या काव्याचा अर्थ नक्की काय ?

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in काथ्याकूट
28 Jan 2009 - 1:58 am
गाभा: 

हा प्रश्न मला वर्षानुवर्षे पडलेला आहे. खालील गाणे माझ्या आवडीचे. आशाबाई भोसल्यांच्या , दीनानाथांच्या , वसंतरावांच्या , आणि अलिकडे राहुल देशपांडे या युवा गायकाच्या तोंडी ऐकलेले आहे. पण त्याचा अर्थ मला काही माहिती नाही. शब्द नीट आठवतात. शब्दांचे अर्थही समजतात. पण एकूण गाण्याचा अर्थ मला कळलेला नाही. पण अर्थ कुणी सांगेल तर वर्षानुवर्षीचे माझे कोडे सुटेल.

गाणे :

चंद्रिका ही जणु ठेवि या स्नेहे कमलांगणी ।
कुमुदबांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी ॥

चंद्रसदननभमंडला मेघांनी वेढियले ।
शोभाधन विपूल ते लपविता कोपे भरले ॥

शोधित वेगे दशदिशा भूवरी सकल आले ।
आता निकरे सरसावले, दिसत ही या क्षणी ॥

कुणाला जर "मानापमाना"तल्या या पदाचा संदर्भ माहिती असेल तर कदाचित अर्थ समजायला मदत होईल असे वाटते. धन्यवाद !

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

28 Jan 2009 - 3:18 am | घाटावरचे भट

मी काही मानापमान पाहिलेलं नाही. पण वसंतराव देशपांड्यांच्या 'मराठी नाट्यसंगीताची वाटचाल' या कार्यक्रमात त्यांनी या पदाचा प्रसंग असा सांगितला आहे, की 'सैन्याचा तळ पडलेला आहे. धैर्यधर त्या सैन्याचा सेनापती आहे आणि त्या सैन्याच्या तळाजवळच वनमालेची झोपडी आहे. आकाशात चंद्र उगवलेला आहे. आणि धैर्यधर त्या आकाशातल्या चंद्राकडे पाहून किंवा या झोपडीतल्या चंद्राकडे पाहून कुठूनतरी आपलं मानस व्यक्त करतो आहे.'

या नाटकाबद्दल वसंतरावांनी त्यांच्या कार्यक्रमात मजेदार किस्सा सांगितला आहे तो असा -
'हे पहिलं असं नाटक ज्यात संगीत नियोजकाची नेमणूक झाली. मराठी नाटकाच्या इतिहासात पहिल्यांदा लेखक आणि संगीत दिग्दर्शक या जबाबदार्‍या दोन वेगवेगळ्या लोकांनी सांभाळल्या. याचं कारण म्हणजे खाडिलकरांना गाणं येत नव्हतं. म्हणून त्यांनी त्याकाळचे अत्यंत मातब्बर गायक-नट गोविंदराव टेंबे यांना मानापमानाच्या चाली करायला दिल्या. पण इथे अजून एक गम्मत होती. त्याकाळी कवी चालीबरहुकूम त्या त्या वृत्तांत गाणी करत असे, म्हणजे निदान त्या वृत्तांचा तरी त्याला आधार असे. पण दुर्दैवाने खाडिलकरांचा व्याकरणाचा जरी अभ्यास असला तरी छंदशास्त्राचा नव्हता. मग यावर उपाय कोणता? मग त्यांनी गोविंदराव टेंब्यांना बोलावून सांगितलं की 'मी तुम्हाला संगीत दिग्दर्शक म्हणून नेमतो. तुम्ही उत्तमोत्तम चाली काढा आणि मला ऐकवा. मी त्या चालींप्रमाणे तुम्हाला शब्द घालून देतो (अक्षरं घालून देतो)'. मग गोविंदरावांनी इकडून तिकडून उत्तम चाली गोळा केल्या आणि वापरल्या. त्यात कानडी चाली आहेत, गौहरजान-मलकाजान वगैरे त्या काळतल्या प्रतिष्ठित समाजात प्रसिद्ध असलेल्या गायिकांच्या ठुमर्‍या-दादरे सुद्धा आहेत. मग आता समजा साधी गायनशाळेतली चीज घेतली 'आये रे सब गोपी बन बन, रास खेलत पिचकारी मुरारी' की मग ती खाडिलकरांना म्हणून दाखवावी. पण खाडिलकरांना नुसती चीज ऐकून त्यात शब्द घालता येत नसत. मग ते म्हणायचे की 'तुम्ही ते चिजेचे शब्द वगैरे मला सांगू नका. मला लघु-गुरु मधे ते लिहून घ्यायचंय तेव्हा तुम्ही त्यात टट्टाटिट्टी किंवा कक्काकिक्कीची बाराखडी म्हणा'. मग त्या गवयाने नन्नानिन्नी करावं, त्याचे आघात कसे पडतात ते खाडिलकर लिहून घेत. मग त्यातून पद तयार झालं - 'माता दिसली समरी विहरत'. अशी मानापमानातली सगळी पदं झाल्यामुळे ती पदं क्लिष्ट आहेत. त्यांचा अन्वयार्थ लावणं फार अवघड आहे.'

