रसिकतेसाठी गुणांची आवश्यकता ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
10 Feb 2008 - 12:41 pm
गाभा: 

आस्वाद हा शब्द भरतमुनी यांनी आपल्या नाट्यशास्त्र ग्रंथामधे वापरल्याचे वाचनात आहे. खरे तर आस्वाद हा शब्द पाकशास्त्राशी संबंधीत असावा,. चव घेणे, असा त्याचा सरळ अर्थ. नुसते पोटाची खळगी भरण्यासाठी खाणे म्हणजे आस्वाद होऊ शकत नाही. खरा आस्वाद घेण्यासाठी आवडीने खावे लागते. तसेच वाचन करणे म्हणजे साहित्यकृतीचा आस्वाद नव्हे. तर त्या साहित्यातील कलागुणांचा, सौंदर्याचा अभिरुचीपूर्वक आस्वाद घेणे म्हणजे रसग्रहण. आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे.

असो, प्रास्ताविकाचे कारण असे की एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? असले पाहिजेत का ? लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? रसिकता ही जन्मजात असते ? विकसीत करावी लागते ? वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? या आणि अधिक प्रश्नांच्या उत्तरासाठी हा काथ्याकूटाचा प्रपंच !!!!

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

10 Feb 2008 - 1:41 pm | विसोबा खेचर

बिरुटेशेठ,

लय भारी चर्चाप्रस्ताव...आवडला आपल्याला!

आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे.

सहमत आहे...

या आणि अधिक प्रश्नांच्या उत्तरासाठी हा काथ्याकूटाचा प्रपंच !!!!

ही घ्या आमची काही उत्तरे..

प्रास्ताविकाचे कारण असे की एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ?

संबंधित कलेसंदर्भातील माहिती, अनुभव किंवा ज्ञान जर वाचकाकडे/श्रोत्याकडे असेल तर त्या कलेतील त्याचा आस्वादाचा आनंद निश्चितच दुणावतो. एकवेळ माहिती, अनुभव किंवा ज्ञान हे नसले तरी चालेल, परंतु किमान रसिकता हा गुण मात्र त्याच्याकडे असणे आवश्यकच आहे असे मला वाटते! रसिकताच जर नसेल तर मात्र सगळेच मुसळ केरात! :)

उदाहरणार्थ,

यमन ऐकत असताना जर गायकाने शुद्ध मध्यमाचा प्रयोग केला तर जाणकार श्रोता,

'क्या बात है, काय छान शुद्ध मध्यम लावलाय! मध्येच यमनकल्याणचा रंग आवडला!' असं म्हणेल.

परंतु जो श्रोता जाणकार नाही परंतु रसिक आहे तो नुसतीच,

'क्या बात है!' अशी मनमोकळी दाद देईल! परंतु आनंद मात्र त्यालाही तेवढाच होईल.

आणि जो जाणकारही नाही, आणि रसिकही नाही तो काहीच प्रतिक्रिया देणार नाही! :)

आमचे काकाजी देवासकर त्याला 'स्थितप्रज्ञ' असं म्हणायचे बरं का! जो आंब्याच्या फोडी आणि कागद एकाच चवीने खातो तो स्थितप्रज्ञ! :)

अवांतर - बरं का बिरुटेशेठ, काही मराठी संस्थळांवर तुम्हाला असे बरेच स्थितप्रज्ञ बघायला मिळतील! :))

लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ?

उतरू शकते, पण नॉट नेसेसरिली! वाचता वाचता, वाचकाच्या मनातली, वाचकाच्या अनुभवविश्वातलीही एखादी कलाकृती वाचकाच्या डोळ्यासमोर उभी राहू शकते/शकत असावी! असे वाटते.

रसिकता ही जन्मजात असते?

बर्‍याचदा! जसं कलाकार हा जन्मावा लागतो असं म्हणतात, तसंच रसिक हा देखील जन्मावाच लागतो असं म्हटल्यास ते फारसं वावगं ठरू नये!

विकसीत करावी लागते ?

करता येते! काही प्रमाणात विकसित होऊ शकते!

उदाहरणच द्यायचं झालं तर बिरुटेशेठ, आपल्यासारखी मंडळी अगदी अभ्यासपूर्वक आणि भरभरून लोककलेबद्दल लिहितात. ते वाचून त्या कलेबद्दल एखाद्याची रसिकता ही निश्चितच विकसित होऊ शकते असे म्हणण्यास वाव आहे.

अस्मादिकांची 'बसंतचं लग्न' ही लेखमाला वाचून काही वाचक गण, जे आधी विशेष ऐकत नव्हते त्यांनी आता हिंदुस्थानी अभिजात संगीत आवडीने ऐकायला सुरवात केली आहे, त्यांच्यात तशी आवड निर्माण झाल्याचे त्यांनी आम्हाला कळवले आहे!

वि सू - इथे आमच्या बसंतच्या लग्नाची टिमकी वाजवायचा हेतू नसून केवळ उदाहरणादाखल हे लिहिले आहे असे नम्रतेने नमूद करतो! :)

वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ?

नक्कीच असावा लागतो!

असो,

बिरुटेशेठ, खरंच चांगला चर्चाप्रस्ताव. या निमित्ताने आपण आम्हाला आमचेही विचार मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपल्याला थँक्यू! :)

आपला,
बापुभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, (जिथे आग्रेवाली रोशन पुरिया गायली होती!)
इंदौर!

:)

छोटा डॉन's picture

13 Feb 2008 - 11:47 pm | छोटा डॉन

वाह, क्या बात है !!!!!!!! मान गये ऊस्ताद ....
"तात्या" कसले जबरदस्त "विश्लेषण करणारे विवेचन" लिहले आहे तुम्ही .... ताते, त्वाडा जवाब नही .....

आमची सुध्धा आपल्या मताच्या आसपास जाणरी मते आहेत ........

