होतकरू अभिनेता झाल्यावर मी आपोआपच होतकरू अभिनेत्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये दाखल झालो. यात फक्त अभिनेते अन् अभिनेत्रीच नव्हे, तर दिग्दर्शक, शूटिंगचं सामान भाड्यानी देणारे, साउंड रेकॉर्डिस्ट, अभिनयाचे आणि तत्सम इतर क्लासेस चालवणारे वगैरे सगळेच सामावलेले असतात. त्या विषयाशी संलग्न सर्व प्रकारच्या बातम्या इथे समजतात.
एक हिंदी आणि एक मराठी चित्रपटासाठी अमुक रविवारी अमुक कंपनीच्या ऑफिसमध्ये ऑडिशन होणार असल्याची बातमी आली. त्या रविवारी मी कॉलेजच्या कामासाठी पुण्याच्या बाहेर असणार असल्यामुळे मी त्यांना फोन करून माझी ऑडिशन आधी घेण्याची विनंती केली. तेव्हां त्यांनी मला सांगितलं, "आधी घेऊ शकत नाही, पण तुम्ही परत आल्यावर फोन करा. नंतर घेऊ."
आल्यावर असं कळलं की तीच कंपनी दिग्दर्शनाचे, सिनेमॅटोग्राफीचे आणि अभिनयाचे वर्ग सुरू करणार होते आणि आपल्या कडे असलेलं infrastructure सर्वांना दाखवण्यासाठी दोन आठवड्यांनी एका रविवारी सकाळी एक प्रेझेंटेशन देणार होते. निश्शुल्क. प्रेझेंटेशन संपलं की माझी ऑडिशन घ्यायचं ठरलं.
पूर्वग्रह म्हणा किंवा शंकेखोर म्हणा, 'नि:श्शुल्क' म्हटलं की माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकतेच!
पोहोचल्यावर लक्षात आलं की तीन मजली पूर्ण इमारतच या कंपनीच्या मालकीची आहे. पॉश नसेल, पण स्वच्छ होती, नवी होती, आणि पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी अशी बिल्डिंग असणं काही खायचं काम नाही. चुकचुकणारी पाल चुप बसली.
रिसेप्शनिस्टनी फॉर्म भरून घेतला आणि दुसर्या मजल्यावरच्या वर्गात जाऊन बसायला सांगितलं. मी वर्गाच्या दरवाज्यामधून आत पाऊल ठेवलं मात्र, आत बसलेल्या पंधराएक विद्यार्थ्यांनी उठण्यासाठी खुर्च्या मागे ढकलल्या!
वीसची कपॅसिटी असलेल्या वर्गात साधारण दहा मुलगे आणि पाच मुली अशी पंधरा डोकी होती. वय वर्षे वीस ते तीस. मला पाहून त्यांना वाटलं असणार शिक्षकच आले!
ते बघून मला एक आयडिया सुचली!
मीच शिक्षक असल्याच्या आविर्भावात टेबलापाशी उभा राहिलो. गुड मॉर्निंग वगैरे झाल्यावर म्हटलं, "एक बातमी आहे. काय असेल?"
एकच कल्ला झाला! "ऑडिशनचा रिसल्ट लागला असेल!" दोन आठवड्यांपूर्वी हेच सगळे ऑडिशनसाठी आले होते. होतकरू अभिनेत्यांच्या जगतात बातमी म्हटलं की ती एकच असू शकते!
"इतकी चांगली बातमी नाहिये." थोडा पॉज घेऊन सगळ्यांकडे नजर फिरवत, "आजचा प्रोग्रॅम काही अपरिहार्य कारणास्तव आम्हाला कॅन्सल करावा लागतोय." मी.
प्रत्येकाची / प्रत्येकीची रिअॅक्शन थोडी वेगवेगळी होती, पण ती साधारण कशी असेल ह्याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल!
"पण का?", "आधी नाही का सांगायचं?", "तुम्ही तर आला आहात, तुम्हीच द्या प्रेझेंटेशन." वगैरे वगैरे.
