प्रस्तावना
मी १९७६ ते १९८१ ह्या पाच-साडेपाच वर्षांत बाँबे डॉक्समध्ये काम करत होतो. डॉक्स म्हटले की मालाची वाहतूक आली, म्हणजेच ओघाने ट्रक्सदेखील आले. त्या काळात मला ट्रक्सच्या मागे लिहिलेला मजकूर - बहुतेक वेळा तो शेरोशायरीच्या स्वरूपात असायचा - वाचायची आवड निर्माण झाली होती. अशा शेरोशायरी मी जवळच्या डायरीत लिहून घेत असे. आजही माझ्याकडे माझी ती डायरी आहे, ज्यात जवळजवळ ३५ ते ४० छोटे-मोठे शेर आहेत. काही अगदीच साधे आहेत, तर काही विचार करायला लावणारे आहेत, पण हे सर्व ट्रक्सच्या मागूनच टिपले आहेत.
काही दिवसांपूर्वी ती डायरी सहज चाळता चाळता मनात एक विचार आला की हे शेरशायरी एकत्र एखाद्या कथेच्या स्वरूपात गुंफता येतील का? मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केला व शेवटी ही कथा आकारास आली.
कथेतील ठळक (बोल्ड) अक्षरातील शेरोशायरी जशाच्या तशा ट्रक्सच्या मागून उचलल्या आहेत. साहित्याच्या दृष्टीने ह्या कथेला किती किंमत असेल ते मला सांगता येत नाही, पण वाचकांनी एक वेगळा प्रयत्न म्हणून ह्या लेखाकडे बघावे, अशी इच्छा आहे.
पप्पा जल्दी आ जाना!
देशाच्या संरक्षणार्थ सीमेवर लढणार्या सैनिकांखालोखाल कठोर परिश्रम करणार्यांत दुसरा नंबर कदाचित ट्रक ड्रायव्हर्सचा लागू शकेल. सैनिकांसारखाच तो घरापासून दूर असतो, मृत्यू त्याच्याही आसपास सतत घोटाळत असतो. थंडी-वारा-ऊन-पाऊस कशाचीही तमा न बाळगता तो नेहमी आपले काम करत असतो. त्याच्यासाठी, कोणताही सण-वार, तिथी-दिवस सारखेच असतात. सैनिक देशाच्या संरक्षणासाठी लढतो तर ट्रक ड्रायव्हर, देश सुरळीत चालावा म्हणून आपले काम करीत राहतो. असे असूनदेखील सैनिकाच्या वाट्याला येईल त्याच्या शतांशदेखील, मान त्याच्या वाट्याला येत नाही, उलट पावलोपावली अपमान, अवहेलना, बदनामीच त्याला सहन करावी लागते आणि मग त्यातून निर्माण होते ते एक वरकरणी
दिसणारे बेदरकार, बेछूट, बेगुमान, रगेल आणि रंगेल व्यक्तिमत्त्व. परंतु अशा ह्या व्यक्तिमत्त्वाच्या खाली दडलेलं असतं एक प्रामाणिक, दिलखुलास, आपल्या वतनावार आणि कुटुंबावर अमर्याद प्रेम करणारं दिल. सततच्या प्रवासामुळे, एक ‘किलींडर’ सोडला, तर दिलातली बात सांगायला कोणीही बरोबर नसतो आणि हे दिल मग आपल्या गड्डीवर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतं.
टाटा से निकली कुंवारी, शिवडी में श्रींगार हुआ,
जब चढी थोडी जवानी, सुखविंदरसे प्यार हुआ
गाडीची नवीन चेसीस टाटामधून घेतली आहे, शिवडीच्या बॉडीबिल्डिंग कारखान्यातून चेसीसवर मनपसंत बॉडी बाधून घेतली आहे, सुंदर रंगरंगोटी केली आहे आणि अश्या पूर्ण जवानीत आलेल्या गाडीवर सुखविंदर आपली मांड ठोकून बसला आहे. नवीन गाडी घेतली, तिला मनासारखी सजवली, आता धंद्याला सुरुवात करायला पाहिजे.
कर कमाई, काम बंदे, मुफ्त खाना छोड दे,
झूठा है संसार, इसपर प्यार करना छोड दे|
पण अचानक शेटची मर्जी थोडी खफा झाल्यासारखी जाणवली, कदाचित एखाद्या ‘हितचिंतकाने’ सेठजींचे कान भरले असावेत.
