चेन्नई - रामेश्वरम् - मदुरै २०२५

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
17 Sep 2025 - 5:50 pm

चेन्नई - रामेश्वरम् - मदुरै २०२५

भारतात पर्यटन करणाऱ्यांना एकदा तरी रामेश्वर पाहण्याची इच्छा होतेच. अगोदर तमिळनाडूत दोन सहली झाल्या होत्या. नव्वद टक्के ठिकाणं धार्मिकच आहेत आणि भाषेची थोडी अडचण आली तरी थोडाफार कामचलाऊ तमिळ शब्दसंग्रह उपयोगी पडला होता. आता सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात रामेश्वरला जायचं ठरलं. चेन्नईहून तिकडे जाणं सोपं असल्याने चेन्नईची भर पडली. मग मदुरै ( मदुराई )का नको? तेही जोडले. तीन शहरांची सहल आखली. कन्याकुमारी हे ठिकाण तमिळनाडूत असलं तरी केरळच्या सहलीत तिरुवनंतपुरम पासून फक्त ऐंशी किमी आहे ते मागेच पाहिलं.
केव्हा जावे?
सप्टेंबरमध्येच का? तर हा महिना म्हणजे तिकडचा मे महिना. ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत पावसाळा असतो. पीकपाणी आलं की मुख्य सण पोंगल (संक्रांत) येते. त्यांची मोठी सुटी वीस जानेवारीला संपते. जानेवारी वीस ते फेब्रुवारी वीस हा आणखी एक चांगला काळ तिकडे फिरण्याचा. हवा फार गरम नसते. सहलीत त्रास होत नाही.
कसे जावे?
चेन्नई आणि मदुरै विमानसेवा आहे. तिथून रामेश्वरला जाता येते.
रेल्वेचा वेळखाऊ पर्याय आहे पण आम्हाला जमतो. बस सर्विस सुद्धा आहे.
किती दिवस ?
चेन्नईसाठी दोन दिवस,
रामेश्वर साठी एक दिवस
मदुरै साठी एक दिवस पुरेसे आहेत. जाण्या येण्यासाठी एक एक दिवस लागेल. एखादा दिवस जादा ठेवावा.

चेन्नई शहरात पाहण्यासाठी, फिरण्यासाठी बस सर्विस तर खूपच चांगली आहे. साधारणपणे दर दहा मिनिटांनी सर्व मार्गांवर बसेस धावतात.
लोकल ट्रेन( दोन मार्ग), मेट्रो ट्रेनस ( दोन मार्ग) स्वस्त आणि जलद पर्याय आहेत. यासाठी हे app पाहा.Chennai local trains and metro app
Chennai travel - Route Maps (Appspundit Infotech)
https://play.google.com/store/apps/details?id=com.traintimetable.chennai...
ओटोरिक्षा मात्र इकडे दीडशे रुपये / किलोमिटर भाव सांगतात. अगदी कमी म्हणजे पन्नास रु/-

काय पाहावे, कसे पाहावे ?
चेन्नईमध्ये कप्पालीश्वर आणि वडप्पलानी मुरुगन ही मुख्य गर्दीची देवळे आहेत. सकाळी दर्शनाला जाऊ नये. अकरा ते चार तमिळनाडूमध्ये सर्व देवळे बंद असतात.चार वाजता जावे.
फोटो १
- चेन्नई नकाशा

