वयाप्रमाणे बदलत जाणारी मतं

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in काथ्याकूट
23 Mar 2009 - 5:21 pm
गाभा: 

बारा वर्षांपूर्वी कॊलेजमधून बाहेर पडलो होतो त्यावेळी काही विशिष्ट बाबतीत माझी ( आता असं वाटतं की) टोकाची मतं होती.
त्याबद्दल मी शक्य तेवढा वाद घालत असे.हल्ली असं लक्षात यायला लागलंय की मी आता तितका हट्टी उरलो नाहीये.
जगाला वाटेल ते जगाने करावं, आपण कोण सांगणारे? असं हल्ली वाटतं...

१. लग्नसमारंभातली उधळपट्टी
: मुलगे आणि मुली आपल्या आई-बापांचे पैसे लग्नाच्या चैनीत हक्काने का उधळतात, हा मला पडलेला प्रश्न असे..वरवर आनंदी दिसलो तरी मी तेव्हा कोणतेही लग्नसमारंभ मनापासून अजिबात एन्जॉय करू शकत नसे....
असल्या उधळपट्टीच्या लग्नात उपस्थित राहणं नको असंही वाटत असे. तेव्हा तर मी बर्‍याचशा लग्नांना जाणं टाळत असे. (
कधी विषय निघालाच तर यावरून मी तावातावाने भांडत असे...( हौस हौस असं उत्तर देऊन त्याआड दडणार्‍यांना मी विचारत असे की दुसर्‍याचे पैसे घेऊन स्वत:ची चैन का करावी... स्वत:च्या लग्नात स्वत:ला ( म्हणजे फ़क्त स्वत:ला, आईबापांना नव्हे) परवडेल तितकेच खर्च करावेत..संपलं. मग बरोबर मर्यादित खर्चात लग्नं होतील.. इत्यादी इत्यादी)
... आता मी याबाबतीत थोडा मवाळ झालो आहे ( कारणं अनेक असतील... उधळपट्टीची माझ्या दृष्टीने बदलती व्याख्या असेल... उत्तर भारतीयांची वधुपित्याचे कंबरडे मोडणारी प्रचंड उधळपट्टीची लग्नं पाहिल्यावर ( त्यामानाने मराठी लग्नं काहीच नाहीत अशी -पळवाट असेल...)..... किंवा खूप नातेवाईक एकत्र येणं आणि धमाल करणं यासाठी तरी लग्नसमारंभ व्हावेत असं वाटत असेल...
किंवा थोडक्यात सांगायचं तर आता वय झालं असेल..... हल्ली मी लग्नसमारंभांना उपस्थित राहतो, मनापासून एन्जॉय करतो...
तेव्हाचं सारं आर्ग्युमेंट चूक असं वाटत नाही मला, पण आता इतकाच विचार करतो की आपण आपल्याला पाहिजे तसं केलं..जगाला शिकवणारे आपण कोण?

२. समाजसेवी क्लब : माझ्या ओळखीचे एक ज्येष्ठ डॉक्टर आहेत.स्वभावाने विनोदी... ते एका समाजसेवी क्लबचे सभासद होते. सारखी पुस्तकं नि पत्रकं छापून आम्ही समाजसेवा करतो असा उदोउदो करणारे हे क्लब..... हे डॉक्टर स्वत:च हळूच तसं सांगायचे....मी विचारलं मग समाजसेवेचं काय ? ते हसत म्हणाले ,"बाकीच्यांचं माहित नाही, पण मी तरी तिथे सेवा करायला जात नाही.मी दारू पिऊन रिलॆक्स व्हायला जातो... आम्ही पुढची दारू प्यायला मीटिंग कुठे घ्यावी हा विचार करण्यासाठी आज एका ठिकाणी दारू पीत मीटिंग घेणार आहोत...."
...तेव्हा असं अजून दोघातिघांचं पाहिलं.... हे असे क्लबवाले लोक माझ्या फ़ार डोक्यात जात असत.. ( सरळसरळ मज्जा करायला एकत्र या ना, ही सेवेची नाटकं कशाला ? त्यात त्यांची सेवाज्येष्ठतेची उतरंड, त्या निवडणुका आणि गवर्नर की काहीतरी झाल्याबद्दल स्वकौतुकाच्या वर्तमानपत्रीय बातम्या इत्यादी इत्यादी सगळंच उबग आणत असे.)
..शिवाय प्रत्येक सभासद वर्षाला बारा चौदा हजार देणार तर मग या क्लबचा किती प्रचंड निधी जमायला हवा, आणि त्यांचे किती समाजोपयोगी काम व्हायला हवे असे वाटत असे पण
वर्षाला हे लोक जी सभासद वर्गणी गोळा करणार त्यातली बरीचशी परदेशात मुख्य शाखेला जाते असं ऐकलं तेव्हा हे सारंच एकूण भंपक वाटायला लागलं होतं...
..... या सार्‍या भावनांची तीव्रता आता खूप कमी झाली आहे....आता इतकंच वाटतं,लोक व्यावसायिक संबंध वाढवायला असले क्लब जॉईन करतात आणि स्वत:च्या पैशाने मज्जा करतात,त्यात माझं काय गेलं?
आपल्याला न पटणार्‍या गोष्टी आपण केल्या नाहीत म्हणजे झालं, बाकी जगाला शिकवणारे आपण कोण?

वयानुसार बदलत गेली अशी इथे कोणाची अशी काही मतं असतीलच की ... चला लिहूया..

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

23 Mar 2009 - 5:28 pm | विंजिनेर

ह्यालाच अनुभव ऐसे नाव...
(ज्यांची मतं वयानुसार बदलत नाहीत ते हेकट तरी असतात नाहीतर द्रष्टे तरी. संख्याशास्त्राचा आधार घेता, पहिलीच शक्यता जास्ती ;))
कुठेतरी वाचलं होतं "ज्ञानाच्या वरच्या पातळीवर गेल्यावर चूक-बरोबर ह्यांच्या व्याख्या बदलतात कारण जग मग आपल्याला वेगळ्या चश्म्यातून दिसू लागतं"

विजुभाऊ's picture

23 Mar 2009 - 7:18 pm | विजुभाऊ

खरे आहे मी ही त्या क्लबला नावे ठेवायचो. मग मेम्बर झालो.
त्या संस्थेने मला जे काही उदारतेने अनुभव दिले ते आयुष्यभर पुरतील.
त्या संस्थेचा मी ऋणी आहे.

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

लिखाळ's picture

23 Mar 2009 - 5:54 pm | लिखाळ

आपला चर्चा प्रस्ताव फार छान आहे.

मिपावर बहुधा सुनील यांची स्वाक्षरी आहे (मूळ इंग्रजीमध्ये आहे) ' एक दिवस मी इतका पोक्त होईन, की मी कशावर प्रतोक्रिया देणार नाही !'
या वाक्याचीच आठवण झाली.

