मित्रांनो, आपण जर मराठी साहित्य असे म्हटले तर लगेच "पु ल देशपांडे" हे नाव अग्रक्रमाने पुढे येते. पुलंचे मराठी साहित्यातील योगदान वादातीत आहे ह्यात शंका नाहीच.
एक अख्खीच्या अख्खी पिढी "पुलं" ह्या नावावर जगली, वाढली आणि विस्तारली गेली. मराठी माणसाच्या हळव्या मनाचा कोपरा पुलंनी बरोबर पकडला व त्यामुळे त्यांचे साहित्य मराठी माणसाच्या साहित्य प्रकरात मानबिंदु म्हणुन ओळखले गेले ह्यात शंका नाही. पु. लं. च्या लिखाणातून जगण्याची काही एक पद्धती, काही मूल्ये , यांचे दर्शन घडते. त्यांनी या तत्त्वांचा म्हणा , मूल्यांचा म्हणा , वेगळा असा उद्घोष कधी केला नाही. मराठी मनावर या वृत्तीचा नक्कीच प्रभाव पडत आला आहे. गेल्या काही पिढ्या याची साक्ष देतील.
पण सध्या चालत असलेल्या मिपा संपादकीय - पुलं, ओबामा आणि एकविसाव्या शतकातले मराठीपण. ह्या धाग्यात पुलंच्या "साहित्य आणि लोकाश्रय" वर भरभरुन चर्चा होत आहे.
नाही म्हटले तरी काही जणांना पुलंच्या लिखाणावर बरेच आक्षेप आहेत, त्याचीच चर्चा आपण ह्या धाग्यात करुयात ...
१. असे म्हणतात की पुलंनी त्यांच्या बर्याच साहित्यात "सर्वसामान्य मराठी माणसाचे आयुष्य कॄत्रीम वाटावे " असे सर्वांसमोर मांडले :
आता आपण बटाट्याची चाळ, असा मी असामी अथवा व्यक्ती आणि वल्ली मधील काही पात्रे उदाहरणादाखल घेतली तर ह्या मुद्द्याचे विवेचन करता येईल. पुलंनी इथे वर्णन केलेले समाजजीवन त्या काळातल्या "चाळीत राहणार्या मराठी माणसाला" केंद्रबिंदु ठरवुन केलेले दिसते.
इथे चाळीत राहणारा नायक, त्याचे कुटुंब व त्यांचे शेजारी आप्त वगैरे ह्यांचे अतिशय उत्तम वर्णन पुलंनी केले आहे पण ह्यात कुठेतरी "कृत्रीमता" वाटते आहे. कारण वास्तवात हे जरी अस्तित्वात असले तरी हे "असेच" आहे असे नाही. इथे पुलंनी चाळीचे समाजजीवन, सांस्कॄतीक हालचाल, नातेसंबंध ह्यांचे वर्ण केले आहे पण ते खरोखरच वास्तवात "असेच" होते का हा प्रश्न आहे. मराठी माणसाच्या अपेक्षेत "हे जसे असायला हवे होते" तसे पुलंनी लिहले पण त्या नादात इथे त्यांची वास्तवीकतेशी नाळ तुटली गेली.
उदा : "असा मी असामी " धोंडोपंत जोश्यांची चाळीपासुन ते ऐशाआरामी फ्लॅटपर्यंत वाटचाल व त्या अनुषंगाने त्यांच्यात व त्यांच्या कुटुंबात घडत गेलेले बदल. हे बदल सामाजीक, सांस्कॄतीक, संस्कारातले, नातेसंबंधातले होते. इतक्या का वेगाने माणुस बदलत जातो ? जागीतीकीकरणामुळे प्रगतीचा वेग जरी मान्य केला तरी इथे घडणारे बदल तोंडात बोट घालायला लावण्याइतके धक्कादायक होते.
त्या काळी प्रत्येक चाळीत राहणार्या मराठी माणसाची तिथुन उठुन फ्लॅटमध्ये रहायला जायची इच्छा होतीच, नव्हे त्यासाठीच त्याची धडपड चालु असायची. पुलंनी ही मानसीकता बरोबर पकडली व त्या अनुषंगाने लिखाण केले जे प्रत्येक माणसाला "हवेहवेसे" वाटले पण दुर्दैवाने "कॄत्रीम" वाटावे असे होते.
"बटाट्याच्या चाळी"चे वर्णन करताना देखील पुलं बरोबर हाच कोपरा पकडतात. आपल्या सामाजीक जीवनमानाचा स्तर तर उंचवायला हवा पण त्याबरोबर आपली मुल्ये, संस्कार, संस्कॄती ह्या गोष्ती नेहमी आपल्या बरोबर असाव्यात हा नेहमीच मराठी माणसाचा अट्टाहास राहिला आहे, पुलंनी नेमके हेच लिहले. त्यामुळे इथे जेव्हा " नव्या फ्लॅटमधला अभिजीत अथवा अंकिता परिक्षेला जाताना वडीलधार्यांचा पाया न पडता रॉक्-रॉक म्हणत जाईल" असे वाक्य टाकुन त्यांनी मराठी माणसाच्या हळव्या मनाचा धागा अचुक पकडला आहे व त्यामुळे हे माणसाला आपले न वाटले तर नवलच.
"विकास तर व्हायला हवा पण त्यातसुद्धा मुल्ये सुद्धा जपायला हवीत" हे वैचारील द्वंद्व बरोबर टार्गेट करुन पुलंनी बरेच काही लिहले व त्याला लोकाश्रयही मिळाला.
पण हे सर्व "वास्तवीकतेच्या जवळ" जाणारे होते की "कॄत्रीम" वाटावे इतपत कल्पनारंजन होते हा वादाचा विषय आहे.
२. पुलंच्या व्यक्तीरेखांचा तोंडावळा :
जर आपण धोम्डोपंत जोशी, हरितात्या, नारायण, चितळे मास्तर, अंतु बर्वा व इतर अनेक व्यक्तीरेखांचा तोंडावळा सरळसरळ "ब्राम्हणी"होता ह्यात वाद नाही. साधारणता ३०-४० वर्षांपुर्वीचा काळ जर लक्षात घेतला तर त्या काळचा वाचकवर्ग हा प्रामुख्याने "ब्राम्हण वा इतर उच्चवर्णीय समाज" होता, ह्या समाजाला लेखनात आपलेच प्रतिबिंब दिसले व त्यामुळे हे साहित्य त्यांना आपले वाटले असा एक मतप्रवास आहे.
पुलंनी जाणुनबुजुन हे केले असा आरोप इथे नाही पण त्यांना ह्या गोष्टीचा "फायदा" जरुर मिळाला असे माझे मत आहे.
स्वाभावीकच आहे ना, उद्या जर कोणी "सहस्त्रब्राम्हणभोजने, श्लोक, संस्कार, गावाकडचे जीवन, सध्या हरवत चाललेले लहानपण" ह्यावर लिहले तर मी सुद्धा नक्की हळवा होईन कारण मलासुद्धा कुठेतरी आत आपण सध्या ह्या गोष्टींना "विसरत चाललो आहोत अथवा मिस्स करतो आहोत" अशी भावना आहे, मग असे लिखाण वाचल्यावर स्वाभावीकपणे मी नॉस्टलेजीक होईन व त्या लिखाणाविषयी भरभरुन बोलेन.
असेच काहीतरी इथे जाणवले. हे असेच असेल १०० % खात्रीने म्हणता तेणार नाही पण ह्याचा "फायदा" नक्की मिळाला हे मात्र मान्य करण्यावाचुन माझ्याकडे पर्याय नाही.
३. वास्तविकतेशी फारकत :
वर लिहल्याप्रमाणे इथे सर्वसामान्यांची जीवनाशी निगडीत पण वास्तवाशी फारकत असलेले "स्वप्नरंजन" वर्णन तर येतेच.
पण इथे एक मुद्दा प्रामुख्याने मांडावा वाटतो तो "वंगचित्रे" बद्दल, इथे पुलंनी शांतीनिकेतनात रहात असताना त्यांना दिसलेला बंगाली समाज, माणुस, संस्कॄती ह्याचे चित्रण केले आहे. पण एक वाद असा येतो की लोकांना इथे बंगाली समाजाची खरीखुरी चित्रे दिसली नाहीत. पुलं वर्षभर शाम्तीनिकेतना राहिले पण त्यांनी त्या काळात शांतीनिकेतनाच्या फाटकाबाहेर न पडताच बंगाली समजाचे "कल्पनेतले" वर्णन केले कारण त्या बाहेरच्या समाजाचे काहीच संदर्भ ह्या लेखनात येत नाहीत. त्या काळात बंगालमध्ये कम्युनिस्ट चळवळ व सारंजामशाही विरोधी नक्षलवादी चळवळ भरात होती, सरकार हे दडपुन टाकायचा प्रयत्न करत होते, रोज माणसे मरत होती. ह्या सर्व घटनाम्चा माणुसकीच्या दॄष्टीने पुसटसा उल्लेख अगर चित्रण पुलंच्या लिखाणात कुठेही दिसले नाही. उलट इथे पुलंनी केलेला विनोद आपल्या लक्षात राहतो. विषय तो नव्हता हे बरोबरच आहे पण इतकी "टोकाची अलिप्लता" घेऊन नुसते "कल्पनारंजन" रंगवले गेले असेल व शांतीनिकेतन रंगवले गेले असेल तर हे लिखान "वास्तविकतेशी फारकत" ठरत नाही का ?
४. लेखनशैली :
पुलंनी एकुणच "जे लिहले ते आवडले ह्यापेक्षा जे आवडेल तेच लिहले" असे सुत्र लेखन करताना पाळले असा मतप्रवास आहे. पुलंचे बरेच किस्से, विनोद, मधु गानुंनी लिहलेल्या आठवणी वगैरे विचारात घेतल्या तर हे चक्क "लोकांना आवडेल तेच " लिहले असे पुसटसे का होईना पण जरुर दिसते.
"मुंबईकर, पुणेकर, नागपुरकर" ह्या लेखात त्यांनी तिथल्या माणसाच्या "जिव्हाळ्याचे विषय" निवडुन त्याच अनुषंगाने लेखन केले. इतर सर्वसामान्य बाबींकडे चक्क दुर्लक्ष झाले.
उदा : पुणेकरांचा "जाज्वल्य अभिमान" ही जरी लोक चेष्टेची बाब समजत असले तरी हीच गोष्ट आतुन कुठेतरी पुणेकराला सुखावुन जाते व ह्याचे भांडवल केल्याने गैर-पुणेकर आनंदाने टाळ्या पिटतात.
