कोणी भारत दर्शन केलं आहे का??

बुध्दू बैल's picture
बुध्दू बैल in काथ्याकूट
15 Feb 2008 - 10:10 pm
गाभा: 

आपण सुट्ट्या मिळाल्या की बॅगा भरून गावाला पळतो; नाहीतर केसरी टुर्स किंवा सचिन ट्रॅव्हल्सबरोबर कुठेतरी फिरून येतो. त्यामुळे आपलं बरचसं भारत दर्शन झालेलं असतं.
आपण सर्व कुठेतरी जाऊन आला आहात. त्यामुळे आपले अनुभव मिपाच्या सदस्यांबरोबर 'शेअर' करून बघा. मग बघाच, संपूर्ण भारत-दर्शन मिपावर घडेल की नाही ते.

माझे अनुभव

तसा मी ब-याच ठिकाणी जाऊन आलो आहे. पण मसूरी बद्दलच्या काही ताज्या आठवणी आहेत, त्या शेअर करतोय,

मसूरीला केसरीच्या संगतीत गेलो होतो. तशी आमच्याबरोबर आलेली जवळ जवळ सर्व प्रवासीमंडळी जरा जास्त 'प्रौढ' होती. तरी तिथल्या थंडगार वातावरणात मन रमून गेलं.
घाटांवरून केसरीची बस निघाली, की मला मळमळतं. पण मग मसूरीतल्या वातावरणातील निसर्गसौंदर्य बघण्यात हरपून गेलो, ज्यामुळे मला बसमध्ये मळमळणं बंद झालं.
आम्ही ज्या हॉटेलात थांबलो होतो तिथे सतत लोडशेडिंग होत होतं. हीटर मोडला होता. झोपण्यासाठी रजया चांगल्या जाड्या होत्या म्हणून हायसं वाटलं. पण त्यासुध्दा गारढोण पडल्या होत्या.
आम्ही केम्प्टी धबधब्यावर गेलो होतो. तिथे फोटो काढले, चहा प्यायलो, पाण्यात पाय बुडविले, व खूप मजा केली.
केम्प्टी फॉल्सचे एक वैशिट्य असे सांगितले गेले, की ह्या धबधब्याच्या उगमस्थानाचा अजूनपर्यंत काही पत्ता नाही. त्या धबधब्यावरचे पाणी कुठुन येते हेच कळत नाही.
आमचा कॉरबेट पार्कमधील हॉटेलमध्ये (ती जागा जेथे कालह्या हिंदी चित्रपटाचे शूटिंग केले गेले)वन नाईट स्टे होता. सकाळी लवकर उठून तिथल्या वाहत्या नदीवर पाणी प्यायला आलेल्या लांडोरांना बघितलं, वाघांना बघितलं, आणि तिथेच कायमचं वास्तव्य असावं अशी कल्पना मनात आली.
आम्ही योग्य वेळेत मुंबईत परतलो. कारण त्यानंतर थोड्याच कालावधीत उत्तर भारतात थंडीची जबरदस्त लाट आली आणि आम्ही गोठवणा-या थंडीपासून बचावलो.

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

15 Feb 2008 - 10:59 pm | ऋषिकेश

मग बघाच, संपूर्ण भारत-दर्शन मिपावर घडेल की नाही ते.
या चर्चेच्या आयडियाची कल्पना लई झ्याक
भारतात माझं बरंच भ्रमण झालेलं आहे. माझ्या पायाला भिंगरीच लागलेली असते म्हणा ना :) महाराष्ट्रात यवतमाळ, गडचिरोली, बीड, वगैरे सोडल्यास बराचश्या भागात जाणे झाले आहे. गुजरात मधील सौराष्ट्र, कच्छ वगैरे झालंय शिवाय दमण, दिव, दादरा, पॉंडेचेरी हि "केंद्रशासित स्थळे पण झाली आहेत. राज्यांमधे गोवा, कर्नाटक (मध्य आणि कोस्टल दोन्ही), आंध्र, राजस्थान, दिल्ली हि राज्ये बरिचशी फिरलो आहे. हि.प्र., उत्तरांचल, उप्र मधील अनेक प्रेक्षणीय शहरे भटकलो आहेच. झालंच तर ओरिसात भुवनेश्वर, चिलका सरोवर, आणि म.प्र. मधील भेडाघाट कव्हर केला आहे. पण या चर्चेच्या निमित्ताने माझा काहि आवडत्या स्थळांचे वर्णन इथे करतो.