सिंहगडावर डांबरी रस्ता करुन पिएमटीने बस सेवा चालू केली होती. मोठ्या कौतूकाने त्या बसचे उद्घाटन केले होते. त्यावेळी मला फार संताप आला होता. अश्या निसर्गरम्य ठिकाणी सहजतेने, जथ्याने जाता आले की तिथल्या परिसंस्थेवर मोठा विपरित परिणाम होईल आणि कारण नसताना आपल्या दर्शनसुखासाठी आपण एका परिसंस्थेची/ निसर्ग रम्य ठिकाणातल्या जीवांची हानी करु. अश्या स्थळांवर पोहोचण्यासाठी सोयी कमीतकमीच ठेवाव्यात असे माझे त्या वेळी आग्रही मत होते.
कालांतराने माणूस निसर्गाला कश्या तर्‍हेने ओरबाडून भोगत आहे याची माहिती कळायला लागली आणि त्या माहितीच्या डोंगराखाली माझा उद्वेग, संताप गारद होऊन गेले. :(
-- लिखाळ.

झेल्या's picture

23 Mar 2009 - 6:11 pm | झेल्या

मलाही आधी वाटायचं की अमिताभ, सचिन यांसारख्या मातब्बरांनी हानिकारक शीतपेयांच्या जाहिराती करू नयेत....
पण आता वाटतं/कळतं की इतके पैसे नाकारणे ही सोपी गोष्ट नाही आणि हा त्यांचा व्यावसायिक/वैयक्तिक प्रश्न आहे.

आधी वाटायचं....दारू-सिगारेट्-गुटखा यांसारख्या गोष्टीवर सरसकट बंदीच का येत नाही....

अशा बर्‍याच गोष्टी आहेत....

आता वाटतं की आधी बरोबर वाटायचं... :)

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

लिखाळ's picture

23 Mar 2009 - 6:17 pm | लिखाळ

आता वाटतं की आधी बरोबर वाटायचं...

तेच बरोबर ! अनेक बाबतीत (सर्वच बाबतीत नाही !) वय वाढले की आपण आपली मानसिक उर्जा, जगाची विरोध करण्याची ताकद यांचे मापन आपल्या परीने करतो आणि आपले बळ कमी आहे हे लक्षांत येताच मवाळ पणाचे किंवा पोक्तपणाचे पांघरुण घेतो. जे अश्या वेळी सुद्धा लढायला प्रवाहाविरुद्ध पोहायला, आपली मते ठामपणे मांडायला सरसावतात त्यांच्या हातून काही काम होते. बाकीच्यांच्या हातून भरीव काम होत नाही.

-- लिखाळ.

भडकमकर मास्तर's picture

23 Mar 2009 - 11:25 pm | भडकमकर मास्तर

जे अश्या वेळी सुद्धा लढायला प्रवाहाविरुद्ध पोहायला, आपली मते ठामपणे मांडायला सरसावतात त्यांच्या हातून काही काम होते.

अगदी अगदी..
बाकी सारेच ( मीही त्यात आलोच) विविध पळवाटा शोधणारे
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

रम्या's picture

24 Mar 2009 - 2:51 pm | रम्या

अगदी योग्य!
शंभर टक्के सहमत.
आम्ही येथे पडीक असतो!

वयानुसार अमिताभही बदललाय हो ! मागच्याच आठवड्यात त्याने पेप्सीच्या जाहिराती करायला नकार दिलाय. आणि त्या जाहिराती करणे मनाला पटत नाही हे कारण ही दिलेय.

संदीप चित्रे's picture

23 Mar 2009 - 6:37 pm | संदीप चित्रे

मला आवडलेला एखादा सिनेमा, नाटक, पुस्तक वगैरे जर कुणाला आवडलं नाही तर मी आधी खूप पटवून द्यायचा प्रयत्न करायचो की ती कलाकृती किती छान आहे. आता मी फक्त 'स्ट्राँगली रेकमेंड करतोय' म्हणून सांगतो -- पाहणं/न पाहणं / वाचणं / न वाचणं / आवडणं / न आवडणं हे त्या व्यक्तीवर सोडून देतो.

आवडलं तर आनंदच आहे, नाही आवडलं तर निदान या कलाकृतीपुरत्या तरी आपल्या आवडी जुळत नाहीत हे मान्य .. :)

गणा मास्तर's picture

23 Mar 2009 - 7:06 pm | गणा मास्तर

भडकमकर मास्तर लग्नसमारंभातील उढळपट्टीबाबत तुमचे आणि माझे पुर्वीचे आणि बदललेले विचार अगदीच सेम टू सेम, फरक एवढाच की मला कॉलेज सोडुन फक्त ४ वर्षं झाली आहेत.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

मराठमोळा's picture

23 Mar 2009 - 7:50 pm | मराठमोळा

मला वाटतं आपली मतं बदल्तात म्हणजे आपण त्या गोष्टींची सवय करुन घेतो. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे बाकी जगाला शिकवणारे आपण कोण? हेच खरे.

रस्त्यावर थुंकणारे लोक, कुठेही कचरा फेकणारे, समोरासमोर भ्रष्टाचार करणारे, बसमधे स्त्रियाना धक्काबुक्की करणारे, बेधुंद गाडी चालवणारे एक ना अनेक लोकं आहेत. कुठे न कुठे आपण्सुद्धा काहीतरी दुसर्‍याला आवडणार नाही अशी गोष्ट करतच असतो. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने जगतो वागतो, योग्य किंवा अयोग्य ते काळचं ठरवेल हे समजुन.
थोडक्यात काय तर हे सर्व समाजाचा आणी सिस्टिमचा एक भाग आहेत आणी हे सर्व चुकीचं का बरोबर ते माहीत नाही पण चालणारच.

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

दशानन's picture

24 Mar 2009 - 10:25 am | दशानन

हेच म्हणतो !

आपण पण सिस्टमचा एक भाग... !

पण सुधारणे साठी कोणी तरी वाट वाकडी करने जरुरी असते... तोच पुढे ... महान आत्मा बनतो !

रेवती's picture

23 Mar 2009 - 8:26 pm | रेवती

मला पूर्वी लग्नं, मुंजी, बारश्यांना जायचा भयंकर कंटाळा यायचा.
सगळीकडे पैशाची उधळपट्टी चालू असल्यासारखे वाटायचे.
माझ्या आईला त्याउलट वाटायचे.
उदा. "अग्गोबाई! पमे, तू येणारेस ना? आपली भेट होईल, आठ वर्षांनी."
असं काहीसं तीनं म्हटलं की वैताग यायचा. आता वाटतं लग्नकार्यांना गेलं की
भेटीगाठी होतात. बरं वाटतं इ.(म्हातारपण आलं वाटतं).
पूर्वी अश्या कार्याच्या निमित्ताने भेटल्यावर नातेवाईक म्हणत,
"कित्ती मोठी झाली ही, अगं तुझ्या बारशानंतर काही योग आला नाही भेटायचा."
भयंकर राग यायचा जेव्हा आज्जी कंपनी असं काहीतरी म्हणायची(आणि डोक्यावरून, चेहर्‍यावरून हात फिरवल्यावर त्यांना भरून की कायसं यायचं.)
आता माझ्या मुलाला असं म्हणतात तेंव्हा पुन्हा जुन्या आठवणी निघतात.
एका गोष्टीचा मात्र अजून राग येतो जेंव्हा काका किंवा अजोबा टाइप लोक म्हणतात,
"एवढीशी होतीस, तुला अंगाखांद्यावर खेळवलीये." (अगदी झुरळ झटकावं तसा विचार झटकला जातो.)