नुसताच रसीक .... छोता डॉन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2008 - 3:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,चर्चेच्या प्रोत्साहानाबद्द्ल,आवडीबद्दल थँक्स.....!!! :)

बाकी रसिकतेच्या बाबतीत आमचे एक ढोबळ मत असे की, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते. असे जरी असले तरी प्रत्येकाला काहीना काही आवडत असतेच. तो त्या कलेचा आस्वाद घेतो.

आता आपण दिलेले उदाहरण पाहा.......

>>यमन ऐकत असताना जर गायकाने शुद्ध मध्यमाचा प्रयोग केला तर जाणकार श्रोता,
क्या बात है, काय छान शुद्ध मध्यम लावलाय! मध्येच यमनकल्याणचा रंग आवडला!' असं म्हणेल.

आता आम्हाला यातले यमन माहितच नाही, तेव्हा त्यातले शुध्द मध्यम ही गोष्ट आमच्या डोक्यावरुन जाईल.

याचा अर्थ असा झाला की आम्हाला यमनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
कलेच्या बाबतीत आस्वादाचेही भिन्न स्वरुप असले पाहिजे असे वाटते ?

(अनुष्काचे ) किंवा एखादे सुंदर चित्र पाहिले की, लगेच आपण सुंदर म्हणतो, यमनाचे आरोह-अवरोह समजून मग दाद द्यावी लागेल त्याऐवजी लावणी असेल तर फार बारकावे पाहण्याची गरज नसते ;)

मनाची भूक भागविण्यासाठी प्रत्येक जण आस्वाद घेत असतो त्याच्याकडे असलेली अभिरुची चोखंदळ व्हावी यासाठी त्या त्या कलेचे त्याच्यावर संस्कार झाले पाहिजेत, म्हणजे चांगली कला चांगल्या वाचकांवर संस्कार करते व त्यास रसिक बनवते तर तो रसिक बनेल रसिकता विकसीत होत असते असे वाटते.

बाकी आपल्या मताशी सहमत !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे.
सहमत आहे.

प्रास्ताविकाचे कारण असे की एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ?
नक्कीच आहेत. कारण ज्याप्रमाणे कलाकृती निर्माण करण्यासाठी गुणांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे त्या कलाकृतीचा आस्वाद घेताना रसिकाचे त्या कलाकृतीसोबत एकरुप होणे गरजेचे असते. ते जेवढ्या जास्त प्रमाणात साधेल तेवढा आस्वाद उच्च दर्जाचा ठरतो.
रसिकाला "क्षणस्थ" होता आले पाहिजे. म्हणजे काय? आपण काही उदाहरणे पाहू.
प्रभाकर पणशीकर रंगमंचावर 'तो मी नव्हेच' सादर करीत आहेत. त्यांच्या भरदार आवाजात ते एखादे वाक्य असे काही फेकतात की बस! निर्लज्ज लखोबाला पायातली काढून मारावी असे तुम्हाला वाटले तर ती मोठी दाद असते! पण तसे होण्यासाठी प्रेक्षक त्या संवादात, त्या प्रसंगात लखोबाच्या बरोबरीने जात असले पाहिजेत, म्हणजेच ते त्या 'क्षणात स्थित' असायला हवेत.
छोटा गंधर्वांचं 'वद जाउ कुणाला' सुरु आहे, एखादीच जागा अशी काही येते की माझ्यासारख्या संगीतातल्या जाणकार नसलेल्यालासुध्दा बालगंधर्वांचा भास होऊन जातो आणि अंगावर रोमांच उभे राहतात. मग तात्यांसारख्या, गाणार्‍यांच्या डोळ्यात पाणी आलं तर नवल नाही. इथेही श्रोता त्या पदातल्या शब्दांबरोबर, तानेबरोबर जात असायला हवा.
भाईकाकांचे 'चितळे मास्तर' वाचताना पहाटेच्या वेळी मास्तरांच्या ओसरीवर चालणारा अभ्यासवर्ग आणि त्यात 'रघुवंश' म्हणणारे मास्तर डोळ्यांसमोर आणता यायला हवेत.

लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ?
कोणतीच कलाकृती जशीच्यातशी रसिकाच्या मनात उतरू शकेल असे मला वाटत नाही. कारण कलाकार आणि रसिक ह्या मुळात दोन वेगळ्या व्यक्ती असतात. त्यांचे अनुभव, त्यांचे त्या गोष्टीतले ज्ञान वेगवेगळ्या पातळ्यांवर असू शकते; त्यामुळे त्यांना जाणवणार्‍या गोष्टीत फरक हा असणारच. शिवाय निर्मिती ही बरीचशी अमूर्त असते त्यामुळे त्यामागे कार्य करणार्‍या गोष्टी ह्या अव्यक्तच असतात. त्यामुळेही निर्मिती आणि आस्वाद ह्यात अंतर असणे स्वाभाविक वाटते.

रसिकता ही जन्मजात असते?
बर्‍याच प्रमाणात असावी असे वाटते. कारण ज्याप्रमाणे कलाकाराला काही गोष्टी ह्या जन्मतः असाव्या लागतात तसेच कलाकृती बद्द्लची ओढ ही मूलतः असावीच लागते. त्याशिवाय तुम्हाला ती अनुभूती घेण्याची इच्छा होणार नाही.

विकसीत करावी लागते ?
हो निश्चीतच. अनुभवाने, अभ्यासाने रसिकता विकसित होते. कलेचे मर्म कशात आहे हे समजण्यासाठी रसिकांनासुद्धा अभ्यास आवश्यकच.
चांगल्या मैफिली, नाटके, सवाईगंधर्व सारखे महोत्सव ह्यातून ह्यातून अनुभव समृध्द होतो आणि आस्वाद घेण्याची क्षमता विकसित होते.

वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ?
चांगला वाचक म्हणून मोठे व्हायचे असले तर असावाच लागतो. हे खरे तर कुठल्याही कलेच्या बाबतीत खरे आहे. संवेदनशील असणे ही कलाकार आणि रसिक होण्यातली पहिली पायरी आहे असे मला वाटते.

