भारतातील छोट्या पडद्यावरील "के-सिरियल्स" जेव्हा पाकिस्थानात पोचल्या, लोकप्रिय झाल्या नव्हे त्यांनी भारतीयांइतकंच पाकिस्थान्यांना वेड लावलं. त्याबरोबर तेथे सांस्कृतीक आक्रमणाची ओरड सुरू झाली. पाठोपाठ तेथील प्रसार माध्यमांतून झालेल्या चर्चा, विचारमंथनानंतर; 'बन्स रोड की निलोफर' ह्या धारावाहीकाला जन्म देण्याचे लेखक / पटकथा लेखक फसीह बारी खान आणि दिग्दर्शक एस्. मजहर खान ह्यांनी ठरवले असावे असे हे धारावाहीक पाहातांना वाटत रहाते.
कराचीतल्या कुठल्याश्या बन्सरोडवरच्या एका घरात निलोफर ही धारावाहीकेची नायिका रहाते. मॅट्रीकच्या परीक्षेत २-४ वेळा नापास झालेली, ८-१० भावंडाच्या गोतावळ्यात सगळ्यात मोठी, स्वप्नाळू, निलोफर भारतीय चित्रपट व रुपेरी पडद्यावरील मालिकांची फॅन आहे. शाहरूख आणि प्रितीची विर-झारा ची जोडी तिच्यासाठी ड्रिमकपल आहे. स्टार टि.व्ही. ला ती सितारें वाला चॅनल म्हणते. इस्लामी संस्कृतितील घुसमटीत रहाणारी निलोफर स्वत: ला कुमकुम किंवा सास भी कभी बघतांना त्यातल्या नायिकांत शोधत असते. त्यांच्या प्रत्येक दृश्यांतील साड्या, दागिने, मोठ्ठाली घरे, गाड्या, करोडोंचे व्यवहार आणि त्याच्या गप्पा हे तिच्या करता डोळे विस्फारून बघायचे, चर्चेचे आणि चिंतनाचे विषय आहेत.
हामीद हा निलोफरच्या गल्लीत रहाणारा केबल ऑपरेटर आहे. केबलच्या दुरुस्तीकरतां म्हणून हामीदच निलोफरच्या घरी येणं जाणं आहे. निलोफरला हामीद आवडतो, हामीदच्या गालावर पडणार्या खळ्यांमुळे निलोफर हामीद मधे शाहरूखला शोधते. येताजाता काही विषय काढून ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते. हामीदही तिला माफक प्रतिसाद देतो. निलोफर पेक्षा १०-१२ वर्षांनी मोठी, तिच्या घरासमोर रहाणारी, अविवाहीत, जरा फटाकड्या स्वभावाची फाकरा निलोफरची 'राझदार' आहे. निलोफर कडून तिची सारी गुपिते जाणून घेणारी फाकरा स्वत: बद्दल मात्र निलोफरशी हातचं राखून बोलते. फाकराचं एका विवाहीत काही बच्चोंका बाप असणार्या प्रौढाशी सूत जुळलेलं आहे. ती त्याच्या बरोबर बाहेर लपून छपून फिरायला जाते, मौजमजा करते इतकीच माहिती निलोफरला आहे, तो म्हातारा कोण, कुठे रहातो, फाकराशी तो लग्न करेल काय वैगेरे बद्दल निलोफरला थोडं कुतूहल आहे परंतू चौकशी करण्यापेक्षा स्वतःच सगळं सांगण्याचाच तिचा पिंड आहे.
निलोफर आणि हामीद मधे प्रेमपत्रांची देवाण-घेवाण सुरू आहे. निलोफर आपल्यांच स्वप्नांत दंग आहे. हामीद प्रकरणांमुळे तिचं सितारेंवाल्या चॅनलच वेड कमी झालं आहे. फाकराच्या मदतीने निलोफर हामीदची फाकराच्या घरी व बागेंत भेट घेते. बागेत काही प्रेमाच्या गप्पा करण्यापेक्षा हामीद कडून कोल्ड्रींक्स बर्गरची भूक शमवून घेते. हामीद निलोफरला पळून जाऊन लग्न करण्याविषयी बोलतो, पण निलोफर ते फार गांभीर्यानी घेत नाही.
