एखादी गोष्ट/चित्रपट असावा तशी ही सत्यघटना!
काश्मीरसिंग आज मायदेशी परतणार
इस्लामाबाद, ता. ३ - गेली ३५ वर्षे पतीची चातकासारखी वाट पाहणारी परमजितकौर हिचे स्वप्न आज साकार होत आहे.
गेली ३५ वर्षे तिने परिस्थितीशी झुंज दिली. मोलमजुरी करून मुलांना मोठे केले. हे करीत असताना ती "त्याला' विसरली नाही. तिने धावा सुरूच ठेवला होता. अखेर तिला यश आले....
सुमारे ३५ वर्षे पाकिस्तानी कैदेत असलेला जवान काश्मीरसिंग आज भारतात दाखल होत आहे. पत्नी परमजितकौरने त्याच्या वाटेकडे डोळे लावले आहेत. त्याची आज सायंकाळी तुरुंगातून सुटका करण्यात आली असून, उद्या (ता. ४) सकाळी ११ वाजता वाघा सीमेवर त्याची व कुटुंबीयांची भेट घालून दिली जाईल. मी व माझी पत्नी त्याच्याबरोबर वाघा सीमेवर जाणार आहोत, असे पाकिस्तानचे काळजीवाहू मानवी हक्क मंत्री अन्सार बर्नी यांनी सांगितले.
काश्मीरसिंग परतणार असल्याच्या भावनेने परमजितकौर भारावून गेली आहे. पण हा आनंद पाहण्यासाठी त्याची आई मात्र हयात नाही. काश्मीरसिंगसाठी तिने आयुष्य वेचले; पण तिचे गेल्या वर्षीच निधन झाले.
काश्मीरसिंग कोण?
मूळ नाव शैलोसिंग
मूळचा होशियारपूरमधील नागरचोराण गावचा.
१९६६ मध्ये कॉन्स्टेबल म्हणून नोकरी.
पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार.
१९७३ मध्ये रावळपिंडीत अटक.
आरोप काय?
हेरगिरी व देशविरोधी कारवाया. त्याचप्रमाणे तस्करीचेही आरोप.
तुरुंगवास
पंजाबातील साहिवल तुरुंगात १४ वर्षे.
मुलतान, मियावली व लाहोरमध्ये १० वर्षे.
काही काळापूर्वी धर्मांतर. "इब्राहिम' नामकरण.
सुटका कशी?
१९७८ मध्ये तुरुंगातून कुटुंबीयांना पत्र. त्यानंतर पाठपुरावा.
पत्नीची केंद्र सरकारकडे धाव. मुशर्रफ यांच्याकडे सरकारची विनंती.
पाकिस्तानचे काळजीवाहू मानवी हक्क मंत्री अन्सार बर्नी यांच्या अन्सार बर्नी ट्रस्टकडून दखल.
बर्नी यांचे चिरंजिव व ट्रस्टचे अध्यक्ष सैद फाहद बर्नी यांची मध्यस्थी.
मुशर्रफ यांना अधिकृत विनंती.
गुन्ह्याच्या स्वरूपापेक्षा अधिक शिक्षा भोगल्याचा दाखला.
२९ फेब्रुवारी रोजी मुशर्रफ यांच्याकडून माफी मंजूर.
प्रतिक्रिया
२९ फेब्रुवारी २००८ रोजी बर्नी यांची लाहोरच्या तुरुंगास भेट.
सुटकेची बातमी ऐकून काश्मीरसिंगला रडू कोसळले.
दोनच विनंत्या- १) सोडण्यासाठी वाघा सीमेपर्यंत यावे. २) घरी जाण्यासाठी चांगले कपडे द्यावेत.
साश्रुनयनांनी काश्मीरसिंग यांचे मायभूमीत स्वागत...
अटारी (पंजाब) - सैनिकी कवायतींचे ध्वनी गुंजणाऱ्या वाघा सीमेच्या परिसराला मंगळवारी भावनिक ओलाव्याचा स्पर्श झाला. यातनांमधून मुक्त झालेल्या एका वयोवृद्धाला निरोप देण्याचा हृद्य सोहळा सीमेच्या एका बाजूला सुरू होता; तर दुसऱ्या बाजूला दाटला होता मीलनोत्सुक गहिवर...
पाकिस्तानी तुरुंगात पस्तीस वर्षे नरकयातना भोगल्यानंतर काश्मीरसिंग यांनी अखेर भारताच्या भूमीत पाऊल ठेवले. हेरगिरीच्या आरोपावरून वयाच्या ३२ व्या वर्षी काश्मीरसिंग यांना रावळपिंडीत अटक झाली होती. कोर्ट मार्शलमध्ये मृत्युदंडाची सजा फर्मावण्यात आल्यानंतर त्यांच्या नशिबी लाहोरच्या करागृहातील कोठडीचा अंधार आला होता. तो मंगळवारी सरला. दुपारी पाऊण वाजता त्यांनी मातृभूमीत पहिले पाऊल टाकले आणि त्याच्या कुटुंबीयांनी दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ६७ वर्षीय काश्मीरसिंग यांची ६५ वर्षीय पत्नी परमजित कौर गेल्या शुक्रवारपासून अमृतसरमध्ये मुक्कामास होत्या. भावना मोकळ्या करताना त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.
