जे व्हायचं होतं ते तसं होऊन गेलं
आता मी स्वत:ला सावरतो आहे
अडवून पापण्याआड चिंब आसवाना
मी भावनांचा पसारा आवरतो आहे
कोण जाणे काय झालं होतं मला
एका स्वप्नाने गात्रं भारली होती
उद्याच्या उजेडावर विसंबून मी
अंधारात एक उडी मारली होती
कशावर तरी आदळलो, आणि
जाणवलं, फसलीच आपली उडी
कुठेच दिसत नाही इथे किनारा
भरकटली आहे आपली होडी
भरून आले पाण्याने डोळे, पण
म्हटलं अस खचून जायचं नाही
आयुष्यात अस होतंच राहणार
निराशेचा गुलाम व्हायचं नाही
खेळवीत चेहर्यावर निरागस हसू
मी स्वत:लाच धीर इथे देतो आहे
पायात बेड्या पराभवाच्या अन्
नजेरेने उज्वल उद्याचा वेध घेतो आहे
कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या
असंख्य तुफानाना टक्कर देईन मी
असेल जरी इथे आज अंधार चहूकडे
उद्या उज्वल यशाचा दिवस पाहिन मी
प्रतिक्रिया
2 Mar 2008 - 9:29 pm | प्राजु
कोणाही निराश माणसाला उत्साह देईल अशी आहे. निराशेने गळून न जाता नविन लढाई लढण्यास समर्थ व्हा असा संदेश देणारी कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
3 Mar 2008 - 9:02 am | विसोबा खेचर
गावडेसाहेब,
सुंदर कविता!
भरून आले पाण्याने डोळे, पण
म्हटलं अस खचून जायचं नाही
आयुष्यात अस होतंच राहणार
निराशेचा गुलाम व्हायचं नाही
वरील ओळी सुंदर आहेत...
तात्या.
3 Mar 2008 - 10:48 pm | llपुण्याचे पेशवेll
'असेल जरी इथे आज अंधार चहूकडे
उद्या उज्वल यशाचा दिवस पाहिन मी'
कदाचित दुर्दम्य आशावाद म्हणजे हाच असावा.
पुण्याचे पेशवे
4 Mar 2008 - 1:17 am | चतुरंग
कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या
असंख्य तुफानाना टक्कर देईन मी
असेल जरी इथे आज अंधार चहूकडे
उद्या उज्वल यशाचा दिवस पाहिन मी
ओळी आवडल्या. आगे बढो!
चतुरंग
4 Mar 2008 - 9:07 pm | विकास
फार सुंदर कविता. वाचनखुणांमधे घातले...किप इट अप!
मला कुसुमाग्रजांच्या "कणा"या कवितेतील विद्यार्थ्याच्या "बाण्या"ची आठवण झाली. छोटेसे काव्य असल्याने, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खाली लिहीत आहे:
ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
"गंगामाई पाहूणी आली" गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली
भिंत खचली,चूल विझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेउन सर आता, संगे लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला
पैसे नको, जरा एकटे पणा वाटला
मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून, नुसते लढ म्हणा
4 Mar 2008 - 9:42 pm | विसोबा खेचर
धन्यवाद विकासराव,
कुसुमाग्रजांची माझी ही अतिशय आवडती कविता!
प्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे ही कविता फार सुंदर म्हणतात असा माझा अनुभव आहे...
आपला,
(कुसुमाग्रजप्रेमी) तात्या.