अवधूत साठे..

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in काथ्याकूट
5 Dec 2025 - 7:35 pm
गाभा: 

' अवधूत साठे, ट्रेडिंग ॲकॅडमी' ही सुरेश वाडकर यांनी गायलेली ओळ अल्पावधीतच चांगलीच लोकप्रिय झाली आणि साठे ॲकॅडमी सुद्धा.
आज त्यांच्या वरील सेबीने केलेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमीवर परवाना न घेता वित्तीय सल्लागार म्हणून संस्था चालवल्याचा आरोप आहे.
सामाजिक प्रसार माध्यमांवर अशीही चर्चा सुरू झाली आहे की एका मराठी माणसाने अगदी अल्पावधीतच मिळवलेल्या यशामुळे अमराठी ट्रेडर्स लॉबीने हे कारस्थान रचले आहे
जाणकारांनी प्रकाश टाकावा

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

5 Dec 2025 - 8:13 pm | चंद्रसूर्यकुमार

मी अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडेमीचा विद्यार्थी आहे आणि माझ्यासारख्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना अवधूत सर हे एकदम जेन्युईन आहेत हे माहित आहे. त्यांच्या काही हितशत्रूंनी हा प्रकार केला आहे याविषयी मला अजिबात शंका नाही. मी त्यांची जी काही सेशन बघितली आहेत त्यात त्यांनी कधीही एखादा शेअर विकत घ्या असे सांगितलेले नाही तर ते एखादा शेअर घेतला किंवा विकला तर तो टेक्निकल अ‍ॅनॅलिसिसच्या कोणती तत्वे/नियम या अनुसार त्यांनी विकत घेतला/विकला एवढेच सांगतात. पूर्ण उद्देश विद्यार्थ्यांना शिकविणे आणि त्यांची स्किल विकसित करणे इतका आणि इतकाच असतो. पूर्ण देशात मार्केटमधून किमान एक लाख यशस्वी ट्रेडर्स निर्माण व्हायला पाहिजेत हा उद्देश त्यांनी ठेवला आहे. कोणतीही टिप न देता कोणतीही गोष्ट आयती न देता विद्यार्थ्यांना योग्य तो निर्णय स्वतः स्वावलंबीपणे घेता यावा- त्यांच्या भाषेत आपले विद्यार्थी Independent professional traders व्हावेत हा आणि केवळ हाच त्यांचा उद्देश आहे. खरं सांगायचं तर इतकी सकारात्मक उर्जा आणि तळमळ असलेला दुसरा माणूस मी तरी बघितलेला नाही. सतत आपल्या विद्यार्थ्यांना आणखी काय देता येईल, त्यांना यशस्वी होण्यासाठी लागणारा कालावधी कसा कमी करता येईल, आधीच चांगली असलेली सपोर्ट सिस्टीम आणखी कशी वाढवता येईल याचा आणि याचाच विचार करणारे आणि ध्येयाचे वेड लागलेले अवधूत सर आहेत. मार्च २०२० मध्ये कोविड काळात मार्केट जोरदार आपटले तेव्हा एका दिवसात एक कोटी रूपये त्यांनी कमावले होते हे त्यांना तेव्हापासून ओळखणार्‍या सगळ्या विद्यार्थ्यांना माहित आहे. त्यांनी कमाविले आहे त्याच्या एखादा टक्का जरी कमावता आले तर मस्त समुद्रकिनारी एखादा बंगला बांधून काही न करता 'चिल मारावी' असे माझ्यासारख्याला वाटेल. पण इतके पैसे कमावले असूनही कधी कुठे मजा करायला गेले आहेत असे कधी झाले नाही. त्यांनी कधी विश्रांती घेतली आहे हे ऐकिवात नाही. मे २०२५ मध्ये त्यांच्या मुलाच्या दीक्षांत समारंभासाठी ते अमेरिकेला गेले होते तिथूनही त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सेशन घेतली होती. त्या सेशनमध्ये मी होतो म्हणून सांगत आहे. असे झपाटून काम करणारा माणूस आहे तो.

आता आलेल्या संकटातून ते नक्की काहीतरी मार्ग काढतीलच याची खात्री आहे. ज्या विद्यार्थ्यांची स्किल वाढवायला स्वतः कष्ट घ्यायची आणि आपली चूक होत असेल तर ती कुठे आणि कशामुळे होत आहे हे जाणून घेऊन त्यात सुधारणा कशी करता येईल यावर काम करायची तयारी आहे असे सगळे विद्यार्थी अगदी एकदिलाने अवधूत सरांच्या मागे आहेत. तरीही तुळशीच्या रोपांमध्ये भांग उगवितेच त्याप्रमाणे ज्यांना काही न करता, स्वतः कोणतेही कष्ट न घेता दुसरा कोणी टिप देणार आणि काय करायचे ते सांगणार अशांचे मत सरांविषयी चांगले नसेल.

गामा पैलवान's picture

5 Dec 2025 - 10:45 pm | गामा पैलवान

चंद्रसूर्यकुमार,

खुलाशाबद्दल धन्यवाद. एक प्रश्न पडलाय. सेबी ट्रेडिंग अकादमी वर कशी काय कारवाई करू शकते? तिच्या अखत्यारीत ही संस्था येऊ शकेल काय? वित्तीय सल्लागाराचा परवाना न घेता काम करायचा धोका मास्तर कधीही पत्करणार नाहीत, असं तुमच्या म्हणण्यावरनं वाटतंय. किंबहुना अकादमी वित्तीय सल्ला देत नाही असंच दिसतंय. मग सेबी कुठनं आली?

आ.न.,
-गा.पै.

चंद्रसूर्यकुमार's picture

5 Dec 2025 - 11:09 pm | चंद्रसूर्यकुमार

किंबहुना अकादमी वित्तीय सल्ला देत नाही असंच दिसतंय. मग सेबी कुठनं आली?

अमुक एक शेअर घ्या असा सल्ला किंवा टिप सर कधीही देत नाहीत तर नक्की काय बघून आपण तो शेअर घेतला/विकला ते सांगतात. याचा उद्देश हा की भविष्यात तसाच सेट-अप दुसर्‍या कोणत्या चार्टमध्ये आला तर विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे नक्की काय करायचे याचा निर्णय घेता यावा. पण याविषयी नियम थोडे धुसर आहेत असे वाटते. मी अमुक एक गोष्ट बघून तो शेअर घ्यायचा निर्णय घेतला याचा अर्थ तो शेअर घ्या असा सल्ला झाला का? सेबीने कदाचित तसा अर्थ लावला असावा.

जर कोणीही अमुक एक शेअर घ्या असे जाहीरपणे (युट्यूब/टेलिग्राम किंवा कुठेही ) म्हटले तर त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारे लोक असतात. असे म्हणणार्‍या मनुष्याकडे योग्य ते ज्ञान नसेल आणि त्याचे डोळे झाकून अनुकरण केले तर त्यातून लोकांचे नुकसान होऊ शकते. म्हणून कोणीही याविषयी सल्ले द्यायला निघाला तर त्याच्याकडे सेबीचे लायसेन्स असले पाहिजे असा नियम आहे. आणि तसे परवाने देण्यापूर्वी सेबी परीक्षा घेते आणि त्या परीक्षेत कमीतकमी टक्के मार्क मिळवावे लागतात तरच सेबी परवाना देते. सेबीचे हे नियम त्या दृष्टीने योग्य आहेत. मात्र मुळात सल्ला म्हणजे काय- सर जे काही शिकवितात त्याला सल्ला म्हणता येईल का याविषयी तितकी स्पष्टता नसावी असे वरकरणी वाटते. आता अवधूत सर काय करतात ते बघायचे. आमच्यासारखे विद्यार्थी त्यांचे आजन्म समर्थक आहेत.

