पाडव्याची लोटी

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
4 Aug 2009 - 11:30 pm
गाभा: 

गुढी पाडव्याला नक्की काय करायचे असते हा एक मोठ्ठा प्रश्न असतो. सकाळी पूजा करून गुढी उभारली; कडुलिम्बाचा पाल्याबरोबर गुळखोबरे खाल्ले, थोडे इकडेतिकडे करून नन्तर आमटी पुरणापोळीवर ताव मारून लोळणे ..ते एकदम सुर्यास्ताला गुढी उतरवायला जागे होणे या व्यतिरीक्त नक्की काय करायचे असते हा एक प्रश्नच असतो. अर्थात प्रश्नावर विचार करायला एकदम संध्याकाळीच वेळ मिलतो
शाळेत असताना पाटीवर सरस्वती काढून पाटीपूजा करायचो. ती कडवट गोड कडूलिंबाची चटणी खायचो. तेंव्हा काही प्रश्न पडायचे. ते तसे अजूनही पडतातच फक्त हल्ली कोणी जाहीर रीत्या चारचौघात अक्क्ल काढली तर काय म्हणून प्रश्न विचारायची गडबड करत नाही.
ते काही प्रश्न मला दर पाडव्याला हमखास आठवतात.
मी माझ्या पालकाना प्रश्न विचारायला लाजलो नाही पण " जरा गप्प बैस की गधड्या. आचरटासारखा काय विचारतो आहेस?" हे ऐकले की आमचे प्रश्न हवेत विरून जायचे.
माझ्या मुलाने विचारलेल्या एका प्रश्नाला मी जेंव्हा हे असेच उत्तर दिले तेंव्हा त्याचा पुढचा प्रश्न तयार होता. "बाबा आचरट लोक नक्की काय प्रश्न विचारतात?" मी निरुत्तर .......
कोण्या शालीवाहन राजाचे त्याला मिळालेल्या प्रीत्यर्थ प्रजेने गुढ्या तोरणे लावून स्वागत केले होते अशी एक कथा आहे. राम वनवासातून आल्यावरसुद्धा अयोध्यावासीयानी त्याचे स्वागत गुढ्या तोरणानी केले होते. असे युद्धाकान्डात लिहिले आहे.
पण मग गुढी उभारण्याचे नक्की प्रओजन काय?
चैत्री पाडव्याला नवे वर्ष सुरु होते. मग दिवाळी पाडव्याला काय सुरु होते?
माझे प्रश्न अगदी साधे निरागस आणि सोप्पे असायचे.
गुढी उभारताना काठी का वापरतात? पंधरा ऑगस्टला गुढी का उभारायची नाही ? या प्रश्नात मार खाण्यासारखे काय आहे. पण मी भरवर्गात एका वर्ग शिक्षकाच्या वेशातल्या सैतानाचा मार खाल्ला आहे.
"बैस खाली" अशा उर्मट आणि तद्दन आचरट वाक्यात ते शिक्षक माझ्या सारख्या होतकरु चौकस विद्यार्थ्यांच्या शंकाची व्हिलेवाट लावत असत.
ह्या शिक्षकाना मी एकदा एक शंका विचारली होती. गणीताच्या तासाला त्यानी कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागले असता एकाचा भाग जातो बाकी शून्य येते असे शिकवले. मला फळ्यावर याचे उदाहरण लिहायला सांगितले. मी मोठा आकडा कशाला लिहायचा म्हणून शून्याला शून्याने भागले.आणि भागाकार एक आला असे लिहिले. आता यात चिडण्यासारखे काय आहे ? पण त्या बरोब्बर लिहिलेल्या उत्तराला सुद्धा त्यानी माझ्या हातावर छड्या मारून "फार शहाणाहेस" अशा शब्दात हिणवले. वर " बैस खाली" हे उर्मट आणि तद्दन आचरट भरत वाक्य उचारलेच .
मी ठरवले की आता शंका आल्या तर त्या विचारकरूनच विचारायच्या.
गुढी पाडव्याचा आणि या शंकांचा संबन्ध काय अशी एक शंका येईल. वर्षाची सुरुवात ज्ञान वाढवून करायची म्हणून मी शंकांच्या आठवणी काढतो.
याच शिक्षकानी मराठी शिकवताना ( हो आमच्या शाळेत प्रत्येक विषयाला स्वतन्त्र शिक्षक ही चैन परवडणारी नव्हती) दोन वाक्याना जोडणार्‍या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात हे सांगितले. याचे उदाहरण साम्गता का असे विचारल्यावर माझा हात नेहमीप्रमाणे वर ......बाकी इतर कोणाचेच हात वर नव्हते म्हणून नाइलाजाने त्यानी मला संधी दिली.
मी म्हणालो " च्यायला" हे उभवयान्वयी अव्यय आहे. मास्तरांचा चेहेरा मस्त रंगीबेरंगी झाला.
आता मला सांगा की तुम्ही कटिंग करायला न्हाव्याच्या दुकानात गेलात आणि त्याचे दुकान बंद दिसले हे मित्राला कसे सांगाल?
सोप्पे आहे ...अरे न्हाव्याकडे कटिंगला गेलो च्यायला दुकानच बंद होते. या वाक्यात न्हाव्याकडे कटिंगला गेलो आणि दुकानच बंद होते ही दोन वाक्ये "च्यायला" या शब्दाने जोडली आहेत. आहे की नाही "च्यायला" हा शब्द उभयान्वयी अव्यय. पन मास्तराना हे अजीबात पटेना. पण ते माझ्या बुद्धीमत्तेवर बहुतेक खुश असावेत कारण ते त्या नन्तर बराच वेळ आनन्दाने घाम पुसत होते.
गुढीपाडव्याचे प्रश्न मी त्याना विचारायचा प्रश्नच आला नाही. त्यांनी त्या नन्तर लगेचच दुसर्‍या वर्गावर बदली मागून घेतली.
माझ्या शंकांमुळे अधून मधून मला आचरट हे विषेषण लागायचे. विषेशतः आई आणि बाबांकडून
फुटबॉल मध्ये गोल पोस्ट चा आकार चौकोनी असतो तरीही त्याला गोल का म्हणतात?
नर्सच्या नवर्‍याला नरसोबा म्हणतात का?
सूर्य समुद्रात बुडल्यावर पाणी गरम का होत नाही?
क्रिकेट मध्ये विकेट कीपर हा संधी मिळताच विकेट का उडवतो ?
फास्ट बॉलर नेहमी बॉल तिथेच का घासतो?
काय चूक आहे हो या प्रश्नात?
असो...ते प्रश्न काही एवढे गंभीर रूप धारण करून परत आले नाहीत. मोठा माणसांचे हे एक बरे असते. त्याना उत्तर येत नसले की " बैस खाली" असे एकदम तुसड्या आवाजात ओरडायचे किंवा आचरट पणा पुरे " असे खास दम देण्यासाठीच्या राखीव आवाजात म्हणायचे
गुढी पाडव्याचा तो प्रश्न मात्र माझे पुढचे सगळे प्रश्न कायमचे बंद करून गेला.
गुढी पाडव्याला काठीवर साडी गुंडाळुन त्यावर लोटी का बांधतात?
यात आचरटपणा तो काय झाला?

