यापुर्वीचे भाग आपण येथे वाचु शकता.
अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १)
अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २)
अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ३)
अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ४)
शिवभारतातील भेटीचा तपशीलः-
शिवचरित्र अभ्यासायचे तर एक अस्सल साधन म्हणजे कविंद्र परमानंद लिखित शिवभारत. कविंद्र परमानंद नेवासकर हे शहाजी राजांच्या पदरी होते.शिवाजी महाराज सन १६४२ मध्ये पुणे जहागिरीत आले त्यांच्याबरोबर ते आले असावेत.त्यांनी लिहीलेले शिवभारत उर्फ अनुपुराण हे संस्कृत काव्य हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे एक अस्सल साधन मानले जाते.कारण एकतर परमानंद हे थेट शिवाजी महाराजांचे समकालीन होते.प्रत्यक्ष शिवरायांना भेटून त्यांनी हे प्रसंग त्यांच्याच तोंडून एकले असणार.सहाजिकच या वर्णनाची अधिकृतता जास्ती आहे.एकप्रकारे कविंद्र परमानंद हे शिवरायांचे अधिकृत चरित्रकार मानायला हवेत. शिवभारत या ग्रंथात या अफझलखान भेटीचे नेमेके काय वर्णन आहे ते पाहू. शिवभारतातील या पानावर शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या प्रत्यक्ष भेटीत काय घडले याचे वर्णन वाचायला मिळते.
प्रत्यक्ष अफझलखानाच्या भेटीत काय घडले याचे वर्णन वरील पानावर आपण वाचु शकतो.यामध्ये शिवरायांनी अफझलखानाला मारले ते तलवारीने वाघनखांनी नाही हे स्पष्ट होते.
इथे शिवाजी राजांनी अफझलखानाला मारल्यानंतर प्रतिक्रीया म्हणून कृष्णाजी भास्कर यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या तलवार हल्ल्याचे वर्णन आहे.तसेच स्वतः शिवाजी महाराजांनी पट्ट्याचा वार खानाच्या डोक्याचे तुकडे केले हा ही उल्लेख वाचायला मिळतो आहे.
अफझलखानाच्या भेटीनंतर सय्यद बंडा उर्फ बडा सय्यद व खानाचे इतर सरदार शिवाजी महाराजांवर कसे चालून आले आणि त्यांचा निकाल राजे व त्यांचे साथीदार यांनी कसा लावला ते आपण वाचु शकतो.
वाघनखांचे तथ्यः-
अफझलखानाला शिवाजी महराजांनी वाघनखांनी पोट फाडून कोथळा बाहेर काढला हे वर्षानुवर्षे चालत आलेला समज.पण यात फार तथ्य वाटत नाही.एकतर वाघनख लोखंडाची बनलेली असतात.
वाघनखे परिधान केल्यावर
जरी अंगठीसारखी ती बोटात बसत असली तरी जिथे एकमेकांना भेटायचे आहे तिथे ती स्पष्ट दिसणार.
.
मुळ वाघनख
अफझलखान -शिवाजी राजे यांची भेट निशस्त्र ठरलेली असताना, खानाला सहज दिसतील अशी वाघनखे महाराज परिधान करतील असे वाटत नाही.
.
शिवाय स्वतः महाराजांनी हा प्रसंग शिवभारतकार कविंद्र परमानंदांना सांगितला असावा.कारण काव्य असलेल्या शिवभारतमध्ये फक्त दोनच तिथी येतात.एक शिवाजी महाराजांच्या जन्माची आणि एक अफझलखानाच्या वधाची.शिवभारत या ग्रंथात दिल्याप्रमाणे महाराजांनी बिचव्याचा उपयोग करुन पोट फाडले.
.
बिचवा
अफझलखानाची आडदांड शरीरयष्टी ध्यानात घेता वाघनखांचा फार उपयोग झाला असता असे वाटत नाही,ईथे बिचवाच उपयोगी पडेल.पुढे अज्ञानदासने पोवाडा रचताना तो अधिक रंजक व्हावा म्हणून वाघनख्यांची कल्पना घुसडली असावी.
