"मेड इन चायना'पाठीमागचे रहस्य यात आहे!

मीनल's picture
मीनल in जे न देखे रवी...
25 Feb 2008 - 7:21 pm

हा माझा ई सकाळ्मधे प्रकाशित झालेला अजून एक लेख .चीनमधे राहत असताना लिहिला होता.
"मेड इन चायना'पाठीमागचे रहस्य यात आहे!जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी "मेड इन चायना' लेबल लावलेल्या वस्तू सर्रास पाहायला मिळतात. अमेरिकेतील मोठमोठाली शहरं काय, की भारतातील छोटंसं गाव काय? भाजी - आमटीतल्या लसणापासून ते इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंपर्यंत चायनीज स्वस्त माल सर्वांनाच माहीत आहे. .......सर्वत्र भेटणा-या या चिनी लोकांचे व्यक्तिमत्त्व प्रभावित करणारे असे म्हणाल तर तसं अजिबात नाही. खोल बारीक डोळे, नाक बसकट, गालाची सपाट हाडे, पिवळसर कातडी आणि यात अधिक भर म्हणून, की काय तर कमी उंची! मग जगातील सर्व बाजारपेठांवर आक्रमण करून यशस्वीरीत्या बस्तान मांडलेल्या या अशा चिन्यांमध्ये आहे तरी काय? भौगोलिक दृष्टीने अतिप्रचंड असलेल्या या  चीन देशात शेती करायला आणि औद्योगिकीकरणासाठी मुबलक जागा ही जमेची बाजू. जगात सर्वाधिक लोकसंख्या असल्यामुळे "मानव' एक उत्पादनाचा महत्त्वाचा घटक, याचीही काही कमी नाही. असंख्य कामगार उपलब्ध असल्यामुळे मजुरीचा दर कमी. माल तयार करण्याचा खर्च कमी. त्यामुळेच माल विकण्यासाठी जी किंमत आकारली जाते तीही तुलनेने कमीच. म्हणूनच या वस्तू चिन्यांना स्वस्त दरात विकता येतात. चिनी व्यापारी तसे चतुर आहेत. चीनमध्ये स्थानिक मिळणा-या वस्तूंचा दर्जा व निर्यात केल्या जाणा-या वस्तूंचा दर्जा यात तफावत केली जाते. शिवाय प्रत्येक देशात जाणा-या मालाच्या प्रकारात व दर्जात विषमता जाणवते. स्पष्ट करून सांगायचे म्हणजे चीनने अमेरिकेला पाठवलेला माल व भारतात पाठवलेला माल यांच्यात बराच फरक असतो. एकतर प्रत्येक देशातील लोकांच्या वस्तूंची गरज, आवड निरनिराळी. त्याप्रमाणेच लोकांची खरेदीची क्षमताही वेगळी. याच गोष्टी निर्यातीतील फरकाला कारणीभूत आहेत. उत्तम दर्जाची महागडी वस्तू कितीही सुंदर आणि उपयुक्त असली तरी भारतीय बाजारातून जलद विकली जाईलच अशी शक्‍यता कमी. म्हणूनच प्रत्येक देशाचा नीट अभ्यास करून त्या त्या प्रमाणे बदल करून वस्तू निर्यात करण्याचे "चातुर्य' चीनकडे आहे. "मागणीनुसार उत्पादन' हे समीकरण अचूक अवलंबले गेलेले दिसते. जपानसारख्या नावीन्यपूर्ण वस्तूंचा शोध लावणा-या देशाकडून माहिती मिळवणे, त्यातील बारकावे समजून घेणे व त्याची चक्क नक्कल करणे यातही चीन मागे नाही. प्रतिकृती अशी तयार करतात की ती अगदी मूळचीच वाटावी. पूर्वेतिहास असलेल्या देशांकडे पूर्वापार चालत आलेली ज्ञानसंपदा तसेच अनुभवाचा बराच साठा असतो. हजारो वर्षांपासून स्थिरावलेल्या चीनकडेही खूप पारंपरिक कला आहेत. लोकरीचे विणकाम, मातीकाम, चित्रकला, भरतकाम, हस्तकला, लाकडी किंवा दगडी कोरीव काम चिनी लोकांना अवगत आहे. नानाविध रंगसंगतींच्या छान छान वस्तूंच्या निर्मितीची आवड आहे. पारंपरिक कलेची जोपासना, प्रगती करून त्याचा उपयोग अर्थार्जनासाठी केलेला दिसतो. यात गायन, वादनाबरोबर व्यायामाचे वेगवेगळे प्रकार (वुशु, कुंग-फु, ऍक्रोबॅटिक्‍स) तर जगप्रसिद्ध आहेत. चायनीज औषधे, जी वनस्पती, प्राणी, पक्षी यापासून केलेली असतात, त्यांचा गुण जलद व कायमस्वरूपी असल्यामुळे जगात त्यांचा प्रसार व मागणी वाढत आहे. वस्तूबरोबरच ज्ञानाचीही विक्री करण्यात चीन अग्रेसर आहे. योगविद्या मूळची भारतातील. ती शिकून घेऊन इंग्लंड, अमेरिकेत योग शिकवणारे चिनी योगशिक्षक