रामेश्वरम् देवळात उत्तर दरवाजाकडे बारा कुंड ( विहिरी) आहेत. तिथले पाणी अंगावर शिंपडून घेऊन मग रामेश्वर दर्शनाला जायचा प्रघात आहे. पण हे आम्ही टाळले. काही जण अग्नितीर्थ समुद्रावर स्नान करून दर्शनाला पूर्व दरवाजाने जातात. रेल्वे किंवा बसने येणारे भाविक थेट पश्चिम दरवाजाने आत जाऊन दर्शन घेतात. ज्याची त्याची श्रद्धा. प्रवेशासाठी पुरुषांनी पांढरी लुंगी घालण्याची आवश्यकता नाही. शर्ट पँट चालते. स्त्रियांनी साडी किंवा पंजाबी ड्रेस.
चेन्नई नकाशा पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की एमजीआर सेंट्रलच्या उजवीकडे जो चेन्नई फोर्ट भाग आहे ( जॉर्ज टाऊन) त्यात असंख्य गल्ल्या आहेत. त्यात स्थानिक लोकांना लागणाऱ्या सर्व वस्तूंचा बाजार आहे. काही बजेट हॉटेल्सही इथे आहेत आणि मुख्य म्हणजे ब्रॉडवे बस स्टँड आहे. इथून चेन्नईत कुठेही जाता येते. उजवीकडून किनाऱ्याने दक्षिणेकडे खाली जाताना प्रथम फोर्ट भाग आहे त्यात काही मुख्य सरकारी इमारती आणि एक चर्च आणि म्युझियम आहे. त्यानंतर येतो अण्णास्क्वेअर बस स्टँड आणि एमजीआर आणि जेयललिता यांची स्मारके. स्मारकांच्या पुढेच लगेच मरीना बीच सुरू होते. संध्याकाळी इथे पर्यटक येतात. सकाळी कुणी नसते. यावेळी चौपाटी यांत्रिकपणे साफ करतात. चौपाटी खाली पाच किमी पसरली आहे. बाजूचा मुख्य रस्ता आहे तो अड्यारमार्गे कोवलम- महाबलीपूरमला( मामल्लापूरमला) जातो. रस्त्याच्या एका बाजूस मरीना चौपाटी तर दुसऱ्या बाजूला मुख्य सरकारी इमारती, युनिव्हर्सिटी, विवेकानंद हाऊस असे दिसतात. या (वि.हा. V.H.)आवारात एक म्युझिअम आणि आइस हाऊस आहे. इंग्लंड वरून जहाजाने बर्फ आणून इथे साठवला जायचा. ब्रिटिशांनी चेन्नई बंदर विकसित केले आणि खास अधिकारी चेन्नईत राहायचे. वातावरण इंग्लंडचेच. पार्ट्या इत्यादी. याच्या पुढे आहे लाईट हाऊसची आठ मजली इमारत.साडेपाच वाजेपर्यंत वरती जाता येते. लाईट हाऊस नंतर आहे सेंट थॉमस चर्च( = सॅन्थोम ). यानंतर येतो अड्यार हा प्रसिद्ध भाग .( आतमध्ये जाता आले नाही कारण करोना निर्बंधात बंद केले ते नंतर उघडलेच नाही.) चौपाटी ते सॅन्थोम ते कप्पालिश्वर मंदिर ( कोविल)
जेमतेम अंतर दोन अडीच किमिटर आहे. इथे मइलापोर भाग सुरू होतो. ( मयिल =मोर). एमजीआर सेंट्रल स्टेशनहून मरीना बीच, लाईट हाऊस, सॅन्थोम दाखवून परत आणायला ओटोरिक्षावाले बाराशे रुपये मागतात. यातला काही भाग दुपारी काही संध्याकाळी पाहाणे योग्य आहे त्यामुळे थोडी घाई होते. उलट सुलट फिरावे लागते.

शहराचा मधला भाग म्हणजे चेन्नई एगमोर मयलापोर ते सेंट थॉमस माऊंट. यात मोठे बाजार आहेत. मुख्य इमारती आहेत.यूएस विजा ओफिस आणि एम्बसी अण्णा सर्कलपाशी आहे. म्युझियम आहे. दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळी जाणे ठीक.

एगमोर ते कोयांबडू ते नुंगांबकम - कोडांबकम - वडप्पलानी ते मिनांबकम ( चेन्नई एरपोर्ट) या भागात जाण्यासाठी मेट्रो उत्तम. वडप्पलानी मंदिर ( मुरुगन कोविल) इथले मुख्य मंदिर आणि खूप मोठी रांग लागते. लोकल ट्रेन्स, मेट्रो आणि भरपूर बसेस याच्यामुळे चेन्नईत फिरणे फारच स्वस्त आणि सोपे आहे. फक्त वेळेचं भान ठेवावे लागते. काही गोष्टी मंगळवारी बंद असतात. देवळे दुपारी बंद असतात.
फोटो २
-रामेश्वरम नकाशा

