राम राम मंडळी,
मिसळपाव परिवारातील प्रत्येकाचे स्वागत!
आजपर्यंत श्री गजाननाच्या, आई अंबाबाईच्या, आई योगेश्वरीच्या कृपेने, भाईकाकांच्या, बाबूजींच्या, भीमण्णांच्या आणि कुसुमाग्रजांच्या आशीर्वादाने, आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे मिसळपावने इथपर्यंत वाटचाल केली, आणि यापुढेही अशीच करेल अशी खात्री वाटते!
येत्या एक दोन दिवसात मिसळपावच्या मुखपृष्ठात काही बदल करायचे ठरवले आहे. सध्या मिसळपावच्या डाव्या बाजूला नेहमी मिसळीचे चित्र लावलेले असते. तशीच चित्राकरता आणखी एक जागा करण्याचे मनात आहे, जिथे मिपाकरांच्या घरातल्या काही विशेष पाककृतींची छायाचित्रे लावली जातील आणि त्याखाली तसा उल्लेख असेल!
उदाहरणार्थ-
चौकोनामध्ये संबंधित चित्र,
आणि त्या चित्राच्या खाली,
"आज सर्वांना श्रीखंडपुरी - प्राजूकडून!"
असा मजकूर असेल! :)
म्हणजे समजा एखाद् दिवशी एखाद्या मिपाकराच्या घरी काही विशेष पदार्थ (व्हेज,नॉनव्हेज, तिखट, गोड कुठलाही,) केला असेल तर तो पदार्थ एखाद्या छानश्या प्लेटमध्ये घालून त्या मिपाकराने आपल्या मिसळपावकरताही त्याचा एक छानसा फोटू काढून ठेवावा आणि तो सरपंच डॉट मिसळपाव@जीमेल डॉट कॉम (sarpanch.misalpav@gmail.com) या पत्त्यावर पाठवावा! यथावकाश, फर्स्ट कम फर्स्ट बेसिस वर तो फोटो त्या मिपाकराच्या नांवानिशी एखाद् दोन दिवसाकरता मिपाच्या मुखपृष्ठावर झळकेल! :)
'आज प्राजूकडे छानसं थालिपीठ केलं होतं बरं का!', किंवा 'आज आमच्या एकलव्याने छानशी साबुदाण्याची खिचडी केली होती बरं का!' किंवा 'आज वरदाकडे उत्तमपैकी सँडविचेस केली होती बरं का!' किंवा आज 'विकासरावांकडे मस्तपैकी मटणवडे केले होते बरं का!' किंवा 'आज आमच्या वरूणदेवाकडे झकासपैकी श्रीखण्डपुरी केली होती बरं का!' हे तरी सगळ्या मिपाकरांना समजेल! तेवढीच जरा गंमत...! :)
फोटू शक्यतोवर लँडस्केप मध्ये असावा, शक्यतोवर घरी बनवलेल्या पदार्थांचाच असावा. अगदीच जर आपल्यापैकी एखाद्याने/एखादीने कुठल्या हॉटेलात वगैरे जाऊन काही विशेष पदार्थ चापला असेल आणि तो पदार्थ सर्वांनी पाहावा असं जर त्या मिपाकराला/मिपाकरणीला वाटलं तरच त्या पदार्थाचा फोटू काढून पाठवावा! परंतु शक्यतोवर, होता होईल तो घरी बनवलेल्या पदार्थांचाच फोटू पाठवावा!
रोजच प्रत्येकाकडे काही खास पाकृ बनवली जाते असे नाही परंतु आपण कधी अचानक नाष्ट्याचा एखादा छानसा, अनवट पदार्थ बनवतो, कधी पटकन छानसं पिठलं बनवतो, कधी काय तर कधी काय!
तर मिपाकरांनो,
तुमच्या घरी बनलेला तो जो काही पदार्थ असेल आणि तो पदार्थ एकदम पेश्शल आहे, तुमचा लाडका आहे, तो सर्वांनी पाहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर अगदी जरूर त्याचा फोटू काढा आणि पाठवा. तुमच्या नांवासकट मिसळपाववर त्या पदार्थाची छबी झळकेल आणि तुमच्यासोबत फोटूतूनच का होईना, संपूर्ण मिसळपाव परिवारही त्या पदार्थाचा आस्वाद घेईल! :)
काय मंडळी, कशी वाट्टे आइडिया? :)
जसं खाद्यपदार्थाच्या फोटूबाबत तसंच सुविचारांबाबत. मिसळपावच्या सुधारीत मुखपृष्ठावर सुविचाराकरताही थोडी जागा ठेवायचे ठरवले आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्याला आवडलेला सुविचार जनरल डायर यांना पोष्टकार्डाने पाठवावा. सुविचाराकरता एखादी काव्यात्मक ओळही चालेल. संस्कृतमधल्या सुविचाराही विचार होऊ शकेल परंतु होता होईलतो सुविचार मराठीतच असावा. त्या सुविचाराला खालील प्रमाणे प्रसिद्धी मिळेल!
