कोलंबी-बटाटा मसाला

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in पाककृती
16 Oct 2009 - 11:33 am

गणपाशेठ, प्रभो, पांथस्थ,दिपालीताई इ. पासून प्रेरणा घेऊन आपणही आपली एखादी पाककृती लिहावी, असा विचार मनात आला. माझे स्वयंपाकाचे प्रयोग खरे तर केवळ निरीक्षणातून आणि स्वतःच्या चवीसाठी केलेल्या उचापतींमधून चालू झाले. लहानपणी आई-आजीने कधी कशाला हात लावू दिला नाही (आणि त्याबरोबरच अनेकदा 'आयतं गिळायला पाहिजे' वगैरे मुक्ताफळांचे सत्कारही केले), त्यामुळे स्वयंपाकघरात उभे राहून त्या काय करत आहेत, याकडे लक्ष देणे; पाककृतींची पुस्तके वाचणे वगैरेपर्यंत उड्या मारल्या जायच्या. अमेरिकेत आल्यावर मात्र आपल्या मनाप्रमाणे प्रयोग करायचे स्वातंत्र्य मिळाले नि त्याचा स्वयंपाकघरात पुरेपूर उपयोगही करून घेतला (नि उपभोगही घेतलाच ;) ) त्यातच गणपाशेठ नि प्रभोचे एकामागोमाग एक मॅरेथॉन प्रयोग पाहून अस्मादिकांनाही स्फुरण चढले. 'चांगले जेवण करता येणार्‍या अमेरिकास्थित मुलास नवरेबाजारात मिळणारा भाव' हा आणखी एक बोनस् प्वाइन्ट् तीनेक वर्षांपूर्वी कोणा दूरदर्शी सद्गृहस्थाने माझ्या हातची कोणतीशी पाककृती चाखून माझ्या प्रोफाइलमध्ये नोंदवला होता. या सगळ्याच्या पुण्यस्मरणाने आज मिसळपाववर पहिली (आणि तीच शेवटची ठरू नये, अशी प्रार्थना करून) पाककृती लिहायला घेतली आहे.

कोलंबी-बटाटा मसाला:

वाढणी: १-२ जणांसाठी

साहित्यः

  1. १-२ जणांना हवी असेल तितकी कोलंबी साफ करून (मधला काळा दोरा काढणे वगैरे प्रकार )(मी अमेरिकेत मिळणारे मध्यम आकाराचे कुक्ड् श्रिम्प्स् चे पाकीट घेतले होते; साफ करायची वगैरे गरज पडली नाही)
  2. १ मध्यम/मोठा कांदा
  3. दम-आलू साठीचे २ बटाटे (ते नसल्यास १ मोठा बटाटा)
  4. ३/४ वाटी ओल्या नारळाचा चव/नारळाचे दूध
  5. १ टी स्पून आले-लसूण पेस्ट
  6. १ टी स्पून खसखस
  7. १ टी स्पून धने-जिरे पूड
  8. ३-४ सुक्या लाल मिरच्या
  9. १ टी स्पून लाल तिखट
  10. १ टी स्पून हळद
  11. १ टी स्पून गरम मसाला
  12. २ टी स्पून मटन मसाला/चिकन मसाला/फिश मसाला, फिश मसाला असल्यास सर्वोत्तम
  13. १ टी स्पून/चवीनुसार मीठ
  14. २-३ आमसुले(कोकम)
  15. १-१.५ टेबलस्पून तेल
  16. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:

