आज सकाळीच टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक "विनोदी" लेख वाचनात आला. इंग्रजीमध्ये बुकर बिकर अशी तथाकथित प्रतिष्ठेची पारितोषिके मिळवणारे लेखक म्हणे साहित्य अकादमीकडून डावलले जातात, असा हास्यास्पद आरोप त्यात करण्यात आला आहे. यंदा बुकर मिळवणारृया अडिगा यांचाही त्यात उल्लेख आहे.
यापुर्वी बुकर मिळालेल्या भारतीय लेखकांचे काही वाचलेले नाही, मात्र अडिगा यांच्या व्हाईट टायगरला बुकर मिळाल्यावर उत्सुकतेने कादंबरी वाचली...
आणि प्रचंड निराशाच पदरी आली. बुकर सारखे "प्रतिष्ठित" पारितोषिक मिळण्याइतकी गुणवत्ता या कादंबरीत खरंच आहे का, असा प्रश्न पडला. अडिगा यांचे लेखन कौशल्य आणि तिरकस शैली दाद देण्यासारखी असली, तरी त्यापलिकडे जावून या कादंबरीत काही शोधायला गेल्यास हाती काहीच लागत नाही.
कादंबरीतल्या व्यक्तिरेखांचे चित्रण अत्यंत "वन डायमेन्शनल" आहे, इतके की आपण एखादृया हिंदी चित्रपटाची कथा वाचतोय की काय असा भास होतो. भारतातील "आहे रे" आणि "नाही रे" वर्गातील विरोधाभासाचे चित्रण, एवढा एकमेव निकष या कादंबरीला बुकर देताना लावला गेला आहे असे वाटते. पण असे चित्रण साहित्यिक कसोटीवर कितपत खरे उतरले आहे, हे तपासून पाहणे ज्युरीला आवश्यक वाटले नाही काय असाही प्रश्न पडतो. याच लायकीच्या पुस्तकांना बुकर मिळत असेल, तर यापुढे ते एकाही भारतीय लेखकाला नाही मिळाले तरी चालेल!
...तर मूळ मुदृदा होता टाईम्स ऑफ इंडियामधील "विनोदी" लेखाचा. त्यात चेतन भगत या अर्ध्या हळकुंडाने पिवळृया झालेल्या "लेखक"महाशयांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार बिनमहत्त्वाचे आहेत, असे तारे तोडले आहेत. ज्याची पुण्याई अवघे तीन फुटकळ पुस्तके (त्यातही पहिल्या पुस्तकानंतर इतर दोन्हींमध्ये आलेला तोच तो रटाळपणा) इतकीच आहे, त्याने अशी बेजबाबदार विधाने करणे हे अपेक्षितच आहे.
इंग्रजी वर्तमानपत्रे तर अशा मीडिया सॅव्ही लेखकरावांना डोक्यावर घेण्यासाठी चातकापेक्षाही जास्त आतूर असतात. त्यातून "तिकडे" कौतुक झाले की मग काय विचारुच नका. अशा लोकांना कोठे ठेवू आणि कोठे नको असे या "जर्नलिस्टस"ना होत असते. "दी आर्ट ऑफ सेलिंग" चा महिमा, दुसरे काय?
... असो, तर मुदृदा हा, की बुकर बिकर ने भारावून जावून भारतीय इंग्रजाळलेल्या लेखकरावांची पुस्तके फार अपेक्षा ठेवून वाचू नका. त्यापेक्षा आपल्या विश्वास पाटलांच्या "पानिपत" अथवा "महानायक"चे किंवा श्रीनांच्या गारंबीच्या बापूचे आणखी एक पारायण करणे माझ्यासारखे सामान्य पुस्तकप्रेमी पसंत करतील.
बाकी, चेतनराव, तुमचं चालू दया. गारगोटयांच्या बाजारात हिरे-माणकं विकली जात नाहीत हेच खरं!
प्रतिक्रिया
19 Mar 2009 - 11:24 am | चिरोटा
चेतन भगतह्यान्चे लिखाण मलापण काही खास भावले नाही. सामान्य असेच त्यन्चे लिखाण आहे.भगत ह्याना साहित्य अकादमीच्या पुरस्काराची अपेक्षा असावी. ते मिळणार नाही हे लक्श्यात आल्यावर 'कोल्ह्याला द्राक्षे आम्बट' असल्याने ते तारे त्यानी तोडले असावेत.
