मश्रूम-फ्लॉवर फ्राय

जृंभणश्वान's picture
जृंभणश्वान in पाककृती
4 Mar 2009 - 8:32 pm

साहित्य:
०) पाव किलो मश्रूम (शक्यतो पांढरे, काळपट नकोत)
१) पाव ते अर्ध्या किलोच्या दरम्यान फ्लॉवर
२) एक मध्यम आकाराचा कांदा
३) ४-५ मोठ्ठे चमचे तेल, शक्यतो जेवढा जिन्नस आहे त्याच्या अंदाजानुसार
४) तिखट, मीठ, हळद, आणि हिंग पावडर अंदाजे
५) भरपूर लाल मिरचीच्या बिया - पिझ्झावर घालायला मिळतात तशा
६) गरम मसाला/भाजीचा विकतचा मसाला/आले लसूण पेस्ट - हे सर्व ऐच्छिक, नाही वापरले तरी चांगला लागेल पदार्थ

कापाकापी:
प) मश्रूम आणि फ्लॉवर उभट कापून ठेवा.
फ) कांदा - आपले बोट न कापता जेवढा बारीक कापता येइल तेवढा बारीक कापा

कृती:
प्रकरण १: मश्रूम्स परतणे
य) पसरट कढईमधे २-३ चमचे तेल गरम करावे. गरमगरम तेलात मिरचीच्या बिया घालाव्यात, चांगल्या सणसणीत २-३ शिंका येतील असा खाट येउ द्या, मग तेलात मश्रूम टाकावे.
र) मश्रूम्स चांगले परतावे - मश्रूम्स ना थोड्या वेळानी पाणी सुटेल - पाण्याची वाफ होउन पाणी संपत आले की, हळद तिखट मीठ टाकून मश्रूम्स परतणे चालू ठेवावे.
ल) पूर्ण पाण्याची वाफ झाल्यावर गॅस बंद करा [ज्यांनी सुरुवातीला गॅस लावला नसेल त्यांनी ही पायरी वगळली तरी चालेल]

प्रकरण २: कांदा व फ्लॉवर परतणे
त) प्रकरण १-य) प्रमाणेच सर्व करावे. फक्त
त.१) पसरट कढईऐवजी मोठ्ठे भांडे घ्यावे - ज्यात शेवट मश्रूम्स, फ्लॉवर सर्व जिन्नस एकत्र मावेल एवढे मोठे भांडे लागेल
त.२) कांदा लाजून लाजून गुलाबी होईपर्यंत परतावा
थ) आता कांद्यावरच फ्लॉवर घालून खरपूस परतावा.
द) मंद आचेवर परता शक्यतो, आमच्या गॅसची आच कायम मंदच असते - एकतर मंद नाहीतर बंद
ध) कृपा करुन फ्लॉवरला झाकण ठेवून वाफ देऊ नका, शास्त्रीय कारण माहीत नाही पण चव बिघडते -
न) फ्लॉवर परतत असताना सगळे आवडीचे मसाले योग्य वेळेला घालावेत.

प्रकरण ३: मश्रूम्स, कांदा, फ्लॉवर युती
क) प्रकरण १-ल) मधे परतून ठेवलेले मश्रूम्स फ्लॉवरच्या भांड्यात ओतावेत
ख) हलक्या हाताने छान एकत्र करावे सगळे - अगदी एकजीव नका करु, काला व्हायचा.

पोळी, भात, ब्रेड, नुसतेच - कशाबरोबरपण/कसेपण खावा. खा म्हणजे झाले, वाया नका घालवू.

चित्र कम पुरावा:

आवराआवरी:

अविवाहीत असून मित्रांबरोबर रहात असाल तर -
च) कामवाल्या काकू येत असतील तर काय प्रश्नच नाही
छ) सिंक रिकामे असेल तर सगळी भांडी सिंक मधे टाकून डाराडूर झोपून टाका किंवा घराला कुलुप लावून, फोन बंद करुन ४-५ तास गायब व्हा
ज) सिंक रिकामे नसेल आणि डिशवॉशर असेल तर वापरा लगेच तो
झ) सिंक रिकामे नसेल आणि घरी डिशवॉशर पण नसेल तर रुममेटस किंवा अपार्ट्मेंट काहीतरी एक बदला.

