जाता पंढरीसी....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
5 May 2025 - 7:29 pm

"जाता पंढरीसी सुख वाटे जीवा....."

आजी आजोबांची पंढंरी म्हणजे नातवंड. पोटासाठी दाहीदिशा अशा परिस्थितीत बरेच आजीआजोबा या सुखापासून वंचितअसतात. कवीवर्य बाकीबाब म्हणतात तसेच,

"पिलास फुटूनी पंख तयांचे घरटी झाली कुठे कुठे.....",

आमचेही एक पिल्लू दुरदेशी गेलयं. भलं हो त्या इंजीनिअरांचे ज्यांनी व्हाट्स अप सारखे तंत्रज्ञान बनवले.विसाव्याच्या क्षणी सहवास नाही पण कमीतकमी संपर्क तरी होतो. तरूण पणी या गोष्टी सहज वाटतात. कांचनसध्येला मात्र प्रकर्षानं जाणवतं,अंतर्मुख व्हायला होतं अशा वेळेस मुलं, नातवंड दुर असणं याची खंत वाटणं आणी आजी आजोबांनी एकमेकांची समजूत काढणं हे सगळ एखाद्या कविते सारखं आणी नेमक हेच कविवर्य बाकीबाब यांनी "आता विसाव्याचे क्षणं",या कवितेत सशक्त पणे मांडलयं. प्रत्येकात हे आजी अजोबा असतात तेव्हां बाकीबाब त्यांची मनस्थिती वर्णन करताना कवितेत म्हणतात

"कधी होती डोळे ओले,मन मानसाची तळी
माझे पैलांतले हंस डोल घेती त्याच्या जळी"

"मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवें
दुर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हांसवे"

"बाकीबाब दा जवाब नही"..

एक अफलातून कवी आरती प्रभू,यांचा नक्षत्रांचे देणे हा कवितासंग्रह वाचनात आला. त्यातील "दोन पोक्त पाने"ही कवीता वाचनात आली. कवीच्या मनात कही वेगळे असेल परंतू मला मात्र दोन समवयस्क म्हातार्‍यांची तुलना वाटली.

दोन पोक्त पानं:
एक पिवळंशार ,दुसरं हिरवेगार
बाजुबाजूला ;
दोघांचे देठ एकत्र थेट
एकावरल्या रेषा, दुसरं वाचतयं
स्वतःच्या रेषातनं पसरतयं
पहिल्याच्या अंगात....

म्हातारपण मनाची अवस्था आहे व उद्याकडे बघत आनंदाने जगणं हे तारूण्य आहे. मी उद्याकडे बघणारा. उद्या उजाडलं तरी ठिक, नाही उजाडलं तर मला काहीच कळणार नाही म्हणून आनंद. आसो......

सातासमुद्रा पलिकडे वाढणारी दुधावरची साय मोठी झाली होती. दररोज बोलणे होत होते. आता,चांगलेच समजू लागले होते.आजोबा इकडे या म्हणून बालहट्ट सुरू होता.तीन वर्षापूर्वी गेलो होतो.आठवणी उसळ्या मारू लागल्या.आम्हांलाही ओढ लागली, जाण्याचे निश्चित केले.अजून वेळ होता तरी बालहट्ट, नुसते आश्वासन नको म्हणून सहा महिने आगोदर तिकीट करायला लावले.अम्रिकेच्या वारीचा अनुभव असल्याने टेन्शन नव्हते. दररोजच्या संवादात एक विषय, वेगवेगळ्या योजनांवर सांगोपांग चर्चा रंगू लागल्या. खोडकर मन पुर्वानुभवावर तुकबंदी करण्याचा प्रयत्न करू लागले. तुकोबाराय म्हणतात, "मन चंचल चपळ,जाता येता न लगे वेळ",तद्वत शब्दच्छल.

अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे
खिशाला फुटतात शंभर फाटे

तेवीस किलोत फक्त कपडे चार
आवांतर सामानाची गर्दीच फार

महिनाभर आगोदर येते यादी
म्हातारी वादी, म्हातारा प्रतिवादी

बुधानी,कल्याणी,चितळे, कयानी
वडी,सांई,जरा बेताने खर्च करा नी

कलश,कालनिर्णय,कढाई,पेशवाई
रोज पॅन्ट शर्ट तरी पैठणीची अपुर्वाई

म्हातार्‍याची वडवड,चश्म्याची वाट
पायाला भिंगरी अन कण्हारली पाठ

सामानाची मांदियाळी बॅगा झाल्या भारी
काय सांगू,अम्रिकेच्या आधी पुण्याची वारी

तयारी झाली ,म्हातारीनं घेतली बॅक सिट
म्हातार्‍याच्या नावानं फाडतीया तिकीट

पिझ्झा, बर्गर... आठवणीने,काटा आला
म्हातार्‍याला आधार चकणा न प्याला.

आपलाच खिसा अन् आपलेच पोट
आपलेच दात अन् आपलेच ओठ

काय सांगू मित्रांनो.....
अम्रीकेच्या वारी,भेटे दुधावरची साय
मन पाखरू पाखरू,वारी वारी जाय.

अम्रीकेस जाण्यास तीनच महिने राहिले होते. परिस्थीती बदलली. पंचमहाभुतांच्या आपसात कुरबुरी चालू झाल्या.प्रकृती लोहगडा सारखी पण अचानक भगदाड पडले.निदान झाले.रक्त वाहिन्या, तणावा (Stress) मधे ४९% तर विश्रांती (Rest) मधे ६१% प्रवाही आसल्याचे निदर्शनास आले. तीन मुख्य धमण्या अवरूद्ध झाल्या असून पुर्ववत करण्यासाठी योग्य ती उपाय योजना (ओपन हार्ट सर्जरी) करावी लागेल म्हणून सांगीतले.चिरफाड करण्यासाठी तयार नव्हतो.

"जब होवेगी उमर पूरी तब छुटेगा हुकूम हुजुरी.".

यावर पक्का विश्वास,तसेच,सर्व जबाबदाऱ्या संपल्या,"इश्वरेच्छा बलियसी ",असे म्हणत निर्धास्त,त्यामुळे साफ नकार दिला व आहे त्या परिस्थितीत डिस्चार्ज द्या म्हणून विनंती केली.

हृदयरोगतज्ञ परिचयातले,शल्य चिकित्सकांचा सल्ला घेतला.तज्ञांनी ऑपरेशन करता नकार दिला.माझ्या पथ्थ्यावर पडले.एन्जिओप्लास्टी केली,उजव्या धमणी मधे एक स्टेन्ट टाकला,औषधे दिली.उर्वरीत निर्णय एक महिन्या नंतर घेऊ असा सल्ला दिला.घरी परतलो. आप्तेष्ट, नातेवाईक,मित्रपरिवारनी गाठीला असलेल्या पुरचुंड्या सोडायला सुरवात केली.मला पर्यायी औषधांवर थोडा विश्वास आहे.पुदिना,लसूण कोथिंबीर,जिरा,मिर्ची व लिंबू यानी बनवलेली चटणी,ॲन्टी ऑक्सिडंन्ट,युरीक ॲसीडचा कर्दनकाळ,मुत्रपिंडाची कार्यक्षमता वाढवते असे एका मित्राने स्वानुभव सांगीतला. सर्वच रोजच्या खाण्यातल्या.एक मोठा चमचा रोज जेवणात घ्यायला सुरुवात केली.

माझ्या ऐंशी वर्षाच्या काकांनी लसूण,आले, सफरचंद व्हिनेगर,मध याचा अनुपातीक काढा दररोज एक चमचा घ्यायला सांगीतला. तब्येत सुधारत गेली.

