दिवाळी अंक २०२५ - संपादकीय - विसाव्वं लागलं..

गवि's picture
गवि in दिवाळी अंक
20 Oct 2025 - 12:00 am

एकोणीस वर्षं पूर्ण!

एकोणीस ही संख्या ऐकली की माझ्या डोळ्यांसमोर एक तरुण येतो. मीच म्हणा किंवा तुमच्यापैकी कोणी म्हणा.

स्वतःला सगळं जग समजलं आहे याची खातरी झालेला, पण प्रत्यक्षात अजून काहीच न समजलेला. आणि हे समजायला आणखी बरीच वर्षं बाकी असलेला. स्त्री सदस्यांनी एकोणीस वर्षाची तरुणी कल्पावी. लेडीज विरुद्ध जेंट्स असा वाद नको.

पुरुष सदस्यांनी एखादी एकोणीस वर्षांची तरुणी कल्पल्यासदेखील हरकत घेणारा मी कोण बापडा! तर ते एक असो.

वय एकोणीस म्हणजे अर्धवट घोगऱ्या आवाजात एकही शब्द न बोलता फक्त आवाजाच्या पट्टीतून “मी आता मोठा झालोय! मला अक्कल शिकवू नका..” असं सतत जाहीर करणं आणि तरीही अजून घरच्या मूर्ख आणि जुनाट मोठ्या लोकांकडून खर्चाला पैसे घेत राहावं लागणं.

'बीत गये दिन बचपन के, आये नहीं दिन शादी के.. तो फिर क्यूँ न खाये अमूल चॉकलेट?' असे हे दिवस..

ही जाहिरातदेखील जुन्या खोडांनाच चांगली आठवत असेल. मी ओळी जरा बदलल्या, इतकंच.

तर चऱ्हाट वळणं आवरतो आणि काहीतरी गंभीर विषय घेता येतो का, ते बघतो.

मिपा आज स्थिर उभं आहे. स्वत:वर, म्हणजेच आपल्या सदस्यांवर आणि वाचकांवर विश्वास ठेवून मिपा श्वास घेतं आहे. वयाने मोठं होत चाललेलं, पण आत अजूनही तोच जुना उत्साही पोरगा असलेलं.

मिपाचं बालपण आठवतं ना?

तेव्हा इथे शब्दांचे पूर यायचे. कथा-कविता भरभरून वाहात असायच्या. काही वाह्यातदेखील असायच्या.

कधी जिलब्या पडत, तर कधी चपला मिळत. कोणी हसता हसता वाईट खपला असं कळत असे आणि प्रतिसादात ईमोजीऐवजी थेट खरेखुरे शब्दच असायचे. आजही मिपावर इतर सोशल मीडियाप्रमाणे ईमोजी नाहीत, पण त्याचा काहीही परिणाम आपल्या संवादावर होत नाही.

तरीही... खोटं का बोला? काही काळापासून मनात थोडी धाकधूक होती.

आपल्या मिसळीतून सर्जनशीलतेची तर्री आटते आहे का? सकाळचा रस्सा दुपारी दोन वाजता पाणीदार होऊन प्लेटमध्ये येतो, तसा प्रकार तर होत नाहीये ना?

कथा, कविता, एकूण ललित लेखन.. हे सगळं जरा कमी.. जरा काय? फारच कमी.. आणि राजकीय मसालेदार वादविवादच जास्त दिसतात का? तो मसालादेखील चव न वाढवता आम्लपित्त वाढवणारा..?!

कधी वाटतं, माणसं ललित लिहिणं विसरली की काय? आता फक्त 'यशस्वी कसे व्हाल?' किंवा काहीतरी मोटिव्हेशनल, काहीतरी कामाचं, काहीतरी फायद्याचं.. अशाच लेखनाची चलती आहे का? वीस वीस सेकंदांची रील्स आणि तूनळी शॉर्ट्स वर वर ढकलत आपण त्यात नवीन तर्री शोधतोय का?

बदल वाईट असतो असं मी कधीच मानत नाही. नव्या काळात वीस-तीस सेकंदांत किंवा एका मिनिटात जो आपली कथा मांडू शकेल, पोहोचवू शकेल, तो उत्कृष्ट कथाकार ठरेल. कवितेला तर खूपच चांगले दिवस येतील. लेस इज मोअर..

पूर्वी जेव्हा कुणी गोष्ट लिहायचं धाडस करायचं, तेव्हा शंभर लोक “वाहवा!” म्हणायचे.. किंवा 'जिलबी' म्हणायचे.

पण आता कुणी गोष्ट लिहिली की मात्र शंका येतात – “स्रोत काय?”, “विचार कुणाचा?”, "तूच लिहिलीस की जीपीटीने?"..

तेव्हा वाटतं, आपण इतके ‘तर्ककर्कश’ झालोय की भावनांना आता व्यक्त होण्याआधी परवानग्या मिळवाव्या लागणार आहेत की काय?

मनात एक अंधारलेल्या दमट संध्याकाळीसारखा विचारही आला होता की..

की कधीतरी आपल्यालाच म्हणावं लागेल, “दिवाळी अंकही आता इतिहासजमा झाला आहे. हाच आपला शेवटचा अंक."

मिपाचा हा वार्षिक अंक म्हणजे एक नुसती पुरचुंडी नसून सर्वांचा सामूहिक श्वास आहे. वार्षिक लाइफ सर्टिफिकेट उर्फ 'जीवन प्रमाणपत्र' आहे.