ऐकिवात आहेत. फेंगशुई (आर्ट ऑफ प्लेसमेंट) या वस्तूंच्या रचनेच्या कलेचा वापर आपल्या समृद्धी व उत्कर्षासाठी करण्याचे फॅड भारतातही एवढे पसरले आहे की आपले भारतीय वास्तुशास्त्र सोडून लोक या चिनी कलेच्या नादी लागले आहेत. "आपले' ते दुस-यांच्या गळी उतरवण्यात तरबेज दिसतात हे चिनी. प्रादेशिक भव्यता व अतिप्रचंड लोकसंख्या. त्यामुळे भिन्नता अपरिहार्य! पण चीनमधल्या विविधतेत ही एकात्मता दिसते. भाषा, पेहराव, अन्न यामध्ये वेगळेपणा असला तरी शेवटी सर्व जण चिनी! देशामधली हीच विविधता एक वैशिष्ट्य म्हणून चीनने जगासमोर मांडले आहे. जागतिक व्यवहारात प्रचंड परकीय चलन मिळवून देणारे पर्यटन (ट्रॅव्हल) क्षेत्रात चीन हे "प्रेक्षणीय स्थळ' म्हणून केव्हापासूनच उच्च स्थानावर जाऊन बसले आहे. दर वर्षी लाखो पर्यटक हा चीन पाहायला येतात आणि बॅगा भरभरून चिनी सामान आपल्या देशात घेऊन जातात. चीनमध्ये धर्म, जात यांचा अतिरेक नाही. राजकारणात तर नाहीच नाही. ख्रिश्‍चन, बौद्ध, मुस्लिम धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व किंवा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी  हाणामा-या, दंगेधोपे झालेले ऐकले नाहीत. काही लोक तर कोणताही धर्म पाळत नाहीत. कुठल्याही येशू-अल्लाला न भजताही ते लोक मजेत राहत आहेत. हे सामाजिक स्वातंत्र्य व शांतता हे या देशाच्या प्रगतीला पोषकच आहेत. सर्व चिन्यांकडे एक मात्र आहे - देशप्रेम! "मी एक चिनी आहे' हा सर्वांना अभिमान आहे. व्यापार, खेळ, युद्ध, अभ्यास किंवा इतर कुठलाही व्यवहार / उद्योग करताना आपल्या देशासाठी हानिकारक असे काहीही होणार नाही याची त्यांना सतत जाणीव असते. स्वतःच्या हित, प्रगतीइतकेच देशाचे हित आणि प्रगती महत्त्वाची. देशाचे राष्ट्रगीत उत्साहाने आणि अभिमानाने गाणारे हे चिनी देशप्रेमी हीच या देशाची खरी संपत्ती! जागतिक व्यापारात वर्चस्व असणा-या चीन देशाच्या वर्चस्वाला चौकस, चाणाक्ष, स्नेहभावी, धूर्त, तडजोड स्वीकारणा-या         व्यापा-यांबरोबरच चिनी सरकारही जबाबदार आहे. राजघराण्याची सत्ता संपुष्टात आल्यानंतर पूर्णपणे मोडकळीला आलेल्या देशाला पुन्हा उभे केले ते कम्युनिस्ट राजवटीने. आधुनिक सरकारनेही अंतर्गत राजकीय खेळी न खेळता, स्वहिताचे उद्दिष्ट गुंडाळून ठेवून जनहिताचे कार्य चालू ठेवले व देशाला सुस्थिती आणवली. बाजारपेठेच्या कक्षा सातासमुद्रापलीकडे रुंदावण्यासाठी लवचिक धोरण अवलंबून सवलतींद्वारे निर्यातीला प्रोत्साहन दिले. मुक्त व्यापाराला परवानगी दिली तरी स्वावलंबनाचा हेतू न विसरता! मल्टिनॅशनल कंपन्यांचा शिरकाव सहन केला तो केवल भांडवलासाठी नव्हे तर त्यांच्याकडून ज्ञान संपादन करता यावे म्हणून! आपला कुठलाही तोटा होणार नाही याचे पूर्णपणे भान चीन देशाला आहे. कडक नियम, नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध कारवाई व त्वरित शिक्षा यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे सोपे झाले. सामाजिक, आर्थिक, राष्ट्रीय प्रगतीसाठी योजना केल्या. सरकारने व त्या अमलात आणण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले चिनी जनतेने आणि मग देशाला बळकटी आल्यावर एकजुटीने आक्रमण केले या जगावर. आक्रमण केले आहे इतर प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर, जी आहे देशाच्या पाठीचा कणा! हे बहुरूपी सोंगी, ढोंगी आक्रमण वाळवीसारखे मुळापासून पोखरते आहे तुमचा देश. कधी लेचापेचा होऊन पडेल कळणार नाही तुम्हालाच. म्हणून साऽऽ वऽऽ धाऽऽ नऽऽ!!! - मीनल गद्रे बीजिंग, चीन

