ऐरावती रत्न थोर

विकास's picture
विकास in काथ्याकूट
9 Oct 2009 - 9:02 pm
गाभा: 

नोबेल पुरस्कार (विशेष करून शांतता) देताना राजकारण होते हे नक्कीच. ते केवळ अमेरिकन फिक्सिंग नसून नॉर्वेजीयन फिक्सिंग आहे, किंबहूना हे महासत्तांचे एकत्रीत फिक्सिंग आहे. बर्‍याचदा ज्या देशात सौंदर्यसाधने खपवायची असतात त्या देशातील युवतींना "मिस युनिव्हर्स" केले जाते तसेच ज्या मुद्यांना जोर देयचा असतो त्यातील व्यक्तीस नोबेल शांतता पुरस्कार दिला जातो. म्हणूनच दुर्दैवाने गांधीजींना मिळाला नाही. नेहरूंनी तर इतके चीन विरुद्ध शांतताप्रिय राहून हरून दाखवले तरी देखील मिळाला नाही कारण त्या काळातील जागतीक राजकारणात त्याचे महत्व नव्हते. या उलट व्हिएटनामवर युद्ध लादून पर्यायाने स्वतःच्या देशातील सैनिकांच्या आयुष्याची वाताहात करण्यात आणि देशाला नामुष्कीने हार पत्करायला लावण्यात सामील असलेल्या (भारत आणि इंदिरा विरोधी) हेन्री किसिंजरलापण हा पुरस्कार देण्यात आला होता. का? अर्थात तेंव्हा कम्युनिस्ट रशियाला जिथे हवा तिथे धक्का मारण्याचे तंत्र अवलंबले जात होते आणि भांडवलशाहीचा प्रभाव विविध पद्धतीने वाढवण्याचे प्रयत्न होत होते...

असेच दुसरे जागतीक राजकारण असते ते ऑलिंपिक्सचे स्थळ ठरवताना. आपले शहर शिकागोला या संदर्भात मान मिळावा म्हणून स्वतः ओबामा आणि मिशेल ओबामा समितीसमोर (अँमस्टरडॅमला) बोलायला गेले तरी शिकागो पहील्याच फेरीत बाद झाले!

ओबामांच्या बाबतीत नोबेल मिळताना मात्र वेगळे आहे असे वाटते. जे थोडेफार इस्त्रायली पंतप्रधान इझॅक रॅबीन, तत्कालीन परराष्ट्रपंत्री शिमॉन पेरीस आणि पॅलेस्टाईन नेते यासर अराफत यांना जसे गडबडीत नोबेल दिले कारण त्यातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल असे वाटले तसेच काहीसे या संदर्भात आहे. आणि तसे खरेच काही ओबामांच्या हातून चांगले झाले तर त्यांना (अमेरिकन व्यक्तीस वगैरे) नोबेल मिळाले म्हणून वाईट वाटायला नको. पण आधीच स्वतःच्या देशातील सामान्य आणि असमान्य जनतेच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली असलेल्या ओबामांना आता युरोपाच्या "न्युक्लीअर फ्री वर्ल्ड" या स्वप्नाच्या (वास्तवीक त्यांच्या वास्तव भितीच्या) ओझ्याखाली पण वागावे लागणार आहे. कारण त्यांच्या "न्युक्लीअर फ्री वर्ल्ड" च्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख निवडसमितीने केला आहे.

यातून काय दिसते? निव्वळ आंतर्राष्ट्रीय राजकारण? ते आहेच, पण तितकेच हा भाग पटत नाही. त्यातून दिसत आहे ते काही तरी आता चांगले निष्पन्न होउंदेत हे "डेस्परेशन" आणि तसे "हातघाईला" येण्यामधली कुठल्याच अर्थाने सामान्य नसलेल्या या वरीष्ठ लोकांमधील मानसीक अगतिकता. तुम्हा-आम्हाला अथवा आपल्याहून सामान्य असलेल्या जनतेला विविध पद्धतीच्या अगतिकतेने, डेस्परेशनने पछाडलेले असते. कायम नसेल पण कधी ना कधी नक्कीच... पण जे अतिउच्चभ्रू आहेत त्यांना अशी काय काळजी आहे? ते खरेच "चिंता करीतो विश्वाची" असे म्हणत आहेत का निव्वळ काहीतरी कोता स्वार्थ आहे?