एके दिवशी आपापल्या घरांच्या खिडक्यातून ते दोघे नैनमटक्का करतांना निलोफरचा बाप तिला पाहातो आणि तिचं बिंग फुटतं. भेटी-गाठी बंद होतात, पण चिठ्ठीला दगड बांधून एकमेकांकडे फेकून आपल्या भावना पोचवण्याचे प्रयत्न दोघे करत रहातात. एके दिवशी निलोफरशी जिन्याजवळच्या व्हरांड्यातून बोलण्याचा प्रयत्न करणारा हामीद पकडला जातो. तो निलोफरच्या बापाला निलोफरशी लग्न करण्याची ऑफर देतो जी निलोफरचा बाप झिडकारतो. आता, फाकराच्या मदतीनं पत्रव्यवहार सुरू रहातो. इकडे निलोफरचे अम्मा-अब्बा तिचा निकाह नात्यांत कोणाशी ठरवायचा प्रयत्न करतात. निलोफरला हामीदनी पळून जाऊन लग्न करण्याविषयी विचारलेलं असतं ते आठवतं. निलोफरच्या लग्नासाठी म्हणून केलेले दागिने घेऊन निलोफर पळून जायची हिंम्मत करते खरी पण हामीदच्या घरी पोचल्यावर तिला दोन धक्के बसतात... ते कोणते? हामीद आणि निलोफरचं शेवटी लग्न होतं का? तिच्या हिंदी मालिकांच्या वेडाच काय होत? फाकराशी तिचा म्हातारा आशिक लग्न करतो का? वैगेरे प्रश्नांची उत्तरे शोधण्यांत रस असल्यास हे २-३ तासांचे नाटक पाहून मिळवा.
हामीदची भूमिका केलेला अभिनेता सोडल्यास ह्यातील एकही कलाकार माझ्या ओळखीचा नाही. परंतू निलोफर, फाकरा, हामीद व इतर कलाकार आपापल्या जागी फिट बसतात. पात्रांचे एकमेकांशी ओरडून बोलणे, शिव्या ह्यामूळे नाटक जरा लाऊड वाटतं पण स्थानीक संस्कृतीनुसार लोक असं एकमेकांशी बोलत असावेत? म्हणून त्या कडे दूर्लक्ष करता येईल.
भाग १ http://video.google.com/videoplay?docid=8840211917125612818
भाग २ http://video.google.com/videoplay?docid=-4816792972630497686
भाग ३ http://video.google.com/videoplay?docid=-5076939735569752942
हा लेख आम्ही आमच्या अनुदिनीवर प्रसिद्ध केलेला आहे.. http://redyachyatondived.blogspot.com/
प्रतिक्रिया
3 Mar 2008 - 11:24 am | विसोबा खेचर
वा व्यंकटराव! आज प्रथमच तुमची लेखनशैली अनुभवली. खूप साधी सोपी आणि प्रवाही वाटली! निलोफरच्या गोष्टीची आपण फार नेटकी, मोजक्या शब्दात आणि कुठेही पाल्हाळ न लावता ओळख करून दिली आहे...
सध्या जरा कामाच्या गडबडीत आहे, सवडीने आपण दिलेल्या दुव्यावर जाऊन चित्रफिती पाहीन. थोडीशी झलक मात्र पाहिली! छान आहे...
