त्या दिवशी शांभवीच्या घरातून निघून गेल्यावर मात्र एकदाही अमितनं तिला फोन केला नाही. शांभवीच्या कानात त्यानं सांगितलेला प्रत्येक शब्द घुमत होता. आयुष्यात कधी कधी जास्त विश्लेषण करत बसलं तर हातात असलेला क्षण पण आपण घालवून बसतो. शांभवीच थोडंफार तसंच झालं होतं. अथर्वनं एका रात्री जेवताना विषय काढलाच.
"काय झालंय तुला शांभवी? पूर्वीसारखी बोलत नाहीस, जेवणावर लक्ष नसतं , परवा सान्वी किती रडत होती आणि तू मात्र कुठंतरी विचारात हरवलेली आणि हे काय? एकही पैंटिंग काढलेलं नाहीयेस इतक्या दिवसात. इज एव्हरीथिंग ओके?"
"अह... हो. सगळं ठीक आहे अथर्व. अमितनं काही थिम्स फायनल केल्यात त्याचाच विचार करत होते." एवढं सगळं होऊनही आज अमितचं नाव ओठावर का यावं याचाच विचार करत असताना अथर्व म्हणाला,
"अरे हो, तुला विचारायलाच विसरलो, काम कसं चाललंय प्रोजेक्टचं? जातेस कि नाही डिजिमॅक्स मध्ये? अमितचा कालच फोन आलेला मला, सांगत होता कि शांभवी मॅडम बरेच दिवसात आल्या नाहीत म्हणून"
"नाही, असं काही नाही... उद्याच जाणार आहे मी." शांभवी गडबडीत म्हणाली. अमितनं अथर्वला फोन करून बोलायची काय गरज होती हे तिला कळेना.
"अरे वा, ठीक आहे तर. सकाळी तुला तिकडं सोडून मग मी ऑफिसला जाईन आणि संध्याकाळी मीच पिक अप करेन. मस्त डिनर ला जाऊ मग. काय म्हणतेस?"
"हम्म. चालेल." उद्या अमितला कसं सामोरं जायचं याचा विचार करत असताना शांभवीनं अथर्वला होकार देऊन टाकला.
दुसऱ्या दिवशी ऑफिस ला पोचल्यावर जेव्हा अमितनं हस्तांदोलन करत शांभवीचं स्वागत केलं तेव्हा शांभवीला सर्प्राइजिंगली खूप छान वाटलं. क्षणभर तिला वाटलं कि आपण जेवढा विचार करत होतो तेवढं काही हे सगळं अवघड नाहीये. अमितच्या हाताच्या त्या स्पर्शात तिला आश्वासन, प्रेम, काळजी जाणवली. परत एकदा ऑफिस मध्ये असलेल्या अमितचं व्यावसायिक रूप बघून तिला पण तिच्या कामाची आठवण झाली आणि कामात गुंतल्यावर मनात चाललेली खळबळ बरीच कमी झाल्यासारखी वाटली.
निसर्गानं माणसाला मनाबरोबर एक शरीर पण दिलंय आणि त्या शरीराला खूप गुंतागुंतीच्या गरजा दिल्यात. ह्या शरीराला नेहमी काही तरी नवीन हवं असतं , नवी माणसं , नवे स्पर्श त्याला आवडतात. आपण चाकोरीबाहेर का वागतो? तर आपल्याजवळ सगळं काही असताना पण आपल्याला अजून काहीतरी नवीन हवंच असतं. आणखी एखादी कार, अजून थोडे कपडे.. दरदिवशी आपल्या गरज वाढतच जातात. तसंच काहीतरी शांभवीचं पण होत होतं . अमितच्या जवळ असताना त्याच्या एखाद्या स्पर्शानं, त्यानं लावलेल्या सेंट मुळं , तर कधी फक्त त्यानं तिच्याकडं सहज बघितलं तरी शांभवीच्या अंगावर रोमांच येत. तिला त्या रात्री झालेला प्रसंग जसाच्या तसा आठवे. अमितचा हळुवारपणा, त्याचा तिच्या अंगावरचा स्पर्श आणि अधेमधे त्यानं पुटपुटलेले शब्द तिला अजून त्याच्या जवळ जाण्यासाठी प्रवृत्त करत.
काय हरकत आहे एक समांतर आयुष्य जगायला? मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पाळत असताना मी स्वतःला आवडत असलेलं असं काही केलं तर काय होईल? दुसरं म्हणजे अमित हा खूप जबाबदार पुरुष आहे आणि कुठंतरी मनाच्या एका कोपऱ्यात मला तो खूप आवडतो."