हे यार, तेरे दोस्तीने दिल जला दिया,
गाडी मुझे दिलवाकर, उल्टा चमचा फिरा दिया|
मग तोंडातून सहजच हे शब्द उमटतात -
अये भगवान, तेरे दर पर ये फरियाद करते है,
मत कर उन चमचोंको पैदा, जो हमे बरबाद करते है|
आणि असेदेखील म्हणावेसे वाटते की,
हर मौसम बदलता है, दुनियाका ढंग देखकर,
हे दोस्त, तू न बदलना मेरा वक्त देखकर|
पण काय करणार? ही दुनियाच ही अशी आहे –
ये दुनिया है मतलब की, यहा कौन किसीका होता है?
धोखा वही देता है, जिसपर भरोसा होता है|
आणि शेवटी हेच खरे की -
फूलोंसे काटे अच्छे जो दामन थाम लेते है,
दोस्तोंसे दुश्मन अच्छे, जो जलकर भी नाम लेते है|
शेवटी, वाहे गुरू आणि मॉं शेरावालीच्या कृपेने पहिले भाडे मिळाले. जाऊन-येऊन, कमीत कमी दोन महिने तरी लागणार होते आणि पैसेही चांगले मिळणार होते. पण, पण.. अचानक मनजीत कौरच्या आठवणीने मन कातर, हळवे झाले, एक अनामिक हुरहूर लागली, अजून आपण आपल्या दिलातली बात तिच्याजवळ बोललो नाही आणि कदाचित तिचेदेखील आपल्यावर प्रेम असेल? तिचे घरवाले तिच्या लग्नाचे बघताहेत, अशी कुणकुणदेखील लागली आहे. जाऊ दे, जे नशिबात असेल तेच होईल आणि एकदा का सफरीला सुरुवात झाली की नशिबात काय होईल ते फक्त वाहे गुरूच जाणोत. मनजीतला हेच सांगून निघावे की –
रहा चमन तो फूल खिलेंगे,
रही जिंदगी तो फिर मिलेंगे|
उजाले जिंदगीके साथ हमारे रहने दो,
न जाने जिंदगीकी किस गलीमे शाम हो जाए|
निघता निघता नवीन गड्डीचे पेढे देण्याचे कारण काढून सुखविंदर मनजितला जाऊन भेटला. उत्साहाने आपल्या पहिल्याच सफरीविषयी बोलला, एखाद-दीड महिन्यात परत येईन असेही सांगितले, पण मनातली बात मनातच राहून गेली -
मोहब्बत क्या करें वो जो बदनामीसे डरते है,
ये उनका काम है, जो जिंदगी बरबाद करते है|
सुरत तेरी देखकर कब तक सब्र करू ?
आखोको झांक लूं, मगर दिल को क्या करूं?
काटकर जबान मेरी, कह रहा है वो जालीम,
अब तुम्हे इजाजत है, हाले दिल सुनानेकी|
सफरीला सुरुवात झाली. पल्ला फार लांबचा आहे, रस्ता जिकिरीचा आहे, वाटेत डाकू-गुंडांचा त्रास आहे, पण वाहे गुरूंवर तेवढाच भरवसा आहे -
फानुस बनके हवा जिसकी हिफाजत करें,
वह शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करें|
रोजच पंधरा-पंधरा तास गाडी चालवायची, कोठेतरी धाब्यावर रोटी खायची, चाय-नाश्ता करायचा, भेटलेल्या इतर ड्रायव्हर्सबरोबर गप्पा मारायच्या, पुढच्या प्रवासाचा अंदाज घ्यायचा आणि पुन्हा चालू पडायचे. काही दिवस तर नीट गेले आणि अचानक पोलिसांनी एका चेकपोस्टवर नाकाबंदी केली. एक ड्रायव्हर चोरीचा माल घेऊन जात आहे, अशी त्यांना खबर लागली होती. वाईटांबरोबर चांगलेदेखील पिसले गेले, कारण नसताना सुखीला पोलीस ठाण्यात दोन-तीन दिवस बसून राहायला लागले, पोलिसांचे अत्याचार सहन करावे लागले आणि त्याचे मन बंड करून उठले. वाटले, काहीही न करता त्रास भोगावा लागतोच आहे, तर करावीच बेइमानी.