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

10 Feb 2008 - 4:06 pm | भडकमकर मास्तर

पुण्याला एफ्टीआयाय फिल्म इन्स्टित्युट मध्ये एक फिल्म ऍप्रिसिएशन चा कोर्स आहे ...... सिनेमाचे आस्वादन....
The curriculum includes theoretical and practical study of the art and history of film and the development of cinema as a medium of art and communication. Film classics both Indian and International will be used for critical analysis and study.
_________________________________

"आता कलेचे आस्वादन शिकवून येते का? " असा प्रश्न काही लोक नक्कीच विचारणार... माझ्या मते रसिक माणसाला अधिकाधिक थिअरी शिकल्यास कलेच्या आस्वादनात अधिक खोली यायला मदत होते....मात्र आधी निदान विषयाची आवड आणि समजून घ्यायची इच्छा हवी तरच अधिक चांगला रसिक शिकवून बनवता येऊ शकतो, असे माझे स्वतःचे मत आहे...

अवांतर : आता हेच पहा ना, क्रिकेट पाहताना एखादा फलंदाज यॉर्क होतो आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून घेतो, मजा येते...पण चेंडू रिव्हर्स स्विंग कसा होतो ते शिकल्यास रिव्हर्स स्विंग होत असताना योर्कर वर बोल्ड करणार्या गोलंदाजाच्या कलेचे , मेहेनतीचे अधिक आस्वादन करता येते... म्हणजे क्रिकेट ची मुळात आवड असणार्याने ही अधिकाधिक माहिती करून घेतली तर तो चांगला क्रिकेट आस्वादक होऊ शकतो...!!
(कुठे ही क्रिकेट चे उदाहरण द्यायची आवड असणारा )
स. भडकमकर

रसीकता विकसीत करावी लागते ?
एकदम महत्वाचा विषय आहे माझ्यासाठी. इथे मातब्बर लोक आहेत त्यांनी कृपया शिकवणी घ्यावी. तात्यांनी संगीत विषयात एक भाग लिहला होता, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत बरेच जण आहेत.

१) कविता कळत नाही. पण विडंबन सुचते, बर्‍यापैकी समजते.
२) तसेच शिल्पकला, चित्रकला, मॉडर्न आर्ट च्या नावाने बोंब
मला वाटते शालेय अभ्यासक्रमात जमले तर हे सगळे समजवून सांगीतले पाहीजे. नाहीतर कुठेतरी लिहुन येते की अमुक चित्र, शिल्प चोरीला गेले त्याची किंमत इतकी लाख डॉलर्स आहे की मगच धस्स होते. चित्र/ शिल्प पाहुन "हे काय आहे?" असेच होते.

बरेच लेखक व काही गुणी रसीक यांना नेहमी प्रश्र पडत असतो की अरे इतका चांगला लेख पण प्रतिसाद इतके अल्प... पण कारण असेलच ना. जसे सुग्रास भोजन खायला आवडते तितकेच कधीतरी फक्त आमटी भात फारतर पापड देखील "आहाहा" वाटु शकतो. पण तो भात, ती आमटी विशिष्ट प्रकारे केलेली असावी लागते. सरसकट कुठलाही आमटी भात नाही.

सगळ्यात महत्वाची कला व त्याचे सादरीकरण. एका विशिष्ट विषयावर अनेक चित्रपट येतात पण सगळेच सुपरहीट होत नाहीत. का बरे?

रसिकता ही जन्मजात असते ?
कोणालाही त्यांचे मत अगदी समोरासमोर विचारले तर ९९% लोक सुरवात हीच करतील की, "मी काही तज्ञ नाही पण मला असे वाटते.." रसिकता म्हणण्यापेक्षा आवड, मते सगळ्यांची असतात.

लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ?
लेखकावर अवलंबुन. तोच तसा प्रयत्न करु शकतो.

वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ?
प्रत्येक वाचक हा संवेदनाक्षम असतोच. कोणाच्या मते जादा तर कोणाच्या कमी. :-)

एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ?

हो किंवा नाही. हो ह्या करता की काही क्लीष्ट विषय जसे शास्त्रीय संशोधन (अंतराळ विज्ञान) किंवा कुठली अभिजात कला (क्लासीक आर्ट??) जसे शास्त्रीय संगीत समजायला त्या विषयातील थोडेसे ज्ञान/माहिती / पुर्व परिचय थोडासा पाहीजे.
ललीत लेखनात तसा वाचकाकडे नसला तरी लेखकाने जास्त संभ्रम होउ शकेल असे लिहता कामा नये, जरी एखादा धागा नीट बांधला गेला नाही लेखात/ काव्यात तरि लेख/काव्य संपायच्या आता त्या विणी घट्ट केल्या पाहीजे.

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 5:41 pm | सुधीर कांदळकर

१.
नुसते पोटाची खळगी भरण्यासाठी खाणे म्हणजे आस्वाद होऊ शकत नाही. खरा आस्वाद घेण्यासाठी आवडीने खावे लागते. तसेच वाचन करणे म्हणजे साहित्यकृतीचा आस्वाद नव्हे. तर त्या साहित्यातील कलागुणांचा, सौंदर्याचा अभिरुचीपूर्वक आस्वाद घेणे म्हणजे रसग्रहण.

म्हणून तर अनेक श्रीमंत लोकांकडे घराच्या दर्शनी भागात पुस्तके ठेवलेली असतात. परंतु ब-याच वेळा चिकटलेली पाने विलग केलेली नसतात. असे लोक शैक्षणिक काळात भरपूर वाचतात. परंतु त्यांच्या नजरेसमोर प्रश्नोत्तरे असतात. आम्हाला ११+४ बी एस सी च्या १ल्या वर्षी पु भा भाव्यांची १७वे वर्ष ही कथा होती. ब-याच मुलांना ती कळली नाही.

२.
आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे.