प्रतिक्रिया
5 Mar 2008 - 2:21 am | धनंजय
कश्मीरसिंह यांच्या सुटकेसाठी झटणार्यांच्या कार्याचे चीज झाले.
बातमी पोचवून आमच्या दिवसात आनंद भरलात, धन्यवाद.
5 Mar 2008 - 8:55 am | विसोबा खेचर
हेच म्हणतो...
तात्या.
5 Mar 2008 - 6:35 am | चंबा मुतनाळ
काश्मीरसिंहच्या सुटकेनिमित्त अभिनंदन!
असेच बाकीचे युद्धकैदी, जे १९६५ च्या युद्धापासून पाकीस्तानच्या विवीध तुरुंगात खितपत पडले आहेत, ते देखील आपल्या नातेवाईकांकडे परत येवोत अशी आशा!
5 Mar 2008 - 6:58 am | सृष्टीलावण्या
इतके वर्ष डोळ्यात प्राण आणून पती घरी येण्याची वाट पाहणार्या पत्नीच्या प्रार्थनेला व तिने केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले यश. इतर सर्व घटक नाममात्र आहेत.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
5 Mar 2008 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काश्मीरसिंग ची सुटका ही बाकीच्या अशाच युद्धकैद्यांसाठी आनंदाची बातमी असेल, पण वाया गेलेल्या आयुष्याचे काय ?
किंवा, माणुस कुटूंबात परत आला, कदाचित हीच बातमी वाया गेलेले आयुष्य भरुनही काढत असेल असेही वाटते.
इथे बातमी दिल्याबद्दल आभारी.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
5 Mar 2008 - 10:26 am | विकास
नागरीक (सैन्यात नसलेले तुमच्या-आमच्यासारखे बहुसंख्य) आपली सुरक्षितता आणि एकंदरीतच आपले सुखी जीवन "टेकन फॉर ग्रॅन्टेड" पद्धतीने घेतो. म्हणूनच ती येथे द्यावीशी वाटली...
5 Mar 2008 - 4:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नागरीक (सैन्यात नसलेले तुमच्या-आमच्यासारखे बहुसंख्य) आपली सुरक्षितता आणि एकंदरीतच आपले सुखी जीवन "टेकन फॉर ग्रॅन्टेड" पद्धतीने घेतो. म्हणूनच ती येथे द्यावीशी वाटली...
एकदम सही !!!
पण, आपण इथे दिलेल्या बातमीबद्दल नाही म्हणत हो, काश्मिरसिंगाचे परत येणे हीच बातमी त्या कुटूंबासाठी त्याचे वाया गेलेले आयुष्य भरुन काढत असेल असे वाटते, असे म्हणतोय......!!!
5 Mar 2008 - 9:26 am | प्राजु
ही बातमी सकाळमध्ये वाचली आज. मन भरून आलं. पण त्यांनी धर्मांतर का केलं असावं हा प्रश्न राहून राहून मनाला बोचत राहिला..
- (सर्वव्यापी)प्राजु
5 Mar 2008 - 9:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण त्यांनी धर्मांतर का केलं असावं हा प्रश्न राहून राहून मनाला बोचत राहिला..
ही या घटनेत ही एक जिव्हारी लागणारी गोष्ट. पण प्रसंगानुसार कदाचित तसा निर्णय घ्यावा लागला असणार.
इथले धर्मपंडित पुन्हा त्यांना हिंदुधर्मात आणतील आणि राजकारणाला एक चांगला विषयही मिळेल असे वाटते.
अवांतर :- विषयांतराबद्दल क्षमस्व !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
5 Mar 2008 - 11:18 am | आनंदयात्री
>>इथले धर्मपंडित पुन्हा त्यांना हिंदुधर्मात आणतील आणि <<
ते बहुदा शीख असावेत !!
5 Mar 2008 - 9:16 pm | shrikantsv
अजुन किती तरी भारतीय युद्धकैदी पाकिस्तान असतील
सरकार ला कधी बुदी येणार
6 Mar 2008 - 2:52 pm | भडकमकर मास्तर
पण त्यांनी धर्मांतर का केलं असावं हा प्रश्न राहून राहून मनाला बोचत राहिला..
सगळ्याच गोष्टी थोड्याच चॉईसने केल्या जातात?
हेरगिरी हे एक अवघड काम आहे... ( ७३ साली रावळपिंडीत तर फारच अवघड काम...)
मी पूर्वी वाचले होते की कोणताही हेर पकडला गेला की त्याने हे ग्रुहित धरलेले असते की त्याचा देश (पकडला गेल्यावर लगेच ) हा आम्ही पाठवलेला नाही,असे म्हणतो आणि त्याला परत घेत नाही ..... वगैरे... आता खूप वर्षांनी का होईना काश्मीरसिन्ग परत आले ही एक भाग्याची गोष्ट....
..... आता इतर युद्धकैदीसुद्धा परत यायला हवेत...