माझे अभंग माझी गाथा

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
26 Feb 2008 - 10:48 am

तात्यांनी  केशवा, टेक युअर ओन टाईम पण येऊ दे एखादे फर्मास विडंबन... असा आदेश सोडला होता, पण मायदेशी परतण्याच्या गडबडीत खरोखरच टाईम जास्त गेलाआमची प्रेरणा नंदन यांची अप्रतिम कविता तिचे अभंग तिची गाथा..
एक तो 'वीकांत' | तेव्हाव्ही आकांत |झोपाया निवांत | मिळेचिना ||
उशीरा झोपणे | उशीरा उठणे |निवांत लोळणे | आळशी मी ||
हसावे मिशीत | थोड्याशा खुशीत |उशी ही कुशीत | घोरताना ||
धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम |बायको सद्दाम | सोय नाही! ||
चिडते साजणी | फेकते लाटणी |पळते त्या क्षणी | झोप माझी ||
बायको ठेक्यात| नवरा धाकात | आयुष्य धोक्यात | ठरलेले ||
कसेसे उठावे | सुसाट सुटावे |परस गाठावे | कैसेतरी ||
मोकळ्या हवेत | बसावे निवांत |चकाट्या पिटत | सगळ्यांच्या ||
जरी हा हराम | करतो आराम |कामे ती तमाम | तुंबलेली ||
रोजची टुकार | कामे ती भिकार |थोडीशी चुकार | उरकतो  ||
असा हा संसार |होऊनि लाचार|रोजचे आचार | चाललेला ||
स्वप्ने मी पाहिली | कर्जे ही काढली | खोपटी बांधली |  एकदाची ||
हा हप्ता बिकट | घेतला फुकट |वाचेना नकद | काही केल्या ||
पर्देशी राबावे| हातचे राखावे| डॉलर जोडावे| ठरवतो||
प्रपंच चांगला | सोडूनि पातला |एकटा राहिला | दूर देशी ||
भावना सारुन | मनाला मारून |वास्तव दारुण | स्वीकारले ||
'काम'सू सचिव | कलीग रेखीव |शेजारी आखीव | छळतात ||
नित्य ही पहाणी | दूर ती साजणी |जनांस कहाणी | सांगवेना ||
नको ही आसक्ती | बरी ती विरक्ती |देहा ला विभक्ती  | सोसवे ना ||
देह हा शिणतो |सारखा कण्हतो |म्हणून भरतो | पेला माझा ||
पेला हा पकड |बाटली उघड |  तळावे पापड | सोबतीला ||
एकटा पडतो | दारूत बुडतो |दिवस काढतो | कसे तरी ||
भिंतीला टेकत | रस्त्यात झोकत |आमची वरात | नेहमीची ||
जायचे दिवस | निराश निरस |सगळा विरस | आयुष्याचा ||
मित्राने आम्हासी | ओळख  जालासी |दिली ही अभासी| करूनीया ||
छंद हा जडला | जीव हा गुंतला |प्रपंच वाढला | जालावरी ||
कविता फाडाव्या | खोड्या ही काढाव्या |तंगड्या ओढाव्या | सगळ्यांच्या ||"
भांडणे लावावी | दुरून पहावी |आपली चालावी| कंपूबाजी ||कविता अखंड | ओवी ते अभंग |कुठले निर्बंध | ठेवले ना ||
जरा ना लाजणे | तिरके चालणे |विडंबे पाडणे | सुरू झाले ||
ठेवा हा सुखाचा | निर्व्याज स्मिताचा |विसर दुःखाचा | पाडो थोडा ||
डोळे हे पुसून| थोडेसे हासून | कामाला उठून | लागा आता ||
'केशवकुमारा' | होऊनी उदारा |"केशवसुमारा" | माफ करा||

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

26 Feb 2008 - 9:22 pm | चतुरंग

प्रत्येक कवन | आले ते घेऊन|विडंबी प्राक्तन | जालावरी||
केशवापरते | वाचले जाई ते|'वाचे ना' तरी ते | विडंबनी ||
'केशवसुमारा' | मि.पा.चा मोहरा |बाकि तें पैजारा | म्हणे 'रंग्या'||
चतुरंग

विसोबा खेचर's picture

26 Feb 2008 - 12:22 pm | विसोबा खेचर

ठेवा हा सुखाचा | निर्व्याज स्मिताचा |विसर दुःखाचा | पाडो थोडा ||
हेच खरं रे केशवा! क्या बात है...
असो, आमच्या विनंतीला मान देऊन इतके सुरेख विडंबन लिहिल्याखातर केशवा तुला दंडवत...
तात्या.

