"शांभवी पुढच्या महिन्यात आपल्या नवीन ऑफिस आणि प्रोजेक्ट संदर्भात आपल्याला फ्रँकफर्ट ला निघायचं आहे तेव्हा इकडची सगळी कामं आटोपून घे आणि उरलेली कामं टीम ला विभागून दे." फोन वरून अथर्व शांभवीला सूचना देत होता.
"ठीक आहे अथर्व. नेहमीप्रमाणे मी प्रेसेंटेशन पण तयार करते." असं म्हणून शांभवीने फोन खाली ठेवला आणि ती आपल्या कामाला लागली.
अथर्व जॉईन झाल्यापासून एका वर्षातच ए बी एस ग्रुप ने बरीच मोठी मजल मारली होती. भारतात जवळपास सगळ्या मोठ्या शहरांत तर ऑफिसेस उघडली होतीच पण ह्या पलीकडे भारताबाहेरही दोन देशांमध्ये ए बी एस ग्रुप ऑफ कंपननीच्या शाखा उघडल्या होत्या आणि ह्या सगळ्या प्रगतीबरोबरच शांभवी आणि अथर्वची मैत्री पण फुलत चाललेली होती. फक्त ऑफिसातच नव्हे तर ऑफिसबाहेरही भेटणे, लॉन्ग ड्राईव्हस ह्या सगळ्यामुळं कळत नकळत का होईना, पण अबोल असणाऱ्या शांभवीला एक जीवाभावाचा मित्र भेटला होता. अथर्व हा बाकी सगळ्या पुरुषांसारखा नाही हे पहिल्या दोन भेटींमध्ये कळल्यावर शांभवीने परत मैत्रीत हात कधीच आखडता घेतला नाही.
ठरल्या दिवशी शांभवी सकाळी एअरपोर्ट ला तीन तास आधी येऊन वेटिंग लाऊंज मध्ये अथर्वची वाट बघत बसली होती. सकाळी लवकर निघाल्याने तिचा डोळा लागला आणि जेव्हा तिला दचकून जाग आली तेव्हा फ्रँकफर्ट फ्लाईटच्या बोर्डिंग ची घोषणा तिने ऐकली. आजूबाजूला बघितलं तर अथर्व कुठंच दिसत नव्हता, मोबाईलवर फोन केला तर तोही लागेना. कधी एक मिनिटाने पण उशीर न करणारा अथर्व आज आला नसल्यानं शांभवी ला आज पहिल्यांदाच त्याच्याबद्दल इतकी काळजी वाटत होती. काय करावं ह्या विचारात असतानाच दुरून गडबडीत येणारा अथर्व तिला दिसला.
"अरे कुठं होतास इतका वेळ? फोन का लागत नव्हता? काय झालं नक्की? अरे किती काळजीत होते मी." डोळ्यात पाणी आणि रागाने लालबुंद झालेल्या शांभवीला बघून आज अथर्व ला खूप मजा वाटत होती.
"अगं फोन बंद पडला होता आणि ट्रॅफिक पण खूप होतं . पण तू किती प्रश्न विचारतेस गं. मला तर वाटायला लागलय तुझ्या प्रश्नमंजुषेमुळं आपली फ्लाईट मिस होतेय की काय." अथर्वने हसतच उत्तर दिले.
आज पहिल्यांदाच अथर्व शेजारी बसताना तिला अवघडल्यासारखं होत होतं. एकतर आज पर्यंत कधी कुणासाठी एवढी काळजी तिला वाटली नव्हती आणि दुसरं म्हणजे अथर्वशी एवढ्या बालिशपणे वागल्यामुळं तिला स्वतःचा राग पण येत होता. अथर्व मात्र डोळ्याच्या कोपऱ्यातून तीचे बदलणारे हावभाव बघून गालातल्या गालात हसत होता.
नेहमीप्रमाणेच मीटिंग यशस्वीपणे पार पडल्यावर दोघेही माईन नदीच्या काठी असलेल्या एका बार मध्ये ड्रिंक्स घेत बसलेले होते. ऑक्टोबर मध्ये जवळपास शून्याच्या आसपास असलेल्या तापामानात शहर खूप रम्य दिसत होते.
