पुरोगामी/लिबरल म्हणजे तरी काय?

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in काथ्याकूट
8 Jul 2009 - 9:19 pm
गाभा: 

(दोन दिवसांच्या अ‍ॅब्स्टेन्शननंतर पुन्हा - नवीन नावाने - प्रवेश)

सध्या मिपावर विविध धाग्यांच्या निमित्ताने 'पुरोगामी असणे' हा विषय चर्चिला जात आहे. पुरोगामी लोकांनी व्यक्त केलेल्या मतांबाबत काही सदस्यांच्या भावना तीव्र होऊन त्यांनी त्यांचा धिक्कार करणार्‍या सह्या निर्माण केल्या. ज्यांनी या सह्या आपल्या प्रतिसादात वापरल्या ते प्रतिगामी आहेत का? तर नाही त्यांच्यातल्याच अनेकांनी 'स्त्रियांचे कपडे' टाइप अनेक धाग्यांवर पुरोगामी म्हणता येतील अशा स्वरूपाची मते व्यक्त केली आहेत. त्यामुळे माझ्या मनात जे वैचारिक मंथन झाले त्याचे हे प्रकटन आहे. (मंथनाचे थोडे कारण 'माझी मते अशी का?' याबाबत अन्य सदस्याकडून झालेली विचारणा हेही होते)

पुरोगामी म्हणजे काळानुरूप पुढे जाणारी विचारसरणी अशी ढोबळ व्याख्या केली तरी काळानुरूप पुढे* अशी निश्चित दिशा विचारसरणीला असते का? म्हणजे २५ वर्षामागे अशी विचारसरणी समाजात होती. सध्या अशी आहे म्हणजे आणखी २५ वर्षांनी अशी असणार असे सांगता येते का? तर तसे काही नसते. मग पुरोगामी (पुढे जाणारी) विचारसरणी कशाला म्हणतात/म्हणावे?

जनरलाइज्ड बोलायचे तर आधुनिक ज्ञान उपलब्ध होण्यापूर्वीच्या निकषांवर आधारलेले मत (समाजनियम) योग्य आहे की अयोग्य आहे याचा पुनर्विचार करून लिबरल निकषांवर अजूनही योग्यच असलेले मत स्वीकारणे अयोग्य असलेले मत/ नियम धिक्कारणे. समजा मला ब्राह्मणांनी मांसाहार करायला हरकत नाही असे सांगायचे आहे तर मी म्हणतो, 'मनुस्मृतीत ब्राह्मणांनी मांस खाल्लेच पाहिजे/खायला हरकत नाही असे अमुक तमुक श्लोकात लिहिले आहे.' असे सांगणे हे जुनाट विचारसरणीचे म्हणता येईल कारण जस्टिफिकेशन म्हणून मी जुन्या ग्रंथाचा आधार देत आहे. मांसाहार करण्याने काही जीवशास्त्रीय नुकसान होत नाही असे अभ्यासांती आढळले आहे म्हणून मांसाहार चालेल असे सांगत नाही.

मी वर लिबरल निकष हा आणखी एक शब्द वापरला आहे. लिबरल म्हणजे तरी काय. माझ्यापुरती याची व्याख्या सर्वांना मनःपूत वागण्याची समान मुभा इथून सुरुवात करून समाज हा समाज म्हणून अस्तित्वात रहावा इतपतच बंधने प्रत्येकाच्या वागणुकीवर आणावीत अशी विचारसरणी.

मी लिबरल/पुरोगामी विचारसरणीचा आहे याचा अर्थ या 'फर्स्ट प्रिन्सिपल' पासून सुरुवात करून प्रत्येक नियमाचा विचार करतो. एखादा नियम करताना तो समाज अस्तित्वात रहावा यासाठी अत्यावश्यक आहे का हा प्रश्न सर्वात आधी विचारतो. आणि तो नियम नसता काही लोक जे वागतात ते इतरांना त्रासदायक असते काय? घातले जाणारे कुंपण जितके मोठे ठेवता येईल तितके ठेवणे हा माझ्या विचारसरणीचा उद्देश असतो.

हे झाले नव्याने केल्या जाणार्‍या नियमाबाबत. पण आपण आज नव्याने समाज उभारत नाही आहोत. समाज आधीच अस्तित्वात आहे. आणि कुंपणे भरपूर प्रमाणात घालून झालेली आहेत. तेव्हा शक्य तेथे/आवश्यक तेथे ढुशा मारून कुंपण मोठे करण्याचा प्रयत्न ही देखील माझी पुरोगामित्वाची व्याख्या. प्राथमिक निकष पुन्हा तोच. समाज धोक्यात येईल का?

आता मी अस्तित्वात असलेल्या प्रत्येक नियमाविषयी असा विचार करतो का? तर नाही जेव्हा एखादा नियम चर्चेत येतो तेव्हाच मी असा विचार करून माझे मत ठरवतो. समलैंगिकतेचा प्रश्न असाच अचानक समोर आला. त्यावर माझे काहीही मत नव्हते. तो समोर आल्यावर (एका सदस्याकडून खरडीतून विचारणा झाल्यावर) मी त्याच्यावर वरील निकषानुसार विचार केला. आणि समलैंगिक असण्याने समाजाचे अस्तित्व धोक्यात येत नसल्याने त्यावर असलेले कायद्याचे बंधन जाणे योग्य अशा निष्कर्षाप्रत मी आलो.

'त्या' सहीत लिहिलेले समलैंगिकांचे उदात्तीकरण हा भाग तत्कालिक रागात लिहिला गेला असावा असे वाटते. कारण 'यापुढे समलैंगिक होणे हे प्रत्येकाचे ध्येय असायला हवे' असे लिबरल लोकांचे म्हणणे नव्हते.

पुन्हा समाज धोक्यात येणे याची व्याख्या निश्चित नाही. माझी व्याख्या फार मोकळी आहे. समाज करून राहण्याने माणसाचे जीवन एकटे राहण्यापेक्षा सुखी होते. तेवढ्याच प्रमाणात समाज अस्तित्वात राहिला तरी पुरे अशी माझी व्याख्या.

हे माझे मुक्त चिंतन आहे. मिपाच्या सदस्यांच्या प्रतिसादांतून त्यांच्या मतांच्या आधारे याच्या पुढची चर्चा करण्याचा प्रस्ताव.

----------------
*कॉस्मॉलॉजी (विश्वरचनाशास्त्र?) या भौतिक शास्त्राच्या शाखेत 'अ‍ॅरो ऑफ टाईम' अशी संकल्पना आहे. म्हणजे काळाला एक निश्चित अशी आधी-नंतर फरक असलेली दिशा असते. दोन स्थितींमध्ये विशिष्ट स्थिती दुसर्‍या स्थितीच्या आधीची असे नक्की म्हणता येते (लहानपण आधी - वार्धक्य नंतर). आणि ही आधी-नंतर ची रिलेशनशिप नेहमीच तशी असते. ती (आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वात) कधीही उलट होत नाही.

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

8 Jul 2009 - 9:23 pm | ऋषिकेश

विचारांची सुरेख मांडणी.. पुरोगामित्त्वाच्या व्याख्येचे कुंपण पटले :)

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

लिखाळ's picture

8 Jul 2009 - 9:36 pm | लिखाळ

पुनर्विचार करून लिबरल निकषांवर अजूनही योग्यच असलेले मत स्वीकारणे अयोग्य असलेले मत/ नियम धिक्कारणे.

समाज करून राहण्याने माणसाचे जीवन एकटे राहण्यापेक्षा सुखी होते. तेवढ्याच प्रमाणात समाज अस्तित्वात राहिला तरी पुरे अशी माझी व्याख्या.