"नंदा प्रधान" हा तर "कल्पनतेला समॄद्ध प्रातीनिधीक मराठी माणुस" ...
त्या काळी बर्यापैकी निम्न-मध्यमवर्गात वाढत असलेल्या सामान्य मराठी माणसाची सुप्त इच्छा ही "नंदा प्रधान टाईप" जीवन जगन्याची होती, जे कल्पनेत आहे तेच समोर दिसल्याने स्वाभावीकच हा भाग उचलला गेला ह्यात आश्चर्य नाही.
तेच उदाहरण "बबडु अथवा तो " ह्या व्यक्तीरेखांचे. जरी आपण तसेच असावे अशी इच्छा नसली तरी एक सुप्त "आकर्षण" नक्कीच होते ह्या वर्गाबद्दल. सामान्य माणसांचा ह्या लोकांशी क्वचितच संबंध येई त्यामुले लिखाणातुन हे खुसखुषीत शैलीत वाचायला मिळाल्याने ते हीट न झाल्यासच नवल ...!
तर वर उल्लेखल्या व इतर अनेक मुद्द्यांचा आधारे आपल्या "पुल व लोकाश्रय" ह्यावर काथ्याकुट करता येईल, नव्हे तशी अपेक्षा आहे.
**** डिस्केमर ***
१. वर उल्लेखले गेलेले सर्व विचार माझेच आहेत असे नव्हे, मी त्याच्याशी समहत असेनच असेही नाही. विवीध ठिकाणी वाचलेल्या व ऐकलेल्या मतांचे संक्षेपाने सादरीकरण आहे.
२. इथे "शुद्ध चर्चा" अपेक्षीत आहे. तुमच्या प्रमाणे मी सुद्धा पुलंभक्त असल्याने चर्चा फक्त "मुद्द्यांवरच" करावी. इतर अनाठायी आदळआपट, आक्रस्ताळेपणा वगैरे माझ्या दॄष्टीने शुन्य किमतीची आहे. संपादकांनी असे काही दिसल्यास योग्य कॄती करावी ही अपेक्षा कारण विषय संवेदनाशील आहे.
३. शक्यतो चर्चा "लिखाणावरचा" झाल्यास उत्तम ...
***** डिस्केमर संपले ****
प्रतिक्रिया
10 Feb 2009 - 12:58 pm | महेंद्र
अतिशय उत्कृष्ट लेख आहे..
परंतु कॄत्रिमताता वाटण्याचं कारण म्हणजे आज समाजामधे जो बदल झाला आहे त्या मुळे सगळं काही खोटं वाटतं.
कदाचित तेंव्हाच्या परिस्थीती प्रमाणे ते योग्य असेल..
म्हैस ही गोष्ट वाचली तर जाणवतं की प्रत्येक पात्र आपल्या नेहेमी च्या पहाण्यातलं आहे. तसंच काहीस नारायण, रावसाहेब इत्यादी मधे वाटतं.
असा मी असा मी मधे जे काही लिहिलंय कदाचित तेंव्हाची परिस्थीती तशिच असावी. आजकाल मोठ्या शहरामधे आपल्याच बिल्डिंग मधे शेजारी कोण रहातो ते पण माहिती नसते. कदाचित तेंव्हाची परिस्थिती त्यांनी पुस्तकात लिहिलं तशिच असण्याची शक्यता आहे.आजच्या बदललेल्या समाजमुल्यांमुळे आपल्याला ते 'खोटं' वाटतं..
त्यांनी जे काही लिहिलं ते "वास्तवीकतेच्या जवळ" जाणारे होते की "कॄत्रीम" हे तर नक्की सांगणं कठिण आहे.
२. पुलंच्या व्यक्तीरेखांचा तोंडावळा :- सहमत...
३. वास्तविकतेशी फारकत :
कम्युनिस्टांचा त्या काळातलं बिहेविअर जरा संशयातितच होतं , जेंव्हा चायना ने आक्रमण केले तेंव्हा १९६२ ......असो..... तो विषय निराळा. कदाचित वाद नको , म्हणुन त्यांनी कम्युनिझम ला लिहितांना बाजुला ठेवलं असावं..
४. लेखनशैली : सहमत...
10 Feb 2009 - 2:00 pm | भडकमकर मास्तर
बिहेविअर जरा संशयातितच
अर्थाप्रमाणे अंदाज केल्यास तुम्हाला संशयास्पद असं म्हणायचं असावं...की दुसरे काही??
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
10 Feb 2009 - 2:13 pm | नितिन थत्ते
'चाळीतील जीवन' या विषयावर मराठी साहित्यात बरेच काही लिहिले गेले आहे. अजूनही मिपा सारख्या संकेत स्थळांवर सदस्य आपल्या बालपणीच्या आठवणी वगैरे लिहितात त्यांतही या चाळीतील जीवनाचे थोडे ग्लोरिफाईड चित्रण असते.
व पु काळे हे कदाचित पहिले लेखक असतील ज्यांनी चाळीतील जीवनाची कुचंबणा आपल्या कथांमधून मांडली
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
10 Feb 2009 - 2:20 pm | भडकमकर मास्तर
डॉन्याचा लेख आवडला...
अवांतर :
पुलंवर जब्बार पटेलांनी केलेल्या फिल्ममध्ये त्यांना असा प्रश्न विचारला होता की तुम्ही एकाच प्रकारचं लेखन जास्त करत राहिलात ...त्यावर त्यांनी त्यात सांगितलं आहे ," मी कामगार चळवळ किंवा दलित चळवळींबद्दल लिहिलं नाही कारण मी ते अनुभवलं नाही... मी अनुभवलं तेच लिहिणार ..."
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
10 Feb 2009 - 3:51 pm | महेंद्र
बरोबर.. संशयास्पदच म्हणायचं होतं मला.. केवळ विषय डायव्हर्ट होउ नये म्हणुन कम्युनिझम वर जास्त लिहिलं नाही.
10 Feb 2009 - 5:00 pm | ऍडीजोशी (not verified)
१. असे म्हणतात की पुलंनी त्यांच्या बर्याच साहित्यात "सर्वसामान्य मराठी माणसाचे आयुष्य कॄत्रीम वाटावे " असे सर्वांसमोर मांडले :
असं कोण म्हणतं? ज्यांनी चाळीतले, कोंकणातले जीवन कधी अनुभवले नाही ते की पु. लं. च्या लिखाणातून सातत्याने येणार्या मध्यमवर्गीय उच्चवर्णीयांवर आसूड ओढणारे सुधारतावादी चळवळीतले स्वयंघोषीत 'सोशल रिफॉर्मर्स'?. कारण ज्या वेळी पु. लं. नी धोंडोपंत जोशी चाळीतून ब्लॉक मधे गेलेले दाखवले त्याच वेळी कोंकणात हालाखीत जगणारे अंतू बर्वे ही दाखवले.
आता आपण बटाट्याची चाळ, असा मी असामी अथवा व्यक्ती आणि वल्ली मधील काही पात्रे उदाहरणादाखल घेतली तर ह्या मुद्द्याचे विवेचन करता येईल. पुलंनी इथे वर्णन केलेले समाजजीवन त्या काळातल्या "चाळीत राहणार्या मराठी माणसाला" केंद्रबिंदु ठरवुन केलेले दिसते.
बटाट्याची चाळ मधे चाळीतलीच लोकं असणार. बाकी पात्रांबद्दल बोलाल तर ती ज्या ज्या समाजातून आली त्या त्या समाजातल्या लोकांचं यथार्थ चित्रण त्यांच्यात आहेच. पारशी लोकांशी माझा संबंधा आला नाही म्हणून पेस्तन काका वाचून असे पारशी नसतातच असं म्हणणं नक्कीच चूक आहे.
इथे चाळीत राहणारा नायक, त्याचे कुटुंब व त्यांचे शेजारी आप्त वगैरे ह्यांचे अतिशय उत्तम वर्णन पुलंनी केले आहे पण ह्यात कुठेतरी "कृत्रीमता" वाटते आहे. कारण वास्तवात हे जरी अस्तित्वात असले तरी हे "असेच" आहे असे नाही. इथे पुलंनी चाळीचे समाजजीवन, सांस्कॄतीक हालचाल, नातेसंबंध ह्यांचे वर्ण केले आहे पण ते खरोखरच वास्तवात "असेच" होते का हा प्रश्न आहे. मराठी माणसाच्या अपेक्षेत "हे जसे असायला हवे होते" तसे पुलंनी लिहले पण त्या नादात इथे त्यांची वास्तवीकतेशी नाळ तुटली गेली.
उदा : "असा मी असामी " धोंडोपंत जोश्यांची चाळीपासुन ते ऐशाआरामी फ्लॅटपर्यंत वाटचाल व त्या अनुषंगाने त्यांच्यात व त्यांच्या कुटुंबात घडत गेलेले बदल. हे बदल सामाजीक, सांस्कॄतीक, संस्कारातले, नातेसंबंधातले होते. इतक्या का वेगाने माणुस बदलत जातो ? जागीतीकीकरणामुळे प्रगतीचा वेग जरी मान्य केला तरी इथे घडणारे बदल तोंडात बोट घालायला लावण्याइतके धक्कादायक होते.
१००% चूक. हेच आपणही आज-काल अनुभवत आहोत. मुलांची शिक्षणं सुरू असे पर्यंत १ बि.एच्.के मधे रहाणार्या मध्यमवर्गीय लोकांचं मुलांची शिक्षणं होताच / परदेशात जाताच काही वर्षातच रहाणीमान लगेच उंचावतं, घरी गाडी येते. हे अर्थातच ज्या लोकांबद्दल पु.लं. नी लिहीलं त्यांच्याच बाबतीत घडतंय. आणि ह्याच वेळी अजूनही हालाखीत जगणारी लोकं आहेतच. पु.लं. नी समाजाच्या एक भाग असलेल्या लोकांबद्दल लिहीलंय. त्यामुळे ते त्या वेळच्या संपूर्ण समाजाचं प्रातिनीधीक लिखाण नाहिये. त्यावेळच्या चाळकरी मध्यमवर्गीयांचं नक्कीच आहे. चाळीच्या एका खोलीतून २ बेडरूमचा फ्लॅट आणि गाडी ही वाटचाल माझ्या सख्ख्या काकाच्या घरात घडली आहे त्यामुळे ज्यांना असं होणं कॄत्रीम वाटतं त्यांनी कॄपया दिवे घ्यावेत.