"तुम्हाला कारण सांगून काही फरक पडणार आहे का? जर आम्ही तो प्रॉब्लेम सोडवू शकत असतो तर आम्ही इतक्या मेहनतीनी आणि खर्चानी प्लॅन केलेलं प्रेझेंटेशन रद्द करू का?" मी.
मुली पहिल्या ओळीत बसल्या होत्या. त्यातली एक काकुळतीला आली होती! "सर, मी शिरूरहून आलिये, आमच्या घरी कोणालाही अॅक्टिंग करणं पसंत नाही. किती मुश्किलीनी मी आलिये! आणि आता हे?" बिचारीचे अश्रू अगदी पडण्याच्या बेतात होते!
"मला वाईट तर वाटतंच आहे बेटी, तुझं कौतुकही वाटतंय. पण काही गोष्टींना नाइलाजच असतो. ते कोणाच्याच हातांत नसतं."
दोनचार मिनिटं असा वाद चालला. रद्द केल्याबद्दल मला फारसं वाईट वाटंत नाहिये हे लक्षात आल्यावर मुलांच्या आवाजाला धार आली!
"कॅन्सल करण्याचं कधी ठरलं?" एका मुलानी रागारागांत विचारलं.
"ही आत्ता दहा मिनिटं झाली असतील." मी फारसा विचार न करता उत्तर दिलं.
"शक्यच नाही. मी पाच मिनिटापूर्वी आलो. रिसेप्शनिस्टनी मला वर यायला सांगितलं."
मी मनातल्या मनात जीभ चावली. माझा निष्काळजीपणा झाला होता. आता त्याला काय उत्तर द्यावं अशा विचारात असतानाच दरवाजातून एक हेल्पर टाइपचा मुलगा आत आला. त्याच्या हातात एक ट्रे होता. त्यावर कॉफीची किटली आणि बरेचसे डिस्पोसेबल पेले होते.
माझ्या हाती कोलीत मिळालं. मीही माझा आवाज चढवला, "हे बघ, एक तर हे प्रेझेंटेशन फुकट आहे. वर रिफ्रेशमेन्ट्स देखील आम्ही देतोय. त्यामुळे आवाज वाढवायचं काम नाही. कळलं?"
आता मात्र त्याची सटकली.
"मी सरांनाच भेटतो. हे कोण लागून गेले? आम्हाला काय भीक लागलिये काय? म्हणे रिफ्रेशमेन्ट्स देतोय." असं म्हणंत दाणदाण पाय आपटत तो बाहेर गेला.
तो बाहेर गेल्याबरोबर मी अनाउन्स केलं. "आता खरं काय तो ऐका. मी काही सर नाही. तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे आणि प्रेझेंटेशन कॅन्सल वगैरे झालेलं नाही. मी सगळ्यांची भंकस केली!"
एकदम गलका झाला! "काय टेन्शन दिलंत राव!", "च्यायला. आम्हाला खरंच वाटलं" एकंदर चांगलाच हशा झाला. त्या रडवेल्या मुलीच्या चेहर्यावरचा आनंद बघून माझी अपराधीपणाची भावनाही नाहिशी झाली.
मी दोन्ही हातांनी थांबायची खूण केली. "खरी मजा पुढेच आहे. आपण सगळे अॅक्टर बनायला आलोय. आता खरी अॅक्टिंग करायची. आता तो आणि सर आले की सगळ्यांनी म्हणायचं की असं काही झालंच नाही! ओके?
शेवटी सरांना खरं तर आपण सांगणारच आहोत. पण तोपर्यंत जी मजा करायची त्यात चांगली अॅक्टिंग करून सरांना impress करायचं आहे. लक्षात ठेवा, अजून ऑडिशनचा निकाल लागायचा आहे!"
सगळेच तिशीच्या आतले. मला वाटलं होतं की उत्साहानी सगळे सामील होतील. पण तसं काही झालं नाही. एकमेकाकडे द्विधा मनस्थितीत बघू लागले.
मात्र शिरूरच्या मुलीला आयडिया एकदम पसंत पडली!
"अरे घाबरताय काय? करूया ना!" ती.
