स्वातंत्र्यवीराचे पुण्यस्मरण

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
25 Feb 2008 - 11:47 pm

दि. २६ फेब्रुवारी २००८ - स्वातंत्र्यवीर सावरकरांची ४२ वी पुण्यतिथी!
ज्यांच्या प्रेरणेने हिंदुस्थानात क्रांतिची ज्वाला धगधगली, ज्यांनी 'रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?' असा सवाल करीत पहिली २० ब्राउनिंग पिस्तुले हिंदुस्थानात पाठविली, ज्यांच्या दुर्द्म्य इच्छेचे फलस्वरुप म्हणुन हिंदुस्थानात पहिला बाँब तयार झाला, ज्यांच्या '१८५७' या प्रकाशना आधीच जप्तीचे आदेश निघालेल्या क्रांतिग्रंथशिरोमणीने धगधगत्या क्रांतिकारकांची निर्मिती केली, ज्यांच्या क्षात्रतेजाने सत्ताधिश इंग्रजांची झोप उडाली, ज्या महावीराने ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा देणार्‍या न्यायासनाला 'तोपर्यंत तुमचे सरकार टिकेल काय?' असा मर्दानी सवाल केला, ज्या द्रष्ट्याने सैन्याचा पुरस्कार केला, ज्या महाकवीने अजरामर काव्याची निर्मिती केली, ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने मराठीचा पुरस्कार केला त्या स्वातंत्र्यवीर विनायकराव दामोदर सावरकरांना त्यांच्या ४२ व्या पुण्यतिथीच्या दिनी सादर वंदन.
ते होते म्हणुन आपण आहोत.

प्रतिक्रिया

विकास's picture

26 Feb 2008 - 12:00 am | विकास

२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशनाने प्राणत्याग केला.  मिपाने सावरकर पुण्यतिथीची आठवण ठेवल्याबद्दल धन्यवाद.  वास्तवीक सावरकरांबद्दल बरेच काही लिहून येते. जालावर पण "झाल्या ही बहू , होतील ही बहू" असे त्यांच्या विषयीच्या चर्चांबद्दल बोलता येईल. पण आत्ता मला कवी शंकर वैद्यांची एक कविता आठवली, जी त्यांना सावरकरांचे वक्तृत्व सभेमधे  ऐकल्यावर स्फुरली होती. आपल्याला आवडेल अशी आशा करतो. (जशी आठवते तशी! तेंव्हा चु.भू. द्या.घ्या.) (लाईन स्पेसींग जास्त येत असल्याने, प्रत्येक कडव्याला रंग दिले आहेत)
लाखांचा समुदाय लोटला घुमवीत कोलाहल, त्या नादाने वरी सरकले गगनांचे मंडल |
व्यासपिठावर परंतु होता दिव्य तुझी चाहूल, श्वास रोधूनी खिळूनी बसले अवघे भुमीतल |
शब्द तुझा अन पहीला जेंव्हा कानावर पडला, रोमांच्याचा शेला अंगावरती फडफडला ||
नयनांच्या जाळ्यात ठेवले जरी तुला पकडून, शब्दांच्या जाळ्यात चालले अडकत सारे जन |
तव वदनातून फुटू लागल्या हस्तामधल्या सरी, लखलखली अन चल्लख जिभली, चलाख बिजली परी|
नभ फोडून नग लंघित गंगा ओघ जणू आला, रोमांच्याचा शेला अंगावरती फडफडला ||
शकले पडता भारतभू ने जी किंकाळी दिली, तव हृदयातील कोटरात ती दडूनीया बसली |
पंख उभारून आक्रंदून ती, येताना बाहेर, लाख वीजा गगनात लोटल्या, कोसळले अंबर |
हाय भारत भू हाय हुंदका हेलावत गेला, रोमांच्याचा शेला अंगावरती फडफडला ||
तू सिंधूचे स्तोत्र गायले गहीवरूनी अंतरी, वात्सल्याचा तवंग फिरला जनसंमर्दावरी |
स्वातंत्र्याचे गान नाचता वदनी ओसंडून, अद्भूत शक्ती लहरत गेली, अंगाअंगातून |
छेडीलेस तू हृदयामधल्या जणू प्रत्यंचेला, रोमांच्याचा शेला अंगावरती फडफडला ||