रेवती

तिमा's picture

23 Mar 2009 - 8:31 pm | तिमा

मलाही खर्चिक लग्ने, त्यातले मानपान, दिखाऊपणा, वरात, बँड वगैरे गोष्टींचा फार राग यायचा. माझ्या लग्नाच्या वेळेस सासर्‍यांनी रजिस्टर लग्नास विरोध दर्शवला तेंव्हा आमच्यातर्फे कोणालाच न बोलावता मी निषेध व्यक्त केला. आता वाटते एवढा आततायीपणा करण्याची खरच गरज होती का ?
समाजसेवी किंवा तत्सम क्लबांवर मी तेंव्हा उपहासाने हंसे. आता वाटतं की ते जे काही थोडंफार करतात तेवढे तरी आपण करतो का ?
या विषयावर मी तेंव्हा एक कविताही केली होती. पण ती करतानाच मी ,माझ्यासाठी, एक पळवाट पण शोधून ठेवली होती.
बसलो होतो गंमत पहात
चारजणांची दशा प्रवाहात
सगळेच तसलेच रडतराऊ
आपल्यावेळेस पाहून घेऊ
वेळ केंव्हा गेली बरे ?
चार म्हणतात तेच खरे!

विनायक प्रभू's picture

23 Mar 2009 - 8:33 pm | विनायक प्रभू

मुले
देवाघरची फुले
आताशा वाटायला लागले ही मंडळी आपल्यालाच 'फुल' बनवतात.

विकास's picture

23 Mar 2009 - 9:53 pm | विकास

या संदर्भात दोन मोठ्या व्यक्तींची वाक्ये आठवली. (जशी आठवली तशी मराठीत अर्थांतरीत!):

जर एखाद्या मुद्यासंदर्भात माझी दोन परस्परविरोधी मते असल्याचे तुमच्या लक्षात आले तर त्यातील दुसरे म्हणजे वाढलेल्या वयातील मत हे माझे मत म्हणून अधिक ग्राह्य धरा - म. गांधी

जर तुम्ही तुमच्या विशीत कम्युनिस्ट नसाल तर तुम्हाला हृदय नाही आणि जर वयाच्या तिशीतपण तुम्ही कम्युनिस्ट(च) असाल तर तुम्हाला डोके नाही! - चर्चिल (हेच वाक्य इतरही त्यांचे म्हणून सांगतात!)

- विशीत आणि तिशीतही डोकेच वापरणारा विकास ;)

मिहिर's picture

23 Mar 2009 - 10:26 pm | मिहिर

मला अनेकदा विविध कारणांवरून चिडून उठायला होते. ( मी आता १६ वर्षांचा आहे).
विशेषतः ग्लोबल वॉर्मिंग आणि हरितग्रुह परिणाम याबद्दल काहिंची अनास्था आणि हे फार लांबचे व सरकारचे काम आहे म्हणणार्यांचा.
मला वाटते काही गोष्टींचा राग यायलाच हवा.

मोग्याम्बो's picture

28 Feb 2014 - 4:35 pm | मोग्याम्बो

मोटार सायकल वापरता की सायकल ?

क्रान्ति's picture

23 Mar 2009 - 11:12 pm | क्रान्ति

जगाला शिकवणारे आपण कोण हेच खरे!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

पिवळा डांबिस's picture

24 Mar 2009 - 12:00 am | पिवळा डांबिस

जगाला वाटेल ते जगाने करावं, आपण कोण सांगणारे? असं हल्ली वाटतं...
ते तर खरंच!
त्याबरोबरच,
जगाला वाटेल ते जगाने करावं, आपण सांगून काय फरक पडणारे? असंही हल्ली वाटतं!!!:)
आपण आपल्याला योग्य वाटेल तसं आयुष्य जगावं. बाकी जे ते आपापल्या कर्माने चढतंय/ पडतंय....
उगाच आपण आपल्या डोक्याला त्रास कशाला लावून घ्या? असंही हल्ली वाटतं!!!
:)

आपण जगाला शिकवू शकत नाही किंवा आपण म्हणतो तसेच लोक वागतील अशी अपेक्षाही करु शकत नाही. 'देव देवळात आणि कर्मकांडात नसून तुझ्या मनाच्या चांगुलपणात आहे' असे परोपरीने समा़जाला सांगू पाहणारा कबीरसुद्धा जेंव्हा

तेरा मेरा मनवा कैसे एक हुई रे?
मै कहता तू जागत रहियो
तू रहता है सोयी रे

असा निराशावादी होतो, तिथे आपल्यासारख्या सामान्य माणसाचे काय? पण कबीराने हाही निराशावाद या दोह्यातून शेकडो वर्षांपूर्वी व्यक्त केला (तो आजही काही क्षण असे येतात की अगदी नेमकेपणाने इतका पटतो की मनकवडा कबीर आपलेच बोल आपल्या इतक्या आधी कसे बोलून गेला याचे आश्चर्य वाटते) आणि तो त्याला वाटेल ते सांगतच राहिला. तसेच आपण लोकांवर परिणाम होत नाही म्हणून आपले मत व्यक्त करणे सोडून द्यावे हे बरोबर नाही असे वाटते.

वय आणि अनुभवानुसार माझीही मते बदलत जात आहेत. पण म्हणून एकेकाळी जे वाटले ते चूक होते किंवा निष्कारण होते असा स्वतःचा आता अधिक्षेप करणे हे सुद्धा तुम्हाला पुढे कधीतरी बरोबर वाटणार नाही. एका विशिष्ट वयात, विशिष्ट घटनेला, विशिष्ट दृष्टिकोनातून, तुमच्या पिंडानुसार तुम्ही दिलेला प्रतिसाद महत्वाचा असतो. असे बहुविध प्रतिसाद असतात, म्हणूनच या जीवसृष्टिचं रहाटगाडगं चालू राहत. काही प्रतिसाद प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी लगेच रामबाण लागू होतात, काही नाहीत. पण काय लागू होइल हे आधी कळायला मार्ग नसल्यामुळे सर्वच प्रतिसाद पुढे यायला हवेत. लोकशाहीत जसे पुरोगामी डाव्यांच्या अतिउत्साही, अतिऔदार्याला लगाम घालायला सनातनी उजवे आवश्यक असतात, तसेच उजव्यांच्या रूढी-परंपरांना अडकून राहिलेल्या बेड्या मोकळ्या करायला पुरोगाम्यांचे नवनवोन्मेष प्रभावी असतात.

काही प्रतिसाद, काही मते आज पटत नाहीत. पण मनात कुठेतरी दडून राहतात. ग्रेसांच्या कवितेतल्या ओळी जशा आज दुर्बोध वाटाव्या, आणि पुढे एका विशिष्ट क्षणी, विशिष्ट मनोवस्थेत, विशिष्ट स्थळी अचानक त्या शब्दांनी उभ्या केलेल्या प्रतिमेचा साक्षात्कार होउन मोठे रहस्योद्घाट्न व्हावे तशी ती मते पटतात. आई-वडिलांनी, वडिलधार्‍यांनी सांगितलेले आपण लहानपणी ऐकत नाही, पण पुढे कधीतरी वाटत की ऐकलं असत तर बर झाल असत.

