दिवाळी अंक २०२५ - भालदार-चोपदार - कथा

योगी९००'s picture
योगी९०० in दिवाळी अंक
20 Oct 2025 - 10:50 pm

"मुंबईचा दादा आला र र र् र्...."

कोणीतरी मला बघून ओरडले. तसा मी बर्‍याच दिवसांनी माझ्या गावी जात होतो. पूर्ण रात्रभर प्रवास करून सकाळी एस टी गावाला पोहोचली होती. स्टॅड वरून घर तसे जवळच होते व हातात जास्त सामानही नव्हते. त्यामुळे बदललेले गाव बघत चालत घरी निघालो होतो. मला घराजवळ आल्याचे बघून कोणीतरी आतमध्ये वर्दी दिली होती.

मला बघून भालदार-चोपदार दोघेही एकदम पळत आले. मी अरे हो थांबा म्हणे पर्यंत त्यांनी माझ्या हातातले सामान त्यांच्याकडे घेतले आणि मला घराकडे घेऊन निघाले. दारातच या दोघांपैकी कोणाच्या तरी बायकोने मला थांबवले आणि "अग हे काय करतेस" असं म्हणेपर्यंत ओवाळले. ही भालदाराची की चोपदाराची बायको हे माझे मलाच माहीत नव्हते. दोघांच्याही लग्नाला मी गेलो नव्हतो. आत येऊन बसलो आणि दुसर्‍याच्या बायकोने पाणी आणून दिले. घरात पाय ठेवल्यावर आजी-आजोबांच्या आठवणींनी जरा भरून आले. डोळे थोडे पाणावले. ते बघून माझे दोन्ही भाऊ मला बिलगले.

त्यातल्या एकाने विचारले," दादा, कळवायचे ना आम्हाला येणार म्हणून, स्टॅडवर आलो असतो, शिवाचा काल फोन आला तेव्हा कळलं की तू येणार म्हणून. पण नक्की कसे येणार ते कळलं नव्हतं". आता यावर मी त्यांना काहीच उत्तर दिले नाही. काय बोलणार होतो? त्या दोघांपैकी कोणाचाही नंबर माझ्याकडे नव्हता. त्यांचा नंबर माझ्याकडे असावा असेही मला कधीच वाटले नव्हते, निदान कालपर्यत तरी...

थोड्यावेळाने मी माझे आवरून घेतले आणि परत बैठकीच्या खोलीत येऊन बसलो. लगेच चहा आणि पोहे हजर झाले. भालदाराने लगेच विचारले, "दादा, खाऊ नाही आणलास मुंबईचा?". मला खुदकन हसू आले. लटक्या रागाने त्यांना म्हणालो, "अरे घोड्यांनो लहान काय आता तुम्ही? चाळीशी पार केली ना? ". यावर दोघांचीही तोंडे उतरली. त्यांची नाराजी बघून लगेच माझ्या पिशवीतून माहीमच्या हलव्याचा बॉक्स काढला. लगेच दोघेही त्यावर तुटून पडले. दोघांच्याही बायका खुदूखुदू हसत होत्या. एकीने त्यांना सांगितले पण की जरा मुलांसाठी ठेवा. पण मी लगेच मुलांसाठी आणलेली खेळणी आणि दुसरा खाऊचा बॉक्स त्यांना दिला. "एवढे कशाला आणले रे?" असे चोपदाराने विचारले. मी परत त्यांना रागवून म्हणालो,"तुमच्यासाठी आणले ते चालले काय? तुमच्या मुलांना का नको मग?". त्यावर दोघांनाही "आम्हाला सवय लागली आता हे तुझ्या हातून खायची" असे उत्तर दिले.

