मला आवडलेल्या काही अलिकडील कविता

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in जे न देखे रवी...
5 Mar 2008 - 12:11 am

मराठी संकेतस्थळांवर भटकताना अनेकदा कविता वाचायला मिळतात. अनेक नवे लोक आपापल्या परीने काहीतरी प्रयत्न करून पहात असतात.
या भटकंतीमधे सापडलेल्या या काही कविता. या सर्व कविता नव्व्दीच्या दशकातल्या किंवा नंतरच्या आहेत. त्या अशा कवींच्या आहेत जे मला केवळ आंतरजालामुळे माहीत झाले. विषय , मांडणी, भाषेला दिलेली वाटावळणे , या सर्व बाबतीमधे या कविता फार अनवट आणि म्हणूनच महत्त्वाच्या ठराव्यात. कविता या प्रकाराच्या शक्यताना जेव्हा आतापर्यंतच्या मार्गांपेक्षा वेगळ्या अंगानी भिडण्याचे प्रयत्न होतात तेव्हा एक नवीन प्रकारची कविता जन्म घेते.

सुरवात करतो मन्या जोशीच्या एका कवितेने.


प्रतिक्रिया

मनिष's picture

5 Mar 2008 - 10:34 am | मनिष

कोणीतरी समजवाल का प्लीज?
- (सामान्य) मनिष

धनंजय's picture

5 Mar 2008 - 10:51 am | धनंजय

जाते आहे.
"माणसे माणसे चुकतात" शब्दप्रयोग आवडला.

"सिव्हिल विधाने" चा अर्थ "सुसंस्कृत धाटणीचे पठडीबद्ध बोलणे" असा होतो का?

मुक्तसुनीत's picture

5 Mar 2008 - 11:23 am | मुक्तसुनीत

एकूण कवितेचा सूर हा आधुनिक जगात माणसामाणसामधल्या संप्रेषणाच्या (कम्युनिकेशनच्या ) अभावाकडे लक्ष वेधून घेणारा आहे. (मिस्टर आणि मिसेस लिमये समोरासमोर असतात; पण एकमेकाना हाक मारायला जणू पब्लिक् अनाउंसमेंटची गरज पडते.) आणि या अभावावर भाष्य करताना , मग कविता सर्वसामान्य श्रद्धांवर , भाबडेपणावर तिरकस असे भाष्यसुद्धा करते. "सबका मालिक एक" वरील या औपरोधिक ओळी या भाष्याच्या खात्यावर जमा होतात ; असा मी अर्थ लावला.

रेल्वे स्थानकावर कधीतरी ऐकलेल्या अनाउंसमेंटवरून - त्या अनाउनंसमेंटच्या एका अंधुक स्मृतीतून ही कविता येते. रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी आढळाणार्‍या "सबका मालिक एक" सारख्या ढोबळ ओळी त्या अनुषंगानेच येतात असे मला जाणवले.

>>> "सिव्हिल विधाने" चा अर्थ "सुसंस्कृत धाटणीचे पठडीबद्ध बोलणे" असा होतो का?

होय. असाच अर्थ मी लावला.

धनंजय यानी या ओळीवर विचारलेल्या प्रश्नांवर थोडा विचार केला असता असे जाणवले की , कवितेत या ठिकाणी तर्कशास्त्र (लॉजिक) आणि स्थापत्य अभियांत्रिकीमधल्या संज्ञांची आलटापलट करून एक रचना केली आहे. घरे विकत घेताना बिल्टअप एरिआ, सुपरबिल्टअप एरिआ असे शब्द ऐकतो . तर या सुपरबिल्टअप एरिआवर सिव्हील इंजिनीयरींगची बांधकामे उभी असतात. तर्कशास्त्रामधे असे म्हण्टले जाते की विधाने ही काही विश्वासांवर उभी असतात. (स्टेटमेंट्स आर बेस्ड ऑन सर्टन प्रेमिसेस.)

तर्कशास्त्र (लॉजिक) आणि स्थापत्य अभियांत्रिकीमधल्या संज्ञांची आलटापलट अशी साधलेली आहे.

धमाल मुलगा's picture

5 Mar 2008 - 11:18 am | धमाल मुलगा

शब्द आणि त्या॑नी बनलेली वाक्य॑ वाचली, त्या॑चा बाळबोध अर्थही लागला, पण........

कविता म्हणून म्हणाल तर..एकजात सगळ॑ टाळक्याच्या १०००० फुटावरून भुर्रर्रर्र....
काय करणार, आम्ही पडलो यत्कि॑चित गद्य जीव, (ग)धडा च म्हणा ना, कविता कसली कळणार डो॑बल?

आपला,
- (ग)धडा ध मा ल.

विसोबा खेचर's picture

5 Mar 2008 - 11:22 am | विसोबा खेचर

कविता मस्त आहे! सुंदर आहे...

आपला,
तात्या लिमये.

मुक्तसुनीत's picture

5 Mar 2008 - 11:36 am | मुक्तसुनीत

...आणि मला आवडलेली कविता.

विठोबा .

सगळे
नकाशे उलगडून दाखवतो तो
हा मास्टर प्लॅनर,
शक्यतांची दाट रानं
माझ्या अश्रूंचं ठिबकसिंचन करून वाढवली
तो हा वनमाळी

प्रत्येक चुकलेल्या वासरच्या कानापर्यंत
जाते याची बासरी
भवतापाचा गरगरता फेरा
नि पायात या गुराख्यानं पेरली भिंगरी

हे हरी
दमला की रे माझा जीव,
शक्यता सम्प्रदायातल्या माझ्या बापा
आता धर मला पोटाशी
अणि ठेव तुझ्यापाशी.

