गोव्याच्या अंजुना बीचवर शांभवी हातात थंडगार मॉकटॆल घेऊन रिक्लाईनर चेअर वर पहुडली होती. समोरच सान्वी आणि इंदू वाळूत किल्ला बनवत बसल्या होत्या. इंदू ही बंगल्यावर काम करणाऱ्या शेवंताची मुलगी. वीस वर्षांची इंदू पण शेवंताबरोबर बंगल्यावर मदतीला येऊ लागली. हसरी, बडबडी पण कामसू अशी इंदू थोड्या दिवसात सान्वी ची इंदू ताई बनली.
"घरी हीचा बाप दारु पिऊन बडवतो आमास्नी आणि माह्या पोरीवर बी त्या भ***ची लई वंगाळ नजर हाये बगा. म्हनून म्या पोरीला बी माह्या संगट हिकडं घिऊन आली. भाईर ऱ्हाईली तर काय बी करू शकनार नाय त्यो. अवं काय सांगू म्याडम, अवं माजघरात झोपत्या पोर तर रात्री धा येळा डोकावतोय त्यो लांडगा." असं म्हणून शेवंतानं डोळ्याला पदर लावला.
शेवंता आणि इंदू सकाळीच यायच्या. मग झाडलोट, साफ सफाई, बागेची देखभाल, धुणं भांडी आणि वरची सगळी कामं करायच्या, शांभवीला स्वयंपाकात मदत करायच्या आणि संध्याकाळी सहा वाजता परत निघायच्या. शहराबाहेर असलेल्या ह्या मोठ्या बंगल्यात शांभवीला कधी कधी खूप एकटं वाटायचं आणि त्यात आजकाल अथर्व पण महिन्यातून दहा पंधरा दिवस दौऱ्यावर असायचा. अश्या वेळी दिवसा शेवंताचा आणि रात्री, बंगल्याबाहेरच खोलीत राहणाऱ्या आणि बंगल्याची सेक्युरिटी बघणाऱ्या मुरारीचा तिला आधार होता.
"शेवंता, मी इंदूला आमच्याकडं ठेवून घेऊ का? ती सान्वीची काळजी पण घेईल आणि मला पण रात्रीचा आधार. आज काल सान्वी पण खूप धडपडी झालीय आणि तिच्या मागं धावताना माझं पैंटिंग्स करायचं पण राहून चाललंय. सान्वी ला पण तिची इंदू ताई खूप आवडते."
“असं झालं तर लई उपकार व्हतील बगा म्याडम. पोर हित ऱ्हाईली तर चार पैकं बी कमवंल आनि त्या हैवानापासनं बी वाचंल. उद्याच कापडं घेऊन धाडते आमच्या इंदीला हिकडं."
दुसऱ्या दिवसापासन इंदू बंगल्यातल्या गेस्ट रूम मध्ये राहू लागली. सान्वी आणि तिचं खूप छान जमायचं. सान्वीला आवरण्यापासून ते खाऊ घालण्यापर्यंत आणि खेळवण्यापासून ते झोपवण्यापर्यंत सगळं इंदू अगदी मनापासून करायची. आता शांभवीला पण रात्री एकटीला भीती वाटायची नाही.
प्रदर्शन संपून दोन अडीच महिने झाले असले तरी त्याची धुंद अजूनही शांभवीच्या मनात होती. प्रदर्शनाला आलेल्या जवळपास सगळ्यांनीच तिचं कौतुक केलं होत. घर भर पसरलेले बुकेज आणि फोन, मेसेज यावरून शुभेच्छांचा वर्षाव तर महिनाभर सुरु होता. एका नामांकित वर्तमानपत्रात प्रदर्शनाचा तपशीलवार वृत्तांत पण छापलेला होता. त्यात शांभवीच्या पैंटिंग्सचं वर्णन आणि तिच्या कल्पकतेचं कौतुक केलं होतं. आणि या सगळ्याचा परिणाम असावा, पण शांभवीनं अजून जोमात काम सुरु केलं होतं. येत्या सहा महीन्यांत दुसरं प्रदर्शन भारवायचंच असा तिने स्वतःशीच निश्चय केला होता. त्यासाठीचेच लँडस्केप हुडकायला आणि त्याबरोबरच सुट्टी घालवायला ती सगळ्यांबरोबर गोव्याला आलेली होती. काहीही झालं तरी आजचा सूर्यास्त आपल्या रंगांमध्ये बंदिस्त करायचाच असा विचार करत ती रिक्लाईनर चेअवर पडली होती.
डोळे बंद करून लाटांचा आणि वाऱ्याचा आवाज कानांत साठवत तल्लीन झालेली शांभवी मोबाईलच्या आवाजानं दचकली. थोड्या नाराजीनंच तिनं तो अनोळखी नंबर बघूनही फोन उचलला.
"डोळ्यात सागराला भरून,अथांग तुही असशील का
चंद्र तुझा होईन मी, तूजला भरती परी येईल का "
"कोण बोलतंय ?" शाम्भवीन अनिश्चितपणे विचारलं.
"अगं, एवढ्यात विसरलीस कि काय मला. दोन महिन्यांपूर्वी तर भेटलेलो आपण तुझ्या पैंटिंग्स च्या प्रदर्शनात. तुझ्या सुंदर पैंटिंग्स चा आणि त्याहूनही सुंदर असलेल्या तुझ्या सौन्दर्याचा एक चाहता, आणि कोण?" पलीकडून आवाज आला.
"अमित?" नकळत शांभवीच्या तोंडातून ते नाव बाहेर आलं आणि तेच नाव आपल्याला कसं काय आठवलं ह्याचा विचार करत असतानाच पलीकडून आवाज आला.