खरं म्हणजे माहीमचा हलवा (मुंबईचा खाऊ) सर्वप्रथम त्यांना माझ्या आईने दिला होता. आम्ही लहान असताना एकदा दिवाळीत गावी गेलो होतो. त्यावेळी आईने हा खाऊ त्यांच्यासाठी दिला. हे दोघेही त्यावेळी अडीच-तीन वर्षांचे होते. आईने त्यांना दादाने (म्हणजे मी) तुमच्यासाठी खाऊ आणला रे असे सांगून भरवला होता. त्यावर ते दोघेही खूप खूष झाले होते. त्यानंतर मी जेव्हा जेव्हा तिकडे गेलो, त्यावेळी प्रत्येकवेळी आई मला हा खाऊ विकत घ्यायला लावायची आणि त्यांना माझ्या हातून द्यायला लावायची. म्हणून प्रत्येक वेळी मी गेलो की हा खाऊ असे समीकरण यांच्याकडे झाले होते. हा खाऊ देण्याचा प्रकार जवळ जवळ सहा-सात वर्ष चालला होता. तर नंतर मला का कोणास ठावूक, या दोघांचाही त्यावेळी राग यायला लागला. एकदा तर मी गेल्या गेल्या त्यांनी हा खाऊ मागितला तर मी रागाने आणलेला बॉक्स जमिनीवर आदळला होता. आई मला माझ्या वागण्याबद्दल खूप ओरडली होती. त्यानंतर रागावून एकदाही मी तो खाऊ नेला नव्हता. ते दोघे साधारण १५ वर्षांचे असताना त्यांनी खाऊ मागितल्यावर "हावरटसारखे खाऊ काय मागता?" असे म्हणून त्यांना नाराज केले होते. त्यानंतर बर्‍याच दिवसांनी म्हणजे आज त्यांच्या साठी खाऊ नेला होता. मधल्या काळात आमचे नाते ही माहीमच्या हलव्यासारखे पातळ झाले होते.
आईचा या दोघांवर फार जीव होता. तसे भालदार-चोपदार म्हणजे माझे लांबचे चुलत भाऊ. रामा काका हे त्यांचे वडील, म्हणजे माझ्या आजोबांच्या चुलत भावाचा एकुलता एक मुलगा. या आजोबांच्या चुलत भावाच्या आणि त्याच्या बायकोच्या अकाली निधनानंतर आजोबांनी त्यांच्या मुलाला म्हणजे रामा काकाला सांभाळ करण्यासाठी म्हणून आपल्याकडे ठेवले आणि रामा गड्यासारखे वापरून घेतले. त्याचे शिक्षण म्हणून काही तरी जुजबी शिकवले पण नंतर घरच्या कामासाठी आणि टीचभर असलेल्या शेतीसाठी त्याला राबवून घेतले. रामा काका पण साधा भोळा, काका आपल्याला सांभाळत आहेत म्हणून आयुष्यभर त्यांच्याबरोबर सावली सारखा राहीला. एवढेच नव्हे तर आजोबांनी आजीच्या सांगण्यावरून तिच्या नात्यातली एक थोडीफार अधू असलेली व लग्न जमत नसलेली मुलगी स्थळ म्हणून आणली. तिच्याशी पण काकाने काही न बोलता लग्न केले. ती मुलगी म्हणजे आमची काकू आयुष्यभर आजीची नोकर म्हणूनच घरात राबवली गेली. त्या काकूला मी कधी स्वयंपाकघरातून बाहेर आलेले किंवा निवांत कधी बसलेले बघीतले नाही. बाबांनी रामा काकाला कधीच चांगली वागणूक दिली नाही. कधी गावाकडे आलो की रामा काका बाबांच्या दिमतीला असायचा. आईला मात्र त्या सर्वांचा कळवळा यायचा. म्हणून दिवाळीला न चुकता काकूसाठी साडी आणायची. स्वतःच खाऊ घ्यायची आणि मला काकांच्या मुलांना द्यायला लावायची. बाबांनाही एकदोन वेळा जबरदस्तीने रामा काकासाठी कपडे घ्यायला लावले होते. ते मिळाल्यावर काकाच्या डोळ्यातले अश्रू थांबले नव्ह्ते. मी सुद्धा बाबांच्या वळणावरच गेलो होतो. जसा जसा मोठा होत गेलो तसे काका-काकूंना नोकरासारखे वागवायला लागलो. एकदा तर काकाला ए रामा पाणी आण असे म्हणालो होतो. आईने तिथल्या-तिथे माझे मुस्काट फोडले होते. अजून तिने मला बदडले असते पण आजी मध्ये पडली आणि मला वाचवले. या गोष्टीमुळे रागावून मी काका आणि त्याच्या कुटूंबाला अजून तुसड्यासारखे वागवायला लागलो होतो. तसेच त्यांच्या जुळ्या मुलांना म्हणजे भालदार-चोपदारांनाही कमी लेखायला लागलो.

