नुकताच झालेला इटालीमधला भूकंप हा तेथील २००-२५० लोकांचे बळी घेऊन गेल्याचे बहुतेकांनी वाचले असेल. याआधी अनेकांना आठवतील ते भूज आणि लातूरचे भूकंप तर हजारोंचे बळी घेऊन गेले. लातूर येथील भूकंपात जवळजवळ आठ-दहा हजार लोक मृत्यू पावले, ३० हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आणि भूज येथील भूकंपात सुमारे २०,००० लोक मृत्युमुखी पडले, ३ लाख इमारतींची हानी तसेच वित्तहानीही प्रचंड झाली असे सांगितले जाते. याखेरीज येथील पशुधनाचा (गाई/शेळ्या/मेंढ्या/कोंबड्या) मोठ्या प्रमाणावर नाश झाला आणि त्यामुळे या प्राण्यांवर ज्या लोकांचे पोटपाण्याचे उद्योग अवलंबून असतात अशा लोकांचेही अतीव नुकसान झाले असे ऐकले आहे.
चक्रिवादळे, पूर हल्लीच्या काळात बरीचशी पूर्वसूचना देऊन येतात, म्हटले तर लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी थोडा का होईना, वेळ असतो. पण भूकंपाच्या बाबतीत मात्र आपण बेसावधच पकडले जातो. वास्तविक पाहता पृथ्वीच्या पोटात चाललेल्या अनेक प्रक्रियांमुळे अनेकदा जमिनीचे स्तर हलतात. ही प्रक्रिया कमी अधिक प्रमाणात सर्वत्र आणि सतत चालत असली तरी तिचे परिणाम दरवेळी पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहणार्या लोकांना/प्राण्यांना जाणवतातच असे नाही. काही ठिकाणी हे परिणाम जास्त जाणवतात याचे कारण ह्या घडामोडी जमिनीच्या किती खोलवर चालू आहेत तसेच जमिनीच्या वेगवेगळ्या थरांची रचना कशी आहे इत्यादींवर हे अवलंबून असते. पृथ्वीच्या ज्या भागांत भूकंपांची शक्यता जास्त असते अशा भागांना भूकंपप्रवण "क्षेत्रे" (जागा) म्हणतात. भूकंप कशा प्रकारे जाणवतो, यावरून भूकंपाच्या वेगवेगळ्या तीव्रता ठरवल्या गेल्या आहेत.
पण भूकंपाच्या परिणामांमध्ये सर्वात मनाला बोचते ती मनुष्य/प्राणहानी. बोचण्याचे कारण असे की ही मनुष्यहानी बरेचदा नुसतीच भूकंपाच्या तीव्रतेवर (स्केलवर) अवलंबून नसते, तर अनेकदा भारतासारख्या देशातली प्राणहानी ही विशेषतः बरेचदा चुकीच्या पद्धतीने राहण्याच्या इमारती बांधल्या गेल्याने तसेच हानी टाळण्याच्या इतर मार्गांकडे झालेले दुर्लक्ष यांमुळे होते असे वाटते. असे दिसून येते की, जेव्हा भूकंप हे विकसित देशात होतात, तेव्हा ही हानी अत्यंत कमी होते, किंवा कधीकधी होतही नाही. याचे मुख्य कारण म्हणजे इमारतींच्या रचनेचे आणि प्रकारांमधले प्रमाणीकरण, आणि इमारती अधिक टिकाऊ आणि सुरक्षित करण्याची धडपड. आपल्याकडे दुर्दैवाने ही जाणीव विशेष दिसत नाही. तरीही माझ्या माहितीप्रमाणे काही प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेषतः आय आय टी कानपूर आणि काही सरकारी संस्था यांनी मिळून अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. पण याबद्दल नंतर कधीतरी.
हे सर्व नुकतेच आठवण्याचे कारण म्हणजे नुकताच झालेला इटलीतील भूकंप. आठवते त्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे महाराष्ट्रात रत्नागिरी, तसेच कोयनानगर भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. तेव्हाचे हे धक्के बर्यापैकी सौम्य स्वरूपाचे असल्याने विशेष हानी झाली नाही, परंतु हानीकारक तीव्र भूकंप सांगून होत नाहीत आणि अचानक आलेल्या संकटाला कसे सामोरे जायचे याची कसलीही कल्पना नसल्याने जे नुकसान व्हायचे ते होऊन जाते हे अशा भूकंपांनंतरच लक्षात येते.