चतुरंग's picture

26 Feb 2008 - 1:24 am | चतुरंग

इथे दिल्याबद्दल धन्यवाद, विकास.
चतुरंग

स्वाती दिनेश's picture

26 Feb 2008 - 1:08 pm | स्वाती दिनेश

चतुरंगांसारखेच म्हणते.खरेच अतिशय ओजपूर्ण काव्य! विकास येथे टंकल्याबद्दल धन्यवाद,स्वाती

प्राजु's picture

26 Feb 2008 - 12:13 am | प्राजु

काय अफाट कविता आहे ही! रोमांच उभे राहिले...  इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
कोटी कोटी प्रणाम या भूमीपुत्राला...
- (सर्वव्यापी)प्राजु

स्वाती राजेश's picture

26 Feb 2008 - 12:28 am | स्वाती राजेश

या स्वातंत्र्यसैनिकाला विनम्र अभिवादन..सोबतची कविता छान आहे

"हिंदुभूमीच्या स्वातंत्र्याकरिता मारिता मारिता मरेतो झुंजेन!" अशी जाज्ज्वल्य प्रतिज्ञा करणार्‍या आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण ती जगणार्‍या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस अभिवादन.
हे काव्य त्या महाकवीस अर्पण -
हिंदुभूमिचा पुत्र असे हा लढवय्या सेनानी
हसत जाई तो पोहुन तेही शिक्षा 'काळे पाणी'
अमोघ वाणी असे तयाची ज्वलंत ती लेखणी
आंग्लतख्त ते फोडुन टाकी बलशाली हातांनी
दूरदृष्टिता तरी तयाची ना ओळखली कुणी
श्रध्दांजलि ही तुला अर्पिता नयनी येई पाणी
चतुरंग

विकास's picture

26 Feb 2008 - 1:04 am | विकास

...दूरदृष्टिता तरी तयाची ना ओळखली कुणी
श्रध्दांजलि ही तुला अर्पिता नयनी येई पाणी
 
फारच छान काव्य!

विसोबा खेचर's picture

26 Feb 2008 - 3:24 am | विसोबा खेचर

साक्षीदेवा,
तुझ्यासारख्या, भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या, 'नाही चिरा नाही पणती!' अश्याही अवस्थेतल्या काही स्वातंत्र्यवीरांची आमच्यासारख्यांना ओळख करून देणार्‍या डोळस अभ्यासकाने सावरकरांवर दोन शब्द लिहिणे हेच केव्हाही उचित आहे!
स्वात्रंत्र्यदेवतेकरता अंदमानात कोलू पिसणार्‍या या महामानवास मिसळपाव परिवारातर्फे विनम्र आदरांजली!
शंकर वैद्य आणि चतुरंग, दोघांचीही काव्ये अतिशय उत्तम!
आपला,(सावरकरभक्त) तात्या.

प्राजु's picture

26 Feb 2008 - 6:43 am | प्राजु

अप्रतिम कविता आहे तुमची. तुम्ही इथे द्यायला नको होती.  ती वेगळी जे न देखे रवी मध्ये लिहायला हवी होती. अजूनही लिहा. मी ही कविता माझ्या संग्रही ठेवली तर चालेल का?
- (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग's picture

26 Feb 2008 - 9:10 am | चतुरंग

खरं तर ही कविता नाही. सर्वसाक्षींचे विचार आणि शंकर वैद्यांची स्फूर्तिदायक कविता वाचून लगेच स्फुरलेल्या ह्या ओळी इथे देण्यामागे स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्याचीच इच्छा होती.
तू संग्रही ठेवणारच असलीस तर जरुर ठेव.
चतुरंग

सुधीर कांदळकर's picture

26 Feb 2008 - 9:57 pm | सुधीर कांदळकर

साधले. अशी तेजस्वी कविता या वेळी या धाग्यात येणे हे खरोखर उचित होय.  अपलीअभिवादन करण्याच्या इच्छेचे कौतुक करतो.
आपल्या संवादामध्ये ताँड घातल्याबद्दल क्षमस्व.
माझे पण स्वावी ना अभिवादन.

