सकाळी सात वाजले तरी आपल्या अतिभव्य बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरच्या बेडरूमच्या टेरेस वर उभी राहून शांभवी विचार करत होती. समोर उधळणाऱ्या लाटा आज तिचं मन हलकं करत नव्हत्या. अथर्व च्या मागं लागून तिनं हा सी फेस बंगला विकत घेतला होता. शहराबाहेर दूर आणि समुद्र किनारी असलेल्या ह्या बंगल्यात दुसऱ्या मजल्यावर तिची आणि अथर्व ची शानदार बेडरूम होती. सोबतच साथ देणारा घोंघावता खारा वारा आणि लाटांचा उमदा आवाज तिला खूप आवडायचा. बेडरूमच्या टेरेस वर उभी राहून ती तासंतास समुद्राकडे बघत राही पण आज मात्र तिला तो आवाज भेसूर वाटत होता. ह्या समुद्राने आपल्याला त्याच्यात सामावून घ्यावे आणि या जगासाठी आपण एका क्षणात नाहीसे व्हावे असे तिला वाटत होते. काल रात्रीच्या प्रसंगानंतर रात्रभर तिला झोप लागली नव्हती. शेजारी झोपलेल्या अथर्व कडे बघून तिच्या डोळ्यात पाणी आणि मनात अपराधी भावना येत होती. पहाटे लवकर उठून एक कडक कॉफी घेतल्यावर तरी बरं वाटेल असं वाटून पहाटेच ती टेरेस वर उभी होती. रात्रभर झोप न झाल्याने आणि खूप जास्त विचार केल्याने तिला थकवा वाटत होता. पण आज काही झालं तरी हा अध्याय संपवायचा तिनं निर्णय घेतला होता. सकाळी नऊ वाजता अमितने काल सांगितलेल्या ठिकाणी भेटायचं वचन तिनं त्याला दिल होतं पण त्याला भेटण्याचा दरवेळ सारखा उत्साह मात्र आज राहिला नव्हता.
अमित.. तरुण, देखणा, राजबिंडा, एका मोठ्या कंपनीचा वाईस प्रेसिडेंट आणि तिच्या दुसऱ्या पण समांतर आयुष्याचा एकमेव साक्षीदार. अमित चा विचार आल्यावर आपसूक त्याच्या बरोबर घालवलेल्या धुंद क्षणांना आठवून तिच्या ओठावर मंद हसू आलं पण दुसऱ्याच क्षणी त्याची जागा परत खोल विचारांनी घेतली. खोल विचार.. अगदी समोर अंथरलेल्या सागरासारखे गूढ पण तरीही अथांग.
-----
शांभवी परांजपे म्हणजे सौदर्याची जिवंत व्याख्याच जणू. सोनचाफ्यासारखा रंग, सोनकळीसारखं नाक, खांद्यावर रुळणारे कुरळे केस आणि गुलाबी ओठांवर असणारं फुलं उधळणारं हसू. कुणीही मागं वळून पाहावं असं आरस्पानी सौदर्य म्हणजे शांभवी. एका नामांकित युनिव्हर्सिटी मधून एम बी ए झाल्यावर ए बी एस ग्रुप नावाच्या एका मोठ्या कंपनी मध्ये ती मार्केटिंग डिपार्टमेंटला रुजू झाली. मुळातच हुशार आणि स्मार्ट असल्यामुळं अगदी कमी वेळातच शांभवी कंपनीचा केंद्रबिंदू बनली. शांभवी तशी मितभाषी, कुणाच्यात जास्त न मिसळणारी, आपण आणि आपलं काम ह्यातच लक्ष घालणारी पण तरीही कुणी काही मदत मागितली तर मात्र जीव तोडून मदत करणारी असल्यामुळं ती पुरुष कलीग्स मध्ये कौतुकाचा तर स्त्री कलीग्स मध्ये गॉसिप चा विषय ठरत होती. हे आपलं आगळं वेगळं वलय सांभाळत शांभवी मात्र प्रत्येक नवा दिवस स्वतःला सिद्ध करत पुढं जात होती. अर्थातच फक्त तीन वर्षांच्या कमी वेळात ती मार्केटिंग डिपार्टमेंट ची हेड बनली होती.