उदाहरणार्थ -
"आईवडिलांचा आणि गुरुजनांचा नेहमी आदर करावा!" - सौजन्य: चतुरंग.
:)
असो,
तर मंडळी, लागा कामाला. काही चांगलंचुंगलं खाल्लंत तर त्याच्या फोटू काढा आणि मिसळपावला पाठवा! :) आपल्याला माहिती असलेले, कानी पडलेले, वाचनात आलेले सुविचार मिसळपावकडे पाठवा ही विनंती...
जाता जाता - (कुठेतरी स्ट्रीक्ट रहायला लागतं बाबा! :)
फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर शक्यतोवर सगळ्याच पाकृ आणि सगळेच सुविचार यांना पाठवणार्याच्या नांवानिशी सन्मानपूर्वक प्रसिद्धी दिली जाईलच परंतु....
त्या बाबतचे अंतिम अधिकार जनरल डायर यांच्याकडे असतील याचीही कृपया प्रत्येकाने नोंद घ्यावी ही विनंती! :)
आपला,
(चांगलं खाणारा, चांगल्या विचारांचा!) तात्या.
प्रतिक्रिया
21 Feb 2008 - 11:05 am | धोंडोपंत
वा वा . हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
छान उपक्रम आहे. मिपाचे अजून एक पुढचे पाऊल.
आपला,
(अग्रगामी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
21 Feb 2008 - 11:34 am | तात्या विन्चू
उत्तम योजना....सुविचाराबरोबरच एखादा मार्मीक अथवा विनोदी Quote पण टाकला तर मिसळ सोबत लिम्बाच्या फोडीचीही सोय होइल....
आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू
21 Feb 2008 - 1:37 pm | माझी दुनिया
हेच म्हणते :-D
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
21 Feb 2008 - 11:39 am | राजमुद्रा
एकदम झकास!
आता नवीन रेसिपीज करते, अन फोटू बी काढते.अन धाडून देते बगा लवकरच !
राजमुद्रा :)
21 Feb 2008 - 12:06 pm | झकासराव
काय सुपिक डोक आहे राव ह्या कल्पनेमागे :)
जबरीच आहे.
बरय मगं.
सगळेच भेटु आपण आपापल्या घरातील एखाद्या पाककृतीसहीत :)
21 Feb 2008 - 12:52 pm | स्वाती दिनेश
चांगला विचार आहे,आता काही नवे केले की फोटु काढून ठेवायला हवा,:)
अवांतर:बरेच दिवसात स्वातीने नवे काही केले नाही (पेठकरांची पावभाजी वगळता..)
स्वाती
21 Feb 2008 - 12:56 pm | विसोबा खेचर
बरेच दिवसात स्वातीने नवे काही केले नाही (पेठकरांची पावभाजी वगळता..)
का बरे काही नवीन केले नाहीत? :)
21 Feb 2008 - 1:10 pm | स्वाती दिनेश
कारण काही नाही,असेच,उगाच.. नाही झाले बरेच दिवसात काही नवे..
स्वाती
21 Feb 2008 - 3:42 pm | माझी दुनिया
मुळातल्या विंग्रजीतला पण भाषांतरीत चालेल का ?
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
21 Feb 2008 - 6:47 pm | विसोबा खेचर
मुळातल्या विंग्रजीतला पण भाषांतरीत चालेल का ?
हो, चालेल की! मराठीत भाषांतर असल्याशी कारण!
आपला,
(सुविचारी) तात्या.
21 Feb 2008 - 3:51 pm | मनस्वी
स्तुत्य उपक्रम!
मनस्वी
21 Feb 2008 - 6:58 pm | व्यंकट
आहे
21 Feb 2008 - 7:00 pm | प्राजु
मिसळपावचे स्वयंपाकघर आणि मिसळपाव वर वास करणारी सरस्वती.. या दोहोंची उपासनाच आहे ही.
तात्या,
अत्यंत चांगली कल्पना आहे ही. ही कल्पना लगेच आमलात आणली जावी हि विनंती. तुमच्या अशाच नवीन कल्पना आणि आमचे उत्स्फूर्त सहाय्य यातून मिसळपाव आंतरजालीय विश्वाचा मानबिंदू ठरावं हीच ईशचरणी प्रार्थना..
- प्राजु
21 Feb 2008 - 7:04 pm | विसोबा खेचर
मिसळपावचे स्वयंपाकघर आणि मिसळपाव वर वास करणारी सरस्वती.. या दोहोंची उपासनाच आहे ही.