धमाल मुलगा's picture

26 Feb 2008 - 10:55 am | धमाल मुलगा

जाज्वल्य देशाभिमानी, प्रखर बुद्धीमत्तेचा महामेरु, केवळ अशक्यप्राय ह्या एकमेव शब्दाने मोजली जाईल अशी दूरदृष्टी असलेल्या अख॑ड भारतवर्षाच्या ह्या सुपुत्रास त्रिवार प्रणाम.तात्याराव सावरकरा॑च्या चरणि माझा साष्टा॑ग द॑डवत.लाखांचा समुदाय लोटला घुमवीत कोलाहल, त्या नादाने वरी सरकले गगनांचे मंडल |व्यासपिठावर परंतु होता दिव्य तुझी चाहूल, श्वास रोधूनी खिळूनी बसले अवघे भुमीतल |शब्द तुझा अन पहीला जेंव्हा कानावर पडला, रोमांच्याचा शेला अंगावरती फडफडला ||वा !!! यथोचित वर्णन.

मदनबाण's picture

26 Feb 2008 - 11:13 am | मदनबाण

||स्वातंत्रलक्ष्मी की जय|| सावरकरया पुस्त्कातील मला आवडलेला काही भाग खाली देत आहे :-----प्रत्येकाने स्वातंत्रलक्ष्मीची उपासना का केली पाहीजे,हे एकदा स्पष्टपणे सांगितले पाहिजे असेसावरकरांना वाटले आणि त्यातून त्यांचे "स्वतंत्रेचे स्तोत्र" जन्म पावले.स्वातंत्रलक्ष्मीची मह्ती गाताना सावरकरांनी सांगितले :----मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदान्तीस्वतंत्रते भगवती,योगिजन परब्रम्ह वदतिजे जे उत्तम्,उदात्त्,उन्नत्,मह्न्मधुर ते तेस्वतंत्रते भगवती,सर्व तव सहचारी होतेआणि म्हणुनतुजसाठि मरण ते जननतुजवीण जनन ते मरणतुज सकल चरचर शरणभरत भूमीला द्रढालिंगना कधी देशील वरदेस्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे---------------------------------------------------------------------------------------मदनलाल आणि सावरकर यांची शेवटची भेटः-----सावरकर २२ तारखेला मदनलालना भेटायला गेले.मदनलालनाही फार बरे वाटले.पोलिसांच्या देखतच दोघांचे बोलणे चालले होते.सावरकर ,मदनलाल दिसताच उद्द्गारले " मी तुमचं दर्शन घ्यायला आलेलो आहे."दर्शन !गुरुकडून एवढा गौरव झाल्यानंतर  मदनलालना आणखी कही नको होते. मदनलाल म्हणाले माझी 'मला फाशीची शिक्षा होणार हे ठरलेलंच आहे त्यामुळे ही आजची भेट शेवटचीच भेट ठरणारआहे. म्हणुन मी तुम्हाला माझी अंतीम ईच्छा  सांगतो.माझा अंत्यविधी,ब्राम्हणाकडून मंत्राग्नी देउन केला जावा.माझ्या मृत देहाला  माझ्या भावाचा,तसेच  कोणत्याही अहिंदू चा स्पर्श  होउ नये.माझे कपडे आणि पुस्तकं-सारं काही विका आणि ते पैसे इथल्या आपल्या राष्ट्रीय निधीला द्या."मदनलालांचा निरोप घेताना सावरकरांना गहिवरुन आले.(स्वातंत्र्य वीर सावरकर भक्त:-- मदनबाण )

