यावर्षी १४ जानेवारीला संक्रांत होती. ती कधी १३ तारखेला येते कधी १५ ला! त्याचं कारण मला माहित नाही. पण असं म्हणतात की त्या दिवशी सूर्य मकरराशीत प्रवेश करतो म्हणून ती मकरसंक्रांत. आता या मकरसंक्रांतीचं काय महत्त्व, तर तेव्हापासून म्हणे सूर्य उत्तरेकडे सरकायला लागतो. आपल्यापैकी बर्याच लोकांना भूगोलात शिकलेलं आठवत असेल की उत्तर गोलार्धात सगळ्यात लहान दिवस असतो २२ डिसेंबर या दिवशी, तर मग संक्रांत जानेवारीत का येते?
पृथ्वीवर ऋतू होतात ते पृथ्वीचा आस कलता असल्यामुळे! या आसाचा उभ्या सरळ रेषेशी सध्या साधारण २३.५ अंश एवढा कोन आहे. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरताना उत्तर गोलार्धाचा भाग, या कोनामुळे, सूर्याकडे रोखला जातो तेव्हा उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. आणि बरोब्बर सहा महिन्यांनी पृथ्वी फिरली की दक्षिण गोलार्धाचा भाग सूर्याकडे रोखला जातो आणि तिकडे उन्हाळा येतो आणि आपल्याकडे हिवाळा! जेव्हा पृथ्वी सूर्याभोवतीच्या कक्षेमधे फिरताना 'हे दक्षिण गोलार्धाचं सूर्याकडे रोखलं जाणं थांबतं' तो दिवस असतो २२ डिसेंबर; हाच तो दिवस ज्या दिवशी दक्षिण गोलार्धात सगळ्यात मोठा दिवस असतो आणि उत्तर गोलार्धात सगळ्यात लहान दिवस.
पृथ्वीला वेगवेगळ्या गती आहेत. सहा आत्ता चटकन आठवत आहेत पण तो विषय वेगळा आहे*. ते अवांतरात बघा. त्यापैकी दोन महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्याला रोजच्या(?) व्यवहारात दिसतात, एक म्हणजे परिवलन (स्वतःभोवती फिरणे) आणि दुसरं परिभ्रमण (सूर्याभोवती फिरणे). आणखी एक आहे परांचन. पृथ्वीचा आस ध्रुवतार्याकडे रोखलेला असतो, पण तो तिथेच स्थिर नाही. तो आस स्वतःभोवतीच एका वर्तुळाकार कक्षेत फिरतो, ती पृथ्वीची परांचन गती. म्हणजे या गतीमुळे पृथ्वीचा ध्रुवतारा बदलतो. आहे तोच तारा पुन्हा उत्तर ध्रुव बनण्यासाठी २६००० वर्ष लागतात किंवा आसाला स्वतःभोवती एक वर्तुळ पूर्ण करायला २६००० वर्ष लागतात. त्यामुळे पृथ्वीचे ऋतू 'सरकतात' किंवा जी संक्रांत १४ जानेवारीला यायची ती खरी आता २२ डिसेंबरला आली पाहिजे. २६००० वर्षांत संक्रांत मागे येऊन येऊन पुन्हा २२ डिसेंबरला येईल. किंवा पृथ्वीच्या 'दक्षिण गोलार्धाचं सूर्याकडे रोखलं जाणं थांबतं' तो दिवस १४ जानेवारीपासून सरकून आता २२ डिसेंबरपर्यंत आला आहे आणि तो अजूनही मागे मागे सरकत आहे. तुम्हाला कदाचित वेगळं असणारं 'टिळक पंचांग' माहित असेल, ते वेगळं आहे याच कारणामुळे! टिळकांनी पंचांग या परांचन गतीनुसार बदललं, आधुनिक केलं. (गीतारहस्य किंवा त्यांच्या आणखी कोणत्या ग्रंथात याचा उल्लेख आहे.) तर हे झालं संक्रांत आणि उत्तर गोलार्धातला सगळ्यात लहान दिवस एकाच दिवशी न येण्याचं कारण!
पण त्यातही अजून थोडा किचकटपणा आहे. सगळ्यात मोठी रात्र २२ डिसेंबरला असली तरीही सगळ्यात उशिरा सूर्योदय आणि सगळ्यात लवकर सूर्यास्त २२ डिसेंबरला होत नाहीत. २००८ सालात पुण्यात सगळ्यात लवकर सूर्यास्त झाला संध्याकाळी ५:५६ ला, १५ नोव्हेंबरपासून ३ डिसेंबरपर्यंत आणि २००९ सालात सगळ्यात उशीरा सूर्योदय झाला/होणार सकाळी ७:१०ला १५ जानेवारी ते २२ जानेवारी या काळात! (ही गणितं मी केली नाहीत; www.timeanddate.com या संस्थळावरून मी ही माहिती गोळा केली.) याचं कारण आहे पृथ्वीची सूर्याभोवतीची कक्षेतली गती** जी शून्य नाही. कक्षेतल्या गतीमुळे उशीरा सूर्योदय आणि लवकर सूर्यास्त या घटना २२ डिसेंबरला होत नाहीत. सूर्याचा आकाशातला रोजचा भासमान मार्ग हे एक वर्तुळ, खरंतर वर्तुळाचा एक भाग असतो. जर पृथ्वी स्वतःच्या कक्षेत फिरत नसती तर रोजची ही वर्तुळं समकेंद्री (मराठीत concentric)असती, (खरंतर एकच वर्तुळ झालं असतं.) पण असं पकडू या, की पृथ्वी खूपच मंदगतीने फिरत आहे, ३६५ दिवसांच्या ऐवजी ३६५ वर्ष म्हटलं तर पुरेल, तर ही वर्तुळं (जवळजवळ) समकेंद्री असती आणि उशीरा सूर्योदय आणि लवकर सूर्यास्त या घटना २२ डिसेंबरलाच झाल्या असत्या. आता याची तुलना चंद्र रोज ५० मिनिटं उशीरा उगवतो याच्याशी करता येईल. चंद्राच्या बाबतीत ही घटना दिसते म्हणून त्या उदाहरणाचा वापर करू या.
चंद्र रोज ५० मिनीटं उशीरा उगवतो. कारण चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो तेवढ्या वेळात चंद्र पृथ्वीभोवती थोडा फिरलेला असतो (साधारण ३६०*(५०/(२७*२४*६०)) एवढे अंश) आणि तेवढं जास्तीचं अंतर फिरायला पृथ्वीला ५० मिनिटं लागतात, त्यामुळे चंद्र रोज ५० मिनिटं उशीरा उगवतो. तसंच जर पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसती किंवा खूपचकमी वेगात फिरत असती तर २२ डिसेंबरलाच सर्वात उशीरा सूर्योदय आणि सर्वात लवकर सूर्यास्त दिसला असता.