बीतपशील :-
६५ हत्ती व हत्तिणी सुमार ४००० घोडे सुमार
३,००,००० जडजवाहीर १,२०० उंटे सुमार
२,००० कापड वोझी ७,००,००० नगद व मोहोरा व होन सोने रुपये.
भांडी तोफखाना सर्वही घेतले. कलम १. वजीर पाडाव जाहले :
१ सरदार व वजीर मातबर. १ मंबाजी भोसले, १ अफझलखानाचे पुत्र १ नाटकशाळेचे पुत्र, १ राजेश्री झुंजारराव घाडगे, १ या खेरीज लोक कलम १ येणे प्रमाणे पाडाव केले. या खेरीजही जिन्नस मालमत्ता, गुरेढोरे, बैल, मबलग मत्त पाडाव केले. भांडते लोकांनी तोंडी तृण धरून शरण आले त्यासी व बायकामुले, भट-ब्राह्मण, गोरगरीब असे अनाथ करून सोडिले. राजा पुण्यश्लोक शरणागतास मारीत नाही. याजकरिता त्याचे लोकांनीही कित्येक अनात सोडिले. अफझलखानाचा लेक फजल हा पायी चिरगुटे बांधून झाडीत पळोन गेला. तसेच कित्येक भले लोक पळोन गेले. संख्या न करवे.
जखमी सैनिकांची विचारपूस
ऐशी फत्ते करून जय जाहला. मग राजे याणी खानाचे पुत्रास व सरदार पळून गेले होते, त्यास धरून आणिले. राजा खास प्रतापगडाखाली उतरोन कुल आपले लोक व अफझलखानाचे लोक व त्याचे पुत्र, भांडते माणूस होते, तितकियास भेटून, पोटाशी धरून, दिलासा करून, भांडते लोक जे पडले होते, त्यांच्या लोकास चालविले. पुत्र नाही त्यांच्या बाय्कास निमे वेतन करून चालवावे असे केले. जखमी जाहले त्यास दोनशे होन व शंभर होन, दर आसामीस जखम पाहून दिधले. मोठे मोठे लोक धारकरी जुमले होते, त्यास बक्षीस हत्ती, घोडे दिधले. हस्तकडी, कंठमळा, तुरे, पदके, चौकडे, मोत्यांचे तुरे, कित्येकास बक्षीस फार दिले. ऐसे देणे लोकास दिधले. कित्येकास गावमोकासे बक्षिस दिधले. लोक नावाजिले. दिलासा केला.
विजयोत्सव
मागे कौरवाचा क्षय पांडवांनी केला. असा वीरावीरास झगडा जाहाला. खासा खान राजियाने एकांगी करून मारिला. अफझलखान सामान्य नव्हे. केवळ दुर्योधनच जातीने होता. आंगाचा, बळाचाही तैसाच ! आणि दुष्ट बुद्धीने तैसाच ! त्यास एकले भीमाने मारिला, त्याचप्रमाणे केले. शिवाजी राजाही भीमच ! त्यांनीच अफझल मारिला. हे कर्म मनुष्याचे नव्हे. अवतारीच होता. तरीच हे कर्म केले. यश आले, असे जाहाले. खानाकडील वजीर पाडाव केले होते त्यास वस्त्रे, भूषणे, अश्व देऊन अनाथ करून सोडिले. त्या उपरी राजश्री पंताजीपंतासही उदंड वस्त्रे, अश्व, अलंकार दिधले. अपर द्रव्यही दिधले. खुशाली केली.
राजगडास मातुश्रीस व सर्वासही फत्तेची खबर लिहून पाठविली. त्यानीही वर्तमान ऐकून साखरा वाटून नगरे – करणे केले. भांडी मारिली. मोठी खुशाली केली. येणे रीतीने राजियाकडील वर्तमान जाहाले.
