गवार बटाटा जवळा

चित्रादेव's picture
चित्रादेव in पाककृती
23 Apr 2009 - 7:28 am

gavaar

गवार आमची तशी एकदम मनपसंद भाजी. त्यात परवा तात्यांनी जवळयाची आठवण काढून दिली. मग काय घेतली पिशवी आणि गेले बाजाराला. फरक हाच की इथे कोळीण न्हवती भांडायला. इथे बाप्या होत्या मिचमिच्या डोळ्याचा. इकडच्या एशियन मार्केटात गेले अन घेवून आले सुखा जवळा. मग गवार आणली. जमवाजमव झाली.मग केली सुरुवात. तर मंडळी, हे घ्या.

सामानः
१ वाटी जवळा,
१/२ किलोच्या आसपास खुटखुटीत गवार्(मोडून पहा कशी खुटकन मोडते का नाही. एका हाताने खुडा अन खुट आवाज आला की समजा),
१ मोठा लाल कांदा,
१ चमचा काळा मसाला,
१/२ चमचा काश्मिरी लाल मसाला पूड,
हळद,
२ चमचे ओले खोबरे, १ लहान कांदा आणि ५-६ लसूण पाकळ्या भाजलेलं वाटण,
आल्याचा तुकडा,
कोथिंबीर,
१ लहान कुठलाही रंगाचा बटाटा,म्या पामराने जांभळा बटाटा घेतला,
१ टोमॅटो,
एखादी चिंचं,

कृती:
१.गवार नीट निवडून हातानेच बेताच्या आकाराची खूडून धूवून निथळत ठेवा. जवळा पाखडून पाण्याने धूवून पाण्यात भिजत ठेवा.
२.कांदा,लसूण अन खोबरे हे भाजून वाटण तयार ठेवा.शेवटी आल्याचा तुकडा टाकून वाटून घ्या बारीक.
३.फोडणीचा मोठा कांदा कापून पुरेसे तेल टोपात टाकून तापले की कांदा मस्त खरपूस परतायचा.
४. आता त्यात टोमॅटो टाका, मस्त परता. हळद आणि लाल काश्मीरी मिर्च मसाला तेलात टाका. वाटलेले वाटण तेलातच परता.
५. मग बटाटा परतून झाला की गवार्(कोवळी असेल तर वेगळी उकडवायची गरज नाही) परतून घ्यायची.
६. शेवटी एक वाफ आली झाकण ठेवून की जवळा अन चिंच टाकून परता. झाकण मारून मंद आच करून शिजू द्या थोडा वेळ. मग वरून कोथिंबीर घालून उतरवा अन खा तांदूळाची रोटी(कोळीणीच्या भाषेत) वा भाकरी बरोबर खा.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

23 Apr 2009 - 7:30 am | विसोबा खेचर

चित्रादेव यांना मिपावरून काढून टाकण्यात येत आहे.

धन्यवाद! :)

तात्या.

मितालि's picture

23 Apr 2009 - 7:39 am | मितालि

सही दिसतेय... का छळताय असले तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ बनवुन..
कधी एकदा जन्मभुमीला परत जातेय आणि जननी ने बनवलेली जवळ्याची भाजी खातेय असे झालय...
जननी जन्मभुमीश्च स्वर्गादपि गरियसी चा अर्थ आता कळतोय.........

काजुकतली's picture

27 Apr 2009 - 12:03 pm | काजुकतली

गवार आणि जवळा हा माझ्या लेकीचा आवडता विषय आहे. पण ह्या दोघांचे काँबो करता येते हे माहितच नव्हते.. नक्की करणार ही भाजी...

साधना