मदत हवी आहे - घरगुती मिनीगॅस

वेदश्री's picture
वेदश्री in काथ्याकूट
23 Aug 2009 - 12:26 am
गाभा: 

नमस्कार!

दर मोठ्या शुभमुहूर्ताला गरजेनुसार (आणि उपलब्ध 'प' जीवनसत्व किती आहे ते चाचपूनही!) घरात काहितरी नवे घेण्याचा माझा प्रयत्न असतो. उद्या गणेशचतुर्थी आहे आणि सद्ध्याची गरज आहे घरगुती गॅसचे कनेक्शन. भारत गॅस एजन्सीकडे नाव नोंदवून आज सात महिने होऊन गेले पण कनेक्शन मिळण्याचा काहीच पत्ता दिसत नाहीय. स्वतःचे कनेक्शन तात्पुरते मला वापरायला द्यायला काही दोस्त (ज्यांचे गॅस कनेक्शन आता ते पाईप्ड गॅसची सोय असलेल्या सोसायटीत रहायला गेल्याने तसेच पडून आहे) तयार असले तरी 'परावलंबित्व जितके कमी तितके श्रेयस्कर' अशा माझ्या स्वभावाला ते पटत नाहीय. दोन-चार दोस्तांकडून पक्की सोय होईपर्यंत २ किलोची गॅसबत्ती/मिनीगॅस घेण्याबद्दल सल्ले मिळालेत. तूर्तास ही मिनीगॅसची कल्पना स्वागतार्ह वाटत असली तरीही त्यासंदर्भात काही अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा काथ्याकूट काढायचा खटाटोप केला आहे. माझे प्रश्न खाली दिले आहेत -

१. पुण्यात असा मिनीगॅस कुठे विकत मिळू शकेल?
२. नेहमीच्या गॅस सिलेंडरच्या सुरक्षिततेबाबत जशा सर्व चाचण्या झालेल्या असतात तशा याही मिनीगॅसच्या केल्या जातात का? असतील तर त्याची शाश्वती कशी तपासावी?
३. साधारण कितीपर्यंत जाईल या मिनीगॅसचे बजेट? (५००-६०० रुपयांमध्ये मिळायला हरकत नसावी असे दोस्तांचे म्हणणे पडले.)
४. या मिनीगॅसबद्दल आपणास आणखीन काही माहिती असेल जी मला उपयोगी पडू शकेल तर ती द्यावी.

घरगुती गॅसची सोय लवकरात लवकर झाल्यास माझ्या जेवणाची मी चांगली सोय करू शकेन. त्यामुळे आपल्याला याबाबत माहिती असल्यास कृपया लवकरात लवकर मदत करावी ही विनंती.

कृपाभिलाषी,
वेदश्री

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

23 Aug 2009 - 1:16 am | दादा कोंडके

मी असा मिनी गॅस बंगळूर मध्ये दोन-एक वर्षापुर्वी घेतला होता. दोन किलोचा गॅस सिलिंडर आणि त्याच्यावरच बसवलेला बर्नर होता. मला तो ४०० रु. ला पडला होता. रोज एकवेळचं जेवण बनवायचो, तो तीन महिने चालायचा! संपला की २०० रुपयात नवीन. त्याच्यावर आयएसाआयचा मार्क होता. सिलेंडर वरच बर्नर असल्यामुळे तो गरम होउन फुटतो की काय अशी भिती वाटयची. पण तस काही झालं नाही!

पुण्यात मार्केट यार्डपाशी कुठल्यातरी दुकानात पाहिल्यसारखं वाटतय. नक्की माहीत नाही.

तरी स्वयपाक करताना कल्जी घेन. :)

"I always win, except when I loose. But then I just don't count" :D

रेवती's picture

23 Aug 2009 - 1:32 am | रेवती

मिनीगॅस म्हणजे एक टिल्लू सिलिंडर असतो तो ,असे गृहीत धरले आहे. ह्या माहितीची मदत होते आहे का ते पाहणे. १२ वर्षांपूर्वी लक्ष्मी रस्त्यावर, लिमये नाट्य चित्र मंदिराच्या बाजूला असलेल्या गॅसच्या अनेक दुकानांपैकी एकातून छोटा सिलिंडर घेतला. त्याची किंमत दोनेकशे होती + ३०० रू. गॅसची किंमत. दोघांच्या कुटुंबाला तो मला बरोबर २५ दिवस पुरत असे. पुन्हा त्या दुकानातून रिकामा सिलिंडर देउन नवा ३०० रू ना मिळत असे. शेगडी वेगळी विकत घ्यावी लागते. हा मिनीगॅस सुरक्षित(आयएसआय मार्क) तर होताच पण लग्गेच मिळायचा याचाच आनंद होता. (तरी शाश्वतीबद्दल दुकानदाराकडून खात्री केलेली बरी.)काही दिवसांनी तो महाग वाटू लागला व मित्रमंडळींपैकी एकाचे पडून राहिलेले कनेक्शन वापरले. आपली गरज जर कमी असेल (एका व्यक्तीसाठी) तर हा वापरायला हरकत नाही.

रेवती

शाहरुख's picture

23 Aug 2009 - 2:32 am | शाहरुख

असे प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर आणण्यापूर्वी खालील उपाय करावा..

१.खुर्चीतून उठावे..(बिछान्यातच असल्यास बिछान्यातून)
२. दार उघडून घराच्या बाहेर यावे.
३. शेजार्‍याच्या घराची कडी अथवा घंटी वाजवावी.
४. त्याने/ तिने दार उघडल्यावर नसल्यास प्रथम आपली ओळख करून द्यावी.
५. आपला वरील प्रश्न मांडावा.
६. त्याला / तिला स्थानिक माहिती असल्यास तो/ती देईलच अन्यथा अश्या स्वरूपाचे उत्तर देईल की "तिसर्‍या मजल्यावरील पाटलांकडे आहे असा गॅस".
७-अ. आपले निम्मेअधिक काम इथे झालेच..मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील कार्यवाही करावी.
७-ब. पाटलांकडे जाऊन तिसर्‍या सुचनेपासून परत उपाय अवलंबवावा.