विजापुरी एकच आकांत! :-
त्या उपरि विजापुरास चवथे दिवशी जासूद – हरकारे यांनी खबर पाद्शाहास व पाद्शाहाजादीस जाहीर केली कि, ‘ अफझलखान खासा मारून शिर कापून नेले. कुल लष्कर लुटून फस्त केले, ‘ असे सांगताच अली अदलशाहातक्तावरोन उतरोन महालात जाऊन पलंगावरी निजला. त्याणे बहुत खेद केला. असेच पाद्शाहाजादीसखबर लागताच पलंगावरी बैसली होती तेथेच ” अल्ला ! अल्ला ! खुदा, खुदा ! ” म्हणून अंग पलंगावरी टाकून रडत पडली. ” मुसलमानाची पादशाही खुदाने बुडविली,” ऐसा कित्येक विलाप करून बहुत शोक केला. पाद्शाहाजादीने तीन दिवस अन्न – उदक घेतले नाही. तसेच कुल मोठमोठे वजीर व लष्कर व कुल शहर दिलगीर जाहाले. म्हणू लागले कि, ‘ उद्या राजा येऊन शहर मारील व कोट घेईल ! ‘ ऐसे घाबरे जाहले. खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करून मराठ्यांसी दिली असे वाटते ‘ असे म्हणो लागले.
प्रतापगडी देवीची स्थापना :-
त्या उपरांत मग राजियासी स्वप्नात श्री भवानी तुळजापुरची येऊन बोलू लागली कि, ‘ आपण अफझल तुझ्या हाते मारविला व कित्येक पुढेही आले त्यास पराभवात नेले. पुढेही कर्तव्य उदंड कारण करणे आहे. आपण. तुझ्या राज्यात वास्तव्य करावे. आपली स्थापना करून पूजा – पूजन प्रकार चालविणे. ‘
त्या उपरी राजियाने द्रव्य गाडियावरी घालून ; गंडकीनदीहून गंडकी पाषाण आणून श्री भवानी सिद्ध करून प्रतापगडावर देवीची स्थापना केली. धर्मदान उदंड केला. देवीस रत्नखचित अलंकार भूषणे नानाप्रकारे करून दिली. महाल मोकाशे देऊन सचंतर हवालदार व मुजुमदार व पेशवे देवीचे करून महोच्छाव चालविला. नवस यात्रा सर्वदा तुळजापुरच्याप्रमाणे तेथे चालती झाली. आणि तुळजापूरचे यात्रेस लोक जातात त्यास दृष्टांत स्वप्ने होतात कि, ‘ आपण प्रतापगडास आहे. तेथे तुम्ही जाऊन दर्शन घेणे व नवस फेडणे, ‘ असे देवी बोलू लागली. मोठे जागृत स्थान जाहाले.
युद्धानंतर कारागीर तुळजापूरला पाठवून तुळजाभवानी प्रमाणेच मूर्ती प्रतापगडावर घडविण्यास महाराजांनी सांगितले होते,यावरून असे म्हणण्यास जागा आहे कि मुळ तुळजाभवानीच्या मूर्तीला अपाय झाला नसावा.
प्रतापगड युध्दाचा लष्करीदृष्ट्या विचार :-
प्रतापगडाच्या लढाईत बचावाच्या धोरणाच्या दृष्टीने महाराज्यांना पारघाटाचा व प्रतापगडसारख्या तटबंदीच्या जागेचा अतिशय उपयोग झाला. या युध्दाचा जास्त बारकाईने अभ्यास व विचार करायचा असेल, तर गडाच्या पूर्वेच्या २४ मैलांच्या व उत्तर दक्षिणेकडील ८/१० मैलांच्या सर्व टापूतील प्रदेशाची सूक्ष्म दृष्टीने पहाणी करावी लागेल.