रामेश्वरम रामनाथस्वामी मंदिर आणि धनुष्कोडी तसेच डॉ. अब्दुल कलाम यांचे घर आणि म्युझियम या तीन मुख्य गोष्टी. देऊळ सकाळी लवकर उघडते पण खूप गर्दी असते. तिकडे ऊन फार असते त्यामुळे सकाळी धनुष्कोडी पहावे. ( ओटोरिक्षावाले धनुष्कोडी आणि वाटेतील कोदंडरामार मंदिर पाहून आणण्याचे एक हजार रुपये घेतात.) बसने गेल्यास बस थेट शेवटच्या अरैच्चल मुन्नार येथे सोडून देते. वाटेतील जागा पाहता येत नाहीत. तिकडे हवा तेवढा वेळ घेऊन नंतरच्या बसने परत येताना कलामच्या घरापाशी उतरावे. नंतर चार वाजता देवळात जावे. संध्याकाळी गर्दी नाहीशी होते. चेन्नईवरून इथे पहाटे दोन रेल्वे येतात त्या गाडीने येऊन दर्शन करून चेन्नईला परत( पावणे सहा आणि पावणे नऊ) जाणारे भाविक बरेच असतात. रात्री संन्नीधी मार्गावर ( पूर्व दरवाजा ते अग्नितीर्थ) गुजराती खाणावळ आणि इतर खाणावळींत जेवण चांगले मिळते. असे एक दिवसांत रामेश्वरम् पाहता येते).
फोटो ३
-मदुरै नकाशा

मदुरै - मीनाक्षी मंदिरात सकाळी साडेचार ते साडेसहा, साडेसात ते अकरा खूप गर्दी असते. चारलाच जावे. लुंगी आणि बर्मुडा हाफ चड्डीवर बंदी आहे.
मंदिराची गोपूरे खूप उंच असली तरी सर्व बाजूंनी बाजारातल्या तीन चार मजली इमारतींनी वेढल्याने दुरून दिसत नाहीत. जानेवारीपासून गोपुरांना रंगकामासाठी बांबू लावले असल्याने शिल्पे पाहताच आली नाहीत.
मदुरैमध्ये मीनाक्षी मंदिर ( मीनाक्षी सुंदरेश्वरार कोविल) आणि तिरुमल नायकार पॅलेस या दोन जागा एका दिवसात सहज पाहून होतात.
फोटो ४
चेन्नई मेट्रो

फोटो ५
तांबरम लोकल

फोटो ६
वेल्लाचेरी लोकल

फोटो ७
रामेश्वरम् अग्नितीर्थ बस स्टँड ते धनुष्कोडी अरैच्चल मुन्नाई बसप्रवास रूट

इतर माहितीसाठी यूट्यूबवरचे हे विडिओ उपयोगाचे आहेत.
Travel yatra videos
1. Chennai tourist places - https://youtu.be/LuB5kv5VUwM?si=aiderIncMGgRT45o
2. Best parks in chennai ..........https://youtu.be/AUI2HuZsd3I?si=1PAwkbezDSaYUp-v
3. Best beaches in Chennai......https://youtu.be/7mVpfNkqNTg?si=Q4Q0hZvPbQsJv870
4. Best markets in chennai.( Video no 7)......https://youtu.be/_LHDJ9x5FpY?si=dBNKBUjcD7rWd2jy
5. Chennai local travel guide.......https://youtu.be/DqDlaczYUUc?si=3X8_NkIYhvZqevd5

By SugarSpiceNice India
1. 20 best things to do in Chennai.........https://youtu.be/LAW2G1sV_Lg?si=6FEZWm6Vf_93hQJC
2. Chennai food and travel.............https://youtu.be/urvvib0TE2I?si=_lJRrOHUzOBQ7Ljo

By Agam Explorer
1. Rameshwaram yatra guide.........https://youtu.be/KJ-JCIuao0Q?si=HdywPTokUH4TcaRg
2. Madurai tourist places..........https://youtu.be/2nWVp7ZL9KU?si=U8sNjpAWB2pFErEw