म्हणून बोलत राहा, नि:संकोच सांगत राहा, वाद घालत राहा. अमर्त्य सेनांनी आपल्याला उगाच 'आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन' म्हटलेले नाही! :)

नंदन's picture

24 Mar 2009 - 9:06 am | नंदन

लेख आणि लेखाचा विषय दोन्ही आवडले. चौथीत 'सावरकर' या शीर्षकाचे एक पुस्तक वाचले होते. स्वातंत्र्यवीरांवरील लेख आणि एकंदरच त्यांची भूमिका पुढे नेणार्‍या लेखांचे संकलन असे त्याचे स्वरूप होते. ते आणि एका नातेवाईकांकडे इतर काही मासिके (धर्मभास्कर बहुतेक) वाचून सगळ्या मुसलमानांना देशाबाहेर हाकलून लावलं पाहिजे, अशी काही काळ ठाम धारणा झाली होती. (सुदैवाने ती पुढे बदलली.)

'आहे मनोहर तरी' मध्ये सुनीताबाईंनी या विषयावर केलेलं चिंतन आठवलं. वाढत्या वयानुसार स्वभावाचे कंगोरे घासून कसे गुळगुळीत होत जातात. माझं तेच खरं हा अहंकार गळत जातो, अशी त्यातली काही वाक्यं आठवतात.

बाकी वर लिखाळ यांनी जे म्हटले आहे, ("जे अश्या वेळी सुद्धा लढायला प्रवाहाविरुद्ध पोहायला, आपली मते ठामपणे मांडायला सरसावतात त्यांच्या हातून काही काम होते. बाकीच्यांच्या हातून भरीव काम होत नाही.") त्याच्याशी सहमत आहे. हा दृष्टिकोन आणि चर्चाविषयात असलेला वाढत्या वयाचा संदर्भ यांवर भाष्य करणारं ऍनातोली फ्रान्सचं एक वाक्य पहा - I prefer the folly of enthusiasm to the indifference of wisdom. (रामदास यांच्या खरडवहीतून साभार.). 'थोडे वेडे व्हा' म्हणतात तसे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2009 - 9:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर चर्चा प्रस्ताव मस्त आहे.

>>वयानुसार बदलत गेली अशी इथे कोणाची अशी काही मतं असतीलच की ... चला लिहूया..

देव, धर्म, श्रद्धा, उपवास, एकादशी याबाबतीत आम्ही पूर्वी फार गंभीर असायचो. (पापाची भिती वाटायची )हल्ली सर्वच गोष्टी बुद्धीवर तपासायला लागलो आणि भूतकाळातील अनेक रक्तात स्थिरावलेल्या श्रद्धा डळमळीत व्हायला लागल्या आहेत. उदाहरण सांगायचे तर, एकादशीच्या दिवशी चक्क नॉनव्हेज खावे वाटते. तेव्हा लक्षात आले, वयपरत्वे जाणिवा बदलात हे मात्र शंभर टक्के खरं आहे ! ( आता पापाची भिती वाटत नाही )

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

24 Mar 2009 - 9:51 am | विसोबा खेचर

वयानुसार बदलत गेली अशी इथे कोणाची अशी काही मतं असतीलच की ... चला लिहूया..

वा मास्तर! उत्तम धागा..

आपला,
(वयानुसार किंचित मॅच्युरिटी आलेला!) तात्या.

:)

प्रकाश घाटपांडे's picture

24 Mar 2009 - 9:56 am | प्रकाश घाटपांडे

वयापर्माने मान्स बी बदलत्यात मंग त्यांची मत बी बदलनारच की. आता बदलल तर मान्सच म्हंत्यात सरड्या पर्माने रंग बदलतोय. नाई बदलल त म्हंत्यात निस्ता ठोंब्याच र्‍हायलाय. जग कुट गेल?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नितिन थत्ते's picture

24 Mar 2009 - 10:49 am | नितिन थत्ते

२५ वर्षापूर्वी पुण्यातून ग्रॅजुएट झालो त्या सुमारास मी हिंदुत्ववादी, आरक्षणविरोधी (जातीयवादी), ठोकशाहीवादी आणि भांडवलवादी होतो.

हिंदुत्ववादी असूनही त्यावेळीही रूढीभंजनवादी होतोच. सावरकरांचा प्रभाव असावा.

आता मी यातला काहीच नाही. उलट आरक्षणवादी, आणि थोडा डावीकडे झुकलो आहे. आणि कोणी संस्कृतीच्या नावाने गळा काढला की भयंकर संताप अजूनही येतो.

मुख्य बदल म्हणजे फक्त काळे आणि पांढरे काही नसते सारे ग्रे असते ही समज आली.
एकाच वेळी गांधींचा समर्थक (अहिंसा) आणि विरोधक (आधुनिक उद्योगवादी) तसेच सावरकरांचा समर्थक (रूढीभंजक) आणि विरोधक (हिंदुत्वविरोधक) असू शकतो. दुसर्‍या शब्दात सावरकर समर्थक असण्यासाठी गांधीद्वेष करावाच लागतो असे नाही तसेच उलटसुद्धा.

खराटा
(रंग माझा वेगळा)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

25 Feb 2014 - 10:28 am | भाग्यश्री कुलकर्णी

अगदी हेच मनात आले.

स्वामि's picture

24 Mar 2009 - 9:48 pm | स्वामि

नवा नवा व्यवसाय सुरु केला त्या वेळी 'खोटं' बोलणार्या पेशंटचा खुप त्रास व्हायचा."तुम्हीच तर मागच्या वेळी मला गोळ्या लिहून दिल्या होत्या","आम्ही आलो होतो पण तुम्ही दवाखान्यात नव्हता","आज पइसे आणले नाहीत,पुढच्या वेळी नक्की देतो,""आधी कुठेच दाखवलेलं नाही,तुम्हालाच पहिल्यांदा दाखवतोय"हल्ली या गोष्टींचा त्रास जाणवेनासा झाला आहे.पूर्वी पेशंट खरं बोलतोय हे गॄहीत धरायचो,आता तो खोटं बोलतोय हे गॄहित धरतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Mar 2009 - 9:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पूर्वी कोणी वयाने मोठा माणूस सांगतोय म्हणून विश्वास ठेवायचे, आता फक्त पांढरे केस पाहूनच विश्वास ठेवते असं नाही. आता मोठ्या माणसाची सरळसरळ चूक दिसत असेल तर तसं सांगतानाही काहीही गुन्हा केल्यासारखं वाटत नाही.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Feb 2014 - 3:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मास्तरांनी धागा वर काढला आहे म्हणून:

नंदनच्या प्रतिसादातलं वाक्य, "इतर काही मासिके (धर्मभास्कर बहुतेक) वाचून सगळ्या मुसलमानांना देशाबाहेर हाकलून लावलं पाहिजे, अशी काही काळ ठाम धारणा झाली होती. (सुदैवाने ती पुढे बदलली.)" याला +१ म्हणताना आता आनंदच होतो.

२००९ मधे होते त्यापेक्षा आता अधिक उदारमतवादी असल्याचं जाणवतं; गांधीबद्दल थोडं वाचन केलं, विशेषतः 'लोकमान्य ते महात्मा', त्यामुळे मत बदललं आहे; आता अधिक गांधीप्रेमी आहे. प्रतिक्रियांमधून व्यक्त होण्यापेक्षा स्वतंत्र लेखन करण्याचं, विचार मांडण्याचं महत्त्व पूर्वीपेक्षा जास्त पटलं आहे.

