कामानिमित्त बेंगालुरु (आधीचे बेंगलोर) मधे काही दिवस राहण्याचा योग आला होता. तिथे पोचल्यावर असे वाटले कि दुसर्या देशात आलो आहोत आणी ते सुद्धा व्हिसा आणी पासपोर्ट शिवाय. तेलगू, तमिळ आणी कन्नड आणी काही अंशी इंग्रजी वापरात असलेल्या या चार भाषा. पहिला दिवस गेस्ट हाऊस वर दुरदर्शन संचावर काही कार्यक्रम बघण्यात गेला. दुसर्या दिवशी ऑफिसात गेलो आणी गेट वरच्या रखवालदारापासुन ऑफिसातल्या सर्व लोकांशी इंग्रजी भाषेत संवाद साधावा लागला. एकटं वाटु लागल्यानं थोडासा निराश असा मी कँटीन मधे गेलो आणी कोपर्यातल्या एका टेबल वर बसलो. इतक्यात चार मराठी शब्द कानावर पडले आणी मी थोडा खुष झालो. मागे वळुन पाहिले तर एक व्यक्ती फोनवर मराठीत बोलत असल्याचे दिसले. आशावादी मनाने मी त्याचं फोनवरचं संभाषण संपताच त्याला गाठलं आणी विचारलं " आपण मराठी आहात का?"
त्याने माझ्याकडे विक्षिप्तपणे पाहिले आणी म्हणाला : " येस. "
मी: "मला थोडी मदत हवी आहे"
तो: " व्हॉट काईंड ऑफ हेल्प?"
मी: "मी इथे नवीन आहे आणी मला राहण्यासाठी घर शोधत आहे. तुम्ही काही महीती देऊ शकता का?
तो: "डु वन थिंग. बाय न्युज पेपर अन्द लूक फोर द ऍड्स." एवढे बोलुन तो सरळ चालता झाला. (मदत नाही केली तरी चालेल पण आपल्या मायबोलीत बोलायला काय लाज वाटत होती क ह्या हरामखोराला?)
हा एक छोटासा अनुभव. असे बरेच अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी मला आले . आपली लोकं हिंदी बोलायला तयार असतात पण मराठी नाही, आणी या सर्वांचा सारांश असा कि
मराठी लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर गेलं कि मराठी बोलायची लाज वाटते
ह्यावर आपले मत काय?
नोंद घ्या: मराठी लिखाणाची सवय नसल्याने मिपा वर अपेक्षित असलेली भाषा शैली माझ्याकडे अजुन नाही. विषयाचा आशय समजुन घ्यावा ही नम्र विनंती.
प्रतिक्रिया
1 Mar 2009 - 11:01 pm | मृण्मयी
तुमच्या दुर्दैवाने एका व्यक्तीचा असा अनुभव आला म्हणून सरसगट सगळ्यांसाठी हे अनुमान काढणं योग्य नाही. माझे सासरे, नवरा गेल्या ३० वर्षांपासून बंगलोरात स्थाइक झालेत. ओळखीची बरीच मराठी मंडळी आहेत. असा अनुभव मला तरी कधी आला नाही.
मराठी बोलताना काही इंग्रजी शब्द किंवा वाक्य वापरली जाऊ शकतात. पण म्हणून 'मराठी बोलायची लाज वाटते' असा अर्थ होत नाही.
2 Mar 2009 - 11:11 pm | टारझन
????????????? ठिक आहे तो ईंग्लिश मधे बोलला .. त्याचं त्याच्या पाशी ... त्याने काय करावं हे त्याला ठरवू द्या ..
तो केवळ इंग्लिश बोलला .. आपण तर शिवीगाळ करता आहात .. आपल्यात खरंच दम असता तर हाच शब्द त्याच्या समोर बोलला असतात ..
- एक हरामखोर
आम्ही कोणी काय करावं ह्यावर स्वता:ला त्रास होत नाही तो पर्यंत मौण बाळगतो !
1 Mar 2009 - 11:07 pm | मराठमोळा
तुम्ही माझा लेख पुर्ण वाचलेला दिसत नाही.
हा एक छोटासा अनुभव. असे बरेच अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी मला आले . आपली लोकं हिंदी बोलायला तयार असतात पण मराठी नाही,
मी सर्व अनुभव इथे लिहु शकलो नाही त्याबद्दल दिलगीर..
आपला मराठ्मोळा..
1 Mar 2009 - 11:14 pm | अमृतांजन
मी बंगलोरात सगळ्या रिक्षावाल्यांशी सुद्धा मराठीत बोलतो. ते कन्नड मधे बोलतात मी हटत नाही. शेवटी ते हिंदीत येत्तात.
बाजारात गेल्यावर अनेकदा मराठी लोक भेटतात. त्यांचे मराठी कानावर पडल्यावर अर्थातच बरे वाटते, संवाद साधायची इच्छा असेल तर मराठीलाच चिकटून राहतो.
पण आय टीतले अर्थ्या हळकुंडाले पिवळे झालेले लोक भेटतात व तुम्हाला जसा अनुभव आला तसा येतो.
पण आपण हटायचे नाही. लगे रहो!
जाताजाता, मी पण आय टी वालाच आहे पण त्या वरच्या कटगरी मधल्या लोकांना समुद्रात फेकावे असे वाटते.
2 Mar 2009 - 8:34 am | छोटा डॉन
>>मी बंगलोरात सगळ्या रिक्षावाल्यांशी सुद्धा मराठीत बोलतो. ते कन्नड मधे बोलतात मी हटत नाही. शेवटी ते हिंदीत येत्तात.