आपले मत चांगलेच आहे. दुसरे मत सुद्धा विचार करण्यासारखे.
मला या प्रसंगी दोन उदाहरणे आठवतात. रामशास्त्री चित्रपटामध्ये प्रसंग आहे की पेशव्यांचा एक सैनिक एका बटकीशी विवाह करतो. तो तीला विक्रीच्या ठिकाणाहून घेऊन जाऊन विवाह करतो. बटकीला पळवले या गुन्ह्यासाठी त्याला हात तोडण्याची शिक्षा होते. त्या प्रसंगी रामशात्री तेथे येऊन पेशव्यांना म्हणतात की माणसाची विक्री होणे हेच मुळात चुकीचे आहे. त्यापुढे जे घडले ते पहिल्या चिकीच्या प्रथेवर रचले गेले. त्यामुळे विवाहित सेवकास सोडून द्यावे आणि माणसांची विक्री सुद्धा थांबवावी. पेशवे या नव्या विचाराचे स्वागत करतात. इत्यादी. यामध्ये चालू परिस्थितीमध्ये विवेकी असणे आणि त्या प्रमाणे वागणूक करणारे रामशास्त्री आणि माधवराव दोघेही मला पुरोगामी वाटतात. म्हणजेच. समाजाची आजची मते काही असली तरी स्वतंत्र बुद्धीने-विवेकाने वागणारे लोक नवे पायंडे पाडतात. तेच पुरोगामित्व. असे मी म्हणेन.
दुसरा एक प्रसंग. एका मित्राचे आजोबा देवळात पोथी सांगणारे एकदम धार्मिक विचारांचे. त्यांच्या खेड्यातून अधी कधी बाहेर न पडलेले. ते एकदा बरेच वय झालेले असताना शहरात कुणाकडे गेले असता देहदानासंबंधी ऐकतात. आणि ताबडतोब देहनासाठी फॉर्म भरतात. आता जगातल्या घडामोडींचा फारसा गंध नसलेल्या वृद्ध माणसाकडून झालेले हे वर्तन मला अतिशय भावले. समाजाबद्दलची अशी समज, जीवनाबद्दलचा काही विशिष्ट हेतू माहित असणे हेच अंगभूत पुरोगामित्वाचे लक्षण मला वाटले.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

विजुभाऊ's picture

9 Jul 2009 - 9:21 am | विजुभाऊ

मी ऐकले तेच खरे बाकी सर्व मिथ्य. माझ्या मनावर असलेल्या संस्काराना पटते तेच सत्य बाकी मिथ्य ही अट पाळून जगणारे आणि मी ऐकले पाहिले त्या पेक्षा वेगळेही काही असू शकते. हे मानणारे यांच्यातच नेहमी वाद होत असतात. बुद्धीप्रामाण्यवादीही बरेचदा या बाबतीएत हट्टी असतात. ते म्हणतात क्त्त बुद्धी ला पटेल तेच खरे. पण मानवी बुद्धीला तसेच कल्पना शक्तीला मर्यादा असतात. या मर्यादा असतात त्या अनुभवाच्या/ महितीच्या.
बाप दाखव नाहीत्वर श्राद्ध कर या उक्तीनुसार बुद्धीप्रामाण्यवादी वागत असतात. ते निस्चीतच पुरोगामी नाहीत. याला अंनीस चे कार्यकर्तेही अपवाद नाहीत
एखाद्या पंथाला बान्धुन घेतल्यावर त्या पन्थाच्या चौकटीक न बसणार्‍या अनेक गोष्टी असू शकतात. उदा: रीमोटकन्ट्रोल वर एखादे विमान चालू शकते याचे तान्त्रीक ज्ञान नसणार्‍या वा तसे असु शकते हे माहीत नसणार्‍या अंनीस च्या कार्यकर्त्याला मानवाशिवाय विमान उडते हा कल्पनाविलास वाटू शकतो. विज्ञानानेही बर्‍याच अंधश्रद्धा जोपासल्या आहेत.
एखादी नवी कल्पना असु शकते. त्या कल्पनेच्या आस्तित्वाला वाव द्यावा. त्या कल्पनेचा उपयोग समाजौपयोगी होउ शकतो याचा सारासार विचार करणे आणि त्या कल्पनेला समाजात सामावून घेणे हा माझ्या मते पुरोगामी पणा असु शकतो.
शंबूकाच्या कानात वितळते शिसे ओतणारा रांम काय आणि सावित्री बाई फुल्याना दगड मारणारे /त्यांच्या अंगावर शेण फेकणारे हे काही फार वेगळे नव्हते. तेही धर्माच्या/ सामाजीक असमतेच्या वैचारीक जोखडाखालून बाहेर न येऊ शकणारे अभागी जीव होते.
त्यानी विरोध केला कारण त्याना सामाजीक महत्व अबाधीत ठेवायचे होते.
इन्द्राची पूजा न करता तुम्हाला जो डोंगर अन्न पाणी देतो जो तुमच्या गाईगुरांचा सांभाळ करतो त्या डोंगराला महत्व द्या हे सांगणारा कृष्ण मला पुरोगामी वाटतो.
पुत्र पालथा जन्मला पादशाही पालथी घालेल म्हणणारे शिवछत्रपती मला पुरोगामी विचारांचे वाटतात
मनाचा थोडा मोकळेपणा . नव्या विचारांबाबत थोडी लार्जर अ‍ॅक्सेप्टिबिलिटी दाखवणे आणि अनलर्निंग या गोष्टी पुरोगामी असण्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे

श्रावण मोडक's picture

8 Jul 2009 - 10:40 pm | श्रावण मोडक

पुरोगामी, उदारमतवादी वगैरे चौकटी आहेत. चौकटी असल्याने त्यांना एक मर्यादा आपसूकच येते. त्यामुळं ही चौकट मानण्यापेक्षा या चौकटींमध्ये असणाऱ्या तत्त्वांचा विचार करणे अधिक उचित.
एक परिस्थिती : पुरोगामीपणाच्या चौकटीत असणाऱ्या तत्त्वांपैकी काहीना माझी सहमती नसेल. अशावेळी मग मी प्रतिगामी ठरतो का? तसे घडू नये. कारण अशा वेळांपैकी अनेक वेळेस मी पुरोगामी या चौकटीतील त्या विशिष्ट तत्त्वाबाबत त्या चौकटीचाही विस्तार करू पहात असेन. किंवा, नव्या संदर्भात ते तत्त्वदेखील कालबाह्य झालेले असेल. अशावेळी मी पुरोगामी नाही किंवा प्रतीगामी आहे असे ठरते का?
माझ्या मते नाही.
उदाहरणार्थ संस्कार या धाग्यावर मी म्हटले होते की, "एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो." मी एखाद्याची श्रद्धा असणे मान्य करतो म्हणून मी अंधश्रद्धावाद्यांच्या गटात जातो का? माझ्या मते अशा कृष्ण-धवल पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात. कारण, जगणे तसे नसते. जगणे इतके कॉम्प्लेक्स - व्यामिश्र आहे की, तेथे ही कृष्ण-धवल छापाची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न मूर्खपणाचा असतो. असे कृष्ण-धवल करावयाचे ठरवले तर माणसा-माणसातील संबंधांचे स्वरूपच बदलून जाईल. नाती वगैरे भंपकपणा ठरेल.
समलिंगी कल हे वैज्ञानिक किंवा नैसर्गिक आहे असे मी मानतो म्हणून मी पुरोगामी ठरतो? समजा समलिंगी कल हे वास्तव स्वीकारतानाच मी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली जे होते त्याचे समर्थन करीत असेन तर मी काय ठरतो? असाही एक माणूस आहे माझ्या पाहण्यात. म्हणजे तो स्वतः समलिंगी कलाचा आहे, समलिंगी माणसांचे हक्क वगैरे मांडू शकणारा आहे, त्याचवेळी सार्वजनिक गणेशमंडळ चालवतो आणि त्यात जे "इतर" घडते ते सारे करतो. त्याला काय म्हणायचे? पुरोगामी? उदारमतवादी?
या चौकटी माणसानेच बसवलेल्या आहेत. काही वेगवेगळ्या तत्त्वांच्या एकत्र बांधणीला दिलेले ते नाव आहे. त्या तत्त्वांची ही मोट असते. वरकरणी ते प्रत्येक तत्त्व एकमेकाशी सुसंगत वाटते. त्याचे तसेच पालन करावयाचे ठरवले तर वर म्हटल्याप्रमाणे नाती वगैरेही भंपक ठरेल. तेव्हा या चौकटींना मी महत्त्वच देत नाही. त्यापेक्षा त्या चौकटींच्या आत काय बसवले आहे माणसाने ते महत्त्वाचे. आत जे आहे त्यांची ओळख या वरच्या लेबलांवरून होत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jul 2009 - 9:24 am | प्रकाश घाटपांडे

मी एखाद्याची श्रद्धा असणे मान्य करतो म्हणून मी अंधश्रद्धावाद्यांच्या गटात जातो का? माझ्या मते अशा कृष्ण-धवल पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात. कारण, जगणे तसे नसते. जगणे इतके कॉम्प्लेक्स - व्यामिश्र आहे की, तेथे ही कृष्ण-धवल छापाची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न मूर्खपणाचा असतो. असे कृष्ण-धवल करावयाचे ठरवले तर माणसा-माणसातील संबंधांचे स्वरूपच बदलून जाईल. नाती वगैरे भंपकपणा ठरेल.