अवांतरः
*पृथ्वीच्या आत्ता आंतरजालाच्या मदतीशिवाय आठवलेल्या सहा गती:
१. परिवलन - स्वतःभोवती फिरणे, कालावधी २४ तास = १ दिवस
२. परिभ्रमण - सूर्याभोवती फिरणे, कालावधी ३६५ दिवस = १ वर्ष
३. परांचन - पृथ्वीचा परिवलनाचा आस आपल्याभोवती फिरतो, कालावधी ~ २६००० वर्ष
४. Nutation / न्यूटेशन (मराठी शब्द?) - या आसाचा कोन जो सध्या २३.५ अंशात कललेला आहे, तो २२ अंश ते २५ अंश या मर्यादेत बदलत असतो, कालावधी ~ ७२००० वर्ष
५. सूर्य आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरतो. गेल्या १३ अब्ज वर्षात (विश्वाचं वय साधारण हे एवढं आहे अशी हल्ली फॅशन आहे) सूर्याने २० प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत.
६. आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरताना सूर्य आकाशगंगेच्या प्रतलाच्या (plane) खाली-वर simple harmonic motion मधे फिरतो. त्याचा कालावधी आता आठवत नाही.
**पृथ्वीची कक्षा वर्तुळाकार नाही. सरलीकरणासाठी आपण कक्षा वर्तुळाकार आहे असं म्हणतो पण सगळ्याच ग्रहांच्या (आणि उपग्रहांच्या ग्रहांभोवतीच्या कक्षाही) कक्षा लंबवर्तुळाकार आहेत. आणि त्यामध्ये सूर्य दोनपैकी एका केंद्रकावर आहे, (केंद्र नाही). त्यामुळे आपल्या कक्षेत दोन विशिष्ट बिंदूंपाशी पृथ्वी असताना ती सूर्याच्या एकदम जवळ किंवा एकदम लांब असते. जेव्हा जवळ असते तेव्हा तिचा आपल्या कक्षेतला वेग सर्वात जास्त असतो आणि लांब असताना सगळ्यात कमी. आणि पृथ्वी सगळ्यात जवळ असते तो दिवस आहे ४ जानेवारी जो या २२ डिसेंबरच्या खूपच जवळचा दिवस आहे. पण वेगवेगळे ऋतू असण्याचं ते कारण नाही.
तर मुख्य प्रश्नः संक्रांत १४ जानेवारीला का येते किंवा या दिवसांचं महत्त्व काय? मला नक्की माहित नाही पण मला जे माहित आहे त्याप्रमाणे आता संक्रांत १४ जानेवारीच्याऐवजी २२ डिसेंबरला साजरी करावी. क्वचितच संक्रांत १३ किंवा १५ जानेवारीला का येते याचं उत्तरही मला माहीत नाही. तुम्हाला माहित असेल तर थांबलात काय, लिहा प्रतिसाद!
प्रतिक्रिया
17 Jan 2009 - 5:05 pm | सुनील
नेहेमीप्रमाणेच पहिल्या वाचनात फारसे समजले नाही. अजून दोन वाचने झाल्यावर बरेचसे समजेल (असे वाटते!).
तेव्हा प्रतिक्रियी तेव्हाच!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
17 Jan 2009 - 5:19 pm | कपिल काळे
वेगळी माहिती मिळाली. आता जरा विचार करावा लागेल. थोडं विषयांतर होइल खरं पण गेल्यावर्षी जेव्हा उत्तरायण सुरु झाले ( म्हणजे डिसे२००७) तेव्हा सूर्य ऑस्ट्रेलियाकडून भारताकडे येउ लागला. तेव्हाच खरतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट साम्राज्यामधून सूर्याने आपले स्थान हलवले. तिथून तो मावळला,भारताने त्याची सुरुवात करुन आपल्याबरोबर आणलेला सूर्य अजून ऑस्ट्रेलियात परत गेलाच नाही. त्यामुळे २००७ चे उत्तरायण मी खास लक्षात ठेवले आहे.
17 Jan 2009 - 5:21 pm | आनंद
चांगला लेख अदिती, आक्रुत्या आणि चित्रे टाकली असतीस तर समजायला आणखी सोपे गेले असते,
संक्रांत १४ जानेवारीला तर कधी १३ किंवा १५ ला येते , याचा काही
परिभ्रमण - सूर्याभोवती फिरणे, कालावधी ३६५.२५६ दिवस , याच्या बरोबर काही संबध असावा.
17 Jan 2009 - 5:25 pm | मिंटी
आदिती आनंद म्हणतात त्याप्रमाणे जर आकृत्या आणि चित्रे टाकली असतीस तर समजायला सोप्पं गेलं असतं......
पण बाकी एकदम मस्त माहिती मिळाली...... :) छानच लेख
18 Jan 2009 - 12:12 pm | विनायक पाचलग
हेच म्हणतो
तसे तोंड ओळ्ख म्हणु न्ठिक आहे
आपला
बेसिक कच्चा असणारा(पक्का म्हणू का)विनायक
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
17 Jan 2009 - 5:43 pm | ढ
सांगायचं तर काही कळलं नाही.
पण बोलून चालून आम्ही ढ !
जेव्हा केव्हा संक्रांत साजरी करायची ठरेल तेव्हा म्हणू
तिळगूळ घ्या गोड गोड बोला !!!!!!
17 Jan 2009 - 6:33 pm | विनायक प्रभू
अदिती बै नी फार चांगला तास घेतला. त्यांनी शिकवलेले सर्व कळाले. ह्या बद्दल सर्वात पहिले माझे हबिणंदन. बै तुम्ही खरेच हातात रोज थोडा वेळ खडू (किंवा मार्कर )घ्यावा.
एक शंका: सुर्य पुर्वेला उगवतो आणि पष्चिमेला मावळतो हे किती खरे.
17 Jan 2009 - 10:06 pm | पिवळा डांबिस
एक शंका: सुर्य पुर्वेला उगवतो आणि पष्चिमेला मावळतो हे किती खरे.
बरोबर! कारण आमच्या गावात सूर्य आग्नेयेला उगवतो आणि नैॠत्येला मावळतो....
खरंच!!!!
:)
18 Jan 2009 - 11:16 am | विनायक प्रभू
त्याला उगाच उगवतो, मावळतो म्हणतात. तो आपल्या जागेवर उभा आहे वाट पहात पुढच्या महाभारताची वाट बघत.
18 Jan 2009 - 11:24 am | मदनबाण
मग हे वाचा :- http://www.netglimse.com/holidays/makar_sankranti/significance_of_makar_...
(मकर रास असणारा)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
18 Jan 2009 - 4:35 pm | अवलिया
बरोबर! कारण आमच्या गावात सूर्य आग्नेयेला उगवतो आणि नैॠत्येला मावळतो....
खी खी खी
आमच्या गावात २१ मे ते १७ जूलै सूर्य इशान्येला उगवतो वायव्येला मावळतोऽ
१७ मे ते २१ मे आणि १७ जुलै ते २१ जुलै पुर्वेला उगवतो पश्चिमेला मावळतो
२१ जुलै ते १७ मे आग्नेयेला उगवतो आणि नैॠत्येला मावळतो....
मी कोणत्या गोलार्धात आणि गावात ऽ.... व्यनी करा.
(यात स्थानिक पुर्वेचा आणि पश्विमेचा संदर्भ धरावा. विषुववृत्तीय पुर्व धरु नये :) )
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
17 Jan 2009 - 6:51 pm | सुनील
एक शंका: सुर्य पुर्वेला उगवतो आणि पष्चिमेला मावळतो हे किती खरे.