खरे आहे. म्हणूनच काहीहि साहित्यमूल्य नसलेल्या शृंगारिक कादंब-या भरपूर खपतात आणि चांगले कवितासंग्रह फारसे खपत नाहीत.

३.
एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? असले पाहिजेत का ?

होय. नाहीतर मला मर्ढेकरांची कविता एकदा वाचून जाणकारांचे मत वाचल्याशिवाय कळली असती. जी. ए. ची कथा पंचविशीत वाचतांना वेगळी वाटते व चाळिशीनंतर वेगळी वाटते. याचा अनुभव आपल्याला चाळिशीनंतरच घेता येईल.

४.
लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ?

नाही. लेखकाचे अनुभवविश्व व वाचकाचे अनुभवविश्व वेगळे असण्याची शक्यता जास्त असते. खास करून जेव्हा आपण एखाद्या प्रसिद्ध कादंबरीवरील चित्रपट पाहतांना याचा अनुभव येतो. लेखकाला चित्रपट बहुधा आवडत नाही. कारण त्याच्या मनातील प्रतिमा वेगळी, दिग्दर्शकाच्या मनातील वेगळी, कॅमेरामनच्या मनातील वेगळी आणि प्रेक्षकाच्या मनातील वेगळी असते. लेखकाचे काही अनुभव वाचकाला ठाऊक नसण्याची शक्यता असते. उदा. अमेरिकेतील वा युरोपातील लेखकाच्या मनातील ट्रॅफिक उजव्या बाजूने जाणार व भारतातील वाचकाच्या मनातील डावीकडून. आयर्व्हिंग वॉलेसची 'फर्स्ट लेडी' वा 'सेव्हन्थ सीक्रेट' किंवा ' ऑर्थर हॅले ची 'मनीचेंजर' किंवा 'हॉटेल' (मुळातील. भाषांतरित नव्हे) वाचावी.

५.
रसिकता ही जन्मजात असते ?

होय.

६.
विकसीत करावी लागते ?

होय. शिकल्याशिवाय आणि अनुभवाशिवाय कळणारच नाही. शास्त्रीय संगीत तर शिकल्याशिवाय कळणारच नाही.

७.
वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ?
हा प्रश्नच खरे म्हणजे मला कळला नाही. वाचक हा साहित्याचा वाचक हे मी गृहीत धरले आहे. वकिलाची नोटीस अथवा सरकारी/व्यावसायिक पत्र वाचणारी व्यक्ती म्हणजे वाचक नव्हे. संवेदना नसेल तर शब्दाला/वाक्याला काही अर्थच राहणार नाही. नाहीतर फार शहाणा आहेस असे म्हटले तर कोणीहि खूश होईल. साहित्यातील नवरस संवेदनेशिवाय कसे कळणार?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2008 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वच प्रतिसाद आवडले. मात्र रसिकांकडे कोणते गुण आवश्यक आहेत त्याचीही जरा चर्चा व्हावी असे वाटते.
आम्ही काही प्वॉइंट काढले आहेत ? ते सायंकाळी टंकतो :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु's picture

11 Feb 2008 - 9:48 am | प्राजु

रसिक होण्यासाठी एक महत्वाचा गुण लागतो तो म्हणजे पेशन्स...
समोरची व्यक्ती जे लिहिते, बोलते ते समजून घेण्यासाठी संयम आवश्यक आहे. गाणे ऐकणे, कविता वाचणे, सिनेमा पाहणे, लेख वाचणे, जोक समजणे या सगळ्यांसाठी थोडीफार उपजत रसिकता अंगी असावी लागते. पण ती नसेल तर अंगी बाणवता येते. आपण ज्या ग्रुपमध्ये राहतो, वावरतो तिथल्या वातावरणानुसार एखाद्या विषयांत रूची वाटू लागते.
आमच्या घरी माझी आतेबहीण शिकण्यासाठी रहात होती. ती कोकणांतली आहे. तिला क्रिकेट मध्ये विशेष रस नव्हता. पण जेव्हा वर्ल्डकप सुरू झाला तेव्हा आमच्या घरी सतत त्याच चर्चा आणि विषय.. यामुळे तिलाही क्रिकेट आवडू लागले. ती न चुकता आमच्या बरोबरीने मॅचेस् पाहू लागली.

- प्राजु

प्रमोद देव's picture

11 Feb 2008 - 10:23 am | प्रमोद देव

हे मूळ गुण असल्याशिवाय सर्व व्यर्थ आहे.
एक उदाहरण घेऊ.
विनोद सगळ्यांनाच आवडतात(टवाळा आवडे विनोद.. असे समर्थ म्हणाले होते. त्याचा संदर्भ वेगळा आहे बरंका)
पण विनोद जर का डोक्यावरून गेला आणि त्याची चिरफाड करायचा प्रयत्न केला गेला तर काय गंमत उरेल?
म्हणजे जसे विनोद समजायला विनोदी बुद्धीची आवश्यकता आहे तसेच तिथे शाब्दिक आणि भाषिक ज्ञानही आवश्यक आहे.

संगीत समजायला तसा कान लागतो असे म्हणतात. म्हणजे खरे तर जे काही सुश्राव्य आहे त्याला संगीत म्हणायला काय हरकत असावी? पण सुश्राव्यतेबरोबर जर संगीतशास्त्राची जाण असेल तर ती दुधात साखर ठरेल.
आता कुणी म्हणेल की बासुंदी गोड आहे किंवा मस्त झालेय हे सांगायला ती कशी करतात हे ठाऊक असण्याची काय जरूर? तर हेही तितकेच बरोबर आहे. बासुंदी मस्त झालेय इतके सांगितले आणि चवीने ती खाल्ली(की प्यायली?) की झाले. त्यातच सगळी पावती मिळाली. आता हे झाले सामान्य रसिकाचे मत.
पण एखादा संगीतज्ञ गाणे नुसतेच श्राव्य नव्हते तर 'अमूक एका ठिकाणी घेतलेली तान अथवा सरगम काय बहारीची होती' हे सांगतो तेव्हा ती रसिकता जास्त दाद देऊन आणि घेऊन जाते.
तेव्हा मला असे वाटते की कोणत्याही क्षेत्रातल्या रसिकांचे ढोबळ मानाने दोन गट करता येतील. एक सर्वसामान्य रसिक जो केवळ 'आवडले, छान आहे अथवा खास नाही, दम नाही ' असे म्हणेल आणि दुसरा दर्दी रसिक जो 'छान आहे, आवडले अथवा खास नाही, दम नाही' हे नेमके कशामुळे ते सांगू शकेल.