सगळ्यांना वाट पाहायला लावणारा, निघायला उशीर होणारा. ताण आणणारा.. पण शेवटी एकदाचा प्रकट होणारा.. अजून तरी खातरीशीर..

यंदाच्या वर्षीचा लेखांचा सुरुवातीचा काहीसा संथ प्रवाह पाहून ते मळभ आणखी गडद व्हायला लागलं होतं. पण नंतर जितकं आणि ज्या उत्कृष्ट दर्जाचं साहित्य झोळीत जमा होत गेलं, ते पाहून त्या काळ्या अवकाळी ढगांना आधी शरमून आणि मग आनंदाश्रू बनून कोसळून नष्ट व्हावं लागलं.

लोक्स... अजूनही धडधडतंय आपलं हृदय! नो टेन्शन.

कधीकधी आपणच आपल्या मिपा परिवाराबद्दल शंका घेतो आणि मिपा उलट आपल्यालाच म्हणतं, "ताण घेऊ नको. तू आहेस तोवर मी आहे.”

जे विचार मनात आले, ते मान्य करायला आता मला काहीच लाज वाटत नाही. मी आणि अनेक इतरांनी क्षणिक का होईना, असा संशय घेतला होता.

आणि आज मनापासून आनंदाने कबूल करतो.. मिपा जागं आहे आणि असेल. हां.. मिपामध्ये काळानुसार तांत्रिक बदल करत राहण्यासाठी प्रशांत आणि नीलकांत यांना सतत टोचण्या देत राहणं हे तर आलंच. "लवकरच मिपा अपग्रेड करू" या त्यांच्या वायद्यावर विश्वास ठेवणंदेखील आलं. (कधीकधी वाटतं की अपग्रेड न झाल्यानेच मिपाचा आत्मा टिकून आहे की काय??)

हे सगळं घडवणारे सगळे हात पुन्हा एकदा, यंदाही, पडद्यामागे आहेत.

लेख मागवणारे, डिझाइन करणारे, तपासणारे, दुरुस्त करणारे.. सुधांशुनूलकर, टर्मीनेटर, प्रचेतस, ज्ञानोबाचे पैजार, प्रा.डॉ. दिलीप बिरुटे, गणपा, जव्हेरगंज, चांदणे संदीप.. इतरही अनेक..

तुमच्यामुळेच ही एकोणीस वर्षं सहज पार पडली.

आणि पुढचं विसावं वर्ष नक्कीच आणखी एक नवा कोरा अंक घेऊन येणार..

मिसळपाव आता केवळ संकेतस्थळ नाही.. मोठ्ठ्या पुस्तकाच्या पानांत दडवून ठेवून टिकलेल्या जाळीदार आणि नक्षीदार पिंपळपानांचा तो संग्रह आहे.

तो फक्त वाचकांचा नाही, तो फक्त लेखकांचा नाही,
तो ‘आपल्या’ सगळ्यांच्या मनाचा हळवा कोपरा आहे. पुन्हा पुन्हा परत येण्यासाठी.. कोणताही धागा उलगडून परत परत वाचण्यासाठी.

दिवाळी अंक म्हणजे त्या कोपऱ्यातली थोडी जास्त झगमगणारी खास पणती. किंवा ठेवणीतला मोठ्ठा भुईनळा म्हणा.

प्रत्येक वर्षी आपण तो लावतो. अगदी दिवाळीच्या पहिल्या पहाटे नसेल, थोडा उशिराने का होईना, पण तो भुईनळा आपण पेटवतो. तोही झगमगाट करत बरसतो. आसपास उजेड आणि ऊब तयार करून जातो.

आणि मिपाच्या पुढच्या दशकात आपण पुन्हा एकदा म्हणू..
“बुढ्ढा होगा तेरा बाप".

एकोणिसाव्या वर्षाचं थोडं शहाणं, थोडं वेडं संपादकीय इथेच आवरतं घेतो आणि अंक वाचण्यासाठी तुम्हाला मोकळं करतो.

लेखन पाठवणाऱ्या लेखकांना आणि ते वाचणाऱ्या वाचकांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

- गवि
1

प्रतिक्रिया

स्वधर्म's picture

20 Oct 2025 - 1:54 pm | स्वधर्म

दिवाळी अंक निघेपर्यंत संपादकांची कशी धाकधूक असेल ते अगदी नेमके मांडलेत आपण. पण आता मिपा तारुण्याने मुसमुसते आहे, तेंव्हा लेट अस एन्जॉय!
तुमच्यासह सर्व संपादक मंडळाचे मनापासून आभार _/\_

यातील बरेच प्रश्न सर्व साहित्यप्रेमींना पडत असतील. तरी माणसाची सर्जनशीलता कोणतेही एआय़ घेऊ शकत नाही असे मला तरी वाटते.सर्व संपादक मंडळाचे मनापासून आभार _/\_

गामा पैलवान's picture

20 Oct 2025 - 5:57 pm | गामा पैलवान

गवि,

तुमचं संपादकीय मनोगत हे एक रत्न आहे. बाकी, मज बापड्यास काय काय बोलावं हे सुचंत नाहीये ! __/\__

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

20 Oct 2025 - 6:00 pm | गामा पैलवान

चुकून दोनदा 'काय काय' असं लिहिलं. खरंतर एकदाच लिहायचं होतं.

-गा.पै.

जाताजाता : कळफलकासमोर दिवाळीचा फराळ घेऊन का बसू नये, हे समस्तांना कळलं असेल.