बुद्धकथा आणि एक प्रयोग.

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
16 Feb 2009 - 10:18 pm
गाभा: 

मी अणि माझ्या एका मित्राचे २/३ दिवस कोठेतरी दुर जावे आणि मनोसोक्त आपल्या आवडत्या विषयावर गप्पा माराव्या असे ठरले होते. त्या बेतास अनुसरुन आम्ही नागपुरला आमच्या दुसर्‍या एका मित्राकडे जाण्याचा विचार निश्चित केला.

माझ्या मित्राबद्दल सांगणे राहिलेच, माझ्या या मित्राचा भारतातील अथवा जगातील सर्वच प्रख्यात अशा धर्माचा गाढा अभ्यास आहे. प्रत्येक धर्माची तपशीलवार तत्त्वे, त्यात्या धर्माच्या महापुरुषाची आयुष्यातील महत्त्वाची प्रसंगे, त्यांनी दिलेला आदर्श, धर्मसार इत्यादी इत्यादी तो कसे लक्षात ठेवतो आणि समर्पकपणे सांगतो याचे मला आश्चर्यच वाटते, संस्कृतवर प्रचंड असे प्रभूत्त्व, अनेक श्लोकांचे संदर्भ योग्यवेळी तपशिलवार सांगता येणे, त्यांचा परस्पर संबंध, त्याचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध इत्यादी इत्यादी वर त्याचे प्रभूत्त्व आहे, कदाचित अनेक जन्मांचे ते संचितही असावे.

सुदैवाने त्याचा जन्म अतिशय सधन अशा कुटुंबात झाल्या असल्याकारणे आपल्यासारखा अन्न, वस्त्र आणि निवारा अश्या विवंचनाही नाही. वृत्ती मात्र पूर्ण सन्याशाची, दिवसभर वेगवेगळ्या विषयावरची धार्मिक पुस्तके वाचणे, मनन, चिंतन, सत्संग, प्रवचने इत्यादीमध्ये तो आपला वेळ घालवित असतो.

तर अश्या या आगळ्या आणि वेगळ्या चाकोरीबाहेरच्या मित्राबरोबर जायचे ठरले आणि प्रवास सुरु झाला. पतंजली सुत्रे, उपनिषदे, गीता, भागवत, बायबल, कुराण इत्यादीवर आलटुन पालटुन चर्चा होत होत्या. मी कधी प्रश्न विचारावे, कधी खोडसाळ प्रश्न विचारावे, कधी वेड्याचे सोंग आणून बावळटासारखे प्रश्न विचारावे असा क्रम चालु होता. त्याने मात्र अविचल आणि संयमीपणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुसंगत अशी उत्तरे द्यावी अश्या प्रकारे आमचा वेळ चालला होता.

त्यात ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या मध्ये संवाद कसा होतो असा प्रश्न मी विचारला. त्याचे उत्तर, ज्ञानी आणि ज्ञानी अशी जर भेट झाली तर त्याच्यामध्ये मौनाचाच संवाद घडतो, ज्ञानी आणि अज्ञानी यांचा जर संबंध आलातर कमीत कमी शब्दात मात्र परिणामकारक असा संवाद होत असतो. अनेकवेळेस अज्ञानीचे रुपांतर नकळतच ज्ञान्यामध्ये होत असते ( आपणासारखे करिती तात्काळ,काळवेळ त्याना नलगे-तुकाराम).अज्ञानी आणि अज्ञानी असा संबंध आलातर वितंडवाद, भांडण इत्यादी ठरलेलेच असतात असे त्याने सांगितले.

ज्ञानी आणि अज्ञानी ( किंवा मुमुक्षु) यांच्यातील संवाद कसा घडत असतो असे विचारले असता, या साठी माझ्या मित्राने मला ७/८ बुद्धजीवनाच्या कथा सांगितल्या(कथा कधी तरी सांगेणच), कथा, ती सांगताना त्याचे त्या कथेत हरविले जाणे, मनापासून कथा सांगणे आणि त्यामागचे तात्पर्य खोलात जाऊन विषद करणे यामूळे मी मात्र नक्कीच हरखुन गेलो. मनावर काय मोहिनी आली, मन कसे भारले गेले याचा विचार अथवा आठवण आजही आली की मनावर एका वेग़ळ्याच ब्रह्मानंदी आनंदाचा शिडकावा होतो.

घरी आल्यावरही मी दोन तीन दिवस त्या बुद्धकथेच्या धुंदीतच होतो असे म्हणाना, रात्री झोपेत सुद्धा मित्राचे संभाषण त्याच्या आरोहा अणि अवरोहाबरोबर कानावर येत असे, कधी कधी बुद्ध आणि त्याचे भिक्षु बसलेले आहे, धर्मचर्चा चालु आहे, भगवान आपल्या भिक्षुंना जीवनाचे तत्त्व समजावुन सांगत आहे असे दृष्य डोळ्यासमोर तरळत असे. अंगुलीमाल, शौन, भिक्षु आनंद इत्यादी नजरेसमोर वावरत आहे असे वाटत असे.

मी माझ्या मुलाला त्या शैलीत कथा सांगण्याचा प्रयत्न केला पण एक शतांशही मला ते कथाकथन कौशल्य जमले नाही असे म्हणा ना, नंतर भ्रमणसंचावर मी काही कथा मुद्रित करण्याचा प्रयत्न केला तर माझा आवाज मलाच ओळखता आला नाही आणि माझा आवाज लोक कसे सहन करतात याचाच प्रश्न मलाच पडला.