विवाहित असाल/ बाकी उर्वरित साऱ्या शक्यता -
काय आयडियेची कल्पना नाय बुवा - सदसदविवेकबुध्दीनुसार निर्णय घ्या.

तळटिपा:
ट) हाच पदार्थ जरा कमी परतून, थोडेसा कच्चासर ठेवला तर चकणा म्हणून दारुबरोबर छान लागतो
ठ) दारु न पिणाऱ्यांनी निराश नका होउ - मांउटनड्यू किंवा तत्सम शरीराला हानिकारक थंड पेयाबरोबर चकण्यासारखा खा
ड) ग्रेव्ही पाहिजे असल्यास टोमॅटोची ग्रेव्ही करा आणि त्यात मश्रूम-फ्लॉवर्स बदाबदा ओता
ढ) मला स्वयपाकातले काहीही येत नाही परंतु, वरील एकच पदार्थ मी चांगला बनवतो असे जनमत आहे त्यामुळे कृतीमधे मुलभूत चुका आढळल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता योग्य ते बदल करुन घ्यावेत

प्रतिक्रिया

सहज's picture

4 Mar 2009 - 8:39 pm | सहज

भारी दिसते आहे.

लिखाळ's picture

4 Mar 2009 - 8:45 pm | लिखाळ

वाहवा .. मस्त पाकृ...
१ल च्या कंसातली सूचना जोरदार..
पाकृ लिहिण्याची पद्धत खास :)
-- लिखाळ.

रेवती's picture

4 Mar 2009 - 9:17 pm | रेवती

बरेच साधले आहेत एकाच प्रकरणात!
पाकृ परी पाकृ झाली, वर अविवाहितांना चार गोष्टी सांगितल्यात.
फोटू चांगला आलाय!

रेवती

मेघना भुस्कुटे's picture

4 Mar 2009 - 10:32 pm | मेघना भुस्कुटे

जबर्‍या रे! त थ द ध न - य र ल व ; खा म्हणजे झाले, वाया नका घालवू; मंद नाहीतर बंद; सदसदविवेकबुध्दीनुसार निर्णय घ्या... सगळंच ज्याम आवडलं.
आता काय लिहिणारेस? लवकर लिही.

भडकमकर मास्तर's picture

5 Mar 2009 - 1:26 am | भडकमकर मास्तर

एच मन्तो...
मस्त लेख आहे...

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग's picture

4 Mar 2009 - 10:45 pm | चतुरंग

साहित्याची सुरुवात १ ऐवजी ० आकड्याने करणे अतिशय आवडले! :) (माझा मुलगाही आकडे मोजताना "पहिला आकडा ० का नाही?" ह्यावरुन माझ्याशी नेहेमी वाद घालतो त्याची आठवण झाली! #:S )
गुलाबाच्या काट्यांप्रमाणे जागोजागी पेरलेल्या टोकदार सूचना अगदी पटल्या! ;)

चतुरंग

मेघना भुस्कुटे's picture

4 Mar 2009 - 11:00 pm | मेघना भुस्कुटे

अरेच्चा! हे माझ्या नजरेतून सुटलं होतं की.
रंगाशेट, धन्स!

बेसनलाडू's picture

5 Mar 2009 - 12:42 am | बेसनलाडू

साहित्याची सुरुवात १ ऐवजी ० आकड्याने करणे अतिशय आवडले!
श्वानसाहेब आय् टी वाले दिसतात. कृतीक्रम (ऍल्गॉरिदम्) आणि बर्‍याच फॉर् लूप्स्, व्हाइल् लूप्स् लिहिल्या असाव्यात ;)
(माझा मुलगाही आकडे मोजताना "पहिला आकडा ० का नाही?" ह्यावरुन माझ्याशी नेहेमी वाद घालतो त्याची आठवण झाली! )
रंगाशेठ, आपल्या चिरंजिवांची सी, सी++ ची पुस्तके वाचायची सुरुवात लवकरच होणारसे दिसते.
(आय् टी वाला)बेसनलाडू

चतुरंग's picture

5 Mar 2009 - 12:48 am | चतुरंग

रंगाशेठ, आपल्या चिरंजिवांची सी, सी++ ची पुस्तके वाचायची सुरुवात लवकरच होणारसे दिसते.