अर्थात भालदार-चोपदार ही त्यांची खरी नावे नव्हती. दोघे जुळे भाऊ, माझ्यापेक्षा साधारण १४ वर्षांनी लहान होते. त्यांची नावे सोहन आणि मोहन. पण एका प्रसंगामुळे त्यांना सगळे भालदार-चोपदार म्हणायला लागले. लहानपणी आम्ही मुलांनी गणपतीसाठी गावी गेल्यावर एक नाटूकले रचले होते. गावातल्या लोकांसमोर ते सादर करायचे होते. त्यात माझा राजाचा रोल होता. सोहन-मोहन खूपच लहान होते. पण त्यांचाही हट्ट चालू होता की त्यांनाही नाटकात घ्या म्हणून. त्यांची रडारड चालू होती. त्यामुळे आम्हा मुलांपैकीच कोणीतरी त्यांना राजाच्या बाजूचे सेवक म्हणून भालदार-चोपदार असा रोल द्या असे सांगितले. खरं म्हणजे आम्हा मुलांनाही भालदार-चोपदार यांचे नक्की काम काय असते ते माहित नव्हते. पण या दोघांनी राजाचे सेवक म्हणून राजाबरोबर रहायचे असे त्यांना सांगितले. त्यामुळे हे दोघेही काहीतरी काम मिळाले म्हणून खूष झाले आणि यांची रडारड थांबली म्हणून आम्ही खूष झालो. प्रत्यक्ष नाटकाच्या वेळी या दोघांनी खूप टाळ्या घेतल्या व हशे वसूल केले. लहानपणी दिसायला एकदम गोड होते आणि त्यात त्यांना वेषभूषा केली होती त्यामुळे सर्वांचे लक्ष यांच्याकडेच होते. प्रत्येक प्रसंगात राजाच्या म्हणजे माझ्या बाजूला उभे राहीले.
राजकन्येला राक्षसाच्या तावडीतुन सोडवण्याचा एक प्रसंग होता आणि तेथेही हे दोघे माझ्या बाजूला मख्खासारखे उभे. मध्येच मी जखमी होऊन पडतो तरी हे तिथेच मला वारा घालत उभे. मी जखमी होऊन विव्हळण्याची अ‍ॅक्टींग करत त्यांना अरे आत जा, आत जा असे सांगत होतो पण हे दोघे भुमिकेत खूप घुसले होते आणि हलायचे नाव घेत नव्हते. शेवटी राक्षस झालेला अ‍ॅक्टर त्यांच्यावर ओरडला आणि तुम्हाला खाऊन टाकतो म्हणाला तेव्हा ते आत पळाले. पण नंतरच्या प्रसंगात जसे मी राक्षसाला मारुन राजकन्येची भेट घेऊ लागतो तसे परत हे स्टेजवर आले आणि माझ्या बाजूला उभे राहीले. सर्वांची हसून पुरेवाट झाली होती. त्यानंतर गावभर यांचे नाव भालदार-चोपदार म्हणून पसरले होते. हे दोघे मोठे झाले तरी हे नाव त्यांना चिकटले होते आणि त्यांनाही त्याचे काहीच वाटत नव्हते.

जसा मी मोठा होत गेलो. तसे माझे गावी येणं कमी झालं आणि या दोघांबरोबर संबंधही कमी होतं गेले. पण या दोघांना मोठा दादा म्हणून माझ्याविषयी खूप आदर होता. माझ्या लग्नात हे दोघेही आले होते. पण रामाकाकाची मुलं म्हणून त्यांना त्याप्रमाणेच वागणूक दिली गेली. लग्नाच्या दोन दिवस आधीपासून हे दोघे घरी राबले. मी तर नवरदेव असल्याने वेगळ्याच धुंदीत होतो. माझी बरीच कामे यांच्यावर टाकली. अक्षरशः मी राजासारखे वागलो आणि ही दोघं सेवकासारखे राबले. पण यांच्या लग्नात मी गेलो नाही. माझ्या बायकोने पण यांच्याशी किंवा माझ्या गावातल्या लोकांशी संबंध ठेवले नाही आणि जे काही गावातले दोन-चार मित्र होते त्यांच्याशी मला संबंध ठेवू दिले नाही.