सूर्य जिथे उगवतो त्याला पूर्व म्हणायचा प्रघात आहे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
19 Jan 2009 - 10:21 am | एकलव्य
सूर्य जिथे उगवतो त्याला पूर्व म्हणायचा प्रघात आहे!
वाह ... मार डाला!!
17 Jan 2009 - 10:09 pm | रेझर रेमॉन
हॅलो चिका,
राग नको. गति चांगल्या आहेत. मला त्यात विशेष 'गती' नसली तरी ही!
(Nutation / न्यूटेशन (मराठी शब्द?) - या आसाचा कोन जो सध्या २३.५ अंशात कललेला आहे, तो २२ अंश ते २५ अंश या मर्यादेत बदलत असतो, कालावधी ~ ७२००० वर्ष)
* मराठी शब्द अक्षाच्या कोनाची गति असावा. २२ ते २५ अंशापर्यंत बदलायला तो ~ ४२००० वर्षं घेतो ( का ~ ७२०००?)
५. सूर्य आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरतो. गेल्या १३ अब्ज वर्षात (विश्वाचं वय साधारण हे एवढं आहे अशी हल्ली फॅशन आहे) सूर्याने २० प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत.
* परिक्रमेसाठी साधारण २५ कोटी वर्षे लागतात असं वाचलंय.
६. आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरताना सूर्य आकाशगंगेच्या प्रतलाच्या (plane) खाली-वर simple harmonic motion मधे फिरतो. त्याचा कालावधी आता आठवत नाही.
* याला सूर्यकुलाचे आंदोलन म्हणतात. उर्ध्व आणि अधर आंदोलनाला सुमारे ६ कोटि ८० लाख वर्षे लागतात असे म्हणतात.
* या व्यतिरिक्त एक गति केंद्रच्युतिचे आवर्तन, म्हणजे सूर्याच्या परिभ्रमणाची कक्षा लंबवर्तुळाकार असून तुम्ही लिहिलंय त्या प्रमाणे सूर्य कक्षेच्या केन्द्रापाशी नाही... क़क्षेची ही केन्द्रच्युती ०.०१६ आहे. ही केन्द्रच्युती इतर ग्रहांच्या प्रभावामुळे होते. केन्द्रच्युतीच्या एका आवर्तनाला सुमारे ९०००० वर्षे लागतात. (असं म्हणतात)
आपल्याला काही फारसं गमत नाही... कारण, मं.....द बुद्धी.
-रेझर रेमॉन.
17 Jan 2009 - 10:55 pm | विकास
लेख मस्त आणि माहीतीपूर्ण आहे.
एक प्रश्न - सूर्य मकर राशीतपण २१ डिसेंबरलाच प्रवेश करतो का? तसे असेल तर १३-१५ जानेवारीच्या सुमारास तो काय मध्यावर वगैरे असतो का?
यातील एका तारखेस मकर संक्रात का म्हणतात ते आत्ता माहीत नाही (शोधून सांगेन) पण त्याचा संबंध हा सुर्याचा मकर राशीत असण्याशी आहे इतके नक्की. आपण म्हणता तसे २१ डिसेंबरला तो नसावा कारण आत्तापर्यंत किमान एखाद्या ज्योतिषाने तरी ह्याबद्दल आवाज उठवला असता.
17 Jan 2009 - 11:43 pm | सर्वसाक्षी
माझ भूगोल या विषयीच आकलन वा ज्ञान(?) शालेत असताना होत तितपतच आहे, त्यात सुधरणा नाही हे मला जाणवलं. माहितीपूर्ण पण गहन लेख. ( समजायला वेळ व कष्ट याची गरज आहे)
17 Jan 2009 - 11:53 pm | धनंजय
उत्तम माहिती, अदिती. धन्यवाद.
संक्रांत १३-१५ तारखेपर्यंत हलण्याचे कारण बहुधा पुढीलप्रमाणे :
पृथ्वीच्या सूर्याभोवती परिभ्रमणाचा काल पूर्णांक दिवसांच्या आकड्यात नाही (३६५.२४... दिवस). सूर्य मकरराशीतून कुंभराशीत जाण्याचा मात्र जवळजवळ बरोबर ३६५.२४... दिवसांनी जातो.
म्हणजे या वर्षी जर सूर्य तारामंडळातल्या त्या मकर-कुंभ सीमेवरून १४ जानेवारी, २००९ला पहाटे २:०० वाजता गेला, तर पुढच्या वर्षी (मध्ये २९-दिवसांचा फेब्रुवारी आला नाही तर) बरोबर ३६५.० दिवसांनी, म्हणजे १४ जानेवारी २०१०ला पहाटे २:०० वाजता सूर्य ती मकर-कुंभ सीमा पर करणार नाही, अजून ०.२४ दिवस बाकी राहील. सूर्य ती सीमा सकाळी ~९:०० वाजता पार करेल. (त्याच्या पुढच्या वर्षी १४-१-२०११ दुपारी ~३:०० वाजता.) टीप : १:००, ९:००, ३:०० हे आकडे उदाहरणादाखल घेतलेले आहेत. 'क्ष' वाजता, 'क्ष+६' वाजता, वगैरे म्हणायला हवे होते.
भारतीय तिथी ही सूर्योदयाच्या वेळी सुरू होते आणि पुढच्या सूर्योदयाच्या वेळी संपते. ग्रेगोरियन कॅलेंडरवरचा दिन मात्र मध्यरात्री सुरू होऊन पुढच्या मध्यरात्री संपतो. त्यामुळे वरील उदाहरणातल्या प्रथम वर्षी संक्रांत आदल्या तारखेला साजरी केली जाईल, पुढील दोन वर्षांत मात्र तारीख १४ जानेवारी राहील. कधीकधी लीप-वर्षाच्या जानेवारीत (सौर स्थितीपासून तारखेचा लीप-प्रमाद जेव्हा सर्वाधिक एका-टोकला गेलेला असतो) संक्रांत १५ जानेवारीला येऊ शकते. वगैरे.
हा ०.२४... दिवसांचा प्रमाद लीप-वर्षांमुळे अधून-मधून ठीकठाक केला जातो. परांचनामुळे, तसेच बाकीच्या गतींमुळेही. ३६५-३६६ दिनांकांचे वर्ष आणि हिवाळा-उन्हाळा यांचा त्यातील दिनांक, यांच्यात जो सूक्ष्म प्रमाद दर वर्षी होतो तो साचत जातो. तो अशा कुठल्या पद्धतीने ठीकठाक करायचा ठराव ज्योतिषांमध्ये, किंवा जागतिक स्तरावर झालेला नाही. सध्या सूर्य मकर-कुंभ सीमेवरून जाण्याची वेळ संबंध दक्षिणायन-उत्तरायण दिशाबदलाच्या वेळेपेक्षा वेगळी आहे. पूर्वी कधीकाळी ती वेळ जवळजवळ एकच होती.
वगैरे.
17 Jan 2009 - 11:59 pm | llपुण्याचे पेशवेll
अधिक महीने का पाळले जातात ? असाही एक प्रश्न पडला आहे.
पुण्याचे पेशवे
Since 1984
18 Jan 2009 - 1:08 am | चतुरंग
मराठी किंवा चांद्र कॅलेंडर मधे प्रत्येक महिना साधारणपणे ३० दिवसांचा असतो (क्षयतिथी किंवा सलग दोन दिवसाची एक तिथी वगळता).
त्यामुळे १२ * ३० = ३६० दिवस होतात (प्रत्यक्षात ह्यापेक्षा कमीच भरतात ~ ३५८ च्या आसपास).
त्यामुळे दर चार वर्षांनी एक महिना अधिक करुन ही तूट भरुन काढली जाते त्यालाच अधिक मास म्हणतात.
ग्रेगोरिअन कॅलेंडरमधे ही तूट लीप इयरने भरुन काढतात त्यात एकच दिवस वाढवावा लागतो.
चतुरंग
18 Jan 2009 - 2:50 am | धनंजय
शुद्धिपत्र :
धनुराशीतून मकरात संक्रांत, मकरातून कुंभात नव्हे.
भारतातील तिथींचे आकडे चांद्र आहेत - म्हणजे पूर्णिमा-अमावास्या आणि मधल्या दिवसांचे आकडे. पण चांद्र महिन्याचे नाव मात्र सूर्य कुठे आहे ते बघून ठरते. म्हणजे चांद्र महिना सुरू होताना त्या क्षणी सूर्य कुठल्या नक्षत्रात आहे, ते बघून - म्हणजे चंद्राची कला ० असताना सूर्य चित्रेत असला तर महिन्याचे नाव "चैत्र", सूर्य विशाखेत असला तर "वैशाख", वगैरे (जरा अतिसुलभीकरण खपवून घ्या...)
पण चांद्र परिक्रम-कलांनी सौर वर्षाला पूर्णांकाने भाग जात नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी साधारण त्या ऋतूत जी पूर्णिमा/अमवास्या येते, तेव्हा सूर्य नेमका त्या नक्षत्रात नेमक्या त्याच ठिकाणी नसतो - मागे पुढे असतो. कधीकधी एकापाठोपाठ दोन अमावास्या अशा येतात, की सूर्य त्याच नक्षत्रात असतो - पहिल्या अमावास्येला नक्षत्रात हल्लीच शिरलेला असतो, पुढील अमावास्येत ते नक्षत्र अजून सोडलेले नसते. त्यामुळे एकापाठोपाठ एक अशा दोन महिन्यांना तेच-ते नाव प्राप्त होते. हाच तो अधिक महिना.
अधिक महिना हा ग्रेगोरियन अधिक दिवसासारखा नसतो. सूर्याच्या आकाशमार्गातील विशिष्ट ठिकाणी येत नाही. पूर्णांक विभाजक नसलेल्या भागाकारानंतर शिल्लक नेमकी काय आहे ते यादृच्छिक* असल्यामुळे सूर्य असा एका नक्षत्रात दोन अमावास्यांसाठी असणे, वर्षात कधीही - कुठल्याही नक्षत्रात होऊ शकते. म्हणून अधिक महिना कुठल्याही नावाच्या महिन्याला जोडून आलेला दिसतो.
*अर्थात गणित नेमके असल्यामुळे "यादृच्छिक" शब्दाचा अर्थ "रँडम" असा मला अभिप्रेत नाही.
18 Jan 2009 - 3:31 pm | अवलिया
जरा अतिसुलभीकरण खपवून घ्या..
अजुन सुलभ खाली सांगितले आहे :)
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
18 Jan 2009 - 12:46 am | विकास
जालावर शोधल्यावर जी काही माहीती हाती आली, त्या प्रमाणे, खगोलविद्या आणि ज्योतिषविद्या अशा दोन पद्धतीने कालनिर्णय केला जातो. वर अदीतीने सांगितलेली पद्धत ही खगोलविद्येतील आहे ज्यात Spring Equinox प्रमाणे सुर्याचा राशीप्रवेश ठरवला जातो. ज्योतिषविद्येत एका वर्तुळाचे (जरी लंबाकृती असले तरी) ३६० अंश हे १२ राशीत विभागून ३० अंशाचे एक घर करण्या"त आले आहे. विकीवर अजून एक दुवा मिळाला त्याप्रमाणे:
याच पद्धतीची माहीती ही "आर्यांच्या सणाचा इतिहास" (लेखक "ऋग्वेदी") यांच्या का अशाच कुठल्याशा पुस्तकात वाचल्याचे आठवते. कदाचीत प्रकाशराव यावर माहीती टा़कू शकतील :-)
18 Jan 2009 - 3:29 pm | अवलिया
भारतीय तिथी ही सूर्योदयाच्या वेळी सुरू होते आणि पुढच्या सूर्योदयाच्या वेळी संपते
भारतीय दिवस सूर्योदयाच्या वेळी सुरू होतो आणि पुढच्या सूर्योदयाच्या वेळी संपतो.
चंद्र रविच्या पूढे १२ अंश गेला की एक तिथी होते. तिथीची सुरवात आणि समाप्ती ही दिवसाच्या( अथवा रात्रीच्या ) कोणत्याही भागात होते. कुठल्याही कार्यासाठी किंवा संदर्भ म्हणुन त्या दिवशी सुर्योदयाला जी तिथी असते तीच त्या दिवशी मानली जाते. त्यामुळे पंचागामधे कधी कधी एकच तिथी दोन दिवस असते (अहोरात्र) किंवा एखादी तिथी दाखवली जात नाही (क्षय तिथी).
मात्र श्राद्ध आणि काही धर्मकार्याला, त्या विशिष्ट वेळेस जी तिथी आहे तीच धरली जाते किंवा ती कार्ये त्या तिथीलाच केली जातात.
याविषयीचा खुलासा पंचागात अधिक माहीतीच्या रकान्यात असतो.
बाकी स्पष्टीकरण छान. शुद्धीपत्र दिले आहेच त्यामुळे तो विषय नाही.
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
17 Jan 2009 - 11:55 pm | llपुण्याचे पेशवेll
छान लेख. परांचन गती शब्द ऐकला होता पण त्याचा प्रत्यक्ष वापर कसा होतो ते माहीत नव्हते. धन्यवाद. टिळकानी पंचांगाचे शुद्धीकरण केले होते असे ऐकले होते. ते केले म्हणजे काय केले असेल याचा थोडाफार अंदाज आला. असो या विषयात मूळातच गती कमी असल्याने फार काही कळले नाही. पण लेख आवडला. :)
पुण्याचे पेशवे
Since 1984
18 Jan 2009 - 3:43 am | केदार
तर तेव्हापासून म्हणे एवढ एकच वाक्य सोडलं तर लेख आवडला.तुम्ही माहीती नक्कीच चांगली दिली.
पण भारतात कालमापनाच्या मुख्य दोन पध्दती आहेत चांद्रमास व सौरमास. तसेच विकास ह्यांनी लिहील्याप्रमाने खगोल शास्त्र व भविष्यशास्त्र हे दोन वेगवेगळ्या पध्द्दतीने कालनिर्णय करतात.