हे बाकी बेष्ट या कृष्णधवल विचारातुन निर्माण झालेल्या ज्योतिष विषया बाबत ज्योतिषाच्या पाउलखुणा या लेखात आम्ही वरील विचारांचा आधार घेतला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

रेझर रेमॉन's picture

8 Jul 2009 - 11:50 pm | रेझर रेमॉन

नितिन,
फार छान आणि स्पष्ट अर्थ पोहोचवणारे लिखाण... सुंदर..
लिखाळांची उदाहरणे ... नेमकी.
मोडक साहेब थोडे कळायला जड झाले... काय म्हणतात ते "व्यामिश्र" झाले, बघा बुवा.

पुरोगामी हे काल सापेक्ष विशेषण आहे. कालचा पुरोगामी आज पुरोगामी हे विशेषण लावू शकेलच असे नाही. एखाद्या वेळेस तो आजच्या पुरोगाम्यांना प्रतिगामी वाटू शकतो.
अर्थात प्रतिगामी याला काही विशिष्ठ अर्थ असला तर... कारण जे पुरोगामी मतांशी सहमत नाहीत ते प्रतिगामी असा अर्थ सोयिस्कर पणे काढला जातो. याही पुढे जाऊन पाहिल्यास उद्याचा पुरोगामी काल आणि आजच्या पुरोगाम्यांना त्यांच्या पुरोगामी मतांसहीत ही पटत नाही, असे देखील होते. या दृष्टीने प्रतिगामी या विशेषणासाठी नेमकी पोजच राहत नसल्याने जे पुरोगाम्यांना विरोध करतात ते.. अशी व्याख्या करावी लागते... हे पाहता या या विशेषणाला नेमकेपणा नसल्याने या किंवा कोणत्याही समाजातला कोणी ही स्वतःला प्रतिगामी म्हणवून घेणार नाही... सो लीव इट टू दॅट...
पुरोगामी म्हणवून घेणारे किती आहेत? ते कितीसे पुरोगामी आहेत? हे चार्ट केल्यास चांगलेच मनोरंजक होईल.
सहज इथे चर्चेत आला म्हणून समलैंगिकतेचा मुद्दा.. हा इथे चर्चेत थर्ड पर्सन मध्ये आहे असे समजून विचार केला तर मी त्याला विरोध का कारावा? त्याचे अस्तित्व मला का मान्य नसावे? आणि असे अमान्य करताना मी त्या मानसिकतेचे सायको अ‍ॅनालिटिकल विश्लेषण करतोय किंवा समजून घ्यायचा प्रयत्न करतोय का? ज्याच्याशी माझा संबंध नाही असा हा मुद्दा कोणासाठी तरी मोठा मानसिक प्रश्न असू शकतो, त्याच्या/तिच्या अस्तित्वाचा प्रश्न असू शकतो. मी केवळ विरोधासाठी विरोध करतोय का? याचा विचार अस्वस्थ झालेल्यांनी जरूर करावा... दरवेळी आमचा धर्म बुडाला, संस्कृतिचं कसं होणार किंवा आमच्या बायका- मुलांना या समाजात रहायचंय असली कारणं पुढे करणं योग्य आहे का?
आपल्याला मान्य असो-नसो... जे नैसर्गिक आहे ते नाहीच.. नसावंच असं वाटायला लागणं.. त्यावर बंदी असावी आणि ती सरकार नावाच्या बलवानाने दंडुक्याच्या आधाराने कुण्या तिसर्‍यावर राबवावी असं वाटणं आणि तरी आपल्याला कोणी प्रतिगामी हे फारसा अर्थ नसलेले विशेषण लावू नये असं वाटणं... कसं शक्य आहे?
मुद्दा तो नाही.. पुरे. पुरोगामी या शब्दाशी जवळीक साधून विचारसरणी फार काळ उजवी राहू शकत नाही... एक साधा प्रश्न... तुम्हाला जात आहे आणि समाजात काही जातिने कनिष्ठ असे घटक आहेत हे आपल्याला मान्य आहे का? असा प्रश्न... याचं उत्तर प्रत्येक जण नाही असे इथे देईल... पण.... देअर रीमेन द ट्रॅप चिको...
- रेझर

अभिज्ञ's picture

9 Jul 2009 - 12:21 am | अभिज्ञ

पुरोगामी म्हणजे नक्की काय हा प्रश्न मलाहि पडलेलाच आहे.
श्रावण मोडक म्हणतात ते बहुतांशी पटले. परंतु मला वाटत हा नुसताच काल सापेक्ष नसून (रेझर रेमॉन म्हणतात त्या प्रमाणे ) व्यक्ती सापेक्ष देखील असावा. शेवटी पुरोगामीत्वाला "कुठे थांबावे" ह्याचे बंधन असावे, प्रतिगामीत्वात बहुधा त्याला काही मर्यादा नसावी. हवे तेवढे मागे जाता येते.
समलिंगी संबंध ह्या विषयावरून हा चर्चेचा धागा निघाला. त्यापुर्वी धनंजय ह्यांचाही ह्या विषयावर एक धागा आला होता.

समलिंगी संबंध ह्यांना मिळालेली मान्यता ही योग्य आहे हे काहि लोकांना पटलेले आहे. काहि लोक हे धर्म/समाज /संस्कृती ह्यावर आक्रमण मानत असतील्.ढोबळ मानाने समाजातील बहुतांश लोक ह्याला अनैसर्गिक संबंध मानतात वा मानत आलेले आहेत. त्यासापेक्ष जी लोक ह्या संबंधांना मान्यता देतात तीच मंडळी पुरोगामी म्हणवतात.

या पुढे जाउन,
ज्या सेक्शन ३७७ चा दाखला मागच्या ब-याच चर्चांमधे मिळाला त्यानुसार
"एखाद्या व्यक्तीने प्राण्यांशी संबंध ठेवणे हे अनैसर्गिक असून तो दखलपात्र गुन्हा आहे"

ह्या आधीच्या चर्चा पाहता लैंगिक ता ही खाजगी बाब असून प्रत्येकाला त्याच्या इंन्स्टिंक्ट प्रमाणे वागण्याचा हक्क मिळावा असा वर म्हंटल्याप्रमाणे "पुरोगामि" मंडळिंचा एकंदर अप्रोच होता.
समजा समलिंगी संबंध ह्यांच्य ऐवजी "प्राण्याशी स॑बंध" अशी केस आली असती तर ह्यातले किती पुरोगामी प्रतिगामी झाले असते? हे वाचायला आवडेल.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

Nile's picture

9 Jul 2009 - 12:30 am | Nile

अहो साहेब!
दोन सज्ञान व्यक्तीं मधील परस्पर संमतीने असेलेला संबध म्हणजे काय हे तुम्हाला स्पष्ट झालेले नाही असे दिसते. प्राण्याची संमती कशी घेणार?
अ‍ॅपल्स अँड ऑरेंज्स!

अभिज्ञ's picture

9 Jul 2009 - 12:41 am | अभिज्ञ

~X(
मालक आधी हे वाचा ना,
ज्या सेक्शन ३७७ चा दाखला मागच्या ब-याच चर्चांमधे मिळाला त्यानुसार
"एखाद्या व्यक्तीने प्राण्यांशी संबंध ठेवणे हे अनैसर्गिक असून तो दखलपात्र गुन्हा आहे"

ह्या आधीच्या चर्चा पाहता लैंगिक ता ही खाजगी बाब असून प्रत्येकाला त्याच्या इंन्स्टिंक्ट प्रमाणे वागण्याचा हक्क मिळावा असा वर म्हंटल्याप्रमाणे "पुरोगामि" मंडळिंचा एकंदर अप्रोच होता.

