२-३ आठवड्यांनी येऊन घर बघेन असे सांगून पुन्हा मुंबईस आलो मात्र लवकर परत जाणे शक्य झाले नाही. एकातून दुसरे, दुसर्यातून तिसरे अशी कामे वाढतच चालली होती. गया फिर आज का दिन भी उदास कर के मेरी अशी अवस्था झाली होती. दर वेळेस तृप्तीशी, आई बाबांशी खोटे बोलणे जीवावर येत होते. मात्र सेकंड लाईफ जगण्याची उर्मी वारंवार मनात येत असे. त्या स्वप्नाचा पाठलाग करणे अवघड होत चालले होते. मात्र एप्रिल च्या शेवटी पुन्हा संधी चालून आली. तृप्तीच्या मावस बहिणीचे मे महिन्यात लग्न होते त्यामुळे तिला १५-२० दिवस अगोदरच गावी जायचे होते. शिवाय आई बाबांना देखील गावी जाऊन फार दिवस लोटले होते त्यामुळे ते पण महिनाभर गावी जाऊन राहतो म्हणून मागे लागले होते. ३० एप्रिल ला पहिले आई बाबांना गावी सोडले मग तृप्ती ला तिच्या माहेरी सोडले आणि मी परत मुंबईला आलो.
नंतर येणार्या आठवड्यात शुक्रवार आणि शनिवार रजा टाकून परत वडगाव ला जायचे ठरविले. आर्थिक वर्ष जरी मार्च अखेरीस संपते तरी त्या वर्षाची कामे एप्रिल पर्यंत रेंगाळतात. ती एप्रिल अखेर पर्यंत दिवस रात्र करून संपविल्यामुळे रजा मिळण्यास अडचण झाली नाही. गुरुवारी रातराणी पकडून शुक्रवारी सकाळी तालुक्याला पोहोचलो. लॉज मधे उतरुन अंघोळ वगैरे करुन १० वाजता जनता बँकेत हजर झालो. एरंडे साहेब (बँक मॅनेजर) पण आज निवांत होते. त्यांचे इयर एंडींग पण बहुधा उरकले होते.
"काय साहेब, दोन तीन आठवड्यात येतो सांगून एकदम दोन तीन महिन्यांचीच उगवलात ? अहो तुमच्या साठी मित्राकडे तर बोललोच होतो पण अजून दोन जणांकडे शब्द टाकला होता पण तुम्ही आलाच नाहीत ? " साहेब बोलले.
"माफ करा साहेब, पण इयर एंडींगच्या कामामुळे सुटकाच झाली नाही." मी दिलगीरी व्यक्त केली. साहेबांनी मग २ वाजेपर्यंत काही कामे असतील तर करुन या मग आपण घरे बघायला जाऊ असे सांगीतले. मी पण मग तिथून निघालो. इतर भेटींत नेहमी वेळ कमी असल्यामुळे ह्या भागाची ओळख करुन घेता आली नव्हती. आज वेळ आहे तर बघून घेऊ असा विचार करुन मग आजुबाजूचा परिसर निवांत भटकलो. अर्थात भटकण्याचा उद्देश टेहळणी करण्याचाच होता. एक वाजेपर्यंत भटकून मग जवळच्याच एका छोट्या हॉटेलात जाऊन दुपारचे जेवण करुन पावणे दोन वाजता बँकेत परत आलो. एरंडे साहेबांनी आपल्या सहकार्यांना आवश्यक सुचना देऊन मग आम्ही बाहेर पडलो.