पहाडांच्या सोंडांचा, किल्ल्याचा, नद्यांचा, घाटांचा व खोऱ्यांचा युध्दकौशल्याच्या दृष्टीने किंवा स्थानिक डावपेचांचा विचार करण्याच्या दृष्टीने कसा उपयोग होतो हे युध्दात दिसून येते. महाराजांचे दोन सेनापती शामराजपंत पद्मनाभी व त्रिंबकपंत युध्दात पडले असतानाही त्यांच्या फौजांनी घाबरून जाऊन पळून न जाता शत्रूला तोंड देत आपली कामगिरी फत्ते केली. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्या वेळच्या मानाने कौतुकास्पद आहे. शिवाजीमहाराजांनी आपल्या सैनिकांची मानसिक ताकद अशी वाढविली होती. शिवकालातच या अशा गोष्टी घडू शकल्या. पूर्वी व त्यावेळीही इतर सैन्यांमध्ये सेनापति वा सरदार पडला तर सैनिक पळून जात अशी परंपरा होती.
नंतरच्या काळातही व पुढेही १८०३ पासून १८४३ पर्यंत मराठयांची इंग्रजांबरोबर जी युध्दे झाली त्यातील कांही युध्दात मराठयांचा जय झाला. परंतु त्याचा यथायोग्य फायदा न घेता व माघार घेतल्यामुळे इंग्रजांना यश मिळून मराठयांचा मोड झाला. असे इतिहास सांगतो.
अशा प्रकारच्या घोडचुका महाराजांच्या शिस्तीखाली तयार झालेल्या सेनापतिनी व फौजांनी न केल्यामुळे व आपल्यावर सोपविलेली कामगिरी उत्कृष्ट रीतीने तंतोतंत पार पाडल्यामुळे आपल्याहून दुप्पट-तिप्पटीन असलेल्या शत्रूवरही महाराजांना विजय मिळविता आला.
“हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा!” असा कानमंत्र सामान्य माणसांना देऊन आपल्या नेतृत्वाने त्याच सामान्य माणसांकडून असामान्य इतिहास घडविणारे छत्रपति हे महान राष्ट्रपुरूष होत. त्यांचे चरित्र म्हणजे सावध राजकारणाची, पार्थ पराक्रमाची, पुरोगामी विचारसरणीची, नव-नवोन्मेषशालिनी प्रतिभेची, भगिरथ उद्योगाची, उदात्त चारित्र्याची, दक्ष व निष्कलंक राज्यकारभाराची, अतुल शौर्याची, असीम त्यागाची, समतेची, ममतेची व निस्वार्थी लोकसेवेची गाथाच!
विजापुर मुलुखावर आक्रमण :-
आता खान मेला म्हणून राजे शांत बसले नाहीत, राजांना माहीत होतं, लोखंड गरम आहे तोपर्यंत हातोडा मारला तर कमी ताकदीत जास्त फायदा होतो. एक मोठे युध्द जिंकले म्हणून स्वस्थ न बसता लगेच पुढची चढाई केलेली दिसते.अर्थात याचे नियोजन प्रतापगडाच्या समरप्रसंगाची तयारी करत असताना झाले असणार.एखादा श्रेष्ठ सेनापती कसा विचार करतो याचे हे उत्तम उदाहरण.
