जिन्हे नाझ है मराठीपे वो कहा है ?

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
19 Feb 2009 - 6:38 pm
गाभा: 

वीस वर्षापूर्वीचा एक प्रसंग आठवला.
उल्हासनगरच्या एका कॉलेजने मराठी विषय बंद करायचे ठरवले.
विद्यार्थ्यांपैकी एक मुलगा सात्वीक संतापाने नवशक्तीच्या कचेरीत गेला .बिडवईंना (मला वाटतं ते तेव्हा सहसंपादक होते.) भेटला.
दुसर्‍या दिवशी ती बातमी नवशक्तीच्या पहील्या पानावर.
त्याच दिवशी विधान सभेत लक्षवेधी सूचने द्वारा या गोष्टीची दखल घेण्यात आली.
कॉलेजच्या व्यवस्थापनाने सपशेल माफी मागून मराठी बंद होणार नाही याची ग्वाही दिली.
(अभिमानाची गोष्ट अशी की तो विद्यार्थी मिपा सदस्य आहे.)
--------------------------------------------------------------------------------------------
आता वीस वर्षानंतर
दृश्य क्रमांक .१
मदुराई कामराज विद्यापिठाचं स्टडी सेंटर मुंबादेवीत आहे. डॉ.राजी रेड्डी यांना भेटायला जायचं होतं. मुंबादेवी मंदीराच्या मागे मुंबई महानगरपालीकेच्या शाळेत दुसर्‍या मजल्यावर पोहचता पोहचता एक चमत्कारीक अनुभव आला.शाळेचे सगळे वर्ग बंद होते.तळ्मजल्यावर एक योग शिकवणार्‍या संस्थेचे ऑफीस.पहील्या मजल्यावर निवडणूक अधीकार्‍याचे ऑफीस.दुसर्‍या मजल्यावर मदुराई कामराज चे ऑफीस.बोलता बोलता रेड्डींना विचारले
"ये मराठी स्कूल आज बंद है क्या ?"
"नो. नो. मराठी स्कूल बंद हो गया बाबा इधरका."
"क्यू?"
"क्या करेगा म्युनीसीपालीटी.? मराठी सिखनेको कोई आताच नही ना आजकल."रेड्डींनी स्पष्टीकरण दिले.
मराठी शाळेचे सहा वर्ग या स्ट्डीसेंटरला महीना पाच हजार भाड्यावर मिळाले आहेत.
मुंबईत महापालीकेच्या अनेक मराठी शाळा बंद होत आहेत असंही पुढच्या चर्चेत कळलं.
मराठी सिखनेको कोई आताच नही ना आजकल."
> > --------------------------------------------------------------------------------
दृश्य क्रमांक २
संत गाडगे महाराज शाळेचा एक कारकून गाडीत भेटला.
काय म्हणते हो शाळा ?
शाळा फक्त रात्री आता. मी सकाळी हॉटेलात काम करतो.
असं का बाबा ?
अहो येते कोण मराठी शाळेत आता ?
म्हणून रात्र शाळा मराठी.
सकाळी इंग्रजी माध्यम.
अहो येते कोण मराठी शाळेत आता ?
--------------------------------------------------------------------------------------------
दृश्य क्रमांक ३
मुंबईतल्या एका शाळेत काही कामासाठी गेलो होतो.
मुख्याद्यापकाच्या कार्यालयात एका मारामारीची चर्चा.
दोन तीन शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची चर्चा.
सारांश असा.
शाळेत विद्यार्थ्यांमधे दोन तट आहेत.
इंग्रजी माध्यम/ सेमी इंग्रजी वाले एका बाजूस.मराठी माध्यमाचे विद्यार्थी दुसर्‍या बाजूस.
कंटाळलो हो मारामार्‍यांना.इथे तर भांडतात. बाहेर ट्ञुशन जातात तिथेही भांडतात.
तरी बरं दोनच वर्ग आहेत मराठी वाल्यांचे.एका शिक्षकाचे उदगार.

--------------------------------------------------------------------------------------------
दृश्य क्रमांक ४
कळव्याची एक शाळा मराठी माध्यमाचे वर्ग दर वर्षी एक असे करून बंद करत आहे.
कारण एकच.
मराठी क्लासेसला मान्यता मिळत नाहीय्ये हो.
विद्यार्थीच नाही येत ऍडमीशनसाठी.

हेच इंग्रजी माध्यम असते तर ताबडतोब मान्यता मिळाली असती.
(मुख्याध्यापकांनी माहीती दिली.)
--------------------------------------------------------------------------------------------
दृश्य क्रमांक-५
सोसायटीतल्या तिवारी नावाच्या एका मेंबराचा रात्री अचानक फोन आला.
"सर, आपकी थोडी मदत चाहीये थी"
बोलो ना क्या मदत चाहीये ? मी म्हटलं
"सर वो म्हाडा का फारम पूरा भरना है.फारमका कल लास्ट दिन है." तिवारी म्हणाले.
"तकलीफ काय है? "मी विचारलं."आप तो बिस सालसे थानेमे रहते है."
"सर ऐसा है की फारम अंग्रेजीमे है.आप तो जानते है हमारी अंग्रेजी "असं म्हणत तिवारी हसले.
लेकीन मराठीमे है ना उसमे.वो पढो और लिखो.मी सांगीतलं.
"मराठी नही आती ना हमको."तिवारीनी समस्येचं मूळ सांगीतलं .
"क्या बात है तिवारीजी ,अब बीस साल ठाणेमे रहेते हो और मराठी नही आती."मी विचारलं.
"क्या है सर ,अंग्रेजी आती नही और बंबैयेमे मराठी के बगैर काम चलता रहा .अब का करीयेगा."

तिवारीचा प्रॉब्लेम जिनाईन (त्याचाच शब्द) होता.
जिथे पोट भरत होता तिथली भाषा येण्याची गरज त्याला पडली नव्हती.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दृश्य क्रमांक ६
माझ्या एका गुजराथी मित्रासोबत मी बोलत होतो.
मग रविवारी आपण भेटायचं का ? मी त्याला विचारलं.
त्यानी बायकोकडे बघीतलं .
तिने रविवारी कोणाच्यातरी घरी सिमांत वगैरे सल्याचं सांगीतलं.
आता सिमांत म्हणजे काय ते मला कळेना .
त्याच्यावर त्या मित्रानी पोटावर हात फिरवत सांगीतलं की "तमारा घाटी भासामा सू केवाय...?"
माझा चेहेरा वाईट पडला असावा.
त्याच्या ते लक्षात आलं ."सोरी हो , मराठी बोलना चाहीये था "अशी काहीतरी लिपापोटी त्यानी केली.
डॅमेज वॉज डन.मला फार वाईट वाटलं.
माझी मातृभाषा फक्त घाटी भाषा म्हणून ओळखली जावी ? तिच्याच घरात?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एका कविसंमेलनात गेलो होतो
त्यातली एक कविता आठवते आहे. त्या कवितेत एक दुरुस्ती करतो.
त्या काळचा गोरा साहेब लई बाई बेस होता.....
आता सारे चोर झाले
साळा इकून थोर झाले
चोर कसं म्हनू त्याना
माझा भाऊ त्यात होता...
आपण सगळेच त्या माझा भाऊमध्ये येतो का .?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मराठी शाळेचं भारुड मी लिहीलं तेव्हा हेच सगळे विचार माझ्या मनात होते.जेव्हढं भारुडात लिहू शकलो तेव्हढं लिहीलं.परंतू माझ्या समोरचे प्रश्न त्यापेक्षा मोठ्या व्याप्तीचे आहेत.
१ महाराष्ट्रात मराठी लयास जात चालली आहे का ?
२ मराठीच्या वापराची आवश्यकता लोकांना जाणवत नाही का?
३ मराठीचा आग्रह कोणीच का करत नाही.?
४ जर मराठी शाळा ज्या प्रमाणात बंद पडत आहेत तशा बंद पडत राहील्या तर येणारी पिढी मराठी बोलेल की नाही.?
५ स्वत:च्या राज्यात जर ही अवस्था असेल तर बाहेरच्या राज्यात विशेषत: उत्तरेत मराठी माणसाचा उल्लेख "बुळा"म्हणून केला जातो त्यात मराठी माणसाची करणी त्याला भोवते आहे असे म्हणावे का?
६ फक्त राजकीय फायद्यासाठी मराठी मराठी असे उर बडवणार्‍या नेत्यांना मी कसे कामाला लावू शकेन?(मराठीसाठी)
७ मी इतर राज्यात राहणार्‍या इतर देशात रहाणार्‍या मराठी माणसाशी वाद घालत मराठी मुद्यापासून दूर जातो आहे का?
८ मी शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे जे मला करता येते ते करणारच आहे पण इतर क्षेत्रातल्या माझ्या मराठी भाउंना काय करावेसे वाटते.?
९ हे सगळे मी किती लवकरात लवकर करू शकेन.?
१० ह्या विषयाची चर्चा आधी कधीतरी नक्की झाली असेल तरीपण......

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

19 Feb 2009 - 6:48 pm | यशोधरा

:(

अवलिया's picture

19 Feb 2009 - 6:58 pm | अवलिया

१ महाराष्ट्रात मराठी लयास जात चालली आहे का ?
नाही ब्वा!

२ मराठीच्या वापराची आवश्यकता लोकांना जाणवत नाही का?
कोण म्हणते असे? मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे

३ मराठीचा आग्रह कोणीच का करत नाही.?
कारण आपण आग्रह धरत नाही. मी समोरासमोर बोलतो तेव्हा फक्त मराठीत बोलतो.. समोरचा कोणत्याही भाषेत बोलत असला तरी...झक मारत मराठी बोलतो समोरचा.

४ जर मराठी शाळा ज्या प्रमाणात बंद पडत आहेत तशा बंद पडत राहील्या तर येणारी पिढी मराठी बोलेल की नाही.?
काही दिवस थांबा... मंदीबाईचा फेरा समीकरण बदलुन टाकेल.

५ स्वत:च्या राज्यात जर ही अवस्था असेल तर बाहेरच्या राज्यात विशेषत: उत्तरेत मराठी माणसाचा उल्लेख "बुळा"म्हणून केला जातो त्यात मराठी माणसाची करणी त्याला भोवते आहे असे म्हणावे का?
काय संबंध? काहीही...

६ फक्त राजकीय फायद्यासाठी मराठी मराठी असे उर बडवणार्‍या नेत्यांना मी कसे कामाला लावू शकेन?(मराठीसाठी)
त्यांच्या गां*वर लाथ मारुन? आहे तयारी?

७ मी इतर राज्यात राहणार्‍या इतर देशात रहाणार्‍या मराठी माणसाशी वाद घालत मराठी मुद्यापासून दूर जातो आहे का?
अजिबात नाही.

८ मी शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे जे मला करता येते ते करणारच आहे पण इतर क्षेत्रातल्या माझ्या मराठी भाउंना काय करावेसे वाटते.?
सगळे असे स्पष्टपणे सांगता येत नसते. पण कुणी काही करतच नाही असे नाही.

९ हे सगळे मी किती लवकरात लवकर करू शकेन.?
तुम्ही करणारे कोण? परमेश्वराची (नियतीची वा शक्तीची वा जे काही असेल त्याची) जेवढी इच्छा असेल तेवढे तुम्ही कराल.
तुम्ही कोण आले सुधारणारे? तुमच्या सुधारणेने फरक पडेल ? नाही.
जमेल तेवढे करायचे....फलाची अपेक्षा न करता!!

१० ह्या विषयाची चर्चा आधी कधीतरी नक्की झाली असेल तरीपण......
असु द्या हो... मनातले विचार मांडले की तगमग कमी होते..

बाकी, मनुष्याने भाषा संवादाचे साधन म्हणुन स्विकारल्यापासुन हजारो वेगवेगळ्या भाषा जन्मास आल्या, वाढल्या, लयास गेल्या.
अजुनही जोपर्यंत पृथ्वीवर मनुष्य आहे, तो पर्यत नवनवीन भाषा बनत रहातील.
अशा परिस्थितीत, एक भाषा लयास गेली तर खेद कुठला, एक भाषा महान झाली तर आनंद कुठला?

निदान तुम्ही व मी नक्कीच फक्त मराठीत बोलु (कारण मराठी सोडुन दुस-या भाषा समजतात पण बोलताच येत नाही)

--अवलिया

रेवती's picture

19 Feb 2009 - 7:30 pm | रेवती

फारच सहमत.

रेवती

निखिलराव's picture

20 Feb 2009 - 12:05 pm | निखिलराव

हे १ नंबर....

३ मराठीचा आग्रह कोणीच का करत नाही.?
कारण आपण आग्रह धरत नाही. मी समोरासमोर बोलतो तेव्हा फक्त मराठीत बोलतो.. समोरचा कोणत्याही भाषेत बोलत असला तरी...झक मारत मराठी बोलतो समोरचा.

संदीप चित्रे's picture

19 Feb 2009 - 7:10 pm | संदीप चित्रे

>> बंबैयेमे मराठी के बगैर काम चलता रहा
मला तरी असंच वाटतं की हे समस्येचे मूळ आहे.

विनायक प्रभू's picture

19 Feb 2009 - 7:26 pm | विनायक प्रभू

हम्म

गणा मास्तर's picture

19 Feb 2009 - 7:44 pm | गणा मास्तर

१ महाराष्ट्रात मराठी लयास जात चालली आहे का ?
हो. शिक्षणाचे माध्यम मराठी न राहिल्याने बर्र्‍याचजणांना मराठी शब्दच माहीत नसतात.(उदा. महासागर, विल्हेवाट....)
२ मराठीच्या वापराची आवश्यकता लोकांना जाणवत नाही का?
फार थोड्या लोकांना जाणवते.
३ मराठीचा आग्रह कोणीच का करत नाही.?
एका वर्गाला पोटापाण्याची चिंता आहे, त्यामुळे त्याला भाषेशी काहीही घेणे देणे नाही. दुसर्‍या वर्गाने ईंग्रजीचा संबंध सामाजिक प्रतिष्ठेशी जोडल्याने ते
मराठीचा आग्रह धरत नाहीत.

४ जर मराठी शाळा ज्या प्रमाणात बंद पडत आहेत तशा बंद पडत राहील्या तर येणारी पिढी मराठी बोलेल की नाही.?
पुढची पिढी मराठी बोलेल पण ती धेडगुजरी असेल. (मी फ्रुट्स खाल्ले. मला काही अंडरस्टॅन्ड झाले नाही)

५ स्वत:च्या राज्यात जर ही अवस्था असेल तर बाहेरच्या राज्यात विशेषत: उत्तरेत मराठी माणसाचा उल्लेख "बुळा"म्हणून केला जातो त्यात मराठी माणसाची करणी त्याला भोवते आहे असे म्हणावे का?
हो.
६ फक्त राजकीय फायद्यासाठी मराठी मराठी असे उर बडवणार्‍या नेत्यांना मी कसे कामाला लावू शकेन?(मराठीसाठी)
अवघड आहे.
७ मी इतर राज्यात राहणार्‍या इतर देशात रहाणार्‍या मराठी माणसाशी वाद घालत मराठी मुद्यापासून दूर जातो आहे का?
खरे आहे. सगळी शक्ती मराठी संवर्धनासाठी खर्च करण्याऐवजी वादविवाद घालण्यात जाते.
८ मी शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे जे मला करता येते ते करणारच आहे पण इतर क्षेत्रातल्या माझ्या मराठी भाउंना काय करावेसे वाटते.?
तुम्हाला मदत करायला आवडेल. माझ्या मते मराठी शाळांमधुन उत्तम ईंग्रजी शिकवले पाहिजे. मराठी माध्यमातल्या मुलांना ईंग्रजी लिहिता वाचता येते, पण श्रवण आणि
संभाषण कौशल्य नसल्याने न्युनगंड येतो.

९ हे सगळे मी किती लवकरात लवकर करू शकेन.?
सुरुवात लगेच करता येइल. फळे कधी मिळतील कोण सांगणार.
१० ह्या विषयाची चर्चा आधी कधीतरी नक्की झाली असेल तरीपण......
आधीचे काही संदर्भ.
http://www.misalpav.com/node/1845
http://www.misalpav.com/node/2720
http://www.misalpav.com/node/2274
http://mr.upakram.org/node/1288
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

अनामिक's picture

19 Feb 2009 - 7:45 pm | अनामिक

>> दुसर्‍या वर्गाने ईंग्रजीचा संबंध सामाजिक प्रतिष्ठेशी जोडल्याने ते मराठीचा आग्रह धरत नाहीत.

असहमत, सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा ईंग्रजी ही आजची सामाजिक गरज आहे असे म्हणावे वाटते.

अनामिक.

त्रास's picture

19 Feb 2009 - 7:47 pm | त्रास

सर्व प्रश्नांना माझ्यामते असे उत्तर असु शकते-
महाराष्ट्रात सगळ्या इग्लिश शाळेत मराठी हा विषय असतोच. तो नीट शिकवायचा. त्यातून मराठीचे स्फुल्लिंग फुलवायचे.

नाहीतर आज एखद्या मराठी माणसाला फोन केला आणि मराठीत बोलले की तो तुच्छपणे वागवतो. पण इंग्लिश मधे बोलले की आदराने वागवतो. त्याला ईंग्लिश येत नसेल तर गडबडून हिंदीत बोलतो. असे करायचे नसते हे जरी सगळ्या विद्यार्थ्यांना कळले तरी मराठी जिवंत राहील.

त्रास's picture

19 Feb 2009 - 8:04 pm | त्रास

आणखी एक करता येण्यासारखे आहे- मराठी शाळांतुन ईंग्लिश असे काही शिकवायचे की मुलांना दहावीच्या आतच ईंग्लिश मिडियम वाल्या शाळातील मुलांपेक्षा चांगले ईंग्लिश बोलता आले पाहिजे.

अनामिक's picture

19 Feb 2009 - 9:13 pm | अनामिक

नीट शिकवून काय फायदा? शिकणारेच मराठी शिकायला का-कू करतात. फक्त पास होण्यापुरतं कोणीही शिकेल, पण मराठीची आवड मनापासून असायला हवी. घरचं वातावरण मराठी शिकायला, बोलायला, वाचायला प्रोत्साहन देणारं असायला हवं. जिथं माय-बाप दिवस रात्रं कामात व्यस्तं असतात, मुलांसाठी त्यांच्याकडे वेळ नसतो, तिथे मराठीची आवड कशी निर्माण होणार? इंग्रजी शाळेत फक्तं मराठी -एक विषय असून चालत नाही... अशा शाळेत इंग्रजी बोलण्याचा अलिखित नियम असतो, जो सगळे विद्यार्थी काटेकोरपणे पाळतात. बरं, आज बहुभाषीक एवढे झालेत की इंग्रजी सोडून मुलांनी बोलायचे म्हणजे हिंदीमधेच बोलतात ही मुलं. मग "अगर मी होमवर्क टाईममधे फिनीश नाही केलं तर मला पनीशमेंट होईल" असं मराठी ऐकायला येतं. अर्थात ही परिस्थिती आज शहरी भागात सहज दिसून येते, पण छोट्या-मोठ्या गावातलं चित्र पालटायला वेळ नाही लागणार. आज माझ्या छोट्या गावातसुद्धा इंग्रजी शाळा (आधी सेमी, मग पुर्ण) मागच्या १५ वर्षांपासून आहे, आणि काळाची गरज म्हणून जवळ जवळ सगळे सुशिक्षित पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतच घालताना दिसतात, शाळेत शिकताना सोडून इतरत्र जरी मराठी चा सर्रास वापर होत असला तरी हे चित्र पालटायला वेळ लागणार नाही असे वाटते.

अनामिक

सर्वसाक्षी's picture

19 Feb 2009 - 7:58 pm | सर्वसाक्षी

मराठीला मराठी लोक किंमत देत नाहीत तर इतरांनी का द्यावी? मराठी माणसाचे हिंदी या विषयावर मराठी माणसाने मराठी माणसाची जितकी कुचेष्टा केली आहे तितकी हिंदी भाषीकांनी केली नसावी. बाकी त्यांना गरजही नाही. मराठी माणुस बराचसा परधार्जिणा. त्याला आपल्या माणसांपेक्षा इतरांचे कौतुक अधिक. आणि न्युनगंड तर अनेक प्रकारचा. आपण मराठीत बोललो तर आपल्याला जरा कमी समजतील म्हणुन अट्टाहासाने इतर भाषा बोलणारा मराठी माणुस. शिवाय असाही एक ठाम विश्वास की समोरच्याला मराठी येत वा समजतच नाही. अगदी मामलेदारमधे सुद्धा 'ए एक तिखा मिसल लाना' असे सांगणारे मराठे मी पाहिलेले आहेत.

फार कशाला शक्यतो मराठीतुनच बोलावे, जिथे रुढ मराठी शब्द आहेत तुथे इंग्रजी शब्द न वापरता आवर्जुन मराठी शब्द वापरावेत असा आग्रह धरणारा उपहासाचा, टवाळीचा विषय ठरतो आणि'संकुचित' म्हणुन हिणवला जातो.

मराठी शाळा बंद पडत आहेत, लोक मुलांना मराठी शाळेत घालत नाहीत याचीही काही कारणे आहेत. बहुधा स्पर्धेच्या जगात आपले मुल मागे पडु नये अशी भिती असावी. संगणक म्हणजे इंगजी, स्पर्धात्मक परिक्षा म्हणजे इंग्रजी अशी समिकरणे झाली आहेत. शिवाय मराठी शाळांमधे अभ्यासाव्यतिरिक्त खेळ व व्यक्तिमत्व विकास याकडे दुर्लक्ष होते, अनेकदा मराठी शाळांमध्ये कला, क्रिडा या सुविधाच नसतात हे ही कारण असू शकेल. शिवाय मराठी ही मातृभाषा, ती रोज घरात बोलली जाते तेव्हा ती मुलाला येणारच मात्र इंग्रजी शाळेमुळे इंग्रजी चांगले येईल व परदेशी भाषाही उच्च माध्यमिक शालेय शिक्षणक्रमाचा भाग म्हणुन शिकण्याची संधी मिळेल अशीही एक भावना.

अनेकांच्या बदलत्या नोकर्‍या हे ही एक कारण असु शकेल. कुठेही जावे लागले तरी शिक्षण अडु नये.

अर्थात हे सगळे असले तरी मराठी शाळांमध्ये चांगली मुले नसतात व परिचितांची, प्रतिष्ठितांचे मुले इंग्रजी माध्यमात तर आपणही मुलाला त्याच शाळेत घालुया हे दुष्टचक्र आहेच. मराठी शाळांमध्ये शिक्षक चांगले नाहीत ही सबब अमान्य, सर्व इंग्रजी शाळांमध्ये चांगलेच शिक्षक थोडेच असतात?

आणि तरीही ठाण्याच्या सरस्वती सारख्या मराठी शाळा आजही भरभराटीला आहेत आणि लौकिक टिकवुन आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Feb 2009 - 9:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि तरीही ठाण्याच्या सरस्वती सारख्या मराठी शाळा आजही भरभराटीला आहेत आणि लौकिक टिकवुन आहेत.

मी १९९६ला दहावी झाले तेव्हापासूनच गाडी उताराला लागली होती. शाळेत पूर्वी लांब रहाणार्‍या मुलांना प्रवेश मिळत नसे आणि आता ५-६ किमी लांब रहाणार्‍यांनाही आर्रामात प्रवेश मिळतो.

बाकी अवलियांचं एक वाक्य आवडलं, मुंबई महाराष्ट्रात असली तरीही महाराष्ट्र म्हणजे मुंबई नाही. पुण्यात, हल्ली जिथे आय.टी.मुळे बर्‍यापैकी अमराठी वर्ग आहे तिथेही, अनेक दुकानांमधे मराठी कानावर येतं, दुकानांच्या पाट्या बव्हंशी मराठी/देवनागरीत असतात आणि मराठी येत असेल तर फायदा जरूर होतो. (हे एका बंगाली मित्राचं मत! त्यावर मलाच एक बंगाली मैत्रिण म्हणते, "बरं आहे, इथे लोकं मराठी बोलतात ते; आता कलकत्त्यात कोणी विचारत नाही बंगाली येतं का नाही ते!")

अदिती

लिखाळ's picture

19 Feb 2009 - 9:59 pm | लिखाळ

(हे एका बंगाली मित्राचं मत! त्यावर मलाच एक बंगाली मैत्रिण म्हणते, "बरं आहे, इथे लोकं मराठी बोलतात ते; आता कलकत्त्यात कोणी विचारत नाही बंगाली येतं का नाही ते!")

:) हे मस्त ! पाहा .. भाषाभिमानी बंगाल्यांकडे असे ...

आज मटामधल्या एका बातमीचा मथळा वाचला...
अमेरिकेने खोलली पाकची पोल
बहुधा हिंदी आणि मराठी दोन्ही लोकांना कळावे अशी संकरित भाषा वापरायचा घाट दिसतो मटावाल्यांचा.
-- लिखाळ.

भडकमकर मास्तर's picture

20 Feb 2009 - 2:24 pm | भडकमकर मास्तर

मटाने मराठी भाषेचीच पोल खोलायला सुरुवात केली आहे असे वाटते...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बाप्पा's picture

20 Feb 2009 - 8:26 am | बाप्पा

@अदिती, पुण्यनगरी मधे देखील अश्या बर्याच शाळा आजही लौकिक टिकवुन आहेत आणि राहतिल. इतर भाषांना माझा विरोध नाही पण आपण आधी मात्रुभाषा व्यवस्थित शिकायलाच हवी. मी देखिल मराठी माध्यमातुन शिकलो. पदविधर झालो.
पहिल्यांदा अमेरीकेला गेलो तेव्हा मनात थोडा न्युनगंड होताच पण अगदी पहिल्या दिवशीच तो नाहिसा देखिल झाला. मराठी माण्साचा हा चिवटपणा अजुन कुठ्ल्याही देशाच्या नागरिकात अढळुन येत नाही.

अनामिका's picture

21 Feb 2009 - 5:02 pm | अनामिका

अदिती सहमत
आणि तरीही ठाण्याच्या सरस्वती सारख्या मराठी शाळा आजही भरभराटीला आहेत आणि लौकिक टिकवुन आहेत.

मी १९९६ला दहावी झाले तेव्हापासूनच गाडी उताराला लागली होती. शाळेत पूर्वी लांब रहाणार्‍या मुलांना प्रवेश मिळत नसे आणि आता ५-६ किमी लांब रहाणार्‍यांनाही आर्रामात प्रवेश मिळतो.

१९९८ साली माझ्या ज्येष्ठ चिरंजीवाला सरस्वती मराठीमधे प्रवेश नाकारण्यात आला होता केवळ लांब रहतो म्हणुन ?तिच परिस्थिती बेडेकरची जर तेंव्हा प्रवेश मिळाला असता तर कदाचित परिस्थिती काही अंशी वेगळी असती आज.!.........असो त्यामुळे इंग्रजी मध्यमात घालण्यावाचुन पर्याय उरला नाही.............पण तरीही आज इंग्रजी माध्यमात शिकुनही अस्खलीत मराठी बोलता तसेच लिहिता वाचता येतय चिरंजीवांना हेच महत्वाच................!
"समोरचा माणुस कंटाळुन का होईना मराठीतच बोलु लागे पर्यंत आपण मराठीतच बोलणे "हा जालीम उपाय निदान मी तरी शोधुन काढलाय माझ्यापुरता..............
"अनामिका"

मृदुला's picture

20 Feb 2009 - 12:26 am | मृदुला

जवळजवळ दहा वर्षांपूर्वी मी नोकरीला लागले तेव्हाही माझ्या गटात स्थानिक भाषा माध्यमातून शिकलेले कोणीच लोक नव्हते. पुष्कळांना मी मराठी माध्यमातून शिकले आहे याचे आश्चर्य वाटायचे. एकंदरित इतक्या वर्षांत जितक्या भारतीय लोकांबरोबर मी काम केले आहे त्यापैकी केवळ एक कानडी माध्यमातून शिकलेला मनुष्य आहे. बाकी सगळे इंग्रजी.

मला स्वतःला इंग्लंडला पोचेपर्यंत इंग्रजीची सवय नव्हती, आत्मविश्वास नव्हता. बंगलोरात जी चार वर्षे राहिले ते हिंदीच्या जोरावर. हिंदी बरीच सुधारली, पण काय उपयोग? त्यापेक्षा थेट इंग्रजीची सवय केली असती तर बरे झाले असते. पण परकीय भाषा शिकणार नाही, त्यातले काही वाचणार नाही हा मनाचा हट्टीपणा जायला पुष्कळ वर्षे लागली.

मला वाटते शहरात इंग्रजी शाळा मराठी शाळांपेक्षा जास्त लोकप्रिय ठरणार यात काही विशेष नाही; बदलता येण्यासारखे तर नाहीच नाही. गावांत सेमी इंग्लिश हा उत्तम पर्याय आहे. आपल्याला आवडो न आवडो इंग्रजी जगाची भाषा झाली आहे. आपल्याकडे आधीपासून इंग्रजीची परंपरा आहे तर त्याचा फायदा करून घ्यावा.

भाषासंवर्धनासाठी ती सतत वापरावी. म्हणजे जमेल तितक्या लोकांशी मराठीत संवाद साधावा. लिहावे, वाचावे. नुसता संपूर्ण मराठी माध्यमाच्या शाळांचा आग्रह धरून काही पदरात पडणार नाही.

सुक्या's picture

20 Feb 2009 - 2:00 am | सुक्या

तुमचा तर्क मला पटला नाही. मीही मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो, अगदी पधवीधर होइपर्यंत मला फाड्फाड ईंग्रजी येत नव्हतं. आजही आपला शालेय अभ्यासक्रम सेमी-ईंग्रजी आहे ज्यात साधारण ५ वी पासुन ईंग्रजी शिकायला सुरुवात होते. त्यात वावगं काहीही नाही.

मराठी माध्यमाची शाळा असली तरी तिथे ईंग्रजी शिकवली जात नाही असे मुळीच नाही. इथे प्रश्न आहे तो मराठी माध्यमाच्या शाळेत न शिकण्याचा. त्याचा संबंध हा बहुतांशी स्टेटस सिंबल शी आहे. किंवा समोरचा बाब्या / बाबी ईंग्रजी माध्यमात शिकतो / शिकते म्हणुन आपला बाब्या / बाबी तिथेच शिकला पाहीजे हा हट्ट किंवा स्पर्धेत आपली मुले मागे राहतील ही अनाठायी भिती ह्या गोष्टी जास्त जबाब्दार आहेत.

परकीय भाषा शिकणार नाही, त्यातले काही वाचणार हा दुराग्रह झाला. तो कुणालाच नको आहे.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

घाटावरचे भट's picture

20 Feb 2009 - 3:10 am | घाटावरचे भट

>>मीही मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो, अगदी पधवीधर होइपर्यंत मला फाड्फाड ईंग्रजी येत नव्हतं.
मी पण मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो. पदवीधर होऊनही बराच काळ झाला. मला अजूनही विंग्रजी धड बोलता येत नाही.

मुक्तसुनीत's picture

20 Feb 2009 - 5:35 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. वाघिणीचे दूध पचायला तयार नाही :-)

विसोबा खेचर's picture

20 Feb 2009 - 6:32 am | विसोबा खेचर

मास्तरांनी ठळक अक्षरात लिहिलेल्या सर्व गोष्टी पटणार्‍या आहेत, वास्तव आहेत..!

मुंबईच्या व्यवहारी जगात आजकाल मराठीला कुणीही विचारत नाही..

तात्या.

सालं, याच्यापेक्षा आमचे इंदूर आणि मध्य प्रदेशातले मराठीजन बरे. हिंदी प्रांतात राहून हिंदीची सरमिसळ असलेली मराठी का होईना ते बोलतात. काही जण तर अगदी अस्खलित बोलतात. नवी पिढी हिंदीशी जास्त जवळीक साधणारी आहे. पण संस्कृती मात्र मराठी जपणारी आहे. घरात किमान मराठी बोलावे असा आग्रह असतो. आमच्या लोकमान्य नगर या परिसरात तर बाहेरही सर्रास मराठी बोलली जाते. ही जवळपास पाच ते सहा हजाराची मराठी वस्ती आहे. परिसरातील जवळपास सर्व दुकानदारांना मराठी समजते. मराठी लोकांना लागणार्‍या सर्व सांस्कृतिक गोष्टी या दुकानांत मिळतात. 'सानंद'सारखी संस्था दर महिन्यात एक किंवा दोन नाटकांचे प्रयोग ठेवते. हे नाटक पाच प्रयोगात सादर होते. ते पाच ते सहा हजार लोक बघतात. याशिवाय दर महिन्यात मराठी समाज नावाची संस्था मराठी चित्रपट दाखवते. सर्व मराठी साहित्यिक, कलावंतांचे कार्यक्रम नियमितपणे येथे होतात. त्याला बर्‍यापैकी प्रतिसादही मिळतो. साहित्यिक कार्यक्रमांना पुढची पिढी फारशी नसली, तरी सांगितीक कार्यक्रमांना मात्र चांगलीच गर्दी असते. या क्षणी इंदूरमध्ये एकही मराठी शाळा नाही. होत्या त्या बंद पडल्या. इथे शिकण्याची गरज म्हणून आधी हिंदी आणि आता इंग्रजी शाळांकडे इथला मराठी माणूस वळाला आहे. पण हे करतानाही तो मराठी भाषा संस्कृती टिकवून आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस यापेक्षा नक्कीच जास्त काही करू शकतो नाही का?

ता. क. माझ्या शेजारी रहाणार्‍या एका आरस नावाच्या आजोबांनी (जे झाबुआ येथे ३५ वर्षे नोकरी करून इंदूरला स्थायिक झाले आहेत.) सारेगमपच्या कार्यक्रमावर आक्षेप घेताना म्हटलं, या कार्यक्रमात महाराष्ट्राचा आवाज असे का म्हणतात? आम्हीही हा कार्यक्रम आवडीने पहातो. आम्हीही मराठी आहोत. मग त्याला मराठीजनांचा आवाज असे शीर्षक का दिले जात नाही? त्यांचा प्रश्न मला निरूत्तर करणारा ठरला.)

लिटिल चॅम्प्सविषयीच्या बातम्या, मुलाखती, लेख इथल्या हिंदी वृत्तपत्रातही टेचात छापून आले.

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Feb 2009 - 12:41 pm | llपुण्याचे पेशवेll

अगदी खुळचटपणा आहे हा. कसली आलीये मराठी काय काय ते..... साला जग २१व्या शतकात. आन इंग्रजी बोलायची सोडून कसली ते मराठी बिराठी. आणि ज्याने त्याने काय बोलायचे हा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. कसे?

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

सुचेल तसं's picture

20 Feb 2009 - 12:54 pm | सुचेल तसं

आणि मुलांना कुठे मराठी मिडीयम मधे घालत बसता... ग्लोबलायझेशनच्या जमान्यात इंग्लिश मिडीयम कधी पण प्रेफरेबल...

तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो,
तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो,
मग माझं म्हणून काय असतं?
-श्याम मनोहर

विनायक प्रभू's picture

20 Feb 2009 - 4:37 pm | विनायक प्रभू

भरी

जाणकार's picture

20 Feb 2009 - 2:15 pm | जाणकार

भोचक
तुम्हि बरोबर लिहलय ,मि पण इन्दोर चाच आहे, इन्दोरला ह्याच बरोबर दसरा ते दिवाळिच्या मधे "जत्रा"नावाचा ३ दिवसान्चा एक मेळावा असतो त्यात मराठि पदार्थाचे ३०/४० प्रकार असतात् ,मराठि चे ३/४ वाचनालये आहेत,साहित्य संवाद नावाच्या घरपोच वाचनालयाचे तर ५५०० च्या वर सभासद आहेत,कालच्या शिव जयंतिच्या मिरवणुकित ८०००/१०००० लोक जमलि होति,मागल्या २० वर्षा पासुन लोकसभे करिता मराठि स्त्रीच निवडुन येते आहे आणि जास्तित जास्त मराठि घरांमधुन मराठित शिकत नसतानाहि घरि आणि आपसात मराठित बोलले जाते.
असे पाहिल्यावर वाट्ते कि महाराष्ट्रा पेक्शा मग मराठि ला जपण्याचे जास्त प्रयत्न महाराष्ट्रा बाहेर होत आहेत.(आणि येथे कोणि नेते पण महाराष्ट्रा बाहेर मराठि कार्यक्रम का म्हणुन मारठोक पण करत नाहित)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Feb 2009 - 9:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या धाग्याचं शीर्षक हिंदीत का आहे?

अदिती

लिखाळ's picture

20 Feb 2009 - 9:32 pm | लिखाळ

ही विप्रंनी भाविष्यकाळाची भीतिदायक प्रतिमा दाखवली असेल. जर वेळीच काही केले नाही तर भविष्यात 'मराठीचे काय झाले' हा प्रश्न हिंदीत विचारावा लागेल :)
-- लिखाळ.

विनायक प्रभू's picture

21 Feb 2009 - 3:16 pm | विनायक प्रभू

अगदी बरोबर

यशोधरा's picture

20 Feb 2009 - 10:25 pm | यशोधरा

अदिती, मी आत्ता तू विचारलेला प्रश्नच विचारणार होते! :)

मीही मराठी माध्यमातून शिकले, पण इंग्लिश भाषेचा अडसर कधीच जाणवला नाही.

१.५ शहाणा's picture

20 Feb 2009 - 9:33 pm | १.५ शहाणा

आपण मराठी शब्द वापरल्यास चुक म्हणुन हासतो पण इंग्रजी वापर ल्यास उच्च्य समजतो
उदा. मेरी वाइफ आज आ रही है वाइफ हा इंग्रजी शब्द
मेरी बायको आज आ रही है बायको हा मराठी शब्द याला सर्व हासतात पण १ ले हे सुशिक्षीत समजतात
»

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Feb 2009 - 10:01 pm | llपुण्याचे पेशवेll

अगदी खरे आहे 'अर्धवटराव'. आमच्या इथे ग्रुप मधे कोणी अमराठी नाही तरी लोक 'हिंदी' मधे बोलतात. आणि जे अमराठी आहेत ते १ किंवा २ तरी सगळे लोक हिंदीत बोलतात. शेवटी मराठी माणूस षंढ आहे हेच खरे. त्यामुळे आमच्या मराठी मित्राने मला 'कहा जा रहा है' असे विचारले तर मी 'भाजी आणनेको जा रा है' असे सांगतो. पूर्वी हिंदी प्रश्नाला मराठीत उत्तर देऊन संभाषणाची गाडी मराठीवर आणत असे पण कंटाळा आला आता. एकट्याने किती मरायचे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

प्रियाली's picture

21 Feb 2009 - 2:16 am | प्रियाली

जिन्हे नाझ है मराठीपे वो कहा है ?

अर्धे मराठी लेखांना हिंदी शीर्षेके देण्यात गुंग आहेत. बाकीचे अमेरिकेला पोहोचले आहेत. ;)

कलंत्री's picture

21 Feb 2009 - 12:58 pm | कलंत्री

भारताच्या मागच्या १००० वर्षाचा अभ्यास केलातर अनेक गोष्टी नष्ट व्हाव्या अशी स्थिती यावी आणि कोणीतरी एखादा व्यक्ति यावा आणि त्याने ती परिस्थिती पालटुन द्यावी असे कायमच घडलेले आहे. मराठीच्या बाबतीतही हेच घडेल असा आशावाद मला वाटतो.

अर्थातच असा व्यक्ति येईपर्यंत मराठीत धुगधुगी रहावी म्हणून आमचा प्रयत्न चालु असतो.

सुचेल तसं's picture

21 Feb 2009 - 3:38 pm | सुचेल तसं

>>(अभिमानाची गोष्ट अशी की तो विद्यार्थी मिपा सदस्य आहे.)

तो विद्यार्थी म्हणजे तुम्ही का वि.प्र.?

तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो,
तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो,
मग माझं म्हणून काय असतं?
-श्याम मनोहर