अल्गोरिथम वर्षानुवर्षे चालत आल्याने सिद्ध झालेला आहे..आपण लुप मधे जाणार याची आम्ही खात्री देतो.

टीप १ - 'पाटील' ऐवजी 'येड्डीरुप्पा' अथवा 'अय्यर' असे आडनाव असल्यास मराठीतूनच बोलण्याचा आग्रह असेल तर तो थोडा बाजूला ठेवावा.
टीप २- मिनिगॅस घेतल्यानंतर माहिती दिलेल्याला आवर्जून चहासाठी बोलवावे..काही महिन्यानंतर फ्रीजचीही गरज भासू शकते.

:-)

कृपाभिलाषीच,
शाहरुख

मिसळपाव's picture

23 Aug 2009 - 2:54 am | मिसळपाव

वर दादा कोंडकेने लिहिल्याप्रमाणे जो सिलिंडरवरच बर्नर असतो, तो 'कँपिंग स्टोव्ह' असावा बहुदा. तुम्हि जर ३० मिनीटंच्या वर वापरणार असाल, तळणी वापरणार असाल तर शेगडी वेगळी घेतलेली जास्त श्रेयस्कर. जरा जास्त खर्च येईल पण सुरक्षिततेच्या दृष्टिने वेगळी शेगडी असलेली बरी.

Nile's picture

23 Aug 2009 - 3:44 am | Nile

कुठल्या गावात राहता? पुण्यात असाल तर कुठे? माझ्या अनेक वर्षांच्या (कसे ते विचारु नका) माहीती नुसार १ दिवसात कनेक्शन मिळते.

नीलकांत's picture

23 Aug 2009 - 7:50 am | नीलकांत

अशी छोटी गॅस शेग़डी पुण्यात टिळक रोडला टिळक स्मारक मंदीराजवळ मिळेल. (महाराष्ट्र बॅ़केच्या समोर) शेगडी आयएसआयची घ्यावी. किती किलो गॅस बसतो यावर त्याची किंमत अवलंबून असते. गॅस तेथे भरून सुध्दा मिळतो. मात्र हे दुकान सदाशिव पेठेत असल्यामुळे दुपारी १ ते ४ बंद असतं.

गॅस मंडईत सुध्दा भरून मिळतो. मंडईत एक भोजपुरी सिनेमा लागतो असं थिएटर आहे शिवाजी रोडवर तेथे मि़ळतो.

सुरूवातीला हा गॅस ठिक वाटतो मात्र नंतर नंतर महाग वाटायला लागतो. मोठा गॅस घेणार असालच तर मग यात पि जिवनसत्व घालवण्यात अर्थ नाही असं वाटतं.

- नीलकांत

सखाराम_गटणे™'s picture

23 Aug 2009 - 9:10 am | सखाराम_गटणे™

आप्पा बळवंत चौकात पण मिळतो,
माझ्याकडे आहे तो ११०० र ला विकत घेतला होता. ७-८ झाले अजुन शिल्लक आहे.

वेदश्री's picture

23 Aug 2009 - 9:53 am | वेदश्री

अरे वाह! सर्वांच्या मदतीने आज माझे काम फत्ते होणार बहुतेक. मदतीबद्दल मनापासून आभार.

दादा कोंडके,
मस्त माहिती सांगितलीत. तुम्ही तुमच्या मनात असलेली भीती सांगितलीत हे खूप बरे झाले.

रेवती,
माझ्या एकटीसाठीच हवेय कनेक्शन. लग्गेच मिळाल्यास अत्यंत बरे होईल. रोज केवळ जेवण्यासाठी ४-५ किलोमीटर गाडी दामटायला नको वाटते.. शिवाय भरमसाठ पैसे मोजूनही पोटाला शांतता लाभेल असे साधे मराठी जेवण मिळत नाहीच. थोडे महाग पडले तरी ताबडतोब सोय होणे जास्त महत्त्वाचे आहे तूर्तास.

शाहरुख,
हा अल्गोरिदम वापरून झाला आहेच शिवाय आमच्या (अजून तयार न झालेल्या) सोसायटीच्या गुगलग्रुपमध्येही हे विचारून झालेय. बहुतेक सर्व घरी अगोदरचेच कनेक्शन आहे आणि ज्यांच्याकडे नाही (बॅचलर्स) त्यांना स्वयंपाकाचा खटाटोप करण्यात रस नाही. आसपासच्या (??!!!)मार्केटमध्येही चौकशी करून झालीय पण त्यांना हा प्रकारच माहिती नाही. ज्या दोस्तांनी हा प्रकार सांगितला ते बेंगळुरूचे असल्याने अशी सोय पुण्यात उपलब्ध आहे की नाही हे विचारण्यापासून सुरूवात झाली माझी! शेजारच्या मॅथ्यूकाकू आणि अलीकाकू खूपच चांगल्या आहेत.. मला मध्येमध्ये काही ना काही खायला आणून देतात प्रेमाने (हे लिहित होते तेव्हाच मॅथ्यूकाकूंनी डोसे-चटणी आणून दिली गणेशचतुर्थीचा सण म्हणून!). त्यांच्या वयोमानानुसार तब्येतीच्या अनेक अडचणी असल्याने रेडीमेड चालत नाही मग त्यांना रिकामे डबे परत करताना जीव एवढासा होतो माझा.

मिसळपाव,
अत्यंत मोलाचा सल्ला दिलास. आता जितके जमेल तितके शेगडी वेगळीच घेण्याचा प्रयत्न करते. सिंगल बर्नरवाली चालेल सद्ध्या. तूर्तास दोनवेळचा पोळीभाजीचा स्वयंपाक आणि या काकवांचे डबे परत करताना त्यात भरण्यासाठी काही खाऊ करता आला की बस्स.