शेवटचे या आधी गेलो ते आजोबांना गाडी घेतली ती दाखवायला. साधी मारूती अल्टो गाडी घेतली तरी मर्सिडीझ घेतल्यासारखा भाव मारत गेलो होतो. त्यावेळी सुद्धा या दोघांपैकी एकावर गाडीचा दरवाजा जोरात लावला म्हणून डाफरलो होतो. नंतर काका-काकू गेल्यावर भेटायला सोडा पण पत्र-फोन काहीही केला नाही. तशी मला गरजच वाटली नाही.

पण आज गरज पडली होती मला गावी यायची. सरकारी नोकरी करून हेडक्लार्क म्हणून रिटायर झालो होतो. मिळणार्‍या तुटपुंज्या पेन्शनमध्ये घरचा खर्च भागत नव्हता. मुलाचे शिक्षण चालूच होते आणि मुलीच्या लग्नाच्या कर्जातून अजून बाहेर पडलो नव्हतो. पुढे काय करायचे हा प्रश्न आ वासून उभा होता. बायकोने सांगितल्याप्रमाणे गावातले घर आणि जो काय जमिनीचा तुकडा होता त्यात हिस्सा मागायला आलो होतो. आजोबांनी जाण्याआधी हे घर आणि जमिन या दोघांच्या नावाने करून टाकली होती. कदाचित शेवटच्या काही वर्षात आपली काळजी सख्या मुलाने किंवा नातवाने घेतली नाही पण यांनी घेतली याचे बक्षिस किंवा कायम यांना वाईट वागणूक दिली याचे सल कुठेतरी आजोबांना बोचले असावे म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असावा. आता या दोघांच्या संमतीशिवाय मला काहीच मिळणार नव्हते.

हे सगळे विचार रामा काकाच्या हार घातलेल्या फोटोकडे पहात असताना झरझर येऊन गेले. माझे लक्ष तिकडे लागलेले पाहून भालदार मला म्हणाला,"जाऊ दे रे दादा, तुला जमलं नसेल बाबा गेले त्यावेळी भेटायला यायला, एवढे वाईट वाटून घेऊ नको". आता माझी मलाच लाज वाटायला लागली आणि थोडा गहिवरलो. ते पाहून दोघाही भावांनी मला सावरले आणि खूर्चीवर बसवले. एक मला वारा घालू लागला आणि दुसरे माझे पाय चेपू लागला. "हे रे काय करताय" असे विचारताच पाय दाबणार्‍या चोपदाराने, "दादा, आम्ही भालदार-चोपदारच" असा उद्गार काढला. अरे पण असे म्हणून मी त्याच्या डोळ्यात पाहिले तर माझ्याविषयीचा अतीव आदर त्याच्या डोळ्यातून ओसंडून वहात होता. आई मला त्यांच्यासाठी का खाऊ घ्यायला लावायची ते आज मला कळले.

राजाला वारा घालणारा भालदार आज जिल्हाधिकारी होता आणि राजाचे पाय चेपणारा चोपदार एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर होता. आणि त्यांचे आदरातिथ्य घेणारा राजा यांच्याकडे जमीन-जुमल्याचा हक्क कसा मागायचा त्याचा विचार करत होता.

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

21 Oct 2025 - 7:04 pm | खटपट्या

अप्रतिम कथा

सुबोध खरे's picture

21 Oct 2025 - 7:40 pm | सुबोध खरे

सुंदर कथा!

कंजूस's picture

21 Oct 2025 - 8:13 pm | कंजूस

खरंय.

उगाच असल्या चांगल्या कथेचं बोन्साय ( =शशक)करायची पद्धत पडली आहे. ती पाळली नाही ते बरं झालं. पोहोचली.

सुखी's picture

21 Oct 2025 - 11:21 pm | सुखी

छान