साहेबांच्याच मोटरसायकलवर बसून मग त्यांचे मित्र श्री. गावडे यांच्याकडे गेलो. गावडेंनी कशा प्रकारचे घर हवे आहे वगैरे चौकश्या केल्या. एकटे राहणार की फॅमिली हे पण विचारले. मला एकट्यासाठीच घर हवे आहे ते पण महिन्या दोन महिन्यातून तीन चार दिवस राहण्यासाठी असे म्हटल्यावर ते जोरजोरात हसले. "साहेब पैसा जास्त झाला असेल तर आम्हाला द्या. इकडे तालुक्याला लॉज भरपूर आहेत की. कशाला पैसे घालवता ?" पण मला लॉज मधे राहायला आवडत नाही. तिथे फार अस्वच्छता असते शिवाय इकडून घरी मला ढेकणांची भेट न्यायला आवडणार नाही असे बोललो. बाकी काही नाही पण ढेकणांचा मुद्दा मात्र त्यांना एकदम पटला. मग त्यांनी आम्हाला ३-४ घरे दाखविली मात्र ती मला पसंत पडली नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे आजुबाजूच्या लोकांच्या चौकस नजरा. मला पुढे जे काही करायचे होते त्यात एकांत आणि कमीत कमी जनसंपर्क हवा होता. त्यामुळे मी ती सर्व घरे नापसंत केली. शेवटी गावडे म्हणाले की चला तुम्हाला अजून एक शेवटचे घर दाखवितो. शक्यतो हे घर मी कोणाला दाखवत नाही पण तुम्हाला दाखवितो.
"का बरं , का नाही दाखवित इतरांना ?"
"ते मी तुम्हाला नंतर सांगतो पण अगोदर घर बघून घ्या". बोलता बोलता आम्ही एका बंगल्याजवळ येऊन पोहोचलो.
"चला, आपलं ठिकाण आलं"
"अहो पण मला छोटं घर हवं आहे, बंगला भाड्याने घेण्याइतपत माझी ऐपत नाही".
"नाही, पुर्ण बंगला भाड्याने देण्यासाठी नाहीए. त्याच्या तळमजल्यावर मालकीण बाई राहतात. वरचा मजला भाड्याने देणे आहे, बघायला हरकत नाही".
मी मनात जरा साशंकच होतो मात्र एकदा बघायला काय हरकत आहे असा विचार करुन होकार दिला. दारावरची बेल वाजवली आणि थोड्याच क्षणांत दरवाजा खुद्द मालकीण बाईंनीच उघडला. बाई साधारण पस्तीस ते चाळीशीच्या दरम्यान असाव्यात. अंगावरचे कपडे त्यांच्या आर्थिक सुबत्तेची साक्ष देत होती.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर गावडेंनी मुळ विषयाला हात घातला.
" तुमचं लग्नं झालयं काय ?" मालकीण बाईंनी विचारताच मी एकदम नाही म्हणून गेलो. खरं सांगायच तर कंपनीत काही दिवस हेल्पडेस्कवर बसून काम केल्यामुळे तोंडातून पहिला शब्द नेहमी खोटाच निघत असे. कारण प्रत्येकाला आपली समस्या लगेच सोडवून हवी असे. त्यामुळे इंजिनिअर उपलब्ध नाही, दुसर्या कॉलवर आहे, तुमच्या समस्येवर उपाय शोधणे चालू आहे, अशा सबबी कायम सांगाव्या लागायच्या. त्याचाच परिणाम माझ्या बोलण्यावर झाला होता आणि ही सवय अगदी घरापर्यंत गेली होती. इतकी की तृप्तीला मी एखादी गोष्ट पटवून सांगत असल्यास ती माझ्यावर चिडायची. मी तुझी क्लायंट नाहिये, मला इतकं पटवून सांगू नकोस असे ती मला नेहमी बोलायची.
असो. आता शब्द तर तोंडातून निघून गेला होताच त्यामुळे तेच नाटक पुढे चालू ठेवणं भाग होतं. लग्न झालेलं नाही, महिन्यातुन २-३ दिवसच येणार म्हटल्यावर बाईं थोड्या साशंक झाल्या. मात्र एरंडे साहेब आणी गावडेंनी "माणूस खात्रीचा आहे, काही त्रास होणार नाही." असे पटवायला सुरुवात केली. बाईंचे खाते देखील जनता बँकेतच असल्यामुळे मी डायरेक्ट त्याच बँकेच्या चेकने भाडे देईन म्हटल्यावर त्या निवळल्या आणि वरचा मजला दाखवायला घेऊन गेल्या. वरच्या मजल्यावरुन दिसणारे दृष्य अप्रतिम होते. एका बाजूच्या खिडकीतून लांबच लांब डोंगर रांगा आणि दुसर्या बाजूला अफाट लांबच लांब पसरलेली शेती असा नजारा होता. शिवाय आजुबाजूला वस्ती अगदी विरळ होती. मला हवा असलेला एकांत इथे होता. एक छोटेखानी हॉल, बाजूला छोटेसे किचन आणि एक बेडरुम विथ अटॅच्ड बाथरुम अशी शहरी माणसाला हवी असणारी व्यवस्था होती. बेडरुम मधे कपड्यांसाठी एक कपाट, एक पलंग होताच शिवाय किचन मधे गॅस, थोडीशी रोजच्या उपयोगासाठी लागणारी भांडी देखील होती. म्हणजे मला दोन चार कपड्यांच्या जोड्यांशिवाय इतर काहीच आणण्याची गरज नव्हती. वरच्या मजल्यावरुन मागच्या बाजूला एक जिना उतरत होता त्याने सरळ बंगल्याच्या बाहेर पडता येऊ शकत होते. म्हणजे वरची व्यवस्था अगदीच स्वतंत्र होती. मला ही व्यवस्था अगदी पसंत पडली आणि मी त्वरीत होकार कळविला आणि व्यवहार पक्का करण्यासाठी गावडेंना खुणावले.