एक महिन्यानंतर पुन्हा तज्ञांची भेट घेतली. अम्रिकेला जाऊ शकतो का म्हणून विचारले. साफ नकार दिला. सर्व परिस्थिती उलगडून सांगीतल्यावर पुन्हा एकदा स्ट्रेस एम पी आय (Stress M P I) परिक्षण करून घ्या,नंतर आपण विचार करू. संबधित विभागात संपर्क केल्यावर कळाले,परिक्षणा साठी हवे असलेले न्यूक्लिअर मेडिसीन उपलब्ध नाही पंधराएक दिवस लागतील.टांगती तलवार तशीच लटकत राहिली.तयारी काहीच नव्हती. तणाव वाढत होता. अनिश्चितता चिंतेत भर टाकत होती. निर्वाणीचा पांडुरंगाची सतत आळवणी करत होतो.

"भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते "

शेवटी परिक्षण झालं.सर्वांच्याच प्रार्थनेला यश आलं.निदान झाले. रक्त, तणावात ७०% आणी विश्रांती मधे ७०% प्रवाही आसल्याचे समजले निदर्शनास आले.याचा अर्थ हृदय पुर्ण क्षमतेने काम करू लागले होते.हृदय पुर्ववत तरूण झाले.तज्ञ सुद्धा आनंदी झाले, घेतलेला निर्णय योग्य व कष्ट फलद्रूप झाले होते.तज्ञांनी लगेच परवानगी दिली.लगीनघाई सारखी लगबग सुरू झाली.बालकवींची गाणे कानात रूंजी घालू लागले.

'आनंदी आनंद गडे,इकडे तिकडे चोहीकडे".

एका आठवड्यात सर्व तयारी केली. ठरल्या प्रमाणे आमचं वऱ्हाड अम्रीकेकडे झेपावले. हवाई सेवा फ्रान्सची होती. उद्घोषणा फ्रेंच व इंग्लिश भाषेत होत होत्या.रात्रीचा दिड वाजला होता.आठवड्यापासून दगदग चालू होती. प्रवासाच्या दिवशी मिनिटभर सुद्धा चैन नव्हते. हवाई प्रवासाचे सर्व सोपस्कार कुठली अडचण न येता पार पडले. विमानात बसल्या बसल्या लगेचच झोप लागली.चार तास मस्त झोप झाली.चारी बाजूस नजर फिरवली.काही सहप्रवासी जागे,काही झोपेत होते. चहाची तल्लफ आली आणी पावले पेंन्ट्रीकडे वळाली. एक हवाई सुदरी स्टुलवर बसून पुस्तक वाचत होती.मला बघताच तीच्या चेहर्‍यावर (बेगडी) स्मितहास्य फुलले.

मी-"वन कप ऑफ टी",
हवाई सुंदरी-"प्लीज".
मी-"वन कप ऑफ टी".
ह. सू-"प्लीSssssज".
असे संभाषण दोन तीन वेळा झाले.मला काही कळेना की माझं काय चुकतंय.

अचानक डोक्यात प्रकाश पडला.लक्षातआले, मी आंग्ल भाषेत बोलतोय व बोलताना त्यांच्या भाषा सभ्यतेच्या मर्यादांचे उल्लंघन करतोय.

"हायला! आता काय सांगू या बाईला? "

" कृपया मजला एक कप चहा मिळेल काय?किवां कृपया एक कप चहा द्याल तर फार उपकार होतील". हे कसं वाटतं!

हवाई सेवा हा व्यवहार आहे. पैसे देऊन विकत घेतलेला. शिष्टाचार पाळला तर उत्तम पण समजा अनावधानाने नाही पाळला गेला तरी काही वावगे नाही.

आपली मातृभाषा म्हणजे साधी,सोपी,सरळ. सुंदर. एक प्रकारचे मार्दव असलेली मरहाट्टी शत्रुच्या छातीत धडकी भरवणारी,अबलांना सहायक वाटणारी.मी रांगडा शिपाई आणी तो सुद्धा, "महाराष्ट्र देशा, कणखर देशा,दगडांच्या देशा",चा पाईक. माझी भाषा रोख ठोक.

