उदासबोध

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
7 May 2009 - 10:37 am
गाभा: 

चंद्रशेखर महामुनींच्या या धाग्यावर जेव्हा प्रतिसाद आले त्यावेळी ही चर्चा अशी वळण घेईल असे त्यांना वाटले नव्हते. ते म्हणतात

आस्तिक - नास्तिक हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला एखादि गोष्ट जर नसेल पटत तर किमान समोरच्या व्यक्तिच्या भावनांचा आदर करावा असे मला मनापासुन वाटते.

सहमत आहे. या विषयी नरहर कुरुंदकरांचे विचार पटतात. ' माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही. परंतु माझ्या सभोवती जे असंख्य लोक ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांच्यापासुन तुटुन जाण्यावर ही माझा विश्वास नाही'
महामुनी साहेब आपण निराश होउ नका. वाद विवाद चालतच रहाणार. आम्ही इतरांच्या श्रद्धेचा आदर करतो. श्रद्धा म्हणले कि चिकित्साच करायची नसते. थोडेसे डोळस होउन पाहिले कि समुह शरणागतता हा भक्तीच्या उन्मादातुन कसा प्रकट होतो हे संजोपरावांच्या शिर्डीचा समुह उन्माद मधे उत्कृष्ठ सांगितलेली आहे त्यांचे श्रद्धा अंधश्रद्धा बाबत मुक्तक देखील छान आहे.
मंगेश पाडगावकरांच्या उदास बोध मध्ये बुवा शक्ती बाबत लिहिलेले पंक्ती बुवाबाजीच्या मानसिकतेचे विश्लेषण करतात.
"माणसे खपाट खंगलेली, आतुन आतुन भंगलेली
अदृष्य्य दहशतीने तंगलेली , आधार नाही
प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा,
जो काढील सार्‍या उवा, मनातल्या चिंतेच्या
आधि म्हणे 'जय साई' मगच अधिकारी लाच खाई
अजुन पकडला गेला नाही,कृपा म्हणे बाबांची
आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही
आपण भिडायचे नाही, आयुष्याला
कणा झिजुन गेला पार, शिरजोरापुढे सर्व लाचार
बुवा नाम जपाचा उच्चार, नशा देई

प्रतिक्रिया

विकास's picture

7 May 2009 - 10:43 am | विकास

' माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही. परंतु माझ्या सभोवती जे असंख्य लोक ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांच्यापासुन तुटुन जाण्यावर ही माझा विश्वास नाही'

वरील कुरंदकरांचे वाक्य एकदम छान आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 May 2009 - 10:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका, छान लिहिलं आहेत. नरहर कुरुंदकरांचं वाक्य आवडलंच. शिवाय दोन वाचनीय लेखांच्या लिंक्सही दिल्यात. या सगळ्याबद्दल आभार.

जागु's picture

7 May 2009 - 11:05 am | जागु

अगदी पटलं.

अवलिया's picture

7 May 2009 - 11:07 am | अवलिया

हॅ हॅ हॅ
काका सध्या तत्वचिंतन जोरात चालु आहे तर ! :)
नाही, वाद निर्मितीपेक्षा वादशमनावर सध्या जोर आहे, म्हणुन म्हटले !! :)
असो, यात तुमचे पण अजुन काही विचार लिहिले असते तर अजुन मजा आली असती !

--अवलिया

प्रकाश घाटपांडे's picture

7 May 2009 - 11:45 am | प्रकाश घाटपांडे

वाद निर्मितीपेक्षा वादशमनावर सध्या जोर आहे,

:)

यात तुमचे पण अजुन काही विचार लिहिले असते तर अजुन मजा आली असती !

