हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १०: ध्वज मंदिराचा सुंदर ट्रेक

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
7 Feb 2022 - 4:21 pm

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने...
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ५: है ये जमीं गूंजी गूंजी!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ६: गूंजीचा हँगओव्हर!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ७: सत्गड- कनालीछीना ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ८: ग्रामीण जीवनाची झलक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ९: अदूसोबत केलेला ट्रेक

४ नोव्हेंबरला बूँगाछीना गावामध्ये पूजा पार पडली. उत्तराखण्डमधील सामुदायिक लोक जीवनाचा अनुभव घेता आला. त्या निमित्ताने नातेवाईकांसोबत भेटी गाठी झाल्या. सगळ्यांचे अपडेटस कळाले. आज लक्ष्मीपूजन आहे, त्यामुळे रात्री सत्गडला पोहचायचं आहे. सर्व नातेवाईकांचा व बूँगाछीना गावातल्या रमणीय परिसराचा निरोप घेऊन निघालो. दिवाळीचा दिवस असल्यामुळे पिथौरागढ़ला जाणा-या शेअर जीप्स मिळत नाही आहेत. त्यातच इथल्या सरकारी बस ड्रायव्हर्सचाही कुठे कुठे संप सुरू आहे. त्यामुळे खूप वेळ रस्त्यावर वाट बघत थांबलो. दुपारच्या उन्हात सुखद वाटतंय. पण हळु हळु संध्याकाळ होतेय, तसं स्वेटर चढवावं लागलं. शेवटी बुंगाछीनामधलाच एक जण त्याच्या जीपने सोडायला तयार झाला. इथे पहाड़ी रस्ते आहेत, त्यामुळे वाहनांचा दर तुलनेने बराच जास्त आहे. सरकारी बस साधारणपणे एका किलोमीटरसाठी दोन रूपये घेते तर शेअर जीप चार किंवा पाच रूपये घेते. त्यातच पेट्रोलचे वाढलेले भाव आणि कोरोनामध्ये आलेली मंदी. इथे मुख्य व्यवसाय असलेला पर्यटन उद्योगही प्रभावित झालेला आहे. असो.

बुंगाछीनावरून पिथौरागढ़ला न जाता एक मार्ग डायरेक्ट कनालीछीनाकडे जातो. हा सत्गडचा शॉर्ट कट आहे. इथून मोठी वाहनं तितकी जात नाहीत. हा एक नवीन परिसर बघायला मिळाला. अगदी डोंगराच्या आतमधून जाणारा रस्ता. वाटेत लागणारी छोटी गावं आणि हिरवागार निसर्ग! अक्षरश: देवदारांचं राज्य! इतके दिवस इकडे फिरत असूनही ह्या रस्त्यावरचे नजारे विशेष भावले. तेव्हाच मनात ठरवलं की, जमेल तसा ह्या रोडवर एक ट्रेक नक्की करेन. आणि काही दिवसांमध्येच तो योग आलासुद्धा. ह्या रस्त्यावर ऑक्टोबरमधल्या पावसामुळे झालेली हानी अजून जाणवते आहे. कुठे कुठे रस्ता अगदीच जेमतेम जीप पास होईल इतका छोटा झालाय. अनेक ठिकाणी काही भाग वाहून गेलाय. आणि दूरवर जे नजारे दिसतात, त्यांच्यातही हिरव्यागार वनश्रीमध्ये मोठे पिवळे पट्टे दिसतात. हे पिवळे पट्टे म्हणजे वस्तुत: लँडस्लाईड झालेल्या जागा आहेत. तिथे पाणी जोराने आल्यामुळे जमीन खचली व रस्ता वाहून गेला. झाडंही कोसळली. दूरवर रमणीय दृश्यांमध्ये हा डाग सगळीकडेच दिसतोय...