शिवथर घळः समर्थ रामदासांनी जिथे दासबोध लिहिला, छत्रपतींच्या राजकारणासाठी जिथे गुप्त बैठका होत ते महाराष्ट्रातील कोकणात महाड जवळील ठिकाण "शिवथर घळ". एका अतिप्रचंड धबधब्याच्या मागे हि घळ आहे. त्या घळीत गेल्यावर समोर पडणारा प्रपात त्या गुहेला वेगळंच परिमाण देतो. मला आतापर्यंत वाटलेली हि सर्वात पवित्र जागा!. इथे जाऊन बघाच! या धीरगंभीर वातावरणात समर्थांना दासबोधासारखं काव्य स्फुरलं नसतं तरच नवल

द्वारका: कृष्णाची द्वारीका नगरी. माला हे शहर का आवडलं हे सांगता येणार नाहि. खरंतर चार शहरांसारखंच एक. पण खूप खूप आवडलं

नैनितालः डोंगरमाथ्यावरील नैनि सरोवर. भोवताली उंच हिमशिखरे, पाईन- ओक आदी वृक्षराजी, एक रम्य सकाळ, हातात बकरीच्या दुधाचा गरमागरम चहा वा वा वा!

चांद्रखाणी पासः हा मोठा हिमालयातील ट्रेक आहे. पण या ट्रेक दर्म्यान पहायला मिळणारं सौदर्य कुठल्याहि थंड हवेच्या ठिकाणाहुन पाहिलेल्या दृश्यापेक्षा शतपटीने सुंदर वाटलं
(ता कः या मे महिन्यात मी युथ हॉस्टेल तर्फे असणारा सारपास हा ट्रेक करणार आहे. इच्छुक अधिक माहिती इथे पाहु शकतात)

भारत म्हटलं की अर्थात अजुन बरीच ठिकाणं आहेत पण तुर्तास इथेच थांबतो

-(भटका) ऋषिकेश

फटफटी वरुन वरंधा घाट मार्गे महाडकडे उतरणे. घाटातून जाताना भरपूर माकडे (म्हणजे, खरी:) दिसतात. एकेठिकाणी गरम्-गरम चहा भजी गाडी सुध्दा आहे!घाट उतरला की वाटेत घळीकडे जाण्याचा फाटा लागतो.
शिवथरघळीकडे अगदी शेवटपर्यंत रस्ता नीट आहे. सगळा राना-शेता-डोंगरातून जात असतो आणि आजूबाजूला असंख्य छोटेमोठे धबधबे डोंगरांवरून कोसळत असतात! फारच छान दृश्य. डोंगरातला पाऊस कोसळतो म्हणजे कसा - पावसाचे सपकारे अक्षरशः थोबाडून काढतात.
प्रत्यक्ष घळ तर काय वर्णावी महाराजा - समर्थांसारख्या शक्तिउपासक राजगुरूने हे ठिकाण नसतं निवडलं तरच नवल!
डोंगराच्या डोक्यावरुन धबधबा कोसळतो आणि आपण त्याच्या मागे उभे! तुषारांनी संपूर्ण अंग चिंब भिजल्याशिवाय ती मौज, तो थरार नाही!!

त्याचं वर्णन समर्थांच्याच शब्दात -

गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनी चालिल्या बळे|
धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळे||

आणखीही बरीच ठिकाणे आहेत पण पुन्हा कधीतरी.

चतुरंग

ऋषिकेश's picture

16 Feb 2008 - 12:35 am | ऋषिकेश

आजूबाजूला असंख्य छोटेमोठे धबधबे डोंगरांवरून कोसळत असतात
अगदी खरं.... महाराष्ट्रातील सहस्त्रधारा असं त्याभागाला आम्ही नाव ठेवलं होतं (सहस्त्रधारा नावाचं एक पर्यटन स्थळ हि.प्र.मधे पण आहे ).. आणि पावसाळ्यात तर मजा औरच