काही मतं बदलली हे मान्य करताना अपराधीभावना अजिबातच येत नाही.

मृदुला's picture

25 Mar 2009 - 2:44 am | मृदुला

दहा ते वीस या वयात सगळ्या लोकांना देव नाही हे पटवून द्यायला हवे असे वाटायचे. प्रार्थना, रूढी, व्रते सगळे निरुपयोगी असून 'मोठे' लोक यात वेळ का घालवतात याचा राग येई. नंतर देवळात जाणे, नमस्कार करणे या संकेतांप्रमाणेच ते न करणे हाही एक निरुपयोगी संकेत आहे हे लक्षात आल्यावर या विषयावरची मते मवाळ झाली.

वीस ते पंचवीस वयात स्त्रीपुरुष समानतेचे वारे डोक्यात होते. माझी आणि इतरांचीही प्रत्येक अन प्रत्येक कृती मी या समानतेच्या मापाने मोजून बघत असे. काही कमीजास्त (बाय्स्ड) आढळल्यास झालीच खडाजंगी!

पंचवीस ते आत्तापर्यंत प्रत्येकाला आपापले विचार असतात; तर्क असतात असे पटू लागले आहे. कोणत्याही मुद्द्यावर हातघाईवर येऊन वाद घालावासा वाटत नाही. (हा आळशीपणा असावा का अशी एक शंका आहे.)

वृद्धत्वी निज शैशवास जपणे साधणारे थोडेच. माझ्यापुरते मी केवळ माझे कुतूहल जपले आहे. बाकी (आळशीपणा) अगदी वयानुसार.

भडकमकर मास्तर's picture

25 Feb 2014 - 12:56 am | भडकमकर मास्तर

हा पाच वर्षांपूर्वीचा धागा पुन्हा वर काढतोय...अजून बर्‍याच जणांची बदलत जाणारी मतं वाचायला आवडतील ... :)

गेल्या ५ वर्षात तुमच्यात काय बदल झाले ते ही टाका.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Feb 2014 - 5:05 pm | बिपिन कार्यकर्ते

साक्षात कवटी परत आली! धन्य आहात मास्तर! ;)

लग्नसमारंभ, हिंदुत्ववाद, इ. गोष्टींबद्दलची मते वयानुरूप बदलली आहेत.

बाकी जण्रल ग्रे-पण ठसायला तोकड्या का होईना, अनुभवाची मदत होतेय खरी.

सुबोध खरे's picture

25 Feb 2014 - 10:12 am | सुबोध खरे

वयानुरूप माझी मते फारशी बदललेली नाहीत असे वाटते. लग्नात उधळपट्टी करू नये असे तेंव्हा वाटत होते. माझ्या स्वतःच्या लग्नात (२२ वर्षापूर्वी) अगदी जवळच्या नातेवाईकांना बोलावले होते.(आहेर, देणे, घेणे अर्थातच नव्हते) मित्र आप्त वर्य लांबचे नातेवाईक इ इ ना तेंव्हा फाटा मारला होता. दुपारी तीन ते रात्री दहा एवढ्या वेळात शास्त्रोक्त विवाह आणि स्वागतसमारंभ संपन्न झाला. यात आमचे सासरेबुवा थोडे नाराज झाले होते पण हे आमच्या वडिलांचा पूर्ण पाठींबा असल्याने मी करू शकलो हीही वस्तुस्थिती. मी आणि माझी बायको अनुज (दोन नंबरचे)असल्याने घरच्यांची हौसमौज मोठ्या भावांच्या लग्नात थोडीफार झाली होती.
आजही माझे मत तेच आहे. कालच मी माझ्या बायकोला एक मूलगामी विचार बोलून दाखविला. तिने या विचारला पूर्ण पाठींबा दर्शविला आहे.( मुलांचा पाठींबा हळू हळू तयार करण्यात येईल)
आपल्या मुलांच्या लग्नात तीन समाजसेवी संस्थांचे स्वयंसेवक पावतीपुस्तक घेऊन तेथे बसवायचे. या तीन संस्था म्हणजे १)श्री बाबा आमटे यांचे आनंदवन २) वनवासी कल्याण आश्रम ३) टाटा कर्करोग रुग्णालय.
सर्व आमन्त्रीताना त्यांच्या इच्छा आणि क्रयशक्तीप्रमाणे त्यांच्या आवडीच्या संस्थेला. तिथल्या तिथे देणगी देण्याचे आवाहन करायचे. हि गोष्ट आमंत्रण पत्रिकात सुद्धा लिहून आवाहन करायचे. जेवढी देणगी लोकांकडून येईल तितकीच देणगी माझ्या खिशातून.
जेवण अतिशय साधे आणि फक्त सायंकाळी. उगाच लोकांना रजा घ्यायला लावून मनुष्य तास फुकट आणि लोकांची मनातून नाराजी.
असो काय जमते पाहूया.

इरसाल's picture

25 Feb 2014 - 10:24 am | इरसाल

डॉ. खरे तुम्ही ग्रेट होतात, आहात आणी रहाल.

हॅट्स ऑव टु यु सर !

आपल्या मुलांच्या लग्नात तीन समाजसेवी संस्थांचे स्वयंसेवक पावतीपुस्तक घेऊन तेथे बसवायचे. या तीन संस्था म्हणजे १)श्री बाबा आमटे यांचे आनंदवन २) वनवासी कल्याण आश्रम ३) टाटा कर्करोग रुग्णालय.

बेश्ट.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2014 - 6:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपल्या मुलांच्या लग्नात तीन समाजसेवी संस्थांचे स्वयंसेवक पावतीपुस्तक घेऊन तेथे बसवायचे. या तीन संस्था म्हणजे १)श्री बाबा आमटे यांचे आनंदवन २) वनवासी कल्याण आश्रम ३) टाटा कर्करोग रुग्णालय.
सर्व आमन्त्रीताना त्यांच्या इच्छा आणि क्रयशक्तीप्रमाणे त्यांच्या आवडीच्या संस्थेला. तिथल्या तिथे देणगी देण्याचे आवाहन करायचे. हि गोष्ट आमंत्रण पत्रिकात सुद्धा लिहून आवाहन करायचे. जेवढी देणगी लोकांकडून येईल तितकीच देणगी माझ्या खिशातून.

हे खूप आवडलं ! मुलाच्या लग्नात हा प्रस्ताव मांडला जाईल. घरच्यांचा स्वभाव पहाता काही अडचण येणार नाही. *good* या कल्पनेसाठी खास धन्यवाद !

अर्थात तुमची हरकत नसल्यास आणि कल्पनाश्रेय तुम्हालाच दिले जाईल हे नक्की.

सुबोध खरे's picture

25 Feb 2014 - 7:43 pm | सुबोध खरे

एक्का साहेब
आमची हरकत कशाला आणि श्रेय कसलं म्हणता? आपल्या हातून काही भरीव समाजसेवा होत नाही मग निदान "तुरत दान महापुण्य" असावे.
खरं तर या विषयावर एक वेगळा धागा काढावा असा विचार होता म्हणजे हा धागा हाय जैक होऊ नये यासाठी.