आपला मीडिया आणि पत्र्कार हल्लि साहित्याच्या बाबतितपण अमेरिकेकडे डोळे लावुन बसलेला असतो.NY Times/WashingtonPost मध्ये भारतिय वन्शाच्या लोकान्चा उल्लेख आला रे आला की हे आनन्दाने उड्या मारणार आणी इकडे मोठी बातमी देणार.त्यात भगत हे आय्.आय्.टी आणि आय्.आय्.एम्.चे.मग काय विचारता.
भेन्डि-
19 Mar 2009 - 11:48 am | विंजिनेर
आपण लेखाचा दुवा दिला नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणे अवघड आहे. पण आपल्या काथ्याकुटाच्या पार्श्वभूमीवर आधारित माझे दोन पैसे:
मुळात चांगलं पुस्तक आणि महत्वाचे पुरस्कार ह्यांचा संबंध जरा जपुन लावायला हवा. कारण पुरस्कार मिळालेल्या चांगल्या पुस्तकांची संख्या आणि पुरस्कार न मिळून सुद्धा चांगली प्रसिद्धी मिळून अमाप खपणारी चांगली पुस्तके अशा दोन्ही बाजू पहायला मिळतील.
ह्यात "चांगले" पुस्तक म्हणजे ज्यातून जास्तीत जास्त वाचकांना दर्जेदार सकस वाचल्याचा आनंद मिळतो असे पुस्तक हे आधी सांगितलेले बरे.
मग ते पुस्तक लोकप्रिय होउदे किंवा वादग्रस्त तो मुद्दा अलहिदा.(कोणी म्हणेल की ह्याच न्यायाने प्लेबॉय मासिकांना बुकर नाहितर उत्तम वार्ताहराचा पुलित्झर का नाही मिळत ;) तर त्याला उत्तर असे की जगातल्या ५०% वाचक - म्हणजे स्त्रियांच्या दृष्टीने अशी पुस्तके वाचून कुठलाही आनंद मिळत नाही आणि भारत सोडला तर इतर देशात मासिकांची रद्दी विकत नाहीत म्हणून तो ही उपयोग नाही)
पुरस्काराचे महत्व शेवटी लेखकू मंडळींच्या दृष्टीने जास्त असते (प्रकाशक पायावर लोळण घेतात :)). पण वाचकाने मात्र पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे का नाही ह्याला अवाजवी महत्व न देता बरे-वाईट पुस्तकांची निवड नीर-क्षीर पद्धतीने करणे गरजेचे आहे.
19 Mar 2009 - 12:05 pm | अ-मोल
प्रतिसादाबददल धन्यवाद
संदर्भासाठी दुवा
http://epaper.timesofindia.com/Default/Scripting/ArticleWin.asp?From=Arc...
19 Mar 2009 - 12:11 pm | विनायक पाचलग
अडीगांचे पुस्तक वाचायचा प्रयत्न केला पण बोअर झालो म्हणून सोडुन दीले
पण ऍ़ज युजवल साधारणतः भारतीयांबद्दल ताशेरे ओढले की पुरस्कार मिळुन जातो ही समज या पुस्तकाने पक्की केली
बाकी चेतन भगत पहील्यांदा खुप आवडलेला पण आता तीसरे पुस्तक वाचले आणि कंटाललो
तीच तीच कथा फक्त बॅकग्रावुंड वेगळी तीन मीत्र एक ज्येस्ठ व्यक्ती वगैरे वगैरे
चालु दे
(अवांतर- मध्यंतरी लोकसत्तात या अडीगावर भाश्य करणारा लेख आला होता जमले तर लिंक देइन
आणि हो सध्या अजुन एक आय आय टीयन जोरात आहे तुषार रहेजा म्हणुन त्याचे एनिथिंग फॉर यु मॅम जोरात गाजते आहे कोणाला माहीती असल्यास वा वाचले असल्यास जरुर सांगावे)
When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES
विनायक पाचलग
20 Mar 2009 - 6:48 am | मुक्ता २०
मी वाचलय.
काही खास असं नाहिये. साधी लव्ह स्टोरी आहे, त्यात तो मुलगा त्याच्या गर्ल्फ्रेन्डसाठी काय काय करतो हेच आहे. टाइम पास म्हणुन ठीक आहे!