  1. प्रथम अर्धा कांदा उभा पातळ चिरून घ्या. उरलेल्या अर्ध्याचे उभे-आडवे हवे त्या आकाराचे तुकडे करून घ्या नि ते मिक्सरमध्ये टाका.
  2. ३/४ वाटी ओल्या नारळाचा चव/नारळाचे दूध, १ टी स्पून आले-लसूण पेस्ट, १ टी स्पून खसखस मिक्सरमध्ये टाकून कांद्यासह चांगले वाटून/लिक्विफाय करून घ्या.
  3. कढईत १-१.५ टेबलस्पून तेल तापत ठेवा.चांगले गरम झाल्यावर प्रथम सुक्या लाल मिरच्या थोड्या परतून घ्या; पातळ उभा चिरलेला कांदा रंग बदलेतोवर (गुलाबीसर होईतोवर) मंद/मध्यम आचेवर परतून घ्या.
  4. बटाट्याच्या साधारण मोठ्या फोडी करून घ्या. दम-आलू साठीचे चिटळुंग बटाटे असल्यास एका बटाट्याच्या ४-६ फोडी या प्रमाणे फोडी करून घ्या. त्या कढईत टाका, धने-जिरे पूड टाका नि साधारण २ मिनिटे परतून घ्या.
  5. वरील क्र. २ मधील मिश्रण कढईत घालून सगळे एकत्र ढवळून घ्या. गरज भासल्यास अर्धी वाटी पाणी घाला.
  6. मिश्रणात आता कोलंबी घाला. तिखट, हळद, गरम मसाला, फिश मसाला/मटन मसाला/चिकन मसाला टाका. आमसुले टाका. मिश्रण चांगले ढवळा आणि झाकून शिजवत ठेवा.
  7. मधून मधून ढवळत रहा. बटाटे कितपत शिजलेत याचा अंदाज घ्या. समाधानकारकरित्या शिजल्यावर चवीपुरते मीठ घालून शेवटची उकळी काढा.
  8. गॅसवरून उतरवून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. गरमागरम पोळ्यांबरोबर किंवा ब्रेडबरोबर हादडा.

IMG_1165

टिपा:

  1. आमसुलांऐवजी टोमॅटो वापरूनही थोडी आंबट चव आणता येईल. त्यासाठी टोमॅटोच्या मध्यम फोडी करून त्या उभ्या चिरलेल्या कांद्यासोबत परतून घ्याव्यात.
  2. प्लेटमध्ये दिसणारा स्टीलच्या वाटीतला पदार्थ म्हणजे तिक्षे पोहे. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी (तो मी केलेला नाही; दिवाळीच्या फराळाचा आयटम् आहे जो भारतातून आयात केला गेला आहे. )

प्रतिक्रिया

सहज's picture

16 Oct 2009 - 11:37 am | सहज

शिवाय त्या पोळ्या तू केल्या असशील तर सहीच रे!!

बेसनलाडू's picture

16 Oct 2009 - 11:41 am | बेसनलाडू

केल्यात रोटी-लॅन्ड वाल्यांनी :D ;)
(आयतोबा)बेसनलाडू

नंदन's picture

16 Oct 2009 - 11:40 am | नंदन

सही, बेला. पाकृतला तुझा प्रथमाध्याय परमेश्वराच्या पहिल्या अवतारानेच संपन्न झाला आहे, हे पाहून संतोष जाहला :).

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

16 Oct 2009 - 12:36 pm | श्रावण मोडक

पान वाढा!

सुबक ठेंगणी's picture

17 Oct 2009 - 6:27 am | सुबक ठेंगणी

असंच म्हणते.
गरमगरम कोलंबी बटाटा आणि तव्यावरची पोळी/फुलका (असलं तर वरून तूप!) वा! मस्तच...करून पाहीन नक्की.
अंगठीबद्दल अभिनंदन!

विसोबा खेचर's picture

16 Oct 2009 - 12:44 pm | विसोबा खेचर

सुंदर...

तात्या.

गणपा's picture

16 Oct 2009 - 12:58 pm | गणपा

बेलाशेठ वेल्कम टु क्लब :). उत्तरोत्तर आश्याच एक से एक रेशिप्या येउ देत.
फोटु आणि पाकृ लै जबरा.

प्रभो's picture

20 Oct 2009 - 5:28 pm | प्रभो

बेलाशेठ वेल्कम टु क्लब

आता नाव शोभतय तुमचं...:)
उत्तरोत्तर आश्याच एक से एक रेशिप्या येउ देत.
फोटु आणि पाकृ लै जबरा.

--प्रभो

अवलिया's picture

16 Oct 2009 - 2:58 pm | अवलिया

परम संतोष ! :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

स्वाती२'s picture

16 Oct 2009 - 4:30 pm | स्वाती२

छान! आज आमच्याकडे हाच मेनु आहे

प्राजु's picture

16 Oct 2009 - 8:11 pm | प्राजु

'चांगले जेवण करता येणार्‍या अमेरिकास्थित मुलास नवरेबाजारात मिळणारा भाव'
बरं बरं!! आता गुपित समजलं... पारिजात फुलांच्या दरवळाप्रमाणेच तुझी पाककला बहरत राहो.. :) ;)
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

16 Oct 2009 - 8:22 pm | चतुरंग

मस्तच आहे पाकृ, तरी बरं मी मांसाहारी नाहीये आता! #:S

..शेवटची उकळी काढा
वगैरे एकदम खास पाककृतीतले शब्द टाकले आहेस की! ;)

(हे 'रोटी लँड' काय प्रकार आहे? तयार पोळ्या देतात की काय - फक्त घरी आणून भाजायच्या?)