शंकरराव's picture

28 Jan 2009 - 7:22 am | शंकरराव

पंत व्वा!!
दर्दी अभ्यासकाने दिलेली माहीती अन किस्सा आवडला

अजून येउद्यात ....
(मर्म बंध शोधणारा) शंकरराव

मुक्तसुनीत's picture

28 Jan 2009 - 3:21 am | मुक्तसुनीत

भटसाहेब !
फारच माहितीपूर्ण उत्तर ! आणि नुसती कोरडी माहिती नाही , तर त्या काळातला एक किस्सा. मजा आली !
(मात्र गाण्याचा शब्दार्थ अजूनही लागलेला नाही मला :-( . लेकिन छोडो. मूळ प्रश्नाच्या उत्तरापेक्षा हे उत्तरच झकास ! :-) )

सुनील's picture

28 Jan 2009 - 7:24 am | सुनील

पदाचा अर्थ डोक्यावरून जातोय हे खरे, पण सुंदर माहिती!

मग त्या गवयाने नन्नानिन्नी करावं, त्याचे आघात कसे पडतात ते खाडिलकर लिहून घेत. मग त्यातून पद तयार झालं
याच कारणांमुळे, गडकर्‍यांनी पदे लिहिण्यास नकार दिला आणि त्यांच्या नाटकातील सर्व पदे वि.सि.गुर्जर यांनी लिहिली, हे खरे का?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सर्किट's picture

28 Jan 2009 - 8:51 am | सर्किट (not verified)

मुसूशेठ,

आपल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी विकिपंडित नव्हे, खरे पंडीत आवश्यक आहेत. त्यामुळे आपल्याला नाट्यसंगीतात डॉक्टरेट केलेल्या माझ्या एका मित्राचा पत्ता पाठवत आहे (कृपया तो प्रकाशित करू नये. त्याची परवानगी नाही.) त्याला विचारा. तो नक्की सांगेल, ही खात्री आहे.

-- सर्किट

मुक्तसुनीत's picture

28 Jan 2009 - 8:55 am | मुक्तसुनीत

तुमच्या मित्राला आणि तुम्हाला आगाऊ धन्यवाद !

घाटावरचे भट's picture

28 Jan 2009 - 11:11 am | घाटावरचे भट

आणि अर्थ आम्हा अज्ञ पामरांसही कळवा. अर्थात डॉक्टरसाहेबांची परवानगी असेल तर ;).

हुप्प्या's picture

29 Jan 2009 - 12:08 am | हुप्प्या

प्रसिद्ध गायक व कीर्तनकार चारुदत्त आफळ्यांनी ह्या गाण्याचा अर्थ समजावला होता. मला सगळा आठवत नाही. पण एकंदरीत ह्या गाण्यात कुण्या स्त्रीच्या सुंदरतेची तारीफ केली आहे.
चंद्रिका म्हणजे चांदणे. ते चांदणे, ढग म्हणजे मेघ, तस्कर म्हणजे चोर, चोरेल ह्या भीतीने पृथ्वीवर आणून ठेवले आहे. म्हणजे बहुधा ती स्त्री.
पुढचे नीट लक्षात नाही. पण मग ढग रागावून चंद्रिकेला शोधत पृथ्वीवर आले आणि त्याला आता ती चंद्रिका दिसते आहे असे काहीतरी.

धनंजय's picture

29 Jan 2009 - 12:31 am | धनंजय

एखाद्या कमळे असलेल्या तळ्याच्या शेजारी चंद्रकोरीच्या प्रतिबिंबाकडे बघत स्त्रीला त्या चंद्रिकेची उपमा देऊन हे गाणे म्हणता येईल.

त्या परिस्थितीत नायिकेला हस्तगत करणार्‍या खलनायकाचे सावट असेल, आणि आकाशात काही ढग असतील तर पूर्णोपमा सिद्ध होते.