त्या काळी प्रत्येक चाळीत राहणार्या मराठी माणसाची तिथुन उठुन फ्लॅटमध्ये रहायला जायची इच्छा होतीच, नव्हे त्यासाठीच त्याची धडपड चालु असायची. पुलंनी ही मानसीकता बरोबर पकडली व त्या अनुषंगाने लिखाण केले जे प्रत्येक माणसाला "हवेहवेसे" वाटले पण दुर्दैवाने "कॄत्रीम" वाटावे असे होते.
होतीच आणि ते १००% खरं आहे. त्या वेळी गिरगाव आणि दादर मधून मोठ्याप्रमाणावर चाळकरी लोकं बोरिवली / डोंबिवली / ठाणे इत्यादी परिसरात स्थलांतरीत झाली.
२. पुलंच्या व्यक्तीरेखांचा तोंडावळा :
भडकमकर मास्तरांच्या प्रतिसादात ह्याचे उत्तर आले आहे.
३. वास्तविकतेशी फारकत :
मुद्दा क्र. १ ला दिलेली उत्तरं वाचावीत.
४. लेखनशैली : पुलंनी एकुणच "जे लिहले ते आवडले ह्यापेक्षा जे आवडेल तेच लिहले" असे सुत्र लेखन करताना पाळले असा मतप्रवास आहे. पुलंचे बरेच किस्से, विनोद, मधु गानुंनी लिहलेल्या आठवणी वगैरे विचारात घेतल्या तर हे चक्क "लोकांना आवडेल तेच " लिहले असे पुसटसे का होईना पण जरुर दिसते.
पु. ल. व्यवसायीक लेखक होते त्यामुळे त्यांनी असे केले असेल तर त्यात काहीच चूक नाही. तसंच त्यांनी पठडीबाहेरचं लिखाणही भरपूर केलं आहे. पण लोकांनाच (सर्वसामान्य जनता, तत्ववेत्ते नाही) ते वाचायला आवडत नसल्याने ते जास्त प्रकाशात आलं नाही. पु.लं. ची इतर पुस्तकं वाचलेली लोकं आणि 'एक शून्य मी' वाचलेली लोकं ह्यांच प्रमाण पाहिल्यास कारण कळेल.
तसंच लोकांनी पु.लं. ना मानधन देऊन 'तुम्ही लिहा, आम्ही तुमचं घर सांभाळतो' असं न म्हटल्याने काय लिहावं काय नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे.
10 Feb 2009 - 6:53 pm | शितल
>>>>पु. ल. व्यवसायीक लेखक होते त्यामुळे त्यांनी असे केले असेल तर त्यात काहीच चूक नाही. तसंच त्यांनी पठडीबाहेरचं लिखाणही भरपूर केलं आहे. पण लोकांनाच (सर्वसामान्य जनता, तत्ववेत्ते नाही) ते वाचायला आवडत नसल्याने ते जास्त प्रकाशात आलं नाही. पु.लं. ची इतर पुस्तकं वाचलेली लोकं आणि 'एक शून्य मी' वाचलेली लोकं ह्यांच प्रमाण पाहिल्यास कारण कळेल.
तसंच लोकांनी पु.लं. ना मानधन देऊन 'तुम्ही लिहा, आम्ही तुमचं घर सांभाळतो' असं न म्हटल्याने काय लिहावं काय नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे.
सहमत.
डॉन्या तु व्यवस्थित मुद्देसुद लिहिले आहेस. पण काही ठिकाणी तुझ्या मुद्यांशी अशंतः सहमत त्याचे कारण ऍडीजोशीच्या ह्या वरच्या परिच्छेदात आहे.
10 Feb 2009 - 7:02 pm | छोटा डॉन
>>पण काही ठिकाणी तुझ्या मुद्यांशी अशंतः सहमत त्याचे कारण ऍडीजोशीच्या ह्या वरच्या परिच्छेदात आहे.
ऍडीने जे काही मुद्दे मांडले आहे त्यातल्या काही मुद्द्यांना व सर्वात महत्वाचे म्हणजे "कॄत्रीमतेच्या" मुद्द्याला आत्ताच मी खाली एक सविस्तर प्रतिसाद टाकुन उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे ...
तो वाचुन पहावा एकदा, त्यातले काय "पटले नाही" हे ही आवश्य कळवावे.
बाकीच्या मुद्द्यांवर विस्तारीक व सविस्तर प्रतिसाद चर्चा रंगत गेल्यावर अथवा समारोपाला देईन ..
बाकी "असहमत" असण्यानेच चर्चा पुढे जाते असे असल्याने आपण असहमत असल्याबद्दल काही वेगळे वाटले नाही.
असो, बाकी सवडीने.
------
छोटा डॉन
11 Feb 2009 - 7:54 am | यशोधरा
ऍडी, तुला १००% अनुमोदन!
10 Feb 2009 - 5:52 pm | मुक्तसुनीत
छोटा डॉन यांचे , एक उत्कृष्ट लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि अनेक आभार.
काही वेळाने सविस्तर प्रतिक्रिया लिहिण्याकरता ही जागा राखीव ठेवत आहे !
10 Feb 2009 - 5:54 pm | सिद्धेश
असा मी असामी " धोंडोपंत जोश्यांची चाळीपासुन ते ऐशाआरामी फ्लॅटपर्यंत वाटचाल व त्या अनुषंगाने त्यांच्यात व त्यांच्या कुटुंबात घडत गेलेले बदल. हे बदल सामाजीक, सांस्कॄतीक, संस्कारातले, नातेसंबंधातले होते. इतक्या का वेगाने माणुस बदलत जातो ? जागीतीकीकरणामुळे प्रगतीचा वेग जरी मान्य केला तरी इथे घडणारे बदल तोंडात बोट घालायला लावण्याइतके धक्कादायक होते.
१००% चूक. हेच आपणही आज-काल अनुभवत आहोत. मुलांची शिक्षणं सुरू असे पर्यंत १ बि.एच्.के मधे रहाणार्या मध्यमवर्गीय लोकांचं मुलांची शिक्षणं होताच / परदेशात जाताच काही वर्षातच रहाणीमान लगेच उंचावतं, घरी गाडी येते. हे अर्थातच ज्या लोकांबद्दल पु.लं. नी लिहीलं त्यांच्याच बाबतीत घडतंय. आणि ह्याच वेळी अजूनही हालाखीत जगणारी लोकं आहेतच. पु.लं. नी समाजाच्या एक भाग असलेल्या लोकांबद्दल लिहीलंय. त्यामुळे ते त्या वेळच्या संपूर्ण समाजाचं प्रातिनीधीक लिखाण नाहिये. त्यावेळच्या चाळकरी मध्यमवर्गीयांचं नक्कीच आहे. चाळीच्या एका खोलीतून २ बेडरूमचा फ्लॅट आणि गाडी ही वाटचाल माझ्या सख्ख्या काकाच्या घरात घडली आहे त्यामुळे ज्यांना असं होणं कॄत्रीम वाटतं त्यांनी कॄपया दिवे घ्यावेत.
----------------------------------------
सहमत
मी स्वत: कोकणात राहातो. आणि पु ल नी वर्णन केलेले कोकण आणि आताचे कोकण
यात पुष्कळ फरक असला तरी असे कोकण एके काळी अस्तित्वात होते हे मला माझ्या
आजीकडून समजले.
10 Feb 2009 - 6:54 pm | छोटा डॉन
चर्चा प्रस्तावाला कुणीतरी अमान्य असणे ह्यातुनच चर्चा पुढे जाते असे असल्याने मी आपल्या "असहमत असण्याशी सहमत" आहे ..
बर्याच जणांना हा मुद्दा "चुक अगर अयोग्य" वाटत असल्याने मी ह्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन ..
>>हेच आपणही आज-काल अनुभवत आहोत.
अंशतः सहमत.
साहेब, सध्याच्या तंत्रज्ञातील विकासाचा वेग व त्या काळातील वेग ह्याची तुलना केली तर बर्याच गोष्टी स्पष्ट होतील.
पुर्वी ज्या गोष्टींचा शोध लागायला अगर विकास व्हायला ३०-४० वर्षे जायची तीच बाब आता मात्र ३-४ वर्षाच्या कालखंडात अगदी आरामात घडताना दिसत आहे. माझा विरोध हा विकास होण्याला नाहीच आहे, तो आहे ज्या वेगाने विकास झाल्याचे चित्र मांडले गेले आहे त्याला.
>>मुलांची शिक्षणं सुरू असे पर्यंत १ बि.एच्.के मधे रहाणार्या मध्यमवर्गीय लोकांचं मुलांची शिक्षणं होताच / परदेशात जाताच काही वर्षातच रहाणीमान लगेच उंचावतं, घरी गाडी येते.
पुन्हा एकदा अंशतः सहमत.
वरच्या अधोरेखीत शब्दांकडे जर आपण पाहिले तर असे दिसते की मुलांची अथवा स्वतःची "परदेशवारी अथवा चांगल्या संधी" ह्या उत्तम उत्पन्नाला व पर्यायाने जीवनमान स्तर उंचावण्याला कारणीभुत असतात. माणुस परदेशवारी करुन आला की त्याचा "लिव्हिंग स्टँडर्ड" वाढतो ह्यात शंका नाही पण ही परिस्थीती तेव्हा कुठे होती ? आज जसे सामान्य कर्मचारीसुद्धा परदेशी जाताना दिसतात तसे आधी सुद्धा शक्य होते का ? आपल्या समोर अशी किती उदाहरणे आहेत ?
असो. परदेशाचे सोडुन द्या ....
आपण विचार करु की नोकरीतील बढती व त्यामुळे पर्यायाने आलेले उच्च जीवनमान. तसे पाहिले तर त्या काळी "सामान्य कारकुनाच्या" नोकरीतुन मिळणारे उत्पन्न एवढे उणेपुरे असायचे की त्यात मुश्कीलीने घरखर्च सांभाळला जायचा, अगदी सहकुटुंब नाटक वगैरे पाहणे ह्या गोष्टी चैनीच्या सदरात मोडत. मग त्यात "शिल्लक" ती किती अशी पडायची ? शिवाय तुम्ही कोकणातुन वरचा पैसा येत होता असे म्हणाल तर त्यांच्या लिखाणात वर्णन केल्याप्रमाणे उलट इथुनच "मनीऑर्डरी" कोकणात जायच्या.