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2014 - 12:09 am | पिवळा डांबिस

खरं तर या विषयावर एक वेगळा धागा काढावा असा विचार होता म्हणजे हा धागा हाय जैक होऊ नये यासाठी.

डॉक्टरसाहेब, तुमची आयडिया चांगली आहे पण जर शक्य असेल तर खरंच या विषयावर नवीन धागा काढा.
कारण माझं मत वेगळं (अ कॅव्हियाट म्हणाना!) आहे आणि ते इथे मांडलं तर या धाग्याचं नक्की काश्मीर होणार!!
आणि डेन्टिस्टच्या धाग्याचं काश्मीर करणं म्हणजे मरणांतिक कळांना आपण होऊन आमंत्रण देणं!!! :)

लॉरी टांगटूंगकर's picture

26 Feb 2014 - 12:04 am | लॉरी टांगटूंगकर

_/\_

विकास's picture

26 Feb 2014 - 1:43 am | विकास

हा चांगला उपक्रम आहे... माझ्या सभोवतालच्या इथल्या अनेक अनिवासी भारतीयांमधे हे करणे आता खूप कॉमन झाले आहे. पद्धती वेगवेगळ्या वापरल्या जातात. म्हणजे लहानपणी मुलांचे वाढदिवस साजरे करताना भेटवस्तू न देता एखाद्या भारतात काम करणार्‍या सेवाभावी संस्थेस (अथवा अमेरीकेतील देखील) देणगी गोळा करतात.

हल्ली अरंगेत्रम (भरतनाट्यम शिक्षणाचे गॅज्युएशन) हे एक मोठ्ठे प्रस्थ झाले आहे तसेच ग्रॅज्युएशन पार्ट्या पण होतात. पण यात विशेष करून संघाची पूर्वपिठीका असलेल्या कुटूंबांकडून स्वतःच्या खिशातून निधी एखाद्या सामाजीक कार्यास देण्याची पद्धत मी पाहीली आहे. तेच लग्न समारंभात देखील पाहीले आहे.

अनुचीत होईल म्हणून नावे घेण्याचे टाळतो: पण दोन मोठी उदाहरणे माहीत आहेत. एका उदाहरणात अमेरीकेत जन्मलेल्या मुलाचेच लग्न होते. तो गुंतवणूक क्षेत्रातला असल्याने आमंत्रितही तसेच होते. सगळ्यांना फक्त समाजनिधीसाठी देयचे असले तर पैसे देण्यास सांगण्यात आले आणि गोळा झालेले जवळपास $७५,००० जसेच्या तसे भारतात कुठल्याशा कार्याला दिले.

एक भारतीय वंशाचा मुलगा, इथल्या मनोरंजन क्षेत्रात यशस्वी झालेला आहे. त्याच्या संदर्भात आत्ताच ऐकले. भारतात रीक्षा ओढत नेणारी माणसे प्रत्यक्ष पाहीली. नंतर नजीकच्या काळात लग्न होते. स्वतःच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येतो म्हणून देवाकडे आभार मानण्यासाठी म्हणून त्याने पन्नास रिक्षेवाल्यांना मोटराईझ्ड रीक्षा दिल्या...

पण हे मोठे सोडून द्या अगदी अमेरीकन सुखवस्तू असलेले पण अमेरीकन स्टाईल अतिश्रीमंत नसलेले भारतीय देखील असे दान देताना पाहीले आहेत.

प्रमोद देर्देकर's picture

25 Feb 2014 - 10:33 am | प्रमोद देर्देकर

आयला ती देणगीची कल्पना लय भारी आहे. सगळ्यांना हे जमायला हवे. तेवढी देशसेवा तरी होईल हातुन.

राही's picture

25 Feb 2014 - 11:16 am | राही

ही देणगीची कल्पना फारशी यशस्वी झालेली मी बघितलेली नाही. लग्नसमारंभाविषयी कल्पना नाही पण इतर अनेक मोफत कार्यक्रमांत उदा. मोफत नेत्रतपासणी, वैद्यकीय सल्ला, गाण्यांचे कार्यक्रम, पुस्तकप्रकाशन (अगदी 'समिधा'सारखी सुंदर प्रकाशने) बाहेर दानपेटी अथवा दानपुस्तिका ठेवलेली असते पण लोक त्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. मोफत कार्यक्रमांचा/सेवांचा आस्वाद घेतात आणि बाहेर पडतात. या सेवा लायन्स क्लब वगैरेंसारख्या धनबहुल संस्थांनी प्रायोजित केलेल्या असतील तर देणगी न देणे एकवेळ समर्थनीय मानता येईल पण जेव्हा काही डॉक्टर्स किंवा काही कलावंत एकत्र येऊन लोकांसाठी काही करतात तेव्हा फूल ना फुलाची पाकळी अर्पण करणे योग्य ठरावे. पण कदाचित आपल्याला गुप्तदान मानवत नसावे. आपण काय आणि किती दिले आहे हे यजमानापर्यंत पोचायला हवे असे आपल्याला वाटत असते. विशेषतः महागड्या भेटीबद्दल तर अधिकच.
अर्थात डॉक्टरसाहेबांचे अभिनंदनच.

सुबोध खरे's picture

25 Feb 2014 - 11:31 am | सुबोध खरे

राही ताई
यात गुप्त दान वगैरे काही नाही. गुप्त दान करण्यात आपल्याला रस नसतो.आपले नाव झाले पाहिजे अशी(भारतीय) वृत्ती आहे
येथे या सर्व सरकारमान्य संस्था आहेत. त्यांच्या स्वयम सेवकांना पावतीपुस्तक घेऊन बोलवायचे. या दानाला ८० G या कलमाखाली आयकरातून सुट सुद्धा आहे. जितके दान लोकांना द्यायचे आहे तितके द्या आणि रीतसर पावती घ्या. चेकने किंवा क्रेडीट कार्डाने सुद्धा पैसे दिले तर चालतील. अशी योजना आहे माझी वहिनी गेली काही वर्षे स्वतः हिंगणे येथील अनाथ महिलश्रमाचे पावतीपुस्तक घेऊन कौटुंबिक कार्यक्रमात येते. आम्ही आणि आमचे बरेच नातेवाईक दर वर्षी त्यांच्या भाऊबीज या उपक्रमाला देणगी देत आले आहोत.
यात मी फक्त थोडासा बदल करण्याचा विचार केला. लोकांना आगाऊ सूचना किंवा आवाहन आमंत्रण पत्रिकेतून केले (आहेर/ भेटवस्तू ऐवजी आपण रोख व चेक घेऊन यावे आणि आपल्या ऐपतीप्रमाणे वरील संस्थाना दान द्यावे आणि वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावेत) तर लोकांची मानसिक तयारी राहते शिवाय वरील संस्थांची सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रत्यक्ष कार्य लोकांना माहित असल्याने त्याबद्दल शंका राहत नाही.
आपण बहुसंख्य लोक सामाजिक कार्याला मदत करायची आहे अशा मनोवृत्तीचे असतो पण आळशी पणामुळे( यात मी स्वतः येतोच) प्रत्यक्ष काम होत नाही म्हणून हा सुचवलेला एक पर्याय आहे. यात जाता जाता काही समाजकार्य होईल असा विचार आहे.