इन्साफके खोज मे निकला तो जुल्म नसीब हुआ,
जब जुल्मसे प्यार किया तब इन्साफ हासिल हुआ|
पण दुसर्याच क्षणी नेक विचार मनात आले, वाटले – नकोच ती बेइमानीची मिठाई
गरिबी आनेसे शरीफोकी शराफत कम नही होती,
सोनेके सौ टुकडे करनेसे, उसकी किमत कम नही होती|
सफर पुढे सुरू झाली. मजल-दरमजल करीत मुक्कामाला पोहोचला, परतीचे भाडे मिळवून घरच्या दिशेला प्रवास सुरू झाला. आता मनात मनजितचेच विचार घोळताहेत. आपण कमवायला लागलोय, कर्ज काढून का होईना, एका ट्रकचे मालक आहोत, आता मनजितचा हात मागायची वेळ आली आहे, उशीर करून चालणार नाही. पण अचानक एका मुक्कामाला त्याचा गाववाला भेटला आणि मनजितचे लग्न झाल्याची ‘खूशखबर’ सुनवली.
सुखविंदरच्या पायाखालची जमीनच जणू सरकली, डोळ्यापुढे अंधारी आली, डोळे भरून आले. काय करावे ते सुचेनासे झाले. शेवटी हृदय मोकळे करायला त्याने ट्रकचा सहारा घेतला. तेथेदेखील त्याला समोरच तसबिरीत मनजित दिसली. पोटभर रडून झाल्यावर, मन घट्ट करून त्याने ट्रक सुरू केला, पण आता त्यात पहिल्यासारखी उमेद राहिलेली नव्हती. अॅक्सिलरेटरवरचा पाय ढिला पडला आहे. घरी तरी आता कोणासाठी जायचे..
लिखा परदेस किस्मत मे, वतनको याद क्या करना?
जहॉ कोई नही अपना, वहॉ फरियाद क्या करना ?
मनजितसाठी घेतलेले झुमके आणि कंगन त्याने हलकेच सतलजमध्ये, डोळ्यातल्या आसवांबरोबर सोडून दिले.
आस जब टूट जाती है, तब रूह कीस तरह कसमसाती है,
ये उस बदनसीब दुल्हनसे पुछो, जिसकी बारात लौट जाती है|
हळूहळू दिवस, महिने, वर्षे उलटले. उरातली वेदना आता पूर्वीसारखी प्रकट होत नव्हती. यार-दोस्तांची लग्ने होऊन ते घर-गृहस्थीला लागले होते. धंद्यातदेखील जम बसू लागला होता. अशातच, मोहल्ल्यात नव्याने राहायला आलेली पारो त्याचे मन चंचल करू लागली. पण मन तयार नव्हते. एका जखमेतून सावरत असताना दुसरी जोखीम का ओढवून घ्या -
खुदा मेह्फूज रखे इन तीन बलाओंसे,
वकिलोंसे, हकीमोंसे, हसिनोंकी निगाहोंसे|
पण कितीही दुर्लक्ष करायचे ठरवले, तरी पारो आता मनात रुंजी घालू लागली होती. तिचे ते तिरपे दृष्टिक्षेप, गालातल्या गालातले हसणे त्याचे काळीज विदीर्ण करू लागले होते -
सफर करना है, तो टैंकोसे करो, ट्रकोंमे क्या रक्खा है?
कत्ल करना है, तो नजरोंसे करो, तलवारोंमें क्या रक्खा है?
खुशबू फूलोसें होती है, चमन का नाम होता है,
निगाहे कत्ल करती है, हुस्न बदनाम होता है|
हुआ दुश्मन जमाना यार बनकर,
गला काट दिया तुमने, गलेका हार बनकर|
आणि एक दिवस पारोचे मा-बाप तिचा रिश्ता घेऊन आले आणि सुखविंदर नाही म्हणू शकला नाही. लग्न लागले, दोनाचे चार हात झाले. यथावकाश चाराचे आठ झाले. दोन गोजिरवाणी पिल्ले घराचा स्वर्ग बनवू लागली. त्यांच्या गोड चिवचिवाटीने सुखविंदर-पारो सातव्या आसमानात झुमू लागले. सुखविंदर आणखी मेहनत करू लागला, भाडं मिळाल्याचा जितका आनंद व्हायचा तितकाच मुलांपासून दूर राहावं लागेल म्हणून उदासदेखील व्हायचा. ट्रक घेऊन निघाल्यावर मुलं, परत येताना हे घेऊन या, ते घेऊन या अशी फर्माइश करू लागली. छोट्या बबलीला गुडिया हवी आहे, रेडियोवरचे गाणे मनात रुंजी घालू लागले आहे -
पप्पा, जल्दी आ जाना,
सात समंदर पार से, गुडियोंके बाजार से,
अच्छीसी गुडिया लाना, अच्छी से गुडिया लाना
गुडीया चाहे ना लाना
पप्पा जल्दी आ जाना
गुडिया घेऊन परत येताना अॅक्सिलरेटरवरचा पाय आता तेज पडायला लागला आहे.