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

25 Feb 2008 - 8:25 pm | सुधीर कांदळकर

मुख्य म्हणजे संशोधकाचा आव न आणता. साधे सोपे व सहज. एवढा कठीण विषय आणि एवढी सोपी मांडणी. हे सोपे नाही महोदया. 
चिनी व्यापारी तसे चतुर आहेत. चीनमध्ये स्थानिक मिळणा-या वस्तूंचा दर्जा व निर्यात केल्या जाणा-या वस्तूंचा दर्जा यात तफावत केली जाते. शिवाय प्रत्येक देशात जाणा-या मालाच्या प्रकारात व दर्जात विषमता जाणवते. स्पष्ट करून सांगायचे म्हणजे चीनने अमेरिकेला पाठवलेला माल व भारतात पाठवलेला माल यांच्यात बराच फरक असतो.
हे निरीक्षण उल्लेखनीय. ठाऊक नव्हते. अभिनंदन व शुभेच्छा.

सर्वसाक्षी's picture

25 Feb 2008 - 9:30 pm | सर्वसाक्षी

आपली स्वतःची चीनी भाषा सोडता इतर कोणत्याही भाषेचा गंधही नसलेले चीनी उद्योजक, त्यांचे प्रचंड कारखाने, दहा वर्षांनंतरचे चित्र डोळ्यापुढे ठेवुन केलेली जागा/ यंत्रसामुग्री यातील गुंतवणुक हे निश्चितच थक्क करणारे आहे.
चीन मध्ये उत्कृष्ठ, चांगल्या, बर्‍या आणि सुमार अशा चार दर्जाच्या वस्तू बनतात असे माझे निरिक्षण आहे. कोणत्याही ग्राहकाला नाही म्हणायचे नाही हे त्यांचे धोरण. बि.एम.डब्ल्यु/ बेंझ सारख्या मोटारी, संगणक चीन मध्ये बनतात. डिसेंबर मध्ये गेलो असता २१ तारखेला सर्व प्रसारमाध्यमांना एकच विषय होता- शांघायच्या प्रदर्शनात ठेवेलेले ७२ आसनी ए आर जे २१ विमान! येत्या काही वर्षातच ही संपूर्ण देशांतर्गत बांधणीची विमाने अंतर्गत वाहतूकीपैकी ६०% वाटा उचलतील अशी अपेक्षा आहे!
प्रचंड संख्येने उत्पादन, तुलनेने स्वस्त श्रम, कमी आयात कर, अधिकाधीक कच्चा माल/ यंत्रे देशातच उपलब्ध, अत्यंत प्रगत अशी वाहतूक व्यवस्था, सुसज्ज बंदरे, अत्याधुनिक साधने यामुळे (व एके काळी सरकारकडुन कर्ज घेउन बुडविण्याची असलेली सवलत) यामुळे त्यांची उत्पादने स्वस्त नसली तरच नवल. शिवाय अनुसंधानावर युरोप्-अमेरिकेच्या तुलनेने नगण्य खर्च (तुम्ही शोधा आम्ही बनवतो:)) यामुळे किमतीच्या बाबतीत हे किफायती ठरतात.
