मिश्र डाळींची भजी

शाल्मली's picture
शाल्मली in पाककृती
5 Mar 2009 - 7:46 pm

नमस्कार मंडळी,

आमच्या घरी कोणाला जेवायला बोलावले असेल, कोणाचे केळवण, सत्यनारायण वगैरे अश्या काही पूजा असतील तर जेवणात पाहिजेतच अशी ही मिश्र डाळींची भजी.

साहित्य :-
१ वाटी उडीद डाळ
१ वाटी मुगाची डाळ
१ वाटी हरभर्‍याची डाळ
४-५ हिरव्या मिरच्या
१ इंच आलं
१ लहान चमचा धनेपूड
१ लहान चमचा जिरेपूड
चवीनुसार मीठ
तळणीसाठी तेल

कृती:-
प्रथम उडीद डाळ, मुगाची डाळ आणि हरभर्‍याची डाळ एकत्र ५ ते ६ तास पाणी घालून भिजत ठेवावी.
डाळी भिजल्यानंतर ५-६ तासांनी त्या चाळणीवर घालून ५-१० मिनिटे निथळत ठेवाव्यात. त्यानंतर मिक्सरमधून भरड वाटून घ्याव्यात. (डाळी अर्धबोबड्या वाटाव्यात. एकदम पीठ करू नये.) वाटतानाच त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालाव्यात. पाणी अजिबात घालू नये.
या वाटलेल्या मिश्रणात धनेपूड, जिरेपूड, मीठ, किसलेले आलं आणि आवश्यकता वाटल्यास थोडे तिखट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. एका कढईत तेल तापत ठेवावे. तेल कडकडीत तापल्यावर छोटी छोटी भजी घालून खरपूस तळून घ्यावीत.
चिंचेच्या चटणीबरोबर गरम असताना खावीत.

चिंचेच्या चटणीसाठी :- चिंचेचा कोळ करून घ्यावा. त्यात गूळ, दाण्याचे कूट, तिखट, मीठ घालून चटणी ढवळून घ्यावी.
ही भजी एकदम कुरकुरीत होतात. आणि वरील चटणीबरोबर एकदम चविष्ट लागतात. :)

--शाल्मली.

प्रतिक्रिया

नंदन's picture

5 Mar 2009 - 7:52 pm | नंदन

आहे पाककृती. दुपारी ४ ते ६ या वेळात खायला बेश्ट!. पाकृ आणि फोटोइतकेच 'डाळी अर्धबोबड्या वाटाव्यात' हे वाक्यही आवडले. :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

भाग्यश्री's picture

5 Mar 2009 - 11:02 pm | भाग्यश्री

मलाही!! अर्धबोबड्या वाह काय शब्द आहे... :))

शाल्मली भजी मस्तच! करून बघणार.. :)
http://bhagyashreee.blogspot.com/

चकली's picture

5 Mar 2009 - 7:53 pm | चकली

मला ही भजी खुप आवडतात. छान रेसिपी!
चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु's picture

5 Mar 2009 - 8:10 pm | प्राजु

मस्त फोटो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

5 Mar 2009 - 9:26 pm | क्रान्ति

फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटल. रविवारी करून पहायला हवी. मी असे हरभरा दाळीचे पालक घालून वडे करते. तेही छान होतात. ही भजी पण नक्कीच करुन पाहीन.
क्रान्ति

स्मिता श्रीपाद's picture

5 Mar 2009 - 9:30 pm | स्मिता श्रीपाद

एखाद भजं उचलुन तोंडात टाकता आलं असतं तर :-)

अवांतरः आज तात्या काय बरं लिहितिलं?

-स्मिता

रेवती's picture

5 Mar 2009 - 9:43 pm | रेवती

बराच प्रयत्न करून एकही भजं काढता आलं नाही त्या फोटूमधून!;)
इतका छान फोटू व सोपी पाककृती टाकल्याबद्दल तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.... सॉरी धन्यवाद!
एक शंका : भरड वाटलेल्या पिठात कडकडीत तापलेल्या तेलाचं मोहन नाही घालायचं का?

रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Mar 2009 - 9:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रेवतीताई, तुला एखादं भजं काढता आलं तर मलाही शिकव कसं काढायचं ते! भजी पाहून भरल्यापोटी भूक लागली.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

रेवती's picture

5 Mar 2009 - 10:05 pm | रेवती

मला जमलं तर न(ण)क्कीच सांगीन.
असं एकट्यानं खाणं बरही वाटत नाही.

रेवती

शितल's picture

5 Mar 2009 - 9:48 pm | शितल

शाल्मलीताई,
पाककृती आणी फोटो मस्तच. :)
भजी मला कोणतीही आवडतेच. ;)

धनंजय's picture

5 Mar 2009 - 10:01 pm | धनंजय

पण करून बघीन की नाही शंका वाटते.

कारण -तळणाच्या उरलेल्या तेलाचे काय करायचे? एकीकडे पुन्हा वापरले तर आरोग्यास हानिकारक हा विचार. दुसरीकडे काटकसरीमुळे टाकवतही नाही. (पोळ्या फारशा करत नाही, त्यामुळे मोहन म्हणून वापरता येत नाही...) या कात्रीत सापडल्यामुळे तळण मी करतच नाही. मग ही सोपी आणि मस्त पाकृ कशी करावी? :-(

प्राजु's picture

5 Mar 2009 - 10:08 pm | प्राजु

भाज्याकरताना, फोडणीसाठी वापरून संपवून टाकायचं... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

5 Mar 2009 - 10:14 pm | रेवती

हेच म्हणते.
तळण्यासाठी तेल कमी घ्या. भजी तळून झाली की दुसर्‍या पातेल्यात/ कढईत लगेच फोडणी करून टाका.
फोडणी जास्त झाली असे वाटत असेल तर कोशिंबीरीवर गार फोडणी ओतावी लागते म्हणून थोडी काढून ठेवा.
तुम्हाला इतक्या चांगल्या पदार्थापासून वंचीत रहावं लागू नये म्हण जरा खटपट चाललीये.:)
रेवती

शाल्मली's picture

5 Mar 2009 - 10:40 pm | शाल्मली

भाज्याकरताना, फोडणीसाठी वापरून संपवून टाकायचं...
बरोब्बर!
तेल उरेल म्हणून भजी करायची नाहीत म्हणजे जरा अन्यायच आहे भज्यांसारख्या पदार्थावर !

स्वगत :- नवर्‍याने कांद्याची भजी हवीत असं आयत्या वेळेस फर्मान सोडल्यावर तळणीतले उरलेले तेल आरोग्याला चांगले नाही हे निमित्त बरं सापडलंय सांगण्यासाठी ;)

--शाल्मली.

चतुरंग's picture

5 Mar 2009 - 10:12 pm | चतुरंग

तेल संपेपर्यंत रोज भजी तळत रहा!! धन्याशेठ हलके घे रे बाबा!!!

(खुद के साथ बातां : रंग्या, कुठेतरी अल्लाद गाठून मस्त शाब्दिक चोप देणार बघ आता धन्याशेठ तुला! नाही त्या खोड्या काढायची हौसच लई तुला! :T )

चतुरंग

रेवती's picture

5 Mar 2009 - 10:18 pm | रेवती

काहीही सल्ले देऊ नयेत.
परवाचं साबूदाणा वड्यांचं तेल पोळ्यांना लावून संपवतीये मी.
पण तळणी तशी छोटीच आहे माझ्याकडे.

रेवती

लिखाळ's picture

5 Mar 2009 - 10:46 pm | लिखाळ

काहीही सल्ले देऊ नयेत.
परवाचं साबूदाणा वड्यांचं तेल पोळ्यांना लावून संपवतीये मी.

हा हा .. दटावणी मस्तंच :)

रंगाके साथ बातां : घरोघरी तळणीचे तेल ! (आणि त्यावरुन ओरडा) अशी नवी म्हण बनवावी काय? :)
-- लिखाळ.

नंदन's picture

5 Mar 2009 - 11:55 pm | नंदन

(साबुदाणा) वड्यांचे तेल रंग्यावर ;)
[कृ. ह. घे.]

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चतुरंग's picture

6 Mar 2009 - 6:09 am | चतुरंग

हा हा हा! दिल खूष!! :))

चतुरंग

शितल's picture

6 Mar 2009 - 7:18 pm | शितल

=))

शितल's picture

6 Mar 2009 - 7:21 pm | शितल

काहीही सल्ले देऊ नयेत.
परवाचं साबूदाणा वड्यांचं तेल पोळ्यांना लावून संपवतीये मी.