या शिक्षणासाठी किंवा सल्ल्यासाठी काही प्रकारची फी घेतली जात असेल तर मग काही नियम लागू होत असावेत. मग भले सल्ल्याचे स्वरुप कसे का असेना. (अमुक शेअर घ्या असे सांगणे किंवा मी का घेतला ते सांगणे)

मोफत असते तर नियमात कदाचित काही शिथिलता योग्य ठरेल.

या अकॅडमीत काही फी घेतली जाते का ते माहीत नाही.

मोफत असते तर नियमात कदाचित काही शिथिलता योग्य ठरेल.

माझ्यामते मोफतही सल्ला देणे गुन्हा आहे.मी एका इन्फ्लुएंसरला फॉलो करते ,त्याला एका गोल्ड म्युच्युअल फंड विषयी विचारले तरी त्याने ,सॉरी मी नियमानुसार हे सांगू शकत नाही असे सांगितले-त्याचे उत्तर

"SEBI नियमांनुसार मी Buy-Sell Tips देऊ शकत नाही. पण, मी तुम्हाला Swing Trading शिकवतो, जेणेकरून तुम्ही स्वतःचे ट्रेडिंग निर्णय घेऊ शकाल.
कोर्स जॉईन केल्यानंतर आमच्या WhatsApp Group मध्ये Access मिळेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

6 Dec 2025 - 8:18 pm | चंद्रसूर्यकुमार

अवधूत साठे ट्रेडिंग अ‍ॅकॅडेमीमध्ये फी नक्कीच घेतली जाते. पण सेबीचे नियम फी घेतली किंवा घेतली नाही यावर अवलंबून नसतात. २०१८ च्या सुमारास युट्यूबवर एक ट्रेडर्स डेस्टिनेशन म्हणून चॅनेल होता. तो मी फॉलो करायचो. अजूनही तो चॅनेल आहे पण त्यातील बरेचसे व्हीडिओ त्या चॅनेलवाल्याने काढले आहेत आणि गेल्या ७ वर्षात नवीन काहीही अपलोड केलेले नाही. सेबीचे नियम आल्यानंतर त्याने आपल्यावर कारवाई होईल या भितीने तो चॅनेल आवरता घेतला असे दिसते.

मूलभूत प्रश्न हा की अवधूत सर जे काही शिकवत होते त्याला सल्ला म्हणता येईल का? सेबीने त्यांच्या वेबिनारमधील काही स्क्रिनशॉट जोडले आहेत आणि त्यात ते काय म्हणाले हे पण जोडले आहे. त्यातही 'मैने इस लेव्हल पर बाय किया' असेच म्हटले आहे. तुम्ही त्या लेव्हलला बाय करा असे नाही. मी या चर्चेत जे काही लिहित आहे ते माझे स्वतःचे अनुभव आहेत. मला अवधूत साठे ट्रेडिंग अ‍ॅकॅडेमीचा अनुभव चांगला वाटला हे लिहिले आहे. याचा अर्थ मी इतरांना 'तुम्ही पण जॉईन करा' असा सल्ला दिला असा होतो का? तसेच काहीसे अवधूत सर जे बोलतात त्याविषयी असावे असे मला वाटते.

दुसरी गोष्ट म्हणजे आस्ता (अवधूत साठे ट्रेडिंग अ‍ॅकॅडेमी) च्या लक्ष्मी म्हणून काही 'सक्सेस स्टोरी' आहेत असा दावा केला आहे. त्यात दोघींनी दावा केला त्यापेक्षा बराच कमी फायदा झाला असे सेबीला सापडले. पण त्या दोघींनी स्वतःच्याच नाही तर त्यांच्या नवर्‍यांच्या अकाऊंटमधूनही ट्रेडींग केले असले तरी आश्चर्य वाटू नये. तसे बर्‍याच जणी करतात. अनेक पुरूष ट्रेडर्सही बायकोच्या अकाऊंटमधून ऑर्डर टाकतात. सेबीने चौकशी करताना जर बायकोच्या पॅनकार्डवर किती व्यवहार आहेत हे बघितले तर आकडा कमीच दिसेल.

तिसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी असे आले आहे की अ‍ॅकॅडेमीच्या ६५% विद्यार्थ्यांना तोटा होतो. यात आश्चर्य काय? रिटेल ट्रेडर्सपैकी ९०% जणांना तोटा होतो हे जगजाहीर आहे. मग सगळ्या रिटेल ट्रेडर्सपैकी १०% ना फायदा होत असेल तर अवधूत साठेंच्या ३५% विद्यार्थ्यांना फायदा होत आहे असे म्हटले तर तोच आकडा एकदम भारदस्त दिसायला लागेल. अजून नाट्यमयता आणायला एकूण रिटेल ट्रेडर्सच्या सरासरीच्या साडेतीन पटीने अवधूत साठेंच्या विद्यार्थ्यांना फायदा होतो असे म्हटले तर ज्यांना यातले काही कळत नाही त्यांना वाटेल- वा वा कित्ती कित्ती छान.

चौथी गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी अवधूत साठे ओव्हरनाईट करोडपती व्हाल, काही न करता पैसे मिळतील असले दावे करतात असले भंपक प्रकार आले आहेत. त्या लोकांना अ‍ॅकॅडेमीविषयी आणि अवधूत साठेंविषयी काहीही म्हणजे काहीही माहित नाही एवढेच बोलतो. ते नेहमी म्हणतात- तुम्ही स्वतःला १००० दिवस द्यायची तयारी ठेवा. १००० दिवस म्हणजे त्या दिवसात भरपूर कष्ट करायचे- भरपूर बॅकटेस्टिंग करायचे. नुसते एक हजार दिवस झाले म्हणून काही न करता (किंवा पाहिजे तितके प्रयत्न न करता) यश मिळेल अशी अपेक्षा कोणाची असेल तर ते मूर्ख आहेत एवढेच म्हणेन. मला स्वतःला १००० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. तरी मी पाहिजे त्या पातळीला आहे का? नाही. याचा अर्थ अवधूत साठेंमध्ये किंवा त्यांच्या शिकविण्यात काही खोट आहे का? तर अजिबात नाही. मी तितक्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत का? ते नेहमी सांगतात तुम्ही सोशल मिडियात जेवढा वेळ घालविता तो न घालविता चार्ट्स बघा. ते मी करत आहे का? नाही. मिसळपाववर मी अनेकदा येतोच ना? तेव्हा मी पूर्ण प्रयत्न करत नसेन तर ती चूक कोणाची? माझी की अवधूत साठेंची? पण बहुतेकांना आपण चुकत असू हेच मान्य करायची तयारी नसते. कोणीतरी टीप्स द्यायच्या आणि यांना काही न करता पैसे पाहिजेत अशी अपेक्षा असते. अवधूत साठेंच्या अगदी पहिल्या सेशनमध्ये त्यांनी एक साधा प्रश्न विचारला होता- कोणाकोणाला पैसे हवेत? बहुतेक सगळ्यांचे हात वर होते. तेव्हा त्यांनी म्हटले- की हात वर केलेल्या सगळ्यांनी बाहेर जा. अर्थात कोणालाही बाहेर काढले नाही पण त्यांचे पुढचे वाक्य होते- इथून स्किल्स शिका. पैसा हे बाय प्रॉडक्ट असेल. पैशावर फोकस ठेवलात तर आयुष्यात कधी मार्केटमध्ये यश यायचे नाही. यापैकी एक कणही माहित नसलेले लोक हातात किबोर्ड आहे म्हणून बडवत सुटलेत आणि काहीही लिहित सुटलेत.