मला वाटते, स्वार्थ कुणाचाही असतोच पण ज्या पद्धतीने जगात घटना घडत आहेत त्या पद्धतीने अस्वस्थता वाढत आहे. अशा बर्‍याच गोष्टी असतात की ज्या आपल्याला पूर्ण माहीत नसतात पण केवळ आडाखे बांधता येतात. पर्यावरण बदल हा असाच एक भाग आहे. तसेच अफगाणिस्तान आणि त्याहूनही जास्त गंभीर हे अणूशक्ती हातात असलेले पाकीस्तान, अणूशक्तीसंपन्न होण्याची इर्षा बाळगणारे इराण, उत्तर कोरीया, विविध पद्धतीने जगात विस्तारत असलेला चीन आणि अर्थातच सर्वत्र भय असलेल्या हिंस्त्र दहशतवादामुळे जग एका वेगळ्याच कड्याच्या टोकावर उभे आहे. यात केवळ गरीब, सामान्यांचाच नाही तर सर्वांचा कडेलोट होऊ शकेल अशी अवस्था आली आहे.

अशा वेळेस, आम्हाला जगाचे पडलेले नाही आम्ही केवळ "अमेरिकन इंटरेस्ट" बघतो असे न म्हणणारी वृत्ती असलेला राष्ट्राध्यक्ष येतो आणि अमेरिकेस, जगाच्या "चांगल्या" अर्थे "जबाबदारी" जाणून जवळ करतो, तेंव्हा आशा वाढतात. पर्यावरण बदलावरून कायदा करण्यापासून ते अगदी इराणशी प्रत्यक्ष बोलणी करण्यापर्यंत ओबामांनी मोकळेपणा दाखवला आहे. कुणाला आवडो अथवा न आवडो, पटो अथवा न पटो,(मला स्वतःला पण पटत नाही) पण कम्युनिस्ट सोव्हीएट रशियाच्या अंतानंतर जगाचे एकमेव नेतृत्व अशी अमेरिकेची प्रतिमा झाली आहे. पर्यायाने सर्व अधिकार एकवटलेला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा त्याच्या अंतर्गत तसेच परराष्ट्र धोरणांनी "राजा कालस्य कारणम" ठरत आला आहे.

अशा या "जागतीक नेतृत्वास" जेंव्हा अचानक सर्वोच्च पारीतोषिक त्याची राजकीय घडी बसत असतानाच मिळते तेंव्हा ते बक्षिस नसून एकीकडे मागणी असते, तर दुसरीकडे त्याची प्रतिमा अजून उजळवून त्याला मोठेपण देत जगाला मागे ओढण्याचा एक प्रयत्न असतो. त्यात कोण किती यशस्वी होत आहे, ते काळच ठरवेल. पण जर त्यातून काही चांगले होणारच असेल तर हेवा वाटणे समजू शकेल पण (जरी उपयोग नसला तरी) त्याला विरोध असायचे कारण असू नये असे वाटते. जर ओबामांना यश येताना दिसले तर काय, उद्या पोप त्यांना जिवंतपणी पण संत म्हणून जाहीर करेल (कारण कशातही पूर्ण यश आले तर तो एका अर्थी चमत्कारच असेल!). पण अजून वर्षभरात काहीच आशेचे किरण दिसले नाहीत तर आधीच अपेक्षांच्या ओझ्याने वाकलेल्या ओबामांना जनतेचा प्रत्यक्ष रोष हा सिनेट/काँग्रेसच्या २०१० च्या निवडणूकातून भोगावा लागेल. एकूण काय जर कालपर्यंत चार तास शांत झोप लागत असेल तर आजपासून ती तासभरच मिळणार आहे...म्हणूनच या संदर्भात, ओबामांची अवस्था बघताना तुकोबाच्या ओळी आठवतातः

ऐरावती रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण...