नाटकाच्या कथावस्तूशी असा कुठला प्रसंग जुळतो का?

मुक्तसुनीत's picture

29 Jan 2009 - 12:32 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो ! हुप्प्या यांचे अनेक आभार !

भडकमकर मास्तर's picture

29 Jan 2009 - 12:23 am | भडकमकर मास्तर

कीर्तनकार चारुदत्त आफळ्यांनी ह्या गाण्याचा अर्थ समजावला होता.

अगदी अगदी हेच आठवले...
मराठी नाट्यगीताला एकशेपंचवीस वर्षे झाल्याबद्दल नाट्यसंगीतांच्या महत्त्वाच्या युगांचा आढावा घेणारा तो कार्यक्रम होता, त्यात ते पदे म्हणताना प्रेक्षकांशी अगदी कीर्तनकाराप्रमाणे संवाद साधत असत... आताच्या प्रेक्षकाने ही पदे का ऐकावीत, कशी ऐकावीत, शिवाय बरोबर दीनानाथांचे, अभिषेकीबुवांचे आणि वसंतरावांचे किस्से....
.. त्यांनी शब्दाशब्दाची फोड करून खाडिलकरांची पदे कशी आवघड असत, याबद्दल याच "चंद्रिका.."गाण्याचे उदाहरण घेऊन अर्थ समजावला होता. ...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋषिकेश's picture

29 Jan 2009 - 6:09 am | ऋषिकेश

आम्हाला चंद्रिका म्हंटले की फक्त झोपलेला बेंबट्या आणि त्याला पुनवे पासून अमावसे पर्यंत चालणार्‍या त्या चंद्रिकेसाठी कोपरखळ्या मारून उठवणारे तीर्थरूप इतकेच आठवते आणि माहित आहे :)

-(असामी) ऋषिकेश

शंकरराव's picture

29 Jan 2009 - 6:18 am | शंकरराव

हसुन हसुन बेजार झालो :))

उडन खटोला's picture

13 Mar 2016 - 9:15 am | उडन खटोला

https://www.youtube.com/watch?v=Gin1K-_ETAU

https://www.youtube.com/watch?v=X10DeRXm94s

"चंद्रिका ही जणू" म्हणजे मराठीतल "एक लडकी को देखा तो ऐसा लगा "....

पण बागेत नायकाने पहिल्यांदाच नायिकेला पाहिली असल्यामुळे त्याला असे वाटले की चंद्रिका ही जणू ....
पण चंद्रिका आकाशात असते , ही इथे कशी आली?
कविकल्पना अशी केली आहे की चंद्राने आपली बहीण पृथ्वी हिच्याकडे चंद्रिकेला काही दिवस राहायला पाठवले आहे ,ती ही चंद्रिका ..

कमला म्हणजे लक्ष्मी , ती समुद्रातून आलेली , तिच्या अंगणात ,म्हणजे समुद्राच्या अंगणात म्हणजे पृथ्वीवर ...
तर कुणी पाठवली? कुमुद म्हणजे चंद्र , तो बांधव म्हणजे पृथ्वीचा बंधु , पृथ्वी आपली आई ,चंद्र तिचा भाऊ , म्हणून तो मामा ...

कारण चंद्राजवळ काळे ढग आले ... श्यामला मेघा तस्कर मानोनी ... त्यांनी चंद्रिकेची शोभा पळवू नये म्हणून हे शोभाधन कोशात भरून चंद्राने वरुन पृथ्वीवर टाकून दिले ...

इथे पृथ्वीवर काळ्या धांगांची भीती नसल्याने ते चंद्रिकेचे शोभाधन पुन्हा विलसू लागले...
ती ही चंद्रिका ..... ही जणू ...

आभार्स- चारुदत्तबुवा आफळे
किर्लोस्कर ते दारव्हेकर , नाट्यदर्शन कार्यक्रम

विवेक ठाकूर's picture

13 Mar 2016 - 12:34 pm | विवेक ठाकूर

ग्रेट !

मंदार कात्रे's picture

13 Mar 2016 - 9:33 am | मंदार कात्रे

कया बात है !

सिंपली ग्रेट ...................

मंदार कात्रे's picture

15 Mar 2016 - 11:30 am | मंदार कात्रे

प्रभाकर कारेकर यानी गायलेले नाट्यधनराशी अल्बम मधील "चंद्रिका ही जणु" ऐका

केवळ अप्रतिम

मी आजपर्यन्त ऐकलेली या गाण्याची सर्वोत्तम व्हर्जन !!!