ही हानी टळावी यासाठी आपण दरवेळी केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहणे योग्य नाही तर भविष्यात हानी होऊ नये किंवा कमीत कमी व्हावी यासाठी जे आपल्या कक्षेत आहे ते आपण करू शकतो. अमेरिकेतील फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने (फीमा) अमेरिकेत भूकंप झाल्यास होणारी हानी कमीतकमी होईल यासाठी जनतेने जी खबरदारी घेतली पाहिजे त्यासंबंधी त्यांच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचना माहिती असल्यास लक्षात ठेवून प्रसंगावधान दाखवून आयत्या वेळी सहज पाळता येण्यासारख्या आहेत.
याचा अर्थ आपल्याकडे ही माहिती नाही असा नाही. अशाच सूचना अत्यंत चांगल्या पद्धतीने भारत सरकारनेही तयार केल्या आहेत, पण त्या सूचना लोकांपर्यंत पोचवण्याचे कितपत प्रयत्न झाले आहेत किंवा ते यशस्वी झाले आहेत ह्याची कल्पना नाही. तसेच स्थानिक पातळीवर पुणे महापालिकेच्या जिन्यावर लोकांना दिसेल अशा ठिकाणी एका फळ्यावर हीच माहिती लिहीलेली मी पाहिली आहे, परंतु तो फळा अशा उंच ठिकाणी लावला आहे की मुद्दाम थांबून ती माहिती वाचायचे कष्ट कोणी घेईल असे वाटत नाही.
यासाठी इथे अशाच एका पुस्तिकेचा (हिंदी) संदर्भ देते. पुस्तिका हिंदीतली असली तरी समजायला कठीण नाही.
http://www.ndmindia.nic.in/EQ_G_H_Dwellers_Bilingual.pdf
या वीस पानी पुस्तिकेतील इतर माहितीसोबतच नागरिकांच्या दृष्टीने मुख्य महत्त्वाचे भाग म्हणजे भूकंपाआधी, भूकंप सुरू असताना आणि भूकंपानंतर काय केले पाहिजे हे आहेत. या पुस्तिकेतील "भूकंप के दौरान क्या किया जाये?" हे पान अशा आपत्का़ळी उपयोगी यावे म्हणून विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहे. काही सूचना साध्या सोप्या भाषेत दिल्या आहेत. "Drop", "Cover", "Hold" ( "वाका", "लपवा" आणि "धरा"). घरातील लहान मुलांनाही अशी माहिती देऊन ठेवावी. अधिक माहिती वरील दुव्यावरील पीडीएफ फाईलमध्येच वाचायला मिळू शकते.
संदर्भ आणि अधिक माहितीसाठी -
http://www.nicee.org/Killari.php
http://www.nicee.org/Bhuj.php
http://pubs.usgs.gov/fs/1999/fs151-99/
http://www.fema.gov/hazard/earthquake/index.shtm
http://www.ndmindia.nic.in/
टीपः ही माहिती मी लेख स्वरूपात मागे एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी दिली होती, पण त्यांनी छापण्याचे कष्ट घेतले नव्हते! माझ्याकडे मराठीकरण केलेली बरीच माहिती आहे, पण देणार नाही, त्यानिमित्ताने पीडीएफ उघडून वाचण्याचे कष्ट घ्यावे लागतील असा उदात्त हेतू आहे.
प्रतिक्रिया
8 Apr 2009 - 9:40 pm | चकली
माहिती उपयुक्त आहे. धन्यवाद
चकली
http://chakali.blogspot.com
8 Apr 2009 - 9:43 pm | प्राजु
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Apr 2009 - 9:54 pm | भाग्यश्री
चांगली माहीती आहे ! वाका,लपवा, धरा आवडले.. पटकन लक्षात राहणासारखे आहे..
तुम्ही दिलेल्या लिंक्स पाहते वाचून..
भुकंप आला की जाम हडबडून जायला होतं...
ही सगळी माहीती नीट माहीत असेल तर बरे पडते.. [कॅलिफॉर्नियावासियांना उपयोगी! :) ]
8 Apr 2009 - 9:57 pm | रेवती
चित्राताई,
महत्वाच्या पण दुर्लक्षीत माहीतीबद्दल धन्यवाद!