एखाद्या मुलीनी "घाबरताय काय?" असं विचारणं म्हणजे मुलांना टेस्टोस्टरोनचं इंजेक्शन दिल्यासारखंच असतं! माना डोलल्या.
अपेक्षेप्रमाणे काही मिनिटांतच तो मुलगा, त्याच्यामागोमाग थोडेसे चिडलेले सर आणि रिसेप्शनिस्ट असे वर्गात शिरले.
मी विद्यार्थ्यांमध्ये बसलेला पाहून तो मुलगा क्षणभर गोंधळला पण लगेच सावरला.
" ह्यांनी सांगितलं." माझ्याकडे बोट दाखवून.
"काय सांगितलं?" मी. चेहर्यावर शक्य तितकं आश्चर्य!
"कॅन्सल झालं म्हणलात ना!" तो.
"आँ? कोण? मी? Are you crazy? मी असं कशाला सांगीन?" चमकून आजूबाजूच्या विद्यार्थ्यांकडे बघायला लागलो! हा असे काय वाटेल ते आरोप करतोय असा आविर्भाव!
"अरे सांग ना सरांना हे काय बोलले ते!" हे त्याच्या शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याला उद्देशून.
"काय बोलले ते?" तो पण साळसूद.
"तुम्ही सगळ्यांनी ऐकलं ना? अरे मग बो-ला-की!" हे जोरात सगळ्यांना उद्देशून. सगळे निर्विकार.
त्या मुलाला कळे ना काय करावं ते. मुलगे खोटं बोलतात सर्रास. पण मुली नाहीत. तो शिरूरच्या मुलीकडे वळला.
"तू तरी खरं सांग की!"
"खरं म्हणजे? बाकीचे काय खोटं बोलतायत?" ती.
आता मात्र त्याचं सगळं अवसानच गळालं. त्याचा आवाज त्या मुलीहून केविलवाणा झाला! "शप्पथ सर, इथे - - - इथे उभं राहून त्यांनी सांगितलं! सगळे खोटं बोलतायत. आई शप्पथ!”
त्याचा क्षीण आवाज ऐकून मात्र माझ्यासकट कोणालाच कंट्रोल करता येई ना! हास्यस्फोट झाला!
काय झालं ह्याची कल्पना येऊन सरही हसायला लागले. मी उठून त्या मुलाकडे गेलो, त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हटलं, "सॉरी बॉस. पण तुला खरं वाटलं की नाही?"
मात्र त्यानी झालेला विनोद अजिबात appreciate केला नाही. माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून आपल्या जागेवर जाऊन बसला.
कायकाय झालं हे मी सरांना सांगितलं. वर्ग शांत व्हायला मिनिटभर लागलं. मग सरांनी आणि त्यांच्या असिस्टंटनी प्रेझेंटेशन द्यायला सुरवात केली. तीन तासांचं उत्तम प्रेझेंटेशन झालं.
संपल्यावर मी सरांना माझ्या ऑडिशनबद्दल विचारलं. "आता जरूरच काय ऑडिशनची?" ते म्हणाले, "मी तुमचं अॅक्टिंग बघितलं आणि कॉन्फिडन्सही. तुमचं शो रील मला पाठवून द्या. तुमच्या योग्य रोल असला की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो."
त्यातून काही निष्पन्न होईल अथवा नाही. मात्र अर्धा दिवस मजेत गेला आणि होतकरूंच्या आणखी एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मी सामील झालो एवढं खरं.
प्रतिक्रिया
17 Apr 2019 - 12:51 pm | यशोधरा
भारी भंकस केलीत की!
पण जरा जपून हो. त्या मुलीला रडू यायचं राहिलं आणि तो मुलगा फक्त चिडला, एखादा माथेफिरू डोक्यात दांडका घालायचा.
17 Apr 2019 - 1:03 pm | सिक्रेटसुपरस्टार
मात्र त्यानी झालेला विनोद अजिबात appreciate केला नाही. माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून आपल्या जागेवर जाऊन बसला.
