ताबडतोब रस मलाई.. :)

प्राजु's picture
प्राजु in पाककृती
15 Apr 2009 - 10:47 pm

नमस्कार खवय्यांनो,
(झालं! आली का परत एक नवा प्रयोग घेऊन..असं कोण रे म्हणतंय तिकडे...??)
रसमलाई ही बंगाली मिठाई, बघताबघता महाराष्ट्रीयन गोड पदार्थात मिसळून गेली .. जशी दूधात साखर मिसळावी ना अगदी तश्शी.
आम्रखंड्,श्रीखंड.. हे पदार्थ तर छानच. गुलाबजाम, खीर तर रोजचेच. रसमलाई माझी अतिशय आवडती डिश आहे. गोड पदार्थांमध्ये जर मन लावून मी काही खात असेन तर ती रसमलाई. चपटे पेढ्याच्य आकाराचे गोळे असले की, रसमलाई. लहान लहान द्राक्षासारखे गोळे असले की अंगूर मलाई..
माझ्या कोल्हापूरी घशातून ही रसमलाई इतकी अलगद उतरते... व्वा! काय सांगू आता.
इथे स्वादची रसमलाई मिळते. तो टिन घरी आणून त्यामध्ये असलेल्या पाकातल्या पनीरच्या इडल्या आटवलेल्या दूधात घालून १-२ मिनीटे उकळल्या की मस्त रसमलाई तयार होते. आज पर्यंत मी तश्शीच करत होते. पण झालं असं.. की, त्या इडल्या भल्या मोठ्या असतात आणि टिनमध्ये ९-१० च असतात. त्यामुळे एकतर एका वेळी ती संपत नाही आणि तसाच टीन ठेवताही येत नाही. त्यामुळे सगळी मलाच संपवावी लागते एका दिवशीच (;) ) . मग डायट गेलं तेल लावत असं होतं.
एक मैत्रीण म्हणाली की, रिकोटा चीज ची रसमलाई मस्त होते. झालं.. मी लग्गेच रिकोटा चीज आणलं. त्यात साखर घालून अवन मध्ये तासभर बेक केलं. बाहेर काढून त्याचे गोळे बनवले आणि दूधात टाकले आटवलेल्या. पण तो जो काही प्रकार झाला तो झाला भलं मोठं पातेलं भर. त्यातून त्याची चव ना धड रसमलाई , ना धड पेढा, ना धड बासुंदी.. या तिन्हीच्या मधलाच प्रकार झाला. झाला तो असा काही झाला.. की खाव्वेना. पातेलं भर ते टाकवेनाही.. पण शेवटी टाकूनच द्यावं लागलं. त्यानंतर मात्र कानाला खडा. रसमलाई स्वादचीच आणून घरी दूधात टाकून खायची.
परवा एक मैत्रीण सहज म्हणाली, "मी रसमलाई घरी केली होती.. नेट वर बघून." रसमलाई हे नाव ऐकूनच मी कान टवकारले. तिला विचारून घेतलं कसं केलं.. काय काय केलं?
पद्धत सोपी वाटली. घरी येऊन रामनवमी दिवशी केली. दिवस चांगला होता त्यामुळे माझ्या प्रयत्नाला यश आलं.
तुम्हाला रसमलाई आवडत असेल तर खालील पद्धतीने जरूर करून बघा. आवडली तर सांगा.. मी मैत्रीणिला धन्यवाद सांगेन.

साहीत्य :
दूध - ३ कप + ३ कप
लिंबू- १/२
साखर - १ कप
पाणी २ कप
दूधाचा मसाला २ टी स्पून, पिस्त्याचे काप (ऐच्छिक)
कूकर