सध्या किती गाजतय माहित नाही पण माझ्या मते हे पुस्तक प्रकाशित होउन बराच वेळ झाला असावा. :)
19 Mar 2009 - 12:05 pm | विसुनाना
अरे, हा 'चेतन भगत' कोण आहे?
तुझे वय किती? तू बोलतोयस किती?
बाळ चेतन, तुला माहित आहे का? भारतातल्या घाणीत आपल्या मनातली घाण मिसळून ती जागतिक प्रदर्शनात मांडली की तिला 'बुकर', 'ऑस्कर'... गेलाबाजार 'नोबेल' वगैरे पारितोषिके मिळतात. सोपं आहे. तुला हवं असेल तर प्रयत्न करून पहा. नक्की यश मिळेल हो!
साहित्य अकादेमी वगैरे जरा अवघड आहे. त्याला खूप वर्ष घासावं लागतं. फक्त इंग्रजीतली चार वाक्यं लिहिता आली तर पुरेसं नसतं. त्यासाठी भारतीय मनाचा उलगडा व्हावा लागतो. चिंतन, मनन लागतं. मग कुठे अस्सल भारतीय कलाकृती उतरतात. त्या नादाला लागायचं असेल तर उगीच टाईमपास लेखन करू नकोस.
तू असे लेख लिहून साहित्य अकादेमी पुरस्कार मिळवण्यासाठी झटत आहेस हे समजले. प्रयत्न सुरू ठेव. शुभेच्छा!
19 Mar 2009 - 12:16 pm | नंदन
वरील प्रतिसादांशी सहमत आहे. व्हाईट टायगर 'पॉवर्टी पॉर्न' म्हणावे असे आहे. एक वेळ तो मुद्दा बाजूला ठेवला तरी त्यात बुकर पारितोषिकप्राप्त सोडाच, पण एक ठीकठाक पुस्तक म्हणूनही काही विशेष आढळले नाही.
अडिगा महोदयांनी एका ब्रिटिश वृत्तपत्राला मुलाखत देताना (बहुतेक गार्डियन) माझ्या ह्या पुस्तकामुळे भारतातील प्रस्थापित वर्गात खळबळ माजली असून पददलितांना आशेचा किरण दिसतो आहे, असे अतिशय विनोदी विधान केले होते. त्यामुळे आधीच 'टॅब्लॉईड' ऑफ इंडियातील बातमी, तशात हे अर्ध्या हळकुंडाचे लेखकु - त्यामुळे बातमी विनोदी म्हणून सोडून द्यावीशी वाटते.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Mar 2009 - 12:56 pm | श्रावण मोडक
'व्हाईट टायगर' वाचलं आणि वेळ वाया घालवल्याबद्दल दोन थोबाडीत मारून घेतल्यात मी... त्यात विकत घेऊन पैसे खर्च केल्याचा पश्चाताप वेगळाच.
माझं जाऊद्या, नंदन-विसुनाना, तुम्ही सांगा - बुकर मिळालेली याआधीची काही भारतीय पुस्तकं वाचली असावीत तुम्ही. मी वाचलेली नाहीत. मिडनाईट्स चिल्ड्रन वाचलं होतं. आणि निराशाच झाली होती. बुकर हा जागतील स्तरावरच्या 'सा.प.'चा पुरस्कार वाटला होता त्यावेळी. गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज वाचलं होतं. तेव्हाही तेच. आजही त्यात फरक पडलेला नाही हे व्हाईट टायगरवरून सिद्ध झालं. बुकरवर खरंच एवढं काही अवलंबून आहे? मला वाटतं, सगळ्या भारतीय भाषांतील काही निवडक कादंबऱ्या आपापल्या मापदंडांनुसार घ्यायच्या ठरवल्या आपण, तर पहिल्या पंचवीसात या बुकरविजेत्यांना स्थानदेखील असणार नाही. 'भगत-गण' काहीही म्हणोत.
गंमत पहायचीये, व्हाईट टायगरचा मराठी अनुवाद येतोय. हातोहात खपतो की नाही पहा... काही नसलं तरी सरकारी अनुदानित लायब्रऱ्यांमध्ये निवांत काही पुस्तकं जातील. आवृत्तीचा सारा खर्च बाहेर पडलेला असेल.