Nile,
भारतमध्ये नावनोंदणी करायला गेले तेव्हा तर दोन सिलिंडरचे कनेक्शन आहे फक्त आठवडाभर थांबा असे म्हणाले होते. दोन तर सोडाच पण एकही सिलिंडरचे कनेक्शन अजुन मिळालेले नाहीय. काढायच्याच झाल्या तर अगदी वरपर्यंत ओळखी काढता येतील पण तसे वागणे 'ये मेरे उसूलोंके खिलाफ' वगैरे असल्याने तो मार्ग मी अवलंबू इच्छित नाही.

नीलकांत,
पत्ते सांगितल्याने खूप मदत झाली. मोठा गॅस घेणार आहेच पण जेवणाची भयंकर आबाळ होत असल्याने काहितरी जुजबी व्यवस्था करणे भाग आहे. शिवाय जेवणाचा डबा म्हणावा तर ४० रुपये केला आहे आता.. आणि चव एकदम भुक्कड!

सखाराम गटणे,
तुम्ही दिलेला पत्ताही लिहून घेतला मी माझ्याकडे. शोधाशोध करायला उपयोगी पडेल हे निश्चित. :)

सर्वांनी केलेल्या मदतीबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. आजच जाऊन बघते मिनीगॅसची सोय करता येते का ते. मॅथ्यूकाकूंना काहितरी मराठी पदार्थ देता येईल आज परतीच्या डब्यात.. :)

सखाराम_गटणे™'s picture

23 Aug 2009 - 1:08 pm | सखाराम_गटणे™

व्य नि पाठवला आहे.

ऍडीजोशी's picture

23 Aug 2009 - 11:31 am | ऍडीजोशी (not verified)

बंगळूरू मधे आल्यावर मी असा मिनी गॅस घेतला. मी त्यावर फक्त चहा आणि कधी कधी मॅगी करतो. मागचा सिलेंडर मला वर्षभर पुरला. संपल्यावर दुकानात जाऊन लगेच बदलून मिळाला. सुवातीला बर्नर सकट सिलेंडर ६५० ला पडला. नुसत्या सिलेंडरचे ३०० होतात इथे.

छोट्या मोठ्या कामांसाठी हा ठीक आहे. पण नियमीत स्वयंपाक / पाणी तापवणे इत्यादींदाठी मोठा सिलेंडरच सोयिस्कर. मित्रांकडे असेल तर हक्काने मागून न्या. चांगले मित्र असतील तर संकोचणे / परावलंबित्व असे विचार मधे आणू नका. सोय बघा.

अभिज्ञ's picture

23 Aug 2009 - 12:53 pm | अभिज्ञ

अगदी हेच म्हणतो.

(एडी च्या गॅसवरची मॅगी खाल्लेला व चहा लै वेळेला पिलेला) अभिज्ञ.
;)

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

वेदश्री's picture

23 Aug 2009 - 2:29 pm | वेदश्री

पाणी तापवणे वगैरे तर नाही पण स्वयंपाक मात्र नियमित करायचा आहे. या वर्षीच्या अकरा संकल्पांपैकी एक संकल्पच आहे माझा की स्वतः स्वयंपाक करून त्याचा डबा हापिसात न्यायचा.. तीन संकल्प झाले पूर्ण आता हा चौथा पूर्णत्वाच्या मार्गावर..

दोस्त (मित्रमैत्रिणी या शब्दांना नको ते अर्थ चिकटल्याने हा नवा माझ्यालेखी सभ्य शब्द वापरते मी.) सगळे अगदी चांगले आहेत माझे. माझ्या या अशा विचारांनी जबरदस्त चिडतात ते सगळेच पण एकदा का तात्पुरती सोय झाली की एकूणच प्रकरण ढिले पडते आणि प्रयत्न तितकेसे मन लावून होत नाहीत. भावंडांपैकी सर्वांच्या नावाने कनेक्शन असून माझ्याच नावाने अजुन घेतलेले नाही त्यामुळे तसे ते असावे अशीही इच्छा आहेच. यामुळे या सर्व लटपटी. स्वाभिमान नको इतका भरलाय माझ्यात यावर माझ्या दोस्तांचे बिनशर्त एकमत होईल बहुतेक.

JAGOMOHANPYARE's picture

23 Aug 2009 - 11:43 am | JAGOMOHANPYARE

भान्डी विकणार्‍यान्च्या दुकानात विचारा.. त्याना माहीत असते.. मी गॅस ऐवजी एक इलेक्ट्रिक हॉट प्लेट व नोन स्टिक पॅन्स वापरत आहे... स्वयपाक होतो त्यावर चान्गला..

वेदश्री's picture

23 Aug 2009 - 2:05 pm | वेदश्री

भांड्यांच्या दुकानात हे एक बरे सांगितलेत. इलेक्ट्रीक हॉट प्लेटमध्ये प्रश्न विजेच्या बिलाचा तर आहेच शिवाय वीज नाही म्हटले की उपाशी रहावे लागेल ते वेगळेच.

बहुधा बेकायदेशिर असावे. जरा माहिती घेवुन विकत घ्या.
वेताळ

वेदश्री's picture

23 Aug 2009 - 2:08 pm | वेदश्री

कँपिंग स्टोव्हसाठी गॅसबत्तीच्या वरचा लॅम्प काढून त्याजागी बर्नर बसवतात असे नुकतेच कळले. गॅसबत्तीत गॅस भरणे जर बेकायदेशीर नसेल तर हेही नसावे असे वाटते.. तरी चौकशी केलेली कधीही बरीच जी मी आता करेनच. धन्यवाद.