आमचा अवधूत सरांवर पूर्ण विश्वास आहे. माझी इच्छा आहे की त्यांनी याविरूध्द कोर्टात जाऊन कोर्टाकडून शेअर मार्केटमध्ये सल्ला म्हणजे नक्की काय ही व्याख्या त्या निमित्ताने व्हावे असे फार वाटते.

असो.

आपण कोणतीही गोष्ट व्यापारी तत्त्वावर सुरू करतो तेव्हा त्यास लागू होणारे सर्व नियम पाळावे लागतात. कारवाई झाल्यावर चिडचिड करून काही उपयोग नसतो. अमेरिकेत काही भारतीय ज्योतीषी व्यवसाय करतात पण भारतातले आणि अमेरिकेतले नियम वेगळे आहेत याची त्यांना जाण आहे. " By using this you agree to our privacy policy and conditions" , ' read here' असे करार असतात ते आपण विविध apps मध्ये पाहतोच. तशा अटी आणि नियम गिऱ्हाईकांना ( customers) मान्य करायला लावूनच उपक्रम राबवावे लागतात. म्हणजे स्थानिक आस्थापना नियम अटी लागू होतात. त्या पार कराव्या लागतात.
[ मी एके ठिकाणी वाचलं की रशियामध्ये गरजूंना फुकट जुने कपडे वाटायचे असतील तरीही जीएसटी लागतो. लोकांच्या भल्यासाठी करतोय म्हणून करातून सूट नाही.
इमारतीच्या ( सोसायटीच्या) गच्चीवर डान्स क्लास फुकट चालवायचा तरीही सोसायटीची परवानगी लागते.
शहरात गावात एखाद्या मोकळ्या मैदानात दुर्बिणीतून आकाशदर्शन फुकट दाखवायचे असले तरीही पोलिसांची परवानगी लागते. सार्वजनिक जागेवर लोकांना जमवण्यासाठी परवानगी. ]

आपण कोणतीही गोष्ट व्यापारी तत्त्वावर सुरू करतो तेव्हा त्यास लागू होणारे सर्व नियम पाळावे लागतात. कारवाई झाल्यावर चिडचिड करून काही उपयोग नसतो

बरोबर,साठे यांनी पसारा खुप वाढवला होता(चांगल्या अर्थाने).त्यातली एखादी वाट चुकून चुकली की ठरवून चुकली ,हा येणारा तपासच सांगेल.परंतु शेअर मार्केटमध्ये अजून एक केस स्टडी या रूपाने मिळाली आहे.

कानडाऊ योगेशु's picture

6 Dec 2025 - 12:50 pm | कानडाऊ योगेशु

म्युट्युअल फंडांच्या टीवी वर वारंवार झळकणार्या जाहीरीती ह्या कायद्याअंतर्गत येतात का? अश्या प्रत्येक जाहीरीतींच्या शेवटी म्युच्युअल फंड्स आर स्ब्जेक्ट टू मार्केट रिस्क..ब्ला..ब्ला..ब्ला..हा जाहीरात फास्ट उरकुन टाकणारा डिस्क्लेमर येतोच येतो.

विवेकपटाईत's picture

7 Dec 2025 - 5:19 pm | विवेकपटाईत

पूर्वी मध्यमवर्गीय एखाद्या कंपनीचे शेअर घेऊन. अनेक वर्षांनंतर गरजेच्या वेळी विकायचे कंपनी सतत नफ्यात असेल तर, उत्तम परतावा मिळत असे. पण आज मध्यमवर्गाला कमी वेळात पैसा कमवायचा आहे. कमी वेळात जास्त पैसा शेअर बाजारात आहे, असे स्वप्न दाखविणारा अवधूत साठे. पण लोक विसरून जातात
रोजची ट्रेडिंग म्हणजे जुगार आणि जुगारात भाग्य महत्वपूर्ण ठरते. .

चंद्रसूर्यकुमार's picture

7 Dec 2025 - 6:24 pm | चंद्रसूर्यकुमार

कमी वेळात जास्त पैसा शेअर बाजारात आहे, असे स्वप्न दाखविणारा अवधूत साठे.

पटाईत काका, माफ करा पण हे वाचून गुडघ्यातील प्रतिसाद देणारे अनेक आणि तुम्ही यात फरक आहे असे वाटत होते तो गैरसमज होता असे वाटते.

अवधूत सरांनी शेअर बाजारात कमी वेळात जास्त पैसा आहे अशी स्वप्ने नक्की कधी आणि कुठे दाखवली हे सांगता का? की दिल्लीत राहून केजरीवालांची थापा मारायची सवय तुम्हाला पण लागली आहे? अर्थात तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या प्रतिसादांची तुम्ही दखलही घेत नाही हे माहित आहे त्यामुळे तुम्ही यावर काहीही लिहिणार नाही हे माहित आहे पण अवधूत सर नक्की काय सांगतात हे तुम्हाला काहीही माहीत नाही असे दिसते.

असो.

युयुत्सु's picture

7 Dec 2025 - 6:51 pm | युयुत्सु

Rofl

कपिलमुनी's picture

7 Dec 2025 - 8:51 pm | कपिलमुनी

जाऊ द्या . इतका दुष्ट रिप्लाय नका हो देऊ..
वयाचा विचार करा ही इनन्ति

विवेकपटाईत's picture

8 Dec 2025 - 6:46 pm | विवेकपटाईत

तुम्ही अवधूत चे रील्स बघितले का? जल्लोषाचे वातावरण बघितले आहे का? नाचणारे शॉट्स पाहूनच मी प्रतिसाद दिला आहे. स्वप्न याहून वेगळे काय असतात तुम्हीच सांगा.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Dec 2025 - 7:15 pm | चंद्रसूर्यकुमार

असली एखादी गोष्ट आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट घेतली की मग असलेच काहीतरी तर्क लढविले जाणार. तुम्ही ज्याला जल्लोषाचे वातावरण म्हणता ते मी नुसते रील्समध्ये बघितलेले नाहीये तर स्वतः अनुभवले आहे. काहीही झाले तरी- म्हणजे मार्केटमध्ये प्रॉफिट/लॉस काहीही झाला तरी take it in your stride आणि 'मजा आ गया' असे म्हणता आले पाहिजे असे सर सांगत असतील, एका ध्येयाने प्रेरीत झालेले लोक एकत्र आले असतील तर मग उत्साहाचे किंवा तुम्ही म्हणता तसे जल्लोषाचे वातावरण असेल की लोक सुतकी चेहरा करून बसतील?