सहज's picture

26 Feb 2008 - 1:17 pm | सहज

>आमच्या विनंतीला मान देऊन इतके सुरेख विडंबन लिहिल्याखातर केशवा तुला दंडवत...
१००% सहमत.
आवडले.

बेसनलाडू's picture

26 Feb 2008 - 1:41 pm | बेसनलाडू

'काम'सू सचिव | कलीग रेखीव |शेजारी आखीव | छळतात ||
नित्य ही पहाणी | दूर ती साजणी |जनांस कहाणी | सांगवेना ||
वावावा!!! :)
(प्रेक्षक)बेसनलाडू

प्राजु's picture

26 Feb 2008 - 8:08 pm | प्राजु

थोडी करूणेची झालर आहे  या विडंबनाला. विडंबनापेक्षा काव्यच म्हणेन मी याला.
चिडते साजणी | फेकते लाटणी |पळते त्या क्षणी | झोप माझी ||
इथे मजा आली
एकटा पडतो | दारूत बुडतो |दिवस काढतो | कसे तरी ||
मात्र इथे हेलावलं मन.
- (सर्वव्यापी)प्राजु

सुधीर कांदळकर's picture

26 Feb 2008 - 8:20 pm | सुधीर कांदळकर

लक्ष लक्ष दंडवत कमी पडतील.
धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम |बायको सद्दाम | सोय नाही! ||
चिडते साजणी | फेकते लाटणी |पळते त्या क्षणी | झोप माझी ||
बायको ठेक्यात| नवरा धाकात | आयुष्य धोक्यात | ठरलेले ||
या ओळी जास्त आवडल्या. बहोत खूब.
पुढील कवितेची वाट पाहातो. शुभेच्छा.

पिवळा डांबिस's picture

27 Feb 2008 - 7:28 am | पिवळा डांबिस

स्वप्ने मी पाहिली | कर्जे ही काढली | खोपटी बांधली |  एकदाची ||
हा हप्ता बिकट | घेतला फुकट |वाचेना नकद | काही केल्या ||
पर्देशी राबावे| हातचे राखावे| डॉलर जोडावे| ठरवतो||
प्रपंच चांगला | सोडूनि पातला |एकटा राहिला | दूर देशी ||
भावना सारुन | मनाला मारून |वास्तव दारुण | स्वीकारले ||
खरंच आहे ते!!!
छान, छान केशवसुमार, छान लिहिलंय!!!

लिखाळ's picture

27 Feb 2008 - 9:39 pm | लिखाळ

मस्त विडंबन ! जियो !
--लिखाळ.
 
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

केशवसुमार's picture

28 Feb 2008 - 11:51 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
केशवसुमार

नंदन's picture

28 Feb 2008 - 1:03 pm | नंदन

छान जमलंय विडंबन :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आजानुकर्ण's picture

28 Feb 2008 - 1:52 pm | आजानुकर्ण

'काम'सू सचिव | कलीग रेखीव |शेजारी आखीव | छळतात ||
नित्य ही पहाणी | दूर ती साजणी |जनांस कहाणी | सांगवेना ||
जबरा विडंबन केशवसुमाराचार्य
(हसरा) आजानुकर्ण

धनंजय's picture

28 Feb 2008 - 6:20 pm | धनंजय

मुळातला विषय वेगळ्या कळकळीचा होता, म्हणून "तिचे अभंग" कविता लांब वाटली नाही. विडंबन मात्र विषयाच्या किरकोळपणामुळे फार लांबल्यासारखे वाटते. काही विडंबने समश्लोकी करू नये - "मना सज्जना ट्रामपंथेचि जावे" या  पु. लंच्या विडंबनात थोडेच श्लोक आहेत - प्रत्येक मनाच्या श्लोकाचे विडंबन न करण्याचा त्यांचा संयम त्या ठिकाणी शहाणपणाचा वाटतो, नाही का?

बेसनलाडू's picture

28 Feb 2008 - 11:39 pm | बेसनलाडू

बव्हंशी सहमत.
काही विडंबने समश्लोकी करू नयेत हे मी 'समश्लोकी' हा शब्द गाळून वाचले, तेव्हाही (जास्तच) सेन्सिबल वाटले. असो.
(सेन्सिबल)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

29 Feb 2008 - 7:44 am | विसोबा खेचर

म्हणून "तिचे अभंग" कविता लांब वाटली नाही. विडंबन मात्र विषयाच्या किरकोळपणामुळे फार लांबल्यासारखे वाटते.
धन्याशेठ, लेका तू प्रत्येक वेळेला काव्याचं मारे समिक्षण वगैरे करतोस ते ठीक आहे परंतु तू स्वत:ही काही उतमोत्तम काव्य करत जा की!
नायतर आमच्या संगीतातल्या सारखं व्हायचं! काही महाभाग स्वत:ला 'सा' लावायची माहिती नाही आणि मारे किशोरीताईंच्या, अण्णांच्या गाण्याचं समिक्षण करतात!
आमच्या किशोरीताई नेहमी म्हणतात, 'आधी किमान १० मिनिटे तरी दोन तंबोर्‍यांमध्ये बसून १०० लोकांसमोर गाऊन दाखवा आणि मग करा समिक्षण!' :)
असो...
तात्या.