"अमित, तू मला सांगितलेलंस ना.. कि एक पेटिंग सायलेंट व्हॅली मध्ये करायचं आहे. ते आपण कधी करणार आहोत?" मीटिंग च्या मध्ये अचानक शांभवीनं अमितला विचारलं.
"जवळपासची सगळी लोकेशन्स संपली कि एक दोन महिन्यात नक्की."
"नाही. मला ते पैंटिंग आधी करायचंय. चालेल का?"
"हो म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाही. तू जसं म्हणशील तसं करूयात. नाहीतरी पाऊस पडतोयच एका महिन्यापासून, तेव्हा आपल्याला हवी तशी हिरवळ पण मिळेल. नो प्रॉब्लेम. पुढच्या आठवड्यात तुझं बुकिंग करतो मग."
तेवढ्यात अमितच्या मोबाईल मध्ये एक मेसेज आला. 'तुही माझ्याबरोबर येतोयस तिकडं.' शांभवीचा मेसेज बघून अमितच्या ओठावर एक हास्याची लकेर उमटली. त्यानं शांभवीकड बघितलं तेव्हा ती त्याच्याकडं बघून हेतुपूर्वक हसत होती.
"एक काम करा मि .शर्मा, पुढल्या आठवड्याची दोन तिकीट बूक करा."
आवड आणि प्रेम, संयम आणि अधीरता, स्पर्श आणि प्रणय यात खूप अंधुक अशी रेषा असते. एक कमकुवत क्षणात ती रेषा विरघळून पण जाऊ शकते. अमित बरोबर घालवलेल्या त्या चार दिवसांनी शांभवीचं आयुष्य जणू संपूर्ण बदलून गेलं. त्याच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक धुंद रात्र यामध्ये शांभवी अमित मध्ये विरघळत गेली. फक्त दोन शरीरच नाहीत तर दोन मनं पण त्या चार दिवसात एकमेकांत मिसळली गेली. एका सो कॉल्ड "विवाह बाह्य संबंधाचा" जन्म झाला होता.
त्यानंतर अथर्व नसताना कधी शांभवीच्या घरी, इशा नसताना अमितच्या घरी, कधी वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये ते भेटत राहिले.
"अमित, you are like an addiction. बऱ्याचदा तुला किमान आठवडाभर तरी दूर ठेवायचा विचार करते पण चार दिवसांपेक्षा जास्त तुझ्या पासून लांब राहायलाच येत नाही" बऱ्याचदा शांभवी त्याला म्हणे.
-----------------------------------------------------------------------------
आज जवळपास सहा महिने झाले होते या सगळ्याला. या सहा महिन्यात असंख्य रात्री तिनं अमितबरोबर घालवल्या होत्या. पण आज मात्र शांभवीनं हे सगळं संपवायचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठीच ती अमितकडं जाणार होती. ह्या सगळ्याला कारणीभूत होता कालचा प्रसंग.
काल सकाळी तिला अमितचा फोन आला,
"हॅलो, हा बोल अमित."
"मला तू आज हवी आहेस दुपारी. हॉटेल मध्ये जाऊयात का?"
"दोन दिवसांपूर्वीच माझ्या घरी आलेलास तू अमित आणि आज परत?"
"दोन दिवस खूप जास्त झाले, मी तुझ्याशिवाय दोन क्षण पण नाही राहू शकत."
"ठीक आहे, येतेय मी" हसून शांभवीनं फोन ठेवला.
कालची दुपार अमितबरोबर हॉटेलच्या रूम मध्ये घालवून जेव्हा ती संध्याकाळी घरी अली तेव्हा ती अचानक दचकली.
"हैप्पी बर्थडे शांभवी." जवळपास पन्नास एक माणसं अचानक बाहेर आली
"ओह्ह्ह... अथर्व सो स्वीट ऑफ यु."
"तुझ्या पेक्षा स्वीट नाही नक्कीच. चल फ्रेश होऊन ये लवकर खाली. वर तुझ्या कपाटात नवीन ड्रेस ठेवलाय. आम्ही वाट बघतोय तुझी.