समजा बढती वगैरे अशा गोष्टी गॄहीत धरल्या तरी त्यामुळे होणारे "उत्पन्नातील वाढ" ही फार नव्हती, आजच्या इतकी जाणवेल अशी मुळीच नव्हती. माझे म्हणणे इतकेच आहे की त्यांच्या सुरवातीच्या आयुष्यातील पगार व निवॄत्तीच्या वेळेसचा पगार ह्यांच्यातला फरक त्यावेळच्या रुपयांच्या "क्रयशक्तीशी" तुलना करुन पाहिला तरी आजच्या काळातल्या फरकाच्या पासंगाला पुरणार नाही. त्या काळीही लोक जमिन जुमला, शेतीवाडी, बंगले, गाड्या वगैरे घेत पण एका सामान्य कारकुनाची ही सहजच झालेली प्रगती मला तरी तोंडात बोट घालायला लावते अगदी त्या काळी जे काही अस्तित्वात असेल त्या जागतीकीकरणाचा संदर्भ लावला तरीही ...
एका सामान्य कारकुन म्हणुन सुरवात करणार्या, चाळीत राहणार्या माणसाच्या आयुष्यात जास्त काही "खास" न करता केवळ कार्यालयातील "बढत्या" ह्यांचा हिशोब जर पकडला तर ही सहजचपणे झालेली प्रगती मला तरी धक्कादायक वाटते.
समजा आपण आर्थीक बाबी सोडुन दिल्या तरी त्यांच्यात इतर झालेले "सामाजीक, सांस्कॄतीक, वैचारीक, वर्तनशील" बदल ह्याबद्दल आपले काय मत आहे ?
मिळणार्या वाढत्या उत्पन्नामुळे राहणीमान उंचावले तरीही हा वारसा आहे तसाच राहतो असे माझे आहे.
मुलांच्या वागण्या बोलण्यातला फरक, बायकोच्या सामाजीक जेवनातला फरक जसे की चाळीतल्या बायकांना टान क्लबात जाणे, पेपरात फोटो येणे , व्याख्यानाला प्रमुख आयोजक म्हणुन उपस्थीत राहणे हे बदल "त्या काळच्या सामान्य मराठी जनांच्या" बर्यापैकी आवाक्याबाहेरचे आहेत. आता कादंबरी ही "सामान्य माणसाबद्दल" आहे म्हनुन हे ठळकपणे जाणवते.
उद्या जर कुणी हेच एका "असामान्य नेत्याबद्दल,पुढार्याबद्दल, संशोधकाबद्दल, डोक्टरबद्दल " लिहले तर ते कदाचित पटेल सुद्धा, पण "कारकुन" म्हणुन सुरवात करणार्या माणसाची एवढी सहजपणे झालेली प्रगती मला जास्त पटत नाही.
हे पहा साहेब, हे असे व्हावे ही प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकजण त्यासाठीच झटत असतो. पण मर्यादा येतात त्या सुरवात कुठुन झाली आअहे, भोवतालची परिस्थीती काय आहे, संधी कशा आहेत, जागतीकीकरणाचा विकास त्यांच्यापर्यंत पोहचला आहे काय ह्या सर्व बाबींना. नेमका इथेच "सामान्य कारकुनाचे चाळीतुन ऐशोआरामी फ्लॅटमध्ये रहायला जाणे व जीवनस्तरात अगणित बदल घडणे" हे खटकते. त्या काळच्या "विकासाच्या संधी" ह्या आजच्या इतक्या सर्वसुलभ नव्हत्या ह्या गॄहीतकातुन मी हे सर्व मांडतो आहे.
>> त्यामुळे ते त्या वेळच्या संपूर्ण समाजाचं प्रातिनीधीक लिखाण नाहिये. त्यावेळच्या चाळकरी मध्यमवर्गीयांचं नक्कीच आहे.
मान्य, तेच तर मी म्हणतो आहे.
चाळकरी निम्न मध्यमवर्गीयात होणारे सहज बदल मला धक्कादायक वाटले.
का ?
ते मी वर लिहले आहे.
>>चाळीच्या एका खोलीतून २ बेडरूमचा फ्लॅट आणि गाडी ही वाटचाल माझ्या सख्ख्या काकाच्या घरात घडली आहे त्यामुळे ज्यांना >>असं होणं कॄत्रीम वाटतं त्यांनी कॄपया दिवे घ्यावेत.
दिवे घेतले .... धन्यवाद ...!
शक्य आहे हो, मी कुठे नाही म्हणतो आहे.
मुळात "चाळीच्या एका खोलीत" राहणारे म्हणजे "गरिबच" अशी चुकीची संकल्पना आपण मांडता आहात, मी त्याबद्दल बोलतच नाही आहे.
पण चाळीत राहणार्या, अगदी बेताचीच परिस्थीती असणार्या, स्वतःच्या एकट्याच्या कारकुनीच्या पगारावर घरखर्च चालवणार्या माण्साच्या आयुष्यात "त्या काळच्या" परिस्थीतीत एवढे बदल सहजपणे घडु शकत नाहीत असे माझे मत होते आणि आहे.
शिवाय त्यात फक्त "धोंडोपंत जोश्यांचेच उत्पन्न" आपण गॄहीत धरतो आहोत ही महत्वाची बाब आहे, बाकी ह्यांचा उल्लेख नाही.
असो.
वास्तविक पाहता ही चर्चा जशी वाढत जाईल तसे अजुन मते मांडायचे मी ठरवले होते पण बरेच लोक "एकाच मुद्द्याला" केंद्रबिंदु ठरवुन आपले मत देऊ लागल्याने मला इथे माझे स्पष्टीकरण गरजेचे वाटले.
बाकीचे आता चर्चा रंगत गेल्यावर अथवा डायरेक्ट चर्चेच्या "समारोपाला" ...!
धन्यवाद ...!
------
छोटा डॉन
10 Feb 2009 - 10:33 pm | ऍडीजोशी (not verified)
का चावतोयस.........?????? की तुला कुणी (तात्वीक रित्या) चावलंय..????????
10 Feb 2009 - 7:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छोटा डॉन,
मस्त विषय काथ्याकुटाला ! मानवी जीवनातील उणिवा, भकासपणा, अशा काही व्यथांची उकल अतिशय विनोदी वृत्तीने पुलंनी केली. विनोदाचा एवढा निर्व्याज, सरळ, साधा आणि सहज अविष्कार इतरत्र सापडणे शक्य नाही.
बाकी त्यांचे लेखन कॄत्रीम किती आणि वास्तव किती त्याला कल्पनेची जोड किती हा भाग सोडून द्या ...मात्र तसे असले तरी त्यांच्या लेखनातील माणसे आपल्या आजूबाजूला वावरतांना दिसतात. जेव्हा आपण बटाट्याची चाळ वाचतो तेव्हा ती सर्व मंडळी आपल्याला हवीहवीशी वाटतात, ती मंडळी आजूबाजूला वावरतांना दिसते. बटाट्याची चाळीतील 'निष्काम साहित्यसेवा'वाचले तर बरेच काही ध्यानात यावे, पुलं लिहितात ' वास्तववादी वाड;मय लिहितांना पात्रांचे हात अंगावर सहजासहजी पडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी' याचाच अर्थ असा की, ते कुठेतरी आहे. आणि ते आपल्या लेखनीने व्यक्त करतात.
''अनेक व्यक्तीरेखांचा तोंडावळा सरळसरळ "ब्राम्हणी"होता ह्यात वाद नाही. साधारणता ३०-४० वर्षांपुर्वीचा काळ जर लक्षात घेतला तर त्या काळचा वाचकवर्ग हा प्रामुख्याने "ब्राम्हण वा इतर उच्चवर्णीय समाज" होता, ह्या समाजाला लेखनात आपलेच प्रतिबिंब दिसले व त्यामुळे हे साहित्य त्यांना आपले वाटले असा एक मतप्रवाह आहे''
शब्दा-शब्दाशी सहमत आहे !
भडकमर मास्तरांच्या प्रतिसादातील एक वाक्य घेतो 'मी कामगार चळवळ किंवा दलित चळवळींबद्दल लिहिलं नाही कारण मी ते अनुभवलं नाही... मी अनुभवलं तेच लिहिणार ..." खरं तर इथे जराशी पुलंवर शंका घ्यायला हरकत नाही. जे अनुभवले ते मांडणे आणि जे पाहूनही न मांडणे या बाबतीत त्यांनी काही सामाजिक व्यवस्थेकडे मुद्दामहून दुर्लक्ष तर केले नाही ना ? असा विचार येणे शक्य आहे. मला वाटतं ' गोलपिठा' च्या प्रस्तावनेत (चुभुदेघे) कवितेत येणार्या चाकोरीबाहेरच्या शब्दांबद्दल ते असे म्हणतात की हे शब्द वेगळेच वाटतात. म्हणजे त्यांनी काही ठराविक वर्गांचेच लेखन केले असे म्हणावे लागते.
लेखक लिहितो कोणासाठी ? हा एक सनातन प्रश्न आहे. आणि त्याचे खरेखुरे उत्तरही तितकेच सनातन आहे. लेखक वाचकांसाठी लिहितो ही गोष्ट सुर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. साहित्य वाचले जाण्यातच लेखकाच्या लेखनाची सार्थकता असते आणि तीच त्यांच्या लेखनाची प्रेरणाही असते. तेव्हा वाचतो कोण ? त्यांच्यासाठी लिहिले तर यशस्वी होता येते. या गुणाकडेही आपण दुर्लक्ष करता कामा नये असे वाटते. चर्चेत येणारे प्रतिसाद पाहून वाटलेले खरडत राहीन.
-दिलीप बिरुटे
10 Feb 2009 - 7:32 pm | मुक्तसुनीत
मला वाटतं ' गोलपिठा' च्या प्रस्तावनेत (चुभुदेघे) कवितेत येणार्या चाकोरीबाहेरच्या शब्दांबद्दल ते असे म्हणतात की हे शब्द वेगळेच वाटतात.
"गोलपीठा"ची प्रस्तावना विजय तेंडुलकरांची आहे.
अवांतर , हलके घ्या : तुमच्या वरील वाक्यातील ते म्हणजे "तें" (तेंडुलकरांचे निकटवर्तीयांतील नाव ! ) असे जर का असेल तर तुमचे बरोबर आहे ;-)
10 Feb 2009 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल थॅक्स !
वरील वाक्यातील ते म्हणजे "तें" (तेंडुलकरांचे निकटवर्तीयांतील नाव ! ) असे जर का असेल तर तुमचे बरोबर आहे
हो-हो तसेच म्हणायचे होते !!! ;)
10 Feb 2009 - 10:46 pm | धनंजय
छोटा डॉन यांनी संकलित केलेले मुद्दे पटण्यासारखे आहेत. त्यावरची चर्चा वाचण्यास मी उत्सूक आहे.