>> मीही नाही केला. स्वतःला त्या मुलांच्या जागी ठेवून पाहिलं आणि फार वाईट वाटलं. कोण कुठल्या परिस्थितीतून तिथे आलंय हे आपल्याला माहीत नसताना, ज्यांना आपण किंचितही ओळखत नाही अशा लोकांच्या का खोड्या काढायच्या? तुम्ही वयाने मोठे दिसता, केवळ हौस म्हणून तिथे गेला असाल, पण कुणी स्वतःच्या आणि घरच्यांच्या पोटासाठी तिथे आलं नसेल कशावरून? फार भाबडे विचार असतील हे पण सॉरी बॉस हे तुम्ही बरोबर नाही केलंत.
पहिल्याच नकारात्मक प्रतिसादाबद्दल माफ करा. ही गोष्ट इतकी रंगवून सांगण्यासारखी मुळीच नाही.
17 Apr 2019 - 1:11 pm | टर्मीनेटर
धमाल किस्सा! मजा आली वाचायला.
17 Apr 2019 - 1:31 pm | अनिंद्य
मिश्किल अनुभव आवडला :-)
तिथे सगळे ऍक्टर बनायलाच आले असल्यामुळे त्यांना जोक पोचला आणि पचला असावा.
Being such sport is not common now, so kudos to you and the team of youngsters !
17 Apr 2019 - 2:34 pm | अन्या बुद्धे
धमाल किस्सा.. टेन्शन दिलंत त्यांना पण टेन्शन रिलीजचा आनंद देखील.. सो सगळं ओक्के:)
17 Apr 2019 - 2:58 pm | स्वीट टॉकर
यशोधरा, टर्मिनेटर आणिअनिंद्य,
धन्यवाद.
सिक्रेटसुपरस्टार, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मात्र जे या करियरबद्दल सीरियस असतात ते FTII, व्हिसलिंग वुड्स वगैरे ठिकाणी प्रयत्न करतात. ती मंडळी पोटापाण्यासाठी करू इच्छिणारी.
मी गेलो होतो तशा क्लासेसमध्येत हौशे नवशे. जर अगदी मिळाल्याच तर त्यातून मिळणार्या छोट्यामोठ्या भूमिकांतून घरच्यांचं तर सोडाच, स्वतःचं देखील पोट भरण्याची शक्यता नाही. हौस मात्र भागते यात वाद नाही.
'स्वतःच्या किंवा घरच्यांच्या पोटासाठी' असे शब्द वापरले की त्याला एक खिन्नतेची किनार येते. त्याबद्दल कुठलाही विनोद हा अस्थायीच असतो. तशी स्थिती तिथे नव्हती.
मात्र तुमच्या मताचा मी आदर करतो.
17 Apr 2019 - 7:27 pm | मिसळपाव
क्या बात :-). पक्के 'प्रँकस्टर' आहात तर! तुम्ही जहाजवासी आहात/होतात. पण "कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढाल"च्या चालीवर म्हणायचं तर "मेडीकलला असतात तर रॅगिंग करण्यात नाव काढलं असतंत" :-)
बाय द वे, पॉप क्वीझ - शिरूरची मुलगी धाय मोकलून रडायला लागली असती तर काय केलं असतंत? त्या प्रसंगात आहात, ढोंग ईतक्यात गुंडाळता येणार नाहीये असं समजून दहा सेकंदात उत्तर द्या !!
18 Apr 2019 - 10:09 am | स्वीट टॉकर
दहा सेकंदात म्हणाल तर लगेचच्या लगेच गुंडाळलं असतं. लगेच खरं सांगितलं असतं. मस्करीची कुस्करी होऊ देणं बरं नव्हे!
18 Apr 2019 - 11:26 am | सोन्या बागलाणकर
आवडेश!
धमाल प्रॅन्क!