अजूनही शरीरावर अमितचा गंध येत होता. शॉवर घेताना शांभवीच्या मनात विचार आला, 'ज्यावेळी आपण अथर्वला फसवून अमित बरोबर झोपलो होतो तेव्हा अथर्व इकडं पल्या वाढदिवसाच्या पार्टीची तयारी करत होता. खरंच किती कोडगे झालोय आपण. किती तरी दिवस झाले अथर्वला आपण वेळच दिलेला नाहीये. तो बिचारा कुटुंबासाठी राबतोय, रात्री बाराला घरी येतोय, कधी कुठलीच अपेक्षा ठेवत नाही आपल्याकडून. आणि आपण? त्याच्या मागं मजा मारतोय. कितीदा तरी तो आपल्याला म्हणतो, 'किती काळजी करतेस माझी? मी रोज लवकर यावं असं वाटतं न तुला? पण काय करू, खूप काम असतं आणि ते असं अर्ध्यात नाही सोडता येत.' खरं तर संध्याकाळी आपण त्याला फोन करतो 'कितीला निघणार ?', का तर त्याच्या आधी आपल्याला हॉटेलमधून बाहेर पडून घरी यायचं असतं. कधी रात्री जवळ घेतलं आपल्याला तर त्याच्या चेहऱ्यात आणि स्पर्शात पण आपण अमितला हुडकतो.'
'अगं आवरलं का तुझं शांभवी, सगळे खाली वाट बघतायत. अथर्वनं नॉक करत विचारलं.
"दहा मिनिटात येते."
अथर्वनं आणलेला लाल रंगाचा गाऊन घालून शांभवी जेव्हा खाली पोचली तेव्हा अमित पण इशासोबत आलेला होता. केक कापल्यानांतर शॅम्पेन चा ग्लास हातात घेऊन अथर्व ने म्हटले "धिस इज फॉर द मोस्ट वंडरफुल वाइफ ऑन द अर्थ. यु नो, शांभवी, या सगळ्या जगामध्ये तू आणि तूच माझी सगळ्यात जवळची व्यक्ती आहेस, किंवा सरळ सोप्या शब्दात सांगायचं तर तूच माझं जग आहेस. आज इतकी वर्ष झाली मी तुझ्या बरोबर आहे पण सरणाऱ्या प्रत्येक क्षणी मी अजूनही तुझ्या प्रेमात पडतो. मी ऑफिसची जबाबदारी सांभाळली असताना बऱ्याचदा तुला वेळ देऊ शकत नाही याचं मला नेहमी वाईट वाटतं पण तू घरी आहेस आणि तू ते घर अतिशय खंबीरपणे सांभाळत आहेत, सान्वीची काळजी घेत आहेस यामुळं कुठंतरी मी निर्धास्त असतो. तुला आठवतंय, जेव्हा आपण पहिल्यांदा या घरात आलेलो होतो तेव्हा तू मला सांगितलेलं होतंस कि अथर्व, हि आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे, काहीही होवो पण तू असंच पुढं जायचं आहेस, प्रगती करायची आहेस, बाबांचं स्वप्न आपण पूर्ण करायचं आहे अथर्व. आणि खऱ्या अर्थानं तू मला ह्या सगळ्यात मदत केलीस. सान्वी झाल्यावर स्वतःच करिअर सोडून तू घरात राहिलीस, कधी सान्वी साठी आई बरोबर तिचा बाबा पण बनलीस, कधीही मी वेळ देत नाही म्हणून तक्रार केली नाहीस. तुला आठवतंय सान्वी झाली तेव्हा रडलेलीस तू कि अथर्व, आता तुझं प्रेम माझ्यात आणि सान्वीत वाटलं जाणार का रे? कसली गोड दिसत होतीस तेव्हा. आज माझ्या आयुष्याचा डोलारा तू इतका समर्थपणे सांभाळला आहेस म्हणून हा अथर्व सरपोतदार जिवंत आहे. खूप खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. तुला माझ्या डोळ्यात दिसतंय ना, त्यापेक्षा पण खूप जास्त...." अथर्व बोलायचं थांबला. त्याच्या डोळ्यात आज पहिल्यांदा शांभवीनं पाणी बघितलं.
------------------------------
आयुष्यात किती चुका माफ असतात? खरं तर माणसाचा जन्म चुका करण्यासाठी. पण जेव्हा एकदा झालेली चूक माणूस पुन्हा पुन्हा करतो त्यावेळी ती चूक रहातच नाही, त्याचा गुन्हा झालेला असतो. आज तोच गुन्हा केलाय आपण आणि तो पण जाणून बुजून. खरंच याची काही शिक्षा असावी का? कि शिक्षा देणार्याला पण लाज वाटावी असं काहीतरी झालंय आपल्या हातून? जर या सहा महिन्यात एकदाही अथर्वला आपण "त्या" अवस्थेत सापडलो असतो तर? किंवा त्याला आपल्या आणि अमितमधील संबंधाबद्दल कळलं असत तर? विचारच करवत नाही. काय घालवून बसलो असतो आपण? तर अथर्व सारखा एक माणूस ज्याच्यासाठी आपण म्हणजे सर्वस्व आहे, त्याच जग आहे, श्वास आहे. पण अजूनही उशीर झालेला नाही, भूतकाळ नसला तरी वर्तमान आणि भविष्यकाळ बदलू शकू आपण. बास झालं शांभवी, सगळं उध्वस्त होईपर्यंत वाट बघू नको आता.