ब्रुक बॉण्डचा चहा अगदी रुपया-दोन रुपयाच्या पाकिटातही मिळतो. ज्याच्या खिशात रोज सकाळी असलेल्या पाच रुपयात चहा-साखर-दूध हे समिकरण बसवायचे आहे त्याला चहाची किंमत किती रुपये किलो हे गौण असते तर त्याला असलेल्या रुपयात चहा मिळणे हे महतत्त्वाचे असते तदवत ५० रुपयांना विजेवर चालणारी आगगाडी अगदी गरिबालाही परवडणारी असते हे ओळखून अशा वस्तू दर्जावर तडजोड करून अशा ग्राहकांचे प्राबल्य असलेल्या बाजारपेठांसाठी आवर्जुन बनविल्या जातात. या वस्तु विकत घेणार्‍याला त्या फार टिकणार नाहीत हे माहित असते पण खिशाला परवडणार्‍या किमतीत त्याला आपल्या पोराना निदान चार दिवस का होइना पण आनंद देता येतो हे महत्त्वाचे असते. शिवाय मुले खेळणी हाताळणार आणि मोडणार तेव्हा भारीची खेळणी आणुन मुलांना खेळु न देता दुरुन पाहायला लावण्यापेक्षा वा मोडल्यावर ओरडण्यापेक्षा अशी खेळणी आणुन देणे अनेक पालक पसंत करतात. तीच गोष्ट दिवाळिच्या विजेवर चालणर्‍या माळांची. हल्ली घरात वसू जोंबाळायला जागा व वेळ नसतो. ४० रुपयंची माळ आणली आणि एक सण साजरा झाला तरी पैसा वसूल!
अनेकदा व्यापारी ग्राहकांना आकर्षित करण्याकरीत जाणुन बुजुन कमी दराच्या व अर्थातच कमी प्रतिच्या व उत्पादन बंद होउ घातलेल्या वस्तू मागतात. यात आपले दिल्लीचे व्यापारी आघाडीवर. मात्र तुमची दोन पैसे अधिक द्यायची तयारी असेल तर तुमच्या तपशिलाबरहुकुम व मागाल त्या दर्जाच्या वस्तू चीनमध्ये मिळतात.
जगात काय चालते आहे, कशाला मागणी आहे हे पाहण्यासाठी चीनी उद्योजक देशोदेशी प्रदर्शने पाहायला जातात, बाजारपेठांमध्ये काय वस्तु व किती किमतीला विकल्या जातात ते पाहायला जातात व आपल्या देशात त्याच वस्तू अल्पदरात बनवुन त्याच देशांना देउ करतात.
तात्पर्य सरकार, उद्योजक व कामगार या तिघांनीही प्रगतिचा ध्यास घेतलेला आहे असे दिसते.

प्राजु's picture

25 Feb 2008 - 9:38 pm | प्राजु

जगात काय चालते आहे, कशाला मागणी आहे हे पाहण्यासाठी चीनी उद्योजक देशोदेशी प्रदर्शने पाहायला जातात, बाजारपेठांमध्ये काय वस्तु व किती किमतीला विकल्या जातात ते पाहायला जातात व आपल्या देशात त्याच वस्तू अल्पदरात बनवुन त्याच देशांना देउ करतात.
हे अगदी खरे. मिनल तुझे निरिक्षण खूप जबरदस्त आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु

मीनल's picture

26 Feb 2008 - 6:14 am | मीनल

अग, ते माझे निरिक्षण नाही.