टंकणीतील विचारतरंग संवादा ऐवजी वाद निर्माण करु लागतील याचे भय वाटते. मुख्य म्हणजे वाद नको म्हणुन संवादच नको ही (आमची) वृत्ती कदाचित उफाळुन येईल याचे ही भय वाटते. आम्ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे चाहते आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य चा आदर केला पाहिजे . परवाच राजन खान यांचे वसंत व्याखान मालेत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेले भाषण / चिंतन आम्ही ध्वनिमुद्रित केले आहे. त्यांचे सर्वच विचार मान्य आहे असे नव्हे
Get this widget | Track details | eSnips Social DNA
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अवलिया's picture

7 May 2009 - 11:54 am | अवलिया

टंकणीतील विचारतरंग संवादा ऐवजी वाद निर्माण करु लागतील याचे भय वाटते. मुख्य म्हणजे वाद नको म्हणुन संवादच नको ही (आमची) वृत्ती कदाचित उफाळुन येईल याचे ही भय वाटते.

खरे आहे. पण आम्हाला तीच वृत्ती जास्त आवडते. :)
मौनं सर्वार्थ साधनम् |
वाद होण्यापेक्षा मौन श्रेयस्कर !!
असो.

--अवलिया

नंदन's picture

7 May 2009 - 1:29 pm | नंदन

राजन खानांचे भाषण ध्वनिमुद्रित करून इथे दिल्याबद्दल धन्यवाद, काका. भाषण ठीकठाक आहे, काही विशेष नवीन विचार समजला नाही. 'मी वक्ता नाही' म्हणत, भाषणाची ठराविक लोकप्रिय तंत्रं वापरली आहेत. इतर मराठी लेखकांच्या तथाकथित संशोधनाची खिल्ली उडवताना 'हयात असलेल्या मराठी लेखकांत मुसलमान समाजाचा अभ्यास असलेला मी एकमेव लेखक आहे' अशी स्वतःभोवती आरतीही ओवाळून घेतली आहे. (चौथीतल्या मुलांनी सहाध्यायी मुसलमान मुलांना अफझलखान म्हणणे ही नव्वदच्या दशकातील एका मराठी नाटकात वापरलेली बाब, त्यांनी इथे आपल्या अभ्यासाच्या दाखल्यासाठी वापरली आहे. ते त्यांनी लिहिलेले नाटक आहे का माहीत नाही. तसे असेल तर हे उदाहरण गैरलागू.) पण ते तसे एकमेव लेखक असले वा नसले तरी याचा 'अभिव्यक्तीस्वातंत्र्य' या मूळ विषयाशी संबंध समजला नाही. तीच बाब शिवाजी महाराजांचा आदरार्थी आणि औरंगजेबाचा एकेरी उल्लेख या शोधाबद्दल. पुढे बुश-सद्दाम इ. प्रकरणाचा फाफटपसारा बराच आहे.

एकंदरीत जे दहा मिनिटांत सांगता येईल, त्यासाठी सव्वा तास खर्ची घातला आहे. बाकी अधूनमधून वाजणारे मोबाईल्स, शेवटी झडलेली छोटीशी स्युडो-चकमक आणि त्यामुळे गेलेला मूड इ. भाग रंजक.

अवांतर -
१. राजन खान यांचं लेखन मी वाचलेलं नाही, पण त्यांनी एका जुन्या लेखात तेंडुलकरांच्या साहित्यिक कर्तृत्वावर झोड उठवलेली आठवते. मात्र अलीकडेच - म्हणजे ते अध्यक्षपदासाठी हातकणंगलेकरांविरूद्ध रिंगणात असताना - एका नवीन लेखकाच्या लेखनाची त्यांनी थेट ज्ञानेश्वरांशी तुलना केली होती :).

२. परवाच वाचलेलं एक वाक्य - Speech is conveniently located mid-way between thought and action, where it often substitutes for both.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रकाश घाटपांडे's picture

7 May 2009 - 1:58 pm | प्रकाश घाटपांडे

मला ही तेच वाटले. तस्लिमा नसरीनचे लेखन त्यांना टुकार वाटले. त्यांचे मते त्याला काही साहित्यिक मुल्य नाहि. पण तिला आपले विचार व्यक्त करण्याची अभिव्यक्ती हवी असे मत व्यक्त करायला ते विसरले नाहि. एवी तेवी अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा विषय आहे तर मला पाहिजे ते बोलून घेतो अस ते सहज पणे बोलुन गेले.