(चौकस)चतुरंग

बेसनलाडू's picture

16 Oct 2009 - 9:23 pm | बेसनलाडू

लाटलेल्या तयार पॅकबन्द पोळ्या असतात त्यांच्या. भारतीय वाणसामानाच्या दुकानात मिळतील. घरी आणून फक्त भाजायच्या.
(अनुभवी)बेसनलाडू

चतुरंग's picture

16 Oct 2009 - 9:55 pm | चतुरंग

कधीतरी अडीअडचणीला उपयुक्त माहिती! धन्स! :)

चतुरंग

मिसळभोक्ता's picture

16 Oct 2009 - 10:23 pm | मिसळभोक्ता

रोटीलँडची तीस पोळ्यांची पाकिटे कॉस्टकोमध्ये पाहिली तेव्हा, जय हारी विठ्ठल म्हणावेसे वाटले !

ही इथल्या सावळ्या विठूरायाची कृपा असावी. (नव्या देशींना येऊ देत नसला, तरी इथल्या जुन्या देशींवर वरदहस्त आहे हो त्याचा.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

Nile's picture

20 Oct 2009 - 12:36 pm | Nile

कॉस्ट्को: आम्ही जय हरी विठ्ठल म्हणुन त्या पोळ्यांची दोन पाकीटे कटेवरी पण घेतली. :)

दिपाली पाटिल's picture

16 Oct 2009 - 8:51 pm | दिपाली पाटिल

मस्तच बेला...ते आपल्या कट्ट्याला आता भरपूर व्हरायटी मिळणार तर... :D

दिपाली :)

संदीप चित्रे's picture

16 Oct 2009 - 9:27 pm | संदीप चित्रे

दिवाळीच्या चार दिवसांत सामिष भोजनाला पर्याय नाही ....
फराळाचे पदार्थ खाऊन कंटाळलेल्या जीभेला रूचिपालट हवाच :)

बेसनलाडू's picture

16 Oct 2009 - 9:33 pm | बेसनलाडू

दिवाळीच्याच दिवशी सकाळच्या अभ्यंगस्नानानंतरच्या फराळात तीन प्रकारचे पोहे आणि बाकीच्या चकली,चिवडा अशा पदार्थांबरोबर चिकन समोसे, फिश कटलेटसुद्धा हवे, असे माझे मत. आणि दुपारच्याजेवणाबद्दल तर .. बोलायलाच नको..
(सामिषप्रेमी)बेसनलाडू

प्रभाकर पेठकर's picture

16 Oct 2009 - 9:49 pm | प्रभाकर पेठकर

मस्त पाककृती. अभिनंदन.

मला व्यक्तिशः नॉन व्हेज पाककृतीत बटाटा आवडत नाही. पण असो.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

आण्णा चिंबोरी's picture

16 Oct 2009 - 11:06 pm | आण्णा चिंबोरी

बेला, इथे भाजीवर वरुन लिंबु पिळला तर चालेल आणि कोथिंबीर(सांबार) थोडी चिरुन टाक नाहीतर गवत खाल्यासारखी लागते.

(खवैया) आण्णा चिंबोरी

लवंगी's picture

17 Oct 2009 - 7:28 am | लवंगी

१ नंबरी

- कोलंबीत बाटाटा आवडणारी लवंगी..

पक्या's picture

17 Oct 2009 - 8:03 am | पक्या

छान रेसिपी. धन्यवाद.

costco मध्ये रोटीलँड च्या पोळ्या मिळतात. फार महाग पण नाहिये. गरम गरमच छान लागतात या पोळ्या. भाजून नंतर खाण्यासाठी ठेवुन दिल्यास फार चिवट झालेल्या असतात.

धनंजय's picture

19 Oct 2009 - 6:57 am | धनंजय

पाककृती आणि चित्रही.

बेसनलाडू
छान पाककृती आहे आजचा मेनु श्रीमती नेने यांनी सांगितलेले बेसनलाडू आणि बुधवारी वरिल मेनु
जठरअग्नि शमन क्रेंद्र अधिकारी
संजीव

मसक्कली's picture

20 Oct 2009 - 12:29 pm | मसक्कली

:D

=P~ =P~

8>