कृती :
१. ३ कप दूध पातेल्यामध्ये घेऊन उकळावे. उकलि यायला लागली की त्यात ते अर्धे लिंबू पिळावे. त्यातला रस पूर्ण संपला पाहिजे.
२. दूध फाटून चोथापाणि झालेले दिसेल. ते एका फडक्यातून गाळून घ्यावे. आणि तयार पनीर फडक्यामध्ये १० मिनिटे घट्ट बांधून ठेवावे.
३. फडक्यातले पनीर काढून घेऊन ते हाताने नीट मळून घ्यावे. गाठी मोडल्या पाहीजेत.
४. त्याचे लहान लहान गोळे किंवा पेढ्याचे आकाराचे गोळे करावेत.
५. कूकर मध्ये डायरेक्ट (भाताचे डबे न वापरता)१ कप साखर घालून त्यात २ कप पाणी घालावे.
६. त्यात पनीरचे गोळे घालून घट्ट झाकण लावून १ शिटी होऊ द्यावी. गॅस बंद करावा. पुढे मोजून ५ मिनिटामध्ये प्रेशअर उतरले तर ठीक नाहीतर कूकर पाण्याखाली धरून थंड पाणी सोडून प्रेशर उतरवावे.
पनीरचे गोळे मोठे झालेले दिसतील. ते अलगद पिळून बाजूला काढून ठेवावेत.
७. दुसर्‍या पातेल्यात ३ कप दूध आटवत ठेवावे. मग त्यात दूधाचा मसला, पिस्त्याचे काप घालावेत. आवडीनुसार साखर घालावी.
८. हे पनीरचे गोळे त्या दूधात घालून आणखी १-२ मिनिटे दूध उकळू द्यावे.
९. थंड झाले की, सजावटीसाठी आणखी पिस्त्याचे काप घालावेत. ही रसमलाई थंड करून खाण्यास द्यावी.

या प्रमाणात साधराण १५-२० गोळे होतात पनीरचे. ३ माणसांच्या कुटुंबाला पुरते रसमलाई. :)

शुभेच्छा

प्रतिक्रिया

चकली's picture

15 Apr 2009 - 11:17 pm | चकली

मी पण अशीच रसमलाई करते. कूकर मध्ये छान होते. कोणी पाहूणे, मित्र मंडळी आली कि करायला छान आहे. सगळ्यांना आवडते!
चकली
http://chakali.blogspot.com

समिधा's picture

16 Apr 2009 - 12:07 am | समिधा

ए खुपच सोपी पध्दत दिली आहेस रसमलाईची. मला पण रसमलाई खुप आवडते पण घरी कधिच केली नाही.
पण आता नक्कीच करुन बघते आणि तुला सांगते.:)
(माझ्या इथे अपना-बझार ला फ्रोजन मिळते तिच एकदा आणली होती,पण मग पुण्याला मिळणारी ताजी आठवली)

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

विसोबा खेचर's picture

16 Apr 2009 - 12:18 am | विसोबा खेचर

हम्म! पाककृती छान आहे. तसा रसमलाई हा प्रकार आम्हाला आवडतो परंतु आम्हाला मध्यप्रदेशातील,उत्तर हिंदुस्थानातील दूध आटवून केलेली मिठाईच अधिक आवडते. दूध फाडून केलेल्या बंगाली मिठाईचे आम्ही तितकेसे भोक्ते नाही!

असो,

आपला,
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी,
इंदौर, मध्य प्रदेश.

शाल्मली's picture

16 Apr 2009 - 12:41 am | शाल्मली

मस्तच प्रकार आहे हा आणि सोप्पाही!
चला.. रसमलाई आता कधीही करता येईल.
करून बघते आणि सांगतेच तुला कशी झाली ते :)

--शाल्मली.

शितल's picture

16 Apr 2009 - 12:55 am | शितल

मस्तच पाककृती.
आता लवकर करून पाहिन आणि तुला सांगेन. :)

रेवती's picture

16 Apr 2009 - 2:02 am | रेवती

करून बघते व सांगते.
कुकरमध्ये एक शिट्टी होइपर्यंत शिजवण्याची आयडीया चांगली आहे.

रेवती

चित्रा's picture

16 Apr 2009 - 2:57 am | चित्रा

कसली? ताबडतोब म्हणून ताबडतोब बघायला आले , तर बराच वेळ खाणारी पाककृती निघाली की. ;)
ताबडतोब रसमलाई म्हणजे डब्यात मिळते ती. ;)

ते असू दे, छान पाककृती.

प्राजु's picture

16 Apr 2009 - 6:33 am | प्राजु

अगदी खरंच खूप लवकर होते ही रसमलाई. जास्तीत जास्त २५ मिनिटे लागतात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चित्रादेव's picture

16 Apr 2009 - 3:06 am | चित्रादेव

ताबोडतोब हवी असेल तर वरच्या दूधात फक्त हलदीरामचे रसगुल्ले घातले की झाले. अन्यथा बाजारातले रिकोटा चीज वापरून करतात पण ती काही इतकी चांगली नाही लागत.