अडीगांच्या लेखी प्रस्थापित वर्गात खळबळ हे बरोबरच आहे, नंदन. तो त्याच्या वर्तुळाला विश्व समजतो. त्यामुळं समग्र प्रस्थापित वर्ग त्या वर्तुळात संपतो. तो त्याचा दोष नाही, आपल्याला असलेला सुमारपणाचा शाप आहे.
19 Mar 2009 - 1:12 pm | विसुनाना
अहो, इतकेच कशाला? इथे तुम्हीच लिहिलेली 'राजे'सारखी गोष्ट, आता वामनसुत लिहित असलेले आत्मचरित्र हे देखील या बुकर (भुक्कड?) पुस्तकांपेक्षा बर्याच वरच्या पातळीवरचे लेखन आहे असे म्हणतो.
19 Mar 2009 - 1:36 pm | नंदन
मिडनाईट्स चिल्ड्रेन/गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज दोन-तीन भल्या मित्रांनी सावध केल्याने अजून वाचली नाहीत :), 'इन्हेरिटन्स ऑफ लॉस'बद्दल उत्सुकता आहे. खरं तर, गेल्या वर्षीच्या यादीतली अमिताव घोष यांची 'सी ऑफ पॉपीज' बरीच अभ्यासपूर्ण आणि वेगळ्या विषयावरची होती; पण 'व्हाईट टायगर'च्या गरिबीच्या झगमगटापुढे ती फिकी पडली असावी.
पारितोषिकप्राप्त पुस्तकांच्या यादीत जे. एम. कॉट्झी, नायपॉल, विल्यम गोल्डिंग सारखी दिग्गज नावे आहेत. इंग्लिश पेशंट, लाईफ ऑफ पायसारखी ग्रेट नसली तरी वाचनीय पुस्तकं आहेत. मग सुमार भारतीय इंग्रजी लेखनाचा उदोउदो करण्यामागे काही कॉन्स्पिरसी थिअरी असावी की काय, असं वाटू लागतं.
हे टोकाचं मत बाजूला ठेवलं, तरी हे सारं मुळात पाश्चात्यांना वाटणार्या कुतुहलापोटी (निरागस/कुत्सित दोन्ही प्रकारचे) असावं. ते ओसरलं की दुकानाच्या बाहेर सूर्यप्रकाशात कपड्याचा खरा रंग दिसतो, तसा हा बेगडीपणा कधीतरी उघड होईल अशी आशा वाटते. तोवर महानोरांची 'खराखरा खाजवीत गिरामीण कथा आली, पचाक्कन थुकताना मुरका मारून गेली. आम्ही च्यायला येड्यावानी पोट धरून हासलो, तंबाखूचे बार चघळीत रसिक होऊन बसलो!' छापाच्या रसिकांचे समाधान करणार्या पुस्तकांना मागणी राहील. तुम्ही म्हणता तसे अनुवादही 'महाजनो येन गता: स पंथ:' च्या न्यायाने खपतील.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Mar 2009 - 1:47 pm | विंजिनेर
उडदामाजी काळे गोरे असायचेच. त्यात उगाच कॉन्स्पिरसी थियरी शोधणं म्हणजे टाइम्स सारख्या सवंग वृत्तपत्राच्या एक फडतूस बातमीला अवाजवी महत्व देण्यासारखं आहे. भारतातल्या भारतीय वंशाच्या आणि मुळ भारतीय नसलेल्या अनेक लेखकांनी उत्तम लिखाण केले आहे. पुढेही नक्की होईल.
पण त्यासाठी एका ३-४ वर्षापूर्वी साहित्य जगात आलेल्या आणि आय-आय-एम चे ग्लॅमर आहे म्हणून प्रसिद्ध झालेल्या लेखकाच्या प्रतिक्रियेची कसोटी लावायचं कारण नाही.
20 Mar 2009 - 1:22 am | भाग्यश्री
इन्हेरिटन्स ऑफ लॉस मला तरी महाबोरमारू वाटलं! सुरवात इतकी बोरिंग आणि संथ! :(
19 Mar 2009 - 8:10 pm | संदीप चित्रे
काय पर्फेक्ट नाव आहे रे :)
19 Mar 2009 - 12:41 pm | महेश हतोळकर
चेतन भगतच्या पुस्तकाचा मायबोली वरचा हा पंचनामा.