मला पुलं यांनीच पी. जी. वुडहाऊस या इंग्रजी विनोदी लेखकावर लिहिलेल्या "पेल्हम" लेखाची आठवण झाली. वुडहाऊसची पात्रे मध्यमवर्गीयांच्या डोळ्यांतून बघितलेला उच्चवर्गाचा समाज होता. म्हणजे ते अनुभवविश्वही संकुचित होते. असे असून वुडहाऊसने खूप-खूप लोकांना आनंद दिला.
सुनिताबाईंनी "आहे मनोहर तरी (मनीं वाटें उदास)" असे सुचवताना सामाजिक जाणिवेबाबत उल्लेख केला आहे. लोकलज्जेसाठी सुनिताबाईंच्या पुरुष-मित्रांचा उल्लेख ते जणू आपलेच मित्र आहेत, असा करत. हे सुनिताबाईंना बोचे, हा तपशील आठवतो.
"मनीं वाटें उदास, तरी आहे मनोहर" असाही विचार मनात येतो.
11 Feb 2009 - 6:58 am | विंजिनेर
सहमत आहे. खुद्द पुलंनी सुद्धा "चार शब्द" (का "अघळपघळ"? चु.भु.दे.घे.) आपल्या लिखाणाची वुडहाउसच्या लिखाणाशी केलेल्या तुलनेत हा उल्लेख केलेला आहे
("...आम्ही कितीही विनोदी लिहीतो असे लोकांनी कौतुक केले तरी एक वुडहाउस वाचला तरी आपण आपण गल्लीतले ब्रॅडमन आहोत याची जाणीव होते..").
आणि शिवाय अशीही खंत व्यक्त केली आहे की
"मी आता पर्यंत केलेले लिखाण लोकांना आवडले असले तरी जे लिहायचे राहून गेले त्याबद्दल वाटणारी खंत कोणाला सांगायची? आणि सांगितली तरी पटेल काय?"
त्यामुळे पुलंनी मध्यमवर्गीयांबद्दल जे काही लिहिलेले आहे तेवढेच त्यांना लिहायचे होते किंवा लिहायला जमले असे म्हणता येणार नाही. बाकी मुद्द्यांचे समर्थन प्राजू/एडी इ.च्या प्रतिक्रियांमधून आले आहेच.
विंजिनेर
10 Feb 2009 - 11:29 pm | प्राजु
सर्वप्रथम डॉन्याचे अभिनंदन!.
पु. ल. एक संस्था होते. व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्.. असं म्हणतात ते पुलं च्या बाबततही खरं आहे.
पुलंनी जे अनुभवलं तेच लिहिलम यात शंकाच नाही. अंतु बर्वा, नारायण, रावसाहेब्...किंवा असा मी असामि मधले धोंडोपंत जोशी. पात्रांचे मुखवटे जरी ब्राह्मणी असले तरि सर्वसाधारण माणूस मग तो बाह्मणेतर असला तरी थोड्याफार फरकाने त्याला त्या पात्रामध्ये स्वतःचे चित्र दिसले.
विचारच करायचा झाला तर सखाराम गटणे ( मिपाचा नव्हे) या पात्रात, त्यांनी गटणेच्या वडीलांचं पात्र जे रंगवलं त्या पात्राच मुखवटा ब्राह्मणी नक्कीच नव्हता. किंवा, सरसकट त्यांनी संस्थेचा चिटणीस, किंवा शाळेच्या कार्यालयातला कारकून यांची पात्र त्यांच्या हुद्द्या प्रमाणेच रंगवली.
जसे शंकर पाटलांनी, (कदाचित मी आता जातीवर बोलते आहे असे म्हणाल) पण त्यांच्या बघण्यात, बोलण्यात, सहवासात जी लोकं आली त्यांच्या स्वभावावरून पाटलांनी आपल्या कथेतील पात्र रंगवली, त्यांची भाषा रंगवली. पुलंच्या बघण्यात, बोलण्यात, सहवासात जर ब्राह्मणेतर किंवा कामगार ई.जर तुलनेने कमी आले असतील तर यात त्याचे काही चुकीचे आहे असे म्हणता येत नाही.
पुलं नी साध्या चाळीत राहणार्या माणसाचे ब्लॉक मध्ये गेल्यावर होणारे बदल हे ढोबळपणे मांडले आहेत. त्यात कदाचीत थोडीफार अतिशयोक्ती असू शकेल. पण हे होणारे बदल अवास्तव मात्र नाहीत. काका चं अंकल होणं, किंवा, बाबाचं फादर होणं.. हे त्यांनी केवळ प्रतिक म्हणून वापरलं असावं.
माझ्य आजीकडे असलेली कामवाली, जेव्हा तीने तिची तट्ट्याची झोपडी पाडून सिमेंटची एक खोली बांधली, तेव्हा ती आजीला जे सांगत होती ते मी माझ्या प्रत्यक्ष कानानी ऐकलं आहे आणि डोळ्यांनी पाहिलं आहे .. ती म्हणत होती, "आज्जी... अवं आता यवडं घर बांदलो.. तर नीट रहाया नगं व्हय? मी पंदरा रूप्पयच्या खालचा साबन वापरत्च न्हाय बगा.."(तेव्हा लक्स चा साबण सगळ्यात महाग म्हणजे १५ रूपये होता.) हे ऐकल्यानंतर पुलंनी लिहिलेले बदल अवास्तव वाटत नाहीत.
वास्तविकतेशी फारकत :
याबद्दल मी काहिच बोलू शकत नाही. पुलं नी जसे बंगाली दाखवले मी तसेच पाहिले, त्यांनी जसे पेस्तनकाका दाखवले मी तसेच पाहिले.
लेखनशैली :
याबाबत बोलायचं तर.. जे जे उत्तम उदात्त उन्नत.. ते तेच पुलंनी घेतलं. उद्या काश्मिरात जाऊन मी जर... श्शी.. इथे हापूस आंबे मिळतच नाहीत असा धोसरा लावला तर मला नक्कीच वेड्यात काढतील. काश्मिर बद्दल बोलायचे तर तिथल्या केसराबद्दल, सफरचंदांबद्दल बोलावं. कोकणांत, आंबा, फणस, काजू यांच्याबद्दल बोलावं. त्याप्रमाणे पुणेकर, नागपूरकर आणि मुंबईकर... त्यांना जे विषय आनंद देतात किंवा त्यांचा अभिमान जागृत करतात त्यांच्याबद्दल पुलंनी लिहिलं. आणि जे लिहिलं ते त्या गावच्या कट्टर माणसाबद्दल लिहिलं. कट्टर पुणेकर, कट्टर नागपूरकर...
जिव्हाळ्याचे विषय हे नेहमीच स्पेशल असतात म्हणून ते जिव्हाळ्याचे असतात. कोल्हापूरी मिसळ मला जिव्हाळ्याची आहे.. त्याबद्दल लिहिताना मी भरभरूनच लिहिणार यांत तीळ मात्र शंका नाही.. नसावी. हाच नियम पुलंच्या लेखनालाही लागू होतोच.
सध्या इतकेच.. पुढचे मुद्दे मांडेन हळूहळू.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Feb 2009 - 6:35 am | प्रमोद देव
'असा मी' तला धोंडोपंत जोशी हा जरी कारकून असला तरी तो एका इंग्लिश कंपनीतला कारकून आहे हे लक्षात घ्या. तेव्हा सरकारी कारकुनापेक्षा त्याचा पगार केव्हाही जास्तच असणार, किंबहुना तो होताच. तसेच ती कंपनी एका शेट्याने ताब्यात घेतल्यावर धोंडोपंतांना बढती मिळाली आणि त्यांचा पगारही वाढला. हे सगळे पाहता पुलंनी जे लिहीलंय ती वास्तवताच आहे असे माझे ठाम मत आहे. अशी शेकडो उदाहरणे मी पाहिलेली आहेत.
पुलंनी रेखाटलेली बहुसंख्य पात्र कमी जास्त प्रमाणात माझ्याही पाहण्यात आलेली आहेत. तसेच त्यांचे संवादही पदोपदी अनुभवाला येत असतात. माझ्या मते पुलंनी जे लिहीलं ते आपल्या आजुबाजूला घडणारंच लिहीलं आणि अतिशय मनोरंजक पद्धतीने लिहीले.
खरे तर आपल्याही आजूबाजूला अशी पात्रे आपल्याला नक्कीच आढळत असतात; मात्र ती टिपण्याची पुलंसारखी दृष्टी आपल्याजवळ नाही हेच खरे.
बाकी तुमचे चालू द्या.
11 Feb 2009 - 6:44 am | घाटावरचे भट
बरोबर. आणि बढती मिळाली ती सुद्धा साधीसुधी नाही तर थेट चीफ अकाउंटंटची. पगार एकदम वाढणं साहाजिक आहे. उद्या जर एखाद्या छोट्या स्टार्टअपमधे काम करणार्या सॉफ्टवेअर इंजिनीयरला जर कंपनी टेकओव्हर झाल्यावर जर एकदम प्रोजेक्ट मॅनेजरची बढती मिळाली तर आपल्याला कदाचित एवढा अचंबा होणार नाही, जेवढा पुलंनी लिहिलेलं वाचून होतोय.
11 Feb 2009 - 7:03 am | विसोबा खेचर
माझ्या मते पुलंनी जे लिहीलं ते आपल्या आजुबाजूला घडणारंच लिहीलं आणि अतिशय मनोरंजक पद्धतीने लिहीले.
खरे तर आपल्याही आजूबाजूला अशी पात्रे आपल्याला नक्कीच आढळत असतात; मात्र ती टिपण्याची पुलंसारखी दृष्टी आपल्याजवळ नाही हेच खरे.
प्रमोदकाकांशी सहमत आहे!
आमचे भाईकाका म्हणायचे, 'एखादी गोष्ट आवडली की पटकन दाद द्यावी आणि मोकळं व्हावं, पण ते कशी आवडली नाही किंवा त्यात काय कमीपणा आहे, मर्यादा आहेत,वैगुण्ये आहेत हे लिहिण्याकरता लोकं पानच्या पानं का खरडत बसतात ते कळत नाही!'
