साप्तहिक लोकप्रभा मधिल हा लेख काही दिवसांपूर्वी वाचनात आला, जाणकार मंडळी कडून या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यात यावा अशी विनंती
कुटुंबसंस्था आम्ही पवित्र असल्याचे धरून चालतो. तिचे गोडवे गातो. पण प्रत्यक्षात तो काय आहे हे लक्षात घेत नाही. कारण येथे विचारांवर संस्कार मात करतात. कुटुंब संस्था ही मुळात शेती संस्कृतीची निर्मिती आहे. कुटुंब हे मालमत्तेचे एकक म्हणजे युनिट ऑफ प्रॉपर्टी असते. त्यात कुटुंबप्रमुखाची एकाधिकारशाही व इतरांचे दुय्यम स्थान अटळ असते. कुटुंब सत्ताकारणापासून कधीच मुक्त नसते. त्यामुळेच पिता-पुत्र संघर्ष उद्भवतात. शेतीचे संरक्षण स्वत:च करावे लागते. म्हणून एकत्र कुटुंब जेवढे मोठे तेवढे उत्तम. अशा परिस्थितीत वयात आलेल्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न असे. म्हणून मुलीचे लग्न लवकर उरकून टाकण्याची प्रथा पडली. त्यामुळे गोत्रगमनाचा (incest) धोका टळत असे. सासरी तसे काही घडले तरी ते आतल्या आत. सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागत नव्हता.
ही व्यवस्था टिकून राहावी म्हणून भावनात्मक परावलंबनाचे उदात्तीकरण करण्यात आले. पुरुषप्रधान अधिकारशाहीला सोयीस्कर अशी मूल्ये धार्मिक वाङ्मय, ललित साहित्य व राजनीती यांनी सातत्याने िबबविली. अशोकाने प्रजेला पुत्र व पौत्र मानले ते त्यांची राजनिष्ठा संपादण्यासाठी. गांधीजीसुद्धा एका विशाल कुटुंबाचे प्रमुख या नात्यानेच वागत होते. औद्योगिक क्रांतीबरोबर ही व्यवस्था ढासळणे अपरिहार्य होते. तरी आजही धंदा, राजकारण वगैरे क्षेत्रात फॅमिली मॉडेलच आदर्श मानले जाते. त्यामुळे व्यावसायिकतेचा बळी दिला जातो. कुटुंबाचे विश्व थोडे विस्तारले की त्यात नातलग व जात यांचा अंतर्भाव होतो. कारण जात ही विस्तारित कुटुंबच असते. अपत्यप्रेम हा कुटुंबाचा आत्मा. कारण अपत्य हे जीवशास्त्रीय गरज तसेच अमरत्वाचे प्रतीक असते. असुरक्षिततेची भावना जेवढी वाढते तेवढी अपत्यांसाठी करून ठेवलेली तरतूद अपुरी भासू लागते. भ्रष्टाचार अटळ बनतो व आर्थिक विषमता वाढत जाते.
याचा अर्थ कुटुंबसंस्था धिक्कारणे असा नव्हे. पण वस्तुस्थितीपासून पलायन किती करणार याचे भान हवे. आमची मते रोमँटिसिझमच्या प्रभावाखालीच वावरतात. जीवनशैली अत्याधुनिक व भावनात्मक सुखदु:खे मात्र मध्ययुगीन अशी सोयीस्कर सांगड घातक ठरल्याशिवाय राहणार नाही. ती आम्हाला सतत भूतकाळाकडे खेचते
प्रतिक्रिया
27 May 2009 - 1:58 am | विकास
नक्की यातून नक्की "कवीला काय म्हणायचे आहे" (हा एक वाक्प्रचार आहे, या संदर्भात लेखकाला..!) ते समजले नाही. लेखक/लेखिकेचे नाव आणि मूळ दुवा मिळाल्यास बरे होईल.. तसेच येथे लेख टाकताना आपल्यालापण काय वाटते ते समजले तर बरे होईल!
बाकी माझे लहानसे निरीक्षण सांगते की हल्ली भारतात, विशेष करून शहरी आणि निमशहरी भागात मुले टिनएजर्स झाल्यावर "एकत्र विभक्त" कुटूंब पद्धतीच अस्तित्वात येऊ लागली आहे. एकाच वेळेस आईचा, वडलांचा, मुलांचा कुठे न कुठे तरी फोन चालू असतो. एकत्र जेवणे आणि त्यात काही तरी संवाद साधणे हा प्रकार पण कमी होत चालला आहे. त्याला दोन्ही बाजू कारणे आहेत (पालक आणि मुले). आता असे असणे हे समाजाच्या दृष्टीने एकंदरीत चांगले नाही असे मला वाटते. त्याचा अर्थ जर वरील लेखात म्हणल्याप्रमाणे, "जीवनशैली अत्याधुनिक व भावनात्मक सुखदु:खे मात्र मध्ययुगीन अशी सोयीस्कर सांगड घातक ठरल्याशिवाय राहणार नाही" असा कोणी घालू लागले तर घालूंदेत...
कारण जेंव्हा कुटूंबव्यवस्था असणे महत्वाचे वाटते तेंव्हा त्याचा संबंध हा मध्ययुगीन, संस्कृती वगैरेशी लावण्याऐवजी समाजशास्त्राशी लावावासा वाटतो. जेंव्हा कुटूंबात अथवा कुठेही (उ.दा. शाळेत शिक्षक-विद्यार्थी) संवाद उरत नाही तेंव्हा त्यातून मुलांची वाढ निकोप होण्याची शक्यता कमी असते असे वाटते.
>>>औद्योगिक क्रांतीबरोबर ही व्यवस्था ढासळणे अपरिहार्य होते. तरी आजही धंदा, राजकारण वगैरे क्षेत्रात फॅमिली मॉडेलच आदर्श मानले जाते. त्यामुळे व्यावसायिकतेचा बळी दिला जातो. कुटुंबाचे विश्व थोडे विस्तारले की त्यात नातलग व जात यांचा अंतर्भाव होतो. कारण जात ही विस्तारित कुटुंबच असते.<<