रेवती,
ये पब्लीक है, त्यात ही मिपावरिल पब्लिक आहे. ;)
काही म्हण पण दम अगदी दमदार वाटला.. :)

धनंजय's picture

5 Mar 2009 - 11:55 pm | धनंजय

माझ्या चिक्कूपणाला चोप मिळाला खरा, पण उत्तम सल्लाही मिळाला - विशेष म्हणजे आता माझ्या घरी भजी तळून होतील, मला तीही मिळणार. पक्या म्हणतात तशी छोटी कढई वापरायची. त्यामुळे हिशोबखाते माझ्याच फायद्याचेच फायद्याचे.

(रंगरावांच्या घरी जाऊन भजी चापायचा [चोपायचा नाही] माझा प्लॅन... सोडा. दोन-चारशे मैल ड्राइव्हिंगच्या आळसामुळे वाचलात...)

तरी : भाज्यांना किंवा कोशिंबिरींना या तेलाची "गार फोडणी" देणे, ही कल्पना आरोग्याच्या दृष्टीने सर्वात चांगली वाटली. पुन्हा पुन्हा तळण करू नये - प्रत्येक खेपेला गरमगार केलेल्या तेलाचे अधिक "पेरॉक्सिडेशन" होते, आणि असे तेल प्रकृतीला चांगले नाही.

रेवती's picture

6 Mar 2009 - 3:11 am | रेवती

(रंगरावांच्या घरी जाऊन भजी चापायचा [चोपायचा नाही] माझा प्लॅन... सोडा. दोन-चारशे मैल ड्राइव्हिंगच्या आळसामुळे वाचलात...)

असं कसं चालेल?
जेंव्हा याल या बाजूला तेंव्हा घरी या. प्लॅन अजिबात बदलू नका.
आळस हा माणसाचा शत्रू आहे. तेवढं ड्रायव्हींग कराच.
रेवती

पक्या's picture

5 Mar 2009 - 11:16 pm | पक्या

मस्त. सोपी आणि चविष्ट रेसिपी. धन्यवाद.

>>पण करून बघीन की नाही शंका वाटते. कारण -तळणाच्या उरलेल्या तेलाचे काय करायचे?
धनंजय राव , कढई अगदी छोटी वापरा तळण्यासाठी ...जेमतेम ५-६ मध्यम आकाराची भजी एकावेळी मावतील एवढी. त्यात भजी बुडतील एवढेच म्हणजे अर्धा कढई तेल घाला. तेल संपत आले की वरून परत थोडे थोडे ओतायचे. दुसरा घाणा काढताना मात्र हे परत घातलेले तेल कडकडीत तापले पाहिजे. भजी करायला वेळ जरा जास्त लागेल पण तेल निश्वितच वाया जाणार नाही. काहीवेळेस उरत ही नाही. कढई मोठी असेल तर खूप तेल घालावे लागते. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गार झालेले तेल परत गरम करून वापरल्यास आरोग्यास हानिकारक असते. त्यामुळे थोडेसे तेल उरलेच तर त्याचवेळी गरम असतानाच इतर भाज्यांसाठी वगैरे वापरावे.

विसोबा खेचर's picture

6 Mar 2009 - 12:46 am | विसोबा खेचर

शेवटचे आचके देत म्हणजे प्राण सोडणे म्हणजे काय, हे तात्यांचा मृत्यू पाहिल्यावर अनेकांना समजले..

परंतु जीव जाईपर्यंत तात्यांनी मूठ मात्र घट्ट बंद केलेली होती. तात्या गेल्यावर ती उघडली असता त्यात मिश्र डाळींची भजी सापडली! बहुधा त्यांनी अंतयात्रेत शिधा म्हणून सोबत बाळगली असतील..

शाल्मलीतैंच्या किचनच्या खिडकीबाहेर एक पिंपळाचे झाड आहे. अलिकडे त्या झाडावरून रात्री अपरात्री,

मिश्र डाळींची भजी! मिश्र डाळींची भजी!

असे आवाज ऐकू येतात असं त्या परिसरतल्या लोकांचं म्हणणं आहे! :)

असो..:)

लवंगी's picture

6 Mar 2009 - 1:03 am | लवंगी

अगदि असेच म्हणते..