वरील चर्चा वाचून आम्हालाही हाच प्रश्न पडला! :)
जाता जाता आम्ही इतकंच सांगू की भाईकाकांनी मराठी माणसाला समृद्ध केला, श्रीमंत करून सोडला!
भाईकाका एक गोष्ट नेहमी सांगायचे ती अशी, की तुम्हाला जर दोन पैसे मिळाले तर एका पैशाचे तुम्ही धान्य आणा आणि एकाचे फूल आणा. धान्य तुम्हाला जगवेल आणि फूल का जगायचं ते सांगेल!
आमच्या आयुष्यात भाईकाकांचं महत्व फार नाही परंतु त्या एका पैशाच्या फुलाइतकं आहे! त्यांनी आमचं जगणं समृद्ध केलं, आम्हाला रसिकता शिकवली!
असो,
बाकी तुमचे चालू द्या.
असे प्रमोदकाकांसारखेच म्हणतो.
इथे कपाळ्याला आठ्या आणि जाड भिंगांचे चश्मे लावलेल्या थोरामोठ्या साहित्य समिक्षकांच्यात आपलं साला काय काम नाय! :)
आपला,
(भाईकाकांचा शिष्य) तात्या.
11 Feb 2009 - 7:15 am | सहज
उत्तम लेख इतकेच म्हणेन.
11 Feb 2009 - 7:26 am | विसोबा खेचर
उत्तम लेख इतकेच म्हणेन.
उत्तम आहे किंवा नाही हे माहीत नाही परंतु या विद्वत्ताप्रचूर लेखाने आमची मात्र फार छान करमणूक झाली! :)
डॉनरावांच्या या लेखाला आमच्या भाईकाकांनीही अगदी मनमुराद दाद दिली असती. हां, आता हा विद्वत्ताजड लेख वाचता वाचता त्यांनाही अंमळ दम लागला असता हा भाग वेगळा! :)
बाकी चालू द्या..
तात्या.
11 Feb 2009 - 11:22 pm | llपुण्याचे पेशवेll
खरे आहे तात्या. मागे सकाळ मधली एक बातमी वाचून आमची अशीच अंमळ करमणूक झाली होती. एकूणच समिक्षेचे महत्व कळल्याने समिक्षा लिहायला पण सुरुवात केली होती.
पण तो ताप लवकरच उतरला. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
11 Feb 2009 - 7:17 am | मनीषा
पु. ल. च्या लेखनात सर्वसामान्य माणसाचे आयुष्य कृत्रिम वाटते हे पटत नाही. त्यांनी पाहिलेले, अनुभवलेले तेच त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या व्यक्तिचित्रातली कित्येक पात्रे आपल्याला समाजात वावरताना दिसतात. त्यांनी त्यांना भेटलेल्या अनेक व्यक्तिंचे गुण / अवगुण एकाच व्यक्तिरेखेत चित्रीत केले आहेत. म्हणुन कदाचित तुम्हाला असे वाटत असेल .. पण इथे आपण लक्षात घेतले पाहिजे कि व्यक्तिरेखा सगळ्या काल्पनिकच आहेत पण त्या जे सांगतात किंवा जे आयुष्य जगतात ते काल्पनिक नाहिये ..हरितात्या, नारायण , रावसाहेब, सखाराम गटणे (आणि त्याचे वडिल सुद्धा) , गुरुदेव ह्या व्यक्ती आपल्याला अगदी जशाच्या तशा नाही ,पण त्यातले काही गुण असलेल्या अशा भेटु शकतात.
लिहिताना थोडे नाटकीय रुप (कृत्रिम नाही) त्यांनी दिले असेल ,तसेच काही काल्पनिक कथा असतील ...... पण ती लेखनाची गरज आहे ... कारण अनुभव जसेच्या तसे लिहिणे म्हणजे डायरी लिहिल्या सारखे होईल आणि सहाजिकच कंटाळवाणे वाटेल .
त्यांचे लेखन ब्राम्हणी होते .... असेल कदाचित पण यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे ? दलित साहित्यिक जे काही लिहितात ते त्यांच्या परिघातलच असतं ना ... मग ब्रम्हणाचे लेखन ब्राम्हणी वाटलं तर बिघडलं कुठे ...
त्यांनी जे लोकांना आवडेल तेच लिहिले हे सुद्धा मान्य नाही ... फार तर तुम्ही असे म्हणु शकाल कि सामान्य मराठी माणसाची आवड आणि पु. ल. सारख्या थोर साहित्यिकाची आवड ही सारखीच होती .
पु.ल. चे साहित्य हे सामान्य जिवनाशी नातं सांगणारं आहे.... त्यात कसलाही आव नाही ... काही भव्य, दिव्य घडवण्याचा अट्टहास नाही..
ते सर्व सामान्य माणसाचेच प्रतिबिंब आहे . त्यात कुठेही कृत्रिमता दिसत नाही ..
सामान्य लोकांच्या जिवनाबद्दल लिहिताना त्यांनीच लिहिलं आहे ... "राजहंसाचे चालणे मोठे डौलदार झाले असेल , पण म्हणुन कावळ्याने काय चालुच नाही कि काय ? "
वास्तविकतेशी फारकत म्हणजे काय ?
नक्षलवादी चळवळ, कम्युनिस्ट इं बद्दल त्यांनी लिहिले नाही ... पण या गोष्टी सामान्य लोकांसाठी किती महत्वाच्या असतात ? तो पु. ल. च्या जिव्हाळ्याचा विषय नसेल कदाचित ..आणि लेखकाला लेखन स्वातंत्र्य असतेच ना ... आता भारताने श्रीलंकेतील एकदिवसिय मालिका जिंकली म्हणुन एखादा अर्थतज्ञ क्रिकेटवर लेख लिहिल का? ...नाही लिहिणार ..मग पु.ल. नी त्या काळात घडत असलेल्या घटनांचा उल्लेख सुद्धा आपल्या लेखनात केला नाही म्हणुन त्यांच्या लेखनात काही त्रुटी राहून गेली असं समजण्याचे कारण नाही ..
11 Feb 2009 - 7:20 am | प्राजु
मनिषाचा प्रतिसाद आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Feb 2009 - 7:29 am | विसोबा खेचर
पु.ल. चे साहित्य हे सामान्य जिवनाशी नातं सांगणारं आहे.... त्यात कसलाही आव नाही ... काही भव्य, दिव्य घडवण्याचा अट्टहास नाही..
अगदी लाख मोलाची बात! अहो पण थोरामोठ्या स्वघोषित समिक्षकांना नेमकं हेच समजत नाही आणि पानंच्या पानं खरडत बसतात बापडे! जाऊ द्या, त्यांनाही बिचार्यांना आमच्या भाईकाकांशिवाय कोण आहे?! :)
तात्या.
11 Feb 2009 - 11:19 am | छोटा डॉन
सर्वात प्रथम "१. वर उल्लेखले गेलेले सर्व विचार माझेच आहेत असे नव्हे, मी त्याच्याशी समहत असेनच असेही नाही. विवीध ठिकाणी वाचलेल्या व ऐकलेल्या मतांचे संक्षेपाने सादरीकरण आहे." हा डिस्केमर सोईस्कररित्या बाजुला सारुन व मी भाईकाकांच्या साहित्याची समिक्षा करतो असा स्वतःच निष्कर्ष काढुन आम्हाला स्वयंघोषीत समिक्षक ठरवणार्या सर्वांचे अभिनंदन व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ...
नेमकी ह्याच संदर्भाची चर्चा वर धाग्यात दिलेल्या "संपादकीयचा धाग्यात" चालु होती, तिथे फारच वाहवत चालल्याने मी "वेगळा धागा काढा" अशी सुचना केली.
मग "मुक्तसुनीतरावांनी" मला तुच वेगळा धागा काढ अशी सुचना केली व त्यानुसार मी उपलब्ध संदर्भांच्या आधारे शक्य तितके लिहले. आता "ओरिजनल चर्चेत" फक्त भाईकाकांच्या लिखाणावरच्या आक्षेपाचे मुद्दे आल्याने मी फक्त "आक्षेप" ह्या बाजुचेच मुद्दे इथे मांडले व त्यावरच चर्चा अपेक्षीत होती.
बाकी ह्यात पुलंना नावे ठेवायची अथवा त्यांच्या साहित्याची समिक्षा करुन त्यांची टिंगलटवाळी करायची असा हेतु असण्याची शंका तरी कुणा माणसाला कशी येऊ शकते ?
काही लोकांना आक्षेप हे असणारच ? तो काय गुन्हा आहे का ? शिवाय ते "आक्षेप" माझेच आहेत व मीच समिक्षा करतो आहे असे मी केव्हा म्हणालो ? वर लिहल्याप्रमाणे "हे संकलित लेखन आहे" हे वाक्य वाचले नाही काय ?
बाकी पुलंची सगळी पुस्तके जवळजवळ मुखोद्गत असताना, त्यांच्या सर्व साहित्याचा संच नेहमी बरोबर बाळगत असताना व अगदी लहानपणापासुन पुलंच्या लिखाणावरच वाढलेल्या एका व्यक्तीची फक्त तो "धागा सुरु करतो (ते सुद्धा दुसर्यांना चर्चा करणे सुलभ व्हावे म्हणुन ) " ह्या एकमात्र गोष्टीला गॄहीत धरुन टिंगलटवाळी, थट्टा, तिरस्कार वगैरे करण्यात काय पॉइन्ट आहे ?
कुणी सांगितलयं तिच्यायला असलं विकतचं श्राद्ध ?
आता हवे असेल तर मी हा धागा "उडवुन" टाकतो, त्यासाठी मला कोणी संपादक नको आहे.
मला वाटते की अजुन एक मोठ्ठा डिस्केमर टाकायचा राहिला "माझे भाईकाकांवर अतिशय प्रेम असुन मी त्यांचा खुप आदर करतो. त्यांचे सर्व लिखाण मला खुप आवडत असुन त्यांचा विरोध करणार्याचा मला राग येतो. हा धागा काढण्याचा उद्देश फक्त अशा दिडशहाण्या लोकांना ठोकण्यापुरता आहे" , मग आमचे "पुलं प्रेम" सिद्ध झाले असते ना, सध्या सर्वजण मला परस्पर "पुलं विरोधी / द्वेष्टा " ठरवुन मोकळे झाले आहेत, चालु द्यात. आम्ही कसे आहोत हे आम्हाला चांगलेच माहित आहे.