असो, मी माझ्या विनंतीला प्लीजची फोडणी दिली. "May i request a cup of tea, please !",तीने विजयी हास्या सोबत चहा दिला.तोही तीच्या सारखाच पुळचट. ह.सु. साठी मस्त कडक तीन अक्षरी "XXX",अस्सल मराठी भाषेतले विशेषण लावले,अर्थात, मनातल्यामनात.जोरात उच्चारले असते तरीही ही तीला कळलेच नसते.काहीजण असभ्य म्हणतील पण इलाज नाही. तीला माझी भाषा येत नाही तर माझ्या भाषेचे सौंदर्य कसे माहीत असणार.कमीतकमी मला तुटकी फुटकी का होईना पण तीची भाषा येत होती. शिष्टाचार पाळणे ही चांगली गोष्ट

कागदी पेल्यातला पुळचट चहा घेऊन जागेवर जाऊन बसलो. विमानाच्या मध्यभागी आसन होते. बाहेर बघायचे म्हटंले तर पाच सहप्रवासी ओलांडून पलीकडे खिडकी त्यामुळे उगवतीचे सौंदर्य जमेल तसे न्याहाळत होतो.खिडकी जवळ एक कर्मदरिद्री मान खाली घालून भ्रमणध्वनी गोंजारत होता.बाकीचे ही तसेच. कुणी पेंगत होते,कुणी घोरत होते.मला त्यांची कीव आणी रागही आला. "गाढवाला गुळाची आणी माळणीला लसणाची चव काय म्हणा.."

अशी ही युरोप खंडावर उगवणारी सकाळ व माझ्या अम्रिकेच्या तिसऱ्या वारीची सुरवात झाली.

स्वमग्न अवस्थेत अपसुकच अनुभवांचे गाठोडे उघडते.असाच एक अनुभव लखनौ मधील, पहिलाच दिवस होता.सोळा सतरा वर्षाचं कार्टं (कार्ट आणी वर्षा काही संबध नाही,हे भाषेचे सौंदर्य आहे),स्टेशनाच्या बाहेर सायकल रिक्षावाल्याला विचारत होतं," तुम तोफखाना बाजार मे चलता क्या?",त्याला राग आला म्हणाला "हमे आप बोलो,कैसे बदतमीजी से बात करते हो" ब्ला,ब्ला,ब्ला.... त्याचा आवतार, कसाबसा गुडघा झाकणारा लाल गमछा, डोळ्या समोर धरला तर सहस्र चंद्रदर्शन घडवणारा कळकट गंजीफ्राक आणी सतत पान खाऊन किडलेले दात.मनातल्या मनात कडक शिवी हासडली, म्हटलं, रुबाब तर बघा, "गांडीवर हाणा पण बाजीराव म्हणा". लखनऊ मधे सारेच नबाब.साठी ओलांडली, गाठीला अनुभव भरपुर आहेत. सांगत बसलो तर मुळ मुद्दा बाजूलाच राहील.

भाषा हे संवादाचे प्रभावी साधन. जेव्हां दोन भिन्न भाषीय तात्पुरते एकत्र येतात तेव्हां शिष्टाचाराचे आवडंबर माजवू नये या मताचा मी आहे.शिष्टाचार आपल्या जागी ठिक पण वरचढपणा सिद्ध करण्यास किवां कुणाला अपमानीत करण्यासाठी भाषेचा उपयोग करू नये. भावना पोहचतली एवढेच बघावे. असो, पाचही बोटं एकसारखी नसतात. तुकोबाराय म्हणतात,

बोलावे बरे |बोलावे खरे ||
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे||

खिडकीबाहेर,आकाशात सुर्यबिंब हळुहळू वर येत होते.नेहमी डोंगरा आडून उगवणारा सुर्य आज कुठल्याही अडथळ्या शिवाय सरळ आकाशातून उगवताना बघणे अद्भुत अनुभव होता.आकाश निरभ्र होते.कवी ग. ह. पाटील यांची पहिल्या यत्तेत पाठ केलेली कवीता आठवली, मुद्दाम शिकलेली म्हणत नाही. कारण कवीतेचा खरा अर्थ त्या वयात कळत नसतो."देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सुर्य देतो".कविवर्य सुधीर मोघे ,"फिटे अंधाराचे जाळे ",फेम, आज असते तर त्यांना विचारले असते! हा अद्भुत अनुभव त्यांनी कसा टिपला असता.