रसिकता ही नैसर्गिकपणे सगळ्यांकडेच असते. मात्र ती काही विषयांपुरती सिमीत असण्याचीही शक्यता असू शकते. कुणाला काव्य आवडते.कुणाला गद्य आवडते. कुणाला संगीत मग ते कोणतेही असो, तर कुणाला निव्वळ सुगम, कुणाला फक्त गजल वगैरे असे रसिकतेच्या बाबतीत फरक आढळतील.
कुणाला नर्तन आवडत असेल, त्यातही पोटभेद असू शकतात.
शिल्पकला,चित्रकला अशा कितीतरी कला अजून आहेत की ज्यात आवड असणारीही असंख्य माणसे आहेत.
थोडक्यात काय तर रसिकता प्रत्येकात असते. पण ती नेमक्या कोणत्या बाबतीत हे सांगणे कठीण आहे. एखाद्या बाबतीत रसिकता दाखवणारा माणूस दुसर्‍या एखाद्या बाबीबाबत साफ 'औरंगजेब' असू शकेल. पण तरीही तो रसिक आहेच. कारण रसिक म्हणजे तरी काय हो? एखाद्या गोष्टीत जो रस घेतो अथवा दाखवतो तोच रसिक. म्हणजे कशातच रस नाही असा माणूस मिळणे दूर्मिळच असावा नाही का?
(मला वाटतेय की मला काय म्हणायचे आहे ते मला नेमकेपणाने मांडता आलेले नाहीये तरीही इथले 'रसिक' वाचक ते नक्कीच समजून घेतील ह्याची खात्री आहे.)

साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ?
होय. समजण्याची इच्छा पाहिजे, कलाकाराचे मन जाणण्याची सह-अनुभूती-क्षमता पाहिजे, कलाकाराचे माध्यम थोडेफार समजले पाहिजे.
समजण्याची इच्छा : कलेचा आस्वाद घेण्याची इच्छा नसल्यास तो बळेच घेता येत नाही. दहाएक दिवसांपूर्वी येथे एका संगीताच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. मन कुठल्यातरी काळजीत व्यस्त होते, पण तिकीट आधीच विकत घेतल्यामुळे तसाच गेलो. पहिला एक तास वाद्यवृंदाचे वाजवणे नीट ऐकले नाही, उगाच समोर काही संगीतमय गोंगाट होत असल्यासारखा वाटला. मग मन शांत झाले, आणि कार्यक्रमाचा पुढचा भाग आवडला.
सह-अनुभूती-क्षमता : कला (प्रस्तुत केली तर - कलाकाराच्या स्वांतसुखाय नव्हे) ही कलाकाराचा रसिकाशी संवादरूप असते. स्वकेंद्रित व्यक्ती तो संवाद समजून घेऊ शकत नाही.
माध्यम थोडेफार समजणे : एक उदाहरण घेऊन बघूया. बेटहोवन च्या नवव्या सिंफोनीचे. लहानपणी कोरलचा गानमेळ मी केवळ गोव्यात चर्चमध्येच ऐकला होता. त्यामुळे पाश्चिमात्त्य गानमेळ ऐकला की मला केवळ एकच विचार मनात येई - ही प्रभूच्या भव्यदिव्यतेची आळवणी आहे. त्यामुळे नवव्या सिंफोनीचा गानमेळाचा भाग ऐकला की माझ्याकडून साधारण त्याच अर्थाचे रसग्रहण होई. खालील यूट्यूब फितीत ऐकावे :

आता खालील यूट्यूब फितीत ३:४० मिनिटे बर्नस्टाइन मास्तर भूमिका त्यांची समजावतात. मग वाद्यमेळ/गायन सुरू ५:३०. पण रेकॉर्डिंगचा दर्जा तितका चांगला नाही - तरी बर्नस्टाईनचे म्हणून वाटल्यास ऐकावे.

जेव्हा मला प्रथम समजले की ही धुन त्या काळातल्या मद्यालयात गंमत म्हणून गायची धुन आहे, जी बेटहोवनने उचलून घेतली, तेव्हा माझा विश्वासच बसेना. पदाचे जे शब्द आहेत ते शिलरचे आहेत की मानवांनी मित्र म्हणून एकत्र यावे वगैरे... म्हणजे तेही चर्चमधले नाही! अर्थात हे संगीत, काव्य दारुड्यांच्या बरळलेल्या गाण्यापेक्षा खूपच उदात्त झालेले आहे, भावगर्भ झालेले आहे, पण "प्रभू किती भव्यदिव्य" हा तो भावगर्भ नाही, आणि संगीताचे बीजही नाही.
अशा प्रकारे संगीताची नीट ओळख होण्यापूर्वीही मी काही रसास्वाद घेत होतो, मला आनंद होत होता, परंतु त्या कलाकाराचे माध्यम ओळखीचे होईपर्यंत माझा रसास्वाद आणि कलाकाराचा मनातला संदेश यांत जमीन-आस्मानाचा फरक होता.

असेच लेखनाबाबत, अन्य कलांबाबत.

असले पाहिजेत का ?
होय. माझ्या वतीने याचे उत्तर मी वरती दिलेले आहे.

लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ?
नाही. त्या कलाकृतीशी लेखकाचे एक भावविश्व आणि अनुभवविश्व जडलेले असते. ते सर्व त्या तोकड्या शब्दांत उतरू शकणार नाही. त्यातील अनेक तपशील लेखक गृहीत धरतो - ते लिहीत नाही, पण ते तपशील वाचकापाशी नसतात. वाचकाकडे त्याचे आपले भावविश्व आणि अनुभवविश्व असते. तो त्यांचा संदर्भ घेऊन त्यांचा अर्थ लावतो. कधीकधी आपल्या अनुभवविश्वात तफावत आहे हे कळूनसुद्धा वाचकाला अर्थ पूर्ण तपशीलवार भावनांसकट लावता येत नाही. उदाहरणार्थ नाटक "संगीत शारदा" घेऊया. यात एक जरठ-कन्या विवाह नाटकाचे कथानक आहे. मुलीचा गरीब बाप पैशाच्या लालसेने एका जख्ख म्हातार्‍या श्रीमंताशी लग्नाचे ठरवतो. त्यात तरुण तडफदार नायक अनेक परीने प्रयत्न करतो पण लग्न रोखण्यात अपेशी ठरतो. नाटकाच्या अगदी शेवटी अंतरपाटावर असे लक्षात येते की लग्नाच्या हावेने श्रीमंत म्हातार्‍याने आपले गोत्र खोटे सांगितले आहे. खरे गोत्र मुलीशी एकच असते, आणि भटजी सगोत्र विवाह लावण्यास ना करतात. अशा प्रकारे हे भयंकर लग्न टळते. मी माझ्या कुटुंबात/मित्रमंडळीत अनेक सगोत्र विवाह बघितले आहेत. माझ्या मते या अंताने काहीच खरे साध्य होत नाही. उलट खरा मुद्दा, जरठ-कन्या विवाह, हा बाजूला पडतो. इथे कन्येची विक्री थांबवायला रूढी बदलण्याऐवजी, या एकाच लग्नाला लागू असलेली आणखी पुरातन रूढी वापरली आहे, हे माझ्या मते चूक आहे. आता त्या काळाचा संदर्भ घेऊन मी नाटकाचा अर्थ लावतो, पण ते म्हणजे मारून मुटकून समज पटवणे. त्या नाटकाच्या लेखनाच्या काळी तो अंत प्रेक्षका-वाचकांना मनापासून योग्य वाटत असे. माझे अनुभवविश्व इतके वेगळे आहे की मला ती कलाकृती त्या अर्थाने अनुभवणे शक्यच राहिलेले नाही. कमीअधिक प्रमाणात अशी दरी प्रत्येक लेखका-वाचकात असते.

रसिकता ही जन्मजात असते ?
होय आणि नाही. दुसर्‍या मनुष्यांबरोबर सह-अनुभूती प्रस्थापित करण्याची ओढ जन्मजात असते. पण कलेच्या एखाद्या आविष्कारातून आपल्याला कलाकाराच्या मनःस्थितीची अनुभूती होणे जन्मजात नसते. कलाकाराच्या अनुभवविश्वाशी ओळख लागते, आणि त्या कलामाध्यमातले "गृहीत आहेत म्हणून सांगणार नाही" असे तपशील काही प्रमाणात शिकावे लागतात. कथक नाचात "शिखर" मुद्रा करून हात वरती नेला म्हणजे "धनुष्य" अर्थ समजतो, हे शिकल्याशिवाय कळायचे नाही. (शिखर मुद्रा केलेला हात कपाळाजवळ वरती नेला की "टिळा लावणे" हा अर्थ होतो, तो बहुतेक भारतीयांना कळतो, बिगरभारतीयांना नाही.)

विकसीत करावी लागते ?
होय.

वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ?
होय.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Feb 2008 - 10:52 pm | llपुण्याचे पेशवेll

तुम्ही लोक इतके जड शब्द वापरत आहात ते माझ्यासारख्या अज्ञ जीवास उमगत नाहीत. त्यापेक्षा भाऊसाहेबांनी कसे २ ओळीत सांगून टाकले आहे
'दोस्तहो मैफील आपली रंगण्या जर का हवी,
आम्हा नको सौजन्य तुमचे''जिन्दादिली ' नुसती हवी"
-रसि़क
डॅनी
पुण्याचे पेशवे

मुक्तसुनीत's picture

11 Feb 2008 - 11:11 pm | मुक्तसुनीत

सर्वप्रथम , बिरुटेसरांचे धन्यवाद आणि मनःपूर्वक अभिनंदन. पहिल्या दर्जाचे दोन्ही : चर्चाविषयही आणि चर्चाही. "रसिकता" या विषयाची व्याप्ति आणि खोली फार मोठी ; माणूसपणाच्या काही महत्त्वाच्या खुणांपैकी ही एक ; यात शंका नाही.

मला असे वाटते की रसिकता हा एक प्रकारचा परकायाप्रवेश आहे : आपल्या माध्यमाद्वारे लेखक/चित्रकार/गायक/संगीतकार/कवी/ शिल्पकार जे मांडतात ते समजून घेण्याकरता आपल्याला त्याच्या डोळ्यानी पहाण्याची, त्याच्या कानांनी ऐकण्याची , त्याच्याशी समधात होण्याची क्षमता असायला हवी. जितका हा परकायाप्रवेश रसिकाच्या अंगात भिनेल तितकी कलाकृती कळायला मदत होणार.

रसिकतेचे आणखी एक मोठे लक्षण म्हणजे तिची सार्वभौमता. एखादी गोष्ट एखाद्याला आवड्ण्याची अनेक कारणे असतील ; इतराना ती कारणे प्रसंगी पटोत न पटोत. अणि कुठल्याही कारणाशिवाय एखाद्या गोष्टीबद्दल रस वाटण्याचे स्वातंत्र्य रसिकाना असतेच ! या बाबतीत खूप मागे वाचलेले एक वाक्य मनावर कोरल्यासारखे झालेय : "प्रत्येक कलाकृती नव्या वाचक/प्रेक्षक/रसिकाच्या मनात नव्याने जन्म घेते !"