शिवाय घळी समोरचा धवधबा हा आठवा धबधबा आहे. त्याच्या वर सात धबधबे आहेत त्यांच पाणी एकत्र येऊन हा धबधबा तयार होतो. पहिल्या धबधब्यापर्यंतचा ४-५ तासांचा ट्रेकहि पावसाळयात करण्याजोगा आहे. पहिल्या धबधब्याच्या पायथ्याशी एका ऋषींचा आश्रम आहे तिथे त्यांनी आम्हाला निरसं दूध दिलं होतं. ट्रेक करून दमल्यावर आश्रमांत प्यायलेलं ते दूधअजून आठवतं :)

-(शिवथरघळ प्रेमी) ऋषिकेश

सुधीर कांदळकर's picture

16 Feb 2008 - 6:05 am | सुधीर कांदळकर

हा माझ्या जिव्हाळयाचा विषय आहे. वाट पाहात आहे. मी तीन वेला दक्षीण भारत केला आहे. ते आपल्याला मिपा वर वाचायला मिळेलच. दुसरा भाग आताच मि पा वर टाकला: वाट फुटेल तिथे २. तरी प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो.

sahil ashok's picture

27 Apr 2010 - 3:01 pm | sahil ashok

आपण तीन वेला दक्षीण भारत केला आहे. तरि हम्पि (विजयनगर) ला जाण्यासाठी मार्गदर्शन पाहिजे.

विशाल कुलकर्णी's picture

28 Apr 2010 - 5:08 pm | विशाल कुलकर्णी

विजयनगरला जाण्यासाठी मुंबईहून जायचे असल्यास दोन पर्याय आहेत. बाय रोड किंवा बाय ट्रेन. विजापूरला उतरून तिथुन पुढे खाजगी गाड्या किंवा कर्नाटका स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस हा पर्याय उपलब्ध आहे.
बँगलोरच्या दिशेने जाणार्‍या बहुतेक ट्रेन्स विजापूरला थांबतात.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्राजु's picture

16 Feb 2008 - 12:42 am | प्राजु

१.कूर्गला गेले होते. खरंतर आम्ही तिथे तिरूपती ला गेलो होतो तेव्हा कुणी तरी जवळच कूर्ग असल्याचे सांगितले म्हणून गेलो आणि ते सुंदर ठिकाण एकदम मनात घर करून गेलं. खरंतर इतर हिलस्टेशन सारखंच ते ठिकाण पण तिथल्या धबधब्याला जाण्यासाठी जी वाट आहे तिथून चालताना आजूबाजूला वेलची, लवंग दालचिनी ची झाडं दिसतात त्या ओल्या मसाल्याचा सुगंध मनाला भुरळ घालतो. तो धबधबा ही खूप सुंदर आहे.

२. मार्लेश्वर : अतिशय सुंदर ठिकाण. चढून जाताना झर्‍यातून जाणारी वाट.. गंभिर गुहा आणि त्यातील शिवलिंग.. खूप आवडले.

३. नैनीताल : तिथे चंडिदेवी आणि मनसादेवी नावाची २ मंदिरे आहेत डोंगरावर. तिथे रोपवे ने जावे लागते. रोप वे ने जाताना, त्या बोगी मधून खाली दिसणारे नैनी तळे.. काय वर्णाव? इथे नैनीतालच्या जवळच.. काही अंतरावर घाटात एक जागा अशी आहे जिथून सकाळी सकाळी सुर्योदयापूर्वी गेलात तर दूरवर लखलखणार्‍या हिमशिखरावर सूर्योदय होताना, सुर्याच्या लालबुंद बिंबाचे प्रतिबिंब त्या हिमशिखराच्या अगदी टोकावर पडते.. आणि तो नजारा पहाणे म्हणजे स्वतःला विसरणे..कडकडणार्‍या थंडीत आम्ही पहाटे ४.०० ला तिथे गेलो होतो सुर्योदय पहायला.. शब्दच नाहीत वर्णायला..

बर्‍याच ठिकाणी हिंडले आहे मी. पण लिहिन सवडीने त्यावर. निसर्गाच्या सान्निध्यातली ठिकाणे मला भावतात...