हाण हाण ..! अम्हीसुद्धा असेच करतो, त्याशिवाय हे लोक वठणीवर येत नाहीत ...
इथे तुम्हाला स्थानीक भाषा येत नसेल तर दुसरा पर्याय राष्ट्रभाषा नसुन चक्क "तमिळ भाषा" आहे, शिवाय एकमेकांच्या नडग्या फोडणारे हेच कन्नडिगा व तमिळी ..
असो.
बाकी बेंगलोरमधल्या मराठी लोकांबाबत आमचाही अनुभव अजिबात चांगला नाही.
जमत नसताना उगाच अहंकार म्हणुन इंग्रजाला झीट आणेल असे इंग्रजी बोलुन भाषेची मारतात पण "मराठी" काही बोलणार नाहीत, लहान मुलांना रागवतानाही चक्क इंग्रजीत रागावतात ...
बहुतेक करुन ही सर्व "विंजेनर" लोकं, अर्थात अपवाद आहेत पण सत्य हेच आहे.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
2 Mar 2009 - 10:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मलाही नॉयडात एका दुकानात कानांवर मराठी ऐकायला आलं (अर्थात त्यांनाही) आणि एकमेकांकडे बघून हसून बोलायला सुरूवात झाली. दोन्ही पार्टीज खूष, नॉयडात मराठी बोलता आलं. ते कुटुंबतर काही वर्ष नॉयडात होतं आणि मराठी लोकं आजूबाजूला नव्हती.
काही (१०, १५ नाहीतर २०) उदाहरणं पाहून कसं ठरवणार की १००% मराठी लोकांना महाराष्ट्राबाहेर गेलं की मराठी बोलण्याची लाज वाटते.
माझा एक मित्र बी.ए.आर.सी. कॉलनीत वाढला, बरोबरचे सगळे मित्र-मैत्रिणी भारताच्या वेगवेगळ्या भागातले, शिक्षणाचं माध्यम अर्थात इंग्लिश! कॉलेजचं एक सत्रं संपत आलं तेव्हा मला समजलं की हा भाई मराठीच आहे. त्याला नाहीच मराठी बोलण्याची सवय, तो कसा काय मराठी बोलणार?? त्याच्याबरोबर दुसरा एक मित्र, मस्त मराठी बोलायचा! त्याचं आडनाव 'बर्मन' ... आजूबाजूला कोणत्या भाषेतले लोक रहातात, मित्र-मंडळ कोणती भाषा बोलतं त्यामुळे बराच फरक पडत असावा.
आणि माझा बॉस, जयराम! पुण्यात शिकला, मुळचा दक्षिण भारतीय. तो मराठी बोलायला लागला की वाटतही नाही हा अमराठी आहे, आणि आतातर त्याची मुलंसुद्धा मराठी माध्यमाच्या शाळेत जातात. इंग्लंडमधल्या (गोर्या ब्रिटीश) बॉसच्या मुलाचा एक मित्र मराठी होता, त्या गोर्यांना पुरणपोळी व्यवस्थित माहित होती, 'नमस्कार' करायचे ते लोकं भेटले की ....
या दोन-चार उदाहरणांवरून मी जर निष्कर्ष काढायला लागले तर तो योग्य असेल का चूक?
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
1 Mar 2009 - 11:21 pm | मराठमोळा
आपण हटायचे नाही हे बरोबर आहे..
मी सुद्धा आय टी मधे काम करतो.. प्रश्न आयटी आणी नॉन आयटी चा नाही..सगळ्यांचा आहे..
प्रश्न आहे कि फक्त मराठी लोकांबाबतच असे का? का काही मराठी लोकांना लाज वाटते??
2 Mar 2009 - 1:13 am | संदीप चित्रे
मी तर महाराष्ट्रात वाढून / राहूनही मराठी न बोलणारे महाभाग पाहिले आहेत !
2 Mar 2009 - 1:47 am | रेवती
अगदी बरोबर!
कालच एक महाशय भेटले मॉलमध्ये!
ओळख नसताना आपणहोऊन बोलतोय माणूस म्हणून फार आनंद झाला.
एरवी इतकी आगाऊ मीच.
त्यानं सांगितलं की गेली ४० वर्ष पुण्यात राहताहेत त्याचे आईवडील, भावंडे केरळमधून येऊन.
मग मराठी येतच असेल असा आमचा (माझा व नवर्याचा) झालेला गैरसमज त्यानं दूर केला.
रेवती
2 Mar 2009 - 11:17 am | नीधप
मुंबईत वाढलेली, मराठी आडनाव धारण करणारी पण "आय डोन्ट नो मच ऑफ मराठी!" असं गोर्या ऍक्सेंट मधे सुनावणारी कैक व्यक्तिमत्वे मी पाह्यली आहेत.
पण त्याच वेळेला मुंबईत वाढलेला सुब्रमण्ये (कानडी), नागपुरात वाढलेली पाठम (तामिळ), पार्ल्यातला चरणसिंग (सरदार), पुण्यातला कांकरीया (मारवाडी), रत्नागिरीतले तलाठी काका (गुज्जू) असे अनेक लोक पाह्यलेत जे उत्तम मराठी बोलतात. काही जणांच्या संपूर्ण कुटुंबामधे मराठी वाचनाचं वेड आहे.