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

9 Oct 2009 - 10:13 pm | सखाराम_गटणे™

ओबामाला फायदा कमी आणि तोटा जास्त होइल याचा.

अवांतरः ते पैसे टॅक्स फ्री असतात का?

प्रमोद देव's picture

9 Oct 2009 - 10:31 pm | प्रमोद देव

भांडखोर जोशांना भांडणापासून परावृत्त करण्यासाठी जसा 'जेपी' हा किताब दिला गेला....वपूंची गोष्ट...जेपी...
तसंच अमेरिकेच्या राष्टाध्यक्षांवर हे नैतिक बंधन घातले असावे.....अण्वस्त्र प्रसार आणि युद्धखोरीपासून परावृत्त करण्यासाठी...असं तर नाही ना आपल्याला म्हणायचे?

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

हुप्प्या's picture

10 Oct 2009 - 1:11 am | हुप्प्या

ओबामाने ह्या पारितोषकाला नम्र नकार द्यावा. दोन चार वर्षात काही ठोस कामगिरी झाली तर जरूर विचार करा असे सांगावे. नाहीतर विरोधकांच्या हातात आयतेच कोलित. अफगाणिस्तान वा इराकमधून माघार घेतली तर विरोधक जोरात बोंबलणार की नोबेलची लाच मिळाली म्हणून हा असे बुळेपणाचे काम करत आहे.
(ह्या गटाचे विरोधक कमालीचे आक्रमक, आक्रस्ताळे आहेत. माघार, शांतता, मुत्सद्दीपणा, विरोधी देशांशी वाटाघाटी असे काही ऐकले की ह्यांचे पित्त खवळते आणि आश्चर्य म्हणजे ह्या लोकांना अनेक लोक पाठिंबा देतात. विशेषतः धार्मिक ख्रिश्चन लोक!)
युद्धातून माघार न घ्यावी तर अत्यंत खर्चिक, निरर्थक, अनंतकाळ चालणारे युद्ध लढत रहाण्याचा पर्याय.
एकंदरीत हे विकतचे दुखणे आहे. वरवर दिसायला बरे वाटले तरी नंतर त्रासदायक.
मूळ लेखाशी अगदी १००% सहमत.

देवदत्त's picture

11 Oct 2009 - 11:59 am | देवदत्त

पुरस्काराचा स्वीकार केला आहे पण एक आव्हान म्हणूनच.
लोकसत्तातील बातमी.
'हा सन्मान न्याय व शांततेसाठी लढणाऱ्या सर्वाचाच’; पुण्यातील प्रकाशकाला ओबामांचा ई-मेल

त्यानुसार त्यांनी म्हटले आहे की,
"केवळ एखाद्या गोष्टीतल्या यशासाठीच नोबेल पुरस्कार दिले गेलेले नाहीत, तर त्यामागच्या प्रयत्नांसाठीही हे पुरस्कार दिले जातात याची मला जाणीव आहे. त्यासाठीच एक आव्हान म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारत आहे."

दशानन's picture

11 Oct 2009 - 2:10 pm | दशानन

एक चुक ;)

तो मेल पुण्याच्या प्रकाशकाला नाही आला आहे तो आला आहे ओबामाच्या मित्राला दिल्ली मधील एक वकील सूरत सिंह यांना.. ओबामा व ते एकत्र शिकत होते हावर्ड मध्ये :)

दुवा !