हवाई सुंदरी सोबत काही हवाई नरपुंगव सुद्धा होते.विमान बहुधा स्वयंचलित प्रणालीवर टाकून पायलट आरामात बसले असावेत. ह.सुंदरी, इतर कर्मचारी आणी प्रवासी साखरझोपेत असल्याने निरव शांतता होती. बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी जागे होते. सुर्योदया बरोबर विमानास जाग आली. कवी मोघे यांच्या शब्दात सांगायचे तर," सुर्य जन्मता डोंगरी,संगे जागल्या सावल्या". प्रसाधनगृहा जवळ प्रवासी उभे दिसू लागले. स्टाफची अचनक लगबग सुरू झाली. नाष्ट्याची वेळ,एअर फ्रान्स हवाई सेवेतील संबधित कर्मचारी भारतीय प्रवाशांना आवर्जून विशिष्ट आवाजात विचारत होते, "मस्साला टी ". नाष्ट्या मधे खाण्याजोगे,एक चमचा उपमा, एक इडली, तीस मिलीलिटर सांबार त्यात एक शेवग्याच्या शेंगेचा तुकडा. बाकी मेदाची (Cholesterol) ची मांदियाळी.कप केक,टेट्रा पॅक मधे ज्युस,चार वेफर्सचे तुकडे.बाकी,चहा मस्त होता.

गंतव्य स्थान जवळ आले होते.कर्मचारी आणी प्रवासी "संपला एकदाचा", म्हणून सुटकेचा निश्वास टाकत होते. कर्मचारी कचरा गोळा करत होते.कप केक,टेट्रा पॅक मधे ज्युस,चार वेफर्स चे उरलेले तुकडे बघून तो आम्हांला म्हणला,"ठेवून घ्या,नाहीतरी हे कचऱ्यातच जाणार आहे."अन्न हे परब्रह्म ",असे संस्कार असल्याने ते उरलेले पदार्थ पिशवीत ठेवले. "देवा घरचे ज्ञात कुणाला",माहीत नव्हते की पुढे जाऊन हेच पदार्थ थोड्या वेळेपुरते का होईना पण आमचा रक्तदाब वाढवणार आहेत.

उद्घोघोषणा झाली,विमानाला सुद्धा प्रवास संपल्याचा आनंद झाला असावा. त्याने पण खाली उतरताना आनंदाने तीन चार उड्या मारल्या.

पुढील उड्डाणासाठी आठ तास प्रतिक्षा करावी लागणार होती.प्रथम सुरक्षा प्रणाली पार करू व नवीन प्रस्थान/उड्डाण जेथून होणार आहे तीकडे जाऊन आरामशीर बसू असा विचार केला. विमानतळ सुंदरच होता. सुचना फलक फ्रेंच भाषेत होते.जागोजागी वाटाडे,सुरक्षा रक्षक व डिजीटल फलक प्रवाशांना अथक मार्गदर्शन करत होते. एका ठिकाणावरून दुसरीकडे जाण्यासाठी विजेच्या गाड्या होत्या. अथक फेऱ्या मारणारी छोटी वातानुकूलित अत्याधुनिक फुलराणी होती. सुरक्षाद्वारी सामान तपासणीत टेट्रा पॅक पेय बघून सुरक्षारक्षकांच्या कपाळावर आठ्याचं जाळं उमटलं आणी त्यांनी खोपच्यात घेतलं. पेय काढून घेतलं आणी उद्धटपणाने म्हणला," हे पिण्यासाठी दिले होते ,नेण्यासाठी नाही"'. "अरे,तुझ्याच भावाने आम्हांला घेऊन जा म्हणून सल्ला दिला",समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. आमच्या सारखे आणखीनही काही प्रवासी बघून जरा हायसे वाटले. मागोमाग सौभाग्यवती सुरक्षा वेशीतून (मेटल डिटेक्टर गेट) येताना धोक्याची घंटी वाजली. सुरक्षा रक्षीणीने खालपासून वरपर्यंत चाचपले.मंगळसूत्र,बांगड्या,कुड्या सर्व धातूचे सामान आगोदरच तबाकात (ट्रे) काढून पुढे पाठवले होते. आता काय राहीले? काहीच कळेना.परिस्थीती गंभीर होऊ लागली.दोन वरीष्ठ "त्रिजटा",विचार विमर्श करू लागल्या.अचानक माझ्या लक्षात आले,मी ओरडलो, "अगं,आंबाड्यात पिना असतील बघ! ". हुश्श........