मरु देत ना, उडवुन टाका हा धागा तिच्यायला, कुणी सांगितले आहे एक तर पानेच्या पाने लिहा व वरुन "पुलंद्वेष्टा" म्हणुन बदनाम होऊन शिव्या शाप खा ...
त्यापेक्षा मी " शर्टाला बटने कोणती लावावीत , आज अंगावर आलेल्या कुत्र्याला दगड कसा मारला, चप्पल कोणती घालावी " असे धमाल व अफाट धागे वाचत बसतो, हाय काय आणि नाय काय ?
बिनधास्त उडवा हा धागा , आपल्याला बी आता घंटा इटरेस्ट नाही राहिला ह्यात ...
आत्तापर्यंत सहभागी झालेल्यांचे आभार ...!
धागा काढ असे सुचवणार्या "मुक्तसुनीतरावांचे" ही आभार ...!
------
( हेतु समजुन न घेता चाललेल्या अनाठायी आदळाआपटीमुळे निराश व संतप्त ) छोटा डॉन
11 Feb 2009 - 11:34 am | सहज
छोटा डॉन यांचा लेख संयमित आहे, उगाच विरोध म्हणून नक्कीच लिहलेला नाहीये. संपादकीय मधे शिवापा यांनी त्यांचे प्रांजळ मत मांडले व चर्चेला सुरवात झाली त्याकरता हा चांगला धागा काढला आहे.
मला खरे तर शिवापा, धनंजय, मुक्तसुनीत, रामदास आदी मान्यवरांचे मत यावर वाचायला आवडेल. लवकरच ते सर्वजण यावर प्रतिक्रिया देतील अशी आशा.
छोटा डॉन यांनी निराश व संतप्त होउ नये चर्चा विधायक वळण घेईल.
11 Feb 2009 - 11:37 am | मराठी_माणूस
सहमत
11 Feb 2009 - 11:42 am | छोटा डॉन
>>छोटा डॉन यांनी निराश व संतप्त होउ नये चर्चा विधायक वळण घेईल.
तुमचं सगळं मान्य आहे हो, पण "पुलंद्वेष्टा , विरोधक " असलेला कपाळ्याला आठ्या आणि जाड भिंगांचे चश्मे लावलेल्या थोरामोठ्या साहित्य समिक्षक व्हायला मला आवडणार नाही. लोक ऑलरेडी तसे ठरवुन मोकळे झाले आहेत.
असले विकतचे श्राद्ध आता बास झाले. आम्ही तरी इथेच थांबलो व मला "हा धागा उडवायची ज्याम इच्छा होत आहे" पण हा मात्र पोटतिडकेने लिहणार्यांचा अपमान होईल म्हणुन थांबतो.
बाकी आम्हाला घरचे खाऊन आमचा हेतु न समजुन घेता आमच्यावर टिकेची झोड उठवुन घेण्यात, शिव्या शाप खाण्यात काडीमात्र इंटरेक्ट नाही.
त्यापेक्षा "निर्रथक कौलं, धागे" काढत बसतो अथवा सरळ "वाचनमात्र" फेज मध्ये जातो, कसे ?
------
छोटा डॉन
11 Feb 2009 - 11:57 am | आनंदयात्री
डॉनसाब तुम्हारा चुक्याच !!
तुमने अगर लेखके नावमे पुल इस नावके जगह पे भाईकाका ये नाव वापरा रेहता तो ऐसा मनःस्ताप नही होता.
11 Feb 2009 - 2:23 pm | ढ
डानराव लिहीत रहा हो.
असं बघा की श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सचिन तेंडुलकरला तीनदा चुकीचा आऊट दिला.
म्हणून काय त्यानं क्रिकेट खेळणं सोडून द्यायचं का?
चांगले वाईट निर्णय=प्रतिसाद यायचेच. तेव्हा बॅटिंग करत रहा अशी विनंती आहे.
11 Feb 2009 - 3:25 pm | विसोबा खेचर
उपलब्ध संदर्भांच्या आधारे शक्य तितके लिहले. आता "ओरिजनल चर्चेत" फक्त भाईकाकांच्या लिखाणावरच्या आक्षेपाचे मुद्दे आल्याने मी फक्त "आक्षेप" ह्या बाजुचेच मुद्दे इथे मांडले
तेच चुकलं असं वाटतं. अहो आपण खूप लहान माणसं आहोत. भाईकाकांसारख्या प्रात:स्मरणीय व्यक्तिच्या बाबतीत उगाच काहीबाही फालतू आक्षेप घ्यायची आपल्या कुणाचीच योग्य्ता नाही..
अहो त्यांनी मराठी वाचकांना भरभरून दिलं, संपन्न, समृद्धपणे जगायला शिकवलं! रसिकांना आयुष्यभर ते फक्त दोन्ही हातांनी वाटतच आले..!
तेव्हा त्यांच्या बाबतीत आक्षेपाचा एक शब्दही बरळायची आपली कुणाचीच पात्रता नाही..
तात्या.
11 Feb 2009 - 3:40 pm | छोटा डॉन
तात्यासाहेब,
तुमच्या आणि इतरांच्या सर्व बाबींशी मी सहमत आहे, तुम्ही जेवढे भाईकाकांचे भक्त आहात तेवढाच मी आहे, ह्यात शंका नसावीच ...
फक्त फरक असा पडला के चाललेल्या चर्चेच्या अनुषंगाने मी सो कॉल्ड "आक्षेपांच्या मुद्द्यांचे संकलन" करुन एक वेगळा काथ्याकुट टाकला , स्वाभावीकपणे त्याला विरोध होणार होता तो झाला.
इथे जी "चर्चा" अपेक्षीत होती ती होत आहे, इनफॅक्ट मी बर्याच मान्यवरांच्या प्रतिसादाची वाट पहात आहे अजुन.
मुक्तसुनीतराव एक मोठ्ठा सविस्तर प्रतिसाद देणार आहेत त्याची उत्कंठा आहे.
१०० % सहमत ...
भाईकाकांच्या गुणांविषयी आम्ही चिल्लर माणसे काय बोलणार ?
जसे आठवतील तसे "उदात्त गुण" लिहायचे म्हटले तरी माझ्याकडुन कदाचित "मिपाच्या इतिहासातला सर्वात मोठ्ठा प्रतिसाद" लिहला जाईल, लिहील तेवढे कमीच ...
त्यामुळे तुर्तास तुमच्याशी सहमत ...
बाकी पाहु अजुन चर्चेत काय काय येते ते ...
फक्त मी "पुलंद्वेष्टा समिक्षक" आहे असा सध्या जो सुर उमटत आहे त्याचे मला वाईट वाटले इतकेच ...!
असो.
------
छोटा डॉन
11 Feb 2009 - 5:50 pm | मुक्तसुनीत
तुम्ही जे चांगल्या हेतूने करायचे ते करा. करताना सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करा. आपली मते निर्भीडपणे मांडा. बस्स. तुम्हाला जशी मते आहेत तशी इतरांनाही आहेतच. त्यांना ती मांडू देत. यामधे तुम्ही संतापण्याचा प्रश्न यायला नको.
व्यक्तिशः मला तुम्ही केलेले हे लिखाण आवडले , जिव्हाळ्याचेही वाटले. इतरांना तसे वाटले नाही. ठीक आहे. जर का तुम्ही सभ्यतेचे सर्व नियम पाळत असाल तर तुम्हाला जे लिहायचे त्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. जे तुम्हाला नावे ठेवतात त्यांच्या मुद्द्यामधला फोलपणा दाखवा. (जर का ते मुद्दे विचार करण्याच्या लायकीचे असतील तर !)
11 Feb 2009 - 6:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे, तुझे मुद्दे सही आहेत ! लिहित राहा. आम्हाला आवडतंय तुझं लेखन.
स्वगतः एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
-दिलीप बिरुटे
11 Feb 2009 - 6:35 pm | छोटा डॉन
>>अरे, तुझे मुद्दे सही आहेत ! लिहित राहा. आम्हाला आवडतंय तुझं लेखन.
:)
ओके सर, तुमचा व इतर सर्व मान्यवरांचा आदर ठेऊन लेखन सुरुच राहिल अशी ग्वाही देतो ...
मी लोकांच्या श्रद्धास्थानावर हल्ले तर करत नाही ना ह्या गैरसमजातुन क्षणिक चीडचीड झाली होती ...
आता सर्व ठीक आहे, नो प्रॉब्लेम ..
आता जशी जशी मतांतरे येतील व चर्चा पुढे जाईल त्याप्रमाणे लिहीत राहिन ...
जर एखादा मुद्दा खरोखर मला पटला तर तो मांडायला भिती कसली ?
आता लिहीत राहिन, वाद झाले तर त्याचा परिणाम लेखनावर होणार नाही ही ग्वाही ...!
मला धीर दिल्याबद्दल व प्रेरणा दिल्याबद्दल सर्वांचे आभार ...!
मुद्द्याची गोष्ट :
थोडी नवी मते, विचार, पैलु अथवा आयाम एखाद्या नव्या प्रतिसादातुन यायला हवेत.
त्यासाठी मान्यवरांच्या प्रतिसादाची वाट पहात आहे, ह्यातुनच चर्चा पुढे रंगत जाईल असा विश्वास आहे. :)
मिपावरच्या एका "उत्तम चर्चेच्या" अपेक्षेत मी आहे व ती नकी पुर्ण होईल असा विश्वास आहे.
------
छोटा डॉन
11 Feb 2009 - 11:56 pm | विसोबा खेचर
भाईकाकांच्या गुणांविषयी आम्ही चिल्लर माणसे काय बोलणार?
का बरं? अहो त्यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वाटतं ते नवे नवे धागे काढून बोलताच आहात की! मग गुणांविषयी बोलायला काय हरकत आहे?
जसे आठवतील तसे "उदात्त गुण" लिहायचे म्हटले तरी माझ्याकडुन कदाचित "मिपाच्या इतिहासातला सर्वात मोठ्ठा प्रतिसाद" लिहला जाईल, लिहील तेवढे कमीच ...
वाट पाहतो. त्यांच्या उदात्त गुणांविषयीचा "मिपाच्या इतिहासातला सर्वात मोठ्ठा प्रतिसाद" वाचायला मला नक्कीच आवडेल..कारण मिपा हे स्थळच त्यांना समर्पित आहे, त्यांना वंदन करूनच सुरू केलेलं आहे!