इ.स. १६५९ च्या अफझल प्रकरणानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशाही प्रदेशात चढाईचे धोरण स्वीकारले. त्यानुसार सैन्याचे तीन भाग करत एक मोठी तुकडी घेऊन स्वतः शिवाजी राजे पन्हाळ्यावर गेले तर दुसरी तुकडी कोकणातून खाली दक्षिणेला राजापूरपर्यंत गेली. या सैन्यदलाच्या अधिकाऱ्याच्या नाव जरी मिळत नसले तरी दोरोजी म्हणून एक अधिकारी या मोहिमेत सहभागी असून त्याने राजापूर पर्यंत धडक मारल्याचे स्पष्ट होते. कोकणातील या स्वारीचे मुख्य प्रयोजन म्हणजे अफझलच्या आगमनामुळे दक्षिण कोकणातील शिवाजी राजांचे जे अंकित संस्थानिक विजापूरकरांना पुन्हा एकदा रुजू झाले होते, त्यांना नरम करणं हे होय. घाटावर पसरलेल्या इतर तुकड्यांच्या मानाने कोकणातील सैन्य जरी फार मोठं नसलं तरी या मोहिमेत शिवाजी राजांच्या एका राजकीय मुत्सद्देगिरीची, राजकारणाव्यतिरिक्त मैत्रीचीही एक बाजू होती. विजापुरी सरदार रुस्तमजमान हा शिवाजी राजांचा मित्र. त्याच्या हुकेरीच्या जहागिरीला लागूनच बांदा, कुडाळ, वाडी व देवगड तसेच आचरे हि स्थळे असून कुडाळ, वाडी प्रांत देसाई लखम सावंताचा होता. नजीकचे वेंगुर्ला बंदर विजापुरी सरदार खवासखानाच्या अंमलाखाली होते. आचरे हे संस्थान विजापूरचे मांडील होते. म्हणजे उत्तरेतून येणारे शिवाजी राजांचे सैन्य व राजापूरपर्यंतचा प्रदेश जहागिरीदाखल कमवून बसलेला रुस्तम यांच्या एकप्रकारे चिमट्यात विजापुरी मांडलिक, बंदरे अडकली होती.
शिवाजी महाराजांच्या कोकणातील हालचालींकडे शक्य तो दुर्लक्ष करणे हा रुस्तमचा वर्तनक्रम म्हणा वा त्याच्या धोरणाचा भाग असल्याने शिवाजी राजांनीही आपल्या सरदारांना रुस्तमच्या प्रदेशास उपद्रव न देण्याची ताकीद दिली होती. याचा परिणाम म्हणजे महाराजांचे सैन्य कुडाळ पर्यंत येऊन धडकलं व तो भाग त्यांनी ताब्यात घेण्यास आरंभ केला. लखम सावंताने यावेळी इतर लहान मोठ्या संस्थानिकांची मदत घेऊन शिवाजी राजांच्या सैन्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत महाराजांच्या पथक्यांनी कुडाळचा किल्ला जिंकून घेतला. परंतु शत्रूचा फिरून प्रतिहल्ला आल्याने व जवळचे युद्धोपयोगी सामान संपत आल्याने तसेच शिवाजी राजेही पन्हाळ्यावर अडकून पडल्यामुळे कुमकेची आशा खुंटून त्यांनी किल्ला सोडून दिला. हाच प्रकार थोड्या फार फरकाने आचऱ्यास घडून तेथील राजाने शिवाजी राजांच्या लोकांना पिटाळून लावले. मात्र याच सुमारास रुस्तमने कोकणात स्वारी काढून फोंडा व कुडाळ ताब्यात घेत विजापुरास कळवले की, कोकांतील शिवाजी महाराजांच्या सैन्याचा पराभव माझ्या मदतीने व हुकमाने झाला आहे. रुस्तमचे यावेळचे धोरण, वर्तन शिवाजी राजांना अनुकूल असेच होते. त्याने कुडाळकराला मदत करण्याऐवजी त्यालाच रगडून काढण्यास आरंभ केला.
.
कोकणातील या वृत्तांताचा मुख्य आधार पसासं मधील ले. क्र. ८१२ असून स. १६६० च्या एप्रिल मधील या डच पत्रात मराठी साधनांच्या तुलनेने शिवाजी राजांच्या हालचालींची बरीच तपशीलवार माहिती आली आहे.
इकडे तिसरी आघाडी उघडून नेताजींनी १५ दिवसात बराच विजापुरजवळचा प्रांत काबीज केला, राजांनी स्वतः कराडवर हल्ला चढवला, स्वराज्याची सीमा जवळपास पन्हाळ्याजवळ नेला. सगळीकडे महाराजांची दहशत निर्माण झाली. त्या १५ दिवसात राजांनी कृष्णा, वेण्णा, वारणा नद्या ते कर्नाटक पर्यंतचा मुलुख काबीज केला, कराडजवळील वसंतगड अन वर्धनगड स्वराज्यात सामील करून घेतले, म्हणजे मूळ स्वराज्याच्या जवळपास अडीच पट मुलुख राजांनी त्यानंतरच्या पंधरा दिवसात स्वराज्याला जोडला.