२० पानी पुस्तीका चाळली, त्यात दिलेली शास्त्रीय कारणे व 'का?', 'कसे?'
ही माहीती अनेकांना नसण्याची शक्यता.
खाली दिलेल्या लिंकांमधले फोटो पहायला नको असे वाटणारे,
पण बिकट परिस्थीतीची जाणीव करून देणारे आहेत.
रेवती
8 Apr 2009 - 11:10 pm | विसोबा खेचर
याआधी अनेकांना आठवतील ते भूज आणि लातूरचे भूकंप तर हजारोंचे बळी घेऊन गेले. लातूर येथील भूकंपात जवळजवळ आठ-दहा हजार लोक मृत्यू पावले, ३० हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आणि भूज येथील भूकंपात सुमारे २०,००० लोक मृत्युमुखी पडले, ३ लाख इमारतींची हानी तसेच वित्तहानीही प्रचंड झाली असे सांगितले जाते. याखेरीज येथील पशुधनाचा (गाई/शेळ्या/मेंढ्या/कोंबड्या) मोठ्या प्रमाणावर नाश झाला आणि त्यामुळे या प्राण्यांवर ज्या लोकांचे पोटपाण्याचे उद्योग अवलंबून असतात अशा लोकांचेही अतीव नुकसान झाले
यालाच नियती म्हणतात! योगापेक्षा भोग मोठे असतात ते असे!
असो,
चांगला लेख आहे. परंतु भुकंप झाला किंवा होऊ लागला की वर सांगितलेले उपाय करण्याचं माणसाला सुचतच असं नव्हे. आणि समजा रात्री गाढ झोपेत असतांना भुकंप झाला तर काय उपाय करणार ते सांगा बरं! आपण केव्हा मेलो हेच मुळात कित्येकांना कळणार नाही!
टीपः ही माहिती मी लेख स्वरूपात मागे एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी दिली होती, पण त्यांनी छापण्याचे कष्ट घेतले नव्हते!
मी प्रयत्न करून पाहू का? माझी सकाळ आणि मटामध्ये थोडीफार ओळख आहे.
बाय द वे चित्रावैनी, आम्हीही भुकंपप्रवण क्षेत्रात राहतो बरं का! मुंबई ते पनवेल असं हे क्षेत्र आहे असं बोललं जातं! एक दिस ठाण्याला ८ स्केलचा भुकंप झाला अशी बातमी ऐकाल आणि मिपावर दुखवटा व्यक्त कराल. अर्थातच, आम्ही तेव्हा मिपावर येऊ शकणार नाही! :)
नियतीदेवीचा विजय असो..! :)
आपला,
(नियतील मानणारा!) तात्या.
--
योगापेक्षा भोग कितीतरी मोठे असतात. अन्य कुठलीही देवता प्रसन्न होण्यापेक्षा नियतीदेवीची कृपा असणे अधिक महत्वाचे! :)
9 Apr 2009 - 1:36 am | चित्रा
एक दिस ठाण्याला ८ स्केलचा भुकंप झाला अशी बातमी ऐकाल आणि मिपावर दुखवटा व्यक्त कराल. अर्थातच, आम्ही तेव्हा मिपावर येऊ शकणार नाही!
काय हुषार आहात हो!
पाककृतींनंतर हे असे बोलण्याची ही नवीन पद्धत वाटते ;)
परंतु भुकंप झाला किंवा होऊ लागला की वर सांगितलेले उपाय करण्याचं माणसाला सुचतच असं नव्हे. आणि समजा रात्री गाढ झोपेत असतांना भुकंप झाला तर काय उपाय करणार ते सांगा बरं! आपण केव्हा मेलो हेच मुळात कित्येकांना कळणार नाही!
अहो, पण वाचून ठेवले तर जागे असणार्यांना तरी निदान काही चान्सेस असतील ना जगण्याचे? शिवाय जमीन हलायला लागली तर बर्याचदा जाग येत असावी. मागे लातूर/किल्लारी भागात काहीजण झोपेतच दगावले होते. इटलीतही तसे झाले. पण याचे मुख्य कारण इमारतींचे जुने प्रकार. लातूर येथे प्रचलित असलेल्या दगडी भिंती पडल्याने अधिक लोक दगावले होते असे स्मरणात आहे. काही वेळा इमारती या अगदी कच्च्या स्वरूपाच्या असतात (अगदी रीइन्फोर्सड काँक्रीटच्या असल्या तरी). त्यामुळे आधी लक्षात आले तर निदान त्या काही प्रमाणात दुरूस्त तरी करून घेता येऊ शकतात, नाही का? हे सर्व विचार आधी मनात आलेच नाहीत, केलेच नाहीत तर सुधारणा कशा करणार? यासाठी हा सगळा उद्योग.