- (निसर्गवेडी)प्राजु

ऋषिकेश's picture

16 Feb 2008 - 12:44 am | ऋषिकेश

वा वा काय मस्त स्थळाची आठवण करून दिलित. :).. हे हि खास पावसाळ्यात जाण्यासारखे ठिकाण

टिउ's picture

28 Apr 2010 - 8:49 pm | टिउ

मी डिसेंबर मधे मार्लेश्वरला गेलेलो. खरंतर डिसेंबर मधे थंडी असेल असं वाटलं होतं. पण वाईट उन होतं. कुठुन आलो इथे असं झालेलं. पण वर पोहोचल्यावर छान वाटलं! शिवाय मध्ये रस्त्यात लिंबुसरबत, कोकम सरबत मिळतं त्याची पण मजा वेगळीच असते...:)

प्राजु's picture

16 Feb 2008 - 12:49 am | प्राजु

जपून जा बरं.. कारण त्या गुहेत नाग लटकत असतात... आणि पावसाळ्यात तर त्या झर्‍यात जळवा आणि साप दोन्ही असतात..
म्हणून जरा जपून... :)

- प्राजु

अनिकेत's picture

16 Feb 2008 - 1:19 am | अनिकेत

आम्ही..... देवाचिये दारी..... देवाचिये.. आय आय एम मध्ये शिकतो......केरळात...
आम्हाला वगळा.............. गतप्रभ झणी होतील तारान्गणे....

आमचे प्रामाणिक मत...

केरळा असे आमुची मात्रुभूमी....

अनिकेत.

माझी दुनिया's picture

16 Feb 2008 - 2:53 pm | माझी दुनिया

नुसत्या वर्णनापेक्षा; लेखकाने/लेखिकेने ही ठिकाणे नेमकी कुठे आहेत, कसे जायचे, राहाण्याची सोय, जेवणा-खाण्याची सोय इ. गोष्टी यांत टाकल्या तर सदस्यांना याचा लाभ घेता येईल.

बाकी विषय छानच !

माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

प्राजु's picture

16 Feb 2008 - 7:07 pm | प्राजु

राहण्याचा आणी जेवणाखाणाच्या सोयीबद्दल कशाला काळजी? ती कुठेही आरामात होते. जेवणाचे हाल तर भारतासारख्या ठिकाणी अजिबात होत नाहीत. इथे परदेशात अशी काळजी करायची.

- प्राजु

टुकुल's picture

27 Apr 2010 - 3:44 pm | टुकुल

जबरदस्त धागा.. वाचनखुन साठवली आहे.

--टुकुल

भोचक's picture

27 Apr 2010 - 5:18 pm | भोचक

पायाला भोवरा असल्याची जाणीव होण्याआधीच भिंगरी सुरू झाली. दहावीनंतर घराबाहेर पडल्यानंतर बर्‍यापैकी भटकंती केली. कोकणात गुहागर, गणपतीपुळे वगैरे झाले. औंरंगाबाद वेरूळ वगैरेही झाले. गुजरातमध्ये कच्छ, सौराष्ट्र, अहमदाबाद, बडोदा झालेय. आता इंदूरला आल्यानंतर बराच भटकलोय. मांडू, महेश्वर, उज्जैन, औंकारेश्वर इथे अनेकदा जाऊन आल्याने आता कोणाबरोबरही जाताना भूमिका 'गाईडची' असते. बाकी भोपाळ, सांची पाहून झालेय. गेल्या वर्षी जूनमध्ये मध्य प्रदेशचे महाबळेश्वर असलेले पचमढी झाले.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

नितीनमहाजन's picture

27 Apr 2010 - 7:52 pm | नितीनमहाजन

गेपरनाथ - राजस्थानातील कोटा या शहरापासून अगदी जवळ हे ठिकाण आहे.

मला याची माहिती अचानक मिळाली. कंपनीच्या काही कामानिमित्त कोट्याला गेलो होतो. बरोबर अजून काही मित्र होते. रविवारी सुट्टीच्या दिवशी "भटकायला काय आहे" असे हॉटेल मध्ये विचारल्यावर या ठिकाणाबद्दल कळले. सकाळी पोटपूजा करून घेतली व राजस्थान S. T. ने आम्ही निघालो.