श्रावण मोडक's picture

11 Oct 2009 - 2:20 pm | श्रावण मोडक

सध्या सज्जनव्रती आहात ना? तरी या वादात असे कसे पडताहात?
अहो, ओबामांचे असे मेल जगभरात किमान काही हजार लोकांना गेले आहेत. त्यात हे दोन आहेत. ओबामांचे असे मेल एरवीही अनेकदा जात असतात. आणि ते का आणि कसे जातात हे काय सांगण्याची गरज आहे?
एकूण मी आधी म्हटलं तसं, ओबामांना नोबेल म्हणजे आपलाही सन्मानच की हो. शेवटी ते हनुमानभक्त आहेतच.
पुण्याच्या बातमीत एक बरा भाग आहे, ओबामांच्या मेलिंग लिस्टवर हे प्रकाशक आहेत असा उल्लेख त्यात आहे.
एकूण, काय त्या मेलचे कौतूक, त्याची काय ती बातमी आणि त्या बातमीची काय ती बातमी...

दशानन's picture

11 Oct 2009 - 2:24 pm | दशानन

आताच हि चुक लक्ष्यात आल्यावर दुरुस्त करायला आलो होतो, ते दोघे मेलिंग लिस्ट मध्ये आहेत व अजून खुप जणे आहेत त्यांच्या मेलींग लिस्ट वर ;)

स्वारी बरं का..

मी आपला परत सज्जन मोड मध्ये जोतो .... जय श्री राम !

धनंजय's picture

10 Oct 2009 - 1:55 am | धनंजय

हे नोबेल पारितोषिक म्हणजे ओबामा यांना "अवघड जागी मुका" होणार असे दिसते. प्रेम दाखवणार्‍याला फटकारताही येत नाही, पण लफड्याचा बभ्रा करणार्‍यांसाठी आयता प्रसंग मिळतो.

लेखात चांगला आढावा घेतला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2009 - 9:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख आवडला. चांगल्या पद्धतीनेही (नेहेमीप्रमाणे) मांडला आहे.

अदिती

विष्णुसूत's picture

10 Oct 2009 - 2:12 am | विष्णुसूत

विकास ,
आपण केलेले मुद्देसुद अ‍ॅनालिसीस ( मराठि शब्द ?) आवडले.
हा पुरस्कार म्हणजे एक प्रकारे अमेरीके वर युध्दबंदि ( अफगाणिस्तान व इराक) व माघार घेण्यासाठि वापरलेले एक दबावतंत्र आहे असे माझे हि मत आहे.
लेख आवडला.
(एन पी आर श्रोता) विष्णुसूत

सखाराम_गटणे™'s picture

10 Oct 2009 - 3:16 am | सखाराम_गटणे™

अ‍ॅनालिसीस - विश्लेषण, चिरफाड,

विष्णुसूत's picture

10 Oct 2009 - 3:26 am | विष्णुसूत

विश्लेषण हा शब्द नेमका आठवत नव्हता. चिरफाड काहि बरा वाटत नाहि. अ‍ॅनालिसीस हा शब्द एकदम "फिट्ट" वाटतो ! असो !
मराठि लिहिताना काहि "पर- भाषिय" शब्द देवनागरी तुन लिहिले तर ते खपवुन घ्वावे हि मिपाकरांना विनंती.
धन्यवाद

अडाणि's picture

10 Oct 2009 - 3:57 am | अडाणि

विकासराव,
सुंदर विवेचन. लेख आवडला.

देव काकांशीही सहमत.

-
अफाट जगातील एक अडाणि.

शाहरुख's picture

10 Oct 2009 - 4:04 am | शाहरुख

लेख बराचसा पटला असला तरी नोबेल सारख्या पातळीवर असे घडावे हे पचत नाही.

स्वगतः- लेका शाहरुख, जागतिक राजकारणावर भाष्य करण्याआधी प्रोजेक्ट टीमने तुला न समजणारे राजकारण करून ज्यादा काम टाकलंय तुझ्यावर ते बघ आधी..

सहज's picture

10 Oct 2009 - 7:59 am | सहज

असे म्हणतात की ओबामाचे पुरस्कारासाठी नामाकंन ओबामा राष्ट्राध्यक्ष व्ह्यायच्या २ आठवडे आधी केले गेले होते. म्हणजे तो राष्ट्राध्यक्ष व्हायच्या आधीच्या त्याच्या कामगिरीवर त्याची निवड झाली?

ह्या पुरस्काराने ओबामावर अजुन चांगल्या भरीव, ठोस कामगिरीसाठी दडपण येणार नक्की. बिचारा..

यशोधरा's picture

10 Oct 2009 - 8:12 am | यशोधरा

आवडला लेख.

Nile's picture

10 Oct 2009 - 10:13 am | Nile

सो मच फोर नोबेलः हे घ्या: http://gregmankiw.blogspot.com/2009/10/first-year-grad-student-wins-nobe... :)

अवलिया's picture

10 Oct 2009 - 11:01 am | अवलिया

नो कमेंटस्

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

क्रान्ति's picture

10 Oct 2009 - 11:59 am | क्रान्ति

माहितीपूर्ण लेख.
क्रान्ति
अग्निसखा

स्वाती२'s picture

10 Oct 2009 - 5:14 pm | स्वाती२

चांगला लेख!
माझ्या मुलाने शाळेत जाता जाता बातमी ऐकली. घरी आल्यावर दारातच तो म्हणाला, 'what these people really want?'.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Oct 2009 - 5:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवड्ला. काही एक अपेक्षीत धोरण ठेवून असा मोठा पुरस्कार दिला जातो, असे असेल तर चांगलीच गोष्ट. पण जगभरातून नोबेल पुरस्कारासाठी ज्या नावांच्या शिफारशी आल्या होत्या त्यात त्यांचे नावच नव्हते म्हणे (बातम्यांवरुन म्हणतो ). आणि नोबेल समितीला खुलासा करावा लागतोय. (म्हणजे हा पुरस्कार का दिला हे सांगतच असतील म्हणा) तसेही तज्ञांच्या उलटसुलट प्रतिक्रिया वाचायला मिळतच आहेत. म्हणजे पुरस्कार जरा लवकर मिळाला कर्तृत्व अजून सिद्ध झाले नव्हते. 'जगाला अण्वस्त्रमुक्त करण्याच्या दृष्टीमुळे शस्त्र नियंत्रणाला बळकटी मिळत आहे वगैरे इत्यादी हे नोबेल चे कारण असेल तर आणखी एक वाचले की, मुस्लीम राष्ट्रांचा विश्वास मिळवला आहे, असेच काही तरी. (म्हणजे मुस्लीम जगाच्या दृष्टीने इतके अविश्वासू आहेत ? ) असो, विषयाला खूप फाटे फूटतील.

"जागतीक नेतृत्वास" जेंव्हा अचानक सर्वोच्च पारीतोषिक त्याची राजकीय घडी बसत असतानाच मिळते तेंव्हा ते बक्षिस नसून एकीकडे मागणी असते''

वाक्यातला विचार पटला !

लेखाबद्दल धन्यू...!

-दिलीप बिरुटे

श्रावण मोडक's picture

10 Oct 2009 - 6:02 pm | श्रावण मोडक

पुरस्कारावरून कार्याचे मोठेपण ठरवणे चुकीचेच, सर्वसामान्य लोक किंवा माध्यमे ही चूक नेहमीच करत असतात. कालपर्यंत मला तरी कोणीही ओळखत नव्हते... - नोबेल विजेते वेंकटरामन रामकृष्णन.
I think it's a mistake to define good work by awards. This is a typical mistake that the public or even the press make. No one knew me before today... - Venkatraman Ramakrishnan, Nobel laureate

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Oct 2009 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>पुरस्कारावरून कार्याचे मोठेपण ठरवणे चुकीचेच...
पुरस्कारांचा गौरव अशा मोठ्या कार्यामुळे होतो.

चिरोटा's picture

10 Oct 2009 - 7:57 pm | चिरोटा

बरेचसे पुरस्कार कार्य केल्यानंतर मिळतात असा माझा समज होता.हा मागणीचा नियम भौ.र्.जी. च्या नोबेल पुरस्कारांना नाही लावला म्हणजे मिळवली.!एक बरे झाले-उ.कोरिया,इराणच्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. पुढचे ३.५ वर्षे तरी अमेरिका ह्या देशांवर बाँबफेक करण्याची शक्यता मावळली.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

विकास's picture

10 Oct 2009 - 8:26 pm | विकास

एक बरे झाले-उ.कोरिया,इराणच्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. पुढचे ३.५ वर्षे तरी अमेरिका ह्या देशांवर बाँबफेक करण्याची शक्यता मावळली.

ती गोष्ट सामान्य अमेरिकन नागरीकाच्या बाबतीत पण लागू होते. हकनाक सैनिक मरतात, त्यांची घरेदारे उध्वस्त होत आहेत.... माझ्या मुलीच्या शाळेत एका वडलांना बर्‍याचदा मुलांना सोडायला आलेला असताना भेटतो. स्वतःची कामे सांभाळत सर्वकाही चालले आहे, पण बायकोला मिलीटरीने बोलावून घेतल्याने इराक-अफगाणीस्तान मधे.... का तर कधीतरी (९/११ च्या आधी) कॉलेजचे शिक्षण फुकट होणार या नादात मिलीटरीचे फॉर्म्स भरले आणि आता ही परतफेड. हे अनेकांच्या बाबतीत. शिक्षणातून, "नो चाइल्ड लेफ्ट बिहाइंड" असा कायदा बुश सरकारने संमत करून घेतला, टाळ्या मिळवल्या पण त्यातच मिलीटरीला रिक्रूटमेंटसाठी अधिक सोय करून ठेवली हे नंतर कळले...

एकंदरीत पुढच्या अनेक पिढ्या जशा आत्ताच्या पिढ्या व्हिएटनाममुळे होरपळल्यात तसे होण्याची शक्यता आहे.

प्रदीप's picture

10 Oct 2009 - 9:31 pm | प्रदीप

चा प्रॉब्लेम समजतो, पण ते जिथे आक्रमण करतात त्या देशांतील जनतेविषयी जास्त सहानुभुति वाटते. व्हिएटनाम, कंबोडिया हे तर होरपळून निघालेत, अजूनही त्यांच्या पिढ्या अमेरिकन्सांच्या नापाम बाँब्समुळे झालेले भीषण परिणाम भोगताहेत. जपानचे ही तेच. इराकमधे त्यांनी काय केले हे आपण पहातो आहोतच.

अमेरिकन जनता सुरूवातीस काही म्हणत का नाही? कारण दुसरीकडे दूरवर कोठेतरी आपल्या उद्दामपणाची खुमखुमी दाखवण्यात त्यांनाही खरे तर तत्वत: काही चूक वाटत नाही. पण मग ते अंगाशी आले, स्वतःची पोरे मरू लागली, की मगच त्यांच्यातील बहुतांशांची रडारड सुरू होते. युध्द विनाकारण सुरू करतांना अंगी उद्दामपणा असतो. आताही तुम्ही जे नजरेस आणताय, तो ह्यातलाच प्रकार आहे.

युध्दा मुळे अमेरीकन अर्थ व्यवस्था जोरात चालु रहाते. त्यामुळे अमेरीकन अर्थ व्यवस्थे च्या सुरळित चालना साठि युध्द होत रहाणे गरजेचे असते. रेगन , बुश १, बुश २, क्लिंटन यांनी अमेरीकेच्या हितासाठि जे करता येइल ते केलं. ह्यापेकि कोणाला हि नोबल मिळालं नाहि कारण ह्यांनी युरोपियन देशांचे प्रभुत्व कमी केलं.
ओबामा ला नोबल देउन युरोपियन देश त्यांचा प्रभाव अमेरीकन परकिय धोरणावर पाडण्याचा प्रयत्न करत आहे. ते इतकं सोपं नाहि.