चित्रा's picture

6 Mar 2009 - 1:47 am | चित्रा

मस्त दिसतायत भजी..

अवांतर -तात्या मात्र काहीतरीच लिहीतात हल्ली हे खपलो, मेलो वगैरे.

रेवती's picture

6 Mar 2009 - 3:06 am | रेवती

सहमत आहे चित्राताई!
अतिप्रेमाने बोलत असतात, मनःपूर्वक दाद द्यायची आहे हे समजते पण...
अन्न समोर असताना आपण असे बोलत नाही.
खूप दिवसांपासून हेच सांगायचे होते.

रेवती

विसोबा खेचर's picture

6 Mar 2009 - 4:50 pm | विसोबा खेचर

चित्रातै, रेवतीतै,

आपल्या दोघींचंही म्हणणं मान्य. आता फक्त एकदा 'तात्या गचकले..' या मालिकेतील शेवटचा प्रतिसाद द्यायची परवानगी द्या. त्यानंतर प्रतिसादांची ही फेज आम्ही बंद करू...:)

बस, आखरी बार!

आणि खात्रीने सांगतो की तो या प्रकारातला माझा सर्वात बेष्ट प्रतिसाद असेल.. आपल्या दोघींनाही अवश्य आवडेल. खरडवहीत दुवा देईन. दाद द्यायला अवश्य या! :)

आपला,
(चित्रातै आणि रेवतीतै च्या म्हणण्याचा आदर करणारा) तात्या.

रेवती's picture

6 Mar 2009 - 5:40 pm | रेवती

ओक्के!

रेवती

विसोबा खेचर's picture

7 Mar 2009 - 10:03 am | विसोबा खेचर

रेवतीतै,

इथे आमचा प्रतिसाद दिला आहे. यापुढे आपल्याला व चित्रातैंना दिलेला शब्द पाळू! :)

तात्या.

बेसनलाडू's picture

6 Mar 2009 - 3:13 am | बेसनलाडू

एकंदरीतच तळकट पदार्थ टाळण्याकडे कल असतो. पण डाळींचे म्हणून पौष्टिक असे नैमित्तिक समीकरण मांडून तळकट असले तरी खाईन ;)
फोटो तर ख ला स !
(हावरट)बेसनलाडू

प्रभाकर पेठकर's picture

6 Mar 2009 - 12:00 pm | प्रभाकर पेठकर

मिश्र डाळीची भजी म्हणजे मस्त 'चखणा'. येत्या शनिवारी (आयला,म्हणजे उद्याच की) करून पाहतो. (म्हणजेच 'करून खातो.')

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

प्रकाश घाटपांडे's picture

6 Mar 2009 - 6:38 pm | प्रकाश घाटपांडे

मिश्र डाळीची भजी म्हणजे मस्त 'चखणा'

अरे वा पेठकर साहेबांचा हा "अनुभव" घ्यावा म्हंतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रभाकर पेठकर's picture

6 Mar 2009 - 8:10 pm | प्रभाकर पेठकर

ठरवा..ठरवा. वेळ आणि जागा ठरवा. 'बार' उडवून टाकू.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

सखाराम_गटणे™'s picture

6 Mar 2009 - 9:31 pm | सखाराम_गटणे™

कधी करायचा बेत बोला??
एकदम जोरात करु.
संगीत मैफील.

बाकी, परवाचा समस आवडला.
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

सहज's picture

6 Mar 2009 - 6:29 pm | सहज

केलीच पाहीजे अशी पाकृ!!!!

vasumati's picture

6 Mar 2009 - 9:25 pm | vasumati

=D> फारच छान आहे क्रुति!!!!!!!
छान झालि भजि!!!!
धन्यवाद अनि नविन पाक्क्रुतिच्यअ अपेक्शेत !!!
..............vasumati..................
..........वसुमति...................

अथांग सागर's picture

14 Apr 2009 - 4:02 am | अथांग सागर

खायचा मोह आवरला नाही...म्हणून आजचं करून खाल्ले.. :)

--अथांग सागर

शाल्मली's picture

9 Mar 2009 - 6:08 pm | शाल्मली

सर्व खवय्यांना मनापासून धन्यवाद!
:)

--शाल्मली.