कंडक्टरला बजावून संगितले, "गेपरनाथ आनेके बाद बताना. हम नये हैं|".
"हां साब|"

बराच वेळ गाडी चालली होती. मधून मधून कंडक्टरला विचारणे चालू होते, "आया क्या गेपरनाथ?" साधारण ४०, ५० मिनिटांनी कंडक्टर ओरडला, "चलो गेपरनाथ आया|"
दुपारच्या १२ च्या उन्हात आम्ही ७ जण गाडीतून उतरलो ते एका माळ रानात. दूरदूर कुठेही मंदिर काय मनुष्यवस्तीच्या खुणा दिसत नव्हत्या. वाटले, आपण चांगलेच गंडलो. तेव्हढ्यात एक गुराखी मुलगा दूरवर दिसला. ओरडून त्याला विचारले - "गेपरनाथ??". त्याने एका पायवाटेकडे बोट दाखवले. वर उन मी म्हणत होते. लांबपर्यंत फक्त माळरान आणिमाळरान. चला आम्ही ७ शिलेदार गेपरनाथ शोधायला निघालो. टळटळ्त्या उन्हात २० मिनिटे पायपीट केल्यानंतर एक झेंडा दूरवर दिसला. "चला, आलो एकदाचे!" आमच्यातील एक हेविवेट म्हणाला. जरावेळाने त्या झेंड्याजवळ सिमेंटची काही बाके दिसली. आता खात्री पटली की लहान का होईना एक मंदीर नक्की आहे.

जसे त्या झेंड्याजवळ गेलो तसे डोंगर संपलेला, खोल दरी व त्या पलिकडे अजून एक डोंगर. एक सुध्दा झाड नाही. उन्हात चालून दमलो होतो पण बाकावर बसायची सोय नाही एवढी ती तापलेली.

तेव्हढ्यात त्या दरीतून दोन माणसे हुश्श करीत वर आली. आम्ही सर्व जण "आ" वासून पहात राहिलो की ही आली कुठून?

त्यांना विचारले,"गेपरनाथ??". दमल्यामुळे उत्तरादाखल त्यांनी फक्त खाली बोट केले. आता मात्र आमचा उत्साह वाढला. त्यांनी दाखविलेल्या रस्त्याने निघालो. खडा उतार, आणि फक्त एक पाउलवाट.
खाली जाताजाता माणसांचा व पाण्याचा आवाज येत होता. मधुनच घंटांचा आवाज येत होता. खाली उतरल्यामुळे सावली आली. थोड्याच वेळात थंडी वाजू लागली. जवळ जवळ २०० फूट खाली उतरलो.

दोन डोंगरांच्या बेचक्यात खाली एक छोटेसे घुमटीवजा देऊळ दिसू लागले. चला भोलेनाथाचे दर्शन घेऊया म्हणून आम्ही देवळात गेलो.

निसर्गाचा चमत्कार अजून दिसायचा होता. त्या मंदिरात शंकराच्या पिंडीवर एका धबधब्याचा अखंड अभिषेक चालू होता. धबधबा लहान होता. वातावरण अतिशय प्रसन्न होते. ५० एक भाविक दर्शन घेते होते. कुठेही कचरा नाही किंवा गलबला नाही. दर्शनानंतर वर आलो त्या मार्गाकडे पाहिले तर विश्वास बसत नव्हताकी अरे या बाजूने आपण कसे येऊ शकलो? धबधब्याचे पाणी पोटभर पिऊन परतीच्या वाटेला लागलो.

असे शंकराचे मंदिर या आधी पाहिले नव्हते.

नितीन

छोटा डॉन's picture

27 Apr 2010 - 10:13 pm | छोटा डॉन

विषय फार आवडीचा आणि मजेशीर असल्याने भरपुर प्रतिसाद होतील ह्या लेखावर, म्हणुन हा भाग-१

अवांतर ( हो प्रतिसादाच्या सुरवातीलाच ) :
१. राहण्याची व खाण्याची सोय कुठे काय असते हे आम्हाला अज्जाबात ठाऊक नाही व आम्ही कधी त्याच्या नादीही लागत नाही ...
२. किती दिवसात ट्रीप होईल हे सांगता येत नाही, कारण उगाच एखादी स्पॉटवरची चहाची टपरी आवडली म्हणुन तिथेच ३-४ तास टीपी करुन पुढचे प्लानिंग बोंबलायला लावणे ही आमची सवय आहे. त्यामुळे वेळेचा अजिबात अंदाज नाही ...
३. कुठे काय प्रसिद्ध आहे / असते हे ही आम्हाला अजिबात ठाऊक नाही, हवी असल्यास ती माहिती विकीपेडियावरुन घ्याची. आम्ही फक्त मग न्हेईल तिकडे आणि चित्त हरवीत तिकडे काय काय चांगले पाहिले ते सांगणार. छापिल टुरिस्ट बुके आम्हाला वाचता येत नाहीत ...