५ नोव्हेंबरची सकाळ. सगळ्यांनी मिळून पुढच्या गावाला जाण्याचं ठरतंय. जेव्हा दुपारपर्यंत वेळ आहे, असं लक्षात आलं तेव्हा सत्गडच्या अगदी बाजूला असलेल्या ध्वज मंदिराकडे जायचं ठरवलं. अतिशय रमणीय असा हा ट्रेक पूर्वी केलेला होता. ह्या डोंगरावर ह्या परिसरातलं शिखर आहे. आणि इथलं मंदिर पवित्र मानलं जातं. त्यामुळे थंडीमध्ये इच्छा नसूनही आंघोळ करून घ्यावी लागली. इथल्या ट्रेकबद्दल दोन गोष्टी अशा आहेत की, पायवाट अगदी निर्जन आहे. शिवाय सगळीकडे जंगलाचा परिसर. त्यामुळे शक्यतो एकट्याने जाऊ देत नाहीत. आणि पायवाट तशी सोपी आहे, खूप बिकट नाहीय. पण नेमकी पायवाट कळण्यासाठी वाटाड्या हवा. त्यामुळेच इतके दिवस इथे जाता आलं नव्हतं. पण अखेर तो योग आला आणि माझ्यासोबत १० वर्षांचा आदित्य यायला तयार झाला. तो इथे अनेकदा आलाय, त्यामुळे त्याला सगळी वाट माहिती आहे. त्याच्याबरोबर घरच्यांनी पूजेचं साहित्य, हार- उदबत्ती आणि तिथे मुक्कामी असणा-या साधूबाबांसाठी अन्नही दिलं. आणि निघालो मस्त!

साधारण तीन किलोमीटर चढाच्या वाटेवरचा हा ट्रेक आहे. नवख्या ट्रेकर्ससाठी थोडा थकवणारा व कठीण असेल. पण मला अजिबात थकवणारा वाटला नाही आणि कठीणही वाटला नाही. ह्यामध्ये घनदाट देवदारांच्या राज्यातून पायवाट वर चढत जाते. साधारण १९०० मीटर उंचीच्या सत्गडच्या वरच्या टोकापासून सुरू करून ही वाट २४५० मीटर उंचीच्या ध्वज मंदिरापर्यंत जाते. पुरेशी मोठी वाट आहे व आसपास दाट झाडी आहे. त्यामुळे दरीचं एक्स्पोजर नाही. पायवाटेवर दगड छान बसवले आहेत, त्यामुळे काही ठिकाणी भर दुपारीही दवामुळे ओलावा असला तरी पाय घसरत नाहीत. मध्ये मध्ये बसण्याच्या जागाही आहेत. पण ह्यापेक्षा इथे वाघाची भिती जास्त आहे. कारण इकडे अलीकडे वाघाचा वावर खूप वाढला आहे. काही अंतरापर्यंत गवताचे भारे आणणारे लोक ये- जा करतात. पुढे मात्र वाट सरळ शिखराकडे जाते. आम्हाला दोघांना अगदी मंदिर येईपर्यंत कोणीही वाटसरू दिसला नाही.


पर्वतांची दिसे दूर रांग!

पायवाट जशी हळु हळु वर चढली, तसे दूरवरचे नजारे खूपच सुंदर दिसत आहेत. २०१७ मध्ये आलो होतो, तेव्हा आकाश इतकं स्पष्ट नव्हतं. त्यामुळे दूरवरचे शिखर नीट दिसले नव्हते. पण आत्ता ते खूपच सुंदर दिसत आहेत. दूरवरचे हिम- शिखर स्पष्ट दिसत आहेत. अवाक् करणारा अनुभव! त्याबरोबर घनदाट जंगल आणि भर दुपारीसुद्धा थंडी आणि अंधार! मध्येच एका ठिकाणी फडफड असा आवाज आला. एक सेकंद वाघाची भिती वाटली आणि लगेचच कळालं की, हा तर पक्षी आहे. मनसोक्त फोटो घेत घेत साधारण सव्वा तासाने मंदिराजवळ पोहचलो. इथे तीन मंदिर आहेत. एक गुहाही आहे. तिथेही गेलो. इथे राहणारे साधू मंदिर परिसरात नाही दिसले. बाकी काही लोक मात्र दिसले. शंभर एक पाय-या चढून सर्वांत वरच्या मंदिरावर गेलो. मोठी घंटा वाजवली, ती सत्गडमध्येही ऐकू जाते. अप्रतिम नजारे! अक्षरश: एका बाजूला नजरेत न मावणारी हिमशिखर रांग दिसतेय! एका दृष्टीक्षेपात न मावणारी पर्वतांची रांग! खाली सत्गड व बाकीची गावं, दूरवर बारीक रेषांसारखे दिसणारे नागमोडी रस्ते आणि हिमशिखर! विहंगम! खाली सत्गड व बाकीची गावं, दूरवर बारीक रेषांसारखे दिसणारे नागमोडी रस्ते आणि हिमशिखर! आणि अर्थातच अनेक ठिकाणी लँड स्लाईडच्या खुणा. खूप मोठा परिसर नजरेच्या टप्प्यात येतोय! आणि इथे मोबाईलला नेपाळचं रोमिंग लागलं. कारण इथून नेपाळ सीमा जवळ आहे. काही‌ मिनिट इथे ध्यान केलं. आणि परत फिरलो. खालच्या अंगणात एक छोटं मंदिर आहे. आदित्यने मला सांगितलं की, त्याला ह्या मंदिरात भिती वाटते. कारण आतून मंदिराच्या छताकडे बघितलं तर ते खूप जास्त उंच वाटतं आणि बाहेरून ते छोटं दिसतं! आणि खरंच असं जाणवत होतं!