मीनल's picture

25 Feb 2008 - 10:09 pm | मीनल

ज्यांनी चीन पहीला आहे त्यांना तो आश्चर्य कारक वाटतोच.ज्यांनी पाहिला नाही त्यांनाही चीनचे कुतुहल असते असे मला वाटते. तेव्हा आणि आत ही माझी चीनची background कुणाला सांगितली की भुवया उंचावतात. हो ,अय्या ,कसं,काय अश्या अनेक प्रश्नांचा भडीमार सुरु होतो.
आपण भारतीयांनी चीनचा फारसा अभ्यास केलेला नसतो. खोल इतिहास ही महिती नाही.शिवाय बरेच वर्ष तो देश `closed ` होता. आता ची प्रगती पाहुन चीनचे सर्वांना  कुतुहल  आहे.
त्यामानाने ब्रिटीश म्हणा ,अमेरिका म्हणा आपल्याला चांगलीच परिचयाची आहे.त्यामुळे त्याचे काहींना  आकर्षण असले तरी  कुतुहल  नाही.
चीनचे  कुतुहल  आहे पण   आकर्षण नाही. दोघातिघांना विचारल की अमेरिका जातोस की चीनला? तर प्रगती झालेला देश आणि प्रगती करणारा देश हा मुद्दा सोडला तर कुणीही चीन म्हणणार नाही.
मी बीजिंगला राहिले.It was very luxurious life .but I knew Chinese well. I mean at least communicable .Otherwise daily life  is also difficult even after living there for years.
But I feel it this is valid for any NonEnglish speaking countires.German,Russia ,French-- all same !You must know their language well to make your life not luxurious but easy.
Compared to that English speaking countries are easy to get in  routine and to settle.
Typing in English is faster ,so used English  words!
sorry for  that.
 
 

मदनबाण's picture

25 Feb 2008 - 11:42 pm | मदनबाण

"मागणीनुसार उत्पादन' हे समीकरण अचूक अवलंबले गेलेले दिसते. जपानसारख्या नावीन्यपूर्ण वस्तूंचा शोध लावणा-या देशाकडून माहिती मिळवणे, त्यातील बारकावे समजून घेणे व त्याची चक्क नक्कल करण......भारतीय बाजारातील अनेक चीनी वस्तु पाहुन मनोमन याची खात्री पटते.-------------------------------------------------------------------------------फेंगशुई (आर्ट ऑफ प्लेसमेंट) या वस्तूंच्या रचनेच्या कलेचा वापर आपल्या समृद्धी व उत्कर्षासाठी करण्याचे फॅड भारतातही एवढे पसरले आहे की आपले भारतीय वास्तुशास्त्र सोडून लोक या चिनी कलेच्या नादी लागले आहेत.------ १००% सहमत..... बांबुची रोपे,लाफिंग बुद्धा, तोंडात नाणे घेतलेला बेडुक,,,,पाण्याच्या थाळील कासव,,,,(हे अनेक व्यापार्र्‍यांकडे दुकानात ठेवलेले पाहीले आहे.) आणि आपल्या घरा समोरील तुळ्स मात्र कुठेतरी हरवली आहे.-----------------------------------------------------------------------सरकारनेही अंतर्गत राजकीय खेळी न खेळता, स्वहिताचे उद्दिष्ट गुंडाळून ठेवून जनहिताचे कार्य चालू ठेवले---------- आपले नेता मंड्ळी (विधान सभा ,राज्यसभा इथे कश्या प्रकारे कुस्ती खेळतात हे अनेक जणानी पाहीले असेलच्.....एक मेकांवर फेकलेले मईक आठवा.) या ड्ब्लु ड्ब्लु एफ साठी कोण्ता बेल्ट द्यायचा यांना?---------------------------------------------------------------             कडक नियम, नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध कारवाई व त्वरित शिक्षा यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे सोपे झाले.:-------- आपल्या इथे :----- काय द्यायच ते बोला !!!!!(हे सोप्या भाषेत समजवणे फार कठीण आहे.)