कुठली समीकरणं काढणार?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
2 Mar 2009 - 1:17 am | सुक्या
नाही हो . . असे मुळीच नाही. मी बहुतेक काळ महाराष्ट्राच्या बाहेर राहीलो आहे. तुम्हाला भेटलेला नमुना एखदा दुसराच असतो. तुमचा बहुतेक पहीलाच अनुभव म्हणुन तुम्हाला वाईट वाटले असेल परंतु आपण बाहेर गेल्यावर जसे मराठी बोलण्यासाठी आसुसलेले असतो तसे इतरही लोक असतात. त्यांनाही मराठी बोललं की बरं वाटतं. एका अनुभवावरुन सरसकट निर्णय घेणे योग्य नाही.
तुम्हाला जे महोदय भेटले तसे पुण्यातही भेटतात. इतके वाईट वाटुन घेउ नका. पण वरती सांगीतलेल्या प्रमाणे आपण हटायचे नाही.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
2 Mar 2009 - 1:44 am | शोनू
किती मराठी माणसं घरात अन घराबाहेर कटाक्षाने मराठी बोलतात ? भाजीवालीशी, बँकेत, पोस्टात, मुलांच्या शाळेत, ब्युटी पार्लर मधे, सगळी कडे हिंदी किंवा इंग्रजीतच संभाषण चालतं.
मुंबैच्या एअरपोर्टवर उतरल्यापासून मी सगळ्यांशी मराठीत बोलत असते अन समोरचे/ माझ्या बरोबरीचे मी मराठीतच बोलते म्हणून वैतागलेले /लाजलेले असतात.
2 Mar 2009 - 2:09 am | वजीर
भाजीवालीशी, बँकेत, पोस्टात, मुलांच्या शाळेत, ब्युटी पार्लर मधे, सगळी कडे हिंदी किंवा इंग्रजीतच संभाषण चालतं.
भाषा ही मानवाने संवाद घडावा आणि काम उरकले जावे ह्यासाठी निर्मिलेली आहे. आपले जे काम आहे ते झाले म्हणजे बस! कोणती भाषा वापरली ह्याने काय फरक पडतो?
वजीर
2 Mar 2009 - 12:22 pm | रम्या
"स्वभिमान", "स्वभाषाभिमान" नावाची काही गोष्ट असते. तो विकला कि मायबोलीच काय मायबापाचंही काही काम राहत नाही. कांम काय होतच राहणार.
आम्ही येथे पडीक असतो!
2 Mar 2009 - 2:34 pm | अमृतांजन
वजीर भाउ, खरे आहे तुमचे. मग मराठीसोडून इतर भाषांमधेच का संवाद साधायचा ? थोडे तोंडी लावण्यापुरते तरी मराठी बोला अशी अपेक्षा फार चुकीची आहे असे मला वाटत नाही.
2 Mar 2009 - 8:23 am | मराठी_माणूस
भाषा ही मानवाने संवाद घडावा आणि काम उरकले जावे ह्यासाठी निर्मिलेली आहे. आपले जे काम आहे ते झाले म्हणजे बस! कोणती भाषा वापरली ह्याने काय फरक पडतो?
स्वातंत्र्याची काय गरज होति , ब्रिटीश राज असते तरी काय फरक पडला असता
2 Mar 2009 - 10:27 am | केदार_जपान
आज बाहेर जरी आपण कुठलीहि भाषा बोलत असलो, तरी जर एखाद्याच्या घरी मराठी ही तितक्याच आवडीने बोलली जात असेल तर तो माणुस इतरवेळी सुद्दा चांगले मराठी बोलेल आणी त्याला त्यात काहिहि कमी पणा वाटणार नाही...पण आजकाल आई-वडिल आणी पालक लोक...घरिच ईंग्रजी बोलतात..जरी लहान मूल मराठी बोलत असले तरी त्याला ईंग्रजी बोलायाला भाग पाडतात... :(
यामुळेच मग नकळत त्यांच्या मना मधे मराठी बद्दल अनास्था निर्माण होते...
माझा एक मित्र कि ज्याचे सगळे आयुष्य इंदौर मधे गेले....तेथे जरी मराठे लोक असले तरी बाहेर सगळीकडे हिन्दी च बोलतात..
पण त्याचे मराठी खूप छान आहे...मी त्याला विचारल्यावर तो मला म्हणाला..कि आमच्या घरी सक्तीने सगळे जण मराठीतुनच बोलतात..त्यामुळे मला त्याची सवय लागली आणी मला आता त्याचा अभिमान वाटतो...तो म्हणाला..कि हे सर्वस्वी पालकांवर अवलंबून आहे...जरी एखादे मूल पुण्यात वाढले तरी घरी त्याला काय शिकवणुक मिळते या वर सर्व अवलंबून आहे..