सोपस्कार संपवून गंतव्य फलाटावर ( गेट) येवून बसलो. पोटात कावळे ओरडत होते.मुलं सबवे,मेकडी च्या शोधात गेले.आम्ही दोघांनी घरून आणलेले तहान लाडू भुक लाडू बाहेर काढले.तिखट मीठाच्या पुर्‍या आणी लसुण चटणी.चटणीचा मस्त घमघमाट सुटला. आजूबाजूस बसलेल्या प्रवांशाची नजर आमच्याकडे वळाली. विमानतळावर पुरी चटणी खाणे काही जणांना "डाऊन मार्केट ", वाटतअसावे.आम्हीं मात्र एन्जॉय करतो. स्वच्छता कर्मचारी अखंड विमानतळ साफ सुदंर ठेवण्यासाठी झटत होत्या.थोड्याच वेळात कुठुन तरी दोन चिमण्या अगदी पाया जवळ आल्या.कितीही काळजी घेतली तरी पुर्‍या आपल्या पाऊलखुणा सोडतात. भारतीय चिमण्यां असाव्यात.खाली पडलेला चुरा टिपत होत्या.पाण्याची बाटली आणण्यासाठी स्वयंचलित मशीन कडे गेलो. दोनशे पंचवीस रूपयात दोनशे पन्नास मिली लिटर पाण्याची बाटली खडकनं आवाज करत बाहेर पडली. बाटलीचा आकार व बिल बघून रक्तदाब क्षणभर वाढला. मनालाच समजावले. पुढे आल्यावर फ्रेंच मधे "eau potable",असा फलक दिसला. पैकी 'पोटेबल' हा शब्द माहीत असल्याने व तेथील मशीन बघून पिण्याचे पाणी भरण्यासाठी व्यवस्था आहे हे कळाले.नंतर मात्र स्वयंचलित मशीनकडे गेलो नाही.

बाकी दिवसभर काही विशेष घडले नाही.पुन्हा एकदा पारपत्रक आणी तिकीट तपासणी झाली. विमानात जाऊन बसलो. उद्घोषणा झाली,"तांत्रिक बिघाडामुळे प्रस्थानाला उशीर होणार आहे, दिरंगाईबद्दल क्षमा असावी". थोड्या वेळात पुन्हा दुसरी उद्घोषणा कानावर आली, "आपल्याला सुचीत करण्यात आनंद वाटतो की तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात यश मिळाले आहे आणी आपण गंतव्य स्थानाकडे लवकरच कुच करत आहोत." सर्व उदघोषणा फ्रेंच मधे होत्या. तुम्हांला कळणार नाही म्हणून मराठीत.भाषांतर करून सांगत आहे. अर्थात मलाही कळाले नव्हतेच.इंग्रजी उच्चार खऱ्या अर्थाने कानावरून गेले. शेजारच्या प्रवाश्याने समजावून सांगीतले.

तत्कालीन राजकिय परिस्थीती,पाॅलिसी आणी परदेशीयांचे केलेले डिपोर्टेशन या सर्व पार्श्वभूमीवर खुप काही चेकिंग,विचारपूस होईल आपल्याला कुठेतरी जाळ्यात पकडतील आणी आल्या पावली जा म्हणतील अशी भीती वाटत होती. पण,असे काहीच झाले नाही. इमिग्रेशन,कस्टम, आगमन कुठेच काहीच त्रास,विचारपूस झाली नाही.पु. लं.च्या भाषेत, "अगदी,रत्नांग्रीच्या आगारातून बाहेर पडावे", इतके सहज बाहेर पडलो.प्रवास सुखरूप झाला.