By Suurojit Palmal
1.Madurai tourist places........ https://youtu.be/_EA7OiK79MA?si=_F_vcMuqcSUM6hZ5
2. Rameshwaram tourist places.....https://youtu.be/mVvUx482v0A?si=ZVbS116sdFAHyWDq
3. Meenakshi temple................https://youtu.be/DlVO-GEEh5E?si=kXEMXIwzh5fJ0Im-
4. Rameshwaram jyotirlinga darshan.....https://youtu.be/CVPAXdCHN68?si=3zZjbKPgA1RGO4lr

By India to Bharat
1. Meenakshi temple guide.....https://youtu.be/rGnDBZWSRfk?si=EEfgptIj_3M2w5fx
2. 5 best places to eat in rameshwaram.......https://youtu.be/u8gX8CUzRHc?si=zNxkpVZlc4a8E5dE
3. Rameshwaram tour guide......https://youtu.be/u-GECuWpWU8?si=y-TCjLALQva2fDWt

कुठे राहावे?
चेन्नई - विमानाने मीनांबकम येथे आल्यास एअरपोर्ट ते चेन्नई एगमोर असा अण्णा सलाई मार्ग आहे , दरम्यान चांगली हॉटेल्स मिळू शकतात. कार हायर करून फिरायचे झाल्यास प्रश्न नाही. रेल्वेने चेन्नई सेंट्रल स्टेशनला आल्यास आजुबाजुला खूप हॉटेल्स आहेत. शिवाय इथे राहिल्यास लोकल ट्रेन किंवा मेट्रो किंवा बसने कुठेही सहज जाता येते असा मध्यवर्ती भाग आहे.
रामेश्वरमच्या - अग्नितीर्थ भागात राहिल्यास स्टेशन, मुख्य बस स्ट्रँड, देऊळ,धनुष्कोडीला सहज जाता येते. बाजार, रेस्टारंट खाणावळ जवळच आहेत.
मदुरै - स्टेशनजवळच पेरियार बस स्टँड आहे. इथून देवळापर्यंतच्या भागात हॉटेल घेणे चांगले. दर्शनासाठी जाताना मोबाईल, बॅगा वगैरे न घेता, रुम वर ठेवून जाता येते. शिवाय नायकार महाल( पॅलेस) जवळच पडतो.

आम्ही तिन्ही शहरांत थोडी भटकंती केली.
Photo slideshow - Chennai_ Rameshwaram_ Madurai part 1
https://youtube.com/shorts/mtRuZRQy0S0?feature=share

Photo slideshow - Chennai_ Rameshwaram_ Madurai part 2
https://youtube.com/shorts/nlSe0xhTJW4?feature=share

Photo slideshow - Chennai_ Rameshwaram_ Madurai part 3
https://youtu.be/HD7n6e8bNsA

# नावाजलेल्या खाणावळींतील ( रेस्टारंटसमधील) पदार्थ काही खास वाटले नाहीत. पदार्थांना घी रोस्ट शब्द चिकटवून किंमती वाढवलेल्या वाटल्या. इतर रेस्टारंटात मात्र पदार्थ चांगले आणि स्वस्त होते.
# रेल्वे पॅन्ट्रीचे वेज थाळी जेवण (८०-१००रु)चांगले होते.
# चेन्नईच्या काही हॉटेल्समध्ये चेकाऊट २४ तासांचा होता. हे बरे आहे.
# चेन्नई शहरातून कूम नदी वाहते ती मुंबईची मिठी नदी आहे. अतिशय घाण वास मारतो. गटारनालाच झाला आहे.
# मरीना बीच एमजीआर स्मारकापाशी वाळूकिनारा आठशे मिटर्स रुंद आहे, सॅन्थोम चर्चपाशी शंभर मिटर्स आहे.
# रामेश्वरम् ते मदुरै एसी बस अंतर १७०किमी भाडे १९० पडते. रस्ता उत्तम आणि वाहने जवळपास नाहितच.
# रेल्वेचा नवीन पंबन पूल पाहिला. जुना काढत आहेत.
# मदुराईचा उच्चार मदुरै असा करतात.
# रामेश्वरम येथील डॉ. अब्दुल कलाम यांचे घर जवळच होते पण पाहिले नाही.
# maps and route tracing यासाठी OsmAnd हे app वापरतो. राज्यांचे offline maps साधारणपणे 200MB चे डाऊनलोड केले की इंटरनेट न वापरता route tracing झकास होते. बॅटरी फारशी खात नाही आणि नकाशे छान रंगीत असतात.
सूचना आणि दुरुस्ती यांचे स्वागत. पुढे जाणाऱ्या पर्यटकांना माहिती उपयोगी पडावी म्हणून लेखाचे प्रयोजन.