इथे मी संमतीचा विषयच काढलेला नाहीये.
बाकि तुम्ही देखील आमच्या सारखे प्रतिगामीच दिसताय.;)

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

Nile's picture

9 Jul 2009 - 12:48 am | Nile

मुळात पुरोगामी आणि प्रतिगामी या शब्दांच्या व्याख्या गमतीशीरच दिसतात!

मी स्वतः ला पुरोगामी समजतो आणि माझे उत्तर वरील प्रमाणे आहे. प्रस्तुत कायद्याला माझा विरोध अजिबात नाही.

तुमच्या वरील प्रतिसादात 'यावर पुरोगामी काय म्हणतील' असा प्रश्न होता म्हणुन मी माझे उत्तर दिले. इतरांचे उत्तर वेगळे असु शकेल.तुम्ही सर्व (स्वतःला) पुरोगामी (म्हणवणार्‍या) लोकांना एकाच पारड्यात ठेवल्या सारखे होत आहे असे तुम्हाला वाटत नाही का?

पक्या's picture

9 Jul 2009 - 2:43 am | पक्या

>>ह्या आधीच्या चर्चा पाहता लैंगिक ता ही खाजगी बाब असून प्रत्येकाला त्याच्या इंन्स्टिंक्ट प्रमाणे वागण्याचा हक्क मिळावा असा वर म्हंटल्याप्रमाणे "पुरोगामि" मंडळिंचा एकंदर अप्रोच होता.

अभिज्ञ साहेब, तुमचा काहितरी गोंधळ होत आहे. तुमच्या वरच्या वाक्यातील 'प्रत्येक ' जण म्हणजे मानव (ह्युमन) .
प्राणी - जनावरे नव्हेत. आधीची चर्चा माणसांच्याच लैगिक व्यवहाराबद्द्ल झालेली होती (भिन्नलिंगी/समलिंगी)
त्यामुळे तुम्ही वर उल्लेख केलेली दोन्ही वाक्ये आपापल्या जागी योग्य आहेत.
मानव प्राणी संबंधात प्राण्याची संमती घेता येणार नाही म्हणून ते अनैसर्गिक कॄत्य.
'लैंगिक ता ही खाजगी बाब असून प्रत्येकाला त्याच्या इंन्स्टिंक्ट प्रमाणे वागण्याचा हक्क मिळावा' हे दोन मानव जोडीदारांच्या संदर्भात योग्य आहे प्राण्यांच्या नव्हे.

हुप्प्या's picture

9 Jul 2009 - 12:36 am | हुप्प्या

ड्रग्ज घेणे, बाळगणे, विकणे हे बेकायदा का असावे? ड्रग्ज घातक आहेत पण एखाद्याला आपल्या पैशाने ते सेवन करायचे असतील तर त्याला कायद्याची आडकाठी का? पुरोगामी विचाराने बघितले तर त्याला स्वातंत्र्य हवे. अर्थात ड्रग्जच्या नशेत काही गैरवर्तन केले, जसे वाहन चालवले आणि अपघात केला, तर कठोर शिक्षा जरुर असावी. पण आपल्या घराच्या आत अमली पदार्थ सेवन केले तर ते बेकायदा का?

वेश्या व्यवसायः वय, संमती ही सगळी बंधने पाळून कुणी स्त्री वा पुरुष पैशाकरता शरीरविक्रय करत असेल तर त्याला बंदी का असावी?

लग्न हे केवळ एक स्त्री व एक पुरुष यांच्यातच का? पुरोगामी विचार केला तर कितीही पुरुष व कितीही स्त्रिया लग्न करुन विवाहित गट म्हणून राहू शकल्या पाहिजेत. जर सर्व मंडळी प्रगल्भ असतील तर समाजाने कायद्याची आडकाठी का करावी?
जवळच्या नात्यातील लोकांना विवाहित होता येत नाही. पुन्हा तोच प्रश्न पुरोगामी विचार केला तर हे बंधन तरी का असावे? प्रगल्भ लोकांना ठरवू द्या की काय योग्य व काय नाही ते.
कमीत कमी बंधने/कुंपणे अशी पुरोगामीत्वाची व्याख्या असेल तर वर उल्लेखलेली कुंपणे तोडावीत अशी पुरोगामीत्ववाद्यांची इच्छा आहे का?

एके काळी कम्युनिझम, साम्यवाद हा पुरोगामी विचार समजला जात असे. ७०-८० वर्षे प्रयोग झाल्यानंतर, लाखो निष्पाप लोकांची कत्तल झाल्यानंतर, अनेक पिढ्या उध्वस्त झाल्यावर असे लक्षात आले की ह्या पद्धतीत काही दम नाही आणि ह्या विचारसारणीला जवळजवळ सगळ्या जगाने तिलांजली दिली.
केवळ पुरोगामीपणाच्या नावाखाली जे आहे ते मोडून दुसरे काही तरी अट्टाहासाने बनवणे आणि शेवटी दोन्ही गोष्टींचा नाश करणे हेही चूकच. कधी कधी प्रस्थापित गोष्टी ह्या काळाच्या कसोटीवर उतरल्यामुळे टिकून असतात हे विसरता कामा नये.

अभिज्ञ's picture

9 Jul 2009 - 12:44 am | अभिज्ञ

प्रचंड टाळ्या.
वाक्या वाक्या शी सहमत.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

ऋषिकेश's picture

9 Jul 2009 - 1:21 am | ऋषिकेश

मुळात वरील उदाहरणे आणि पुरोगामित्त्वाचा बादनारायण संबंध जोडल्यासारखा वाटला.

ड्रग्ज घेणे, बाळगणे, विकणे हे बेकायदा का असावे?... ... ... ... पण आपल्या घराच्या आत अमली पदार्थ सेवन केले तर ते बेकायदा का?

कारण ड्रग्ज घेतल्यानंतर माणसाचा स्वतःवर ताबा रहात नाहि. अश्या परिस्थीतीत त्याच्या हातून सार्वजनिक मालमत्तेचे / इतरांच्या वैयक्तीक मालमत्तेचे नुकसान / हानी होऊ शकते. केवळ ती टाळण्यासाठी म्हणून असा कायदा गरजेचा ठरतो. असे काहि घडल्यावर त्यास शिक्षा ठोठावण्यापेक्षा (भारतीय) कायद्याने अशी प्रिकॉशन घेतली आहे. प्रत्येक देशांत अर्थातच कायदा वेगळा आहे.

वैश्याव्यवसाय....

याबाबत आपला प्रश्न बरोबरच आहे. याबाबतीत प्रतिगामीत्व आणि पुरोगामित्त्व हे व्यक्ती+समाजसापेक्ष आहे. उद्या सरकारने वैश्याव्यवसाय कायद्याने मंजूर केला तर तो (माझ्यामते) पुरोगामी बदल असेल

लग्न हे केवळ एक स्त्री व एक पुरुष यांच्यातच का?

ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक समाजात वेगळे आहे. अजूनही असे समाज आहेत त्यांच्यात बहुपतीत्त्व-पत्नीत्त्व आहे. याचा अर्थ ते प्रतिगामी/पुरोगामि आहेत असा होत नाहि.. तर ती एक जीवनपद्धती आहे. शिवाय यातही (लग्नसंस्थेतही) काही मंडळी लीव-इन रिलेशन्स, कम्युनिटी मॅरेजेस (आपण कल्पना मांडली आहे त्याप्रमाणे एक गट एकमेकांशी लग्न करून आहे) वगैरे आहेच की आणि काहि देशांत ते कायद्याने मान्य देखील आहे.

कधी कधी प्रस्थापित गोष्टी ह्या काळाच्या कसोटीवर उतरल्यामुळे टिकून असतात हे विसरता कामा नये.

"कधी कधी" हा शब्द तुम्हीच वापरला हे बरे झाले ;)

बाकी साम्यवाद हा पुरोगामिच होता.. आधीच्या राजेशाही, सरंजामशाही, विस्तारवाद या जाचक कुंपणाला भेदून तो आला होता.

एखाद्या गोष्टीलाच पकडून न रहाणे व काळाप्रमाणे बदलणे, किंबहूना काळाची पावले ओळखून आपले पाऊल काळाच्या आधी टाकण्याचे धाडस दाखविणे हेच
पुरोगामित्त्व नाहि का?

