किरीट सोमय्या यांचा आरोप
सोमवार व मंगळवारी झालेली शेअर बाजाराची घसरण काही बड्या दलालांना फायद्याची आणि लाखो किरकोळ गुंतवणूकदारांना मात्र तोट्यात ढकलणारी होती. या माकेर्ट क्रॅशची चौकशी करावी, कुणाला फायदा झाला याचा शोध घ्यावा आणि सदोष यंत्रणा बदलावी अशी मागणी इन्व्हेस्टर ग्रिव्हन्सेस फोरमचे अध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केली आहे. या क्रॅशचा फायदा विदेशी वित्त संस्था, मोजके बडे दलाल आणि काही प्रमोटर्सना झाल्याची आपली माहिती असल्याचे सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे सोमवार व मंगळवारचा क्रॅश हा माकेर्ट स्कॅमच असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेअर बाजार कोसळला त्यावेळी फ्युचर अँड ऑप्शनमध्ये गुंतवणूकदारांना पूर्वसूचना न मिळता त्यांच्या शेअरची विक्री झाली. माजिर्न मनी भरण्याचीही उसंत न मिळाल्याने ज्यावेळी गुंतवणूकदारांना शेअरचा ताबा न मिळता त्यांची परस्पर विक्री झाली, त्याचवेळी पैसे असलेल्या गुंतवणूकदारांनाही शेअर ताब्यात घेता आले नाही. परंतु विदेशी वित्त संस्थांसह काही बड्या दलालांना मात्र खालच्या किमतीला शेअर विकत घेता आले. या सर्व प्रकारामध्ये लाखो किरकोळ गुंतवणूकदारांचे अतोनात नुकसान झाल्याचा आणि मोजक्या बड्यांना फायदा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी संपूर्ण चौकशीची आणि नुकसानभरपाईची मागणी 'सेबी'कडे व केंदीय अर्थ खात्याकडे करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान सोमवार व मंगळवारच्या क्रॅशमध्ये नुकसान झालेल्या गुंतवणूकदारांनी 'सेबी'कडे तक्रारी कराव्यात असे आवाहन सोमय्या यांनी केले आहे.
प्रतिक्रिया
25 Jan 2008 - 4:49 pm | विसोबा खेचर
दरम्यान सोमवार व मंगळवारच्या क्रॅशमध्ये नुकसान झालेल्या गुंतवणूकदारांनी 'सेबी'कडे तक्रारी कराव्यात असे आवाहन सोमय्या यांनी केले आहे.
हम्म! काही फायदा होईलसे मला वाटत नाही...!
असो, केवळ बाजार २१००० आहे आणि तो २५००० जाणार आहे यावर विश्वास ठेवून, पीई रेश्यो, व्हॅल्युएशन वगैरे न बघता चढ्या भावाने समभाग घेणार्या, फ्युचर ऑप्शन मध्ये सौदे करणार्या मंडळींबद्दल माझ्या मनात जराही सहानुभूती नाही. जे झालं ते उत्तमच झालं!
तात्या.
26 Jan 2008 - 4:23 am | पिवळा डांबिस
आणि मला तर वाटते की आता झाल्या घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ज्यांचे नुकसान झाले त्यांच्याबद्दल वाईट वाटते परंतु अभ्यासाशिवाय गुंतवणूक म्हणजे तोट्याला आमंत्रण!!
द बुल्स मेक मनी, द बेअर्स मेक मनी; द पिग्ज गेट स्लॉटर्ड!!!
पिवळा डांबिस