उतरताना वेगाने उतरलो. फक्त एक- दोन ठिकाणी पाय घसरण्याची शक्यता होती, तिथे काळजीपूर्वक उतरलो. आणि अर्थातच अप्रतिम नजारे सतत थांबायला भाग पाडत होते. त्यांना मनामध्ये साठवून घेतलं. दुपार होण्याच्या आत घरी पोहचलो. मंदिरात फिरणं व आदित्यची पूजा ह्यामध्ये जास्त गेला, चालणं दोन तासांच्या आत पूर्ण झालं. अतिशय रमणीय असा हा ट्रेक! पण एका अर्थाने खाली शेताचा परिसर येईपर्यंत मनामध्ये वाघाची दहशत आणि धाकधुक होतीच. चालल्यामुळे आलेली उष्णता कमी झाल्यावर परत थंडी सुरू झाली! दुपारी मनसोक्त ऊन खाल्लं आणि मग आणखी एका गावाला जायला निघालो. बस्तड़ी हे गांव २०१६ मध्ये भूस्खलनामध्ये पूर्ण उद्ध्वस्त झालं. अक्षरश: डोंगराच्या ढिगा-याकडे गाडलं गेलं. त्यात आमचेही अनेक नातेवाईक गेले. त्यातून वाचलेले आता जवळच्या शिंगाली ह्या गावी राहतात. पिथौरागढ़- कनालीछीना- ओगला असा मार्ग आहे. ओगलामध्ये हॉटेलमध्ये चहा घेत होतो तेव्हा बाजूलाच कुमाऊँ रेजिमेंटचे जवानही दिसले! संध्याकाळच्या ऊन्हामध्ये हिमशिखर केशरी रंगाचे दिसत आहेत! शिंगालीला पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली. इथेही मला काही अंतर पायी जायचं होतं, पण अंधार पडत असल्यामुळे मला थांबवलं गेलं. खरंच अगदी आतून पहाड़ी प्रदेश बघायला मिळतोय. तिथल्या आयुष्याच्या कॅनव्हासवरचे असंख्य रंग समोर उलगडत आहेत.

.

पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ११: उद्ध्वस्त बस्तडी गावाच्या परिसरातील ट्रेक

(माझे हिमालय भ्रमंती, ध्यान, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख वरच्या ब्लॉगवर उपलब्ध. निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन इ. संदर्भातील उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर आपला नंबर आणि नाव वरील क्रमांकावर पाठवू शकता. धन्यवाद.)

समाजजीवनमानलेखअनुभव

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

8 Feb 2022 - 12:15 pm | विजुभाऊ

खूप सुंदर लिहीताय हो.
अगदी तेथे असल्यासारखे वाटतय.
फोटो ही खूप मस्त आहेत

Nitin Palkar's picture

8 Feb 2022 - 8:31 pm | Nitin Palkar

+१११

चौथा कोनाडा's picture

8 Feb 2022 - 6:04 pm | चौथा कोनाडा

व्वा, अ ति श य सुंदर !
फोटो तर क्लासिकच !

हा भागही माहितीपुर्ण झाला आहे . फोटोही छान .

आलो आलो's picture

13 Feb 2022 - 5:19 pm | आलो आलो

जबराट लिहिलाय....!

मार्गी's picture

14 Feb 2022 - 5:00 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद!