फलज्योतिषाच्या मर्यादा

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in काथ्याकूट
23 Feb 2009 - 3:17 pm
गाभा: 

सध्या प्रकाश घाटपांडे यांची पत्रिका आणि विवाहेच्छू या विषयावरची मालिका चालू आहे. त्यात प्रामुख्याने ज्योतिषशास्त्राच्या मूळच्या फोलपणाविषयी विवेचन आहे.
मी एका वेगळ्या दृष्टीने ज्योतिषविषयक विचार मांडले आहेत.
आधुनिक विद्येने विभूषित असलेले (पण जुन्या परंपरांविषयी प्रेम सुटत नाही असे) अनेक लोक ज्योतिषाचे गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताच्या आधारे समर्थन करू इच्छितात किंवा पत्रिका म्हणजे जनुकीय नकाशा असे गृहीतक मांडतात. प्रस्तुत लेखात मी हे मत 'तात्पुरते' मान्य करीत आहे आणि त्या गृहीतकातून काय निष्कर्ष निघतात ते मांडणार आहे.
"जन्मवेळी आकाशात असणार्‍या ग्रह तार्‍यांच्या स्थितीसापेक्ष गुरुत्वाकर्षणाचा त्या बालकावर परिणाम होतो व त्यामुळे त्याचात जे जनुकीय बदल होतात त्यानंतर स्थिर झालेल्या जनुकीय रचनेचे स्थिरचित्र पत्रिकेत उमटते" हे आपले गृहीतक आहे.
या गृहीतकातच अनेक अंतर्विरोध आहेत. (जन्मवेळ म्हणजे कोणती वेळ; गुरुत्वाकर्षणाचा परिणाम फक्त एकदाच का होतो वगैरे). परंतु मी हे गृहीतक खरे आहे असे "तात्पुरते" मान्य करीत आहे.
एकदा हे मान्य केले म्हणजे जनुकीय रचनेवर आयुष्यातील ज्या गोष्टी अवलंबून असतात, त्यांचे भाकीत* (मोठ्या प्रमाणात डेटा गोळा केल्यावर त्यातून काही संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढल्यावर) करता येईल.
(भाकीत = Prediction)
अशा गोष्टी कोणत्या?
१. त्या व्यक्तीची शारिरिक ठेवण, उंची, स्थूलता
२. बौद्धिक क्षमता (म्हणजे मतिमंद आह की सामान्य)
३. रोगप्रतिकारशक्ती (शरिराबाहेरील जंतूंपासून होणार्‍या रोगांविरुद्ध)
४. संतती निर्माण करण्याची लैंगिक क्षमता
५. काही प्रमाणात स्वभाववैशिष्ट्ये (तापट, सौम्य)
६. इतर शारिरिक विकार होण्याची शक्यता (ससेप्टिबिलिटी) इत्यादि.

याव्यतिरिक्त स्वतःच्या जनुकीय रचनेवर अवलंबून नसणारी कोणतीही भाकिते पत्रिका पाहून सांगता येणार नाहीत.
अशी भाकिते कोणती जी करता येणार नाहीत पण ज्योतिषी ती सर्रास करीत असतात?

  • शिक्षण: बुद्धिमत्ता आणि शिक्षण यांचा अप्रत्यक्ष संबंध असला तरी बुद्धिमत्ता असणार्‍याचे शिक्षण इतर सामाजिक घटकांवर अवलंबून असते. त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे व्यक्ती कोणत्या घरात जन्मली आहे हा. या घटकाचा पत्रिकेत संबंधच नसतो कारण पत्रिका तर त्या विशिष्ट घरात जन्मल्यानंतर बनते. बाकीचेही काही घटक असतात. जसे हवे असलेले शिक्षण जवळ उपलब्ध आहे की दूर? दूर असेल तर तेथे जाऊन शिक्षण घेणे परवडू शकते का? कदाचित ज्याची आवड आहे ते शिक्षण उपलब्धच नसेल तर? (फार पूर्वी आय सी एस ची परीक्षा इंग्लंडला जावून द्यावी लागे. एखादा विद्यार्थी हुशार असला तरी त्याला परीक्षाच देणे शक्य नसे).
  • वैधव्ययोग: स्त्रीला वैधव्य येणे हे प्रस्तावित नवर्‍यामुलाच्या पत्रिकेतून कळायला हवे. ते मुलीच्या स्वतःच्या पत्रिकेतून कसे काय कळते ब्बॉ. (प्रस्तावित मुलीची पत्रिका पाहून ज्योतिषी मलाकडच्यांना हे सांगतात). विधुरयोगाविषयी माहीत नाही.
  • संततीसुख: खरे तर हा खूप गहन विषय असावा. पण ज्योतिषी बहुधा याचा मुले होणे एवढाच अर्थ समजत असावेत. त्यानुसार मुले होणार म्हणजे संततिसुख आहे असे सांगतात. पण मुले होणे हेही पुन्हा दोघांच्या पत्रिकेतून कळायला हवे. पण ज्योतिषी एकाच व्यक्तीची पत्रिका पाहून हे सांगतात.
  • अवांतरः मला स्वतःला सहापेक्षा जास्त मुले होतील हे माझी पत्रिका पाहून एका ज्योतिष्यांनी माझ्या बालपणीच सांगितले होते. अतिअवांतरः मला एकच मुलगी आहे.
  • नोकरीतील घटना: नोकरी जाण्याची शक्यता, परदेशगमनाचा योग हे ही जनुकीय नकाशाशी अजिबात संबंधित नाही.
  • धनलाभ: धनप्राप्ती ही खूप गुंतागुंतीच्या सामजिक प्रक्रियेचा परिपाक असतो. आणि तो जनुकीय आराखड्यावर मुळीच अवलंबून नसतो.

या विवेचनातून असे दिसून येईल की जरी वैज्ञानिक भाषेची झूल पांघरून अंधश्रद्धांचा प्रसार करणार्‍यांचे म्हणणे मान्य केले तरी सामान्यतः ज्योतिषी ज्या विषयांचे भविष्य सांगतात ते भविष्य पत्रिकेतून कळणे शक्य नाही.

टीपः माझा ज्योतिष या विषयाचा मुळीच अभ्यास नाही. परंतु माझ्या थोड्या बुद्धीला जे वाटले ते आम्ही लिहिले.
चूभूदेघे.
ज्योतिषशास्त्र हे छद्मविज्ञान आहे हे मत मी कौलात नोंदवले आहेच. घाटपांडे यांच्याशी मी मुळापासून सहमत आहे.

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

23 Feb 2009 - 3:39 pm | प्रकाश घाटपांडे

फलज्योतिष हा विषय जनसामान्याच्या जिव्हाळ्याचा आहे. सध्या फक्त विवाह आणि फलज्योतिष हा विषय घेतला आहे. कारण बहुतेकांचा या विषयाशी संबंध विवाहाच्याच कारणाने येतो.

परंतु मी हे गृहीतक खरे आहे असे "तात्पुरते" मान्य करीत आहे.

हे मान्य करुन मग विषयाशी संवाद करणे सोयीचे जाते. या बाबत ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचे प्रो. जयंत नारळीकरांनी 13 एप्रिल २००३ मध्ये लोकसत्ता च्या लोकरंग पुरवणीत लिहिलेले परिक्षण अधिक माहिती साठी पहाता येईल.
प्रकाश घाटपांडे