चिरोटा's picture

10 Oct 2009 - 11:39 pm | चिरोटा

आपल्याला ओबामांना भारतरत्न्,महाराष्ट्रभूषण देवून काही प्रभाव पाडता येईल काय? आशियात चीननंतर आपणच नंबर दोनचे दादा आहोत असे म्हणतात्.(ह्.घ्या)
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

विष्णुसूत's picture

10 Oct 2009 - 11:43 pm | विष्णुसूत

महात्मा गांधी "उत्तेजनार्थ" पुरस्कार नक्कि मिळणार आहे ओबामा ला !
फक्त एक भारताची वारी केली कि झालं.

चिरोटा's picture

11 Oct 2009 - 12:25 am | चिरोटा

सहमत.पण त्या बदल्यात व्हिसा वाढला पाहिजे.फुकट नाही मिळणार पुरस्कार. नाहीतर येतील,करतील राजस्थानमध्ये नृत्य,दुर्गम भागातील आदिवासींना भेट देतील्,ताज मध्ये भेटतील अंबानी,गांधीवादी लोकांना आणि अमेरिकेला परतल्यावर परत 'No to Bangalore' चा नारा लावतील.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

विष्णुसूत's picture

10 Oct 2009 - 11:08 pm | विष्णुसूत

एक वाक्य अमेरीकेत महत्वाचे आहे :
"There are no free lunches in America"

ज्या लोकांना फुकट काहि हवं असतं ते स्वतः ला फसवत असतात. अमेरीकन सरकार हे एका मोठ्या कॉर्पोरेशन सारख आहे. अमेरीकेत मिलिटरी रेक्रुटमेंट साठि सरकारला अशी शक्कल लढवावीच लागते. तुमच्या मित्रां बद्दल फक्त सहानुभुती व्यक्त करु शकतो !

देवदत्त's picture

11 Oct 2009 - 11:34 am | देवदत्त

ओबामांना पुरस्कार जाहीर झाल्याचे वाचले तेव्हा मित्रांशी बोलताना माझी हीच प्रतिक्रिया होती की 'कोठेही युद्ध न केल्याने दिले असेल :) '. नंतर बातम्यांमध्ये वाचले की फेब्रुवारी मध्येच त्यांची पुरस्काराकरीता शिफारस केली होती तेव्हा संभ्रम निर्माण झाला होता निकषांबद्दल.

पण तुमचा लेख वाचून त्याची वेगळी बाजूही लक्षात आली. त्याबद्दल धन्यवाद.

भोचक's picture

11 Oct 2009 - 3:30 pm | भोचक

विकासजी, छान लेख. तुमचा तर्कही पटण्यासारखा आहे. युद्ध न करण्याची जबाबदारी ओबामांवर या पुरस्काराने टाकलीय. तीते निभावतात की नाही ते पाहूया.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

हा आहे आमचा स्वभाव

हेरंब's picture

11 Oct 2009 - 9:06 pm | हेरंब

असे पारितोषिक देऊन कोणी शांततेसाठी काही करणार असेल तर महाराष्ट्रातल्या जहाल नेत्यांना, अगदी नोबेल नव्हे, पण तत्सम काही देणे उचित ठरेल. ती आत्ताची गरज आहे.

विकास's picture

23 Oct 2009 - 8:09 am | विकास

आज एक मला नवीन असलेली बातमी टाईम साप्ताहीकात वाचली. गांधीजींचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी अनेकदा सुचवण्यात आले होते पण त्यांना मिळाले नाही. कदाचीत तत्कालीन आंतर्राष्ट्रीय राजकारण आणि ब्रितीश अधिपत्याखालील भारतीय पारंतत्र्य त्याला कारण असावे...

मात्र १९४८ साली गांधीहत्ये नंतर त्या वर्षी हे पारीतोषीक कुणालाच दिले गेले नाही. का? - "to honor the missing laureate"!