------------------------
केदार जोशी
2 Mar 2009 - 11:20 am | मराठी_माणूस
मराठी लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर गेलं कि मराठी बोलायची लाज वाटते
हे तीतकेसे खरे नाही, त्यांना महाराष्ट्रात पण वाटते
2 Mar 2009 - 12:13 pm | भोचक
प्रिय मराठमोळे,
महाराष्ट्राबाहेर मराठी लोक मराठीत बोलत नाही या आपल्या निष्कर्षाला ठोस काहीही आधार दिसत नाही. बंगलोरबाहेरही आपल्याला असे अनुभव आले असतील तर ते स्पष्टपणे मांडा. पण याचा अर्थ ते सरसकट विधान होऊ शकत नाही. इथे इंदूरमध्ये ज्यांचा मराठीचा मातृभाषेव्यतिरिक्त म्हणून काहीही संबंध आलेला नाही, अशी मंडळी छान मराठी बोलतात. मराठी लोक एकत्र आले तर आवर्जून मराठी बोलली जाते. एरवी व्यवहारात मराठी कानावर पडण्याची फारशी शक्यता नसतानाही ही मंडळी मराठी बोलतात याचेच कौतुक वाटते. बरं हे इंदूरमध्येच नाही. धार, देवास, उज्जैन, खरगोन, बर्हाणपूर, खांडवा, ग्वाल्हेर अशा मध्य प्रदेशातील, जिथे मराठी लोक रहातात तिथे हेच दृश्य दिसेल. अनेकांकडे शेजारी-पाजारी, वातावरण मराठी नसतानाही ही मंडळी (भलेही हिंदी शब्द घुसडून) मराठी बोलत असतील तर ती कौतुकाचीच बाब आहे. महाराष्ट्रातून कैक वर्षापूर्वी स्थलांतरीत होऊनही या मंडळींनी मराठी टिकवली आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. 'प्रत्येक मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीत बोलावे.' असे आवर्जून सांगितले जाते. त्यामुळे आपण केलेल्या विधानात काहीही अर्थ नाही.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
2 Mar 2009 - 2:08 pm | ऍडीजोशी (not verified)
आमच्या ढोसरीला या एकदा. अथवा महाराष्ट्र मंडळात या. कल्ला सुरु असतो. काय बिशाद तुम्हाला बँगलोर मधे असल्यासारखे वाटेल.
बँगलोर मधे भरपूर मराठी लोकं आहेत. काही दळभद्री मराठी लोक मलाही भेटले इथे ज्यांच्या कपाळावर मराठी म्हटलं की आठी उमटते. अशांना फाट्यावर मारून जे आनंदाने बोलतात त्यांच्याशी मराठीतच बोलतो. कुणा मराठी माणसाला मराठीत बोलायचं नसेल तर तो त्याचा प्रश्न आहे. पण मग मी पण त्याच्याशी दुसर्या कोणत्याही भाषेत बोलत नाही.
2 Mar 2009 - 3:08 pm | मराठमोळा
मित्रानो,
काही जणानी अमराठी लोकाबद्दल उदाहरणे दिली. मला राज ठाकरेंचा मुद्दा उचलायचा नाहीच मुळी!!
माझा प्रश्न साधा आणी सोपा आहे.
असा काय न्यूनगंड आहे कि काही (मी सर्वांबद्दल बोलत नाहीये) मराठी लोकाना बाहेर मराठीत बोलायला लाज वाटावी?
हा प्रकार मी दुसर्या कोणत्याही राज्यातील लोकाबाबत पाहिलेला नाही. कितीही वर्ष ती लोकं महाराष्ट्रात रहिली तरी मायबोलीलाच महत्व देतात. आपण का नाही? आपण खुप सहजासजी दुसरी भाषा बोलायला तयार होतो (यात काही गैर नाही, आनंदाची गोष्ट आहे. लोकमान्य टिळक सुद्धा अस्खलित इंग्रजी बोलायचे, दुसर्या भाषीवर प्रभुत्व मिळवणे खुप आनंदाची बाब आहे) पण मायबोली सहजासजी कशी विसरू किंवा नाकारु शकतो?
आणी हा लेख मी एका अनुभवावरुन लिहिलेला नाही याची नोंद घ्यावी. वेळेअभावी जास्त लिखाण करु शकलो नाही.
आपला प्रामाणिक,
मराठमोळा..
2 Mar 2009 - 3:26 pm | मराठी_माणूस
तुमच्या निरिक्षणात काहीही चुक नाही. ही वस्तुस्थीती आहे.
हा एक प्रकारचा न्युनगंड आहे. अशा लोकांनी अंतर्मुख होउन विचार केला पाहीजे. ही भाषा ही आपली ओळख आहे. जसे आई वडील तशी मातृभाषा. तीचा दुस्वास हा आई वडीलांचा केल्या सारखा आहे.
बाकी ज्याची त्याची मर्जी. पण आपली ओळख विसराल तर अवस्था "दोन्ही घरचा पाहुणा उपाशी " अशी होइल.
2 Mar 2009 - 3:33 pm | समीरसूर
माझ्या पाहण्यात असे बरेच मराठी नग आहेत ज्यांना मराठी नीट येत नाही; मराठी नीट येत नसल्याचा रास्त अभिमान आहे; आणि मराठी चार-चौघात बोलणे म्हणजे शेण खाण्याहूनही वाईट असे वाटते. आणि या महाभागांना एकूणच मराठी संस्कृतीविषयी शून्य आस्था आणि ज्ञान असते. माझ्या ऑफीसात ३-४ मराठी टाळकी अशी होती/आहेत की जे नेहमी हिंदीमध्ये बोलत असत/बोलतात. एकदा त्यांच्यापैकी एकासोबत मला बंगळूरला जाण्याचा प्रसंग आला. आडनाव अस्सल मराठी! ऑफीसातून निघून अगदी बंगळूरला पोहोचेपर्यंत हा नग माझ्याशी कायम हिंदीत बोलत होता. मला इतकं विचित्र वाटत होतं की विचारू नका. मी शक्यतो मराठीतूनच बोलत होतो परंतु हा पठ्ठ्या काही मराठीत बोलत नव्हता. "पांडुरंग कांती...", "अवचिता परिमळू..." ही आणि अशी बरीच मराठी गाणी या व्यक्तीच्या आवडीची होती आणि विमानात बसल्यावर आम्ही संत ज्ञानेश्वर, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या गांण्याविषयी बरच काही बोललो....पण सगळं हिंदीमध्ये! म्हणजे तो सगळं हिंदीमध्ये आणि मी मराठीमध्ये!