प्रतिक्रिया

अगदी, अगदी.

रामेश्वरम मला आवडलेल्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे.

लेख खरोखरच पर्यटकास मार्गदर्शक आहे.

मदुराई, रामेश्वरम,कन्याकुमारी,त्रिवेंद्रम अतिशय निसर्ग संपन्न पर्यटन आहे.

चित्रगुप्त's picture

17 Sep 2025 - 10:34 pm | चित्रगुप्त

उत्तम, माहितीपूर्ण लेख आवडला. आर्थिक, शारीरिकदृष्ट्या झेपते आहे, तोवर भरपूर फिरून घ्यावे.
मला अजून खूप काही फिरायचे, बघायचे आहे (उदा. रशियातील संग्रहालये) पण सध्यातरी जास्त चालणे शक्य होत नसल्याने यापुढे कितपत जमेल याची शंकाच आहे.

भारीच,मी तुमच्याकडून एकदातरी रेल्वे ट्रिप नियोजन करून घेणार आहे . रेल्वेचा शून्य अनुभव आहे.

नक्कीच करून पाहा. रेल्वे प्रवासाचे फायदे बरेच आहेत.

आठशे किमी किंवा अधिक प्रवासाला कार उपयोगाची नाही.
तुमच्या अहिल्या नगरला जवळचे मेन लाईन स्टेशन मनमाड आहे आणि तिकडून खूप गाड्या आहेत. भोपाळ, किंवा कोटा येथे जाऊन पुढचा आणखी प्रवास करून म.प्रदेशातील ठिकाणे किंवा राजस्थानातील ठिकाणे करून परत मनमाडला येणे शक्य आहे.

श्वेता व्यास's picture

18 Sep 2025 - 9:56 am | श्वेता व्यास

खूप छान रीतीने सर्व माहिती सांगितलीत कंजूस सर.
मला तुमचं या गोष्टीचं फार कौतुक वाटते की तुम्ही त्या त्या भागातील लोकल ट्रान्सपोर्टने प्रवास करता.
आम्ही एकतर हॉटेल्स स्वतः बुक करून स्वतःची गाडी घेऊन फिरतो किंवा पूर्णपणे प्रवास कंपन्यांवर अवलंबून राहतो.
असं तिकडे जाऊन तिकडचं तिकडे प्रवासाचं बघू अशी हिम्मत अजून कधी केली नाहीये.

प्रचेतस's picture

19 Sep 2025 - 5:59 am | प्रचेतस

कसे जावे, कुठे राहावे, काय खावे ह्यांचे बारीकसारीक तपशील तुमच्या वर्णनात असतात. धनुष्कोडीला जाऊन आलात की नाही?

कंजूस's picture

19 Sep 2025 - 10:02 am | कंजूस

हो. गेलो.