मिसळपाव आंतरजालीय विश्वाचा मानबिंदू ठरावं हीच ईशचरणी प्रार्थना..
क्या बात है, धन्यवाद प्राजू...!
आपला,
(कृतज्ञ) तात्या.
21 Feb 2008 - 7:45 pm | ऋषिकेश
अतिशय उत्तम कल्पना.. फोटु अन सुविचार पाठवुच :)
-ऋषिकेश
21 Feb 2008 - 8:08 pm | आणिबाणीचा शासनकर्ता
फोटोंच्या मालकी हक्काबाबत पत्रपेटीतून विचारणा झाली आहे त्याबाबत आमचा खुलासा-
मिसळपाववर/मिसळपावकरता फोटो पाठवल्यावर/चढवल्यावर संबंधिताला त्या फोटोच्या मालकी हक्काबद्दलचा विचार सोडून द्यावा लागेल. म्हणजे निदान मिसळपाव डॉट कॉम तरी त्या विषया संदर्भात काही ठाम भाष्य करू शकत नाही/शकणार नाही.
एकदा एखादा फोटो मिसळपाववर चढवल्यावर कुणीही व्यक्ति तो जतन करू शकते आणि त्याचा कसाही उपयोग करू शकते. असे काही झाल्यास त्यास मिसळपाव डॉट कॉम कुठल्याही प्रकारे जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
तरी येथे पाठवल्या जाणार्या/चढवल्या जाणार्या फोटोंच्या मालकी हक्काबद्दल किंवा इतर कुणाकडून त्याच्या पुढे होणार्या संभाव्य वापराबद्दल/गैरवापराबद्दल जर फोटो पाठवणार्याच्या मनात काही शंका असतील तर त्याने मिसळपाव डॉट कॉम कडे फोटो पाठवू नयेत हे उत्तम!
परंतु फोटोच्या मालकी हक्काच्या मुद्द्यावरून मिसळपाव डॉट कॉम कुणालाही जराही जबाबदार किंवा उत्तरदायी असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी..
जनरल डायर.
21 Feb 2008 - 8:09 pm | लिखाळ
मस्त कल्पना..मजा येईल असे पाकृची चित्रे पहायला.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
21 Feb 2008 - 9:33 pm | चतुरंग
मस्त आयडियाची कल्पना!
वेगवेगळ्या पाककृती बघायला आणि सुविचार वाचायलासुध्दा मजा येईल.
माझ्याकडून पहिला सुविचार इथेच टाकतो - "सामर्थ्य दोन प्रकारांनी दाखवता येतं - एक म्हणजे खाली ढकलून आणि दुसरं वर ओढून." (बुकर टी. वॉशिंग्टन)
(अवांतर - माझ्या मते मराठी संकेतस्थळांमधे मि.पा.चं सामर्थ्य दुसर्या प्रकारचं आहे आणि ते तसंच रहावं:)
चतुरंग
24 Feb 2008 - 2:13 pm | विसोबा खेचर
राम राम मंडळी,
मिपाच्या मुखपृष्ठात थोडा बदल केला असून तिथे आता सुविचाराकरता आणि मिपाकरांच्या पाकृ करता जागा निर्माण केली आहे. तरी कृपया सर्वांनी वरच्या लेखात म्हटल्याप्रमाणे स्वत:च्या घरच्या एखाद्या विशेष पाकृचा फोटो किंवा सुविचार यापैकी जे जमेल ते किंवा दोन्ही, मिसळपावकडे अगदी अवश्य पाठवावे आणि सहकार्य करावे...!
अजूनही रंग, पाककृती विभाग, यांचे काम सुरू आहे. तसेच सभासदांनी वेळोवेळी नजरेस आणून दिलेल्या इतरही अडचणींचे निराकरण करण्याचा मिसळपाव आपल्या परिने प्रयत्न करतच आहे. कृपया थोडा अवधी द्या आणि सांभाळून घ्या, एवढीच विनंती...
मिसळपाव आपल्या सगळ्यांचेच आहे आणि आपल्या सहकार्याविना त्याची प्रगती अशक्य आहे याची मिसळपावला कल्पना आहे...
(कृतज्ञ) तात्या.