अस्सो.

----------------------------------------
*** बेंगलोर - श्रवणबेळगोळ-हसन्-चिकमंगरुळ्-केम्मनगुंडी-हेब्बे फॉल्स-बेलुर ( की हळेबीड ? असो ). ***

एखादा ३-४ दिवसाचा सलग सुट्ट्या असलेला विकांत असला व जास्त उन वगैरे नसले की मस्तपैकी ट्रीपचे प्लानिंग सुरु करावे, रोज रात्री जेवताना मोठ्ठ्या मोठ्ठ्या चर्चा वगैरे कराव्यात, गुगलमॅप्स पाहुन ठेवावेत. आत्ता आपण जे जे काही करणार आहोत त्यातली एकही गोष्ट पुढे आपल्या प्रवासात अजिबात उपयोगी पडणार नाही हे आपले उगाच असु द्यावे, ऐनवेळी धक्का नको बसायला ...
वीकडेज्सच्या शेवटच्या दिवशी दिवसभर एकमेकांना फोन करुन रात्री घरी लौकर येण्यास बजावुन सांगावे व आपण स्वतः रात्री सर्वात उशीरा म्हणजे १० नंतर वगैरे उगवावे, त्याआधी किमान ३ तास आपला फोन बंद करुन ठेवन्याची खबरदारी घ्यावी. साधारणता ही क्रिया आपल्या कंपुतले किमान २ जण तरी पार पाडत असल्याने शक्यतो ज्वालामुखीत लोळण्याची पाळी आपल्या एकट्यावर येत नाही.
ट्रीप हुकल्याच्या वैतागात रात्री एकमेकांवर येथेच्छ टीका ( ह्याला सभ्य भाषेत शिवीगाळ वगैरे म्हणतात ) वगैरे झाली की अंदाजे २ नंतर झोपुन जावे.

दुसर्‍या दिवशी मग सकाळी १० नंतर वगैरे उठुन चहा पिण्याच्या निमित्ताने एकमेकांच्या मुडचा अंदाज घ्यावा, जी काय चाय-शिग्रेट असेल ती शेअर करुन सम्झोता करावा व "आता काय जमु शकेल?" अशी चर्चा सुरु करावी. बहुतेक पब्लिकची कालच पेटली असल्याने भराभर प्लान्स जमतात व आपण चक्क दुपारी २ ला सामान घेऊन व जेवण वगैरे आटपुन बाहेर पडतो, अशा ट्रीपमध्ये फार मज्जा येते.
कुणीतरी सज्जन महात्मा त्या मधल्या काळात गाडी ठरवणे, रुटमॅपची प्रिंट घेऊन येणे, रस्त्यात खायला काही स्नॅक्सची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या व 'इतर' गोष्टी जमा करुन ठेवतो, ह्याची काळजी आपल्याला करण्याची गरज नसते कारण आपण नेहमी हे काम बिघडवुन ठेवतो हे आठवुन आपली औकाद ओळखुन शांत बसावे. असो.

शेवटी कशीबशी आमची गाडी ( इनोव्हा होती बरं का, काय समजलात ? ) बेंगलोरच्या बाहेर अंदाजे ३-३.१५ ला पडते. गाडीत नेहमीप्रमाणे दंगा चालु असतोच ( सगळेच काही इथे लिहण्यासारखे नाही. असो )
१. श्रवणबेळगोळ :
गाडी शहराबाहेर निघुन अंदाजे २ ते २.५ तास झाले ( मधले चहाचे २ हाल्ट वगळुन ) की आपल्याला समोर एक छान नेटकेसे जुने शहर दिसु लागते. ऑलरेडी संध्याकाळ झालेलीच असते त्यामुळे आवराआवरीची एक टिपिकल लगबग गवात दिसुन येते. गाडी हळुहळु गर्दीतुन वाट काढत 'भगवान महावीर' ची प्रचंडकाय मुर्ती असलेल्या देवळाच्या पायथ्याशी येते, भगवानांचे दर्शन तर ऑलरेडी दुरुनच झाले असते. दिस अगदी बुडायला आलेला असतो व एक मस्त केशरी सायंछाया त्या डोंगरावर पसरलेली असते. छे, नुसते शब्दाने लिहण्यात अर्थ नाही, जरा हे पाहुन घ्या बरे ...