एकंदरीत जे दहा मिनिटांत सांगता येईल, त्यासाठी सव्वा तास खर्ची घातला आहे.

यालाच चिंतन म्हणतात. :))

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

स्वाती दिनेश's picture

7 May 2009 - 5:52 pm | स्वाती दिनेश

राजन खानांचे भाषण ध्वनिमुद्रित करून इथे दिल्याबद्दल धन्यवाद,
एकंदरीत जे दहा मिनिटांत सांगता येईल, त्यासाठी सव्वा तास खर्ची घातला आहे. भाषण ठीकठाक आहे, काही विशेष नवीन विचार समजला नाही.

नंदनशी सहमत.
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

7 May 2009 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार

' माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही. परंतु माझ्या सभोवती जे असंख्य लोक ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांच्यापासुन तुटुन जाण्यावर ही माझा विश्वास नाही'

उच्च !
अतिशय भावले हे वाक्य :) लेखांचे दुवेही छानच.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

क्रान्ति's picture

7 May 2009 - 10:38 pm | क्रान्ति

परा आणि नंदन यांच्या प्रतिसादाशी सहमत. राजन खान यांचा मीपणा उफाळून आलाय. [त्यांनी स्वतःपुरतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य पुरेपूर घेतलंय!]
कुरुन्दकरांचे विचार खरंच खास आहेत. संजोप्रावांचे दोन्ही लेख वाचनीय आणि मननीय. विशेषतः श्रद्धा अंधश्रद्धा या विषयावरचं मुक्तक खूपच सरस! सगळ्या दुव्यांबद्दल धन्यवाद.

क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com

संदीप चित्रे's picture

7 May 2009 - 10:45 pm | संदीप चित्रे

वाचलाय की 'मला एखादी गोष्ट माहिती नाही / समजत नाही याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट नसेलच.. फक्त मला या क्षणी त्याबद्दल ज्ञान नाही हे खरं'.

शब्दरचना / वाक्य वेगळं असेल पण अर्थ हाच आहे. मला तरी तो विचार खूप पटला.
यातला अर्थ शक्य तेव्हा वापरायला सुरूवात केल्यापासून अनेक अनावश्यक वाद आपोआप टळत आले :)

धनंजय's picture

8 May 2009 - 12:49 am | धनंजय

लेखात उद्धृत केलेले नरहर कुरुंदकरांचे वाक्य बहुधा त्यांच्या "जागर" या लेखसंग्रहातले आहे. (नसेल तरी त्याच्यापुढील माझे विवेचन त्या संग्रहातील लेखांबद्दल आहे.)

काही प्रतिसादकर्त्यांनी जसा त्याचा अर्थ घेतलेला आहे, तो सर्वथा तसा नसावा.

माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही. परंतु माझ्या सभोवती जे असंख्य लोक ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांच्यापासुन तुटुन जाण्यावर ही माझा विश्वास नाही

"जागर" संग्रहातील अनेक लेख असे पटवायचा प्रयत्न करतात, की भारताची राज्यघटना आणि तदनुषंगिक धोरणे आहेत, त्यांच्यात कुठलाही धर्मविचार प्रमाण मानता येत नाही. म्हणजे त्यांचा संपूर्ण विचार असा काही आहे, की सरकारच्या कुठल्याही धोरणासाठी ईश-प्रामाण्य अमान्य आहे, पण याचा अर्थ "असंख्य लोकांपासून तोडले जाणे" नव्हे.

आता माझे वैयक्तिक मत : ज्या ठिकाणी काही आहार-निद्रा-अभय-मैथुन-आनंद-विचारानुभव-सौंदर्यानुभव यांची वंचना माझ्यापासून होत नाही तोवर कोणीसुद्धा वाटेल त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्या असंख्य लोकांपासून तुटावेसे मलाही वाटत नाही.