सुर्य देखील रोज १ अंशाने आपली जागा बदलतो. सोलार वेळेनुसार त्यामुळे रोज ४ मिनीटाचा फरक पडतो पण ऍस्ट्रॉनॉमी वाल्यांना हा फरक नकोय कारण त्यांना ऍक्सॅट ऍक्सीस हवा त्यामुळे ते साईडरिअल कालगणना करतात. धनू मधुन मकरात येणारा तो योग्य ऍक्सीस डिसें मध्ये येत नसावा त्यामुळेच संक्रात जानेवारीत होते.
मला ह्या प्रश्नावरुन कौरव व पांडवांचे अज्ञातवास नेमका कधी संपतो ते भांडन आठवले कारण सौरा प्रमाने ते महिने संपले न्हवते तर चांद्रमासा प्रमाने ते संपले होते. तेंव्हाही वाद तोच की कालमापण नक्की कसे?
भारतीय गणित हे चाद्रांवर व ऍक्सीस वर (राशी संक्रमन) अवलंबुन असल्यामुळे हा फरक येइल.
(कदाचित मी गणितीय भाषेत हे समजुन देवु शकलो नसेल पण कालमापणात खुप फरक आहे हे मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचे होते)
19 Jan 2009 - 10:15 am | एकलव्य
प्रतिक्रिया आवडली!
18 Jan 2009 - 8:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एखाद्या लेखनात गणित आले की लेखन समजायला मला जरा अवघडच जाते, पण लेख आवडला !!! :)
लिखते रहो !!!
-दिलीप बिरुटे
(आकाशगंगेची कोणतीच गती नसलेला)
18 Jan 2009 - 10:21 am | प्रदीप
व माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार. आकृत्या असत्या तर अजून चांगले झाले असते.
18 Jan 2009 - 11:36 am | देवदत्त
चांगली माहिती आहे. नीट वाचून मग नेमका प्रतिसाद देईन...
परिवलन, परिभ्रमण हे शब्द खूप वर्षांनी वाचनात आले. शाळा आठवली. :)
18 Jan 2009 - 11:37 am | कोलबेर
असेच म्हणतो..परिवलन, परिभ्रमण हे शब्द खूप वर्षांनी वाचनात आले आणि ते कटू दिवस आठवले.
20 Jan 2009 - 8:42 pm | शितल
>>असेच म्हणते.परिवलन, परिभ्रमण हे शब्द खूप वर्षांनी वाचनात आले आणि ..
भुगोलाच्या तासाला परत बसल्या सारखे वाटले. :)
18 Jan 2009 - 12:20 pm | विजुभाऊ
सन्क्रान्त अग्न्येये कडून इशान्ये कडे जाते म्हणजे नक्की काय होते?
( हा प्रश्न खरोखरचा आहे)
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
18 Jan 2009 - 4:31 pm | अवलिया
छान माहिती.
२१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दोन दिवशी दिवस आणि रात्र बारा तासांची असते. याला विषुवदिन असे संबोधले जाते. २१ मार्च रोजी सूर्य विषुववृत्तावर असतो. यादिवशी क्रांतीवृत्तावरील सूर्याचा मार्ग विषुववृत्ताला छेदुन उत्तरेकडे जातो याला वसंत संपात बिंदू असे म्हणतात तर २३ सप्टेंबर रोजी शरद संपात बिंदू असे म्हणतात. वसंत संपात बिंदू पासुन अश्विनी नक्षत्राच्या आरंभबिंदूचे स्थान या अंतराला अयनांश असे म्हणतात. ते अंश, कला, विकला यात दर्शविले जाते.
पृथ्वीची स्वतःभोवतीची फिरण्याची गती खुप मोठी असल्याने भोवरा जसा गुंगत असतो तसेच पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती गुंगते, फिरते. हा साधारणतः २६००० वर्षाचा एक चक्र असा कालावधी आहे. यालाच विलोम अथवा परांचन गती असे म्हणतात. त्यामुळे आज असलेला धृव तारा सतत बदलत असतो. ह्या परांचन गतीमुळे वसंत संपात बिंदू हा दर वर्षी ५०.२ विकला इतका क्रांतीवृत्तावर मागे मागे जातो. तीच अयनांश गती होय.
मेष रास ही अश्विनी नक्षत्रापासुन सुरु होते. अश्विनी नक्षत्रातील ज्या स्थिर ता-यापासुन सुरु होते तिला अश्विन्यारंभ बिंदू असे म्हणतात. ह्याच बिंदूजवळ जेव्हा पूर्वी वसंत संपात बिंदू होता ते शून्य अयनांश वर्ष मानले आहे. परंतु अश्विन्यारंभ बिंदूबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. शून्य अयनांश वर्ष हे शके २०० ते शके ५०० यादरम्यान असावे. याच वेळेस केवळ नक्षत्रावर आधारीत ज्योतिष गणितामधे, पश्चिमेकडुन आलेला राशी विचार बसवला गेला.
ह्या काळात उत्तरायणाची सुरुवात हा फार मोठा सामाजिक सोहळा असे (जसे आज दिवाळी). नेमका त्याच वेळेस राशी पण स्विकारल्या गेल्याने उत्तरायणाची सुरवात, सूर्याचा मकर राशी प्रवेश हा एकाच वेळेस झाला आणि मकर संक्रांत हा सण प्रचारात आला. हळु हळु वसंत संपात १४ जाने, १३ जाने, १२ जाने मागे जात होता. पण मकरसंक्रांत आणि नक्षत्रापेक्षा राशीविचार सर्वसामान्य जनतेला इतका आवडला, की उत्तरायणाची सुरवात म्हणुन साजरा केला जाणारा सोहळा, सूर्याचा मकर राशी प्रवेश म्हणजेच मकरसंक्रांत सण असा बदलला गेला. आणिआजही तोच प्रचलित आहे. मकर संक्रांत या शब्दाचाच अर्थ मकर राशी प्रवेश (मकरेत संक्रमण) असा आहे. मकर संक्रांती व्यतिरिक्त इतर ११ राशींचे प्रवेश त्या त्या नावाची संक्रांत या नावाने पंचांगात दाखवले जातात. पण साजरे करण्याची प्रथा नाही. अशा प्रकारे उत्तरायणाचा आरंभ आणि मकर संक्रांत यांचा काहीही संबंध नाही. केवळ काहीशे वर्षांपुर्वी जेव्हा राशी स्विकारल्या गेल्या तेव्हा उत्तरायण आणि मकर संक्रमण एकावेळी होत असे. निव्वळ योगायोग. जर कदाचित तेव्हा उत्तरायण साजरा करण्याची पद्धत नसती, तर इतर राशी प्रवेशांप्रमाणेच मकरराशी प्रवेश (मकर संक्रांत) हा दिवस सुद्धा दुर्लक्षितच राहिला असता. किंवा भारतीयांनी उत्तरायणच साजरे करण्याची पद्धती अजुनही चालु ठेवली असती तर उत्तरायणारंभ असा सध्या २१ किंवा २२ डिसेंबरला आपण सण साजरा केला असता. पण तसे न होता मकरराशी प्रवेश म्हणुनच जन मान्यता मिळुन हा सण प्रचलित झाला. व तो १४ (१३ किंवा १५) जानेवारीलाच साजरा होतो. निरयन कालगणना स्विकारल्यामुळे जोपर्यंत समाजातुन हद्दपार होत नाही, तो पर्यंत मकरराशी प्रवेश (मकरसंक्रांत) असा हा सण १४ जानेवारीलाच साजरा होणार.
