दिनांक २७ फेब्रुवारी २००८ - हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्तक सेनेचे सरसेनापती हुतात्मा ’चंद्रशेखर आझाद’ म्हणजेच चंद्रशेखर सीताराम तिवारी यांचा सत्त्याहत्तरावा समर्पणदिन.प्रखर राष्ट्रवाद म्हणजे काय ते स्वा. सावरकरांनी दाखवून दिले, धगधगते हौतात्म्य म्हणजे काय ते हुतात्मा भगतसिंगाने दाखवून दिले, समर्पित जीवन म्हणजे काय ते नेताजी सुभाषांनी दाखवून दिले तर एका सेनापतीचा मृत्यू कसा असावा हे हुतात्मा आझादांनी दाखवून दिले.
२७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबादच्या आझाद आल्फ्रेड पार्कमध्ये सकाळी १० च्या सुमारास सुखदेवराज यांच्या समवेत असताना वीरभद्रच्या फितुरीने पोलिस दाखल झाले. विशेष पोलिस अधिक्षक नॉटबॉवर याने आझादांवर पिस्तुल रोखत दुरुनच ’कोण तू? इथे काय करत आहेस?’ असे विचारत त्यांच्यावर गोळी झाडली. या गोळीने आझादांची मांडी फोडली. मात्र .४५५ बोअरच्या धूडप्राय जनावरालाही लोळवणाऱ्या गोळीला न जुमानता आझादांनी संग्रामाला सुरुवात केली आणि उत्तरादाखल आपल्या प्राणप्रिय ’मॉवजर’ ने झाडलेल्या पहिल्याच गोळीत नॉटबॉवरचा डावा हात जायबंदी केला. आझादांनी प्रसंग ओळखला आणि साथी सुखदेवराज यांना शक्य तितक्या लवकर तिथून पसार होण्याचा हुकुम दिला. इच्छा नसतानाही केवळ आपल्या सेनापतीची आज्ञा म्हणून सुखदेवराज निघाले. आझाद जखमी पाय फरपटत एका जांभळाच्या आडोशाला गेले आणि त्यांनी पवित्रा घेतला. नॉटबॉवरच्या पिस्तुलातील गोळ्या संपताच त्याने गोळ्या भरताना त्याचा खांदा जरासा झुडुपाच्या बाहेर आला आणि आझादंचे मॉवजर कडाडले. पलिकडून शिपायांनी नाल्याच्या बाजुने गोळ्या झाडाला सुरुवात केली. आपल्याला पिस्तुल भरणे शक्य नाही हे समजताच नॉटबॉवरने काढता पाय घेतला (अधिक कुमक आणण्यासाठी) पण आझादांनी आपल्या मॉवजरने त्याच्या मोटारीचा टायर फोडला आणि परतीचा मार्ग बंद केला. आता पोलिस निरिक्षक ठाकूर विश्वेश्वरसिंह आपल्या शिपायांसोबत तिथे आले होते. बाहेर चकमकीची बातमी पसरताच बागेचा आसपास खूप गर्दी जमली, त्यात अनेक विद्यार्थीही होते. तुमच्या जीवाला धोका आहे, इथे थांबू नका असे सांगत आझादांनी त्यांना दूर जाण्यास सांगितले. त्याचप्रमाणे हिंदी शिपायांवर गोळ्या चालवायची आपली इच्छा नसून त्यांनी त्यांनी मागे फिरावे असे आवाहन आझादांनी त्यांना केले. मात्र अन्नाचे मिंधे असलेले ते चाकर पुढे सरसावताच आझादंनी प्रतिहल्ला चढविला. झुडुपातून येणाऱ्या धुराच्या रोखाने अचूक नेम घेत आझादांनी ठाकूर विश्वेश्वरसिंहांचा जबडा फोडला आणि त्याला माघार घेणे भाग पडले. एक विरुद्ध चहूकडून वेढणारे अनेक सशस्त्र शिपाई असा विषम संग्राम सुरू होता. जबर जखमी अवस्थेतही आझादांनी चौफेर पसरलेल्या पोलिसांची तब्बल २२ मिनिटे एकाकी पण प्रखर झुंज दिली. अखेर जखमांनी भरलेले शरीर आणि संपत आलेली काडतुसे पाहून आपला अखेरचा क्षण ओळखला आणि डाव्या हातात आपल्या देशाची मुठभर माती घेत उजव्या हाताने आपले लाडके मॉवजर आपल्या कानाशी लावून घोडा ओढला.