परंतु जर कोणी म्हणेल :
१. "माझ्या ईशवचनाप्रमाणे तुला किंवा (या दुसर्‍या मानवाला) आहार मिळणार नाही/सहभोजन मिळणार नाही", वगैरे - तर तशा व्यक्तीच्या म्हणण्याचे खंडन मला स्वसंरक्षणासाठी (किंवा मित्रसंरक्षणासाठी) करावे लागेल.
२. असेच निद्रा, अभय, इत्यादि बद्दलही...

अशा परिस्थितीत मी कोणाचे म्हणणे ऐकीनही, पण ते ऐहलौकिक असावे लागेल. उदाहरणार्थ - "आता अन्न खाणे तुला कुपथ्यकारक आहे, म्हणून तुला खाणे वर्ज्य आहे..." वगैरे वाद ऐकून, तपासून, मानून घ्यायला मी तयार आहे.

जर माझा धंदा जहाज-व्यापाराचा असला तर कोणाचे ईशवचन आहे म्हणून अमुक आदमाचा सेतू आहे, असे ईशवचन सांगून माझा धंदा बंद पाडायला लागले, तर त्याचा मी विरोध करेन. अशा बाबतीत सुद्धा ऐहलौकिक वाद सांगून माझा धंदा बंद पाडला तर मानून घेईन.

(भारतासारख्या प्राचीन भूमीच्या खड्यान् खड्यावर पौराणिक आणि ऐतिहासिक विभूतींचे पाय पडलेले आहेत. मग भारतात जे विश्वास ठेवतात अशा सगळ्यांचाच अपमान टाळायचा म्हटले तर संडास आणि नाले बांधायचे तरी कुठे?)

सारांश : लोकांनी मला अमुकतमुक करायला भाग पाडले नाही (आणि त्यात माझ्या भरलेल्या करभाराचा अंश खर्च करणे, हेसुद्धा आले) तर त्यांच्या कुठल्याही श्रद्धेचा आदर मी करतो. (बहुतेक लोकांना "आपण ईशवचनावरून कुणाला काही करायला भाग पाडतो" याची दखलसुद्धा नसते! सार्वजनिक दारूबंदी करायचा प्रयत्न करतात, किंवा सार्वजनिक बीफबंदी करायचा प्रयत्न करतात ते "त्या दुसर्‍या धर्मातले" लोक असतात.)

नितिन थत्ते's picture

8 May 2009 - 12:08 pm | नितिन थत्ते

राजन खान यांच्यावर भरकटलेली चर्चा रुळावर आणल्याबद्दल धनंजय यांचे आभार.

लेखात श्रद्धा अंधश्रद्धा असे दोन शब्द आहेत.
देवावर श्रद्धा असणारे (पण बुवांना फाट्यावर मारणारे) लोक आपल्या श्रद्धेचे समर्थन करण्यासाठी श्रद्धेचे असे दोन प्रकार असल्याचे मानतात्/सांगतात आणि वर पुन्हा श्रद्धा असावी अंधश्रद्धा असू नये असे प्रतिपादन करतात.

माझ्या मते दोन्ही गोष्टी एकच आहेत. फक्त श्रद्धावस्तू वेगवेगळी आहे.
आपल्या कल्याणाची, हित/ अहिताची जबाबदारी कोणावर तरी सोपवण्याचीच प्रवृत्ती असते.

खराटा
(रंग माझा वेगळा)

हेरंब's picture

9 May 2009 - 6:31 pm | हेरंब

जेंव्हा माणूस आत्मविश्वास गमावतो तेंव्हा तो एखाद्या बुवाच्या, ज्योतिषाच्या किंवा कुठल्यातरी कर्मकांडाच्या मागे लागतो.
तसे करुन जर त्याला मनःशांती मिळत असेल तर तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
पण एखादा निवडलेला मार्ग चुकीचा आणि त्या डेस्परेट माणसाला खड्ड्यात घालणारा असेल, तर त्याला सावध करणे हेही इतरांचे कर्तव्यच आहे.