शेखर's picture

26 Feb 2008 - 12:58 pm | शेखर

 
जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,
यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे ||१||
राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीतिसंपदांची,
स्वतंत्रते भगवती श्रीमती, राज्ञी तू त्यांची,
परवशतेच्या नभात तूची, आकाशी होशी,
स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखली,
वंदे त्वामहम्, यशोऽयुताम् वंदे, यशोऽयुताम् वंदे ||२||
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली,
स्वतंत्रते भगवती, तूच ती विलसतसे लाली,
तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यही तूही,
स्वतंत्रते भगवती, योगीजन परब्रम्ह म्हणती,
वंदे त्वामहम्, यशोऽयुताम् वंदे, यशोऽयुताम् वंदे ||३||
हे अधमरक्तरंजिते, हे अधमरक्तरंजिते, सुजनपूजिते,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते!
तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण,
तुज सकळचराचरशरण, चराचरशरण,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! ||४||
जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,
यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे ||५||
--कवि - विनायक दामोदर सावरकर
वरील गीत हे स्वतंत्रतेचे स्त्रोत म्हणून पिढ्यांनपिढ्या देशभक्तांच्या मनात जाज्वल्य निर्माण करत आले आहे.
स्वातंत्रवीर सावरकरांना त्रिवार मुजरा.
 
- राष्ट्रभक्त शेखर

ऋषिकेश's picture

26 Feb 2008 - 11:33 pm | ऋषिकेश

कोणाकडे जयोस्तुते संपूर्ण आहे का? मला अजून एक कडवं हवे आहे. वर शेखर यांनी दिलेला भाग हा केवळ गेय भाग आहे. मूळ काव्यात एकूण तीन भाग आहेत मला दोन मिळाले ते इथे वाचता येतील. कोणाला याबद्दल माहिती असल्यास कृपया द्यावी
-(अनेक दिवस पूर्ण गाण्याच्या शोधात) ऋषिकेश

विकास's picture

27 Feb 2008 - 2:19 am | विकास

मूळ काव्यात एकूण तीन भाग आहेत मला दोन मिळाले ते इथे वाचता येतील.
मला वाटते ते तेव्हढेच आहे. आपण सावरकर.ऑर्ग वर पाहीले तरी ते तेव्हढेच दाखवतात (जे त्यांनी समग्र सावरकरपुस्तकातून घेतलेले आहे).

सृष्टीलावण्या's picture

26 Feb 2008 - 5:36 pm | सृष्टीलावण्या


  • हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रांतिकारक चळवळ संघटित करणारे आद्य क्रांतिवीर
  • दोन देशांच्या सरकारांनी ज्यांच्या ग्रंथावर प्रसिद्धिपूर्वीच प्रतिबन्ध घातला असे जगातील आद्य लेखक
  • हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यलढ्यात भाग घेतला म्हणून ज्यांची पदवी विद्यापीठाने काढून घेतली असे आद्य पदवीधर
  • हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यलढ्यात सहभागी झाल्यामुळे ज्यांना बॅरिस्टर पदवी नाकारण्यात आली असे आद्य विधिज्ञ
  • विदेशी कपड्यांची निर्भयपणाने प्रकट होळी आयोजित करणारे आद्य देशभक्त
  • हिन्दुराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्वस्पर्शी विचार करणारे, अस्पृश्यता व जातिभेद यांच्याविरुद्ध बंड पुकारणारे आद्य क्रांतिवीर
  • ब्रिटिश न्यायालयाचा अधिकार नाकारणारे आद्य भारतीय बंडखोर नेते
  • पन्नास वर्षे सीमापारीची काळ्यापाण्याची शिक्षा झालेले आणि ती पुरुन उरल्यानंतर सक्रिय कार्य करणारे जगातील आद्य राजबंदी
  • कारागृहात लेखनसाहित्य न मिळाल्यामुळे काट्याकुट्यांनी कारागृहाच्या भिंतींवर सुमारे दहा सहस्त्र ओळींचे काव्य कोरून लिहिणारे आणि ते सहबंदिवानांकडून मुखोद्गत करवून घेऊन प्रसिद्ध करविणारे जगातील आद्य कवी
  • हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्यांची अटक गाजली असे हिन्दुस्थानचे आद्य राजबंदी
  • योगशास्त्राच्या उत्तुंग परंपरेनुसार प्रायोपवेशनाने मृत्युला कवटाळणारे आद्य आणि एकमेव क्रांतिकारक महायोगी

आभारः-
http://www.savarkar.org/mr/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0