नाचणारे शॉट्स पाहूनच मी प्रतिसाद दिला आहे

हो अवधूत सर असे बर्‍याचदा उत्साहाच्या भरात नाचतात. अ‍ॅकॅडेमीचा एक 'ओजीएम कार्ड' (Opportunity generating machine) म्हणून प्रकार आहे. सरांनी ठरविल्याप्रमाणे मार्केटमध्ये एका पातळीवर यश मिळाले की मग त्या व्यक्तीला ते ओजीएम कार्ड दिले जाते. अ‍ॅकॅडेमीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्केटमधून यश मिळवायची ती एक महत्वाची पायरी आहे. असे ओजीएम कार्ड द्यायचा एक कार्यक्रम असतो. त्यावेळेस त्यांचा आनंद सरच नाही तर इतर बरेच ट्रेनर्स नाचून साजरा करतात. त्यात वाईट काय आहे? सतत चौकोनी चेहरा करून मख्खासारखे बसून राहायचे का? ते कार्ड मिळालेल्यांचे हजारो लोक अभिनंदन करत आहेत, त्यांचे यश उत्साहाने साजरे करत आहेत यातून ज्यांना ते कार्ड मिळालेले नाही त्यांनाही आपल्याला ते कार्ड मिळण्यासाठी- पक्षी तितके यश मिळविण्यासाठी काम करायची प्रेरणा मिळत असेल तर त्यात चूक काय आहे? ट्रेडिंग हा प्रकार एकलकोंडा (लोनली प्रोफेशन) आहे. अशावेळी एखादी कधी चूक झाली/ मोठा लॉस झाला तर आधार द्यायला किंवा ट्रेड मस्त चालला/ मोठा प्रॉफिट झाला तर तो साजरा करायलाही एका ध्येयाने/एका दिशेने जाणार्‍यांचा समुदाय सरांनी केला आहे आणि पूर्ण देशात ठिकठिकाणी हजारो लोक त्याचे सदस्य आहेत. अशावेळेस एकत्र येऊन मजा केली तर बिघडले कुठे? त्या समुदायात अगदी दहावी नापासपासून न्यूरोसर्जन आणि ऑन्कॉलॉजिस्टपर्यंत सगळ्या प्रकारचे लोक आहेत. तिथे प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटलच्या तत्वज्ञानावर किंवा तत्सम गहन विषयावर चर्चा करत बसले तर तो समुदाय टिकेल का?

एकूणच सरांची अ‍ॅकॅडेमी म्हणजे काय आहे याविषयी काहीही माहित नसताना अर्धवट पण नाही तर चतकोरवटपेक्षा कमी माहितीवर, इकडे हा रील बघितला, तिकडे तमका व्हिडिओ बघितला यावरून लोकांना वाईट मत बनविताना बघून आश्चर्य वाटते.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

8 Dec 2025 - 2:18 am | हणमंतअण्णा शंकर...

खूप आनंद झाला.

हजारो तरुणांना ज्यांना रिस्क म्हणजे काय आणि ती कशाशी खातात याचे कोणतेही भान न देता ट्रेडिंग म्हणजेच झिरो सम गेम खेळायला लावणे, शिकवणे, आणि त्याचा प्रचार करणे हा गुन्हाच मानला गेला पाहिजे.

हा एक आणि तो पुण्याजवळचा रवींद्र भारती.

रवींद्र भारतीवर देखील सेबीने कारवाई केली.

हे लोक नुसते ट्रेडिंग शिकवतात यावर जे लोक विश्वास ठेवतात त्यांना खडबडून जागे करावेसे वाटते. विशेषत, रवींद्र भारतीने शेकडो तरुणांना एजंट बनवून नफ्यावर नफा या तत्त्वाने हजारो लोकांना अ तिशय रिस्की इन्स्ट्रुमेंट्स मधे गुंतवणूक करायला लावली आहे.

या लोकांना जेल मधेच पाठवावे.

1
सेबी च्या रिपोर्ट मध्ये एक बाब अशी आढळून आली की स्वतः अवधूत साठे यांनी स्वतः काही करोड 6 करोड च्या आसपासचा लॉस स्वतः च्या अकाउंट मध्ये स्वतः ट्रेडिंग करून केलेला आहे . यावर आपले काय मत आहे आणि सर्वव्यवहार ऑनलाइन असल्याने हे सहज सिद्ध करता येते
2
आपण स्वतः सेबी ची अंतरिम आदेशाची pdf पुर्ण वाचलेली आहे का
3
आपण स्वतः अवधूत साठे यांचा कोर्स करून नफा मिळविलेला आहे का ? डिटेल्स नको अर्थातच मी फक्त तुम्हाला काय अनुभव आला ते विचारतोय.
4
सर्व buy आणि सेल आणि स्टॉप लॉस आणि. टार्गेट देऊन हा ट्रेड मी करतोय बाकी तुमची इच्छा असे म्हणून पळवाट निघत नाही आपण कदाचित सेबी चे नियम जाणत नाही असे दिसते. तरी अगदी common sense वापरला तरी जेव्हा अवधूत साठे स्वतः सेबी registered advisor नसताना मुळात त्यांना indirectly सुद्धा advisory देणे हे कुठलीही कायदेशीर संस्था ज्यांची इच्छा अपात्र व्यक्तीने सल्ला देऊ नये अशी आहे त्यासाठी त्यांनी कायदा केला आहे तो साठे यांना नक्कीच माहीत आहे तरी असा "अप्रत्यक्ष "सल्ला देत साठे "उद्युक्त" करत होते हे उघड दिसतेय. शिवाय हे सर्व साठे यांची माहिती आहे तरीही "अप्रत्यक्ष सल्ला देतोय तुम्ही घ्या " ही कायदा मोडण्याची नियत intention उघड दाखवत नाही का ?
5
माझ्या व्यसनातून मला ट्रेनिंग च्या जवळपास 600 करोड मिळाले यात गैर काही नाही पण जे ट्रेडिंग मी लोकांना शिकवतोय ज्यातून कमावण्यासाठी लोक येत आहेत आणि मी सुद्धा तुम्ही माझ्या स्किल प्रमाणे विकसित केल्यास तुम्ही कमवाल ( हो हो side effect) आणि सर्व साईड इफेक्ट साठीच आलेले ट्रेडर्स. तर सरांचा स्वतःचा सिकल प्रामाणिकपणे उत्तमच असणार ट्रेडिंग चा
तरीही सरांची ट्रेनिंग इन्कम 600 करोड जवळपास
आणि सरांचा ट्रेडिंग इन्कम ? 6 करोड loss ?
सराना स्वतः साईड इफेक्ट ऑफ स्किल 1 टक्का सुद्धा ट्रेडिंग मधून कमावता आले नाही का ?
म्हणजे सरांचे खरे स्किल हे ट्रेनिंग चे आहे कदाचित जसे कस्तुरी मृग जाणत नाही की त्याच्या बेंबीत कस्तुरी आहे सराना जाणीव नसावी की त्यांचे खरे स्किल ट्रेनिंग आहे.
सरांचे खरे स्किल माझ्या मते मार्केटिंग आहे. कारण नवीन बकरा पकडण्यासाठी 500 रुपयाचा eye opener ki closer course आणि क्रमाने पुढचे कोर्स सर्वात महागडा 6.75 लाख किंमतीचा कोर्स
हे खरोखर काबिल ए तारीफ मार्केटिंग स्किल आहे.

तुमच्याशी सहमत आहे. बरेच काही प्रश्न आणि विचार मनात येत होते. पण आमचे मित्र क्लिंटन हे टीकात्मक प्रतिसादांत खूपच सेन्सिटिव्ह झाल्यासारखे आणि दुखावल्यासारखे वाटत असल्याने व्यक्त व्हायची इच्छा झाली नव्हती.

रोचक भाग असा की मला अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी किंवा ते स्वतः यांच्याविषयी अजिबातच माहिती नव्हती. ते सोडा, ट्रेडिंग या विषयाचीही नव्हती.