आजही १४ जानेवारी पंचांगामधे मकरराशी प्रवेश असाच दाखवला जातो. २१।२२।२३ डिसेंबर (जो योग्य असेल तो) हाच उत्तरायणारंभ असा दाखवला जातो. त्यामुळे आता या मकरसंक्रांतीचं काय महत्त्व, तर तेव्हापासून म्हणे सूर्य उत्तरेकडे सरकायला लागतो असे मानतात म्हणुन साजरा केला जातो हे म्हणणे बरोबर नाही. गेल्या दिड ते पावणेदोन हजार वर्षांमधे कुणीही उत्तरायणाचा आरंभ मकरसंक्रांतीला होतो असे म्हटलेले नाही. पंचांगामधे पण तसे कधीही उल्लेख नव्हते, नाहीत आणी नसतीलच. एवढी ढोबळ चुक शून्याचा शोध लावणा-यांच्या देशातील बुद्धिमान करतील असे वाटत नाही.
अयनांश आणि उत्तरायणाची सुरुवात यांची सांगड घालुन सूर्याचा मकरराशी प्रवेश १३ ते १५ जानेवारी ( जास्तीत जास्त वेळेस १४ जानेवारी) असा होतो. म्हणुन साधारणपणे १४ जानेवारी मकर संक्रांत असते. पण कधी कधी १३ किंवा १५ तारीख होते. (वरती धनंजय यांनी चांगले स्पष्टीकरण दिले आहे. म्हणुन मी परत देत बसत नाही)
या काळात केवळ निरिक्षणावर आधारुन ही अयनांश गती ५८ ते ६० विकला मानून गणित केले जात असे. (३६० अंश पूर्ण वर्तुळ, एक अंश म्हणजे ६० कला, एक कला म्हणजे ६० विकला). यापद्धतीत ग्रहांचे भोग नीट येत असत, ग्रहण कालात मात्र प्रत्यक्ष आणि गणितात दोन मिनिटे ते २० मिनिटे (त्याकाळी घटका पळे) फरक पडु लागला. परंतु निरिक्षणाला अनुभव आणि गणिताची जोड देवुन दुरुस्ती केली जात असे. पूढे पूढे काही अपरिहार्य कारणांमुळे देशभरातील ज्योतिर्विदांचा एकमेकांशी संपर्क तुटला. तरी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने गणिते मांडुन, निरिक्षणांची जोड देवुन कालमापन करत असे.
सन १९१७ साली सांगलीला लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिर्विदांची सभा झाली. त्यात अयनांश गती ५०.२ विकला निश्वित केली. जी आजही मान्य आहे. पुण्यातील विद्वान ज्योतिषी रघुनाथशास्त्री पटवर्धन यांनी 'शुद्ध टिळक पंचांग' चालु केले. शून्य अयनांश वर्ष शके ४९६ मानुन त्यांनी गणित केले. टिळक पंचांग टिळकांनी चालु केले नाही. सोलापुरचे दाते शास्त्री यांनी याच सभेनंतर अयनांश गती ५०.२ विकला मानुन पंचांग आणले, जे आजही सर्वमान्य असुन दाते पंचांग या नावाने प्रख्यात आहे. दाते व टिळक पंचांग यात ४ अंशांचा फरक आहे. लाहिरी (उत्तरेकडे प्रचलित असलेले) व दाते यांचे अयनांश समान आहेत. तर कृष्णमुर्ती (केपी पद्धतीचे जनक) यांच्यात आणि दाते यांच्या अयनांशात सहा कलांचा फरक आहे. टिळकानी याविषयीची विस्तृत चर्चा आर्क्टिक होम ऑफ वेदाज आणि ओरायन या ग्रंथांमधे केली आहे.
सायन मेष रास ही वसंत संपात बिंदूपासुन सुरु होते व ३० अंशावर संपते. तिथुन पुढे वृषभ वगैरे. निरयन मेष रास ही अश्विनि आरंभ बिंदू पासुन होते. तेथून पुढे प्रत्येकी सव्वादोन नक्षत्रे. रॉफेल एफिमेरीज मधे अयनांश मिळवले की निरयन राशी भोग मिळतात. अन्यथा नक्षत्रभोग दोन्हिकडे समान आहेत.
अश्विन्यारंभ बिंदुविषयीचे प्रमुख पक्ष सध्या दोन आहेत. झिटा पेशियम (जयंती तारा) हा आरंभबिंदु मानणारा झिटा पक्ष आणि १४ व्या नक्षत्रातील (चित्रा मधील ) ता-यापासुन १८० अंशावर आरंभ बिंदु मानणारा चित्रा पक्ष. भारत सरकार मान्य अयनांश( तसेच दाते + लाहिरि) हे चित्रापक्षीय आहेत. १ जाने २००८ ला हे २३।५८।१६, १ जाने २००९ ला २३।५९।११ तर १जाने २०१०ला २४।००।०४ असे आहेत.
चांद्रमास २९.५ दिवसांचा असतो. चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे असते. पौर्णिमेस चंद्र ज्या नक्षत्रात असतो ( १० पैकी ९ वेळा) त्यानुसार त्यामहिन्याला नाव पडले आहे. जसे चित्रा नक्षत्रात असतो तो महिना चैत्र, श्रवण नक्षत्रात असतो तो श्रावण वगैरे. प्रत्येक चांद्र महिन्यात रवि दुस-या (पुढल्या) राशीत प्रवेश करतो. ज्या चंद्रमासात रवी दुस-या राशीत प्रवेश करणार नाही तो महिना अधिक मास म्हणुन गणला जातो. गणिताने हे आधीच काढता येते. सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यात सुमारे ११ दिवसांचा फरक पडतो. तो अधिक मासामुळे भरुन काढला जातो. त्यामुळे आपली दिवाळी साधारणतः आक्टोबर ते नोव्हेंबर याच दरम्यान असते. जर असे केले नसते तर दिवाळी दरवर्षी एक महिना मागे आली असती. आणि सण आणि ॠतु यांचा सुयोग्य ताळमेळ राहिला नसता. गणिताने फाल्गुन ते अश्विन हेच मास अधिक मास होतात. ज्या महिन्यात रविच्या दोन राशी प्रवेश होतो तो क्षय मास होतो. कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष हेच केवळ क्षयमास होतात. हा क्षयमास १९, ११९, १४४ वर्षानी येतो. हे सुद्धा गणितानेच काढले जाते. माघ मास कधीही क्षय किंवा अधिक मास होत नाही.
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
18 Jan 2009 - 1:18 pm | वल्लरी
छान माहीती मिळाली ...
---वल्लरी
18 Jan 2009 - 3:48 pm | वृषाली
चांगली माहिती आहे.
