मूळ पाककृती अमिताबाय सलत्री यांची माझ्या सोयीनुसार बदलली आहे:
- - -
कोळंबी - अर्धा किलो
तांदूळ - एक मोठा चमचा
उडदाची डाळ - एक छोटा चमचा
मेथी - एक छोटा चमचा
एक मोठा कांदा
ओले खोबरे - एक वाटी (खोवलेल्या खोबर्याऐवजी सुक्या खोबर्याचा बारीक कीस मिळतो, त्यात नारळाचे दूध डब्यात मिळते, ते घातले.)
धणे - एक मोठा चमचा
मिरी - पाच कण
सुक्या लाल मिरच्या - १२ (मी चार घेतल्या - अमेरिकेत वाढलेल्यासाठी बनवायचे होते!)
घट्ट चिंचेचा कोळ - १ छोटा चमचा
आणखी तीन मोठे कांदे
- - -
१. कोळंबी - (अर्धा किलो) सोलून, काळा धागा काढून स्वच्छ करून ठेवावी
२. एक मोठा चमचा तांदूळ, एक छोटा चमचा उडदाची डाळ, एक छोटा चमचा मेथीचे दाणे - तव्यावर सुके भाजून थोड्याशा पाण्यात वाटावेत (मिक्सरमध्ये सुके भरड वाटून, मग थोड्याशा पाण्यात वाटणे मला सोयीचे गेले)
३. एक मोठा कांदा + वाटीभर खोवलेले खोबरे मंद आचेवर परतून गुलाबी करावेत.
४. एक मोठा चमचा धणे, चार सुक्या लाल मिरच्या (सलत्रीबाई १२ मिरच्या म्हणाल्या), ५ मिरी, सर्व कोरडे भाजून घ्यावे. परतलेला कांदा, खोबरे, भाजलेले धणे-मिरी-मिरच्या, १ छोटा चमचा चिंचेचा घट्ट कोळ एकत्र वाटावे.
५. तीन मोठे कांदे पातळ चिरून गोड्या तेलावर मंद आचेवर गुलाबी परतावेत. पॅनमध्ये कांदे एका बाजूला सारून कोळंबी मांडावेत. क्प्ळंबीची आधी एक बाजू भाजू/तळू द्यावी, मग उलटून दुसरी बाजू. पूर्णपणे शिजायच्या आधी बाजूला काढावी. (अमिताबाई कोळंबी परतून भांड्यातच ठेवतात - मला अती शिजून रबरासारखी झालेली कोळंबी तितकी आवडत नाही.)
६. आतापर्यांत खमंग परतलेल्या कांद्याच्या कापांमध्ये कांद्या-खोबर्या-मसाल्याचे वाटण घालून परतावा. थोडेसे पाणी घालून उकळी आणावी. कोळंबी घालावी. तांदळा-उडदा-मेथीचा वाटलेला गोळा घालावा.
७. उकळून रस मिळून येऊ द्यावा. तोवर कोळंबी पूर्ण शिजतात. याचा रस फार पातळ करू नये.
प्रतिक्रिया
8 Feb 2009 - 7:50 am | सर्किट (not verified)
समजा, आधीच शिजलेली कोळंबी मिळाली (सेफवे मध्ये मिळते तशी), तर ह्या पाककृतीत काय बदल करावा ?
-- सर्किट
8 Feb 2009 - 11:54 pm | चित्रा
पाकृ. छान. पण अशीच दाटसर करायची का?
शिजलेली कोलंबी मिळाली तर तिचा गारपणा गेल्यावर (बर्फात ठेवलेली असल्याने) ती निथळून थोड्या तेलावर परतून घेतली तर वरील पाककृतीला चालेल असे वाटते. धनंजय सांगतीलच त्यांच्या मते काय करायला हवे ते.
9 Feb 2009 - 2:26 am | धनंजय
हलकी परतून घातलेली चालेल, असे मला वाटते. परतून थोडासा खमंगपणा येतो, तो हवा आहे, पण शिजवायची नाही. जास्त शिजवून रबरासारखी होते.
अमिताबाय म्हणतात की घट्टच ठेवा, आणि मला तशी आवडली. पण थोडी पातळ करायला हरकत नाही.
दाट केल्यामुळे कोळंबीबरोबर बराच रसही धरून प्रत्येक घासात येतो, तसा मला आवडला.
खाली सुनील यांनी भाज्यांच्या उडीदमेथीची कृती दिली आहे, ती भुरकण्यासारखी पातळ दिसते, तीसुद्धा मस्त दिसते आहे. तशीही करून बघायला पाहिजे.