अवांतर - बाकी तुम्ही काही म्हणा व्यंकटशेठ, साला मुसुलमानी सौंदर्याची नशा काही औरच! फार सुरेख दिसतात या मुसुलमानी बायका! खानदानी सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण करणार्या, गोर्यापान, नाकीडोळी अतिशय आखीवरेखीव आणि सगळं अगदी जिथल्या तिथे प्रमाणबद्ध आकारात आणि मापात असलेल्या! छ्या....! :)
तुमची निलोफरपण बाकी खासच दिसत्ये हो! कोण अभिनेत्री आहे कुणास ठाऊक पण साला काय सुरेख आणि बोलके डोळे आहेत त्या बयेचे! छ्या! आपण तर साला बसल्या खुर्चीत खल्लास...!
आपला,
(मुसुलमानी बिर्याणीचा, अत्तराचा, आणि सौंदर्याचा पागल) तात्या हामिद! :)
3 Mar 2008 - 6:46 pm | व्यंकट
धन्यवाद तात्या. मला पण निलोफरच नाव माहिती नाही. बाकी तुम्ही जे वर्णन केलं आहे, त्यास माझे अनुमोदन. ;)
3 Mar 2008 - 3:56 pm | सृष्टीलावण्या
खुप उत्सुकता असते.
१५-२० वर्षापूर्वी एक प्रवासवर्णन वाचले होते त्यातील एक प्रसंग आठवला...
लेखक एकदा पाकिस्थानला गेला होता... तिकिट काढण्यासाठी बारीतून हात आत घातला पैसे देण्यासाठी.. तर तिथल्या विक्रेत्याने पटकन म्हटले.. तुमचे घड्याळ छान आहे, तुम्ही भारतीय किती भाग्यवान आहात. घड्याळे तयार करण्याची तुमची स्वत:ची एचएमटी कंपनी आहे.. आमच्या पाकिस्तानात सर्वच अमेरिकेतून येते.. खिळ्यापासून रणगाड्यापर्यंत.
मला एकदा यायचंय हिंदुस्तानात (व्हिसा न मिळण्यामुळे जे त्यावेळी अशक्यप्राय समजले जायचे).
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
3 Mar 2008 - 5:37 pm | विसोबा खेचर
सृष्टीलावण्या,
आपल्या प्रतिसादातील घड्याळाचा किस्सा छानच आहे, परंतु संबंधित विषयानुरूपही (म्हणजे निलोफरचे कथानक, चित्रफिती इत्यादी) आपण काही प्रतिसादपर लिहिले असतेत तर आपल्या प्रतिसादातील असंबद्धता तेवढी जाणवली नसती असे वाटते...!
असो...
आपला,
(सुसंगत!) तात्या.
3 Mar 2008 - 11:51 pm | प्राजु
व्हीडीओ दिसत नहिये त्या दुव्यावर. काय करावे?
बाकी फोटोमध्ये ही निलोफर खूप छान दिसते आहे. दुव्यावर नाटक पहाता आले तर ते पाहून नंतर प्रतिसाद देइन.
- (सर्वव्यापी)प्राजु
4 Mar 2008 - 12:10 am | व्यंकट
http://video.google.com/videosearch?q=bans+road+ki+nilofar&sitesearch=
4 Mar 2008 - 12:14 am | व्यंकट
दिसेनासा झालेला आहे. पण झी शेअर वर पहाता येतोय अजूनही http://www.apnicommunity.com/pak-tv-pakistani-tv-drama-serials-shows/341...
4 Mar 2008 - 2:54 pm | चित्तरंजन भट
व्यंकटराव, 'बन्स रोड की नीलोफ़र' बद्दल इथे ओघवत्या शैलीत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. वाचून बघायलाच हवी ही नीलोफ़र असे वाटले. सवडीने विडियो बघेन म्हणतो. बाकी मी 'तात्या हामिद' ह्यांच्या 'मुसुलमानी' (हा शब्द फारच आवडला. उच्चारताना फार मजा येते आहे.) प्रतिसादाशी सहमत आहेच.
4 Mar 2008 - 3:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्यंकटराव,बन्स रोड की नीलोफर,नाटकाचे कथानक आपल्या सहज शैलीत वाचायले मिळाले आपले अभिनंदन, बाकी नीलोफर दिसायला खासच हं !!! :) !!!