मुलगी,जावई आपापल्या गाड्या घेऊन स्वागतासाठी अतूर होते.आठ वाजले होते. बाहेर कडाक्याची थंडी होती.पुण्यातील चाळीस डिग्रीतून अम्रीकेत चार डिग्रीत पोहोचलो होतो.आगीतून उठून फुफाट्यात पडण्या सारखीच परिस्थिती....

रात्री मस्त गप्पा व नंतर झोप. ब्रह्ममुहुर्तावर जाग आली. घरातले सर्व साखरझोपेत होते. मी मात्र एक चमचा साखर टाकून आल्याचा, "वाघ बकरी",टाकून चहा बनवला.दिवाण- खान्यात बसून सूर्योदय होण्याची वाट बघू लागलो.तयार होऊन कॅमेरा उचलला. बाहेर पक्षांचा चिवचिवाट ऐकून हळूच दार उघडले. शेजारच्या आंगणात पक्षांना दाणे (Bird Feeder) ठेवले होते. चिमण्या,हाऊस फ्लिंच,डोनी वूडपेकर, काॅमन स्टर्लिग, रेड विंग्ड ब्लॅक बर्ड ,अमेरिकन राॅबीन बरोबरच जायंट स्क्विरील सकाळचा नाष्टा करत होते. त्वरीत ते दृष्य कॅमेऱ्यात कैद केले.सारेच नवीन पक्षी होते.रंगबिरंगी,वेगवेगळ्या आकाराचे.यावेळेस, अम्रीकेतले पक्षीदर्शन माझी वारी आनंदायी करणार असा विचार करत होतो.अचानक,एक आक्टोजेनेरियन सुटबुट धारी, गोराचिट्टा,पांढरी बुल्गानीन दाढी आणी कपाळावर प्रश्न चिन्ह घेऊन शेजारी लगबगीने बाहेर आला. "Any problem?",मी म्हणालो "No,I am enjoying birds". मी माझी ओळख करून दिली,भारतातून मुलीकडे आलोयं,पक्षीदर्शन माझा छंद आहे.सकाळी नवनवीन पक्षी भेटतील म्हणून बाहेर पडलो आहे.कपाळावरच्या आठ्या वितळल्या.स्वताच्या मोबाईल मधून काढलेले फोटो दाखवत, सोसायटीत कुठले पक्षी कुठे दिसतील म्हणून उत्साहाने सांगू लागला. "मी बर्ट, सोसायटी व्यवस्थापन प्रमुख",म्हणून ओळख करून दिली. भेटी बद्दल आनंद व्यक्त केला. दिवस चांगला जावो म्हणून शुभेच्छा देत घरात निघून गेला.याच माणसाने काही दिवसांपुर्वी माझा नातू घरात उड्या मारतो, गोंधळ करतो म्हणून नऊशे आकराला फोन केला होता.

मी सुद्धा प्रस्थान केले......

विशेष नमूद:- जुने जाणते मिपाकर दांपत्य श्रीरंग जोशी आणी जुई यांनी आवर्जून आठवणीने, आपुलकिने चौकशी, विचारपूस केली. घरी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले.

मिपाखरांचा जवाब नही.....

प्रतिक्रिया

शीर्षक पाहून पंढरपूर भटकंतीवर लेख लिहिलाय की काय असे वाटले पण सुखद अपेक्षाभंग झाला.
अचानक आलेल्या आरोग्यविषयक अडचणींचा यशस्वीपणे सामना करत आपली आम्रविका वारी यशस्वीपणे होते आहे. नातवंडांच्या आनंददायी भेटीसोबतच तिथेही आपण आपला पक्षीनिरीक्षणाचा छंद जोपासता आहात.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत.