कापूसकोंड्याची गोष्ट
कल्पना आधीच डोक्यात आलेली, तशी लोककथेच्या सदरात मोडणारी. संवादस्वरूप जुनेच आहे.
पात्रे - सूत्रधार, विदूषक, मुले, विविधधर्मीय धर्मप्रचारक, पालक
---
लहान मुलांचे कोंडाळे
एक जण -
"गोष्ट सांग."
"कसली गोष्ट सांगू?"
"कसली तरी नवीन."
"नवीन?"
"हो, नवीन!"
खूप विचार करतोय... पण गोष्ट काही सुचतच नाहीये.
इतक्यात एकाला गम्मत करायची लहर येते.
"बरं, हां सॅम, तुला आता 'कापूसकोंड्याची गोष्ट' सांगतो."
"सांग!" (सॅम सरसावतो.)
"सांग' काय म्हणतोस, कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?"
"सांग ना रे!"
"सांग ना रे' काय म्हणतोस, 'कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?"
"सांग ना रे गोष्ट!"
"सांग ना रे गोष्ट' काय म्हणतोस, कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?"
बाकी सगळी मुले कोरसमध्ये जॉइन होतात.
"ए, असं काय रे?"
"ए, असं काय रे' काय म्हणतोस, कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?"
"ही ही!"
"ही ही' काय हसतोस, कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?"
सॅमला काही वेगळे वाटते. आपल्याला चिडवले जातेय, हे त्याच्या लक्षात येते. तो "नको" म्हणतो.
"नको' काय म्हणतोस, कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?"
सॅमच्या प्रत्येक हालचालीची नक्कल करत मुले पुन्हा कोरसमध्ये
"असं काय करतोस? 'कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?"
सॅम gets crazy, हातातील वस्तू फेकून मारण्याची नुसतीच अॅक्शन करतो. तीच अॅक्शन करून सगळी मुले पुन्हा कोरसमध्ये
"असं काय करतोस, कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?"
सॅम जायला निघतो. उभा राहतो. पुन्हा नक्कल
"जातोस काय? कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?"
सूत्रधार चिडवल्या जाण्याच्या खेळातून सुटकेचा मार्ग दाखवतो.
सॅमच्या लक्षात येते की आपल्याला चिडवले जातेय. तोही
"कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?"
म्हणूनच प्रत्युत्तर देतो.
चिडवणारे डाव उलटल्याचे पाहून चिडवणे थांबवतात.
सूत्रधार मोठ्यांच्या सामाजिक-धार्मिक जीवनातील 'कापूसकोंड्याची गोष्ट' दाखवतो.
---
दृश्य २ -
एका धर्मप्रचारकाला धर्मप्रचाराची लहर येते.
"बरं, हा सॅम, तुला आता प्रतिमा-मूर्ती नसलेल्या एकट्या देवाची गोष्ट सांगतो."
"सांग!" (सॅम सरसावतो)
"सांग' काय म्हणतोस, प्रतिमा-मूर्ती नसलेल्या एकट्या देवाची गोष्ट सांगू?"
"सांग ना रे!"
"सांग ना रे' काय म्हणतोस, प्रतिमा-मूर्ती नसलेल्या एकट्या देवाची गोष्ट सांगू?"
"सांग ना रे गोष्ट!"
"सांग ना रे गोष्ट' काय म्हणतोस, प्रतिमा-मूर्ती नसलेल्या एकट्या देवाची गोष्ट सांगू?"
बाकी सगळी मुले कोरसमध्ये सामील होतात.
"ए, असं काय रे?"
"ए, असं काय रे' काय म्हणतोस, प्रतिमा-मूर्ती नसलेल्या एकट्या देवाची गोष्ट सांगू?"
"ही ही!"
"ही ही' काय हसतोस, काय म्हणतोस प्रतिमा-मूर्ती नसलेल्या एकट्या देवाची गोष्ट सांगू?"
सॅमला जाणवतं की आपला विश्वास चिडवला जातोय. तो "नको" म्हणतो.
"नको' काय म्हणतोस, प्रतिमा-मूर्ती नसलेल्या एकट्या देवाची गोष्ट सांगू?"
यानंतर मुलांचे गट पडतात. ही मुले मोठी होतात.
---
प्रत्येक गट -
एक गट "मी पहिल्या प्रेषिताच्या, पहिल्या आदेशाची गोष्ट सांगू?"
दुसरा गट "दुसऱ्या प्रेषिताची, दुसऱ्या आदेशाची; पहिला आणि शेवटचा आदेश चुकीचा असल्याची गोष्ट सांगू?"
तिसरा गट "तिसऱ्या प्रेषिताची, शेवटच्या आदेशाची गोष्ट सांगू?"
प्रत्येक जण एकमेकांना
"आमचा ग्रंथ आणि हिरो मोठा, तुमचा ग्रंथ / हिरो सैतान"
...अशी गोष्ट सांगायला लागतो.