18 Jan 2009 - 4:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
१. काही प्रतिसादांवरून "म्हणे" हा शब्द बराच टोकेरी "वाटत" आहे असं दिसतंय. मी "म्हणे" हा शब्द एवढ्यासाठीच वापरला कारण सण-वार, रूढी, परंपरा, इतिहास, इत्यादी गोष्टींमधलं माझं अज्ञान मला लपवायचं नव्हतं, नाही. मकरसंक्रांत १४ जाने (किंवा १३/१५ला) साजरी करण्यात मला काहीच विशेष दिसत नाही; लहानपणी जे कानावर पडलं होतं ते असं होतं की मकरसंक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं (जे अर्थातच चुकीचं आहे) म्हणून तो "म्हणे" हा शब्द वापरला होता. जिथे मला माझ्याच एखाद्या विधानावर फारसा विश्वास नाही तिथेच "म्हणे" वापरलं आहे, वापरते.
२. अवलिया रहातात ते ठिकाण बहुदा पृथ्वीवर नसावं कारण सूर्य बरोब्बर पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतो असं फक्त दोनच दिवशी होतं, ज्या दिवशी संपातबिंदूं(इक्विनॉक्स)वर सूर्य असतो, २३ मार्च आणि २३ सप्टेंबर (फारतर एखाद दिवसाची एरर असेल) पण एवढे दिवस सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो हे कठीण दिसतंय.
३. अधिक महिन्याबद्दल: चतुरंग यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहेच. आणखी थोडी भरः चंद्र स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती ~२७ दिवसात फिरतो, म्हणून चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरून दिसते (पक्षी: चंद्राच्या अर्ध्या भागावरूनच पृथ्वी दिसते). पण पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे चांद्र महिना ~२९-३० दिवसांचा होतो. सौर कालगणना आणि चांद्र कालगणना यांच्यातला फरक साधारण स्थिर रहावा यासाठी अधिक महिना येतो. क्वचितच ११ चांद्र महिन्यांचंही वर्ष होतं.
४.चांद्र महिन्यांची नावं काही नक्षत्रांच्या नावांशी मिळतीजुळती आहेत याचं माझ्या माहितीत असलेलं कारणः
महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राच्या नावावरून चांद्र महिन्याला नावं दिलेली आहेत. उदा: मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र मृगशीर्ष या नक्षत्रात असेल. किंवा विशाखा नक्षत्रात असताना वैशाख महिना इ.
आत्ता गडबडीत आहे पण लवकरच शक्य तिथे आकृत्या टाकून संकल्पना आणखी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची परंपरा नाही आणि मी त्यालातरी अपवाद नाही.
19 Jan 2009 - 10:19 am | एकलव्य
आत्ता गडबडीत आहे पण लवकरच शक्य तिथे आकृत्या टाकून संकल्पना आणखी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते.
लेख गडबडीतच वाचला पण चांगले खाद्य देऊन गेला. आपण मांडलेले तर्क आमच्या बंद पडलेल्या भूगोलाच्या गाडीला अभ्यासाची चावी देण्यास पुरेसे आहेत. धन्यवाद :)
18 Jan 2009 - 9:17 pm | लिखाळ
छान माहितीपूर्ण लेख आणि माहितीपूर्ण प्रतिसाद.
अकृत्या असत्या तर समजायला अधिक सोपे गेले असते या मताशी सहमत.
टिळकांनी खगोलीय अभ्यास त्यांच्या 'आर्क्टिक होम इन द वेदाज' या पुस्तकात आणि 'ओरायन' या पुस्तकांत मांडला आहे. (गीतारहस्यात नाही.)
अजून अनेक मोठे प्रतिसाद पूर्ण वाचून झाले नाहियेत आणि जे वाचलेत ते तितके समजले नाहियेत. ही माहितीपूर्ण चर्चा पुढे वाचत राहण्यास उत्सूक आहे.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
19 Jan 2009 - 6:00 am | ऋषिकेश
छान लेख आणि वरील प्रतिक्रियादेखील
-ऋषिकेश
19 Jan 2009 - 7:13 am | मुक्तसुनीत
लेख आवडलाच. पुन्हापुन्हा वाचावा लागला :-) (आम्हाला एकाच वर्गात दोनदा कधी बसावे लागले नाही हेच नशीब.)
या विषयावर अनेक प्रश्न आहेत पण जमेल तसे विचारायचे आहेत. (काही खरडीमधून आधीच विचारून झालेत ! ;-) )
अदितीबाईंनी लिहिते रहावे ही विनंती. अशा लेखांमुळे , मूलभूत गोष्टींच्या असलेल्या (तुटपुंज्या) ज्ञानाला उजाळा मिळतो , आणि नवी माहिती खूपच मिळते. जितके सकस लिखाण जास्त येईल , तितका गाळसाळ आणि आकसासारख्या निर्बुद्ध गोष्टीना कमीकमी वाव मिळेल. आपल्या संस्थळाचा खरा उपयोग होत राहील , त्याचे श्रेयस स्वरूप नेहमी लोकांसमोर राहील.
19 Jan 2009 - 7:39 am | अनिल हटेला
वाचन चालू आहे ....
अजुन २-३ दा वाचला की समजायला लागेल...
परीभ्रमण आणी परीवलन माहीती होतं, 'परांचन' नवीनच आहे माझ्या साठी..
विक्षीप्त देवीचे लिखाण हळू हळू समजायला लागले..:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
19 Jan 2009 - 10:25 am | सुनील
थोडक्यात काय तर, लीप वर्ष, अधिक मास, इक्विनॉक्स मागे मागे सरकणे इत्यादि गोष्टी घडतात त्या केवळ घटना समपटीत घडत नसल्यामुळे (अपूर्णांक राहिल्यामुळे).
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
19 Jan 2009 - 4:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
थोडक्यात काय तर, लीप वर्ष, अधिक मास, इक्विनॉक्स मागे मागे सरकणे इत्यादि गोष्टी घडतात त्या केवळ घटना समपटीत घडत नसल्यामुळे (अपूर्णांक राहिल्यामुळे).
लीप वर्ष आणि अधिक मास - हो. अपूर्णांकामुळे हे होतं. या वर्षी एक लीप सेकंद होता.
अवांतर माहिती: या लीप सेकंदाचा विचार दोन वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळा केल्यामुळे एक जानेवारीला जी.एम.आर.टी. थोडा वेळ गंडली होती. अर्थात लगेचच हा घोळ निस्तरला गेला.
इक्विनॉक्स मागे सरकतो तो आस फिरत असल्यामुळे, त्याचा अपूर्णांकाशी संबंध नाही.
थोडी चित्रं आणि माहिती:
(चित्रं महाजालावरून मिळवलं आहे.)
या वरच्या चित्रात ऋतू समजावले आहेत. त्यात एक गृहीतक आहेच की पृथ्वीची कक्षा वर्तुळाकार आहे, जी खरी लंबवर्तुळाकार आहे. या चित्राचा विचार करता, सूर्य थोडा २२ डिसेंबरची जी स्थिती आहे त्या स्थितीच्या जवळ आहे.
परांचन (precession):
या वरच्या चित्रात फिरता अक्ष दाखवला आहे. पण पृथ्वीचं परांचन आणि ही आकृती यात फरक आहे. पृथ्वीचा अक्ष अधांतरी असल्यामुळे या गतीचं केंद्र वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे खाली नसून पृथ्वीच्या मध्यभागी आहे.