धनंजय's picture

29 Feb 2008 - 10:31 pm | धनंजय

प्रत्येक वेळेला काव्याचं मारे समिक्षण वगैरे करतोस प्रत्येक वेळेला नाही बरे का! केशवसुमारांसारख्या कुशल शब्दकाराला आवर्जून उत्तरे देतो. नाही दिले तर तिकडून "न लिहिणार्‍यांना धन्यवाद" म्हणून टोमणे मारतात. कुशल आहे, म्हणून प्रतिसाद द्यावासा वाटतो, नका देऊ म्हटले तर नाही देणार. त्यांना लक्षात असेल तर भरभरून प्रशंसाही केली आहे. प्रत्येक वेळेला एकच "आवडले" म्हणून आणि एक कडवे उद्धृत करून प्रतिसाद तर एखादे यंत्रही देऊ शकेल. माझ्या प्रतिसादांत कविता नीट वाचल्याचा दाखला कधीकधी सापडावा.'आधी किमान १० मिनिटे तरी दोन तंबोर्‍यांमध्ये बसून १०० लोकांसमोर गाऊन दाखवा आणि मग करा समिक्षण!' येथे मी चार सहा कविता दिलेल्या आहेत. त्यांत काहींत "सा" लागला आहे, काहींत नाही. मिसळपावावर १०० लोक तरी आहेत (खरा आकडा तुम्हाला ठाऊक!). किशोरीताईंनी असे म्हटले आहे का की १०० लोकांसमोर त्यांच्याइतकेच चांगले गायले पाहिजे? आणि बहुधा असेही म्हटले नाही की प्रत्येक समीक्षणापूर्वी १० मिनिटे २ तंबोर्‍यांमध्ये बसावे. मुख्य म्हणजे मी प्रतिसाद समीक्षक म्हणून नव्हे तर आस्वादक म्हणून लिहीत आहे. आणि आस्वादकाला कलाकाराइतकी प्रतिभा असलीच पाहिजे असा नियम नाही, आणि बहुधा नसतेच. माझ्यापाशी केशवसुमारांइतकी प्रतिभा नाही, याबाबत मला शंका नाही. समाधान व्हावे. काही काव्य सुचले तर  लिहीन. इथेच लिहीन. फोटोही जमल्यास टाकीन. तेही येथील अन्य छायाचित्रकारांच्या तोडीचे नाहीत - फक्त तंबोर्‍यांच्या मध्ये बसल्याचा पुरावा म्हणून. तसे हलकेच घेतले आहे, गैरसमज नसावा.

केशवसुमार's picture

29 Feb 2008 - 1:44 pm | केशवसुमार

धनंजयशेठ,सपष्ट अभिप्राया बद्दल धन्यवाद.. विडंबने समश्लोकी करू नये  किंवा बेला म्हणतात तसे मुळात विडंबनंच न करणे ( जरा जास्त होतयं .. ;) ) विचार करण्यास हरकत नाही.. केशवसुमार

बेसनलाडू's picture

29 Feb 2008 - 1:51 pm | बेसनलाडू

बेला म्हणतात तसे मुळात विडंबनंच न करणे ( जरा जास्त होतयं .. ;) ) विचार करण्यास हरकत नाही..
हे काही निवडक कविता / गझला यांच्या बाबतीत पाळले जाणे किंवा याचे विवेकी उल्लंघन करणे कधीकधी आवश्यक होऊन जाते, असे वाटते. हे बोलायला मी काही तज्ज्ञ, जाणकार, मोठा कवी वगैरे वगैरे नाही; मला तसा अधिकारही कदाचित नाही. पण एका जुन्या सुभाषितातील एक ओळी आठवली आणि संबंधित वाटली, ती येथे उधृत करण्याचा मोह आवरत नाहीये -
अतिपरिचयादवज्ञा सन्ततगमनादनादरो भवति
बाकी आपण सर्वसमर्थ आहातच.
शुभेच्छा.
(सपष्ट)बेसनलाडू

केशवसुमार's picture

29 Feb 2008 - 2:03 pm | केशवसुमार

जरा जास्त होतयं .. ;) हे तुम्हाला उद्देशून नाही..आम्हाल हे किती आवघड आहे  हे सांगण्यासाठी  स्वगत आहे ते..(अविवेकी) केशवसुमार
अवांतर..तुम्ही सांगितलेल्या सुभाषिताचे ही एक विडंबन कालिजात असताना केले होते..पण इथे लिहू शकत नाही
(निर्लज्ज्)केशवसुमार

बेसनलाडू's picture

29 Feb 2008 - 2:43 pm | बेसनलाडू

तुम्ही सांगितलेल्या सुभाषिताचे ही एक विडंबन कालिजात असताना केले होते..
(निर्लज्ज्)केशवसुमार
छे छे ... हे काही अनपेक्षित नाही हो आम्हाला :)
(अपेक्षित)बेसनलाडू

"चांगले (पण लांबले)", मधील चांगले हाही शब्द मनापासूनच आहे, तोही स्पष्टपणे ऐकू आला म्हणजे मिळवली. चांगले न बघता दोष बघणारा असा माझ्याविषयी गैरसमज होऊ नये. तुम्हाला आमच्या फर्माइशी टीका ऐकून बदल करण्या-न-करण्याचे कसब आहे असे वाटते म्हणून सांगतो. बाकी आमच्यासारख्या नवशिक्यांना प्रोत्साहनच दिले असते.

केशवसुमार's picture

29 Feb 2008 - 11:24 pm | केशवसुमार

आपाला काही तरी गैरसमज झाला आहे.. आपण चांगले म्हणले आहे आणि नेहमी म्हणता हे आमच्या चांगलेच (!) लक्षात आहे.. प्रत्येक टिकेतून नेहमी सुधारण्यास वाव असतो हे ही तितकेच खरे..त्यामागे आपला हेतू सकारात्मक आहे..म्हणूनच 'चांगले' म्हणण्यापेक्षा केलेल्या टिकेला धन्यवाद दिले इतकच.. कृपया गैरसमज नसावा.. आणि आमचा ही गैरसमज झालेला नाही याची नोंद घ्यावी.. ((गैर)समजूतदार)केशवसुमार

सख्याहरि's picture

29 Feb 2008 - 4:12 pm | सख्याहरि

अत्यंत सुरेख काव्य...
-(नि:शब्द) सख्याहरी
 

मुक्तसुनीत's picture

29 Feb 2008 - 10:28 pm | मुक्तसुनीत

सर्वप्रथम हे नमूद करतो : केशवसुमार यांची "विडंबन" या प्रकाराची समज आणि त्यावरची हुकूमत प्रशंसनीय आहे. आपल्या नर्मविनोदी स्वभावाला त्यानी आपल्या निर्मितीक्षमतेची जोड दिल्यामुळे त्यानी केलेली विडंबने चपखल , मार्मिक आणि रचनेच्या दृष्टीने बहुतांशी बिनचूक असतात.
विडंबनकार हा सर्कशीतील विदूषकाप्रमाणे असतो असे, मला वाटते अत्र्यानीच म्हण्टले आहे. विदूषक इतर जिमनॅस्ट्स प्रमाणे कुशल असतो, असावा लागतो. केशवसुमाराना हे वर्णन लागू होतेच.  
मात्र विडंबन हा प्रकार हा मुळातच "डिराइव्हड्" (मराठी शब्द ?) असल्याने, त्याबाबतीतील रसिकांची प्रतिक्रिया ही सुद्धा काहीशी हलकी, कॅज्युअल असते. मोडकीतोडकी का असेना, पण एखादी नवी रचना जेव्हा समोर येते, तेव्हा त्याकडे जास्त कुतूहलाने पाहिले जाते.

रंजन's picture

29 Feb 2008 - 10:49 pm | रंजन

दु:खाचा विसर पडावा.. त्याच साठी हे विडंबन ..

चतुरंग's picture

29 Feb 2008 - 10:51 pm | चतुरंग

विडंबन मनपसंत होण्यामधे मुक्तसुनीतांनी दिलेल्या मुद्यांबरोबरच आणखी एक बाब असावी - ती म्हणजे विडंबन हा जरी आधारित लेखनप्रकार असला तरी त्यात मूळ कलाकृतीशी नाते साधतानाच विडंबनकाराचा स्वतःचा विचार आणि शेवटी एक स्वतंत्र कल्पना पोचवण्यातले यश ह्या दोन्ही गोष्टी जमाव्या लागतात.खेरीज, विडंबन म्हणजे विनोदी असलेच पाहिजे असे नाही. कदाचित ह्या पूर्वग्रहामुळे रसिकांची त्याकडे बघायची दॄष्टी बदलत असावी.
चतुरंग