या युद्धाने राजांना काय मिळालं??
१) खान आपल्या सैन्यासकट जावळीत बुडाला हे ऐकून विजापूर दरबारात हाहाकार माजला. बडी बेगम तर चक्कर येऊन पडली असे म्हणतात. तर बादशहा औरंगजेबाचे धाबे दणाणले, कारण याच अफझलखानाने एके काळी या औरंगजेबाला वेढ्यात पकडलेले होते. अफझलखान वध हि राजकीय दृष्ट्या फार मोठी गोष्ट घडली,कारण त्यानंतर विजापूरकर या धक्क्यातून सावरायच्या आतच शिवरायांनी स्वराज्य एकाच महिन्यात दुपटीने वाढविले. राजांनी खानाला मारलं ही बातमी वाऱ्यासारखी अवघ्या हिंदुस्थानात पसरली. अन अनेक प्रतिस्पर्धी शाह्यांनी राजांच्या नावाचा धसका घेतला.
२) तर या लढाईत राजांना ३००० गाठी कापड, वर मिळालेले जडजवाहीर, खाली छावणीत सात लक्ष रुपये रोकड, ९० उंट, १४०० घोडी, ४० हत्ती तसेच तोफा ह्या गोष्टी राजांनी जप्त केल्या.
३) प्रतापगडाच्या या युद्धात शिवाजी महाराजांचा आर्थिक, नैतिक, राजकीय असा लाभ बराच घडून आला. तात्कालिक लाभ म्हटल्यास अफझलचा सारा खजिना, दारुगोळा, युद्धोपयोगी जनावरे त्यांच्या ताब्यात आली. खानाचा मृत्यू व शिवाजी राजांची चढती कमान पाहून सिद्दी हिलाल, पांढरे, खराटे आदि सरदार त्यांच्या सेवेत दाखल झाले. नैतिक लाभ म्हणजे या घटनेमुळे शत्रू - मित्रांवर त्यांचा भयंकर वचक बसला व राजकीय फायदा म्हटल्यास या धक्क्यातून त्याचा मुख्य शत्रू --- आदिलशाह सावरण्याच्या आतच शिवाजी महाराजांनी आपल्या पूर्वनियोजित मोहिमेस आरंभ केला. त्यानुसार खानाच्या वाईच्या तळाचा कब्जा घेऊन त्यांची पथके चंदन - वंदन किल्ले काबीज करून खटाव, वडूज, मायणी, मसूर, विसापूर, तासगाव वरून अष्टयाच्या पुढे पन्हाळ्यास येऊन धडकली व दि. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी त्यांनी पन्हाळ्याचा ताबा घेतला. अफझलच्या मृत्यूनंतरचा हा आदिलशाहीवर दुसरा मोठा आघात होता !
४) यानंतर स्वराज्यावर चालून आलेल्या कोणत्याही सरदाराने पुन्हा मंदिराची नासधूस केलेली दिसत नाही.शाहिस्तेखान पुण्यात लालमहालात रहात असूनही त्याने शेजारीच असलेल्या कसबा गणपती किंवा तांबडी जोगेश्वरी मंदिराला उपद्रव दिल्याची नोंद नाही.तसेच बहादुरखान कोकलताश जाफरजंग या औरंगजेबाच्या दुधभावाने दौंडजवळ भीमा नदीच्या काठी भुईकोट बांधला व त्याला स्वताचेच नाव दिले, बहादुरगड.( याच गडात पुढे संभाजी महाराजांना पकडून आणून त्यांचे हाल करण्यात आले ) पण या भुईकोटातील मंदिरेही सुस्थितीत दिसतात.अफझलखान वधाच्या प्रकरणाची हि दहशत म्हणावी काय?
प्रतापगडाच्या युध्दाच्या विश्लेषणाचा शेवट या काव्यपंक्तीने करतो.
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला ...
दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या,
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||धृ.||
वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी,
प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी ,
हादरली धरणि व्योम शेषही शहारला ||१||
खान चालला पुढे, अफाट सैन्य मागुती,
उंट, हत्ती, पालख्याही रांग लांब लांब ती !
टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला ||२||
तुळजापुरची भवानी माय महान मंगला,
राउळात आदमखान दैत्यासह पोचला,
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला ||3||
श्रवणी तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले,
रक्त तापले करात खडग सिध्द जाहले,
देउनी बळी अदास तोशवी भवानीला ||४||
सावधान हो शिवा !! वैर्याची रात्र ही !!
काळ येतसे समीप, साध तूच वेळ ही,
मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ||५||
केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला
संदर्भग्रंथः-
१) शिवभारत- कविंद्र परमानंद
२) सभासदाची बखर- कृष्णाजी अनंत सभासद
३) ९१ कलमी बखर
४) राजाशिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे
५) शिवचरित्र निंबधावली
६) अफझलखानाचा वध- वि.ल.भावे
७ ) छत्रपती शिवाजी-सेतु माधवराव पगडी
८) युगप्रवर्तक शिवाजी महाराज-वा.कृ.भावे
९ ) मराठ्यांची बखर- ग्रँट डफ
१०) शिवाजी अँड हिज टाईम्स- जदुनाथ सरकार
११) पत्रसार संग्रह भाग १,२,३
१२ ) नेताजी पालकर यांचे युध्दातील योगदान
१३) शिवकाल- वि.गो.खोबरेकर
१४) चंद्रराव मोर्यांची बखर
१५) मराठ्यांचा इतिहास- अ.रा.कुलकर्णी,ग.ह.खरे
१६) शिवाजी महाराज चरित्र- कृ.अ.केळुसकर
प्रतिक्रिया
25 Oct 2020 - 11:51 am | दुर्गविहारी
मिसळपाव संस्थळाच्या मालक्,साहित्य संपादक्,असंख्य जाणकार सभासद आणी जगभर पसरलेले वाचक यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
अफझलखान वधाच्या विश्लेषण मालिकेचा हा अंतिम भाग मुद्दाम दसर्या दिवशी प्रकाशित केला. जसे प्राणसंकट येउनही शिवाजी महाराजांनी न डगमगता शांतपणे विचार करुन योग्य उपाययोजना करुन दैत्यासम अफझलखानाचे पारिपत्य केले.तसेच आपण सर्वजण सध्या करोनाच्या जीवघेण्या संकटातून जात आहोत. बहुतेक जणांच्या परिचयातील,नात्यातील कोणाला तरी आपण सगळ्यांनीच गमावले असेल. आईभवानीच्या कृपेने या दहशतीचा शेवट होईल अशी आशा करुया.हेच आपले सीमोल्लंघन असेल.
जय भवानी ! जय शिवराय !!
2 Nov 2020 - 9:59 pm | शशिकांत ओक
याचा वस्तुपाठ आपले लेखन असते. अत्यंत अभ्यासपूर्ण माहितीपर लेखमाला वाचून आनंद झाला.
या संदर्भात निसणीच्या घाटातून खानाच्या मृत्यू झाल्यावर उरलेल्या सरदारांना पळ काढून जाताना जावे लागले होते. तो डोंगरी मार्ग कुठे असेल? खान महाबळेश्वरला वर चढून प्रतापगडावर तायघाटाने आला. याची आठवण झाली.
5 Nov 2020 - 1:15 pm | दुर्गविहारी
याचा नक्की उल्लेख मला सापडला नाही. पण बरोबर प्रतापराव मोरे असल्याने ते निसणीच्या वाटेने वाईकडे गेले असावते असा अंदाज आहे.
बाकी प्रतिसादासाठी धन्यवाद.
25 Oct 2020 - 12:19 pm | बाप्पू
अतिशय अप्रतिम आणि अभ्यासू लेखन..