सांस्कृतिक संदर्भांची आवश्यकता : कदाचित अमूर्त कलाप्रकारांबद्दल हा मुद्दा लागू होणार नाही. पण काँक्रीट आर्टीफॅक्ट्स बद्दल (मराठी शब्द) हे निश्चित खरे आहे की, ज्या वातावरणामधे , "अवकाशामधे" एखादी कलाकृती आकार घेते, रसिकाला त्याचा कुठेतरी स्पर्श व्हावा लागतो. शेवटी कुठलीही कलाकृती एका पातळीवर "मेक्-बिलिव्ह" (मराठी शब्द?) असते. हे "मेक्-बिलिव्ह" यशस्वी होण्याकरता तुम्हाला अनेक संदर्भांचे ज्ञान उपयोगी , प्रसंगी आवश्यकही ठरते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2008 - 9:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असे जेव्हा रंगमंचावर पडद्यामागुन आवाज येतो, तेव्हा रसिकाची किम्मत आम्हाला कळते.

वरील सर्वच सुंदर प्रतिसादात रसिकाविषयी मत व्यक्त झालेच आहे तरी अजून काही सांगण्याचा मोह आवरत नाही.

रसिकाच्या ठिकाणी जिज्ञासा हवी:- म्हणजे कलेचा, अनुभव पुन्हा घेता यावा किंवा त्या पातळीवर जाता यावे.
मनाची पवित्रता हवी :- कलाकृतीचा आस्वादाच्या वेळी रसिकाचे मन शुद्ध, असले पाहिजे. रसिकाची पाटी आस्वादाच्या वेळी कोरी असली पाहिजे म्हणजे पुर्वग्रह नको.

कलेची जाण असली पाहिजे:- कलेच्या आस्वादासाठी ज्ञानाची गरज आहे. रसिकाला वेगवेगळ्या क्षेत्राविषयी ज्ञान असले पाहिजे, जसे भाषा, दैनंदिन व्यवहार, विज्ञान, राजकारण, समाज, संस्कृती,चे ज्ञान असले पाहिजे.
कलेविषयी आपूलकी,सहानुभूती असली पाहिजे.

संवेदनक्षमता सर्वांमधे असते पण त्याची तीव्रताही महत्त्वाची आहे. सुचकता रसिकाला आस्वादाच्या पातळीवर नेण्यास मदत करते. संवेदनक्षमतेमुळे कलेच्या सौंदर्याचा शोध घेता येतो. आस्वादकाने कलेचा सन्मान केला पाहिजे. कलेकडे सह्दयेतेने पाहता आले पाहिजे.

आणि शेवटी आस्वाद घ्यायचा कशासाठी ,तर नुसता आनंदासाठीच ना !!! तो घेता आला पाहिजे. कधी-कधी आस्वादकाकडूनच कलेचे वेगवेगळे अर्थ समजत असतात. म्हणुन नेहमी म्हटल्या जाते की "" कवी म्हणजे बोलका रसिक, तर रसिक म्हणजे मुका कवी " कल्पनाशक्ती, एकाग्रता, हे आणि असे अनेक गुण रसिकाच्या ठिकाणी असले पाहिजेत असे म्हणता येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर's picture

13 Feb 2008 - 2:39 am | भडकमकर मास्तर

ही एकाने लिहिलेली ऒर्कुट वरील कविता

<<<<<<<<<<<<<<<

माझी ताई

तू माझी ताई आणि तूच माझी ताई
आई सारखी माया देते वडीलान सारखे प्रेम देते
आजोबान सारखा मुका देते अज्जी सारखा खाऊ देते
कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई

भाऊबिजेला खुप Dairymilk आणायचिस मला
छान छान खेल्णी द्यायाचिस मला
रक्षा बन्धन ला शोधून शोधून रखी आणायचिस मला
कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई

पिक्चर बघायला पैसे द्यायाचिस तू
रात्रि अपरात्री चोरून घरात घ्यायाचिस तू
माझ्या मैत्रिनिंचे फ़ोन घ्यायाचिस तू
स्वताच्या नावा खाली पचवायाचिस तू
कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई

सुख दुखात सम्भालुन घ्यायाचिस तू
माझे पोट भरन्या साठी उपाशी राहिलिस तू
माझ्या साठी आई बाबान चा ओरडा खाल्लास तू
कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई

खुप खुप दंगा मस्ती करायचो आपण
आई बाबान बरोबर खुप फिरयाचो आपण
आज्जी अजोबंच्या बरोबर पिझ्झा खायचो आपण
खुप खुप त्रास द्यायाचो आपण
कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई

मला खोटे सांगून धोक्याचा इशारा द्यायचिस तू
बाबाना राग आला की मला लपून घ्यायाचिस तू
आई बरोबर जाउंन भाजी आनायाचिस तू
माझ्या आव्डिची भाजी करायाचिस तू
कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई

आई सारखी माया देत रहा तू मला
बाबान सारखे प्रेमदेत रहा तू मला
आजोबान सारखा मुका देत रहा तू मला
आज्जी सारखा खाऊ देत रहा तू मला
बस एवढेच सन्गायाचे आहे तुला
कारण तू माझी ताई आणि तूच माझी ताई

>>>>>>>>>>>>>>>>>>>
त्यावर अभिप्राय मागितला होता...
..आम्ही लिहिले की भावना योग्य आहेत, पण ओळी एकापुढे एक लिहिल्या तर निबंध उत्तम होईल...
आणि खूप जणांनी छान आहे असे लिहिले...ही कविता ( ?) आवडली???
आता इथे रसिक कोण?
...कवीची संकल्पना उमजलेले रसिक की टीका करणारे आम्ही अरसिक???

धनंजय's picture

13 Feb 2008 - 3:20 am | धनंजय

यात एका प्रकारची लय आहे, म्हणून ही कविता आहे असे मला पटते. हा मुक्तछंद आहे. ओळी एकापुढे एक ठेवल्या तरी गद्य नाही असे मला वाटते.