माझ्यामते पुरोगामित्त्व म्हणजे एक व्याख्या नसून एक स्वभाव आहे. ती एक चाकोरीबाह्य विचारसरणी आहे. ती कुंपणापलीकडे डोकावून बघण्याची वृत्ती आहे.. नवे शिकण्याची - जाणण्याची - स्वतःत बदल घडविण्याची धडपड आहे.

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

पक्या's picture

9 Jul 2009 - 2:46 am | पक्या

>>एखाद्या गोष्टीलाच पकडून न रहाणे व काळाप्रमाणे बदलणे, किंबहूना काळाची पावले ओळखून आपले पाऊल काळाच्या आधी टाकण्याचे धाडस दाखविणे हेच पुरोगामित्त्व नाहि का?

>>माझ्यामते पुरोगामित्त्व म्हणजे एक व्याख्या नसून एक स्वभाव आहे. ती एक चाकोरीबाह्य विचारसरणी आहे. ती कुंपणापलीकडे डोकावून बघण्याची वृत्ती आहे.. नवे शिकण्याची - जाणण्याची - स्वतःत बदल घडविण्याची धडपड आहे.

एकदम बरोबर बोललात, ऋषिकेश. सही उत्तर , पटले.

हुप्प्या's picture

13 Jul 2009 - 4:23 am | हुप्प्या

ड्रग्ज घेतल्याने मालमत्तेचे नुकसान होणारच हे गृहित धरणे साफ चूक आहे. सरकारला तसे करण्याचा अधिकार नसतो. कोण किती ड्रग घेणार आहे आणि त्यातून कोण किती विध्वंसक कृत्ये करणार आहे हे ठरवता येत नाही. दारू कुणी किती प्यायल्याने काय दुष्परिणाम होतात वा होतात का ह्यात कितीतरी फरक आहे. कुणाला काही फरक पडत नाही. कुणी शिवीगाळ करतो कुणी खुनशी बनतो. पण म्हणून सरसकट दारूवर बंदी घालत नाही कुणी.
तसे तर दारू पिऊन वाहने हाकणे धोकादायक असते आणि असे लोक हमखास अपघात करतात. मग दारूवर बंदी का नाही आणि ड्रग्ज वर का?
अपघात झाल्यावर डायवर नशेत असला तर कठोर शिक्षेची तरतूद आहे. पण
सरसकट दारूवर बंदी नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jul 2009 - 2:15 am | llपुण्याचे पेशवेll

हुप्प्याशेठशी सहमत आहे.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

शरदिनी's picture

9 Jul 2009 - 2:17 am | शरदिनी

चिंतन आवडले

सहज's picture

9 Jul 2009 - 7:42 am | सहज

मूळ लेख, प्रतिसाद वाचनीय आहेत.

अवलिया's picture

9 Jul 2009 - 9:46 am | अवलिया

हेच बोल्तो !

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

नितिन थत्ते's picture

9 Jul 2009 - 8:31 am | नितिन थत्ते

चर्चेमध्ये दोन विषय उद्भवले आहेत.

बहुपत्त्नित्व/बहुपतित्व
जवळच्या नातेवाइकांत लग्ने

माझी मते अर्थातच बहुपतित्व/बहुपत्नित्व तसेच जवळच्या नातेवाइकांमध्ये लग्ने असू नयेत अशी आहेत.

त्यापैकी जवळच्या नातेवाइकांमधली लग्ने समाज टिकून रहायला (मी वर सांगितलेल्या निकषांपुरता) योग्य नाही हे जीवशास्त्रीय दृष्ट्या सिद्ध (असे मला वाटते. माझ्या पारशी समाजाच्या थोड्याशा निरीक्षणातून तसेच दिसते. आता दुवे मागू नका) आहे. म्हणून ते निषिद्ध. (येथे स्मृतींमध्ये सांगितले म्हणून निषिद्ध नाही).

माझ्या लेखात मी म्हटल्याप्रमाणे आपण समाज नव्याने निर्माण करीत नाही. तो आधीच अस्तित्वात आहे. त्या समाजात स्त्रियांच्या वागण्यावर बंधने तर आहेतच पण शिवाय मालमत्तेचे संक्रमण वगैरे बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत भेदभाव करणारे कायदेही आहेत. त्या कायद्यांच्या चौकटीच्या दृष्टीने पुरुषांवर हे कुंपण नव्याने घालणे आवश्यक. म्हणून बहुपत्नित्वाला बंदी समर्थनीय.

खरे म्हणजे खाजगी मालमत्ता आणि तिचे संक्रमण या संदर्भचौकटीशिवाय लग्न या संस्थेला काही स्थान नाही. त्यामुळे हे मालमत्तेच्या संक्रमणाच्या नियमांचे कुंपण काढून टाकले तर लग्न नावाचेच कुंपण आवश्यक राहणार नाही आणि त्यामुळे एक/बहु हा प्रश्नही उद्भवणार नाही.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

मुक्तसुनीत's picture

9 Jul 2009 - 8:45 am | मुक्तसुनीत

पुरोगामित्त्व आणि प्रतिगामित्त्व या गोष्टी अर्थातच तुलनात्मक आहेत. त्याला अनेक पैलू आहेत. अंगणात पुरोगामी असणारा परसात प्रतिगामी ठरेल. संदर्भचौकट ही महत्त्वाचीच नव्हे तर अनिवार्य ठरते. कालचा सुधारक आज कर्मठ ठरेल. उद्या तो क्रांतिकारी ठरेल. काळ मूल्यमापन करत रहातो.

काही ठोकताळे आहेत. मूल्ये आहेत. सिद्धांत आहेत , ज्यांच्या निकषावर बर्‍याचदा घासून पाहिले जाऊ शकते. अर्थातच यातही त्रिकालाबाधित आणि स्थलकालनिरपेक्ष सदासर्वदा असे काही म्हणणे धाडसाचे. ध्रुवतारा अचल असला तरी सगळी आकाशगंगाच सतत विस्तारणार्‍या विश्वाच्या संदर्भात जिथे फेकली जाते तिकडे ध्रुवतार्‍याची काय कथा ?

मला माहिती असलेले आणि मी ज्यांना अचल ध्रुवतार्‍यांप्रमाणे - किमानपक्षी दीपस्तंभाप्रमाणे मानतो ते काय ? असा जो तो म्हणू शकतो. पण त्याचे स्वरूप प्रयोगात्मक आहे , व्यक्तिसापेक्ष आहे याची जाणीव ठेवणे योग्य.

मला ज्या सिद्धांतानी प्रभावित केले - पर्यायाने ज्या सिद्धांताचे पालन करणारे "त्या पालन करंण्यापुरते" मला पुरोगामी वाटतात - त्यातील आता सुचणारे देऊ शकतो. इतरांनाही तसे करता येईल.

- स्वातंत्र्य समता आणि बंधुता : ही त्रिसूत्री कुठेतरी पाचवीच्या नागरिकशास्त्रात वगैरे शिकलो असेन. माझ्यामते पुरोगामित्त्वाकरता ही त्रिसूत्री एक चांगला आरंभबिंदू आहे.

- "अंधारातून प्रकाशाकडे" , "तमसो मा ज्योतिर्गमय" , याप्रकारची वचने ज्ञानाचे महत्त्व विशद करतात. वर वर्णिलेल्या त्रिसूत्रांचे पालन व्यक्तीने आणि पर्यायाने समष्टीने करायचे तर ज्ञानाला पर्याय नाही.

अशा काही इतरही गोष्टी सांगता येतील. या कशानेच मूलतः तुलनात्मक असणार्‍या पुरोगामित्त्वासारख्या संकल्पनेला पूर्णत्त्व मिळेल असे नाही. पण माझ्यापुरते जे वाटले ते लिहिले.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jul 2009 - 9:55 am | प्रकाश घाटपांडे

आमच्या मते पुरोगामित्व हे स्थल, काल, समाज सापेक्षतेने बदलणारे एक तत्वज्ञान आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jul 2009 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार

सध्या मिपावर विविध धाग्यांच्या निमित्ताने 'पुरोगामी असणे' हा विषय चर्चिला जात आहे. पुरोगामी लोकांनी व्यक्त केलेल्या मतांबाबत काही सदस्यांच्या भावना तीव्र होऊन त्यांनी त्यांचा धिक्कार करणार्‍या सह्या निर्माण केल्या. ज्यांनी या सह्या आपल्या प्रतिसादात वापरल्या ते प्रतिगामी आहेत का? तर नाही त्यांच्यातल्याच अनेकांनी 'स्त्रियांचे कपडे' टाइप अनेक धाग्यांवर पुरोगामी म्हणता येतील अशा स्वरूपाची मते व्यक्त केली आहेत.