खूप खूप धन्यवाद दुर्गविहारी जी.. !! _^_
तुमचा गड किल्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे. तुम्ही एखादे youtube चॅनेल का नाही सुरु करत. आधीच असल्यास त्याचे नाव शेअर करा प्लीज.
26 Oct 2020 - 10:46 am | दुर्गविहारी
मनापासून धन्यवाद ! गड्,किल्ले यांची माहिती देणारे अॅप्,यु ट्युब चॅनेल्,ई बुक असे अनेक उपक्रम करायचे ठरविले आहेत.सध्या तरी यु ट्युब चॅनेल नाही,त्यामुळे लिंक देउ शकत नाही.
बाकी आपल्या प्रतिक्रीया प्रोत्साहन देणार्या आहेत.यामुळे आणखी लिखाण करायचा हुरुप येतो.
25 Oct 2020 - 4:20 pm | नावातकायआहे
सुंदर लेखमाला! धन्यवाद दुर्गविहारी!
25 Oct 2020 - 4:30 pm | बेकार तरुण
अतिसुंदर लेखमाला....
खूप खूप धन्यवाद दुर्गविहारी.....
26 Oct 2020 - 8:49 am | सोत्रि
अत्यंत सुंदर, अभ्यासपूर्ण आणि माहितीवर्धक लेखमाला.
पुढील लेखमालेस आगाऊ शुभेच्छा!
- (इतिहासप्रेमी) सोकाजी
26 Oct 2020 - 2:21 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त झाली ही पण लेख माला,
आता थांबू नका, और आने दो, आम्ही वाचायला उत्सुक आहोत.
पैजारबुवा,
26 Oct 2020 - 3:10 pm | नि३सोलपुरकर
अतिशय अभ्यासू आणि अप्रतिम लेखन,लेखमाला अत्यंत सुंदर आणि माहितीपुर्ण झाले आहे .
खूप खूप धन्यवाद दुर्गविहारी... पुलेशु
आपली पुढील लेखमाला वाचायला उत्सुक
- नि३
27 Oct 2020 - 3:07 am | वीणा३
मस्त लेखमाला!!! पुढील लेखमालेस शुभेच्छा !!!
27 Oct 2020 - 8:03 am | शेखरमोघे
अत्यंत माहितीपुर्ण लेखमाला
27 Oct 2020 - 11:43 am | भीमराव
जय शिवराय,
शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक असामान्य घटना घेऊन तुम्ही केलेलं हे लेखन अभ्यासपूर्ण आहे. याचं पुस्तक रुपाने प्रकाशन करावं.
2 Nov 2020 - 4:06 pm | इरसाल
भारीच. पुढील दुसर्या लेखमालिकेच्या प्रतिक्षेत.
3 Nov 2020 - 6:32 am | विजुभाऊ
धन्यवाद आभार. इतकी सुंदर लेखमाला दिल्याबद्दल
3 Nov 2020 - 4:28 pm | तुषार काळभोर
तुमचे दुर्ग भटकंतीचे लेख वेगळे असतातच. पण अफजलखान वधासारख्या ऐतिहासिक घटनेचा इतका विस्तृत, तपशीलवार, अभ्यासपूर्ण मागोवा कधी वाचल्याचे स्मरत नाही.
मस्त!
अजून काही ऐतिहासिक घटनांविषयी तुमच्या अभ्यासू शैलीत वाचायला आवडेल!
5 Nov 2020 - 1:19 pm | दुर्गविहारी
प्रतिसाद देणार्या सर्वच मिपाकरांना आणि वाचकांना मनापासून धन्यवाद. खरतर "स्वराज्याचा तिढा आणि पुरंदरचा लढा" हि पुढची मालिका लिहून तयार आहे.पण दिवाळी नंतर ती पोस्ट करतो. यामध्ये शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नाचे विश्लेषण केले आहे.
त्यानंतर शाहिस्तेखानावर सर्जिकल स्ट्राईकवरची कथामालिका लिहीणार आहे.
5 Nov 2020 - 2:06 pm | तुषार काळभोर
देव तुमचं भलं करो!