रेवतीताई, तुमची रेसीपी छान आहे. मला पण वाटले की पटकन झटकन होण्यासारखी आहे म्हणून. :)

रेवती's picture

16 Apr 2009 - 3:35 am | रेवती

नाही हो नाही.
ती रेशिपी माझी नाही.
मला नाही हो येत बंगाली मिठाया (तश्या आपल्या तरी कुठे येतात करायला?;))

रेवती

प्राजु's picture

16 Apr 2009 - 6:36 am | प्राजु

हल्दीरामचे रसगुल्ले काय .. किंवा स्वादच्या रस इडल्या काय.. एकूण एकच. रिकोटा चीजची रसमलाई खाणं म्हणजे शिक्षा वाटते. रसमलाई ची आवड कमीच होईल.
एकदा ही रेसिपी करून पहा. ३ माणसांच्या कुटुंबाला एकावेळी नीट पुरते ही रसमलाई. आणि अगदी २०-२५ मिनिटांत होते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मीनल's picture

16 Apr 2009 - 5:34 am | मीनल

कूकर मधे शिजवायच?
माहितीच नव्हत.
मीनल.

मितालि's picture

16 Apr 2009 - 5:36 am | मितालि

मी पण अशीच बनवते रसमलाई... खुप छान बनते..

विंजिनेर's picture

16 Apr 2009 - 6:18 am | विंजिनेर

रसमलई लुसलुशीत होण्यासाठी, पनीर साठी गाईचेच दुध वापरावे.
शिवाय, पनीर करण्यासाठी लिंबाच्या ऐवजी व्हेजीटेबल व्हिनेगर वापरले तर चव जास्त छान येते.

म्हशीच्या दुध फक्त पनीर पकोडे/टिक्का इ. साठीच छान असते.
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

प्राजु's picture

16 Apr 2009 - 6:37 am | प्राजु

फक्त आणि फक्त गाईंचेच दूध मिळते. म्हैस नावाला सुद्धा दिसत नाही कुठे अमेरिकेत. त्यामुळे स्टोअर्स मधून म्हशीचे दूध नावाचा प्रकार दिसलाच नाही कधी. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मैत्र's picture

16 Apr 2009 - 10:37 am | मैत्र

रिकोटा चीज ची रसमलाई चांगली होते. इतकी वाईट नक्कीच होत नाही. टाकून देण्यासारखी नक्कीच नाही. आणि हो मी एक वेळ खाईन बायकोने केलेले प्रयोग पण जवळपास पंचवीस तीस जणांच्या टीमला आवडले म्हणजे चांगले असावेत.

अर्थात मला माहीत नसलेल्या काही टिप्स किंवा ट्रिक्स असतील तर गृह मंत्रालयात विचारून सांगतो :)

प्राजुताई, तुझी दुधापासून पनीर आणि मग रसमलाई ही पद्धत एकदम ऑथेंटिक (मराठी ?) आहे त्यामुळे ती चव जास्त चांगली असणारच.

स्वाती दिनेश's picture

16 Apr 2009 - 11:36 am | स्वाती दिनेश

प्राजु, ही कुकरची आयडीया भारी दिसते आहे, एकदा करुन पहायला हवी. मी हलदीरामचे रसगुल्ले घेऊन रसमलाई करते कारण रसगुल्ले करण्यात वेळ फार जातो, पण आता ही तुझी आयडीया करुन पाहिन ग.
स्वाती

भाग्यश्री's picture

16 Apr 2009 - 12:05 pm | भाग्यश्री

ए रेसिपी सहीच आहे.. मी नक्की करून बघणार.. :)
पण मला एक शंका आहे.. दुधात लिंबू पिळून त्याचं चोथापाणी होतं.. म्हणजे काय?? :| मी कधी पनीर घरी केलेला पाहीला नाहीये, सो काहीच कळत नाहीये.. (आई करायची तेव्हा आम्ही फक्त खायला हजर असायचो!)
आणि ते फडक्यातून गाळून घेतल्यावर फडक्यात पनीरचा गोळा असेल ना? आणि फडक्यातून खाली काय जाईल??
मला माहीतीय फार अडाण्याचे आहेत प्रश्न.. पण करताना गोंधळ नको उडायला म्हणून विचारतेय!
होममेड पनीरचा मोह जबरी आहे! (हे पनीर भाज्यांनाही वापरता येईल ना??)

www.bhagyashree.co.cc

पर्नल नेने मराठे's picture

16 Apr 2009 - 4:22 pm | पर्नल नेने मराठे

पण मला एक शंका आहे.. दुधात लिंबू पिळून त्याचं चोथापाणी होतं.. म्हणजे काय??

पाणी वेग्ले न दुध वेग्ले होते.....नासलेले दुध पहिलेस नहिस का?

आणि ते फडक्यातून गाळून घेतल्यावर फडक्यात पनीरचा गोळा असेल ना? आणि फडक्यातून खाली काय जाईल

होय गोळा उरतो आणी फद्क्यातुन पाणी निघुन जाते.