"गुड मॉर्निंग ऑल, मी अथर्व सरपोतदार, ए बी एस ग्रुप ऑफ कंपनीचा नवीन सी इ ओ. नुकताच लंडन मधून एम एस करून परत भारतात आलोय आणि आज ए बी एस ग्रुप ला जॉईन करतोय. ए बी एस ग्रुप म्हणजे बाबांचं ध्येय आणि स्वप्नच नाही तर त्यांचं आयुष्य होतं. आणि आता ह्या स्वप्नांच्या पंखांनी आणखी उंच भरारी घ्यावी आणि येत्या पाच वर्षांत ए बी एस ग्रुपचं नाव फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही नावाजलं जावं हा माझा ध्यास आहे. तुम्ही सगळे जण ह्या कंपनीचे आधारस्तंभ आहात, कर्तव्यदक्ष आणि जबाबदार आहात आणि म्हणूनच मला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची अतिशय गरज आहे. आज पासून आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आपल्या कंपनीचं नाव साता समुद्रापार न्यावं अशी माझी इच्छा आहे. सो गाईज , लेट्स मेक धिस ड्रीम कम ट्रू ."
सगळ्यांचा इंट्रो झाल्यावर मीटिंग संपली पण अथर्वच्या तडफदार व्यक्तिमत्वाची छाप आणि मधाळ शब्दांच्या जादू मुळे सगळेच जण जीव टाकून कामाला लागले. पुढचे सहा महिने कुणालाही कामाशिवाय काहीच सुचलं नाही. रात्री ११ वाजेपर्यंत मिटींग्स चालायच्या, नवनवीन अढाखे बांधले जायचे, चर्चा व्हायच्या, ए बी एस ग्रुपच्या विस्तारासाठी सगळ्यांचे अनुभव, वेळ आणि मेहेनत कामाला लागली होती आणि बघता बघता सहा महिन्यांनंतर संपूर्ण प्रोजेक्टचा आराखडा पूर्ण झाला. कुणी काय, कसे आणि कधी करायचे ह्याचा तपशीलवार अहवाल बनवला गेला. आता फक्त ह्या बनवलेल्या योजने प्रमाणे काम करायचं बाकी होतं. शेवटच्या मीटिंग मध्ये अथर्वने सगळ्यांचे तोंड भरून कौतुक केले आणि त्याच्या फार्म हाऊसमध्ये सगळ्यांसाठी एक पार्टी प्लॅन केली.
काळ्या रंगाच्या शिमर बॅकलेस गाउन मध्ये शांभवी अतिशय सुंदर दिसत होती. पार्टी हॉल मध्ये आल्यापासून सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच होत्या, सगळीकडं तिच्याबद्दलच कुजबुज चालली होती आणि म्हणूनच कुणाशीही जास्त न बोलता फक्त हसून सगळ्यांना शुभेच्छा देत ती हॉल च्या सगळ्यात कोपऱ्यात जाऊन बसली.
"एक वर्जिनो मोजितो प्लीज " तिने शेजारून जाणाऱ्या वेटर ला ऑर्डर दिली.
हातातल्या कॉकटेल आणि भोवतालच्या संगीताचा आस्वाद घेत ती स्वतःमध्येच मग्न असताना मागून एक आवाज आला "हॅलो मिस शांभवी, मी येथे बसू शकतो का?"
"ओह्ह! अथर्व सर" तीन हातानंच समोर बसायला सांगितलं.
अथर्वने आपल्या काळ्या ब्लेझरचे शेवटचे बटन सैल केले आणि हातातल्या व्हिस्कीचा सिप घेत तो शांभवी च्या समोर असलेल्या खुर्ची वर बसला.
"तुम्ही अश्या एकट्याच इथं सगळ्यांपासून दूर येऊन बसला आहात, सगळं ठीक आहे ना?" आपल्या भरदार पण काळजीच्या सूरात अथर्वने शांभवीला विचारले.