गावडेंनी मालकीण बाईंना "आम्हाला जरा विचार करण्यासाठी १० मिनिटे द्या" असे सांगीतल्यावर त्या खाली निघून गेल्या. "साहेब, मी इतरांना ही जागा सुचवित नाही त्याचे कारण स्पष्ट सांगतो. बाईंचे मिस्टर आखातात राहतात आणि ते २-२ वर्ष वर्ष भारतात येत नाहीत.त्यांना मुल बाळ नाही. त्यामुळे बाईंचा पुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोण जरा वेगळा आहे. मात्र त्यांचे एखाद्याशी पटले नाही तर त्याला त्या धडा शिकविल्याशिवाय राहत नाहित अशा अफवा आहेत. त्यामुळे तुम्ही हा करार करावा की नाही हे नीट ठरवून घ्या". मी गोंधळलो मात्र वेगळा दृष्टीकोण म्हणजे नेमके काय ते मला कळाले नाही. मात्र माझ्या सेकंड लाईफ च्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी ही जागा उत्तम आहे त्यामुळे ही संधी हातची घालवायची नाही असा निश्चय केला.
"अहो मला काही त्रास नाही होणार, मुळात मी महिन्या दोन महिन्यांतून २-३ दिवसांसाठी येणार, त्यातही दिवसभर कामात जाणार, फक्त रात्री झोपण्यापुरताच तर मी इथे येणार आहे. त्यामुळे तुम्ही बिंधास्त हा व्यवहार करा". मी खात्री दिल्यावर आम्ही खाली आलो. बाईंना व्यवहाराबद्दल होकार कळविला. बाईंनी चहा आणि मोनॅको बिस्कीट दिली त्याचा समाचार घेतला आणि निरोप घेतला.
गेटमधून थोडे अंतर चालून गेलो आणी सहज मागे वळून मागे पाहिले तर बाई अजूनही दरवाज्यातच उभ्या होत्या. एकटक बघत.. माझ्याकडे.
प्रतिक्रिया
20 Apr 2021 - 8:24 pm | अक्षरमित्र
मागील भागांचे दुवे खालीलप्रमाणे. कृपया अणूक्रमणिका बनविता येईल काय ? धन्यवाद
सेकंड लाईफ
सेकंड लाईफ - भाग २
सेकंड लाईफ - भाग ३
सेकंड लाईफ - भाग ४
सेकंड लाईफ - भाग ५
सेकंड लाईफ - भाग ६
सेकंड लाईफ - भाग ७
20 Apr 2021 - 9:26 pm | गॉडजिला
बिंज वॉचिंगच्या जमान्यात सगळे भाग एकदम टाकायचे अस्त्यात
21 Apr 2021 - 2:56 pm | king_of_net
२०१३ पासुन लेखमाला चालु आहे आणि २०२१ ला भाग ८???
21 Apr 2021 - 9:30 pm | योगी९००
मला आवडलेली लेख माला पण मध्ये खंड पडल्याने परत सगळी वाचावी लागणार.
थोडे मोठे व लवकर भाग टाका. तुमची लेखनशैली छान आहे.
23 Apr 2021 - 10:58 am | सतिश म्हेत्रे
एक नंबर कथा. आवडली. यावर्षीच कथा संपवा म्हणजे झाले. पुढील भागासाठी शुभेच्छा.