Nile's picture

23 Aug 2009 - 12:28 pm | Nile

@ वेदश्री:
उसुल के खिलाफ तर मी सांगतही नाही आहे. सद्ध्या सगळीकडे १-२ दिवसात कनेक्शन मिळते. नक्की काय कारण देत आहेत ते लोक? पुण्यात मी स्वतः सकाळी जाउन दुपारी कनेक्शन घेउन आलो आहे. मद्रास मध्ये तर १० मिनिटात घेतलं होतं.
लगेच देत नसतील तर कॅन्सल करुन HP एजंट कडे जा. आणि जर पैश्यांची अडचण नसेल तर सध्या इंडियन किंवा शेल चे गॅस कनेक्शन मिळतात सबसीडी नसल्याने महाग असतो.

वेदश्री's picture

23 Aug 2009 - 2:22 pm | वेदश्री

तुम्ही म्हणता तसे असेल तर मग मी पुण्याबाहेरची असल्याने मला त्रास देतायत का हे लोक? HP कडेच गेले होते सर्वात आधी.. त्यांनी तर सरळ नविन कनेक्शन्स सद्ध्या उपलब्धच नाहीयेत असे सांगून नावही नोंदवून घेतले नाही माझे. त्यांची सर्व्हीसपण चांगली नाहीये असे ऐकले. भारतवाले टोलवाटोलवी करतायत सद्ध्या कनेक्शन्स नाहीयेत १५ दिवसांनी विचारा अशी. आणि पैशांचे म्हणाल तर अडचण अशी कधीच नव्हती/नाही/नसेल पण कायमस्वरूपी सोय महागडी नको असे वाटते.

उद्या परत एकदा भारत मध्ये चौकशी करून बघते काम पुढे सरकतेय का ते. :(

Nile's picture

23 Aug 2009 - 4:01 pm | Nile

नक्की काय सबब सांगत आहेत ते लोक? अपुर्ण कागद्पत्रे हे एक कारण असु शकते, तुम्ही फॉलोअप मात्र ठेवा, पुण्यात भारत पे. ची सेवा जास्त चांगली आहे हे मान्य आहे. मी माहीती काढायचा प्रयत्न करतो की सद्ध्या काही अडचण आहे का.

अजुन एक उपाय असा आहे की तुमच्या मुळ गावी जर एक गॅस (ट्रान्स्फर करण्याकरिता ) स्पेअर असेल तर ट्रान्स्फर करुन घ्या.. किंवा तिकडे सहज मिळत असेल तर तिकडे नविन घ्या व तिकडचा जुना ट्रान्स्फर करुन घ्या, (नवा होत नाही लगेच) लवकर होईल.

मिनीगॅस प्रॅक्टीकल नाही असे मला वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Aug 2009 - 4:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आम्हाला एच.पी.चं कनेक्शन द्यायला ६ महिने लावले, पण शेवटी गॅस दिला. एखाद महिन्यापूर्वी त्याच दुकानात तीन-चार महिने थांबायला लागेल असं सांगत होते.
पुण्यात जर गॅस कनेक्शन द्यायला नाही म्हणत असतील तर:

१. तुझ्या मूळ गावी जर गॅस कनेक्शन लगेच मिळत असेल तर तिकडे एक जादा कनेक्शन तुझ्या किंवा आई-वडीलांच्या किंवा भावंडांच्या नावावर घे. तो गॅस सिलिंडर आणि रेग्युलेटर आले की जुना गॅस पुण्यात, तुझ्या नावावर, ट्रान्सफर करून घे. (सहा महिन्याच्या आत ट्रान्सफर होत नाही, म्हणून जुनाच गॅस ट्रान्सफर करावा लागेल.) ट्रान्सफरला फारतर एखाद आठवडा लागेल. सिलिंडर आपल्याला हलवावा लागत नाही. आपण फक्त कागदपत्रं इकडून तिकडे करायची.
२. मित्र मैत्रिणींपैकी कोणाला गॅस कनेक्शन नकोच असेल तर त्यांचं कनेक्शन आपल्या नावावरच करून घे ना! डिपॉझिटही तूच भरलंस की मग दुसर्‍याचा गॅस वापरत आहोत अशी काळजीही नको.

आमच्याकडेही एक छोटा सिलींडर आहे, गॅस गीझरसाठी तो सर्रास वापरला जातो. भांड्यांच्या दुकानात नवा सिलींडर मिळतो, किंवा बदलून नवाही मिळतो. आमच्याकडे ४ किलोचा सिलींडर आहे. त्याला त्याचा वेगळा रेग्युलेटर येतो, तो आपल्या नेहेमीच्या शेगडीला पाईपने जोडायचा. सुरूवातीला त्यासाठी १८०० रुपये घेतले आणि ३००-३५०ला त्याचं रिफील येतं.

अदिती

वेदश्री's picture

23 Aug 2009 - 8:44 pm | वेदश्री

मॅथ्यूकाकांनी सांगितले की एचपीचे कनेक्शनच नाही तर रिफिल सिलेंडर मिळायलाही मारामार आहे. भारतबद्दल किमान रिफिल सिलेंडर उपलब्धतेबद्दल तरी काही प्रश्न नाहीय म्हणे.

१. ह्याबद्दल Nileना दिलेल्या प्रतिसादात लिहिलेय सविस्तर त्यामुळे हे शक्य नाही.
२. दोस्तांमार्फत सोय करून घेणे हा पर्याय मी आधीपासून बाद (कुत्र्याचे वाकडे शेपूट हे ह्याबद्दलचे कारण!) ठरवला असल्याने हा छान उपाय डोक्यात आला नाही. तुझ्या प्रतिसादातून उपरती झालीय पण असे काही विचारायला आता खूप संकोचल्यासारखे वाटतेय मला. (ह्यात तेरेकी वेदश्री.. असे किंवा तसे कसेही केले तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच का शेवटी? x-( ) तरी बघते असे काही जमले तर..

वेदश्री's picture

23 Aug 2009 - 8:31 pm | वेदश्री

कारण सांगतात की सद्ध्या भारतने नविन गॅस कनेक्शन्स बंद केले आहेत किंवा या भागात नव्या गॅस कनेक्शन्सची संख्या कमी आहे आणि प्रतिक्षा यादीनुसार कनेक्शन्स मिळतील किंवा कनेक्शन्स संपलेत वगैरे.. अपूर्ण कागदपत्रे म्हणायला कागदपत्रे घ्यायला तर हवी ना त्यांनी. आत्ताशी तर नुसते प्रतिक्षा यादीत नाव नोंदवले आहे. कनेक्शन्स येताच फोन करू असे सांगितले आहे! ही यादीही खूप मोठी आहे त्यांच्याकडे.

ट्रान्सफर करण्यासाठी स्पेअर गॅस नाहीय गावी. एका रेशनकार्डवर एकच गॅस कनेक्शन असा काहितरी प्रकार आहे तिकडे! तिकडे चौकशी केली नाही नव्या कनेक्शनसाठी कारण मला स्वतःला उंटावरून शेळ्या हाकायला जमणे शक्य नाही आणि तब्येतीचे प्रश्न असलेल्या साठी उलटलेल्या आईबाबांची मी काळजी घेणं तर राहिले दूरच पण मी त्यांना आणखीन अशा सरकारी डोकेदुखीच्या कामाला लावायला जाणे हे कितपत योग्य आहे? नकोच ते. भावंडं त्यांच्या संसारात बिझी आहेत.. त्यांना कुठे माझ्यासाठी इतका वेळ काढायला सांगू? आपली सोय आपणच करणे हेच कायम जास्त श्रेयस्कर.

मिनीगॅस प्रॅक्टीकल नाही हे तर अगदी सोळा आणे सत्य आहे हो पण काय करणार? ४० रुपयात फक्त ४ पुर्‍या, बटाट्याची भाजी आणि साधी खीर मिळतेय ज्यातदेखील चव नाही.. तर काहितरीतर करावेच लागेल ना.. :,(

शाहरुख's picture

23 Aug 2009 - 1:04 pm | शाहरुख

http://www.pgportal.gov.in/

याची कितपत मदत होईल सांगता येत नाही..पण तुम्ही ७ महिने थांबला आहात जोडणी मिळण्यासाठी तर हा प्रयत्न करून बघायला हरकत नाही...

मिनिगॅस बद्दल मात्र आम्ही आमच्या वरील प्रतिसादाशी चिकटून आहोत :-D

वेदश्री's picture

23 Aug 2009 - 9:16 pm | वेदश्री

बरे झाली ही लिंक मिळाली ते... उद्या भारतवाल्यांची खैर नाही आता. बर्‍याबोलाने सरळ झाले तर ठीकच आहे नाहीतर या लिंकवरच्या वस्तर्‍याने भादरून काढेन एकेकाला!

प्रभाकर पेठकर's picture

23 Aug 2009 - 3:17 pm | प्रभाकर पेठकर

गॅसचा बराच त्रास असेल तर २ रेनी चघळा......

रेनी सिझनमध्ये रेनीचा सल्ला ! क्या बात है...

काय प्रभूकाका तुम्हीपण.. इथे माझा जीव जातोय आणि थट्टा सुचतेय तुम्हाला? धिस इज डार्क (म्हणजे नॉट फेअर) :)

वेदश्री's picture

23 Aug 2009 - 9:23 pm | वेदश्री

आज जाऊन बघून आले मी हा मिनीगॅस प्रकार आणि कसंसंच झालं मला. खेळभांड्यातला गॅस आहे का काय असे वाटले बघताक्षणीच. 'नहीं मामूसे नकटा मामू सही' तत्वाने घ्यायचे म्हणतासुद्धा गावी असताना भरल्या घराचा स्वयंपाक ऐसपैस स्वयंपाकघरात नेहमीच्या गॅसवर करायची सवय असल्याने एकटीसाठी असले तरीही अशा चिंधी गॅसवर काम धकवावे लागणारे हे काही केल्या पचतच नव्हते. शेवटी आता ठरवलेय की उद्या भल्या सकाळी भारतवाल्यांना चांगलं खडसावायचं आणि कायमस्वरुपीच सोय करून घ्यायचा प्रयत्न करायचा.. काम झाले तर उत्तमच पण नाहीच झाले तर अगदीच नाईलाजाने मग घ्यायचा २ किलोचा मिनीगॅस. माझ्या राहत्या जागेपासून बर्‍यापैकी अंतरावर (मुख्य पुण्यापर्यंत जावे लागले नाही) असलेल्या बाजारातल्या भांड्यांच्या दुकानांमध्ये चौकशी करता मिळाली दुकाने हे झमेलं विकणारी.

२ किलो, ५ किलो आणि १० किलो अशा प्रकारचे सिलेंडर्स उपलब्ध आहेत. तुम्हाला हवे असल्यास सिलेंडरवरच बर्नर लावून देऊ शकतात किंवा हवे तर वेगळी शेगडीही मिळू शकते पण बर्नर लावून देण्याकडेच त्यांचा भर असल्याचे दिसले. त्यांच्याचकडे रिफिलींगचे सिलेंडरदेखील मिळतात. वेगवेगळ्या दुकानांमध्ये चौकशी करता सर्वच वस्तूंची आणि सुविधांची किंमत बदलत गेली.. याने माझे डोके आणिकच खराब झाले. २ किलोचा सिलेंडर ६०० रुपयापासून ते १०५० पर्यंत मिळतोय. ५ किलोचा १०५० ते १७०० पर्यंत तर १० किलोचा २५०० ते ३५०० पर्यंत! २ किलोच्या सिलेंडरचे रिफिल १२० ते २५०, ५ किलोचे ३०० ते ३५० आणि १० किलोचे ६०० ते ७५० मध्ये मिळते! आयएसाय मार्क दिसला पण त्याबद्दलची कागदपत्रं किंवा गॅरंटी-वॉरंटी असा काही प्रकार दिसला नाही. कायदेशीर आहे का विचारलं तेव्हा कळलं की महागाचे सिलेंडर जे 'गो गॅस' नामक कंपनीचे आहेत म्हणे ते कायदेशीर आहेत! पण दिल्लीमेड स्वस्तातले सिलेंडर बेकायदा असून ते ने-आण करताना दिसल्यास पोलीस पकडतात म्हणे. अर्थात हे कुठेही लिखापढीत नाही तर नुसते तोंडीच असल्याने महाग वस्तू गळी उतरवण्यासाठीच्या मार्केटींगचे गिमिक किती आणि सत्यासत्य किती ते काही कळायला मार्ग नव्हता. सिलेंडर पूर्ण भरलेला आहे का ते वजन करून दाखवा म्हणता दुकानदाराने ततपप केली आणि माझे उरलेसुरले अवसान गळाले.