सगळे थंडावले. मात्र तरीही पोलिसांचा गोळिबार बराच वेळ सुरू होता. आझाद मेल्याचे नाटक करीत असावेत अशा भीतीने पोलिस जवळ जायला घाबरत होते. मृत्युनंतरही त्या वाघाचा दरारा कायम होता. अखेर दबकत दबकत आणि त्यांच्य देहावर दुरून गोळ्या झाडत ते जीवंत नाहीत याची खात्री करत पोलिस जवळ गेले व आझादांच्या मृतदेहात संगिनी खुपसून त्यांनी ते संपल्याची खात्री करून घेतली व सुटकेचा निश्वास टाकला. ठाण्यावर गेल्यानंतर नॉटबॉवरने कबुली दिली की ’नशिबाने माझ्या पहिल्याच गोळीत आझाद जायबंदी झाले नाहीतर आमच्या पैकी कुणीही जीवंत परतू शकला नसता!’ज्या जांभळाच्या झाडाचा आडोसा घेउन आझाद लढले ते रक्ताने माखले होते, आजुबाजुची मातीही रक्ताने लडबडली होती. पोलिसांनी मृत देह नेताच लोकांनी ती माती कपाळाला लावायल रीघ लावली. जणू आल्फ्रेड पार्कमध्ये नवे तिर्थक्षेत्र जन्माला आले होते. तीन दिवस झाले तरी झाडापुढे डोके ठेवायला लोकांच्या रागा लागत होत्या. मृत्य नंतरही अस्तित्त्व टिकवणाऱ्या आझादांचे तेज सरकारला सहन होणे शक्यच नव्हते, स्रकारने ते जांभळाचे झाड नष्ट केले. मात्र गोरखपूर आश्रमाच्या बाबा राघवदसांनी तिथे त्याच जागी पुन्हा बी पेरले आणि जांभळाचे झाड उगविले.आपला प्राणप्रिय साथी भगतसिंग तुरुंगात फासाच्या प्रतीक्षेत असताना आपण त्याच्या जवळ नाही याचे आझादांना दुःख होत असे. ’त्याचे लग्न मी ठरविले (म्हणजे फाशी) आणि मी मात्र लग्नाला हजर नसेन अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. भूमिगत असताना एकदा गमतीने ते भगसिंगांना म्हणाले होते, की तु जवान झालास आता तुझे लग्न केले पाहिजे’ त्यावर भगतसिंग त्यांना म्हणाले होते की भैयाजी तुम्ही मोठे, तेव्हा आधी मान तुमचा! आझादांनी तो शब्द खरा ठरवला. त्यांनी हुतात्मा भगतसिंग प्रभृतिंच्या फाशीच्या २४ दिवस आधी आत्मसमर्पण केले. त्याचबरोबर मी अखेर पर्यंत मुक्त असेन, जगातली कोणतीही सत्ता मला कधीच पकडू शकणार नाही हे आपले शब्दही त्यांनी सार्थ ठरविले.
(आझादांचे आत्मसमर्पणानंतरचे हे अखेरचे प्रकाशचित्र)
७७ व्या हौतात्म्यदिनी हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांना सादर वंदन
प्रतिक्रिया
27 Feb 2008 - 10:36 am | विद्याधर३१
हे सान्गणार्या दोघा स्वातन्त्र्यवीरान्चे स्म्रुतीदिन लागोपाठ यावेत हा दैवयोगच....
सरसेनापती चन्द्रशेखर आझाद याना विनम्र आदरन्जली......
विद्याधर
27 Feb 2008 - 10:45 am | धमाल मुलगा
रणाविण स्वात॑त्र्य कोणा मिळाले...खर॑ आहे!आणि हे सा॑गणार्या दोघा स्वातन्त्र्यवीरान्चे स्मृतीदिन लागोपाठ यावेत हा दैवयोगच....हेच म्हणतो मीही.त्या बेडर, ज्वल॑त देशप्रेमाने भारलेल्या सरसेनापतीस माझा त्रिवार मुजरा !
27 Feb 2008 - 10:55 am | विसोबा खेचर
मृत्युनंतरही त्या वाघाचा दरारा कायम होता.
!!!
या लेखामुळे आज मिपा पावन झाले, पवित्र झाले!
'चंद्रशेखर आझाद' नांवाच्या त्या नृसिंहाला मानाचा मुजरा!
(नतमस्तक) तात्या.
27 Feb 2008 - 11:07 am | बेसनलाडू
म्हणतो.
(नतमस्तक)बेसनलाडू
27 Feb 2008 - 2:52 pm | संजय अभ्यंकर
सर्वसाक्षी साहेब, समर्पणदिन हा शब्द खटकतो.
हौतात्म्यदिन जरा बरं वाटत.
कदाचित, हा माझ्या शब्दसंग्रहात समर्पण हा शब्द वेगळ्या अर्थाने असेल.
माझे म्हणणे चुक असेल तर क्षमस्व!
संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
27 Feb 2008 - 3:00 pm | प्रमोद देव
इथे देशाप्रती ’समर्पण’ असा अर्थ आहे. ब्रिटीशांना शरण जाणे असा नाही हे लक्षात घ्या.
27 Feb 2008 - 3:20 pm | राजमुद्रा
या अमर हुतात्म्याला लाख लाख सलाम!
राजमुद्रा :)
27 Feb 2008 - 10:38 pm | चतुरंग
विनम्र अभिवादन!
मूर्तिमंत ते पौरुष आणिक पुत्र असे अग्रणी,सशस्त्र क्रांती हेच ध्येय अन् असे ध्यास जीवनी,
हटवू जुलमी दास्यशृंखला म्हणे वीर सेनानी,स्वातंत्र्याचे स्वप्नच मग ते वसे मनी अभिमानी,
हाय घात तो केला तरि त्या फंदि अशा फितुरानी,नशिबी असा हा भारतभूच्या शाप असे डंखुनी,
'आझाद' अशी ती धरती मग शिंपुन त्या रक्तानी,कवळुन घेता पुत्रा मग मृत्यूच्या नयनी पाणी!
चतुरंग
28 Feb 2008 - 8:25 am | विसोबा खेचर
रंगराव,
कविता छानच केली आहे..
तात्या.
28 Feb 2008 - 8:27 am | चतुरंग
अशी चरित्रे वाचल्यावर शब्द मनात राहूच शकत नाहीत!
चतुरंग
28 Feb 2008 - 9:01 am | प्राजु
'आझाद' अशी ती धरती मग शिंपुन त्या रक्तानी,कवळुन घेता पुत्रा मग मृत्यूच्या नयनी पाणी!
खरंच मी तुमची शिष्या आजपासून.. माझा सलाम आझादांनाही आणि तुमच्या प्रतिभेलाही..
- (सर्वव्यापी)प्राजु
28 Feb 2008 - 4:37 pm | सर्वसाक्षी
वास्तवाचे यथार्थ चित्रण करणारे भावस्पर्शी काव्य! अप्रतिम.
27 Feb 2008 - 11:40 pm | प्राजु
शब्दच तोकडे पडतात..
इतिहासा तू वळूनी पाहसी पाठीमागे जरा..झुकवुनी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा..
- (सर्वव्यापी)प्राजु