"आज तो मरने का भी कोई गम नही मोहोतरमा"
"काही काम होतं का अमित?" यावेळेस मात्र अगदी निगुतीनं गंभीर स्वरात तिनं विचारलं.
"खरं तर तुझा गोड आवाज ऐकायचा होता आणि त्यासोबत एक छोटंसं कारणही होतं. डिजिमॅक्स च्या बुकलेट वर एका ठराविक थिम असलेली पैंटिंग्स काढून हवी होती. अर्थातच हा रीतसर ऑफिशिअल प्रस्ताव आहे. पैश्यांबद्दल नंतर बोलणं होईलच पण त्याआधी तुझा होकार आहे का हे समजून घेण्यासाठी फोन केलेला होता."
"सॉरी अमित , पण मला नाही जमणार हे. प्रदर्शनापर्यंत ठीक होत पण हे सगळं... नाहीच जमणार मला. दुसरं म्हणजे अशी साचेबद्ध ठरवलेल्या थिम मध्येच, ठराविक फ्रेमची पैंटिंग्स मला बनवायला येत नाहीत. माझ्या रंगांमध्ये माझ्या भावनापण असतात आणि त्यामुळं तू सांगितल्याप्रमाणे एका बंदिस्त मर्यादित साच्यात मी काम नाही करू शकणार." अमित पुढं काही बोलायच्या आतच तीनं फोन ठवून दिला.
त्या रात्री शांभवीनं अथर्वला अमितनं फोनवर दिलेला प्रस्ताव आणि त्यावर तिनं त्याला दिलेलं उत्तर पण सांगितलं. हे सगळं ऐकून झाल्यावर अथर्व तिला म्हणाला,"
"आता खरं खरं सांग, का नकार दिलास ? सांगेल ते, सांगेल तसं , सांगेल तिथं कुठलंही चित्र तू काढू शकतेस, कल्पनांची भरारी घेऊन हवं ते कॅनवासवर उतरवायची कला तुझ्यात आहे हे मी तुझ्याइतकंच जाणतो. असं असतानाही काहीतरी फालतू कारण पुढं करून तू अमितच्या प्रस्तावाला नकार देतेस आणि हे सगळं ऐकून घ्यायला मी अमित नव्हे तर तुझा नवरा आहे."
"हे बघ अथर्व, मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते पण खरं सांगायचं तर मला हा अमित एवढा काही पटला नाही. तो खूप विचित्र आहे, काहीही बडबड करतो आणि मला नाही पटत हे सगळं. म्हणूनच मला त्याच्याबरोबर काम नाही करायचं आहे. दुसरं म्हणजे ए बी एस ग्रुप सारख्या मोठ्या कंपनीच्या मालकाची बायको एका लहान आणि सो सो असलेल्या कंपनीसोबत काम करते हे थोडं वेगळं आणि विचित्र वाटत नाही का तुला?"
"अगं खूळूबाई, एवढा विचार कधीपासून करायला लागलीस? मी अमितला ओळखतो, तू म्हणालीस तसं खूप बडबड्या आहे तो, कधी कधी थोडं विचित्र वागतो-बोलतो पण. पण खरं सांगायचं तर खूप चांगला आहे तो मनानं. लग्न झालंय, एक मुलगा आहे त्याला आपल्या सान्वीच्याच वयाचा आणि खूप काळजी घेतो तो त्याची. एक प्रेमळ बाप आणि कर्तव्यदक्ष नवरा अशीच प्रतिमा आहे त्याची. सो बेबी, हि इज हार्मलेस. कुणा अनोळखी माणसाबरोबर कुठलंतरी प्रोजेक्ट करण्यापेक्षा अमितसारख्या मला माहित असलेल्या व्यक्तीबरोबर तुझं असणं हि माझ्यासाठी जमेचीच बाजू आहे. आणि आता तुझ्या दुसऱ्या शंकेबद्दल सांगायचं झालं तर जानू , मी असला कुठलाही विचार करत नाही. अमितच्या कंपनीचं स्टेटस काय आहे, त्याचा आपल्या कंपनीशी काय संबंध आहे, हे सगळं तू बाजूला ठेवावंस असं मलातरी वाटतं. तुला आज जे प्रोपोजल आलंय ते तू ए बी एस ग्रुपच्या मालकाची बायको आहेस म्हणून नव्हे तर एक यशस्वी आणि कुशल कलाकार आहेस म्हणून. त्यामुळं जास्त विचार न करता उद्याच त्याला फोन करून होकार कळव."
"हम्म, मी विचार करीन तुझ्या सल्ल्याचा." शांभवी पुटपुटली.
"आणि मॅडम, आपण इथं गोव्याला आलोय ते अमितचं पारायण करायला नव्हे. रात्री करायसाठी बर्याचश्या गोष्टी आहेत." असं म्हणत अथर्वंनं शांभवीला जवळ ओढलं.
रात्र चढणाऱ्या प्रत्येक श्वासांबरोबर धुंद होत गेली. संध्याकाळी काढलेलं सूर्यास्ताचं पैंटिंग भेसूर हसत होतं .
क्रमशः
क्रमशः
(अस्वीकरण: ह्या कथेतील सर्व पात्रे, प्रसंग, घटना आणि विचार हे निव्वळ काल्पनिक आहेत. केवळ मनोरंजन म्हणून त्या स्वीकाराव्यात आणि वाचाव्यात.)
प्रतिक्रिया
22 Oct 2018 - 2:11 am | पद्मावति
मस्तच. पु.भा.प्र.
22 Oct 2018 - 9:19 am | विजुभाऊ
इण्टरेस्झ्टिंग
25 Oct 2018 - 12:31 pm | कलम
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
आपणा सर्वांच्या प्रतिसादांमुळे आणखी पुढे लिहण्याची उमेद वाटत आहे