जास्त अंधार झाला की वर सोडत नाहीत ही ( बहुदा ) चुकीची माहिती पटकन आपल्याला समजते, बाकी सगळे तसेच टाकुन आपण मंदिराकडे पळत सुटावे. बरोब्बर पायथ्याशी आले की समोरच्या अगणीत पायर्‍या बघुन आपला उत्साह निम्मा तिथेच संपतो पण त्याची काळजी करु नये. दुसर्‍याच्या धाप लागण्याला नावे ठेवताना "अरे ते बघ तिकडे काय आहे" असे दुसर्‍याला सांगत आपण मुकाट आपला दम पाण्याच्या घोटाखाली शमवुन घ्यावा व वर चढत रहावे. दिवसभर एसी+पीसी हीच सवय असल्याने आपला दम अंदाजे निम्या पायर्‍यातच संपतो पण खुद्द 'भगवानांची' आपल्याला भेटायची इच्छा असल्याने आपण कसेबसे ते अवघड चढ कम पायर्‍या चढत वर जातो. शेवटच्या अंदाजे ५० पायर्‍या राहिल्या की आपल्याला धीरगंभीर आवाजात चाललेली कसल्यातरी श्लोकाची प्रसन्न आवर्तने ऐकु येतात, भगवानांचा संध्यासमयी 'मस्तकाभिषेक' चालु असतो हे आपल्या लक्षात येते. तो क्षण गाठायचा म्हणुन सगळा ग्रुप आहे नाही तेवढा जोर लाऊन पळत सुटतो ते थेट मंदिराकडे. आत गेल्यावर गाभार्‍यातुन नुसतेच भगवानांचे पाय दिसतात, गर्दील बाजुला सारुन आपण आत असेच घुसायचे व पार भगवानांच्या पायाजवळ जाऊन उभे रहायचे व तो सोहळा अनुभवायचा. दुध, दही, फुले व इतर अभिषेकांच्य वस्तुंनी भगवानांच्या पायांवर अखंड अभिषेक चालु असतो व त्याला सोबत असते ती भगवानांच्या 'जयघोषाची'. अशा वेळी आपला धर्म वगैरे विसरुन आपणही त्या जयघोषात सामिल व्हायचे व त्याचा निखळ आनंद लुटायचा व आत्तापर्यंत जाणवत असलेला थकावा आता कुठे गर्दीत लुप्त झाला हे शोधत रहायचे.
सर्व सोपस्कार पुर्ण झाले की तिथलेच त्या अभिषेकाच्या तिर्थाइतकेच पवित्र आणि थंड असे साधे पाणी प्यायचे व परतीची वाट पकडायची, आत पुर्ण श्रवणबेळ्गोळ अंधारात बुडले असते व जे काही तेज आहे ते असते फोकस मारलेल्या 'भगवानांच्या चेहर्‍यावर' व त्याच्या भक्तीसाठी जमलेल्या 'भक्तांच्या चेहर्‍यावरच्या समाधान' ह्याचेच, अत्यंत पवित्र आणि प्रसन्न.
खाली जाऊन थोडी पेटपुना करावी व पुन्हा स्टार्टर मारुन श्रवणबेळगोळला परतीचा नमस्कार करावा, वरुन भगवान तुमच्याकडे पाहुन मंद हसत असतातच ...

आपण केलेला उशीर व आपला दंगा हे पाहुन गाडीच्या ड्रायव्हरचे अवसान मध्येच संपते व तो आपण आता वनशॉट गाडी मारुन तुम्हाला रात्रीत 'चिकमंगरुळला' पोहचवु शकत नाही ही मजेशीर माहिती देतो. नियमाप्रमाणे गाडीतले २-३ जण चिडतात व २-३ जण "हो बाबा, आता जरा आराम हवाच' असा सुर लावतात. अजुन १-२ जणांचे काहीच म्हणणे नसते व त्यांनी मागे ऑलरेडी आराम सुरु केलेला असतो. शेवटी मग सर्वानुमते रात्र दुसरीकडे काढुन पार सक्काळच्याला चिकमंगरुळात शिरायचे ठरते.
गाडी पुन्हा मार्गाला लागते, अचानक एक बर्‍यापैकी मोठ्ठ्या शहरात सगळीकडे "येच्च डी देवेगौडा व कुमारस्वामी' ह्या जनता दलाच्या नेत्यांची पोस्टरे दिसु लागतात, भाषा तर ऑलरेडी समजत नसतेच व ते विचारायलाही कुणी जागे नसते. गाडी एका चांगल्या हॉटेलापाशी व थांबते व १-२ सज्जन जाऊन बुकिंग वगैरे सोपस्कार पार पाडतात. शेवटी आत जाऊन फ्रेश वगैरे झाले की व पोटात ४ घास ढकलेली की ही टोळी जरा शुद्ध हवा खायला बर्म्युडा व बनियन / स्लीव्हलेस टीशर्ट / भयाण टी-शर्ट ह्या वेशात बाहेर पडते. साधे सरळ गावकरी हे रुप पाहुनच टरकुन जातात आपापसात 'यंडुगुंडु आंडुगुंडुं' सारखे कुजबुजत राहतात. एक सज्जन पानाची टपरी गाठुन त्याच्याशी सौदा करताना गावाचे नाव "हसन" आहे ही माहिती काढुन आणतो.
मग आपल्या डोक्यात ट्युब पेटते, आयला हेच हसन होय.
देवेगौडा इथुन दरवेळी जिंकुन येण्याचा विक्रम करत येतात व संसदेत जाऊन झोपा काढतात.
कर्नाटकच्या राजकारणातल्या एक महत्वाच्या पार्टीचा हा बालेकिल्ला.
शहराचे रुप आणि रंगढंग ह्या ओळखीला साजेसाच ...
रात्री सुनसान रस्त्यावर हिंडताना हे सारे सहज दिसुन येते.

पण सकाळी लवकर चिकमंगरुळकडे निघायचे असल्याने ही सफर अशीच सोडुन ही गँग हॉटेलात परतते व शांतपणे झोपुन जाते व "हसन"चा जीव भांड्यात पडतो व शहरसुद्धा शांतपणे निद्रादेवीच्या आधीन जाते.
झोपताना हलकेच ऐकु आलेली उडत्या स्वराच्या सोनु निगमने गायलेल्या कन्नड गाण्याची सुरावट व सकाळ सकाळ ऐकु आलेल्या ( नव्हे त्यामुळे झोप मोड झालेल्या ) एखाद्या कन्नड विक्रेत्याची अगम्य आरोळी ही ओळख मनात ठेऊन व देवेगौडा पितापुत्रांना लांबुन नम्स्कार करुन दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही 'हसन' ला रामराम ठोकतो व पुढे कुच करतो. वास्तविक पाहता देवेगौडा पण नेहमी असेच बंगरुळला कुच करत असतात व मध्येच त्यांना खुप झोप येत असल्याने आजपर्यंत त्यांनी असा ट्रीपचा वगैरे अहवाल लिहला नसल्याचे आम्हाला 'आतल्या गोटातुन' कळाले.
असो.

---------------------------------------------

क्रमश :

( चला, जेवळ करुन येतो, बाकीचे नंतर .... :( )

------
( क्रमशः प्रवासी )छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

संदीप चित्रे's picture

28 Apr 2010 - 12:03 am | संदीप चित्रे

तर छोटासा छान लेखच आहे रे डॉन्या.
अशाच प्रकारचे प्रतिसाद - २, ३ वगैरे टाकण्यापेक्षा लेखमाला टाक ही रिक्वेष्ट आहे... !
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Apr 2010 - 9:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी! डान्राव, लिहाच तुम्ही!!

लेखाचा विषय उत्तम! सर्व भटक्या लोकांनी या विषयावर लेखन केल्यास एक उत्तम संदर्भ तयार होऊ शकेल.

(घरकोंबडी) अदिती