25 Feb 2008 - 12:37 pm | विसोबा खेचर
राम राम मंडळी,
मिपाकरांच्या घरगुती पाककृतींचे फोटू आणि सुविचार यायला सुरवात झाली आहे बरं का! :)
नुकताच एकलव्याच्या घरी खमण ढोकळा आणि भेळेचा कार्यक्रम पार पडला! त्याचा फोटू त्याने वर दिलेल्या पत्त्यावर पाठवला असून तो आम्ही आज मिपावर चढवला आहे! :)
हा एकलव्य लेकाचा आम्हाला सोडून एकेकटा भेळ आणि ढोकळा खातो! बघून घेईन! (स्वगत!) -:)
मिपाच्या एक सभासद माझी दुनिया यांनी सर्वप्रथम सुविचार पाठवला आहे तो ही आज मिपावर चढवला आहे!
असो, पाककृतीचा फोटो आणि सुविचार सर्वप्रथम पाठवणार्या एकलव्याचे आणि माझी दुनियाचे आभार...
अजूनही असेच फोटू किंवा सुविचार, जे जमेल तसे मिपाकडे पाठवत चला अशी सर्व मिपाकरांना विनंती!
आपलाच,तात्या.
2 Apr 2008 - 4:00 pm | सरपंच
साला पब्लिकचं काहीच सहकार्य नाय! पाकृचे फोटू कोण पाठवतच नाय!
इकडनं-तिकडनं चित्र शोधून एकटा किल्ला लढवतोय!
सुविचार देखील मनस्वी आणि मदनबाणच जास्त पाठवतात!
साला, ही सोय बंद करू की काय विचार करतोय! म्हटलं जरा मिपाच्या रुपात भर पडेल, परंतु पब्लिकला काय पन इंटरेस्ट दिसत नाय!
तात्या.
2 Apr 2008 - 4:15 pm | मनस्वी
तात्या जरा माझा कॅमेरा येउदेत.. मग मी पण पाठवीन माझ्या अजब पाककृती :)
सोय उत्तम आहे. बंद करू नका.
2 Apr 2008 - 7:54 pm | सुधीर कांदळकर
सरस्वती. छान कल्पना.
सुधीर कांदळकर.
2 Apr 2008 - 9:57 pm | डॉ.प्रसाद दाढे
मी माझा डिजि कॅम परत वापरायला काढलाय्..उद्याच आमच्या घरी गुलाबजाम करणार आहेत (म्हणजे बायको तसा पदार्थ करायचा प्रयत्न करणार आहे..) तिचे प्रयत्न सफल झाले तर नक्की फोटो काढून अपलोड करतो
2 Apr 2008 - 10:07 pm | चतुरंग
(म्हणजे बायको तसा पदार्थ करायचा प्रयत्न करणार आहे..)
हे बाकी भारी हां!;)
(अवांतर - आमच्या सौं. नी पहिल्यांदा घरी गुलाबजाम केलेले. अम्मळ मोठेच झाले होते, रात्री ते पाकात घातले, पाक पिऊन ते किती फुगतात ह्याची कल्पना नव्हती आणि सकाळी बघितले तर एवढे मोठे झालेले की मी त्यांचे नाव 'गुलाबलाडू' ठेवले;)!
चतुरंग
2 Apr 2008 - 11:28 pm | भाग्यश्री
सरपंच,
रेसीपी पाठवली आहे.. :)
2 Apr 2008 - 11:58 pm | विसोबा खेचर
रेसीपी पाठवली आहे.. :)
मिपाच्या मुखपृष्ठावर चढवली आहे! :)
अहो पण ही पाककृती कशी केलीत तेही मिपाकरांना सांगा की! तुम्ही मिपावर लिहीत काहीच नाही, नेहमी गप्प गप्प असता! :)
असो, पाकृचे चित्र पाठवल्याबद्दल मनापासून आभार.. अजूनही असेच काही छान फोटू येऊ द्या!
उत्तमपैकी मसालेभात वगैरे करता का? करत असाल तर करा पाहू एखाद वेळेस कधितरी आणि येऊ द्या त्याचा फोटू आणि पाकृ मिपावर! :)
असो,
तात्या.
3 Apr 2008 - 12:09 am | भाग्यश्री
अहो तात्या.. ही पाककृती माझी नाहीय, चकली नावाच्या ब्लॉगवर पाहून केलीय.. आणि थोडफार 'त्या तिथे पलिकडे' सुद्धा पाहीले.. :)
असो.. काय आणि कसं केलं ते सांगणं जाम अवघड आहे! त्यामुळे लिंक देते फक्त.. http://chakali.blogspot.com/2007/08/schezwan-fried-rice.html
आणि मिपा वर लिहीत नाही असं नाही, फक्त प्रतिसाद देते.. बाकी लिखाण वगैरे अपने बस की बात नही.. ब्लॉगवर खरडते तेवढं पुरे.. कशाला लोकांना त्रास ! :)
बाकी, मसालेभात जमतो चांगला.. केला की फोटो पाठवून देईन..
(आता स्वयपाक केला की पहीले फोटो काढायचा नाद लागणार बहुतेक... )