मी प्रयत्न करून पाहू का? माझी सकाळ आणि मटामध्ये थोडीफार ओळख आहे.
धन्यवाद, पण इथे ही माहिती देण्याचा उद्देश ओळखीचा वापर करण्यापेक्षा माहिती अधिक लोकांपर्यंत पोचावी हा होता. पण त्यातून लेख प्रसिद्ध झाला तर नको आहे असे नाही. तो लेख मी रत्नागिरी/कोयना परिसरातल्या सौम्य घटनांनंतर लिहीला होता. पण परत एकदा वाचून सुधारणा करते म्हणते. व्य. नि. तून बोलू.
योगापेक्षा भोग कितीतरी मोठे असतात. अन्य कुठलीही देवता प्रसन्न होण्यापेक्षा नियतीदेवीची कृपा असणे अधिक महत्वाचे!
या नियतीदेवी प्रसन्न आहेतच तुमच्यावर, (तुमची खरडवही साक्ष आहे) तेव्हा काळजी नको. काय?
----
प्राजु, चकली, भाग्यश्री, आणि रेवती, प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
9 Apr 2009 - 6:20 am | केदार_जपान
चित्रा आपण दिलेली माहिती खूपच उपयुक्त आहे..
सध्या जपान मधे असल्यामुळे, आणि जपान हा पूर्ण देशच भुकंप प्रवण क्षेत्रात येत असल्याने याची आता सवय झाली..इथे तर ४-५ स्केल चे भुंकंप अगदी कॉमन आहेत्,,,पण त्याची भिती वाटत नाही..कारण त्यानी घरे-फ्लॅट्स बांधताना घेतलेली दक्षता आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी आणिबाणिच्या परिस्थिती मधे जर भुकंप आला तर त्यासाठी लागणारी आवश्यक ती साधन-सामग्री पण उपलब्ध असते..
घरातले सामान शक्य तेवढे हलके असते..लाइट्स, गॅस , गिझर इ. उपकरणे अश्या रीतीने असतात कि जरी भुकंप झाला तरी शॉर्ट सर्किट वगैरे होउ नये.... सिलिंग फॅन्स मी जपान मधे खुप कमी पाहिले आहेत..शक्यतो एसी असतात :), पण ते सुद्धा एका कोपर्यात बेड पासुन लांब बसवतात..
भारतात सुद्धा मी बरेच वर्ष कोयना नगर मधे होतो... ६४ का ६२ साली तिथे खूप म्मोठा भुकंप झाला.. (६.५ स्केल)..जवळ-जवळ १००० हुन लोक दगावले..मग त्यानंतर तिथे पत्र्याची आणि विशिष्ट पद्धतिचीच घरे बांधण्यात आली आहेत..
त्यामुळे अश्या भागात खबरदारी, आणि घरे वगैरे बांधताना काटेकोर नियम पाळले गेले तर होणारी जीवित्-वित्त हानी टाळली जाइल
- केदार
9 Apr 2009 - 6:57 am | भडकमकर मास्तर
मी एका स्ट्रक्चरल डिजायनरची गोष्ट वाचली होती की त्या बाईने बांधलेल्या भुजच्या इमारती भूकंपानंतरही कोसळलेल्या इमारतींशेजारी व्यवस्थित उभ्या होत्या.
...
हे इमारतीतल्या लोखंडाच्या प्रमाणावरती अवलंबून असते , असे वाचले होते...
...
आपल्याकडे इमारत बांधताना स्वस्त बांधण्यासाठी ( थिअरीमध्ये रेकमेंड केल्यापेक्षा) कमीतकमी स्टील वापरायची पद्धत आहे असे काही मित्रांकडून ऐकले.....