आताही एक अस्सल मराठी मुलगी माझ्या विभागात आहे. ती हिंदीमध्येच बोलते. तिला सोमवारी विचारलं "काय, काय केलं शनिवारी-रविवारी?" ही हमखास हिंदीत उत्तर देते, "कुछ खास नही...ऐसेही मुव्ही देखा, डिनर के लिए गये थे...कल बहुत थक गये थे तो दिनभर आराम किया..." आता अशी उत्तरे मिळाल्यावर काय करणार. माझं असं एक निरीक्षण आहे की सहसा मुंबईमध्ये जन्मलेली, वाढलेली, शिकलेली मुले हिंदीमध्ये बोलणं पसंत करतात. माझ्यासोबत ३-४ मुळचे मुंबईचे असणारे माझे सहकारी होते आणि त्यांना मराठीचं ज्ञान अगदीच नगण्य होतं. कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली मुले सहसा या कॅटेगरीत मोडतात. एकदा एका नाशिकच्या मुलीशी बोलतांना मी 'तो खजील झाला' असे वाक्य म्हणले. ती मुलगी (मराठीच) खोखो हसत सुटली. तिला 'खजील 'हा शब्दच माहित नव्हता. सुरेश भट, मंगेश पाडगावकर, ना. धो. महानोर, विठ्ठल वाघ, शांता शेळके ही व अशी मराठी दिग्गज नावे यांना अजिबात माहित नसतात (वामन चोरघडे, रमेश तेंडुलकर, शि. म. परांजपे, वि. का. राजवाडे, दादा धर्माधिकारी, रमेश मंत्री, जयवंत दळवी, रवींद्र पिंगे, सुभाष भेंडे ही नावे सांगीतली तर बहुधा ही मंडळी भोवळ येऊन पडतील. मला ही नावें माहित आहेत, यांच्या साहित्यकृती थोड्याफार वाचल्या आहेत कारण आम्हाला शाळेत-कॉलेजात यांच्या पुस्तकातले धडे होते; ते मी खूप चवीने वाचले होते आणि त्यातूनच वाचनाची आवड निर्माण झाली होती.) पु.ल. देशपांडे फक्त नावाने माहित असतात. माझ्या एका मुंबईकर सहकार्याला मी पु .ल. माहित आहेत का असे विचारले. त्याने "वो मराठी ऑथर ना? कॉमेडी लिखते थे?" असं म्हणाला आणि हे माहित नसल्याची शरम सुदैवाने त्याच्या चेहर्यावर मला दिसली. असे सहसा होत नाही. असे विचारतांना अजिबात शरम दिसून येत नाही. दिसून येतो तो "आय केअर अ डॅम" हा माज! आणि दिसून येतो तो 'कसल्या गावठी गोष्टी माहित आहेत या खेडूताला' असा संतापजनक भाव!
एकदा मी पुण्यात खूप वर्षांपूर्वी एका जाहिरात एजन्सीत मराठी कॉपीरायटर पदाची मुलाखत द्यायला गेलो होतो. तिथल्या बाईंनी मला परीक्षा म्हणून एका बांधकाम कंपनीच्या नवीन गृहसंकुलाची जाहिरात लिहायला सांगीतले. त्यात तिला काय अपेक्षित होते हे ही समजावून सांगीतले. आणि हे सगळं संभाषण इंग्रजीमधून झाले!! आता बोला.
शिकागोमध्ये एका मित्रासोबत फिरत असतांना एका माणसाने आम्हाला थांबवले. "आर यु मराठी?" असे अतिइंग्रजाळलेल्या उच्चारात आम्हाला विचारले. आम्ही हो म्हटले. माझा मित्र पुण्याजवळच्या यवतचा, आणि मी पुण्याचा आणि तसा अगदी खास जळगांवचा! त्याने आम्हाला 'ह्यॅ जॅक्सन ऍव्हेन्यु कुठ्ठॅ आहे ?' असे अगदी इंग्रजी थाटात विचारले. 'मी पण मराठी आहे बट सेटल्ड इन फ्लोरीडा..." असे सांगून काहीतरी विचित्र अविर्भावात तो माणूस निघून गेला. गुजराती, शीख, दाक्षिणात्य माणसे कुठे ही शिकली, वाढली आणि स्थायिक झाली तरी त्यांची भाषा, संस्कार, उच्चार, संस्कृती सोडत नाहीत. दुर्दैवाने मराठी लोकांमध्ये ही भावना अभावाने आढळते. माझ्या तिथल्या कंपनीत मला एक चेन्नैचा माणूस भेटला. १२ वर्षे तो शिकागोमध्ये राहत होता. मी पुण्याचा आहे हे कळल्यावर तो मला "काय, कसं काय चाललयं" असं नेहमी विचारायचा आणि भेटल्यावर त्याने वालचंदनगरमध्ये घालवलेली ५-६ वर्षे आणि पुण्यात सुटीच्या दिवशी केलेली धमाल याविषयी बोलत बसायचा. आणि मग भारतात परत यायचयं हे ठासून सांगायचा.
शिकागोमध्येच मी जेंव्हा घर शोधत होतो तेंव्हा नागपूरच्या एका देशपांडे आडनावच्या गृहस्थाचा संदर्भ मिळाला. मी त्यांना फोन केला आणि सांगीतले की मला घराची आवश्यकता आहे. आश्चर्य म्हणजे हा सद्गृहस्थ माझ्याशी एकदाही मराठीत बोलला नाही. मी मराठीत आणि तो इंग्रजीत असा आमचा २-३ वेळा संवाद झाला. अमेरीकेत येऊन त्यांना जेमतेम १ वर्ष झालं होतं. आणि बोलतांना पण "काय मराठी आहेत म्हणून मानगुटीवर बसतात बुआ ही लोचट माणसं!!" असे भाव त्यांच्या बोलण्यात असायचे. अशा लोकांना सह्याद्रीवरून खाली फेकून दिले पाहिजे.