बर्नर सरळ सिलेंडरवर लावून घेतल्यास हा अख्खा मिनीगॅस ओट्यावर ठेवून मग त्यावर पातेले, तवा वगैरे ठेवून स्वयंपाक करायचे म्हटले तर मला सहा फूट उंच असावे लागेल.. जी अपेक्षा तद्दन अवाजवी आहे! बरं तो खाली ठेवावा तर पुण्यातल्या या टिचभर स्वयंपाकखोलीत ओट्याची अडगळ होईल कारण अशा अनाहूत आतंकवाद्यांना लोळायला पुरेल इतकी जागाच कुठेय तिथे? कशीतरी जागा करायचीच ठरवले तर खाली बसून स्वयंपाक करावा लागेल.. जो मी कधीच केला नाही. छ्या! सगळेच गणित साफ चुकत चाललेय. :,(

रेवती's picture

24 Aug 2009 - 12:32 am | रेवती

भा. गॅ. चे कायमस्वरूपी कनेक्शन मिळेलच तुला. त्याबरोबर डबल बर्नरची शेगडीही मिळेल. हा जो मधला थांबण्याचा काळ आहे त्यासाठी २ किलोचा सिलिंडर व्यवस्थित पुरतो. मुख्य खरेदी लक्ष्मी रस्त्यावर करून जर रिफिल तुझ्या घराजवळच्या दुकानात घेतलेस तर कदाचित फसवणूक कमीत कमी होइल. फक्त एक 'सिंगल' बर्नरची शेगडी विकत घेउन काम भागेल. माझ्याकडे भा. गॅ. चे कनेक्षन आल्यावरही ही छोटी जोडगोळी कधीकधी गरजेची होत असे (लाईट गेल्यावर गिझर नाही मग पाणी तापवण्यासाठी किंवा जास्त पाहुणे आल्यास वगैरे).
बाकी, आपलं डोकं फिरवणार्‍या बर्‍याच गोष्टी अनुभवाला येतात, पण बेचव अन्नखरेदीमध्येही भरपूर मनस्ताप होतो. फसवणूक वाट्याला आल्यासारखे वाटते. कुठेतरी फसवणार असतातच निदान आपली तब्येत व पौष्टीक अन्न हे तरी मिळेल.

रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2009 - 10:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

रेवतीताईने योग्य सल्ला दिलाच आहे.

वेदश्री, मला वाटतं तू साधी नेहेमीची दोन बर्नरची शेगडी आत्ताच घेऊन टाक. एकदा फक्त भारतगॅसकडून चौकशी करून घे की त्यांच्या कनेक्शनबरोबर शेगडी घ्यायलाच लागते का ते! मुंबई, ठाण्यात कोणी ओळखीचे असतील तर त्यांनाही विचार, कारण तिकडे बर्‍याच ठिकाणी पाईप्ड गॅस येत आहे, आला आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्याच लोकांना आपली अडचण सांगायला लाजू नकोस; अडचण असताना कशाला लाजायचं?

नील, पुण्यात ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे त्याप्रमाणात इतर गोष्टी, सोयी वाढत नाही आहेत, त्यामुळे सहा महिने गॅससाठी थांबावं लागत आहे.
अदिती

आजवर कुठल्याही एजन्सीवाल्याला शेगडीविरहीत गॅस कनेक्शन देताना मी पाहिलेले नाहीये... भारतवालेही त्याला अपवाद नाहीतच. तसे असते तर माझ्या मनात भरलेली ऑटोइग्निशन प्रकारची काचेची शेगडीच घेतली असती मी..

४५००/- मध्ये सिंगल सिलेंडर गॅस कनेक्शन आणि ६०००/- मध्ये दोन सिलेंडरचे गॅस कनेक्शन देणारेत ते. पक्की अकाऊंटंट असल्याने कनेक्शनसाठी इतका खर्च येतच नाही हे मला माहितेय पण तरीही द्यावे लागणार असून जबरदस्तीची शेगडी पत्करावी लागणार, स्वतःच सगळे सामान घरी न्यावे लागणार रिक्षा वगैरेतून ... आणि तरीही इतके महिने प्रतिक्षा! :(

तूर्तास सिलेंडरसोबत सिंगल बर्नर शेगडी किंवा सिलेंडरवरच बर्नर बसवलेला मिनीगॅस असे काही करण्याचे योजावे लागतेय.

वेदश्री's picture

24 Aug 2009 - 4:06 pm | वेदश्री

खरंय रेवती, तू म्हणतेस ते. धड जेवण नसल्याने तब्ब्येतीची धुळधाण होत चाललीय एकंदरीत. आता काहितरी युद्धपातळीवर करावेच लागणार आहे मला.