राही's picture

25 Feb 2014 - 2:31 pm | राही

आपण ही कल्पना राबवलीत याबद्दल आपले अभिनंदनच आहे. पण इतर ठिकाणी, अगदी सरकारमान्य, ८० सीसी सवलतवाल्या आणि सुपरिचित संस्थांच्या बाबतीतही हा प्रयोग फारसा यशस्वी झालेला पाहिलेला नाही. ग्राहकजत्रा, ग्राहकपेठा, प्रदर्शने या ठिकाणी वनवासी कल्याण, निराधार गृह, व्यसनमुक्तिकेंद्र, मनोविकलांगसंस्था अशासारख्यांचे प्रतिनिधी पावतीपुस्तके घेऊन बसतात त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही.
आपण आपल्या कार्यात लोकांना असे आवाहन केले होते आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला ही चांगली गोष्ट.
आम्हीही आमच्या कोणत्याही कार्यात जमा झालेली रक्कम (नोंद करून, कारण देणार्‍याला माहीत नसते की ही रक्कम दुसरीकडे जाणार आहे. शिवाय आहेर नको म्हणून सांगितले तरी काही जवळचे लोक घरी येऊन देतातच, त्यांचा अपमान करावा किंवा खट्टू करावे असे वाटत नाही.) त्यात थोडी स्वतःची भर घालून चांगल्या ठिकाणी देतो. हिंगण्याच्या कार्यकर्त्या, नाना पालकर रुग्णसेवा, असे अनेक कार्यकर्ते घरी येत असतात. श्राद्धे, पूजा वगैरे टाळून त्याऐवजी ती ती रक्कम योग्य ठिकाणी पोचती करतो. त्याशिवाय कॅन्सरपीडित, कुष्ठरोगी, मनोरुग्ण, बहुविध विकलांग, वेश्यांची मुले, यांसाठी काही संस्था कार्यक्रम करतात त्यात यथाशक्ति सहभाग असतो. पण हे सर्व वैयक्तिक झाले. सार्वजनिक ठिकाणी अशी भावना दिसत नाही हे सांगायचे होते.

माझे एक सर सांगायचे, दुसर्‍याकडे बोट दाखविण्यापूर्वी तुम्ही त्याच्या जागेवर जाऊन विचार करा. आणि हा विचार केवळ तुम्हाला त्याच्या सद्यस्थितीत नव्हे, तर त्याचा भूतकाळ, आणि त्याच्या बाजूची आर्थिक्/सामजिक स्थिती याबाबतही करावा. बर्‍याच याप्रकारे विचार केल्यावर असा राग निघून जातो.

आनन्दा's picture

25 Feb 2014 - 6:52 pm | आनन्दा

आणि अजून एक,
सामान्य माणून प्रथम स्वार्थाचाच विचार करणार, हे एकदा स्वीकारले, की राग येणेच बंद होते. मी देखील माझ्या पूर्वायुष्यात कडवा हिंदुत्ववादी होतो, परंतु आता कालपरत्वे मी थोडा मवाळ झालोय. त्यामुळे जे प्रामणिक हिंदुत्ववादी किंवा प्रामाणिक धर्मनिरपेक्ष लोकांच्या बद्दल मला आदर आहे. किंबहुना जे लोक स्वत:शी प्रामाणिक आहेत त्यांबद्दल मला नेहमीच आदर वाटत आला आहे, त्यामुळेच मी संभाजीमहाराज आणि औरंगजेब, किवा गांधी आणि नथुराम या दोघांबद्दलही एकाच वेळी मनात आदर ठेऊ शकतो.

उपास's picture

25 Feb 2014 - 8:02 pm | उपास

वय आणि अनुभवापरत्वे विचार मवाळ झालेत, पण त्याचबरोबर, क्षितिजे विस्तारल्याने आणि थोडा आत्मविश्वास आल्याने ज्या गोष्टी निरर्थक वाटायला लागल्यात त्यांच्याविरुद्ध बोलणं आणि कृती करणंही आताशा शक्य होऊ लागलय.
आरक्षण, हिंदुत्व, जागतिकीकरण (की स्वदेशी), कालबाह्य रुढी हे पटकन जाणावणारे मुद्दे.
अवांतरः
आहेराबाबत खरेकाकांचे विचार आणि कृती अतिशय स्पृहणीय, आवडलीच!

वयाप्रमाणे माझ्यात झालेले बदल (अजून तितकस वय झाल नाही)

पहिला जहाल हिंदुत्ववादी होतो - आता बराचसा कमी झालो आहे.
पूर्वी देवावर नको तेवढी श्रद्धा - आता संपूर्ण नास्तिक
पूर्वी कोणी काय बोलले कि दोन तीन दिवस तोच विचार करत बसायचो - आता "फाट्यावर मारा पुढे चला"

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सही - Nobody is Perfect, I am Nobody.

आयुर्हित's picture

26 Feb 2014 - 1:01 am | आयुर्हित

आपल्या मताचा नितांत आदर आहे
परंतु कोणी कसा खर्च करावा किंवा कसा वेळ व पैसा घालवावा(काही बाबतीत गुंतवावा)हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

मी तर संत ज्ञानेश्वरांप्रमाणे म्हणेन हो "जो जे वांछील तो ते लाहो!"

पण काही चुकीच्या गोष्टी डोळ्यासमोर घडत असतील तर मात्र त्यांचे नेमके कारण काय आहे हे जाणून घेऊन चुकीच्या प्रथांसाठी कान उघाडणी करायला मागे पुढे पाहणार नाही!

सुबोध खरे साहेबांना मनापासून धन्यवाद, खूप छान पद्दत सर्वांसमोर आणली आहे आपण!

चौकटराजा's picture

26 Feb 2014 - 9:46 am | चौकटराजा

मी विशीत असताना जातीव्यवस्थेवर आधारित आरक्षणाला माझा तीव्र आक्षेप होता आज तो अतितीव्र आक्षेप आहे.नोकरीत आंधळे, लंगडे गतिमंद , विधवांची मुले. विधवा, परित्यक्ता या सारख्या लोकाना आरक्षण असले पाहिजे.
शिक्षणात हुशार पण गरीब मुलाना आरक्षण असले पाहिजे मग जात काहीही असो.

मी विशीत असताना माझे विचार मुक्त अर्थव्यवस्थेच्या विरोधी होते. त्यावेळी "चाळीशी ओलांडलीस की भाडवलशाहीचे गोडवे आपोपाप गायला लागशील" असे त्यावेळी प्रोढ झालेली माणसे म्हणत. आज मी साठी ओलांडलेली आहे व मुक्त अर्थव्यवस्था हा मोजके फायदे व अगणित तोटे असलेली अर्थव्यवस्था असते हे माझे ठाम मत झाले आहे.

धर्मराजमुटके's picture

26 Feb 2014 - 10:29 am | धर्मराजमुटके

अवांतर :
आधुनिक महाराष्ट्राच्या जाणत्या राजाची मते दररोज बदलत असतात. त्यामुळे त्यांना अधिक परिपक्व म्हणावे काय ?