माझ्या मनात आता असा एक विचार येत आहे की कोणाकडे वेळ असेल तर, आवड असेल तर, कथाकथनाचे कौशल्य असेल तर त्याने मला व्यनि अथवा खरड पाठवावी, या सर्व किंवा बर्‍याचशा बुद्ध कथा एका तबकडीवर मुद्रित करुन घेण्याचा माझा विचार आहे. बुद्धाच्या जीवनाचे सारे सार, वेगवेगळ्या लोकांना केलेला धर्मउपदेश, काही पदे इत्यादी छोट्या प्रमाणात मुद्रित करावयाच्या आणि प्रयोग जमला तर तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. संगीत, व्याख्याने, किर्तन, प्रवचन इत्यादीचा वापर धार्मिक कामासाठी, प्रचार आणि प्रसारासाठी होत असतोच, कथाकथनाचा (भारत एक खोज मध्ये असे तंत्र वापरले आहे असे स्मरते) वापर करुन एका वेगळ्या सामर्थ्यशाली तंत्राचा वापर करावा असे माझ्या मनात आहे.

कृपया आपापली मते मांडावीत, या कल्पनेला मूर्त स्वरुप कसे देता येईल याचे मार्गदर्शन करावे ही विनंती.

प्रतिक्रिया

शशिधर केळकर's picture

17 Feb 2009 - 11:59 pm | शशिधर केळकर

अशा प्रकारच्या कथा कथित स्वरूपात कदाचित विपश्यनेचा प्रसार करणार्‍यांकडे उपलब्ध असू शकतील. आजच्या घडीला तुम्ही उल्लेखलेला बुद्धविचाराचा प्रचार आणि प्रसार लक्षावधी विपश्यी साधक प्रत्यक्षात करीत आहेतच. आस्था, संस्कार आदि टीव्ही माध्यमातून पू. सत्यनारायण गोयंका यांची प्रवचनेही प्रसारित - प्रक्षेपित होत असतातच. देशभरात त्यांची अगणित सेंटर्स आहेत. (हे सर्व अर्थात तुम्हाला माहीत असेलच).

कोणाला कशा प्रकारे साधना करावीशी वाटेल, तशी ती त्याने करावी हे तत्व मुळात आधी मान्य करूनही हा प्रश्न मनात आला, की बुद्धाच्याच कथांचा प्रसार करावा असे विशेषत्वाने आपल्याला का वाटले असावे?

कदाचित मी फारच विषयाला सोडून लिहिले असेल; तसे असेल, तर क्षमस्व!

तुम्ही वरील लेखाची सुरवात तुमच्या मित्राच्या कौशल्य सांगून केली. तुमच्या मित्रापाशी ती कथाकथनाची दुर्मिळ कला आहे, असे राहून-राहून जाणवते.

त्यांचे बोलणे ध्वनिमुद्रित करून घेतल्यास बहार येईल, आणि तुमच्या मनातला प्रकल्प यशस्वी होईल.

दोनजनाच्या संवादातून घडणार्‍या छोट्याशा कथा आणि त्यातून दिलेला मोठा संदेश अशा प्रकारचा विचार माझ्या मनात आहे. यात एका ज्ञानी आणि अज्ञानी व्यक्तिचा संदेश / संवाद गृहीत धरलेला आहे. बुद्धच का? येथे नारद आणि वाल्या, यम-नचिकेत, अष्टावक्र-जनक असाही संवाद योजुन काही संदेश देता येईल, दुसरा भाग म्हणजे कथाकथनाचे अंगभूत सामर्थ्य ज्याच्या अंगात आहे त्याला या प्रयोगाद्वारे एक नविन वाट चोखाळता येईल.

येथे उल्लेख केलेल्या माझ्या मित्राकडे मराठी भाषेचे ज्ञान नाही आणि दुसरे म्हणजे त्याला ही कल्पना कितपत आवडेल हेही पहावे लागेल. अर्थात कल्पना छानच आहे.

सर्वसाधारणपणे प्रवचने हे एकांगी प्रचाराचे वाटतात त्यात एकाच व्यक्तिने कथाकथन करुन कोणतेही तत्वज्ञान न सांगण्याचा आव न आणता, असे कथन करावे असे मला अभिप्रेत आहे. अर्थातच या माधमावर हुकमत ( प्रभूत्व) असणार्‍यांनी विचार करावा असे मला वाटते.

नितिन थत्ते's picture

21 Feb 2009 - 12:54 pm | नितिन थत्ते

आम्ही नाही बुवा या गावचे

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

कलंत्री's picture

27 Feb 2009 - 6:22 pm | कलंत्री

मी या लेखातील उल्लेख केलेक्या माझ्या मित्राशी बोलत असता त्याच्या या कथनकौशल्यावर कौतुकाचा अभिप्राय म्हणून अभावितपणे सांगितले की, आप बहुत अच्छी बात करते हो, त्यावर त्याने स्मित हास्य करुन सांगितले की आजतक ऐसा कोई नही मिला की वो कहे की आप बहुत सच्ची बात करते हो. मै आजतक ऐसे आदमी की राह देख रहा हु की वो कहे की मै सच्ची बात कर रहा हु.