'त्या' सह्या का निर्माण झाल्या हे 'निर्मात्यांना' माहीती का तुम्हाला ? तुम्ही सरळ सरळ त्या सध्या धिक्कार करण्यासाठी निर्माण केल्या गेल्या असे विधान कसे करु शकता ? त्याबाबत तुम्ही खात्री करुन घेतली होतीत का ?

वापरल्या जाणार्‍या सह्या आणी स्वतःची मते ह्यात फरक असु नये का ? प्रतिगामी छापाच्या सह्या केल्या म्हणजे प्रत्येक वेळी मत व्यक्त करताना प्रतिगामी मतच व्यक्त करायला पाहिजे का ?

बिनबुडाच्या विधानांना वाचुन अपरंपार दु:ख जाहले.

ह्या ओळींच्या पुढचा लेख वाचला नसल्याने त्याबाबत प्रतिक्रीया नाही.

अवांतर :- ह्या पुढे ४ 'शहाण्या' लोकांना विचारुन मग आपली सही ठरवली पाहिजे बरका रे 'निर्मात्यांनो'. उगाच आपल्या सह्यांनी कुठे मंथन वगैरे चालु व्हायला नको.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©

'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

9 Jul 2009 - 12:11 pm | नितिन थत्ते

पराभौ..आपण माझे विधान नीट वाचले नाही.
सह्या वापरणारे प्रतिगामी नाहियेत असं मी म्हटलंय.

ते प्रतिगामी आहेत का? तर नाही

असेच मी म्हटले आहे.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jul 2009 - 12:28 pm | परिकथेतील राजकुमार

थत्ते साहेब प्रश्न प्रतिगामी का पुरोगामी हा नाहिचे. त्या सह्या धिक्कार करण्यासाठी वापरल्या हे विधान तुम्ही कशाच्या आधारावर केलेत ?
कालच मी आणी अवलिया यांनी ह्याबाबत केलेला खुलासा आपण वाचला नाहीत का ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

अवलिया's picture

9 Jul 2009 - 1:50 pm | अवलिया

जाउ दे परा येवढे मनाला लावुन घेवु नकोस !

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

विनायक प्रभू's picture

9 Jul 2009 - 12:12 pm | विनायक प्रभू

जेंव्हा गरज वाटते तेंव्हा 'पुरोगामी' मनात आले तर केंव्हा केंव्हा
'प्रतिगामी'

निखिल देशपांडे's picture

9 Jul 2009 - 3:23 pm | निखिल देशपांडे

कालच्या आणि आजच्या दोन्ही धाग्याची सुरवात एका सही पासुन झाली. त्यात ह्या लेखात लेखकाने "पुरोगामी लोकांनी व्यक्त केलेल्या मतांबाबत काही सदस्यांच्या भावना तीव्र होऊन त्यांनी त्यांचा धिक्कार करणार्‍या सह्या निर्माण केल्य"असे लिहिले आहे, तर ह्या वाक्यावर आक्षेप आहे, कारण मिपा वर वापरणार्‍या सह्या ह्या बर्‍याच वेळा सध्या चालु असलेल्या मिपा वरील घडामोडिंचा उपहास करण्यास वापरल्या जातात. त्या बद्दल योग्य ते विचार काल सही वापरणार्‍याकडुन आलेले आहेतच.

खरे तर पुरोगामी विचार म्हणजे काय आणि एखाद्या व्य्क्तीला पुरोगामी विचाराचा म्हणने ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कारण एक व्यक्ती सतत पुरोगामी किंवा प्रतिगामी विचार करत असतो किंवा त्याच मतावर टिकुन असेल असे नाही. असे उदाहरणे वरच्या अनेक प्रतिसादात आलेली आहेतच. माझ्यासाठी पुरोगामी ज्याला म्हणता येईल जो सामाजिक किंवा धार्मिक बदलांना विरोध करत नाही किंवा बदल व्हावा असा त्याचा विचार असतो. आता आपण दिलेल्या उदाहरणात आपण मासभक्षणाचे उदाहरण दिले आहे. आपण म्हणता तसे जिवशास्त्रिय दॄष्ट्या काही नुकसान होत नाही म्हणुन मासं भक्षण करणारा ब्राम्हण हा पुरोगामी असतो. आता त्याच उदाहारणात थोडासा बदल करुन मी सांगतो जर एखाद्या ब्राम्हणाने त्याचा गुरुने सांगितले म्हणुन जर मास खायला सुरवात केली तर तो प्रतिगामी ठरणार का?? कारण आपल्या उदाहरणा प्रमाणे त्याने जिवशास्त्रिय दॄष्ट्या काही नुकसान होत नाही म्हणुन मासं खाल्ले नाही म्हणुन तो प्रतिगामी ठरतओ का??? पण त्याने सुद्धा तर एका मोठ्या धार्मिक बदलात भाग घेतला आहे. त्याचे श्रद्धास्थान कदाचित विज्ञान नसुन अजुन काहीतरी असेल. समजा जर एक धर्मगुरु सांगतो म्हणुन एक अनिष्ट प्रथा बंद होणार असेल तर त्या धर्मगुरुचे ऐकुन प्रथा बंद करणारे प्रतिगामी आहेत का???ह्याचाच अर्थ पुरोगामी=अश्रद्ध आणि प्रतिगामी= श्रद्ध होतो का??? त्यामुळेच श्रावण मोडक जसे म्हणतात तसे पुरोगामी-प्रतिगामी असा फरक कॄष्ण्-धवल पद्धतिने करणे शक्य नाही.

आता लिबरल ह्या श्ब्द्दाचा आपण केलेला अर्थ हा सर्वांना मनापुत वागण्याची समान मुभा असा आपण घेतला आहे. थोडक्यात त्याचा अर्थ माझ्यासाठी tolerance to behaviour of others असा आहे. आता लिबरल कोणाला म्हणता यईल, जो दुसर्‍याचा मताचा आदर ठेवुन आपले मत मांडतो. आता सार्वजनिक स्थळी वावरताना हे सर्वांकडुन पाळल्या जाते का हे पाहिला पाहिजे. उदाहरणार्थ आपले मिपाच घ्या मागच्या काही दिवसात इथे धर्म, श्रद्धा, समलिंगी संबध अश्या अनेक विषयावर चर्चा झाली होती. त्यात जेव्हा कोणी म्हणतो "मला भाततिय असल्याचा अभिमान नाहिये" तेव्हा नक्कीच ते सगळ्यांना पटणारे विधान नाहिये. तरि पण जेव्हा लोक ते स्विकारतात म्हणुन लोक लिबरल ठरतात.त्यात मला भारतियत्वाचा अभिमान नाहिये म्हणणारा ठरत नाही.

बाकी सहिच्या बाबतित परत एकदा त्या सहित देवपुजा करणारे मुर्ख आहेत किंवा मला भारतिय असण्याचा अभिमान नाहिये असे पण मते होती त्या बाबतित कोणिच काही बोलले नाही. उलट लोकांना personally target करण्यासाठी तयार केलेल्या म्हणुन मोकळे झाले. देवपुजा न करणे कारण त्याला वेज्ञानिक आधार नाही हे पुरोगामी विचार आहेत का??
==निखिल

मिसळभोक्ता's picture

9 Jul 2009 - 3:27 pm | मिसळभोक्ता

पुढे जाणारा. दलदलीत रुतून बसणारे पुढे जात नसतात.

-- मिसळभोक्ता

आनंदयात्री's picture

10 Jul 2009 - 8:06 am | आनंदयात्री

>>पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा. दलदलीत रुतून बसणारे पुढे जात नसतात.

=)) =))
आपले पुरोगामित्व फक्त आपला अहंकार गोंजारत रहाण्यासाठी वापरणे म्हणजे दलदलीत रुतणे !! एकच नंबर व्याख्या !!

बाकी हे पुरोगामी व प्रतिगामी वांझोटे शब्द आहेत नुसते.