जे काही कळतं आहे ते चंद्रसूर्यकुमार यांच्या प्रतिसादांतून. आणि दुर्दैव असं की त्यांच्या प्रतिसादातच मला अत्यंत प्रभावित झालेल्या चाहत्याच्या खुणा (किंवा रेड फ्लॅग म्हणा) स्पष्ट जाणवले.

त्यांच्या (साठे यांच्या) शिष्यांना ६५% च सरासरी तोटा होतो. बाकीच्यांना मात्र ९०% होतो. हे यश आहे. म्हणजे मुळात मेजॉरिटी तोटा होणाऱ्या क्षेत्रात हे मार्गदर्शन केले जात आहे आणि सरासरी अत्यंत वाईट आतबट्ट्याच्या (९०% लोकांना तोटा) व्यवहारापेक्षा कमी तोट्यात (६५% लोकांना किंवा ६५% तोटा) साध्य होते आहे. ही यशाची व्याख्या आहे.

जिथे कोणा स्त्रियांच्या बाबतीत नफा चुकीचा आणि वाढीव दाखवला गेला आणि प्रत्यक्षात कमी आढळला, तिथे .. त्यांनी पती किंवा अन्य कोणाच्या नावाने ट्रेडिंग केले असेल. असे सर्रास होते. असे त्यावर स्पष्टीकरण आले आहे.

ज्यांनी पैसा हवा म्हणून हात वर केला त्यांना बाहेर जा असे सांगितले, पण प्रत्यक्ष बाहेर काढले नाही. (तो इव्हेंट पेड असल्यास रिफंड द्यावा लागला असता का?)

साधना नीट करा आणि सलग अमुक आठवडे, महिने, वर्षे करा. त्या काळात अमुक अमुक इतर काही न करता केवळ इकडे फोकस करा.. जर तुमचे लक्ष इकडे तिकडे भटकले आणि या क्ष महिन्यांच्या साधना काळात खंड पडला तर दोष साधकाचा. गुरुचा नाही.

यश, नफा यांचे सर्व क्रेडिट गुरूंना, अपयश, तोटा, यांची जबाबदारी साधकाची. साधना नीट सांगितल्याप्रमाणे तंतोतंत पाळली नाही.

मी फक्त मी काय केले आणि कसे यश मिळाले ते सांगतो. तुम्हाला यश मिळण्यासाठी तुम्ही स्ट्रॅटेजी खुद्द बनवणे आवश्यक आणि १००० दिवस सतत ती बनवणे आणि फोकस आवश्यक. पण अपयश आल्यास कंपनी जबाबदार नाही.

कोणतीही जबाबदारी न घेणे पण आर्थिक मोबदला घेणे.

परवाना आवश्यक असताना तो न घेता सल्लागार बनणे.

असे इतरही काही फ्लॅग जाणवले.

डिस्क्लेमर: अजूनही मला सत्य काय ते माहीत नाही. अशा दैनिक ट्रेडिंग व्यवहारांपासून अनेक मैल दूर असल्याने ते कळण्याचा मार्ग तूर्त बातम्या इत्यादि हाच आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

9 Dec 2025 - 10:52 am | चंद्रसूर्यकुमार

त्यांच्या प्रतिसादातच मला अत्यंत प्रभावित झालेल्या चाहत्याच्या खुणा (किंवा रेड फ्लॅग म्हणा) स्पष्ट जाणवले.

मी जे काही स्वतः बघितले आहे ते लिहिले आहे. त्यापैकी एकही शब्द मी माझ्या कल्पनेतून लिहिलेला नाही. आता हे कोणाला रेड फ्लॅग किंवा ब्लॅक फ्लॅग किंवा अन्य कोणत्या रंगाचे फ्लॅग वाटत असले तर त्याविषयी मी काहीही करू शकत नाही.

त्यांच्या (साठे यांच्या) शिष्यांना ६५% च सरासरी तोटा होतो. बाकीच्यांना मात्र ९०% होतो. हे यश आहे. म्हणजे मुळात मेजॉरिटी तोटा होणाऱ्या क्षेत्रात हे मार्गदर्शन केले जात आहे आणि सरासरी अत्यंत वाईट आतबट्ट्याच्या (९०% लोकांना तोटा) व्यवहारापेक्षा कमी तोट्यात (६५% लोकांना किंवा ६५% तोटा) साध्य होते आहे. ही यशाची व्याख्या आहे.

युपीएससी, कॅट, आय.आय.टी जेईई करणार्‍या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना खरे यश येते? तिथे तो आकडा १०% पेक्षा बराच कमी आहे. तरीही त्यासाठीचे मार्गदर्शन करणार्‍या संस्था आहेतच ना? तिथे यशाची व्याख्या काय? समजा एकूण विद्यार्थ्यांपैकी २% विद्यार्थ्यांना यश मिळत असेल पण अबक या संस्थेच्या ५% विद्यार्थ्यांना यश मिळाले तर मग ते त्या संस्थेचे यश म्हणायचे की ९५% विद्यार्थ्यांना अपयश येते म्हणून त्या संस्थेचे अपयश?

जिथे कोणा स्त्रियांच्या बाबतीत नफा चुकीचा आणि वाढीव दाखवला गेला आणि प्रत्यक्षात कमी आढळला, तिथे .. त्यांनी पती किंवा अन्य कोणाच्या नावाने ट्रेडिंग केले असेल. असे सर्रास होते. असे त्यावर स्पष्टीकरण आले आहे.

वरील प्रतिसादात लिहिले आहे ती लक्ष्मी गृहिणी आहे. तिचे स्वतःचे उत्पन्न असे काही नाही. तिने तिच्या नवर्‍याकडून पैसे घेऊन ट्रेडिंग सुरू केले. जर असा घसघशीत पैसा मिळाला तर मग इनकम टॅक्सचा झक्कू आपल्या मागे तर लागणार नाही ना हे पण एक कारण असते. नुसत्याच गृहिणीच नाही तर नवरा चांगले कमावत आहे पण त्याची बायको पाच-सात लाखाचे पॅकेजची नोकरी असलेली आहे असे अनेक ठिकाणी बघायला मिळेल. अशा स्त्रियाही अनेकदा थोडे ट्रेड आपल्या अकाऊंटमधून आणि जास्त नवर्‍याच्या अकाऊंटमधून टाकतात. अनेकदा नवरा-बायको दोघेही मोठ्या पदावर असतील आणि ट्रेड घ्यायचा आहे पण आज दिवसभर मिटींग आहेत पण दुसर्‍याला त्यामानाने वेळ आहे तर मग ज्याला वेळ असेल त्याच्या अकाऊंटमधून ऑर्डर टाकली जाते. हे सगळे परस्पर विश्वासातून होते. जोपर्यंत नियमानुसार सगळे काही होत आहे आणि त्या उत्पन्नावर कर भरले जात आहेत तोपर्यंत कोणालाही काही अडचण नसावी.

ज्यांनी पैसा हवा म्हणून हात वर केला त्यांना बाहेर जा असे सांगितले, पण प्रत्यक्ष बाहेर काढले नाही. (तो इव्हेंट पेड असल्यास रिफंड द्यावा लागला असता का?)

प्रत्यक्षात कोणालाही बाहेर काढायचा उद्देश नव्हता तर मार्केटमध्ये पैशावर फोकस ठेऊ नका, स्कील डेव्हलप करा मग पैसा येईलच हे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्यासाठी- थोडीशी नाट्यमयता आणून केले होते. मुख्य सेशन व्हायच्या आधी कन्सेप्ट वेबिनार असतात. ज्यांना मार्केटमधील काहीही माहित नाही अशांना मुख्य सेशनमध्ये यायच्या आधी बेसिक माहिती व्हायला हवी यासाठी ते कन्सेप्ट वेबिनार असतात. नाहीतर मुख्य सेशन सुरू असताना कॅन्डल म्हणजे काय हेच माहित नाही असे व्हायचे. चार सेशन- प्रत्येकी दोन दिवसांची. मी कोर्स केला तेव्हा पहिल्या सेशनच्या पहिल्या दिवसाच्या शेवटपर्यंत कोणाला ड्रॉप आऊट व्हायचे असेल त्यांना १००% पैसे परत करणार असे रिसीटवरच लिहिले होते. माझ्या बॅचमध्ये तरी कोणी असा रिफंड घेतल्याचे ऐकिवात नाही. म्हणजे तीन-चार कन्सेप्ट वेबिनार आणि मुख्य सेशनच्या पहिल्या दिवसाच्या शेवटपर्यंत इतकी १००% रिफंडची गॅरंटी होती. आता मला वाटते शेवटच्या कन्सेप्ट सेशनपर्यंत अशी गॅरंटी आहे.

यश, नफा यांचे सर्व क्रेडिट गुरूंना, अपयश, तोटा, यांची जबाबदारी साधकाची. साधना नीट सांगितल्याप्रमाणे तंतोतंत पाळली नाही.

सॉरी. यशाचे क्रेडिट सरांचे पण अपयशाची जबाबदारी विद्यार्थ्याची असे सर म्हणतात हे तुम्हाला कोणी सांगितले? अशा प्रत्येक प्रतिसादाचा प्रतिवाद करायला खरं तर वेळ नाही पण तरीही उगीच इतरांचे गैरसमज व्हायला नकोत म्हणून लिहित आहे. सर नेहमी म्हणतात की त्यांच्या २८-३० वर्षाच्या अनुभवातून मार्केटमध्ये काय चालते याविषयी त्यांचे सेट-अप्स ते देणार. ते सेट-अप १००% नक्कीच चालत नाहीत- कोणतीही गोष्ट १००% चालत नाही. साधे बेसिक सेट-अप ७०% वेळेस चालतात आणि त्यात अजून काही मसाला घातला तर ती टक्केवारी वाढते. त्यात मनी मॅनेजमेंट करून ट्रेड घ्या हे सर सांगतात. हे टाईम टेस्टेड ठोकताळे आहेत. ते तुम्हाला शिकविले आहेत, त्यात मार्गदर्शन लागल्यास- म्हणजे अमुक झाले तर तमुक करायचे का वगैरे प्रश्नांसाठी सपोर्ट सिस्टीम आहे. तुम्ही प्रोसेस फॉलो करा. त्यात यश आले तर 'थँक यू गॉड मार्केट' म्हणा आणि ट्रेड चालला नाही तर आपले काय चुकले (आणि चालला तरी काय बरोबर केले) याचे विश्लेषण करा एवढेच सर सांगतात. त्यापुढे जाऊन प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिट असल्यास तो गुड प्रॉफिट आहे की बॅड प्रॉफिट आहे तसेच लॉस असल्यास तो गुड लॉस आहे की बॅड लॉस आहे हे पण बघा. सगळी प्रोसेस (रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट- पोझिशन सायझिंग सकट) फॉलो करून प्रॉफिट झाल्यास तो गुड प्रॉफिट. आपण सगळी प्रोसेस फॉलो केली तरी मार्केट उलटे जाऊन लॉस होऊ शकतो. जर प्रोसेस फॉलो केली आहे तरीही लॉस झाला तर मग तो गुड लॉस. तसेच अंदाधुंद काहीतरी करून प्रॉफिट झाल्यास तो बॅड प्रॉफिट आणि लॉस झाल्यास तो बॅड लॉस. काहीही झाले तरी बॅड प्रॉफिटपासून सांभाळून राहा कारण आज तुक्का लागला आणि प्रॉफिट झाला म्हणजे आपणच गॉड आहोत असे वाटायला लागून पुढे कधीतरी पडणार तो खड्डा आपणच खणायला सुरवात करत असतो. सर एवढेच सांगतात की तुम्ही गुड प्रॉफिट आणि गुड लॉस करा. यात कोणी क्रेडिट घ्यायचा प्रश्न येतोच कुठे? इतक्या विद्यार्थ्यांचे क्रेडिट सर घेत बसले तर इतर काही करायला वेळच मिळायचा नाही.

असो. एकूणच तुम्ही सगळे काहीही माहिती नसताना उगीच हवेत तीर मारत आहात. ज्यांना स्वतः कष्ट घ्यायची तयारी आहे अशा विद्यार्थ्यांपैकी कोणीही सरांविषयी वाईट बोलत नाहीये. पण सगळे काही आयते हवे, दुसरा कोणी टिप देणार आणि मी तसे करून पैसा पाहिजे असा अ‍ॅटिट्यूडवाले विद्यार्थी आणि ज्यांना सरांविषयी आणि अ‍ॅकॅडेमीविषयी काहीही माहित नाही असे लोकच वाईट बोलत आहेत. एकूणच काय की मी पैसे भरून अ‍ॅडमिशन घेतली ना मग यश मिळणे हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे असे मार्केटमध्ये चालत नाही. मी आय.आय.टी जे.ई.ई साठी क्लासमध्ये पैसे भरून प्रवेश घेतला आता मला आय.आय.टी पवईला कॉम्पुटर सायन्सला प्रवेश मिळवून द्यायची जबाबदारी त्या क्लासच्या शिक्षकांची असे बोलले तर चालेल का? क्लासमधील शिक्षक फार तर मार्गदर्शन करू शकतात विद्यार्थ्याला स्वतःला कष्ट घ्यायलाच लागतात. मग मार्केटसंबंधी संस्थांमध्ये वेगळे का असावे?

मुद्देसूद उत्तराबद्दल धन्यवाद. मी म्हटले त्यापैकी कोणतेही दावे खुद्द साठे यांनी केलेले आहेत असे मी म्हटलेच नाही. ए टू झेड जे काही मत झाले किंवा इंटरप्रिटेशन झाले ते केवळ तुमचे प्रतिसाद वाचून झाले.

मी जे लिहीले त्यात कृपया काही पर्सनल घेऊ नये. वाचणाऱ्या त्रयस्थ व्यक्तीला असं का वाटलं असेल, आणि ती व्यक्तीही तुमच्याशी कोणताही आकस किंवा मागचे हिशोब नसलेली, मैत्री खात्यातली व्यक्ती... याचा विचार करून तटस्थ आणि त्रयस्थ मनाने आधीचे प्रतिसाद वाचले तर माझी बाजू कदाचित समजून घेता येईल.

पुन्हा एकदा, माझ्या प्रतिसादावर तपशीलवार उत्तर लिहिल्याबद्दल थॅन्क्स क्लिंटन..

