शाही टुकडा...

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in पाककृती
10 Jun 2009 - 10:33 pm

या पदार्थात शाही म्हणण्यासारखे काय आहे माहित नाही.. जिथे सर्वप्रथम खाल्ला.. तिथे याच नावाची पाटी होती.. [नाहीतरी.. नावात काय आहे?]. कृती आंतरजालावरचीच आहे.. थोडाफार बदल केलाय सुचेल तसा..

साहित्यः
१. चार ब्रेड स्लाईसेस
२. पाव वाटी तूप
३. १५०-२०० मिली दूध
४. वाटीभर साखर.. [गोडाच्या आवडीनुसार कमी-जास्त करता येईल ]
५. वेलची, चारोळी
६. रोझ इसेन्स
७. सजावटीसाठी बदाम पिस्त्याचे काप, चांदीचा वर्ख.

पाककृतीसाठी लागणारा वेळ : तीस मिनिटे

पाक़कृती:
१. प्रथम आटीव दूध तयार करून घ्यावे.. त्यासाठी दुधात साखर नि वेलची घालून ते मंद आंचेवर आटवण्यास ठेवावे.. [लागणारा वेळ साधारण २० मिनिटे]
२. ब्रेड स्लाईसेस च्या कडा सुरीने कापून टाकाव्यात.. नि ब्रेड स्लाईसचे त्रिकोणकृती दोन किंवा चार भाग करावेत..
३. सपाट बुडाच्या कढईत थोडे थोडे तूप घालून हे त्रिकोणकृती तुकडे सोनेरी रंगावर तळून घ्यावेत..
४. आटलेले दूध थोडे थंड झाले की त्यात आधी रोझ इसेन्स घालून नंतर हे तळलेले तुकडे घालावेत..
५. बदाम पिस्त्याचे काप घालून नि वर्ख लावून सजवावे [ घरी आयत्यावेळी या तिन्ही वस्तू नव्ह्त्या म्हणून एव्हरेस्टचा केशरी दूध तयार करण्याचा मसाला होता तो घातलाय.. त्यात बदाम पिस्त्याचे काप तर असतातच.. नि त्याचे चूर्ण ही असते.. हे दूधात मिसळले जाऊन आणखी छान लागतेआणि वर्खाला फाटा दिलाय :) ]
६. १५-२० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून थंड केले.. की खायला तय्यार...!!!!

खरंतर काल मी दोन पदार्थ बनवले.. पिकल्या आंब्याचा मुरांबा नि शाही टुकडा.. त्यातला पहिला पदार्थ पूर्णपणे फसला!!! ;)

तो फक्त दिसतोय चांगला!!! बाकी...इतका घट्ट आहे की कापायला धारदार सुरी वापरावी लागतेय.. चवीबद्द्ल विचारू नका.. काकवीतला आंबा.. किंवा घट्ट आंबापोळी.. आंबा चिक्की.. नक्की काय चव आहे..!हेच कोडं आहे!!!
एवढे करून खायचा प्रयत्न केला.. तर इक्लेअर चॉकलेट्सारखे, दात.... टाळू.... दाढा.... हिरड्या.. जिथे जिथे चिकटणे शक्य आहे.. अशा सर्व ठिकाणी चिकटतो.. नमनालाच असं घडल्यामुळे दुसरा पदार्थ कसा बनेल ही शंकाच होती.. म्हणून प्रत्येक कृतीचे फोटो काढले नाहीत.. शेवटी तयार झाल्यानंतर एकदा खाऊन पाहिला.. नि मगच फोटो काढला... :)

अवांतरः पिकल्या आंब्याचा मुरांबा खाण्यासाठी अजून गिनिपिग मिळाला/ली नाही.. :(

प्रतिक्रिया

टिउ's picture

10 Jun 2009 - 10:45 pm | टिउ

पिकल्या आंब्याचा पाक की हो फसलाऽऽऽ

फोटू खरंच भारी आला आहे...

दिपाली पाटिल's picture

10 Jun 2009 - 11:04 pm | दिपाली पाटिल

मी ऐकलं की पाक घट्ट झाला कि थोडं पाणी टाकुन फक्त गरम करावं तर चांगला होतो पण फ्रिज मध्ये च ठेवावं, असं ऐकलं आहे.
बाकि शाही टुकडा छान दिसतोय..

दिपाली :)

मस्त कलंदर's picture

10 Jun 2009 - 11:09 pm | मस्त कलंदर

>>मी ऐकलं की पाक घट्ट झाला
ऐकलं ??? :SS

पहिलाच प्रयत्न असल्याने पाक घट्ट झालाय की पुढे गेलाय हे कळायला काही मार्ग नाही..
गॅसवर पाणी ठेवलंय गरम करायला.. प्रगती (?) किंवा जे काही होईल ते सांगेनच...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त कलंदर's picture

11 Jun 2009 - 1:44 pm | मस्त कलंदर

गरम पाणी घालण्याची युक्ती लागू पडली.. आता आधीपेक्षा खूपच चांगला झालाय.. मी एका काकूंनी बनवलेला मुरांबा खाल्ला होता.. अप्रतिम होती त्याची चव.. तशी चव मात्र जमायला वेळ लागेल..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

सुबक ठेंगणी's picture

14 Jul 2009 - 6:53 am | सुबक ठेंगणी

नंतर पाणी घातलं तरी मुरांबा टिकतो का?

(शंकेच्या पालीची पालक) सुबक

रेवती's picture

10 Jun 2009 - 11:44 pm | रेवती

शाही टुकडा छान झालाय असं फोटूवरून कळतय!
हा पदार्थ पहिल्यांदा हैदराबादला चाखला आणि आवडलाही.
पाक मात्र जरा पुढं गेलाय खरा!
दिपाली म्हणतीये तसं गरम पाणी अगदी थोडं घालून बघायला हरकत नसावी.
रेवती

चकली's picture

11 Jun 2009 - 3:37 am | चकली

छान झालाय शाही टुकडा!!
चकली
http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर's picture

11 Jun 2009 - 12:11 am | विसोबा खेचर

शाही तुकडा क्लासच दिसतो आहे!

हा प्रकार मी इंदौर आणि जबलपूरला अगदी मनसोक्त खाल्ला आहे! त्याचा स्वाद चढल्यामुळे पुढला काही काळ मी आपल्याच मस्तीत विलक्षण माजोरीपणे, मस्तवालपणे वागल्याचे आठवते! :)

मुरांब्याकरता बेटर लक नेक्स्ट टाईम! :)

बाय द वे, कालपरवाच आमच्याही सुगरण म्हातारीने पिकल्या हापूस आंब्याचा मुरांबा केला आहे! दिसायला आणि चवीलाही भन्नाट झाला आहे! :)

आपला,
(मातृभक्त, मुरांबाभक्त, जबलपूरप्रेमी) तात्या.

चतुरंग's picture

11 Jun 2009 - 12:15 am | चतुरंग

बाय द वे, कालपरवाच आमच्याही सुगरण म्हातारीने पिकल्या हापूस आंब्याचा मुरांबा केला आहे! दिसायला आणि चवीलाही भन्नाट झाला आहे!

आम्ही फोटूशिवायच्या पाकृंना प्रतिसाद देत नाही, क्षमस्व! ;)

(लबाड)चतुरंग

विसोबा खेचर's picture

11 Jun 2009 - 12:22 am | विसोबा खेचर

आम्ही फोटूशिवायच्या पाकृंना प्रतिसाद देत नाही, क्षमस्व!

अरे रंगा, फोटू टाकतो बाबा उद्या! आता रात्रीचे बारा वाजून गेलेत. म्हातारी झोपली आहे! उद्या खास तुझ्याकरता त्या मुरांब्याचा चांदीच्या वाटीतला फोटू टाकीन! :)

आपला,
श्रीमंत तात्यासाहेब पेशवे! :)

चतुरंग's picture

11 Jun 2009 - 12:25 am | चतुरंग

चांदीच्या वाटीतल्या सोनेरी मुरांब्याची वाट बघतो!! :W

(नाना फडणवीस)चतुरंग

चतुरंग's picture

11 Jun 2009 - 12:21 am | चतुरंग

मुरांब्यासाठी शुभेच्छा!
(अवांतर - नेनेकाकू करायच्या तसा हापूसचा मुरांबा मी कधीही खाल्लेला नाही! आता तोही मिळणार नाही गेल्यावर्षीच गेल्या बिचार्‍या.)

(दु:खी)चतुरंग

विसोबा खेचर's picture

11 Jun 2009 - 12:29 am | विसोबा खेचर

(अवांतर - नेनेकाकू करायच्या तसा हापूसचा मुरांबा मी कधीही खाल्लेला नाही! आता तोही मिळणार नाही गेल्यावर्षीच गेल्या बिचार्‍या.)

कदाचित तू म्हणतोस त्याप्रमाणे अगदी नेनेकाकू करायच्या तसा उत्कृष्ट तुला वाटणार नाही, परंतु कधी घरी आलास तर अभ्यंकर काकूंच्या हातचा मुरांबा वाढीन हो तुला! आवडतो का ते अवश्य सांग! :)

एनीवेज, नेनेकाकूंना माझी विनम्र आदरांजली...!

ही पूर्वीची सुगरण माणसं एकेक करून चालली याचं मात्र वाईट वाटतं! यांच्यासोबत यांच्या हातची सुरेख चवही काळाच्या ओघात हरवणार याची खंत वाटते!

कोण कुठल्या नेनेकाकू! मी त्यांना कधी पाहिलंही नाही, परंतु याक्षणी उत्तम मुरांबा बनवणार्‍या त्या माउलीबद्दल उगाचंच क्षणभर हळवा झालो आहे!

तात्या.

मैत्र's picture

11 Jun 2009 - 10:21 am | मैत्र

हैदराबादला डबल का मीठा नावाने असाच पदार्थ मिळतो...
मस्त लागतो हा ब्रेडचा टुकडा...

पाकृ साठी धन्यवाद !

श्रीयुत संतोष जोशी's picture

11 Jun 2009 - 12:23 pm | श्रीयुत संतोष जोशी

शाही तुकडा छानच जमला आहे.

फक्त एकच सांगावेसे वाटते की दूध आटवताना त्यात साखर आणि वेलची शक्यतोवर घालू नये. दूध फाटण्याचा संभव असतो.
दूध आटवून झाल्यावर थंड करताना साखर घालावी आणि पूर्ण थंड झाल्यावर मग वेलची घालावी.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jun 2009 - 6:42 pm | परिकथेतील राजकुमार

शाही टुकडा एकदम मस्तच दिसत आहे, चवीलाही तेव्हडाच शाही असावा.

बाकी मुरांब्याची चिक्की सुद्धा आवडली.

परा मगनलाल चिक्कीवाले.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मस्त कलंदर's picture

11 Jun 2009 - 7:06 pm | मस्त कलंदर

आता मुरांब्याची चिक्की नाही.. छान मुरांबाच आहे आता तो.. ;)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jun 2009 - 7:28 pm | परिकथेतील राजकुमार

ते वाचले ग पण मला आधीची चिक्कीच आवडली असे मला सांगायचे होते. एक नवी पाकृ. ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अमेरिकन त्रिशंकू's picture

11 Jun 2009 - 8:01 pm | अमेरिकन त्रिशंकू

ही अमेरिकेतील ब्रेड पुडिंगची भारतीय आवृत्ती दिसते आहे.

http://images.google.com/imgres?imgurl=http://friendseat.com/user_upload...

चित्रा's picture

11 Jun 2009 - 8:42 pm | चित्रा

एका नवीन लग्न झालेल्या पोरीने शाही टुकडा करून मला अचंबित केले होते. म्हणजे तसे मीही फुटकळ प्रयत्न करीत असे लग्न झाल्यानंतर असले गोडधोड करण्याचे, पण तिने पदार्थ फारच सुबकपणे केला आणि वाढला होता. अशा नवीन लग्न झालेल्या मुली इतक्या छान स्वयंपाक करताना पाहून त्या वयात मी जेव्हा होते तेव्हाची फारच लाज वाटते.

वरचेही प्रदर्शन खूप छान. मुरांबाही चांगला दिसतो आहे की.

क्रान्ति's picture

11 Jun 2009 - 10:31 pm | क्रान्ति

पाकृ! दोन्हींचे फोटो पाहून पाणी सुटलं तोंडाला.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

स्वाती दिनेश's picture

12 Jun 2009 - 1:15 pm | स्वाती दिनेश

शाही टुकडा एकदम शाही दिसतो आहे, दूधमसाला घालायची आयडीया मस्त..
(एकदा मी श्रीखंडात आणि एकदा खिरीमध्येही दूधमसाला घातला होता.. बदाम पिस्त्यांच्या कापाऐवजी, मस्त लागत होतं..)
मुरांब्याच्या गडबडीबद्दल रेवतीने लिहिले आहेच परत तेच सांगत नाही..:)
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

13 Jul 2009 - 11:26 pm | प्रभाकर पेठकर

या पदार्थात शाही म्हणण्यासारखे काय आहे माहित नाही..
एक पाव वगळता बाकी सर्व घटक गरीबांना परवडणारे नाहीत. (निदान 'त्या' काळी नव्हते.) असो.

आटीव दूध (त्याला खमंग चव आली पाहिजे) तितकेच घालावे जितके पावाचा स्लाईस पूर्णपणे भिजण्यासाठी आवश्यक असते. (फोटोत ते मला जरा जास्त वाटते आहे. ) पावावर खवा किसून भुरभुरावा. त्यावर सुक्यामेव्याचे तुकडे घालावेत. गरज वाटल्यास वरुन पुन्हा आटीव दूध शिंपडावे.
साजूक तुपात तळलेले स्लाईस साखरेच्या पाकात बुडवून नंतर आटीव दूधाने चिंब करून आणि सुक्या मेव्याने सजवूनही हा पदार्थ केला जातो.
आंब्याच्या मुरंब्यातील साखरेचा पाक कच्चा असावा. जास्त आटवू नये. साखरेच्या अर्धे पाणी घेउन गरम केल्यावर साखर विरघळली की गॅस बंद करावा आणि थंड झाल्यावर आंब्याच्या फोडी मिसळाव्यात.
दोन्ही पदार्थ दिसताहेत छान आणि चवीलाही छानच झाले असणार.
अभिनंदन.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.