19 Mar 2009 - 1:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या लिंकबद्दल धन्यवाद. 'फाय पॉईंट समवन' वाचल्यानंतर इतर पुस्तकांना हात लावावासा वाटला नाही. 'अ नाईट ऍट कॉल सेंटर'ची गोष्ट 'हेलो' या चित्रपटातून कळल्यावर काही रसच राहिला नाही आणि या दोन अनुभवांवरून मी शहाणी झाले.
आय.आय.टी., आय.आय.एम मधून कोणा विषयांत पदव्या मिळाल्या म्हणूनच फार मोठी साहित्यिक जाण वगैरे असते, येते यावर आधीही विश्वास नव्हताच, पण चेतन भगतने सोदाहरण स्पष्ट केलं.
कोणाच्या, कोणत्या मताला किती किंमत द्यायची हे ज्याचं त्याने ठरवायचं, नाही का?
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
19 Mar 2009 - 1:12 pm | भोचक
अगदी खरंय अमोल. हल्ली आपल्याकडे पाश्चात्य पुरस्कारप्राप्त मंडळींना भलताच भाव आलाय. त्यात मीडीयावाल्यांनी यांना चढवून ठेवलंय. एखाद-दुसरं इंग्लिश पुस्तक लिहून त्यात भारतातली गरीबी आणि बरंच काही रेखाटून हे पाश्चात्य पुरस्कार पटकावतात आणि वर भारतावरच 'तंगडी' वर करतात. यांच्याहीपेक्षा सकस लिहिणारे प्रादेशिक भाषेतले लेखक मात्र वळचणीला जाऊन पडतात. त्यांना पुरस्कारही विचारत नाही आणि काही नाही. या अरविंद अडिगापेक्षा मराठीतल्या रमेश इंगळे उत्रादकरांची 'निशाणी डावा अंगठा' ही कादंबरी अप्रतिम आहे. पण त्यांच्या भाळी मात्र असे आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे टिळे मात्र लागत नाहीत. दुर्देव.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
19 Mar 2009 - 2:07 pm | प्रसाद लेले
नम्स्कार
वरिल बहुतेकाशि सहमत आहे . ३ चुका माझ्या आयुशातल्या हे भगताचे पूस्तक वाचले .अतिशय सपक आहे . सजत नहि का ह्या लोकाना फालतु प्रसिधि मिलते.
प्रसाद लेले
19 Mar 2009 - 2:48 pm | नितिन थत्ते
भगत यांची दोन्ही विकत घेतली होती (किंमत फार नव्हती म्हणून). वने नाईट बरे वाटले. पण फाईव पॉइण्टचा कंटाळा आला होता. अर्धीच वाचली.
खराटा
(रंग माझा वेगळा)
19 Mar 2009 - 3:19 pm | शक्तिमान
"द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ"...
माझ्या आयुष्यातल्या तीन चुका म्हणजे मी त्या चेतनची तिन्ही पुस्तके वाचून काढली :''( :''(
असो... मित्रांकडून आणून फुकटात वाचली ही त्यातल्या त्यात हुशारी... ;)
19 Mar 2009 - 4:17 pm | निशिगंध
"द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ"...
माझ्या आयुष्यातल्या तीन चुका म्हणजे मी त्या चेतनची तिन्ही पुस्तके वाचून काढली
मला तुमची प्रतिक्रिया खुपच आवडली.
आणि तुमच्या हुशारी ची दाद नाही....
19 Mar 2009 - 5:09 pm | श्रावण मोडक
मॅन बुकरसाठी व्ही. एस. नायपॉल आणि महाश्वेता देवी यांचे नामांकन.
यादी अशी -
पीटर कॅरी (ऑस्ट्रेलिया), इव्हान कॉनेल (अमेरिका), महाश्वेता देवी (भारत), इ. एल. डोक्ट्रोव (अमेरिका), जेम्स केल्मन (ब्रिटन), मारियो वर्गास लोसा (पेरू), अर्नोस्ट लस्टीग (झेकोस्लोव्हाकिया), अॅलीस मन्रो (कॅनडा), व्ही. एस. नायपॉल (त्रिनिदाद, भारत), जॉयस कॅरोल ओट्स (अमेरिका), अँटोनियो ताबुची (इटली), नगुगी वा थियॉंग'ओ (केनया), दुब्राव्का उग्रेसिक (क्रोएशिया) आणि लुडमिला उलित्स्काया (रशिया).
परीक्षक - अमित चौधरी, जेन स्मायले आणि अँड्रे कुर्कोव
मराठीकरणात उच्चारांचे दोष असतील...