प्रतिक्रिया
20 Oct 2025 - 3:06 pm | स्वधर्म
मराठीत पण जबरी विनोदी ओळी आहेत.
'१३ मेरा ७ रहे'
पासून ते
'बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलाय वाघानं' पर्यंत
23 Oct 2025 - 10:42 am | श्वेता२४
छान आहे कथा. पण मला कधीच कुठल्या ट्रकच्या मागे इतक्या अर्थपूर्ण ओळी वाचायला मिळालेल्या नाहीत...
19 Nov 2025 - 1:15 am | नूतन
विषयाच्या वेगळेपणामुळे कथा आवडली. पण श्वेता २४ यांनी म्हटल्याप्रमाणे एवढी शायरी ट्रकमागे नाही पाहिली.
20 Nov 2025 - 1:04 am | सौन्दर्य
कथा आवडल्याचे कळविल्याबद्दल आभार.
मी २००४ पर्यंत भारतात मुबंईत होतो, तोपर्यंत शेकडा २५ ते ४० टक्के ट्रक्सच्या मागे काहींना काही लिहिलेले मी पाहिले आहे. ट्रक जर उत्तर भारतातील असला तर हमखास शेरो - शायरी लिहिलेली आढळते. अगदी दक्षिण भारतातील ट्रक्सच्या मागे देखील त्यांच्या भाषेत काहींना काही लिहिलेले असते, ते ती भाषा वाचू न शकणाऱ्याला ते समजत नाही हा भाग अलाहिदा. अगदी मुंबईतल्या रिक्षाच्या मागे देखील, "येता का जाऊ?" "आई - वडिलांचा आशीर्वाद" "वाचाल तर वाचाल" असे काही ना काही अर्थपूर्ण वाचायला मिळते. सरकारच्या दबावामुळे आधी 'हम दो, हमारे दो" आणि नंतर "मेरा भारत महान" सारखे संदेश वाचायला मिळतात. एखाद्या ढाब्यावर किंवा टोल नाक्यावर गेलात तर तुम्हाला नक्कीच मी माझ्या लेखात उल्लेखलेली शेरो - शायरी वाचायला मिळेल.
23 Oct 2025 - 12:34 pm | कर्नलतपस्वी
मेरी चली तो तेरी क्युं जली
गुले गुलबदन लाल है,गड्डीते सवार तेरा यार है
निम का पेड चंदन से कम नही ,हमारा लखनऊ लंदन से कम नही
धीरे चलो यार फिर मिलेंगे वररना हरिद्वार मिलेंगे
आता मिपा टिन संपवून ट्वेन्टी मधे पोहचला आहे म्हणून शिकागो डेट्राईट प्रवासात एका कंटेनर मागे लिहीलेला वयस्क चारोळी....
If my wife would let me ride her..
As much as I ride on my motobike...
I would be home...
RIGHT NOW!!!!!.
ड्रायव्हरला काय म्हणायचंय मलाही नीट कळाले नाही .थांबून विचारायची सोय नव्हती.
एका वेगळ्या विषयावरील लेख आवडला.
जर तुम्हीं पाकिस्तान सीमेवरील गावात फेरफटका मारलात तर सारी प्रवासी वाहने खुप नटलेली आणी चटकदार वाक्यांनी सजवलेली दिसतील.रंगीत गोंडे,रिबीन्या ,प्लास्टीक फुले, पोपटाची जोडी आणखी बरेच काही.
श्रीगंगानगर,साधोवाली,फाजिलका,सिरसा या राजस्थानातील सीमावर्ती भागात नोकरी करताना आशीच रंगीबेरंगी वहाने दिसली.
24 Oct 2025 - 9:58 pm | निमी
एका वेगळ्या विषयावरचे लेखन वाचताना आणि त्यानिमित्ताने हटके शायरी वाचायला मिळाल्याने आनंद वाढला.
27 Oct 2025 - 4:17 pm | राजेंद्र मेहेंदळे
ट्र्कमागील वाक्ये गुंफुन केलेला लेख मनाला भिडला. रुक्ष आयुष्यात रंग भरण्यासाठी अशी वाक्ये उपयोगी पडत असतील का?
बाकी मनजित नंतर पारो भेटली आणि दोनाचे चार झाले हे एक बरे झाले. सर्वे सुखिनः संतु!!