त्यांच्याच खालील चार 'संस्कृती' विषयक शब्दांनी मिपाची सुरवात झाली होती. तुमच्याआमच्यासारख्या सुसंस्कृत साहित्यप्रेमी मराठी माणसांच्या संस्कृतीची यापेक्षा सुंदर व्याख्या तेच करू जाणेत! संस्कृतीबद्दलचे खालील चार शब्द त्यांच्या लेखनावर आक्षेप नोंदवणार्या कुणीही लिहून दाखवावे! आपला साला या लोकांन्ला ओपन चायलेंज!
असो. शेवटी, 'संगीतसमिक्षकांनी दोन तानपुर्यात १०० लोकांसमोर बसून आधी किमान १० गाऊन दाखवावं आणि मग अवश्य समिक्षा करावी!' असं आमच्या किशोरीताई म्हणतात तेच खरं!
तात्या.
संस्कृती!
"शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी, केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण, उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ, मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळाचे पाणी, दुसर्याचा पाय चुकून लागल्यावरदेखील आपण केलेला प्रथम नमस्कार, दिव्या दिव्या दीपत्कार, आज्जीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी, मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी, दसर्याला वाटायची आपट्याची पाने, पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थिंचा गंगार्पणाच्यावेळी झालेला स्पर्श, कुंभाराच्या चाकावर फिरणार्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूल हात लागून घाटदार मडके घडावे तसा ह्या अदृष्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो.
कुणाला देशी मडक्याचा आकार येतो, कुणाला विदेशी कपबशीचा!"
-- पु ल देशपांडे.
सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थिंचा गंगार्पणाच्यावेळी झालेला स्पर्श..
या वाक्यात शब्द संपतात आणि उरतात फक्त आणि फक्त पुलं!
असो.. या धाग्यातील माझा हा शेवटचा प्रतिसाद..
तात्या.
12 Feb 2009 - 12:31 pm | सर्किट (not verified)
कुणाला देशी मडक्याचा आकार येतो, कुणाला विदेशी कपबशीचा!"
अरे तात्या,
मग उगाच अमेरिकेतील देशी लोकांवर असा खार का खातोस ? आम्ही भारतीय यंव आणि त्यंव, तुम्हाला पैशांचा माज, वगैरे तुझ्याच लेखनात वाचले आहे. भाईकाकांनी लिहिल्याप्रमाणे तुम्ही मडकी आणि आम्ही कपबशा, हे समजून का घेत नाहीस ?
-- सर्किट
12 Feb 2009 - 1:59 pm | शंकरराव
व्वा !! सर्केश्वर सहमत
बरोबर आहे तुमचा मुद्दा
शंकरराव
13 Feb 2009 - 8:01 am | चतुरंग
एकदम सहमत!
चतुरंग
11 Feb 2009 - 6:50 pm | शंकरराव
फक्त फरक असा पडला के चाललेल्या चर्चेच्या अनुषंगाने मी सो कॉल्ड "आक्षेपांच्या मुद्द्यांचे संकलन" करुन एक वेगळा काथ्याकुट टाकला
डानराव आता ह्या सो कॉल्ड "आक्षेपांच्या मुद्द्यांवर" जरा स्वतःचे मत लिवा
जमेल का ?
मग ठरव "पुलंद्वेष्टा समिक्षक" आहे का नाही .....
शंकरराव
11 Feb 2009 - 8:03 pm | लिखाळ
डॉन्या,
चर्चाविषय आणि त्यावरचे प्रतिसाद छानच आहेत. प्रमोदकाकांचा प्रतिसाद वाचला आणि तो पटला.. बाकी मोठे प्रतिसाद सावकाश वाचीन ..
-- लिखाळ.
11 Feb 2009 - 8:38 pm | खरा डॉन
पुलं देशपांडे ह्यांच्या सारख्या प्रसिद्ध लेखकावर टीकास्त्र सोडण्याआधी डॉनने आपण कोण आपले लेखन काय ह्याचा विचार करायला हवा होता. जाड चष्मे लावुन टीका करायला काय जातंय? बाकी चालू द्या..!
-खरा डॉन .. बाकी सगळे क्लॉन
11 Feb 2009 - 10:10 pm | सखाराम_गटणे™
चांगली चर्चा
12 Feb 2009 - 12:09 am | शिवापा
छोटा डॉन
ज्या क्षणापासुन हि चर्चा सुरु झालीये त्या क्षणापासुन थॉट्स प्रोसेस शांत बसु देत नव्हती. हा थ्रेड उघडेल असे वाटले नव्हते पण आपल्या आणि मुक्त सुनितांच्या प्रयत्नांनी काहितरि प्रचंड महत्त्वाच्या विषयाला मार्ग करुन दिला. सर्वप्रथम आपण लिहिलेला प्रत्येक शब्द अक्षरशः पटतोय. यावर मुक्त सुनित आणि आपण सुचविल्या प्रमाणे बरीच भरीव चर्चा होउ शकते आणि होत आहे. एरव्ही ह्या विषयाला वर्तमानपत्रांनी किंवा इतर मराठि वेबसाइट्सनी हात लावणे अशक्य होते. मि. पा ची तटस्थता वाखाणण्याजोगी आहे. विषयाचा रोख अगदी योग्य जातो आहे.
12 Feb 2009 - 12:15 am | विसोबा खेचर
मि. पा ची तटस्थता वाखाणण्याजोगी आहे.
धन्यवाद..!
पुलंच्या आशीर्वादानेच मिपा सुरू झाले आहे अशीही मिपा व्यवस्थापनाची ठाम श्रद्धा आहे!
तात्या.
12 Feb 2009 - 12:40 am | शिवापा
तात्या एकतर तुम्ही प्रचंड मोठ्या मनाने मला माफ करा. या सर्व चर्चेची सुरुवात मी केली होती. तुमच्या खाद्यप्रवासाचे लेखनाची मी अक्षरशः पारायणे केलियेत. माटुन्ग्यातले ते साउथ इंडिय उपहार ग्रुह एकदमच स्टेशनच्या बाहेर नाहि. थोडे चालुन जावे लागते. आणि मी तुमचे लेख वाचुन असल्या जागा शोधत असतो. तुम्हि हे संकेतस्थळ उभारताना ड्रपल कसा चालतो हे बघत असताना सुद्धा आसपास होतो. इथे पु.लं. चा कणभर सुद्धा अपमान करावयाचा नाहिये. छोटा डॉनचा तर पु. लं. चा सर्वाधिक चाहता आहे. मी दुसर्या थ्रेड मधे माझी प्रतिक्रिया तेहि अगदि वैयक्तिक वेदनेच्या स्वरुपात मांडली होती. मला हा थ्रेड इथे सुरु होइल असे सुद्धा वाटले नव्हते. मी या स्थळाचा वाचनमात्र पाहुणा आहे फार पुर्विचा. पण आगोदरच सांगितल्याप्रमाणे माझे कितीतरी मित्र मला केवळ पु.ल. आवडत नाहि यामुळे दुरावलेत. आता तुम्हालही त्रास होत असेल तर मी काय करु म्हणजे तो थांबेल?
12 Feb 2009 - 12:51 am | वजीर
कितीतरी मित्र मला केवळ पु.ल. आवडत नाहि यामुळे दुरावलेत.
हम्म... इं्ट्र्स्तींग आहे.. पु.ल. का आव्ड्त नाहीत ते लिहा की डिटेल मधे.
12 Feb 2009 - 1:03 am | विसोबा खेचर
तुमच्या खाद्यप्रवासाचे लेखनाची मी अक्षरशः पारायणे केलियेत.
आभारी आहे! हीदेखील भाईकाकांचीच कृपा. त्यांचंच 'माझे खाद्यजीवन' वाचून चार अक्षरं खरडण्याचा मीही प्रयत्न केला होता इतकंच!
माटुन्ग्यातले ते साउथ इंडिय उपहार ग्रुह एकदमच स्टेशनच्या बाहेर नाहि. थोडे चालुन जावे लागते.
आपण नायकच्या श्रीकृष्ण बोर्डिंग हाऊसबद्दल बोलता आहात का? ते तर अगदी माटुंगा स्थानकाच्या बाहेरच आहे. असो..
बाकी माफी वगैरे मागू नका. माझा आपल्यावर किंवा छोटा डॉनवर किंवा अन्य कुणावर कुठलाही राग नाही.. प्रत्येकाची मतं आहेत आणि ती त्याने इथे अवश्य मांडावीत..पुलंच्याच आशीर्वादाने सुरू झालेल्या मिपावर त्याला अटकाव होणार नाही. त्याचप्रमाणे माझीही काही मतं आहेत ती मीदेखील मांडली आहेत..
तात्या.
12 Feb 2009 - 12:21 am | शिवापा
येथे उशिरा आल्याबद्द्ल क्षमस्व. छोटा डॉन काहि काळ प्रचंड अस्वस्थ झाले होते ते दिसते आहे. मला वाटते प्रतिक्रियाची प्राथमिक फेरी फार छान झाली आहे. माझी प्रतिक्रिया विचार करुन आणि नंतर टाइप करून टाकतोय (सवय नाहिये). डॉन साहेब पुन्हा एकदा धन्यवाद
12 Feb 2009 - 4:24 pm | अभिज्ञ
पुलंविषयी ह्या प्रकारची मते या आधीहि ऐकण्यात आली होती.
पुलंचे लेखन हे फक्त मध्यमवर्गा भोवती घुटमळत राहते असा आरोप काहि टिकाकार नेहमीच करत आले आहेत.
परंतु हे विधान
"लताला पॉप ढंगाची गाणी चांगली गाता येत नाहित/किशोर कुमारला शास्त्रीय बाजाची गाणी झेपत नाहित/सचिन तेंडुलकरला वेगवान गोलंदाजी नीट खेळता येत नाहि"
ह्या विधानांइतकेच तकलादु वाटते.
अत्रेंनंतर पुल हे एकच साहित्य,नाटक,चित्रपट,संगीत ह्यांसारख्या विविध क्षेत्रात लीलया वावरताना आढळतात.
माझ्या वडिलांच्या पिढीने अत्रे पाहिले,आमच्या पिढीला मिरासदार,पुल,शंकर पाटील वगैरे मंडळींचे साहित्य चाखायला मिळाले.
परंतु पुढच्या पिढ्यांना एवढी चतुरस्त्र मंडळी पहायला मिळतील कि नाहि ह्याची चिंता वाटते.
अभिज्ञ.
13 Feb 2009 - 8:37 am | सातारकर
परंतु पुढच्या पिढ्यांना एवढी चतुरस्त्र मंडळी पहायला मिळतील कि नाहि ह्याची चिंता वाटते.
पूर्णपणे सहमत.