स्लॅब पडण्याआधी स्ट्रक्चरल डिजायनर इन्स्पेक्शन करून गेल्यानंतर स्टील काढून घ्यायचे ही एक कॉमन पद्धत आहे म्हणे...त्यामुळे भूकंपात इमारत टिकायची शक्यता कमीच.
सिव्हिल इन्जिनियरांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
9 Apr 2009 - 12:19 pm | अवलिया
उपयुक्त माहिती.
--अवलिया
9 Apr 2009 - 2:28 pm | चिरोटा
हे वाचत असतानाच राजस्थानात जैसलमेर येथे भूकम्प झाल्याची बातमी ऐकली.५.३ रिश्टर तिव्रतेचा भूकम्प झाला आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
9 Apr 2009 - 5:18 pm | अत्तु
खुप महत्वाच्या विषयावर लेख आहे. चांगली माहिती दिली आहे.
केदार, तुम्ही म्हटल्याप्रमाणे जपानमध्ये याबाबत खुप जनजागृती झाली आहे.
हो, स्टीलचे प्रमाण अतिशय महत्वाचे असते..त्याचप्रमाणे कॉलमची साईझ पण महत्वाची असते.. हल्ली जागा वाचवण्याच्या दृष्टीने ६ इ"ची कॉलमचा वापर वाढला आहे. हे असे कॉलम असलेल्या इमारती भुकंपामध्ये खुप धोकादायक असतात..
भुकंपप्रवण क्षेत्रामध्ये कसे बांधकाम करावे याबाबत युएनडीपी व भारत सरकारने काही पुस्तिका बनवल्या आहेत. जर कुणी त्या वाचु इच्छित असेल तर मी दुवा देवु शकेन. ( ह्या पुस्तिका इंग्रजीत आहेत). मध्यंतरी यांचे मराठीत भाषांतर करण्याचा प्रयत्न झाला होता.. परंतु बहुतेक ते भाषांतर पुर्ण झाले नाही.
9 Apr 2009 - 10:43 pm | मेथांबा
भा.क.प. ने केलेले काम इथे वाचा -
http://www.greenleft.org.au/2001/435/26746
मेथांबा
10 Apr 2009 - 6:03 am | चित्रा
सर्वांना प्रतिसादांसाठी धन्यवाद.
भाकपचे भूकंपग्रस्तांना मदतीचे काम चांगले आहे. असेच काम अनेक पक्षांनी केले असावे.
भडकमकर मास्तर,
स्टीलच्या प्रमाणात चोरी केली जाते हे बर्याच अंशी खरे आहे. पणा केवळ त्यावर सर्व अवलंबून असते असे नाही, इमारतीचे आकार, तळमजल्याचे स्वरूप (पार्किंगसाठी स्टिल्ट असणे/नसणे), स्टीलच्या योग्य डिटेलिंगचा अभाव, अशी अनेक कारणे आहेत.
खरे तर अधिक शोध घेता आय आय टी ने तयार केलेल्या अनेक मराठी पुस्तिका सापडल्या. ज्यांना अधिक माहिती मिळवावीशी वाटते त्यांनी वाचण्यासारख्या आहेत.
10 Apr 2009 - 5:10 pm | भडकमकर मास्तर
सोप्या मराठीत खूप छान माहिती आहे, ..
या उत्तम दुव्यांबद्दल धन्यवाद...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
10 Apr 2009 - 5:22 pm | शितल
चित्राताई,
उपयुक्त माहिती दिलीत. :)
10 Apr 2009 - 7:47 pm | मराठमोळा
छान माहिती. छान लेख.
धन्यवाद चित्रा तै.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
14 Apr 2009 - 3:57 pm | गुळांबा
२०,००० लोक मृत्युमुखी पडले, ३ लाख इमारतींची हानी तसेच वित्तहानीही प्रचंड झाली असे सांगितले जाते.
हि प्रचंड वित्तहानी रोखण्यासाठी सरकारने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्वदुर पसरवली पाहिजे. पण पैसा वाचवण्यासाठी पैसा खर्च करणे गरजेचे असते हा साधा नियम आहे. भले एखाद्या घरात अग्निविरोधी यंत्रणा वापराअभावी पडुन पडुन फुकट जात असेल पण ती तिथे असणे गरजेचे असते. मात्र हिच गोष्ट अर्थशास्त्राची
अंदाजपत्रके बनवताना विचारात घेताना कोणतेच सरकार दिसत नाही.