सकाळी अकराच्या सुमारास काळ्या रंगाची ऑडी "ग्रीन वाइल्ड रिसॉर्ट" मध्ये वळली आणि ती चालवणार्या शांभवीला आता माहित होतं कि नक्की काय करायचं आहे.
रूम नंबर ३०६ ची तिनं बेल वाजवली आणि एका क्षणात अमितनं दार उघडलं.
"काय हे? नऊ वाजता येणार होतीस तू, अकरा वाजलेत. फोन पण उचलला नाहीस माझा." असं म्हणत अमितनं तिला जवळ ओढलं.
सगळ्या शक्तीनिशी शांभवीनं अमितला दूर ढकललं.
"काय झालं एवढं चिडायला जानू ?"अमित परत तिच्या जवळ येत बोलला.
"आहेस तिथंच थांब अमित, मी तुझ्याबरोर हे सगळं करायला नाही तर तुझ्याशी बोलायला आलीय."
"काय झालंय ? काही प्रॉब्लेम झालाय का? ये बस आधी इथं" शांभवीच्या हातात पाण्याचा ग्लास देत अमित काळजीनं म्हणाला.
"अमित, तुला हे सगळं कसं सांगू माहित नाही पण डायरेक्ट सांगायचं झालं तर आपण आता असं भेटणं थांबवूया का? फक्त भेटणंच नाही तर बोलणं पण. मला हे सगळं नकोय आता."
"नक्की काय झालंय ते सांगणार आहेस का?" अमितनं टिकजय जवळ सरकत विचारलं.
"काल रात्री मी खूप विचार केला अमित, आपण हे सगळं करून कुठंच पोचणार नाहीये कारण या नात्याला काही नाव नाहीये, याचं काही अस्तित्वच नाहीये. हे सगळं करून फक्त आपण स्वतःला आणि एकमेकांना समजावतोय कि आपलं एकमेकांवर प्रेम आहे पण जर आजूबाजूला डोळे उघडून बघितलं तर कळेल कि आपल्यावर तेवढंच प्रेम करणाऱ्यांना आपण फसवतोय रे. आज नशीब समज कि हे सगळं सहा महिने करूनही आपण एकदाही पकडले गेलो नाही किंवा कुणाला संशय आला नाही पण जर कधी हे सगळं बाहेर आलं तर तुझ्या आणि माझ्या या थोड्या वेळच्या सुखापायी किती माणसं दुखावली जातील, तुझं- माझं कुटुंब मोडून जाईल, काय मिळवणार आहोत आपण हे सगळं करून? काहीही म्हण पण एकमेकांच्या स्पर्शामध्ये प्रेम हुडकतोय आपण. कसलं हे आयुष्य? कुणीतरी बघेल म्हणून लपून छपून भेटायचं, सारखी मनात एक भीती, घरच्यांना फसवतोय म्हणून अपराधी भावना.. नको नको झालंय मला आता हे सगळं. अमित, तू म्हणाला होतास ना कि सगळ्याच गोष्टींची कारणं हुडकायची नसतात. आज पण मला तुझ्या आणि माझ्यात जे काही इतके दिवस झालं त्याचं कारण हुडकायचं नाहीये, हे नक्की काय होतय हे जाणून घ्यायचं नाहीये. मला फक्त परत माग फिरायचं आहे ... माझ्या घरट्याकडं."
एवढा वेळ तिचं ऐकत असलेला अमित आता उठला, "म्हणजे अथर्वनं काल तुझ्या वाढदिवसाला दिलेल्या भाषणाचा हा परिणाम दिसतोय. ज्या अर्थी तू आज अथर्वच्या चार वाक्यांनी प्रभावित होऊन मला सोडायला निघालीस म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नव्हतंच मुळी .तुला हे उघड सांगायचं नसलं तरी ह्या सगळ्याचा अर्थ हाच आहे कि तुला माझ्याबरोबर फक्त "हे" सगळं करायचं होतं, अथर्व जे तुला वेळेअभावी देऊ शकत नव्हता ते तू माझ्याकडून मिळवलंस. पण खरं सांगू, मला या सगळ्याचा अजिबात राग येत नाहीये शांभवी. कारण माहित आहे?"