झकासराव's picture

24 Aug 2009 - 11:28 am | झकासराव

मिनीगॅस बद्दल माहिती नाही.
पण प्रायव्हेट गॅस एजन्सी आहेत. जिथे विनाअनुदानीत गॅस मिळतो.
ते पुर्णपणे कायदेशीर आहे.
तिथे डिपोसिट भरावे लागेल १००० रु. आणि सिलिन्डर भरण्याची (गॅसची किंमत) जवळपास ५००-६०० रु. (१२ किलो गॅस) आहे.
तुमच्या जवळ शेगडी, पाइप आणि रेग्युलेटर असायला हव फक्त.
पुर्ण स्वयंपाक असेल तर हाच ऑप्शन जास्त बरा पडॅल अस वाटतय.
एअच पी मध्ये नम्बर लागत नसेल तर भारत कडे जावुन चौकशी अक्रा. तिकडेही नम्बर लावुन ठेवा. जो नम्बर आधी येइल त्याला आपल म्हणा. :)
आणि हो गॅस एजन्सी वाला आपल्याला मुदाम उशीर करत नाहीच शक्यतो.
कम्पनीची पॉलिसी आणि निर्णय असतात. आपण फक्त मध्ये मध्ये गॅस एजन्सी मध्ये चौकशी सुरु ठेवायची.
माझा नम्बर नशीबाने तीन महिन्यात लागला होता. तोवर मित्र जिन्दाबाद. :)

वेदश्री's picture

24 Aug 2009 - 5:26 pm | वेदश्री

एचपीमध्ये भयंकर फडतूस वागवले गेल्याने मी तिथे परत जाणार नाही.

>आणि हो गॅस एजन्सी वाला आपल्याला मुदाम उशीर करत नाहीच शक्यतो.

कळेलच ते मी बीपीसीएलच्या कॅंप ऑफिसला गेल्यावर! त्यांच्या वेबसाईटवरती कंप्लेंट करायला गेले तर पार्सर एरर येतोय!!! कळतेय सगळे हळूहळू...

सूहास's picture

24 Aug 2009 - 3:55 pm | सूहास (not verified)

सू हा स...

भारतमध्ये कनेक्शन्स उपलब्ध नसल्याने अजून दोन महिनेतरी चौकशी करण्यात अर्थ नाही असे सांगितले गेले. सात महिने हेच ऐकतेय असे म्हटल्यावर कॅम्पच्या मुख्य ऑफिसात चौकशी करा खरे बोलतोय की नाही त्याबद्दल असे सांगण्यात आले! चौकशी करणे आता अगदी मनावर घेणे जरूरी आहे असे दिसते. कायमस्वरुपी कनेक्शन अजुनही नाही मिळाले, हे कळले असेलच.

उद्या सकाळी २ किलोचा मिनीगॅस घेणार आहे!

सूहास's picture

24 Aug 2009 - 5:42 pm | सूहास (not verified)

<<<,उद्या सकाळी २ किलोचा मिनीगॅस घेणार आहे!>>>
पाच किलोचा घ्या, दोन किलोत झोल असतो...ब्लॅक ने पण गॅस(सिले॑डर)ची विक्री होते माहीत आहे का ?? फक्त गॅस असावा लागतो...

सू हा स...

वेदश्री's picture

24 Aug 2009 - 5:56 pm | वेदश्री

एकटीच्या स्वयंपाकाला २ किलोचा गॅस सिलेंडर पुरेसा होईल बहुतेक. शिवाय उंचीला त्यातल्या त्यात कमी असल्याने ओट्यावर ठेवला तरी चालेल, जे मला बरे पडेल.

२ किलोत काय झोल असतो? व्हाईट की ब्लॅक ठरवण्याइतकी माहितगार नाही मी या क्षेत्रात. माझ्या बुद्धीला वाटते की इतके सर्रास हे मिनीगॅस प्रकरण विकले जात असेल तर ते पूर्णपणे ब्लॅक नसावे बहुतेक पण तरी तसे असल्यास काही सांगता येत नाही.

सूहास's picture

24 Aug 2009 - 6:01 pm | सूहास (not verified)

<<<२ किलोत काय झोल असतो?>>>
अ‍ॅक्चुएल आतील गॅसच वजन कमी असते...खात्री करुन ,ओळखीच्या दुकानदाराकडुन घ्या हि विनंती..
<<< माझ्या बुद्धीला वाटते की इतके सर्रास हे मिनीगॅस प्रकरण विकले जात असेल तर ते पूर्णपणे ब्लॅक नसावे बहुतेक पण तरी तसे असल्यास काही सांगता येत नाही.>>>
मिनीगॅस हा "व्हाईट कींवा ब्लॅक " नाही ...सरकारच त्यावर काही की नियंत्रण नाही..त्यामुळे अ‍ॅक्चुएल आतील गॅसची शास्वती देता येत नाही...

सू हा स...

वेदश्री's picture

24 Aug 2009 - 6:14 pm | वेदश्री

>अ‍ॅक्चुएल आतील गॅसच वजन कमी असते...
हाहाहाहा... मग ५ किलोत हा झोल नसणार का? अहो ५ किलोच्या सिलेंडरवर नेट्ट वेट ४ किलो लिहिले होते. दुकानदाराच्या ते लक्षात आणून देता त्याने सिलेंडर फिरवून त्यावर एके ठिकाणी लिहिलेले ५.६ दाखवत म्हटले की .. सिलेंडरचे एकंदर वजन ५.६ किलो आहे आणि आतल्या गॅसचे ४ किलो!!! आता बोला.. या नियमाने २ किलोच्या सिलेंडराचे काय गणित आहे कोण जाणे. उद्या ते एक बघून घ्यावे लागेल. जमलेच तर त्याच्याकडच्या डिजिटल वेट मशिनवर वजन करून घेईन.. शक्यता मात्र खूपच अंधुक दिसतेय असे काही होण्याची.

पुण्यातल्या कुठल्या भांडी दुकानदारांशी ओळख नाही माझी. जितकी घेता येईल तितकी काळजी घेऊन खरेदी करणे इतकेच काय ते माझ्या हातात आहे.