वेताळ

विकास's picture

10 Jul 2009 - 12:12 am | विकास

>>मांसाहार करण्याने काही जीवशास्त्रीय नुकसान होत नाही असे अभ्यासांती आढळले आहे म्हणून मांसाहार चालेल असे सांगत नाही.<< (मूळ लेख)

>>आपण म्हणता तसे जिवशास्त्रिय दॄष्ट्या काही नुकसान होत नाही म्हणुन मासं भक्षण करणारा ब्राम्हण हा पुरोगामी असतो.<< (निखिल देशपांडेची प्रतिक्रीया)

सध्या अमेरिकेत उलट चालू आहे (तसे नेहमीच असते - आपल्याकडे दिवस की यांच्याकडे रात्र, आपण एअरोबिक्स की यांचे "योगा" :-) ). इथले पुरोगामी लोकं (अर्थात लिबरल्स) यांच्यात शाकाहारी होण्याचे प्रमाण वाढत आहे. काही अतिरेक पण चालतो म्हणजे "व्हेगन" लोकं गायीचे दुध, तुप वगैरे पण घेत नाहीत!

याचे कारण काय? तर मनुस्मृती हे कारण नाही तर राजेंद्रस्मृती प्रमाणे ( ;) ) १ किलो मांस तयार करताना ३६.४ किलो कार्बनडाय ऑक्साईड वायू तयार होतो जो वातवरण बदलास कारणीभूत असलेला नंबर एकचा घातक वायू आहे. आता पर्यावरण बदलाने जीवशास्त्रीय नुकसान होते आहे असे देखील म्हणता येईलच...

धनंजय's picture

14 Jul 2009 - 3:27 am | धनंजय

कुंपणात बदल घडवणे हे पुरोगामित्वाचे समावेशक लक्षण आहे.

(हे खरे "गामित्वा"चे लक्षण आहे, पण काळ "पुढे" जातो असे म्हणायचा प्रघात आहे, म्हणून बदल "पुढे" जातो. काळाबरोबर होणारे बदल म्हणजे "उन्नती" की "अधोगती" याबद्दल लोकांची मतमतांतरे असतात.)

कुंपणातले बदल वाढवणारे असतात, पण तसे करताना काही लोकांना कुंपणाबाहेर घालवणारेही असतात. याचे उदाहरण १९५१ मध्ये झालेला बहुपत्नीत्व-विरोधी कायदा. या प्रकाराने अनेक स्त्रिया समान म्हणून कुंपणाच्या आत आल्या, पण काही पुरुष बाहेर टाकले गेले. पण कुंपणात बदल झाला असल्यामुळे त्याला पुरोगामी म्हटले जाते.

बाकी लेखातील आणि प्रतिसादांतील विचारपूर्ण मुद्द्यांशी बहुतेक सहमत आहे, उदाहरणार्थ :

समाज करून राहण्याने माणसाचे जीवन एकटे राहण्यापेक्षा सुखी होते. तेवढ्याच प्रमाणात समाज अस्तित्वात राहिला तरी पुरे अशी माझी व्याख्या.

हुप्प्या यांनी म्हटले आहे, की केवळ बदल करायचा म्हणून बदल करणे ठीक नाही. काही सामाजिक कल्पना कधी काळी पारखल्या असल्यामुळे रूढ झाल्या आहेत. त्याला ऋषिकेश यांचे उत्तर मला पटते.

सर्व काही सरसकट बदलायचे असते, असे लोक बहुधा नसतातच. ही काही लोकांची कपोलकल्पना आहे. जोवर कोणी या कपोलकल्पनेशी लढत आहे, तोवर त्या काल्पनिक भस्मासुराशी ते नेहमीच जिंकतील. पण हयात लोकांना नेस्तनाबूत केले का?

कित्येकदा आपण अशा प्रकारचा वाद बघतो - "असे असले तर मग तसे भयंकर तुमचे मत का मानू नये? मी म्हणतो म्हणून तुमचे ते न-सांगितलेले भयंकर मत आहेच. म्हणून तुमचे हे सांगितलेले मतही भयंकर आहे." असे वाद दुसर्‍याशी बोलण्यापूर्वीही जिंकले जातात, त्यांच्यातून फलनिष्पत्ती शक्यच नाही.

दृष्टांत (उदा : जसे बापाने पुत्रीशी संभोग करणे भयंकर तसे कुठलेही कुंपण बदलणे भयंकर) आणि अर्थापत्ती (उदा : कुठल्याही बाबतीत स्वातंत्र्य असणे म्हणजे त्या बाबतीत व्यापारही आपोआप मुक्त असणे) ही तार्किक तंत्रे आहेत. हे तर्क सयुक्तिक असण्यासाठी किंवा नसण्यासाठी काय आवश्यक आहे त्याबद्दल विचार झालेला आहे (गौतमाचे न्यायशास्त्र ~१५०० वर्षे जुने आहे.). ते तर्कशास्त्र खूप पारखल्यामुळे टिकले आहे, असे मीसुद्धा म्हणतो. ते तर्कशास्त्राचे नियम सरसकट टाकून देण्यापूर्वी हुप्प्या यांनी जरूर विचार करावा. त्या मानाने, ते म्हणतात त्यांच्यापैकी काही सामाजिक प्रथा व्हिक्टोरियन काळापासून ~१५० वर्षांपासून आहेत.

मुंजीमध्ये मामा आपली मुलगी बटूला देऊ करतो (ते लग्न आजकाल होत नाही.) पण अशा प्रकारची आत्येमामेभावंडांची लग्ने (प्रौढपणी) काही जमातींत होतात. बहुधा बापाने पुत्रीशी संभोग करण्याइतके भयंकर नाही. मग दृष्टांत सर्वत्र लागू नसेल, तर कुठे लागू आहे, कुठे नाही, याचा काटेकोर विचार करणे तर्काच्या दृष्टीने अपरिहार्य आहे. दृष्टांत देताना असा साधकबाधक विचारही देण्याची जुनी पद्धत हुप्प्या यांनी सकारणच त्यागावी. (माझ्या मते त्यागू नये.)

कोणी वडील आपल्या लहान मुलाला स्वतंत्रपणे सांगू शकतात - "जा काकांना सामान उतरवायला मदत कर." पण सध्यातरी कायद्याने वडील लहान मुलाचे कष्ट विकू शकत नाहीत. म्हणजे काही कृती करण्यास स्वातंत्र्य असते, त्या कृतींचा व्यापार करण्यास स्वातंत्र्य नसते. म्हणजे अभिज्ञ यांचा विचार - "साधे स्वातंत्र्य असल्यास व्यापाराचे स्वातंत्र्य असतेच" हा कधीच पूर्णपणे खरा नव्हता. मग ती अर्थापत्ती (इम्प्लिकेशन) कुठल्या बाबतीत योग्य आहे, कुठल्या बाबतीत अयोग्य आहे, असा काटेकोर विचार करणे तर्काच्या दृष्टीने अपरिहार्य आहे. अर्थापत्ती देताना असा साधकबाधक विचारही देण्याची जुनी पद्धत अभिज्ञ यांनी सकारणच त्यागावी. (माझ्या मते त्यागू नये.)

जोवर अर्धवट दृष्टांत, प्रत्यक्षात-फोल अर्थापत्ती हा युक्तिवादाचा ठिसूळ पाया आहे, तोवर युक्तिवादाचा पूर्ण डोलाराच भासमान आहे.