कवियत्री : इन्डीगो.

मुक्तसुनीत's picture

5 Mar 2008 - 11:39 am | मुक्तसुनीत

विठोबा
म्हणजे पोहायला शिकण्यापूर्वीचं पाणी
स्वरांच्याही अलिकडचा
शुद्ध गंधार
कातळ अंधार
अनन्त रात्रींचा

याच्या कृपासलीलासाठी आपण
तहानेलं व्हावं
तर यानं दुष्काळ पाडावेत
ओठांना भेगाळून टाकावं
यानं हाताची बोटं झडवावीत
यानं क्रूर व्हावं

यानच तहान अणि पाण्यातलं द्वैत
मिटवून टाकावं
यानं तहानेचाच पूर आणावा
यानं आर्तं हाकांना पाझर फोडावेत

याला घाबरवं तेव्हा
यानं भय व्हावं, मृत्यू व्हावं
यानं जीव दडपावा
यानंच संहार मांडवा

यानंच मग जोजवून घ्यावं
यानं असून नाहिसं व्हावं

जसं लयीत पोहायला शिकल्यावर
आपसूक तरंगता यावं
तसं यानं बाजूला व्हावं
होऊन पोहायला शिकण्यापूर्वीचं पाणी

नंदन's picture

5 Mar 2008 - 11:57 am | नंदन

उपक्रम आहे. धनंजयांनी म्हटल्याप्रमाणे, लिमयांच्या कवितेतले दुसरे कडवे जरा समजण्यास अवघड गेले.

'विठोबा'च्या दोन्ही कविता आवडल्या. (दुसरी वाचताना किंचित तूच घडविसी, तूच फोडिसी ची आठवण आली.) पोहायल्या शिकण्यापूर्वीचं पाणी...अप्रतिम! या दोन कवितांवरुन (काहीशी विरुद्ध टोकाची असली तरी) दासू वैद्यांची 'मरुन पडलेला पांडुरंग' ही कविता आठवली. ती येथे द्यायचा मोह होतो आहे -

मरून पडलेला पांडुरंग

वक्तशीर मुलगा
पाठीवर दप्तर घेऊन
शाळेत वेळेवर पोहोचतो
तसा येऊन पोहोचला पाऊस,
एखादं आदिम तत्त्वज्ञान रूजवावं
तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं
जमिनीच्या पोटात

मग भुरभुर वारा सुटला...
छोट्या स्टेशनवर न थांबता
एक्सप्रेस गाडी
धाड धाड निघून गेल्याप्रमाणे
काळे ढग नुस्तेच तरंगत गेले,
वाटचुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा
अचानक पाऊस बेपत्ता झाला

बियाच्या पोपटी अंकुरानं
जमिनीला धडका मारून
वर येण्यासाठी रचलेले मनसुभे
दिवसागणिक वाळून गेले,
जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप
दवाखान्यातल्या व्हरांड्यात
विमनस्क फेऱ्या मारतो
तसा शेतकरी धुऱ्यावर उभा

लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात
पंढरपुराकडे निघालेली दिंडी
आणि इथं काळ्या शेतात
मरून पडलेला हिरवा पांडुरंग!

कवी - दासू वैद्य
कवितासंग्रह - तूर्तास

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सर्किट's picture

5 Mar 2008 - 10:38 pm | सर्किट (not verified)

नंदन ही कविता फारच सुंदर आहे. दासू वैद्यांच्या आणखी कविता देशील का इथे ?

जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप
दवाखान्यातल्या व्हरांड्यात
विमनस्क फेऱ्या मारतो
तसा शेतकरी धुऱ्यावर उभा

डोळ्यासमोर आपसूक उभे राहणारे चित्रण !

- सर्किट

(दासू वैद्य हे ज्येष्ह्ठ की कनिष्ठ हे माहिती नाही, ह्याची सदस्यांनी नोंद घ्यावी. पण कविता फस्क्लास आहे.)

भडकमकर मास्तर's picture

7 Mar 2008 - 3:36 pm | भडकमकर मास्तर

दासू वैद्य एकदा पुण्यात पाच दिवसांच्या नाट्यलेखन शिबिरामध्ये भेटले होते... तेव्हा थोडी ओळखही झाली होती....
( शिबिराच्या आठवणीत मग्न) भडकमकर

चतुरंग's picture

5 Mar 2008 - 9:00 pm | चतुरंग

फारच भेदक मुक्तछंद आहे!
माणसां-माणसांतला एक अगम्य दुरावा आणि वाढत चाललेली अहंकाराची दरी ह्यातून आलेल्या तुटलेपणावर आणि तरिही ते मान्य न करता तुझं तू माझं मी ह्याच तत्वानं आयुष्य पुढे रेटणार्‍या, आत्मवंचना करणार्‍या मनोवृत्तीवरची ही टीका आहे.
मन्या जोशीचे मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण आणि तो अनुभव शब्दात मांडण्याची ताकद ह्या दोन्हीला माझी दाद!!

चतुरंग

shrikantsv's picture

5 Mar 2008 - 9:39 pm | shrikantsv

सुंदर आभारी आहोत मुक्तसुनीत