चुचु

भाग्यश्री's picture

16 Apr 2009 - 8:40 pm | भाग्यश्री

ओके.. मला वाटलंच होतं असंच असेल.. पण म्हटलं विचारून घ्यावं! :)
थँक्स गं..
www.bhagyashree.co.cc

चकली's picture

16 Apr 2009 - 9:10 pm | चकली

पनीर ची क्रूती इकडे आहे

http://chakali.blogspot.com/2008/10/how-to-make-paneer-at-home.html

चकली
http://chakali.blogspot.com

चकली's picture

16 Apr 2009 - 9:11 pm | चकली

पनीर ची कृती इकडे आहे

http://chakali.blogspot.com/2008/10/how-to-make-paneer-at-home.html

चकली
http://chakali.blogspot.com

क्रान्ति's picture

16 Apr 2009 - 12:38 pm | क्रान्ति

मस्त! किचकट मिठाई इतकी सोपी करुन दिलीस, आता करून पहायलाच हवी. फोटो पाहून मोह आवरत नाही!
<:P
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

स्मिता श्रीपाद's picture

16 Apr 2009 - 1:35 pm | स्मिता श्रीपाद

किती सोपी आणि सुटसुटीत आहे ग रेसिपी....
मी येत्या वीकांताला नक्की करणार...
धन्यु.

-स्मिता

स्वाती राजेश's picture

16 Apr 2009 - 3:18 pm | स्वाती राजेश

मस्त आणि सोपी रेसिपी...
त्यातील कुकरमधे उकडायची आयडिया मस्त....
नक्की करून पाहिन यावेळी.

समिधा's picture

28 Apr 2009 - 5:30 am | समिधा

आज बनवली रसमलाई.मस्त झाली.
पण दुध बनवताना दुधाला घट्टपणा येण्यासाठी १/२ चमचा कॉनफ्लोअर लावले.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

शिप्रा's picture

28 Apr 2009 - 10:21 am | शिप्रा

रसमलाईची रेसिपी बेस्ट आहे..करुन बघितली..मस्त झाली होती..दुधाला घट्टपणा येण्यासाठि मी त्यात घरातीलच पेढा कुस्करुन घातला त्यामुळे चव पण मस्त आली होती.
कुकरची आयडीया माहित नव्हती..त्याबद्दल धन्यु :)

रम्या's picture

28 Apr 2009 - 2:59 pm | रम्या

आईने मागच्याच शनिवारी करून पाहीली. एकदम वरीजनल झाली होती. किंबहूना वरीजनल पेक्षा एकदम मऊ झाली होती.
दुधाच्या चोथ्याला लिंबाचा वास येत होता म्हणून तो साध्य पाण्याने धुवून काढला. मग मात्र मस्त झाला.

प्राजूताई एक प्रश्न आहे. पनीर मळताना त्यात खायचा सोडा टाकला तर कुकर मध्ये शिजल्यावर तो स्पंजी होईल का?

आम्ही येथे पडीक असतो!

प्राजु's picture

28 Apr 2009 - 7:12 pm | प्राजु

करून पहा आणि मलाही सांगा. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मितालि's picture

28 Apr 2009 - 8:06 pm | मितालि

हो.. पनीर मळताना चिमुट्भर सोडा टाकतात.. पण जास्त झाला चुकुन तर गोळे फुटणे / विरघळणे अशी रीस्क असते...
आणि १ चमचा मैदा पण घालतात..

टायबेरीअस's picture

28 Apr 2009 - 7:37 pm | टायबेरीअस

छान आहे रेसिपी!

चटोरी वैशू's picture

4 May 2009 - 8:04 am | चटोरी वैशू

ही पद्धत खरचं सोपी आहे ... मी बनवून पाहिली ... मस्त झाली होती.... सासू-सासरे.... जाम फिदा.... नवरा तर एकदम खुश .... आवडती डिश ना........ धन्यवाद...!

जोशी पुण्यात दन्गा's picture

4 May 2009 - 9:43 am | जोशी पुण्यात दन्गा

मी रासगुल्ले घरी करते. पण ही कूकर मध्ये शिजवण्याची युक्ती छान आहे !!
१ अनुभवाची गोष्ट : पनीर करायला लिम्बाऐवजी व्हिनेगर चान्गले असते.
लिब्मामुळे १ प्रकरचा वास येतो आणि पनीर थोडे पिवळ्सर दिसते...

रम्या's picture

4 May 2009 - 12:33 pm | रम्या

मग रसगूल्ले करण्याची आणखी पद्धत कोणती?
आम्ही येथे पडीक असतो!