18 Apr 2019 - 11:38 am | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
तुमच्यात एक खोडकर मुलगा लपलेला आहे, हा अंदाज तुमच्या आतापर्यंतच्या लिखाणावरून केला होताच. आता तर तुम्ही स्वतःच त्याचा सज्जड पुरावा दिला आहात ! :)
18 Apr 2019 - 2:38 pm | स्वीट टॉकर
सोन्याभाऊ आणि डॉक्टरसाहेब,
धन्यवाद ! :)
18 Apr 2019 - 5:54 pm | गामा पैलवान
स्वीट टॉकर,
भारी किस्सा आहे. एका विक्री प्रतिनिधीने मुलाखतीच्या ठिकाणी असंच काहीसं केल्याचं आठवलं. त्याने सरळ मुलाखती घ्यायला सुरुवात केली होती. त्यावरून तुमचा प्रसंग कुठे चाललाय याचा अंदाज आला.
मात्र जळजळीत कटाक्ष वगैरे प्रकरण जरा जास्त तापलेलं वाटलं. त्याला थंड करण्यासाठी मुद्राभिनय उत्तम जमल्याची उत्तेजनार्थ शाबासकी दिलेली चालून गेली असती.
आ.न.,
-गा.पै.
18 Apr 2019 - 7:31 pm | शेखरमोघे
लई भारी. 'नि:श्शुल्क' म्हटलं की माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकतेच - असे म्हणताय - त्यावरही काही किस्से असतील तर जरूर लिहा.
18 Apr 2019 - 10:30 pm | दुर्गविहारी
:-) छान लिहिले आहे. मजा आली वाचून.
19 Apr 2019 - 5:59 am | चामुंडराय
भले ! जबरी किस्सा आहे हा :)
मझा आला वाचताना. तुमचा या आधीचा दुसऱ्या कि तिसऱ्या इनिंगचा धागा वाचलेला आठवतोय. ऑडिशन साठी गेलात म्हणजे तुम्ही अभिनयाकडे गंभीरतेने पाहताय तर.
पुढील वाटचाली करिता शुभेच्छा गोडबोले साहेब.
19 Apr 2019 - 6:40 am | चित्रगुप्त
आवडले रे लेखन आणि तो प्रसंग स्वीटटॉकरा. नाटक- सिनेमाच्या धंद्यात शिरु पहाणार्या तिथे आलेल्या मुला-मुलींना पुढील आयुष्यात याही पेक्षा बिकट प्रसंग, निराशा, फसवणूक, शोषण वगैरेंचे शिकार होण्याचे प्रसंग येऊ घातले आहेत, त्या मानाने हे अगदीच निरुपद्रवी आणि मजेशीर. एक प्रकारे तू थोडीशी चुणूक आधीच दाखावलीस हे बेष्टच, असे 'ह्यांचे' मत.
-- बाईसाहेब नटरंगीकर..
19 Apr 2019 - 8:10 pm | उपेक्षित
मस्त किस्सा,
21 Apr 2019 - 12:50 pm | स्वीट टॉकर
धन्यवाद.
गा पै
पुढे व्यवस्थित झालं. प्रेझेंटेशन नंतर बाहेर पडल्यावर सगळ्यांना उसाचा रस पाजला. तेव्हां त्या मुलानी रिसेप्शनजवळ झालेली मजा सांगितली. भरपूर हसून पांगलो.
21 Apr 2019 - 8:41 pm | कंजूस
नावाला जागून काही वेगळेच फेकायला हवे होते.
22 Apr 2019 - 9:43 am | स्वीट टॉकर
वेगळेच म्हणजे?
26 Apr 2019 - 10:40 am | कंजूस
पास झाला/ पहिला नंबर आला/ नापास झाला तर कसे व्यक्त कराल याचे अॅक्टिंग करा वगैरे.
23 Apr 2019 - 12:26 pm | mayu4u
नंतर सगळ्यांना उसाचा रस पाजलात, ते ब्येष्ट केलंत!
24 Apr 2019 - 10:21 pm | नाखु
मस्करीची कुस्करी होऊ दिली नाही हेच जास्त आवडले.
आणि हो अभिनय कामासाठी शुभेच्छा
25 Apr 2019 - 2:00 pm | स्वीट टॉकर
mayu4u आणि नाखु,
धन्यवाद!
30 Apr 2019 - 5:21 pm | सस्नेह
चांगलेच बनेल दिसत की हो तुम्ही ! =))
1 May 2019 - 12:04 pm | स्वीट टॉकर
@स्नेहांकिता
:)