त्याचा परिणाम खालच्या आकृतीत फक्त २२ डिसेंबरच्या स्थितीवर दाखवला आहे. जेव्हा पृथ्वीचा अक्ष १८० अंशात फिरेल (याला १३००० वर्ष लागतील) तेव्हा २२ डिसेंबरला उत्तर गोलार्धात सगळ्यात मोठा दिवस असेल.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
20 Jan 2009 - 4:18 pm | वाहीदा
gud one ! keep it up !
~ वाहीदा
20 Jan 2009 - 8:59 pm | प्रदीप
अवांतर माहिती: या लीप सेकंदाचा विचार दोन वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळा केल्यामुळे एक जानेवारीला जी.एम.आर.टी. थोडा वेळ गंडली होती. अर्थात लगेचच हा घोळ निस्तरला गेला.
ह्याचा जरा खुलासा व्हावा. दोन वेगवेगळे लोक कोण? व जी. एम. आर. टी. काय आहे?
यू. टी. सी. (युनिव्हर्सल टाईम, कोऑर्डिनेटेड) च्या डिसें ३१ च्या २३:५९:५९ नंतर लगोलग हा एक सेकंद गणण्यात येईल (म्हणजे डिसें. ३१, २३:५९:५९, डिसें. ३१ २३:५९:५९ + ००:००:०१, जाने. १, ००:००:०० असा क्रम) असे अगोदरच जगजाहीर केले होते. त्यानुसारच सगळे केले गेले.
20 Jan 2009 - 9:09 pm | लिखाळ
अवांतर : इथली लीप सेकंदाची चर्चा वाचून 'तुझं आहे तुजपाशी' या नाटकातला काकाजी आणि आचार्यांतला संवाद आठवला.
आचार्य : किती वाजले? बरोबर किती ? ..... सात वाजायला दोन मिनिटे बाकी आहेत?!
काकाजी : 'अरे आमच्या तर घडाळ्यात दुपारचे बाराच वाजून राहिलेत अजून. घडाळ्याला किल्लीच द्यायची राहिली वाटतं'
'...... जंगलात काय दोनच वेळा दिवस आणि रात्र...(इत्यादी .)
-- (श्याम)लिखाळ.
28 Jan 2009 - 11:47 pm | भडकमकर मास्तर
परांचन गतीची इमेज महान आहे...
लेख भारी आहे...
...
पृथ्वीच्या एक दोन गती अधिक कळाल्या...
सूर्य एसेचेममध्ये हालतो वगैरे
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
19 Jan 2009 - 3:17 pm | मनस्वी
छान लिहिलाय लेख.
वेळ काढून परत एकदा नीट वाचावा लागणार आहे.
दुर्बिटणे बाईंनी चांगली शाळा घेतलीये.
19 Jan 2009 - 3:46 pm | शंकरराव
अभ्यासपूर्ण लेख व प्रतिसाद,
लेख आवडला
19 Jan 2009 - 5:48 pm | महेश हतोळकर
थोडी भर माझ्याकडून
अधीकमास
भारतीय (चांद्र) कालगणनेनुसार चंद्राने सूर्याला ओलांडले (आमावस्या झाली) की महिना बदलतो. बदललेल्या महिन्याचे नाव मात्र सूर्य त्या दिवशी ज्या राशी मध्ये असेल त्यावरून ठरते. म्हणजे महिना किती दिवसांचा ते चंद्र ठरवणार पण महिन्याचे नाव सूर्य ठरवतो.
उदा. सरत्या आमावस्येला जर सूर्य कर्क राशीत असेल तर महिन्याचे नाव श्रावण. (मेष - वैशाख, वृषभ - जेष्ठ, ------, मीन - चैत्र).
पण राशींची संख्या १२. त्यामुळे सूर्याला एका राशीतून दुसर्या राशीत जायला ३० दिवस लागतात. पण चंद्राला सूर्यास ओलांडायला मात्र ३० पेक्षा कमी दिवस लागतात. त्यामुळे महिन्याचे दिवस गडबडतात आणि सलग दोन आमावस्या सूर्य एकाच राशीत रहातो. हाच तो आधिक महिना. सविस्तर माहीती येथे मिळेल.
टिळकांबद्दल (ओरायन आणि आर्क्टिक होम इन दी वेदाज्) माझ्या जवळ आत्ता लगेच माहीती उपलब्ध नाही. थोडं धुंडाळून टाकतो.
20 Jan 2009 - 2:55 pm | नितिन थत्ते
मकर सन्क्रांत ही सौर कॅलेंडर नुसार पुढे सरकते. कोणे एके काळी संक्रांत २२ डिसेंबर ला येत असावी म्हणून संक्रांतीचा संबंध उत्तरयणाशी जोडला गेला असावा. सध्या संक्रांत ट्रान्झिशन मध्ये आहे म्हणून ती कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येते. काही वर्षांनी सन्क्रांत १४ जानेवरीला येणार नाही. नंतर ती आणखी पुढे जाईल.
संक्रांतीचा आणि उत्तरायणाचा काहीही संबंध नाही.
29 Jan 2009 - 12:32 am | चैतन्यकुलकर्णी
माझ्या एका उत्तर भारतीय मित्राने दिलेल्या माहितीनुसार दोन्हीकडे शुद्ध व कृष्ण पक्ष यांत फरक आहे. ते बहुतेक पुढे/मागे असतात. याचे कारण काय?
शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!
29 Jan 2009 - 12:57 am | विकास
माझ्या एका उत्तर भारतीय मित्राने दिलेल्या माहितीनुसार दोन्हीकडे शुद्ध व कृष्ण पक्ष यांत फरक आहे. ते बहुतेक पुढे/मागे असतात. याचे कारण काय?
एक शालीवाहन शकाप्रमाणे (मला वाटते महाराष्ट्रातील) तर दुसरा विक्रमसंवत्सराप्रमाणे असतो.
29 Jan 2009 - 10:17 am | नितिन थत्ते
महाराष्ट्रात महिना अमावस्येला संपतो. तर उत्तरेत पौर्णिमेला संपतो.
आपल्याकडे चैत्रमहिना होळी नंतर १५ दिवसांनी सुरू होतो. उत्तरेत होळीच्या दुसर्या दिवशी सुरू होतो.
आपल्या दृष्टीने पितृपक्ष भाद्रपदात असतो. उत्तर भारतीयांच्या दृष्टीने आश्विनात असतो.
अवांतरः महाराष्ट्रात पाऊस जूनच्या मध्यात येतो. तो पुढे सरकत जुलैच्या मध्यात उत्तर भारतात पोचतो. उत्तरेतील मासगणनेप्रमाणे श्रावण आपल्यापेक्षा १५ दिवस आधी सुरू होतो. त्यामुळे पावसाळा सुरू होणे व श्रावण सुरू होणे या दोन्ही घटना साधारण एकात सुमारास घडतात. म्हणून हिंदी गाण्यांमध्ये नेहमी पावसाळा आला या अर्थी आता श्रावण आला असे म्हटले जाते. श्रावणात पाऊस ओसरण्याची सवय असलेल्या आपल्यासारख्यांना हे ऑड वाटते.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)