--समीर
2 Mar 2009 - 10:15 pm | केदार
अशा लोकांना सह्याद्रीवरून खाली फेकून दिले पाहिजे. :))
मुळ लेखापेक्षा तुमचा प्रतिसाद जास्त व्यवस्तिथ आहे, पण मुळ लेखकाच्या भावना पोचत आहेत. जनरलाईज करुन काहीच उपयोग नाही. आपण मराठीची कास सोडू नये.
आणि ह्यापेक्षा पुढचे लोक म्हणजे जे घरी आपल्याच मुलांशी इंग्रजीत बोलतात ते.
वर आणखी एका केदार जोशीने जे म्हणले आहे तेच जास्त योग्य वाटते, घरात इंग्रजीचा चकार (चुकार :) ) शब्द येता कामा नये, मग निदान आपण मराठी बोलतो म्हणजे घाटी झालो ही भावना आपल्या बालबच्यांत तर येणार नाही.
माझी मुलगी साधारण ७ वर्षांची आहे व इथे नेहमी अनेक मराठी नामवंत साहित्यीक, कलाकारांच्या भेटी नित्य होतात, ती लोक पण जाम आश्चर्य व्यक्त करतात की तुमची मुलगी मराठीच बोलते का? अरेच्चा, अरे मी मराठी, तर मुलंही मराठीच की. म्हणजे देशातुन आलेल्या कलाकार लोकांनापण येथील काही मुलं मराठी बोलतात ह्याचे आश्चर्य वाटते. सांगायचा मुद्दा हा की त्यांनी ठरवूनच घेतलेले असते की ही इकडे राहिलं म्हणजे विंग्रजीतूनच बोलतात. माझ्या एका आप्तांनी (त्यांना त्याच वयाची नात आहे) तर माझी विकेटच काढली होती, म्हणाले अहो जोशी, काय तुम्ही, तुमची मुलगी आमच्याकडे येऊन आमच्या नातीशी मराठीत बोलत होती. काय इंग्रजी अजुन पुर्ण शिकली नाही की काय? न्युनगंड हो फक्त न्युनगंड.
एक गोष्ट नमुद करावी वाटते, मराठी संस्थळावर ओळख झाल्यावरही काही लोक (जी मराठीत लिहत असतात, आणी त्यांची ओळख त्यामूळेच झाली), ती पहिलेंदा फोनवर इंग्लीशमध्येच बोलली. (एक दोनच. अगदी अपवाद, बाकी सर्व मराठीच) पण असे होते मात्र. कदाचित सवयीचा भाग म्हणून.
जनरलाईज करुन काही फायदा नाही. तो बोलून गेला, आपण राग राग करुन काय फायदा? उपाय एकच मराठी माणसाला मराठीतच बोलत राहने. (तो इंग्रजी बोलत असेल तरी)
2 Mar 2009 - 11:23 pm | सुक्या
समीर.. आपला प्रतिसाद आवडला. मराठी येत असताना मराठी न बोलणारे, मराठी वाक्यात जाणूनबुजून इंग्रजी किंवा तत्सम इतर भाषेतले शब्द घालणारे, मराठी असल्याचा प्रचंड न्यूनगंड असणारे लोक हे कमालीचे मूर्ख आणि कर्मदरिद्री असतात. मराठी बोलल्यावर वजन / छाप पडत नाही असेही हे लोक म्हणतात. असल्या लोकांकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणे हाच एक चांगला उपाय आहे. जाता जाता त्याला 'तुला मराठी असून मराठी बोलता येत नाही? ' असा खोचक प्रश्न चार चोघात विचारावा. मी तरी असल्या लोकांचा जाहीर पाणउतारा करायला मागेपुढे पाहत नाही. मुलगा हॅरी पॉटर वाचतो हे असले लोक मोठ्या अभिमानाने सांगतात. पु. ल. वाचन म्हणजे काहीच्या काही वगेरे वगैरे..
असे लोक असले तरी मराठी चा रास्त अभिमान असणारे बरेच लोक मी पाहिले आहेत. एका दुकाना काही खरेदी करत असताना मला माझ्या पत्नीशी मराठी बोलताना पाहून एक जोडपे आमच्याकडे आले. 'मराठी का? ' म्हणून विचारले. दोघेही एका प्रसिद्ध मेडिकल महाविद्यालयात प्राध्यापक. १०/१२ वर्षे अमेरिकेत. हा माणूस माझ्याशी इतकं भरभरून बोलला की मला आश्चर्य वाटले. मराठी मंडळ, गणेशउत्सव, हळदीकुंकू या बाबत तो खूप खूप बोलला. त्याच्या घरी एकदा गेलो तर घरात अगदी मराठी वातावरण. शिवाजी महाराजांचा फोटो दिवाणखान्यात, मुलगा ही घरी अस्सलिखित मराठी बोलत होता. थोडक्यात सांगायचे तर वर्षानुवर्षे मराठीपासून दूर राहून मराठीपण जपणारे लोकही आहेत आणि २/४ महिन्यात इंग्रजी / हिंदी ची हळद लागली की मराठी विसरणारे हि लोक आहेत.