---
मध्येच आणखी एक वेगळा सीन -
बागुलबुवाची भीती घालून आईने झोपवलेलं मूल झोपेतून जागं होतं.
आई-बाबा बाजूला नाहीत, म्हणून मूल त्यांना शोधतं.
ते दुसऱ्या खोलीच्या बंद दरवाजापाशी पोहोचतं.
आतून प्रेमळ संवाद कानावर पडतो, पण त्याला काहीच कळत नाही.
मुलाला वाटतं "आई-वडिलांना भीती दाखवून झोपवलं पाहिजे!"
तो दरवाजा वाजवतो आणि ओरडतो,
"तुमचा एक देव सैतान,
तुमचे अनेक देव सैतान,
देव नसणं सैतान,
मूर्ती नसणं सैतान,
मूर्ती असणं सैतान,
तुमचा हा ग्रंथ असणं सैतान,
तुमचा तो ग्रंथ असणं सैतान,
तुमचा ग्रंथ नसणं सैतान...
...अशी गोष्ट सांगू का?"
आई-वडील जागे होतात. मुलाला झोपवतात.
---
सूत्रधार आणि विदूषक डोळ्यांत पाणी येईपर्यंत हसतात.
---
पुन्हा पहिल्या सीनवर -
दोन गट भांडायला लागतात -
"तुझा धर्म पागान आहे, सांगू का?"
"तुझाच धर्म अनेकदेववादी आणि भरकटलेला आहे, सांगू का?"
प्रत्येक गटात उपगट पडतात. शब्द, परंपरा, हिरो-हिरोइन, ग्रंथ यावरून "सांगू का? सांगू का?" भांडणं वाढत जातं.
प्रकरण हमरीतुमरीवर जातं.
तिकडून नास्तिकांचा गट येतो.
"तुमचे सगळे प्रेषित आणि ग्रंथ खोटे आहेत, सांगू का?"
तेही मागे लागतात
"आमची गोष्ट सांगू का?"
मग -
* मूर्तिपूजक
* अनेकदेववादी
* विविध तत्त्वज्ञानवादी
* सहिष्णुता वाढली म्हणणारे
* असहिष्णुता वाढली म्हणणारे
* मानवाधिकारवादी
* पर्यावरणप्रेमी
* प्राणिप्रेमी
* प्राणी खाणारे
* देशप्रेमी
* देशप्रेमाच्या विरोधकांचे टीकाकार
* सोशल मीडिया ट्रोल्स
* 'अमुकफोबिया', 'तमुकहेटस्पीच', 'अतिरेकी हेच देशभक्त' म्हणणारे
...हे सगळेच गट एकत्र येऊन
"गोष्ट सांगू का?
कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का?"
...म्हणत मार्च करू लागतात.
---
शेवटचा सीन -
मुले पुन्हा आपल्या वयाचे कपडे घालून येतात, अगदी मुले म्हणून! मोठ्या मंडळींचा सगळा हलकल्लोळ पाहून कापूसकोंड्यांची गोष्ट खेळणारी मुले आपलाच खेळ मोठे लोकही खेळतात, हे पाहून डोक्याला हात लावून बसतात.
तेवढ्यात सूत्रधार विदूषक येतो आणि म्हणतो, "कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का?" या मॉकिंग ट्रोलमधून "कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का?" हे जे समोरचा बोलतो, तेच प्रत्युत्तर पुन्हा रिपीट करून सुटका होते.
पण सुटका करून घेता घेता तो अजून आजूबाजूच्यांवर आणि पुढच्या पिढीवर आपापले एकांगी नॅरेटिव्ह लादत जातो. कापूसकोंड्याची पूर्ण गोष्टही बहुतेकांना माहितच नसते आणि जी पूर्ण म्हणून असते, तीही आगा-पिछा नसलेली आख्यायिकाच असते.
डोळे बांधलेल्या प्रत्येकाला हत्ती वेगळा जाणवतो, ही कथा नवी नाही, हे सांगून पडदा पडतो.
* लघुनाटिकेचे सर्व माध्यम सर्वभाषीय सर्व अधिकार - कॉपीराइट - लेखक (माहितगार) स्वतःकडे सुरक्षित ठेवू इच्छितो. अर्थात कुणाला या नाटिकेचा विकास विस्तार / सादरीकरण करण्याची इच्छा झाल्यास लेखकाशी संपर्क साधण्याचे स्वागतच आहे.
प्रतिक्रिया
21 Oct 2025 - 6:51 pm | कंजूस
हंहंहं.
31 Oct 2025 - 11:03 am | श्वेता व्यास
लघुनाटिका वाचून वाटलं प्रत्येक सामाजिक प्रश्न ही एक न संपणारी कापूसकोंड्याची गोष्टच आहे.