सूहास's picture

24 Aug 2009 - 6:52 pm | सूहास (not verified)

पुण्यात ,माझ्यापर्यत अजुनपर्य॑त ५ किलो ची कधी ही तक्रार आलेली नाही...त्यात झोल केला की मोट्ठा झोल करावा लागतो...कसा ते सांगतो...ऊदा...रम,व्हिस्की ई. स्पिरिटमुळे बनलेल्या च्या दारु आहेत्..त्यांच डुप्लिकेशन करावयास एक १०*१० ची रुम लागते..आणी साधारण ५०,००० ची ईन्वेस्टमेंट्...पण जर बियरच डुप्लिकेशन करावयाच असेल तर एक भला मोठ्ठा प्लॅन्ट लागतो...जर १०*१० च्या रुममध्ये केल तर धोका असतो आणी नो प्रॉफीट्...तसेच्...मोठ्या(५ किलोचा म्हणा,किंवा १४.३ किलोचा म्हणा करायला खुप मोठ्ठे रॅकेट लागेल..)

सध्यातरी २ किलोचा(नाना पेठेतला) हा झोल आमच्यापर्यंत आला होता...बाकी आपण घेताना काळजी घ्यालच...

सू हा स...

वेदश्री's picture

24 Aug 2009 - 7:05 pm | वेदश्री

२-५ किलोच्या 'झोलर' भावना पोहोचल्या. काळजी घेईन. :)

ऋषिकेश's picture

24 Aug 2009 - 7:29 pm | ऋषिकेश

मी मुंबईकर असल्याने पत्त्याबाबत मदत करू शकत नाहि . क्षमस्व.
परंतु छोट्या गॅस वर अवलंबून न रहाता अजूनही गॅस ट्रांसफर करून घ्यायचे जमते आहे का ते पहा.
ह्या ग्यासवर जेवण बनविणे कठीण वाटते. गॅसच्या ज्योतीचे प्रेसिजन अगदीच कमी आहे. एकतर एकदम कमी नाहितर भलामोठी ज्योत असते. अगदी अडीअडचणीला पाणी तापवणे वगैरे साठी ठिक आहे.. रोजचे जेवण बनविणे कितपत सोयीस्कर पडेल शंका आहे.

असो. आपल्याला आपल्या मनासारखा गॅस मिळून आपण ज्या "गॅस" वर आहात तो त्रास टळो :) व तुम्हाला स्वतःच्या डब्यात, स्वतःच्या हातचं खायला मिळो :)

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून २७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "मामी आमची सुगरण.. रोज रोज पोळी शिकरण...."

वेदश्री's picture

24 Aug 2009 - 7:52 pm | वेदश्री

मी मदत मागितली होती आणि तुमच्याकडून जितकी शक्य तितकी तुम्ही करताय म्हणता तुमच्या सल्ल्याला आगाऊ म्हणून पत्ता देण्याच्या असमर्थतेबद्दल क्षमा मागण्याची काहीच गरज नाही.

गॅसच्या ज्योतीचे प्रेसिजन? खरंच महत्त्वाची गोष्ट आहे की हीदेखील. त्याबद्दल विचार करण्याच्या पलिकडे गेले होते बहुतेक मी सद्ध्या. असो. तूर्तास अगदी पोहे, खिचडी, शिरा, उपमा वगैरे जरी करता आले तरी चारी धामाचे पुण्य मिळाल्याइतका आनंद होईल मला.

शुभेच्छांबद्दल मनापासून आभार.

वेदश्री's picture

26 Aug 2009 - 12:57 pm | वेदश्री

आज २ किलोचा मिनीगॅस १०२१ रुपयात विकत घेतला मी. ४५० रुपयाच्या मिनीगॅसवर आयएसाय मार्क नव्हता म्हणून तो घेणे टाळले. माझ्या घरी न्यायच्या आधी मॅथ्यूकुटुंबाला दाखवायला घेऊन गेले. काकांनी त्यांच्याप्रकारे गॅसची तपासणी केली.. वजनही केले. ३.८ किलो भरले. २ किलो गॅस आणि २.५ किलो सिलेंडर म्हणता एकूण वजन ४.५ किलो असायला हवे होते असे गणित माझ्या डोक्यात चालू असतानाच काका म्हणाले.. आता उद्यापासून आम्ही तुझ्याचकडे येतो जेवायला. त्यांच्या अशा कौतुकमिश्रित बोलण्याने 'झाले गेले विसरूनी जावे, पुढे पुढे चालावे..' असे वाटून समाधान वाटले. :)

मिसळपाववर मदत करणार्‍या सर्वांचे मनापासून आभार.

काळा डॉन's picture

26 Aug 2009 - 4:32 pm | काळा डॉन

मॅथ्यू काकांच देव भलं करो!

काळू शेख ;)

ऋषिकेश's picture

26 Aug 2009 - 4:46 pm | ऋषिकेश

अरे वा! आता फोटु तरी डकवा केलेल्या पदार्थाचे/पदार्थांचे

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ४ वाजून ४५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक कविता "पोटासाठी भटकत जरी...."

कानडाऊ योगेशु's picture

26 Aug 2009 - 2:17 pm | कानडाऊ योगेशु

कालपर्यंत केवळ कुतुहल म्हणुन हा धागा वाचत होतो आणि नेमकी आज ह्या माहितीची गरज पडतेय.
मी बेंगलोर मध्ये असतो.काल रात्री १० वाजता सिलिंडर संपला.(ज्योती गॅस.). नवीन सिलिंडर आज सकाळी ११ नंतरच मिळणार होता.मिनिगॅसची फार निकड जाणवली.
बेंगलोरमध्ये राहणारे मिपाकर (एडीजोशी,दादा कोंडके) मिनिगॅस सिलिंडर खरेदीसाठी काही मार्गदर्शन (दुकानाचा पत्ता,गॅसचा ब्रँड) करु शकतील का?

रेवती's picture

26 Aug 2009 - 10:35 pm | रेवती

अरे वा! आणला का गॅस?
तो छोटा सिलिंडर पाहिला की गणपती आणल्यासारखे वाटते.
आता होउन जाऊ दे स्वयंपाकाला सुरुवात्.....धडाक्यात!

रेवती