आता जो धनुष्कोडीचा रस्ता आहे त्याच्याच डावीकडे पाचशे मिटर्सवर जुना मार्ग आहे( होता) . गाव, बाजार, रस्ता आणि रेल्वेही होती. श्रीलंकेशी( सिलोनशी )व्यापारही चालायचा. गावांत वस्तीही होती. रेल्वे स्टेशन, पाण्याची टाकी ( वाफेच्या एंजिनास पाणी देता यावे यासाठी) होती त्यांचे खांब उरले आहेत. देवळे आणि चर्चाही होते. मला लहानपणीची एका मावशीचे चारधाम यात्रेचे बोल आठवतात. ती साठ साली यात्रा करून आलेली. - "धनुष्कोडीला रामेश्वरहून जाण्यासाठी आगगाडीत बसलो. रेल्वेचे लोक आले आणि सांगितले की वाटेत वारा फार जोरात आहे तरीही खिडक्या अजिबात बंद करायच्या नाहीत. गाडी ढकलली जाईल." - तर यानंतर १९६४ मध्ये मोठी सुनामी आली आणि ती गाडी प्रवाशांसह समुद्रात वाहून गेली. तो सर्व पट्टाच गाव वस्तीसह बुडाला. त्यांचे एक टक्का अवशेष राहिलेत.
जाताना एक पाटी लागते " no drone zone area." इथून ड्रोन उडवले तरी ते काय भारताची सागरी हद्द ओलांडून श्रीलंकेच्या हद्दीपर्यंत जाणार आहेत का असा विचार आला. ( धनुष्कोडी ते तलैमानार अंतर २४ किमिटर आहे. इथून श्रीलंका दिसते असं खोटंच सांगतात) तरीही काही यूट्यूबर उद्योग करतात आणि पोलिस ते जप्त करतात आणि नंतर तंबी देऊन सोडतात. असा एक विडिओ पाहिला आहे.
तसे रामेश्वरम् हे पौराणिक , ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थान आहे. कन्याकुमारीपेक्षा इथे जरा जास्तीच आपलेपणा वाटतो.

कर्नलतपस्वी's picture

19 Sep 2025 - 11:25 am | कर्नलतपस्वी

चर्च, रेल्वेस्थानक, रेल्वे रूळ,गावातल्या वसाहती सर्व खुणा बघितल्या. काही फोटो आहेत कायप्पावर शेर करतो.

आतामात्र भरपूर बदलले आहे असे कळते.

कन्याकुमारी व रामेश्वरम अतिशय शांत पर्यटनस्थळे होती आता भरपूर गर्दी असावी.

कंजूस's picture

19 Sep 2025 - 2:37 pm | कंजूस

काही बदल नाही.

कारण १९६४ च्या सुनामीनंतर सरकारने निर्णय घेऊन टाकला " नो डेव्हलपमेंट झोन" . त्यामुळे इथे काहीही बांधकाम होत नाही. आपल्या वाहनाने किंवा भाड्याच्या वाहनाने गेल्यासच त्या तीन चार जागांवर थांबून पाहता येतात. पण बसने गेल्यास थेट शेवटच्या अरैच्चल मुन्नाईलाच सोडतात. यूट्यूबवरचे विडिओ पाहिल्याने कल्पना आलीच होती आणि वेळ घालवला नाही. तसेही इकडे ऊन फारच जाणवते वारा असला तरी. तिकडे समुद्रकाठाशी थोडी वाळू असलेल्या ठिकाणी काही लोक आंघोळी करत होते आणि पाणी फारच स्वच्छ होते. अग्नितीर्थावर स्नान करण्यापेक्षा खूपच चांगले. तुमचे फोटो पाहिले आणि अजूनही तसेच ओसाड आहे. फक्त एक बदल झाला तो म्हणजे एक वॉच टॉवर उभारला आहे. दीपगृह नाही.

कन्याकुमारीला २०१०, २०१२ ला गेलो होतो.

तिकडे मात्र गर्दी शंभरपट वाढली आहे. मागच्या डिसेंबरला विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लुवर स्मारक या दोन खडकांदरम्यान काचेचा पूल उभारला आहे त्यामुळे गर्दी वाढली. बरेचसे पर्यटक केरळ सहलीतून तिरुवनंतपुरमहून कन्याकुमारीला येतात. तिकडे पद्मनाभस्वामी मंदिरातला खजिना हे एक २०११ पासूनच गर्दी खेचण्याचं कारण आहे. केरळ पर्यटक यादीत किती वरती आहे ते समजू शकते.

उत्तम, माहितीपूर्ण लेख आवडला.

गणेशा's picture

19 Sep 2025 - 6:38 pm | गणेशा

छान लेख..

नुकतेच कंपनीच्या कामासाठी चेन्नई ला जाणे झाले..
तेंव्हा महाबलिपुरम साठी ऑफिस वाल्यान्च्या नकळत टाइम काढला..

खुप्पच सुंदर वाटले तेथील शिल्प मंदिर पाहून..

रामेश्वरम पण नक्कीच जाईल