सध्यातरी तो डी फॉर डायनॉसॉर मधे गुंग आहे! डिप्लोडॉकस, टीरॅनोसॉरस रेक्स आणि कसली कसली लंबीचवडी नावं आणि त्यांची वजने मापे सांगून मला रोज चक्रावून टाकत असतो. :S

चतुरंग

जृंभणश्वान's picture

5 Mar 2009 - 1:11 am | जृंभणश्वान

हो - आयटीतलाच कामगार मी, लूप लिहून लिहून ० ची सवय झाली - शिवाय जरा कूल पण वाटते ;)

समिधा's picture

4 Mar 2009 - 11:27 pm | समिधा

मस्त आहे पाकृ. आणि लिहीलयस पण मस्तच.

भाग्यश्री's picture

5 Mar 2009 - 12:24 am | भाग्यश्री

टिपिकल तुझ्या स्टाईलमधली पाककृती वाचून हहपुवा झाली!! :)))
मस्त रे.. अजुन येऊदेत!
फोटोही भारीच!

http://bhagyashreee.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

5 Mar 2009 - 12:41 am | विसोबा खेचर

कुत्र्याच्या छत्र्या आम्हाला फारश्या आवडत नाहीत, त्यामुळे फोटू पाहूनही या वेळेस आम्ही जिवंतच आहोत.. :)

तात्या.

मुक्तसुनीत's picture

5 Mar 2009 - 2:23 am | मुक्तसुनीत

यॉनिन्ग डॉग ,
लई भारी रेसिपी ! आणि रेसिपीपेक्षा भारी कानपिचक्या ! ;-)

लोकांनो , जृंभणश्वानचा ब्लॉग पाह्यला नसला तर पहा ! फर्मास लिहितात राव. आणि हो , त्यातला "घोरण्यावरचा" बारीकसा लेख वाचायला विसरू नका. भीषण सुंदर आहे तो.

http://bashkalbadbad.blogspot.com/

धनंजय's picture

5 Mar 2009 - 4:30 am | धनंजय

पाकृ आणि वि.सू.

(ताज्या काळ्या अळंबी वापरायलाही हरकत नाही. मूळच्या पांढर्‍या आळंबी कुजून काळ्या झाल्या असतील तर वापरू नये, ही सूचना योग्यच.)

जृंभणश्वान's picture

5 Mar 2009 - 5:05 am | जृंभणश्वान

सर्व मित्रमंडंळींचे आभार :)

छोटा डॉन's picture

5 Mar 2009 - 8:56 am | छोटा डॉन

आयला आजकाल पाककॄत्या लिहण्यात पुरुषांनी बायकांचे मक्तेदारी मोडुन काढली की काय ?
एकदम खल्लास झाला आहे लेख ..
बर्‍याच वाक्यांना दाद देतो, लेखनशैली छानच आहे ...
>> [ज्यांनी सुरुवातीला गॅस लावला नसेल त्यांनी ही पायरी वगळली तरी चालेल]
=)) हाण हाण्ण ...!!!

करण्याचे सोडा ( म्हणज सोडुन द्या, हा सोड्याचा नवा प्रकार नाही. ), पण वाचायला काय भारी वाटते राव ही पाककॄती.
बघु, एखाद्या दिवशी आमचा दोस्तांना छळायचा मुड झाला तर आम्हीही हा बेत जमवु ...

आणि हो, "बाष्कळ बडबड" हा ब्लॉग तुझा आहे हे माहित नव्हतं, सुंदर लिहतोस मित्रा ...
लिहीत रहा ..!!!

------
( उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठेवाला कुक )छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)