लहानपणापासुन आईबाबांबरोबर देवस्थानाला गेलो कि तिकडे एक गोष्ट आवर्जुन पाहायला मिळायची ती म्हणजे दक्षिणा किंवा जिर्णोद्धार निधी. पुर्वी ऐच्छिक असलेली गणपती वर्गणी ११, २१, ५१, १०१ आणि आता १५१ (ऐच्छिक नाही तर जबरदस्ती) झालेली मी पाहिली आहे. मी नास्तिक नाही आहे. रोज सकाळी घरच्या गणपतीला केलेला माझा नमस्कार देवाला पोहोचतो अशी माझी श्रध्दा आहे. दगडी मुर्तीभोवती देऊळ म्हणुन अनेक मजली इमारत ऊभी करायला पैसे द्यायला मला पटत नाही. माझे वडिल काही संस्थांचे सभासद असल्यामुळे पहिल्यापासुन दरवर्षी त्यांचे वार्षिक अहवाल घरी आलेले मी पाहिले आहेत. ते अहवाल वाचताना माझ्या लक्षात आले की त्या संस्थांचे वर्षभर इतर ऊपक्रम चालु असतात. त्यामुळे गणपती वर्गणी किंवा जिर्णोद्धार निधी देण्यापेक्षा वर्षातुन एकदा तोच पैसा या संस्थांच्या शिष्यवृत्ती निधी, वैद्यकिय मदत निधी, विद्यार्थी मदत निधी, जेष्ठ नागरिक निधी यासारख्या ठिकाणी द्यायला मला मनापासुन आवडते.

डॉ. सुबोध खरे यांचे विचार आवडलेही आणि पटलेही.

कॉलेजात असताना मला आणि माझ्या कॉलेजमधील मित्रांना सोव्हीएट देश तयार करणारा लेनीन मोठा वाटायचा. कारण त्या काळात सोव्हिएट देश म्हणून एक मासिक ऑलमोस्ट फुकट मिळायचे. त्यात रशिया आणि तिथल्या संस्कृती, शेतकरी, कामगार, संशोधन वगैरेवर लिहीलेले असायचे. छान छान फोटो देखील असायचे. पण त्याही पेक्षा आम्हाला आकर्षण असायचे ते सोव्हिएट देश मासिकाच्या कागदाचे. त्या कागदाचे बाण खूप छान होयचे आणि दोन हातांच्या दोन बोटांमधे पकडून उडवल्यास लांबपर्यंत जायचे. त्यामुळे गॅदरींग अथवा इतर तत्सम कार्यक्रमात त्याचा खूप छान उपयोग होयचा.

पण जस जसा मोठा झालो तसे असे करणे चूक आहे हे समजू लागले. आणि मग मी लेनीनवादापासून दूर गेलो.

हुप्प्या's picture

26 Feb 2014 - 10:24 pm | हुप्प्या

देशभक्तीने ओतप्रोत भरलेली गाणी, सिनेमे, नाटके आणि पुस्तके वाचून सैनिक आणि सैन्याविषयी पराकोटीचा आदर होता. आपले भारतीय सैनिक म्हणजे सद्गुणाची खाण आणि बाकीचे अत्यंत वाईट. पण जसजसे डोळे उघडत गेले. भारतीय सैन्यात वशिलेबाजी, भ्रष्टाचार, बेपर्वाईचा बळी ठरलेले अनेक लोक भेटले. आणि जमिनीवर आलो.
सगळेच सैनिक आपापल्या देशाकरता जीव धोक्यात घालत असतात. प्रत्येकाला आपापल्या देशाविषयी भक्ती असते. त्या त्या देशाला आपल्या सैन्याविषयी आदराची, कौतुकाची भावना असते हे जेव्हा जाणवले तेव्हा भारतीय सैन्य हे एकमेवाद्वितीय नाही हे उमजू लागले.
पुढे सैन्य हे नेसेसरी इव्हिल अर्थात आवश्यक पण त्रासदायक लोढणे आहे अशीच भावना बनत आहे. एखाद्याला दुसरे काही जमत नसल्यास सैन्यात जावे असे वाटू लागले आहे. वयाचा परिणाम.

अमित खोजे's picture

26 Feb 2014 - 11:15 pm | अमित खोजे

परवाच प्रशांत दामलेची "खुपते तिथे गुप्ते" कार्यक्रमात मुलाखत पाहिली. कविता लाड सुद्धा त्या कार्यक्रमात होती. तिची आठवण आली म्हणून "एका लग्नाची गोष्ट" (कविता लाड वालं) शोधायला गेलो पण गुगल बाबाला पण ते मिळाले नाही. मग "गेला माधव कुणीकडे" आणि "चल काहीतरीच काय" पाहत होतो. त्यावरून अगदी प्रकर्षाने जाणवले कि प्रशांत दामले ची कलाकारी तेव्हा जरी आवडत असली तरीही आता ती काहीशी बावळट वाटते. शिवाय प्रत्येक नाटकात तेच एक ध्यान. नाविन्य काही नाहीच.

हे एक झाले नाटकांचे. पूर्वीचे जुने पिक्चर जरी पहिले तरी ते झाडाभोवती फिरणे वगैरे वेगळे वाटतेच कि. (आत्ताचे नाचही काही फार चांगले आहेत अशातला प्रकार नाही). पण नाच सोडले तर त्यांना काहीतरी ष्टोरी तरी असायची. आत्ता तीच गायब होत चाललीये.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Feb 2014 - 10:41 am | प्रकाश घाटपांडे

मला स्वतःमधे झालेले बदल म्हणजे मी तुलनेने अधिक मवाळ व व्यापक झालो आहे. अच्युत गोडबोलेंचे मनात, सुबोध जावडेकरांचे मेंदुतल्या मनात, डॉ आनंद जोशी व सुबोध जावडेकरांचे मेंदुतला माणुस या पुस्तकांमुळे विचारात काही बदल झाले.अंधश्रद्धेची कारणे ही केवळ अज्ञान व अगतिकता ही नसून मेंदु विज्ञानातील जैविक कारणे देखील आहेत हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद हा मानसिक आरोग्य चांगले ठेवायला मदत करतो हे जाणवल. श्रद्धेच्या सकारात्मक बाजूचा एका वेगळ्या कोनातुन नव्याने विचार या पुस्तकांनी मिळाला. सश्रद्ध लोकांशी तडजोड अधिक सुलभ झाली. आपण स्वतःच आपल्या प्रतिमांमधे अडकत चाललो आहे की काय याचे भय वाटू लागल्याने आत्मपरिक्षण नव्याने चालू केल.......

चौकटराजा's picture

28 Feb 2014 - 9:46 am | चौकटराजा

अंधश्रद्धेची कारणे ही केवळ अज्ञान व अगतिकता ही नसून मेंदु विज्ञानातील जैविक कारणे देखील आहेत हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले.
हे अगदी एक हजार टक्के पटले. उच्च शिक्षित म्हण्जे तो अंधश्रद्ध नसणार असे काही नाही. हे अनेक नातेवाईकानी मला पटवू दिलेय आपल्या वर्तणुकीने !

मारकुटे's picture

27 Feb 2014 - 1:05 pm | मारकुटे

विचारवंतांबद्दल पूर्वी आदर वाटायचा. आता त्यांच्या थोबाडात पायताण मारावं वाटत !!