8 Feb 2009 - 11:48 am | मुक्ता
करुन बघेन..म्हणजे मी नाही माझा नवरा करेल ..मी खाईन.त्याला कोळंबी करायला आणी खायला खुप आवडते
../मुक्ता
8 Feb 2009 - 11:52 am | सहज
ह्या डीश मधे तांदुळ, उडीड व मेथी हे प्रकार काही विशिष्ट चव देतात का ग्रेवी दाट, नक्की काय करतात? वन डीश मिल म्हणून का? म्हणजे अशीच खायची पोळी, भात बरोबर नको?
बाय द वे ह्या वेळी फोटो पाहुन काहीतरी वाटले :-)
10 Feb 2009 - 8:20 pm | धनंजय
तिघा-चौघांना पुरेल, इतपत रस होतो. पण त्यात एक मोठा चमचा तांदूळ आणि एक छोटा चमचा उडद डाळ इतकेच असते. तेवढ्याने रस्सा दाट होतो, आणि उडीदमेथीची खास चव येते.
वेगळा भात करावा, किंवा हा पदार्थ पोळीबरोबरसुद्धा खाता येईल.
8 Feb 2009 - 4:43 pm | सुनील
झक्कास!! माझी अगदी आवडती डिश!
आणि काय पण योगायोग. परवाच घरी बनवली होती उडिदमेथी (शाकाहारी, भेंडीची). मिपावर पाकृ देण्यासाठी फोटू-बिटू पण काढून तयार होतो. ह्या वीकांतात टाकायचा विचारदेखिल होता. पण ते जळ्ळं मिपाच बंद होतं :(
असो, चिंचेच्या ऐवजी कैरी घातली होती, आंबटपणासाठी. आणि भातावर घेण्यासाठी म्हणून थोडी पातळ बनवली होती.
ठीप - बांगड्याची किंवा हलव्याची उडीदमेथीदेखिल सुंदर लागते.
कैरी, भेंडी, खवलेला नारळ, उडिद, मेथीचे दाणे आणि लाल मिरची
तयार उडीदमेथी
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
10 Feb 2009 - 8:25 pm | लिखाळ
सुनील आणि धनंजयाचे आभार.. मी भाज्या वापरुन (भेंडी) उडदामेथी करायचा प्रयत्न करीन. पाकृ मस्तच वाटतेय.
-- लिखाळ.
8 Feb 2009 - 11:01 pm | कालिन्दि मुधोळ्कर
दोन्हि पा. क्रु. छान आहेत. धन्यवाद.
सुनील साहेब सविस्तर क्रु. देऊ शकाल का? आणि कोण्त्या भाज्या वापरता येतील?
9 Feb 2009 - 6:48 am | सुनील
आंबट, गोड, कडू आणि तिखट यांचे मजेदार मिश्रण असलेला पदार्थ म्हणजे उडीदमेथी (लिहिताना जरी उडीदमेथी असे लिहिले तरी बोलताना उड्दामेथी असा उच्चार करायचा!). खोबरे, मिरची आणि मेथीचे दाणे असतातच. आंबटपणासाठी चिंच किंवा कैरी (किंवा दोन्ही) वापरायचे. बाकी पाकृ धनंजय यांनी लिहिल्याप्रमाणेच.
ही सहसा शाकाहारी किंवा मत्स्याहारी बनवितात. भेंडीऐवजी कारली वापरून पहायला हरकत नाही. माशांत, कोळंबी, बांगडा, हलवा (हा माशाचा प्रकार आहे, मिठाईचा नव्हे!) इत्यादि वापरतात.
भातावर घ्यायची असेल तर पातळ बनवावी अन्यथा जाडसरही चालू शकेल.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
9 Feb 2009 - 12:24 am | संदीप चित्रे
काय मस्त रेसिपी दिलीत धनंजय ... धन्स :)
फोटोही आवडला.
ही प्रतिक्रिया द्यायला मात्र दुपार उजाडली.
9 Feb 2009 - 4:23 am | प्राजु
सह्ही सह्ही रेसिपी.
ती कोळंबी एकदा कशी साफ करतात प्रात्यक्षिक दाखवायला हवं..
(स्वगत : हा संदीप कधी बोलावणार आहे घरी कोणास ठाऊक ? नुस्ताच मस्त मस्त रेसिपी म्हणतो..)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Feb 2009 - 4:13 pm | विसोबा खेचर
धन्या,
क्लास रे! जियो..! :)
तात्या.
9 Feb 2009 - 8:21 pm | चकली
>>>आंबट, गोड, कडू आणि तिखट यांचे मजेदार मिश्रण असलेला पदार्थ म्हणजे उडीदमेथी (लिहिताना जरी उडीदमेथी असे लिहिले तरी बोलताना उड्दामेथी असा उच्चार करायचा!). खोबरे, मिरची आणि मेथीचे दाणे असतातच.
खूप छान पाकृ.!!!
चकली
http://chakali.blogspot.com