त्या धुंद वातावरणात अथर्वने शांभवीचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला, "शांभवी, आज जवळपास एक वर्ष आपण एकमेकांना ओळखतो आणि बघताबघता तू इतकी जवळची मैत्रीण झाली आहेस कि कधी कधी वाटतं कि माझं सगळं आयुष्य फक्त आणि फक्त तुझ्याभोवतीच फिरतंय. आडून बोलायची मला सवय नाही आणि म्हणूनच शांभवी, माझ्याशी लग्न करशील? अशी गोड, हुशार, सुंदर आणि माझी सगळ्यात प्रिय मैत्रीण मला आयुष्यभर जवळ हवी आहे माझी बायको म्हणून .मला खूप आवडतेस तू शांभवी. खरंच गं, माझ्याशी लग्न करशील?"
त्या रात्री फ्रँकफर्टच्या थंडगार नदीकिनाऱ्यावर आपल्या प्रेमाची मोहर आणि अबोल होकार अथर्वला कळवताना शांभवीच्या मनात हजारो फुलं आणि अंगावर हजारो रोमांच फुलले होते.
मुंबई ला परत आल्यावर मात्र गोष्टी तश्या खूप जलद होत गेल्या. दोघांच्याही घरच्यांना कल्पना देऊन, त्यांच्या संमतीने साखरपुडा आणि नंतर लग्न ते सगळं जवळपास चार महिन्यातच उरकलं.
'समर्थ' नावाच्या विशालकाय बंगल्यामध्ये दोघेही पुढल्याच वर्षी राहायला आले. अथर्व आता मॅनेजिंग डायरेक्टर तर शांभवी ने असिस्टंट डायरेक्टर ची जागा घेतली होती. दोन वर्षातच जवळजवळ पाच वेगवेगळ्या देशांमध्ये शाखा आणि रोज वाढत जाणारा बिझीनेसचा डोलारा दोघेही अत्यंत मजबुतीने सांभाळत होते. तिसऱ्या वर्षी मात्र गोड बातमीची चाहूल लागताच शांभवीने रीतसर राजीनामा देऊन घरीच थांबण्याचा निर्णय घेतला. अर्थातच ती घरातून हवी ती मदत करत होतीच आणि त्याचबरोबर फावल्या वेळेत तिने पैंटिंग्स करायला सुरुवात केली होती. एकूणच काय तर दोघेही एकमेकांच्या सोबत खूप खूप खुश होते आणि थोड्या महिन्यातच सान्वी च्या आगमनाने तर ते छोटंसं कुटुंब पूर्ण झालं.
आता शांभवीचा बराचसा वेळ सान्वी साठी खर्च होत होता, अथर्वपण नेहमी दौऱ्यावर असे. या मोकळ्या वेळेत शांभवीने बरीच पैंटिंग्स काढली होती. दुसऱ्या मजल्यावरचा हॉल म्हणजे तिची आर्ट गॅलरीच बनली होती.
"तू तुझ्या पैंटिंग्स च प्रदर्शन भरवायला हवंस. आता सान्वी पण दोन वर्षाची झालीय आणि तुझी पैंटिंग्स पण खरंच खूप सुंदर आहेत... अगदी तुझ्यासारखीच" अथर्व तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट बाजूला सारत म्हणाला.
"मी पैंटिंग्स फक्त स्वतःसाठी काढते, हातात ब्रश घेऊन कॅनव्हास वर मारलेला पहिला स्ट्रोक माझ्या मनातली सगळी मरगळ एका क्षणात दूर करतो. फक्त पैंटिंग्स नाहीत तर भावना आहेत त्या माझ्या. त्यांचं असं प्रदर्शन करणं मला नाही जमणार. कधी हे सगळं करावं असं मनातही आलं नाही रे माझ्या."
"अगं तू एकदा माझं ऐकून तर बघ. अंधाऱ्या खोलीत झाकून ठेवलेलं सौदर्य आणि मनात दाबून ठेवलेल्या भावना काय कामाच्या? सौदर्याला कौतुकाची जोड आणि भावनांची अभिव्यक्ती होणं जास्त महत्वाचं"
शेवटी हो-नाही करत करत शांभवीने पैंटिंग्सचं प्रदर्शन भरवायला होकार दिला.