अशा अस्सल मराठी लोकांचा आदर्श ठेवावा, हळदराव भेटले की त्यांना एकतर फाट्यावर मारावे किंवा 'गेला उडत' म्हणून *डी वर लाथ मारावी.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
2 Mar 2009 - 5:36 pm | केळ्या
माझ्या कॉलेजमध्ये एक सरदार मित्र अतिशय छान मराठी बोलायचा.त्याला गुजराथी,हिंदी,पंजाबी,बंगाली याही भाषा तितक्याच उत्तम अवगत होत्या.
त्याची परी़क्षा घेण्यासाठी "एका लहान मुलाशी कसे बोलशील?' असे विचारले.त्या पठ्ठ्याने 'अले-अले,कशा सोना,काय कलतो तू "इ.इ.बोलून माझी दांडी गुल केलि होती.
2 Mar 2009 - 6:35 pm | मराठमोळा
मुंबईमध्ये जन्मलेली, वाढलेली, शिकलेली मुले हिंदीमध्ये बोलणं पसंत करतात.
सहमत. पुर्णपणे सहमत.
माझे सुद्धा बरेच मित्र मराठी बोलतात तेव्हा एखादी नविन भाषा उदयास आली आहे असे वाटते.
एकदा तर चक्क एक मुंबईकर मित्र रात्रीच्या जेवणानंतर मराठी बोलण्याच्या उत्साहात "मी शिघ्रपतन करायला चाललो आहे" असे म्हणाला. (त्याला "शतपावली" म्हणायचे होते).
मुंबई मधे मराठी ची जी अधोगती चालली आहे ती काही पटत नाही बुवा आपल्याला..
आपला,
पुणेकर मराठमोळा..
2 Mar 2009 - 10:56 pm | भडकमकर मास्तर
मराठी बोलण्याच्या उत्साहात "मी शिघ्रपतन करायला चाललो आहे" असे
अगायायाया... =)) =)) झकास प्रसंग आहे....
अर्थ सांगितला का मित्राला मग?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
2 Mar 2009 - 11:16 pm | चतुरंग
मराठी बोलण्याच्या उत्साहात "मी शिघ्रपतन करायला चाललो आहे" असे म्हणाला. (त्याला "शतपावली" म्हणायचे होते).
स्खलित मराठी ऐकून आजूबाजूच्या लोकांची बोबडीच वळली असेल!! :O :T =)) =)) =)) =))
चतुरंग
3 Mar 2009 - 5:05 am | llपुण्याचे पेशवेll
हाहाहा... स्खलित काय शीघ्रपतन काय. मजा आहे बुवा आपल्या मराठी भाषेची.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
2 Mar 2009 - 9:17 pm | विकास
या चर्चेत आणि एकंदरीत मिपासदस्यांमधे महाराष्ट्राबाहेर (भारतात आणि भारताबाहेर) रहाणारे मराठी किती लिहीत आहेत या वरून पण जर काही सर्वेक्षण केले (महाराष्ट्रातील मराठींची संख्या आणि महाराष्ट्राबाहेरील मराठींची संख्या) तर कुठे जास्त मराठी लिहीणारे दिसतील? जे लिहीतात ते बोलायला लाजत असतील असे वाटत नाही...
3 Mar 2009 - 4:08 am | रामपुरी
इथेच (मिपावरच) असे काही लोक आहेत जे आपल्या मुलांशी इंग्रजी भाषेत संवाद साधतात. मुलांशी मराठीत बोलायला लाज का वाटावी कळत नाही. असो.. ज्याचा त्याचा प्रश्न
2 Mar 2009 - 11:33 pm | आनंद घारे
बोलतांना संवाद साधणे सर्वात जास्त महत्वाचे असते. भाषा हे फक्त एक माध्यम असते. बोलण्यातील आशय महत्वाचा असतो.
वाचणार्याला कदाचित खोटे वाटेल, पण मी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षापर्यंत वर लिहिलेली तीन शुद्ध मराठी वाक्ये कदाचित सलगपणे बोलू किंवा लिहू शकलो नसतो. आज मी फक्त मराठीमध्येच रोज पाने भरून मजकूर लिहितो. मला पूर्वीसुद्धा कधीही त्या गोष्टीचा अभिमान किंवा लाज वाटली नव्हती आणि आजसुद्धा त्याचा अभिमान किंवा लाज वाटत नाही . आपण जसे वागतो त्यामागे असंख्य कारणे असतात. त्यातली अभिमान किंवा लाज ही सर्वात गौण असतात.
श्रीनगर, कन्याकुमारी, गांतोक, एवढेच नव्हे तर लीड्स,टोरंटो, व्हिएन्ना आणि अल्फारेट्टा या जागी मराठी भाषेत गप्पा मारणारी अनोळखी माणसे मला भेटली आहेत तसेच मराठी आडनावाची पण मराठीचा गंध नसलेली माणसेसुद्धा मुंबईत भेटली आहेत. कधी कधी आपली समजूत चुकीची असू शकते, उदाहरणार्थ अनुपम किंवा कैलास खेर, कृष्णचंद्र पंत हे मराठीभाषिक नाहीतच. तेंव्हा एकाद्याचे बोलणे ऐकून तो चुकीचेच वागतो आहे असा ग्रह करून घेण्यापेक्षा तो तसे का वागतो आहे हे समजून घेणे शहाणपणाचे ठरेल.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
3 Mar 2009 - 5:10 am | llपुण्याचे पेशवेll
भाषा हे एक माध्यम आहे. बोललेले कळते आहे ना मग विशिष्ठ भाषेचा आग्रह कशाला असे म्हणणे ही एक पळवाट आहे. १-२ वर्षे जर्मनीत राहून जर बर्यापैकी जर्मन भाषा शिकू शकत असतील तर ५ वर्षे महाराष्ट्रात राहूनही मराठीचा गंध नसणे हा शुद्ध पलायन वाद आहे. त्याचे समर्थन होऊच शकत नाही.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
3 Mar 2009 - 8:10 am | सुक्या
+१ असेच म्हणतो . .