"असं काही नाही सर, खरं तर मला सगळ्यांच्यात मिसळायला जास्त आवडत नाही. ऑफिस मध्ये कामाच्या वेळेत एक टीम म्हणून काम करणं वेगळं पण ऑफिस बाहेर असं सोशल व्हायला जमत नाही"
"पण का?" अथर्व चा परत एक प्रश्न.
"असं काही खास कारण नाही पण चार लोकांच्यात मिसळलं कि नको त्या चर्चा, गप्पा ह्यात उगाचच मन भरकटतं आणि मग आपण कधी त्या सगळ्याचा एक हिस्सा होऊन जातो ते आपलं आपल्यालाच कळत नाही. दुसरं म्हणजे मला एकांत आवडतो, मी स्वतःबरोबर राहणं जास्त पसंत करते. मग कधी वेळ मिळाला की पैंटिंग्स काढते तर कधी कविता करते"
"होल्ड ऑन ... आय मीन तुम्ही कविता करता? पैंटिंग्स बनवता ? माझा तर विश्वासच बसत नाहीये. मला तर वाटलेलं कि तुम्ही फक्त आणि फक्त कामच करू शकता " अथर्व डोळे मिचकावत हसून बोलला.
"म्हणजे मी काय इतकी बोरिंग काकूबाई वाटले कि काय तुम्हाला?" शांभवी तशी रागातच बोलली.
"तुम्ही? आणि काकुबाई? हाहाहा.. अहो तुम्हाला काकूबाई म्हणून मला काय पाप लावून घ्यायचं आहे का? तुम्हाला काकू बाई म्हटल्याबद्दल देव मला नरकात पण जागा देणार नाही. पण हो. मघापासून अहो जाहो ऐकून मला मात्र आजोबा असल्यासारखं वाटतंय. सो प्लीज कॉल मी अथर्व"
"उम्म, ठीक आहे पण एका अटीवर. तुम्ही पण मला अहो जाहो म्हणून काकूबाई बनवू नका." शांभवीने हसून उत्तर दिले.
"चलो डील देन,शांभवी"
"हो अथर्व"
"इस मौके पे एक चीअर्स तो बनता है... चीअर्स!!!"
ग्लास किणकिणले आणि एक नव्या अध्यायाची सुरवात झाली होती.
क्रमशः
प्रतिक्रिया
13 Oct 2018 - 5:40 am | पद्मावति
मस्तं सुरुवात. पु. भा.प्र.
13 Oct 2018 - 9:37 am | महासंग्राम
हे फक्त कथेतच होऊ शकतं प्रत्यक्षात असं कधीच घडत नाही, नवीन बॉस आल्यावर तर नाहीच नाही
13 Oct 2018 - 11:34 am | गतीशील
पण माझ्या माहितीप्रमाणे हि कथाच आहे...सत्य-कथा नाही...
13 Oct 2018 - 1:02 pm | कलम
ही काल्पनीक कथा आहे. पुढील भागापासून डीस्क्लेमर देईन.
13 Oct 2018 - 8:50 pm | गतीशील
प्रत्येक गोष्टी मध्ये असं खरंच होऊ शकेल का असा प्रश्न विचारला तर मग सगळ्या लोकांनी आर्ट फिल्म च्या स्क्रिप्ट लिहायला सुरु केलं पाहिजे....
कलमभाऊ (कि कलाम) तुम्ही आपले "कलम" चालू ठेवा..पु.ले.शु...
13 Oct 2018 - 10:07 am | OBAMA80
खूप चांगली सुरुवात. पु. ले. शू.
13 Oct 2018 - 1:06 pm | कलम
सर्व प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पहिलेच लिखाण असल्याने काही चूक असल्यास किंवा काही सुधारणा हवी असल्यास कृपया सुचवावे.
25 Nov 2018 - 5:38 pm | रमता जोगी
मोजितोचं तेवढं मोहितो कराल का?