पुरोगामित्व म्हणजे सर्वच बदलायचे आहे असा अनर्थ जोवर त्यांच्या मनात आहेत, तोवर ते प्रत्यक्षात नसलेल्या कुठल्याशा मायावी राक्षसाशी लढत आहेत. प्रत्येक मायावी लढाई जिंकूनही त्या मायावी विजयातून प्रत्यक्षात काहीच निष्पत्ती होत नाही, अशी निराशा कोणाच्याच पदरी पडू नये.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Feb 2016 - 9:29 am | प्रकाश घाटपांडे

एका पुरोगाम्याचे आत्मपरिक्षण हे उत्पल यांच लेखन वाचण्यासारखे आहे
त्यात मी खालील प्रतिक्रिया दिली होती
ही प्रतिक्रिया मिळून सार्‍या जणी मासिकात २००१ म्ध्ये आलेल्या सुजाता देशमुख यांच्या पुरोगामी जमातवाद या लेखावर प्रतिक्रिया म्हणुन दिली होती. त्याच वेळी ९/११ झाल्याने त्याची आठवण आली म्हणुन खाली ती देत आहे. मूळ लेखा मुळे सुजाता देशमुख "मिळून सार्‍या जणी" च्या संपादक मंडळातुन बाहेर पडाव लागलं. महाराष्ट्र फाउंडेशन चे सुनिल देशमुख या अमेरिका स्थित असलेल्या पुरोगामी आधारस्तंभाची नाराजी ओढवली होती.
माझ्याकडे सुजाता देशमुख यांचा मूळ लेख नाही. त्यामुळे कदाचित थोडे सुसंगत वाटणार नाही. पण तरी स्वतंत्र्य रित्या पाहिले तरी चालेल. उपक्रमचे संकेतस्थळ रिड ओन्ली स्वरुपात देखील गंडते म्ह्णुन पेस्टवत आहे.
पुरोगामी जमातवाद
पुरोगामी म्हटल्यावर सर्वसाधारणपणे 'डाव्या` असा शिक्का लोकांनी मारलेल्या सामाजिक, राजकीय, संघटना तसेच 'आम्ही डावं उजवं मानीत नाही. जात, धर्म पंथ वंश मानीत नाही. अशा विचारांचे लोक` असं चित्र डोळयासमोर येईल.
तुमचा कुत्रा कुठल्या जातीचा आहे असा प्रश्न विचारल्यावर पामेरियन, अल्सेशियन असं काही उत्तर मिळाल्यावर त्याची अंगकाठी, रंगरूप बांधा वगैरे गोष्टी डोळयासमोर येतात. तसं माणूस कुठल्या जातीचा आहे असं विचारल्यावर तो हलकट, काळा, गोरा, उंच, विद्वान असं अभिप्रेत नसंत. त्याची जन्मानुसार असलेली मराठा, महार, मांग, चांभार, ब्राम्हण वगैरे अभिप्रेत असतं. निसर्गात अभिप्रेत असलेली जात ही गुणधर्मानुसार असते. एकटया गुलाबाच्या सुद्धा भरपूर जाती आहेत. सरकारी नोकरीत बायोडाटा देताना मला जात विचारली तर 'मी मनुष्य जातीचा प्राणी आहे' व 'मानवता हा माझा धर्म' असे सांगितल्यावर सगळे हॅ हॅ करुन हसले. तुम्हाला जे अभिप्रेत आहे ते मी सांगणार नाही असे म्हटल्यावर त्याने नाही सांगितले तरी आम्हाला कळतं असे म्हणून स्वत:च तो कॉलम भरुन टाकला.
एखादा वाद आला म्हणजे मध्यवर्ती मुद्दा आला तसं पुरोगामी जमातवादाला सुद्धा मध्यवर्ती केंद्रबिंदू असतो. तो म्हणजे जन्माधिष्ठित नसलेले पुरोगामित्व. हे पुरोगामित्व सुद्धा कुठल्यातरी बिंदूमुळेच मिळालेली एका रेषेवरील दिशा आहे. त्याच अनुषंगाने प्रतिगामित्व ठरते. या बिंदूच्या सापेक्षते मुळेच पुरोगामित्वाचे शिक्के बसत असतात. त्या मुळे पुरोगामी कुणाला म्हणायचं या प्रश्नात प्रसंगी कुत्सितता वाटली तरी सापेक्षता पण आहे. लेखात नमूद केलेला पुरोगामी जमातवाद हा धर्म निरपेक्षतेशी निगडीत आहे. या धर्म निरपेक्षतेची सापेक्षता ही जन्माधिष्ठित असलेल्या धर्माशी सापेक्ष आहे. पुरोगामित्वाचं सोवळं हे लोकांनीच नेसवलेलं आहे. त्याला मी धर्मविरहित आहे असे सांगण्याची सोय नाही. त्याने स्वत:ला काहीही म्हणवले तरी जन्माधिष्ठित धर्म हा त्याला चिकटला जाणारच. सर्वधर्मसमभाव हे तर रिंगमास्टर एकमेकाचे हाडवैर असणारं प्राणी जस एका रिंगणात 'प्रेमानं` बसवितो तसा बसवलेला भाव आहे. हिंदुत्ववाद हा तरी कुठे एक आहे? त्यातही अनेक छटा आहेत. विविध जाती- जमातींची उतरंड असलेला हा समाज एक असणं हे मानण सुद्धा त्या रिंगमास्टरची कमाल आहे. धर्मनिरपेक्षतेची चिकित्सा करताना कुठलाही धार्मिक मूलतत्ववाद आणि धर्मांधता वगळता येत नाही. धर्मांधता आणि धार्मिक मूलतत्ववाद याचे मूल्यमापन करताना धर्मचिकित्सा ही अपरिहार्य बनते कारण धर्म तत्वांची त्याला जोड असते. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला एक प्रश्न नेहमी विचारला जातो काहो तुम्ही फक्त हिंदूच्याच अंधश्रद्धांवर झोड उठवता पण मुस्लिमांच्या अंधश्रद्धांविषयी फारसे बोलत नाही? हा पळपुटेपणा नाही काय? यात हिंदूंच्या अंधश्रद्धाविषयी बोलण्याचा अधिकार प्रश्नकर्त्याने मान्य केलेला आहे. किंबहुना हे काम तुम्ही चांगलच करता आहात असाही कधी कधी सूर असतो. पण तुम्ही पुरोगामी व धर्मनिरपेक्ष आहात तर मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धांविषयी पण त्याच न्यायाने बोला ना! असे आवाहन अभिप्रेत असते. याची उत्तरे ही दिली जातात ती अशी की जवळजवळ ऐशी टक्के लोक हिंदू आहेत साहजिकच बहुसंख्य कार्यकर्ते हिंदूच असणार. त्यामुळे ऐशी टक्के अंधश्रद्धा हिंदूंबाबत असणार. दुसरं उत्तर दिलं जातं आम्ही हिंदू धर्मात जन्मलो साहजिकच संस्कार हिंदू झाले असल्याने आम्ही हिंदू धर्मातील अंधश्रद्धांविषयी अधिक संवेदनाशिल असणं स्वाभाविक आहे. आपण आपलं घर साफ करायचं नाही तर शेजाऱ्याच करायचं काय? या उत्तरांमध्ये चूक नाही पण सर्वसमावेशकताही नाही. चळवळ ही प्रबोधनाशी निगडित असल्याने जवळीक हा महत्वाचा दुवा आहे. अंधश्रद्धा ही सापेक्ष आहे ही बाब जरी घटकाभर बाजूला ठेवली तरी अंधश्रद्धा ही हिंदू धर्मातील काय किंवा मुस्लिम धर्मातील काय तितकीच अंध आहे.चळवळ जरी दोन्ही धर्माना समान लेखत असली तरी जन्माधिष्ठित चिकटलेल्या धर्मामुळे हिंदू कार्यकर्ते हिंदूत्ववाद्यांना मुस्लिमांपेक्षा जास्त जवळचे वाटण्यची शक्यता अधिक. हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हिंदू धर्मात असलेले विविध, प्रसंगी परस्पर विरोधी विचार प्रवाह ही बाब. ग्रंथप्रामाण्य असलं तरी विशिष्ठ धर्मग्रंथ हाच एक प्रमाण हा भाग नाही. धर्मसंस्थापक ही कुणी एक व्यक्ती नाही. चार्वाक दर्शनाला सुद्धा मानाचे स्थान आहे या अर्थाने हा धर्म सर्वसमावेशक आहे. धर्मचिकित्सेलाही एक परंपरा लाभली असल्याने अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो. त्यामुळे हिंदू धर्मांधता ही मुस्लिम धर्माधते पेक्षा बोथट बनलेली आहे. त्यामुळे येथे अंधश्रद्धा निमूर्लन हे तुलनात्मक दृष्टया सोयीचे आहे. अगोदरच धर्मचिकित्सा हा संवेदनाशिल विषय असल्याने सोयीचा असलेला भाग हा प्राधान्यक्रमात असणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा धर्मांधता व मूलतत्ववाद हा राष्ट्रहिताशी निगडीत असते त्यावेळी ही चिकित्सा सोयीनुसार करुन चालणार नाही ती कठोरपणेच झाली पाहिजे ही बाब नाकारुन चालणार नाही. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा बळी ठरलेली ९/११ ही न्यूयार्क मधील घटना ही त्याची साक्ष आहे.