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
3 Mar 2009 - 10:07 am | आनंद घारे
प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक कारण असते. ती गोष्ट न घडण्यासाठी कारणाची गरज नसते. जे लोक जर्मन भाषा शिकले असतील त्यामागे कांही कारण नक्की असेल. जर्मनी, फ्रान्स, इटली, वगैरे सोळा देशांचे भ्रमण आम्ही करून आलो . आमच्या ग्रुपमधल्या एकाही माणसाला तिथल्या एकाही भाषेतला एकही शब्द समजत नव्हता. त्याची गरजही पडली नाही.
महाराष्ट्रात राहूनही मराठीचा गंध नसणे हा शुद्ध पलायन वाद आहे. त्याचे समर्थन होऊच शकत नाही.
पलायनाचे समर्थन कां होऊ शकत नाही? किती तरी पलायने इतिहासात प्रसिद्ध झालेली आहेत.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
3 Mar 2009 - 10:57 am | समीरसूर
पलायनाचे समर्थन तेव्हाच होऊ शकते जेव्हा अगदी जीवावर बेतते. कालच्या 'सकाळ'च्या 'मुक्तपीठ' पुरवणीमध्ये एका म्हातार्या आईला मुलाने आणि सुनेने कसे घराबाहेर काढले आणि ती एका विहिरीजवळ लोकांनी दिलेल्या अन्नावर जगत असतांना आणि आजारी पडल्यावर मरणासन्न अवस्थेत असतांना तिच्या मुलाने आणि सुनेने कसे हात झटकले याचे वर्णन आले आहे. हा ही एक पलायनाचाच मार्ग झाला. आपल्या कर्तव्यांपासून आणि आपल्यासोबतच इतरांचेही जीवन थोडेफार सुसह्य करण्याच्या भावनेपासून पलायन करणे कधीच समर्थनीय असू शकत नाही. पलायन ही भावनाच मुळी सोयीच्या आणि स्वार्थाच्या भावनेतून निर्माण झाली आहे. प्रत्येक व्यक्ती स्वार्थी असते, किंबहुना स्वार्थावरच जग चालते आणि माणसाने स्वार्थी असणे यात काहीच गैर नाही. पण म्हणून प्रत्येक बाबतीत स्वार्थ आडवा आणून आणि फक्त स्वकेंद्रित विचार करून माणूस जगायला लागला तर जगात अनगोंदी माजेल. नात्यांना अर्थ उरणार नाही आणि जग एका जीवघेण्या स्पर्धेचे मैदान बनून जाईल. पलायनाची कितीही उदाहरणे इतिहासात असली तरी त्यातून पलायन करणे शहाणपणाचे असते असा निष्कर्ष काढणे म्हणजे दाऊद इब्राहीमने जे केले ते बरोबर आहे असे म्हणण्यासारखे होईल.
मराठी बोलता/लिहिता/वाचता येणे ही मराठी लोकांसाठी आभिमानाची गोष्ट नसायलाच हवी. ते तितकेच नैसर्गिक आहे किंवा असावे जितके की मानवाचे मूल हळू-हळू रांगायला आणि मग चालायला लागते. मराठी न येणे यालादेखील बरीच कारणे असतात. मराठी न येणे हा देखील महत्वाचा मुद्दा नाही. पण मराठी येत असून, समोरचा माणूस अस्खलित मराठी बोलत असून मराठीत संभाषण करण्याची लाज वाटणे हा संतापजनक प्रकार आहे. मराठी बोलण्याची लाज वाटणे, मराठी साहित्याविषयी, सिनेमाविषयी, नाटकांविषयी बोलण्याची/ज्ञान असण्याची लाज वाटणे, अमराठी लोकांमध्ये मराठीतल्या अप्रतिम साहित्यकृतींवर बोलायला लाजणे हा न्यूनगंड मात्र निश्चितच संतापजनक आहे. याचे समर्थनच होऊ शकत नाही. हिंदी/इंग्रजी मधले काहीही चालेल पण मराठीतले काहीच नको ही प्रवृत्ती खेदजनक आहे. आणि मराठी न येणार्या मराठी लोकांनी आपली मातृभाषा म्हणून मराठी शिकायलाच हवी. कुठलाच दाक्षिणात्य, बंगाली, गुजराती असा आढळणार नाही ज्याला आपली मातृभाषा येत नाही आणि तो त्यातल्या साहित्याचा तिरस्कार करतो. अगदी जगाच्या पाठीवरचा कुठलाही गुजराती हा घरी गुजरातीच बोलतो. मी शिकागोमध्ये असतांना माझ्या ऑफीसात कुश शहा नावाचा २५ वर्षे अमेरीकेत काढलेला, शिकलेला तरुण होता. त्याचे इंग्रजी बोलणे अगदी अमेरीकन लोकांसारखेच होते. पण फोनवर मात्र हा अस्खलित गुजराती बोलायचा. मराठी लोकांमध्ये दुर्दैवाने अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची माजोरी खूप जास्त प्रमाणात दिसून येते. हा न्यूनगंड खूप घातक आहे.
--समीर