पण लिखाणाचा दर्जा मात्र सुमार वाटला.

म्हणजे "कविता आहे, पण छान नाही" म्हणणारा मी या रसिक-अरसिक वर्गीकरणात त्या ऑर्कुट मित्रमंडळात कुठे पडेन?

(उलट इथेच मागे तात्या यांनी लिहिलेले "कुणी मत देता का मत" हे प्रकटन कविता नसून दर्जेदार आहे, असे वाटले. रसास्वाद घेण्यासाठी "कविता" हे लेबल लावण्याची काही गरज मला वाटली नाही.)

भडकमकर मास्तर's picture

13 Feb 2008 - 9:14 am | भडकमकर मास्तर

ओळी एकापुढे एक ठेवल्या तरी गद्य नाही असे मला वाटते
अगदीच गद्य नाही,अर्थात कवितेच्या दर्जाने वैतागून मी तसे लिहिले होते...

पण मी आता विचार करतो की मी कोण दर्जा ठरवणारा??खूप लोकांना आवडली कविता...( म्हणजे भ्रमणध्वनी संदेश पाठवून गायक ठरवण्यासाऱखे ..संख्येवर बरे वाईट ठरवणे..)ज्यांना ही कविता खरंच आवडली, त्यांच्यासाठी मी एक अतिशहाणा मुजोर माणूस असणार, इतक्या चांगल्या भावनेला आणि कवितेला नावे ठेवणारा....आणि मी स्वतः मनातून हायसे मानणार की मला असल्या कविता आवडत नाहीत...मग संदीप खरेची एखादी आवडलेली कविता म्हणणार, मला बरे वाटणार्..मग त्याला शिव्या घालणारे लोक मला अजाण रसिक समजणार आणि स्वतः मर्ढेकर/ चित्रे/ग्रेस इ. तेच फक्त महान कवी आहेत असे म्हणणार...वगैरे...म्हणजे ही रसिकतेची उतरंड तयार होते, पण रसास्वाद हा प्रत्येकाचा निराळा असतो का? माझी ताई या कवितेने काहींना खूप आनंद दिला असेल, तो आनंद कालिदासाच्या रचना समजून घेताना होणार्या रसास्वादाच्या आनंदापेक्षा कमी मानायचा का?

हेच सगळे संगीताच्या बाबतीत....शास्त्रीय संगीत ऐकणारे, जाणणारे या रसिकतेच्या उतरंडीवर सर्वात वरती बसून आहेत असा एक लोकप्रिय समज...मग पॉप , फिल्म वाले....पण रसास्वादाचा आनंद प्रत्येकाचा समान नाहीका ? मला फक्त शास्त्रीय संगीत आवडतं असं म्हणणारा रसिक इतरांपेक्षा श्रेष्ठ असतो का?

रसास्वाद घेण्यासाठी "कविता" हे लेबल लावण्याची काही गरज मला वाटली नाही.)
हे अगदी पटले.... म्हणजे पुन्हा जे काही लिहिले आहे ते चांगले आहे की वाईट इतकेच उरते... ( इथे सिनेमाचे समांतर उदाहरण किंवा समांतर सिनेमाचे समांतर उदाहरण आठवते....
आता आर्ट फिल्म असा शब्द सर्रास वापरतात लोक, मग उरलेल्या फिल्म काय नॉन-आर्ट / अकलात्मक असतात काय? बर्या /वाईट असतील पण त्यांची कलाच नाही?. हे अन्यायकारक आहे.....तरी आता ही समांतर नाटके आणि फिल्म्स यातली दरी थोडी का होईना, कमी होतेय)..असो फिल्म चांगली तरी असते किंवा वाईट तरी...

अमित.कुलकर्णी's picture

15 Feb 2008 - 7:09 am | अमित.कुलकर्णी

अहो, शास्त्रीय संगीत ऐकणार्‍यांमध्ये पण एक उप-उतरंड आहे असे मी बघितले आहे.
उदाहरणार्थ 'ज' या एका गायकाची गाणी ऐकणारा रसिक हा 'क' किंवा 'भ' या गायकांची गाणी ऐकणार्‍यांपेक्षा कमी दर्जाचा ठरवला जातो.
थोडक्यात म्हणजे, ज्याला जे आवडते, ते त्याने करावे / ऐकावे / बघावे असे आम्ही हल्ली करतो.

अमित
------------------------------------------
Doing what you don't like is -being employed and not liking what you do is common human nature!

भडकमकर मास्तर's picture

15 Feb 2008 - 8:43 am | भडकमकर मास्तर

बरोबर आहे... असे असू नये असे कितीही म्हटले तरी ते असतेच...
ज क आणि कोण तेही कळले... :))

सुधीर कांदळकर's picture

15 Feb 2008 - 9:39 pm | सुधीर कांदळकर

अ पासून ज, क, भ सहित ज्ञ पर्यंत सर्वांना भिडते ते अभिजात अशी माझी अभिजाततेची व्याख्या आहे. दिल क्या चीज है ... हे गाणे मुज-याचे आहे म्हणून कोणत्याहि बड्या ख्यालाच्या तोडीचे नाही असे कोणहि म्हणू शकत नाही.

एखादी ढंगदार लावणी एखाद्या तथाकथित उच्च दर्जाच्या कविते एवढी किंवा जास्त श्रेष्ठ असू शकते.

कांहीची उंची सुबोध तर काहीची दुर्बोध. परंतु निव्वळ दुर्बोधता म्हणजे अभिजातता नव्हे. कांही ढोंगी सवंग दुर्बोधतेलाच अभिजाततेचा मुलामा देतात.

उतरंड वगैरे ठराविक उंचीपर्यंत ठीक आहेत. त्यापलीकडील दिव्य उंचीवर नाही.

प्रा. साहेबांस ही चर्चा चालू केल्याबद्दल व चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद.

मारकुटे's picture

10 Jan 2014 - 12:16 pm | मारकुटे

मस्त चर्चा !