चंद्रसूर्यकुमार's picture

9 Dec 2025 - 1:22 pm | चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद.

खरं सांगायचं तर सरांची अ‍ॅकॅडेमी नक्की काय आहे याचा अंदाज तिथे न गेल्यास येणार नाही. सर आपल्या विद्यार्थ्यांसाठी जितके करतात तितके इतर कोणत्याही ट्रेनिंग अ‍ॅकॅडेमीचे कोणी करत असेल असे वाटत नाही. मुख्य कोर्सची चार मोड्युल आहेत. वर म्हटल्याप्रमाणे मुख्य सेशनच्या आधी कन्सेप्ट वेबिनार, मग दोन दिवसांचे मुख्य सेशन असते. त्यानंतर प्रत्येक मोड्युलला तीन किंवा चार रिव्हिजन वेबिनार असतात. ते सध्याच्या बॅचचे विद्यार्थी लाईव्ह अटेंड करू शकतात. इतर सगळ्या पूर्वीच्या विद्यार्थ्यांना त्या रिव्हिजन वेबिनारचे रेकॉर्डिंग मिळते. ते डाऊनलोड करता येत नाही पण साईटवर १०-१२ दिवस ठेवतात. ते जुने विद्यार्थी किंवा सध्याच्या बॅचचे विद्यार्थीही बघू शकतात. मॉड्युल चालू असताना होमवर्क देतात. त्याविषयी काही मार्गदर्शन लागले तर दर १०-१२ विद्यार्थ्यांमागे एक मॉनिटर असतो. अशा चार-पाच मॉनिटर्समागे एक सिनिअर मॉनिटर असतो. मुख्य ट्रेनर (मुंबईसाठी स्वतः अवधूत सर, तर नवी मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोचीन, बंगलोर, दिल्ली, कलकत्ता, दुबई, अमेरिका वगैरेंसाठी त्यांच्याच तालमीत तयार झालेले इतर ट्रेनर्स) दोन दिवसांचे मुख्य सेशन आणि रिव्हिजन वेबिनार घेतात. त्या व्यतिरिक्त मॉनिटर आणि सिनिअर मॉनिटरची पण शंकानिरसनासाठी सेशन असतात. चार मोड्युल पूर्ण झाल्यानंतर एक परीक्षा असते. त्या परीक्षेत चांगले मार्क आले की मग स्थानिक ए.एस.सी मध्ये प्रवेश मिळतो. आमच्या नवी मुंबईत ८ ए.एस.सी आहेत. मुंबई-ठाण्यात ३०-४० सुध्दा असली तरी आश्चर्य वाटू नये. स्वतः अवधूत सर दर महिन्यातून एक सेशन पूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी घेतात तर ठिकठिकाणचे ट्रेनर्स दर तीन महिन्यातून सेशन घेतात. प्रत्येक ए.एस.सी मध्ये एक को-ऑर्डिनेटर असतो. त्यांचीही सेशन्स होतात. मार्केटविषयी काहीही अडचण आली किंवा इतके दिवस ठीक चालले होते आता अचानक फटके बसायला लागले आहेत असे झाले तर किंवा अन्यथाही को-ऑर्डिनेटरला कधीही कॉल करून शंकानिरसन करता येते. मधून मधून स्थानिक सदस्य ऑनलाईन आणि कधीकधी ऑफलाईन भेटतात आणि चार्टवर तर चर्चा करतातच पण त्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष भेटल्यास खादाडी आणि मजाही करतात. आपल्या विद्यार्थ्यांसाठी इतके कोणीही करत नाही. आणि हो. पहिल्या चार मोड्युलचे पैसे भरले की मग रिव्हिजन वेबिनारचे रेकॉर्डिंग आणि इतर सेशन्ससाठी एक छदामही भरावा लागत नाही. उद्देश हाच की एका उद्देशाने प्रेरीत झालेला समूह तयार करून एकमेकांना मदत करावी आणि गरज लागल्यास आधार द्यावा. कारण मार्केट वाटते तितके सोपे नाही. एकटा माणूस राहिल्यास दोन थोबाडीत बसल्यावर हे आपल्याला झेपणार नाही म्हणून बाहेर पडेल. अशावेळेस आपले काय चुकले हे पॉईंट आऊट करणारे पण त्या ट्रेडमध्ये नसलेले म्हणून त्रयस्थ असतील तर ते चांगले असते. या कारणासाठी ठिकठिकाणी असे समूह सरांनी तयार केले आहेत.

तेव्हा सांगायचा उद्देश हा की सरांनी निर्माण केलेली ही एकदम रोबस्ट सपोर्ट सिस्टीम आहे. उद्देश हाच की मार्केटमध्ये यश मिळालेले आणि स्वतः स्वतंत्रपणे कोणावरही अवलंबून न राहता योग्य निर्णय घेऊ शकणारे independent professional traders बनावेत. ती सगळी दुनियाच वेगळी आहे.

तेव्हा लिहायचा उद्देश हा की आता मिडियात आणि सोशल मिडियात जे काही उलट सुलट येत आहे त्यांना खरोखरची माहिती आहे असे वाटत नाही. यातील सगळ्या गोष्टी मी स्वतः अनुभवल्या आहेत म्हणून अगदी १००% स्वतःचा अनुभव लिहिला आहे.

असो.

चंद्रसूर्यकुमार's picture

9 Dec 2025 - 10:00 am | चंद्रसूर्यकुमार

सरांचे खरे स्किल माझ्या मते मार्केटिंग आहे. कारण नवीन बकरा पकडण्यासाठी 500 रुपयाचा eye opener ki closer course आणि क्रमाने पुढचे कोर्स सर्वात महागडा 6.75 लाख किंमतीचा कोर्स
हे खरोखर काबिल ए तारीफ मार्केटिंग स्किल आहे.

या वाक्यावरून तुमचा पूर्वग्रह स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे खरं तर तुमच्या प्रतिसादावर काहीही लिहायची इच्छा नव्हती. पण म्हटले की याचा प्रतिवाद केला नाही तर मग ज्यांना याविषयी काहीही माहित नाही त्यांचे मत विनाकारण प्रतिकूल बनेल म्हणून लिहित आहे. खरं सांगायचं तर तुमच्यासारखे छप्पन्न टीकाकार बघितले आहेत- तुम्ही सत्तावन्नावे. हाकानाका.

सगळ्यात पहिल्यांदा स्वतः सरांना तथाकथित ६ कोटी लॉस आणि ट्रेनिंग इनकम ६०० कोटी याविषयी. सरांनी परवा रात्री एक स्पेशल वेबिनार घेतला आणि त्यात बर्‍याच गोष्टी सांगितल्या. सगळ्यात पहिल्यांदा आस्ताच्या एका लक्ष्मीने (योगायोगाने तिचे नावही लक्ष्मीच आहे) एक कोटी प्रॉफिट केला अशी जाहिरात केली पण तिचा प्रॉफिट ४.१७ लाख आहे हे सेबीच्या पीडीफमध्ये लिहिले आहे त्याविषयी. ती लक्ष्मी त्या वेबिनारमध्ये होती आणि तिने स्वतः लाईव्ह वेबिनारमध्ये तिच्या आणि तिच्या नवर्‍याच्या झिरोधा कोन्सोलमध्ये लॉगिन करून स्क्रिन शेअर करून डिसेंबर २०२० ते मार्च २०२३ या काळात (सेबीच्या अहवालात उल्लेख आहे त्याप्रमाणे) तिचा नक्की प्रॉफिट किती झाला ते सगळ्यांना दाखविले. ४.१७ लाख हा आकडा नक्की कुठून आला हे आपल्याला पण कळले नाही हे तिने सांगितले. अ‍ॅकॅडेमी सेबीला याविषयी 'मिसरिप्रेझेन्टेशन' झाले आहे म्हणून पुराव्यानिशी काही पेपर फाईल करणार आहे.