प्रतिक्रिया

अडाणि's picture

5 Aug 2009 - 3:40 am | अडाणि

आचरट्पणा करू नका... खाली बसा....

लेख मस्त ! तुमच्या प्रश्नांची उत्तरे -
गुढी पाडव्याला काठीवर साडी गुंडाळुन त्यावर लोटी का बांधतात?
१. काठी ह्या साठी कि तोरण उंच व्हावे म्हणून
२. साडी - वस्त्र म्हणून. काही ठिकाणी धोतर बांधतात साडी ऐवजी.
३. लोटी नाही हो.. तो कलश असतो. आज काल सर्वांना कलशाची चैन परवडत नाही म्हणून लोटी, फुलपात्र , वाटी वैगेरे वापरतात...

-
अफाट जगातील एक अडाणि.

पाषाणभेद's picture

5 Aug 2009 - 3:49 am | पाषाणभेद

आस काय नाय विजुभौ. आपली शेंन्का एकदम रास्त हाय.
आदी आमाला वाटल की तुम्ही प्रभूसरांच्याच लेकाची विडंबना क्येली का काय?

आवो हे खाल्ले फोटू पाहा. आव त्या फोटूतल्या परत्येक झेंड्याच्या वर पितळी लोटी दिसतीया नव्ह.

zenda vandan 1
(झेंन्डा वंदन करा १)

Zenda Vandan2
(झेंन्डा वंदन करा २)

Zenda vandan 3
(हा आमचा दाखवायचा फटू हाय. फटूतले झेंडे गौन हाय. आवल्डा का हा फटू ? )

आव झेंडा हवेमधी उडुन जावू ने म्हुन आस करत्यात. आता आपल्या कड पाडव्याची गुढी ही घरच्याघरी करत्यात म्हुन घरचीच लोटी तांब्या वापरत्यात. आन त्येला साडीच पायजे आस काय नाय. कोतत्येबी चांगले कापड चालत्ये त्याला. हां बाकी हारकडं घातल पायजे तिला.

ल्येक पारच चुरचूरीत झाला पघा. आटवडे बाजारातली भेळीसारका झाला जनू, आन हो,
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

विनायक प्रभू's picture

5 Aug 2009 - 9:55 am | विनायक प्रभू

मला माहीत आहे पण सांगता येणार नाही हो विजुभौ तुमच्या शंकेचे उत्तर

अवलिया's picture

5 Aug 2009 - 9:58 am | अवलिया

हल्ली ब्रँड बदलला आहे का?

पक्या's picture

6 Aug 2009 - 2:36 am | पक्या

लेख छान झालाय. पण गुढी पाडव्यालाच टाकला असता तर वाचायला अजून मजा आली असती.
च्यायला चा किस्सा एकदम भारी.

रामपुरी's picture

7 Aug 2009 - 3:49 am | रामपुरी

हा "च्यायला" चा किस्सा राजा गोसावी आणि रंजनाच्या कुठल्या चित्रपटातला आहे कुणाला आठवतंय का? त्याची गोष्ट आठवत आहे पण नाव विसरलो.