नेचर आर्ट गॅलरीचा भव्य हॉल आज गर्दीनं फुलला होता. अथर्वचे बिझिनेस पार्टनर्स, कलिग्स, मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि बरेच ओळखीचे तसेच अनोळखी लोक आलेले होते.
"तुम्हाला समुद्र खूप आवडतो ना?" तिच्या कानापाशी आलेल्या हलक्या पण स्पष्ट आवाजानं शांभवीनं अचानक मागं वळून पाहिलं.
"अरे अमित, वेलकम. शांभवी, मीट अमित. वाईस प्रेसिडेंट ऑफ डिजिमॅक्स. अलीकडेच आपल्या कंपनीबरोबर ह्यांनी करार केलाय पुढच्या दोन वर्षांसाठी." अथर्व ने अमित ची ओळख करून दिली.
" हाय शांभवी, खूप सुंदर आहेत तुमची पैंटिंग्स." अमितने हस्तांदोलन करत शांभवीचं कौतुक केलं.
"थॅंक्स अमित" मंदस्मित करत शांभवी बोलली.
थोड्या वेळानं अथर्व थोडा दूर कुणाशीतरी बिझिनेसबद्दल बोलत असलेला पाहून शांभवी बार काउंटर शेजारी बार स्टूल वर बसलेल्या अमितजवळ गेली .
" मला समुद्र आवडतो हे तुम्हाला कसं काय कळलं ?"मनात मघापासून घोळत असलेला प्रश्न तिनं शेवटी त्याला विचारलाच.
"तुमच्या प्रत्येक पैंटिंग मध्ये कुठं ना कुठंतरी समुद्राची छटा आहेच. कधी तरंग तर कधी निळा रंग, कधी खोली तर कधी त्याची विशालता. तुमच्या पैंटिंग्स बघून वाटतं कि माणसाच्या सगळ्या स्वभावांना, भावनांना तुम्ही समुद्राशीच जोडलेलं आहे. जेवढा वेळ हि पैंटिंग्स बघावीत, तेवढ्यांदा त्यांच्या प्रेमात पडावसं वाटतं. किती गूढ असता नाही तुम्ही कलाकार मंडळी. कुठल्याही दोन गोष्टींना कला नावाच्या दुव्यानं तुम्ही कसंही जोडू शकता." अमितनं हसत उत्तर दिलं.
"हम्म. खरंय. पण खरं सांगायचं तर संध्याकाळपासनं इतके जण येऊन गेले पण तुम्ही मात्र अचूक ओळखलंत. तुम्ही पण पैंटिंग्स करता की काय?"
"हाहाहा... मी आणि पैंटिंग्स? नुसता ठोकळा आहे मी कलेच्या बाबतीत. मला फक्त बिझिनेस करायला येतो आणि अर्थातच तुमच्यासारख्या सुंदर स्त्रियांशी मैत्री करायला येते. आता राहिला प्रश्न माझ्या अचूक अंदाजाचा; तर शांभवी, त्यासाठी मला तुझी पैंटिंग्स बघायची गरज नाही कारण तुझ्या डोळ्यात संपुर्ण सागर सामावला आहे आणि त्यातच मला सगळे रंग सापडतायंत. ते रंग तुझ्या मनाचा ठाव सांगत आहेत, तुझ्या सौदर्याची पाखरण करत आहेत, तुझ्या हास्यानं गडद होत आहेत तर तुझ्या उदासीनतेन फिके पडत आहेत, तुझ्या अस्तित्वातच चकाकत आहेत आणि तुझ्या नसण्यानं निष्प्रभ वाटत आहेत."
शांभवी काहीच बोलली नाही पण कुठंतरी ओठांच्या कोपऱ्यात उलगडलेलं हसू अमितनं नक्की बघितलं.
क्रमशः
(अस्वीकरण: ह्या कथेतील सर्व पात्रे, प्रसंग, घटना आणि विचार हे निव्वळ काल्पनिक आहेत. केवळ मनोरंजन म्हणून त्या स्वीकाराव्यात आणि वाचाव्यात.)
प्रतिक्रिया
16 Oct 2018 - 1:42 pm | श्वेता२४
पण तुम्ही छान खुलवलीय. पुढे काय ची उत्सुकता आहेच