तिच गोष्ट स्वतः अवधून सरांची. मी उपस्थित असलेल्या अगदी पहिल्या सेशनमध्ये त्यांनी सांगितले होते की विद्यार्थी फी भरत आहेत त्यातील सगळे पैसे गुरूकूल बांधायला आणि तिकडची व्यवस्था बघायला तसेच कंपनीचा खर्च चालवायला वापरले जातील आणि त्यांच्या घरचा खर्च चालवायला त्यांचे ट्रेडिंगमधील उत्पन्न पुरेसे आहे. अ‍ॅकॅडेमीचे पहिले गुरूकूल मागच्या वर्षी (की या वर्षी जानेवारीत असेल) कर्जतजवळ सुरू झाले आहे. मी अजून तिथे गेलेलो नाही पण तिकडचे व्हिडिओ आणि तिथे जाऊन आलेल्यांनी सांगितल्याप्रमाणे ते गुरुकूल एखाद्या फाईव्ह स्टार रिसॉर्टप्रमाणे आहे. तिथे जमीन विकत घेणे, बांधकामाचा खर्च यासाठी फी मधून आलेले पैसे वापरले जातील हे पण सरांनी सांगितले होते. मला वाटते तिकडे विद्यार्थी, मॉनिटर, ट्रेनर वगैरे मिळून कधीही दीड-दोनशे लोक असतात. त्यामुळे एखाद्या हॉटेलमध्ये असते त्याप्रमाणे हाऊसकिपींग, मेन्टेनन्स, लॉन्ड्री, अ‍ॅडमीन वगैरे सगळी व्यवस्था आहे. जेवणाचे कंत्राट कोणा कंत्राटदाराला दिले आहे. सांगायचा मुद्दा हा की तो सगळा खर्च विद्यार्थ्यांच्या फी मधून चालविला जातो. सर नेहमी म्हणतात की ट्रेडिंगमध्ये यश मिळायचे असेल तर एका योग्य वातावरणात एकत्र अभ्यास झाला तर ते लाभदायक असते. ते गुरूकूल त्यासाठी आहे. सरांनी अजूनही सांगितले आहे की हे पहिले गुरूकूल आहे. पूर्ण देशात वेगवेगळ्या ठिकाणी अशी २१ गुरूकूल व्हावीत असे त्यांचे स्वप्न आहे. मार्केट संबंधी असे गुरूकूल इतर कुठे नसावे. त्यामुळे ६०० कोटी हे ट्रेनिंगमधील आलेले उत्पन्न सरांचे उत्पन्न आहे ही धारणाच मुळात चुकीची आहे.

आता सरांना स्वतः लॉस झाला असे आले आहे त्याविषयी. सरांनी त्याविषयी सांगितले की त्यांचा स्वतःचा प्रॉफिट डबल डिजीट कोटींमध्ये आहे आणि योग्य वेळेस ते पुरावे जाहीर करतील आणि सगळ्या सत्तावन्न लोकांचे दात घशात घालतील (पुढचे वाक्य माझे- सरांचे नाही). २०२४ च्या जानेवारी महिन्यात सर बराच काळ गुरूकुलाच्या कामाच्या तिथे होते आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या ट्रेडिंग पोझिशन्स वेळेवर क्लोज करता आल्या नाहीत म्हणून त्यांना त्या महिन्यात पाचेक कोटींचा लॉस झाला होता हे त्यांनी तेव्हाच सेशनमध्ये सांगितले होते. पण २४ महिन्यात सहा कोटींचा लॉस आणि ट्रेनिंगचे उत्पन्न ६०० कोटी या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. त्यासाठी लीगल टीम जे काही करायचे आहे ते करत आहे.

सर्व buy आणि सेल आणि स्टॉप लॉस आणि. टार्गेट देऊन हा ट्रेड मी करतोय बाकी तुमची इच्छा असे म्हणून पळवाट निघत नाही आपण कदाचित सेबी चे नियम जाणत नाही असे दिसते. तरी अगदी common sense वापरला तरी जेव्हा अवधूत साठे स्वतः सेबी registered advisor नसताना मुळात त्यांना indirectly सुद्धा advisory देणे हे कुठलीही कायदेशीर संस्था ज्यांची इच्छा अपात्र व्यक्तीने सल्ला देऊ नये अशी आहे त्यासाठी त्यांनी कायदा केला आहे तो साठे यांना नक्कीच माहीत आहे तरी असा "अप्रत्यक्ष "सल्ला देत साठे "उद्युक्त" करत होते हे उघड दिसतेय.

दोन गोष्टी- सरांची ९५%- कदाचित जास्तच सेशन मार्केट संपल्यानंतर असतात. त्यात 'मी ट्रेड करतोय बाकी तुमची इच्छा' म्हणायचा प्रश्नच नाही. तर त्या दिवशी मार्केट चालू असताना नक्की काय बघून तो ट्रेड घेतला हे त्यात ते सांगतात. मी ट्रेड घेतला आणि ट्रेड घेतोय या दोन गोष्टींमध्ये बराच फरक आहे. लाईव्ह मार्केट दरम्यान सेशन असतात ती लाईव्ह मार्केट ट्रेनिंग सेशन असतात लाईव्ह मार्केट ट्रेडिंग सेशन नाही. मी असे एकच सेशन बघितले आहे. त्यावेळेस आम्हाला लॅपटॉप घेऊन यायचा नाही अशी स्पष्ट सूचना होती. तसेच मार्केट सुरू होण्यापूर्वी पण सरांनी- कोणीही ट्रेड कॉपी करायचा नाही तर या सेशनचा उद्देश लाईव्ह मार्केटमध्ये नक्की काय बघायचे हे शिकविणे हा आहे हे स्पष्ट केले होते. लॅपटॉप घेऊन यायचा नाही हा दंडक सर घालू शकतील पण फोनही आणू नये असा दंडक कसा घालणार? घरच्यांशी बोलायचे असते, उबर-ओला बुक करायची असते, इतरही पन्नास कामे फोनवर होतात त्यामुळे फोन सगळ्यांबरोबर असतोच. आता कोणी फोनवर ट्रेड घेतला तर त्याला कोणीच नियंत्रण घालू शकणार नाही. कदाचित असे केल्यास सेबीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही असे सरांना वाटले असेल. ती चूक असेल तर नियामानुसार कारवाई होईलच. पण सरांची नियत वाईट आहे/होती यावर सरांचा कोणीही जेन्युईन विद्यार्थी विश्वास ठेवणार नाही.

म्हणूनच म्हटले की या निमित्ताने प्रकरण कोर्टात जाऊन अ‍ॅडव्हायजरी म्हणजे नक्की काय- सर जे काही करतात ती अ‍ॅडव्हायजरी आहे का हे स्पष्ट व्हावे असे फार वाटते.

आतापर्यंत सेबीने अशी कारवाई अनेकांवर केली आहे. आमच्या नवी मुंबईत अस्मिता पटेल म्हणून एक आहे. तिच्यावरही अशीच कारवाई केली. तेव्हा इतकी चर्चा कुठेही झाली नव्हती. आज अवधूत साठेंचे नाव आल्यावर इतकी चर्चा होते आहे त्याचे कारण आस्ता ही भारतातील सगळ्यात मोठी ट्रेनिंग अ‍ॅकॅडेमी आहे. सर मुंबईचे म्हणून मुंबईत समजा एका वेळेस त्यांचे पाच-सहा हजार विद्यार्थी एकत्र आले . पण तेच सर कलकत्त्यात, दिल्लीत, बंगलोरमध्येही तसेच करू शकतात. तितके विद्यार्थ्यी सगळीकडे आहेत. माणूस जितका मोठा होतो तितके हितशत्रू वाढतात. त्यामुळे मग चर्चाही जास्त.

असो.