"का?" शांभवीनं विचारलं
"कारण माझं तुझ्या बरोबर प्रेम नव्हतंच कधी. तुला जेवढा वेळ उपभोगता येईल तेवढा वेळ उपभोगायचा हा साधा विचार होता माझा. तुझ्या बद्दल फक्त एक आकर्षण होत मला.. खूप आधीपासून, म्हणजे तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हापासून. तुला मिळवायचंच असलं काही वेड नव्हतंच मला, कारण तू नाहीस तर तुझ्यासारख्या शंभर भेटतील. पण तरीही 'प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे' म्हणून मी खडा टाकला आणि सगळ्या गोष्टी मला हव्या तश्या होत गेल्या. अर्थात यासाठी मला तुला माझ्या बायको मुलाशी ओळख करून द्यावी लागली, तुला माझ्या पर्सनल आयुष्यात प्रवेश करू द्यावा लागला. मी तो करू दिला कारण तू माझ्यासाठी खूप "सेफ गेम" होतीस... तू मला म्हणाली होतीस ना तशी अगदी 'हार्मलेस'." अमित हसत बोलला.
'म्हणजे, तू मला वापरलंस अमित? तुझं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच म्हणजे?" शांभवी रडत म्हणाली
"हे बघ, मी तेच केलं जे तू माझ्या बरोबर करत होतीस. राहता राहिला प्रेमाचा प्रश्न तर तुझ्यावर काय म्हणून प्रेम करायचं होतं मी? जेणेकरून तू आज जसं मला इथं सोडून द्यायला आली आहेस ते ऐकण्यासाठी? तू कधीतरी उडून जाणारच हे मला आधीपासूनच माहित होतं. असं असताना मी ह्या सगळ्या फालतू भावनिक गुंत्यात अडकणं मला पटलंच नसतं . आणि परत एकदा सांगतो शांभवी, मी तुला एकदाही जबरदस्ती केली नाही, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, आणि त्या नंतरच्या प्प्रत्येकदा तू स्वतःहून माझ्याकडं आलीस. मी तुला स्वतःहून कधीच सोडणार नव्हतो, कारण you are damn good in bed..." अमित डोळे मिचकावत म्हणाला.
खाड्कन अमितच्या कानाखाली मारून शांभवी उठली आणि आपली पर्स घेऊन रूम बाहेर पडली.
____________________________________________
स्वतःला दोष देत शांभवी रिसॉर्ट बाहेर पडली. घरी पोचली, एक ग्लास भरून ड्रिंक्स तयार केलं आणि चढे पर्यंत ती पीत राहिली.
सकाळी नऊ वाजता अथर्वनं तिला गदागदा हलवत उठवलं.
"काय झालंय अथर्व?" अजूनही नशेत असलेल्या तिनं बळजबरीनं डोळे उघडले.
"उठ, खाली इन्स्पेक्टर पाटील आले आहेत. काल रात्री अमितचा आणि एका बाईचा "ग्रीन वाइल्ड रिसॉर्ट" मध्ये खून झालाय म्हणे."
प्रतिक्रिया
2 Nov 2018 - 4:28 pm | ayush sharad wadnere
काय १ नं. कहानि होति सर.....
2 Nov 2018 - 4:39 pm | कलम
क्रमशः
(अस्वीकरण: ह्या कथेतील सर्व पात्रे, प्रसंग, घटना आणि विचार हे निव्वळ काल्पनिक आहेत. केवळ मनोरंजन म्हणून त्या स्वीकाराव्यात आणि वाचाव्यात.)
2 Nov 2018 - 5:34 pm | देशपांडेमामा
मस्त सुरु आहे कथानक
देश
2 Nov 2018 - 5:53 pm | श्वेता२४
इतके दिवस यात क्राईम डायरी नाव देण्यासारखे काय झालाय याचा विचार करत होते. त्याच उत्तर आता मिळालं. मस्त लिखाण पुढील भाग लवकर वाचण्यास उत्सुक आहे
2 Nov 2018 - 10:34 pm | वीणा३
अगदी अगदी, मी पण तोच विचार करत होते. कहानि मी ट्विस्ट :)
2 Nov 2018 - 8:39 pm | बापु देवकर
कहानी में twist, आवडले.. पुलेशू
3 Nov 2018 - 10:51 am | कलम
:)
3 Nov 2018 - 10:20 am | संजय पाटिल
हम्म.....
पु.भ.प्र.
5 Nov 2018 - 12:03 pm | विनिता००२
छान चाललीये :)
14 Nov 2018 - 9:21 am | रॉबिन हुड
जबरदस्त...कहाणीला वेगळीच कलाटणी मिळाली...पुढील भाग लवकर येऊद्या सर
14 Nov 2018 - 8:11 pm | मास्टरमाईन्ड
टाकताय?